जाब!

Submitted by जो on 2 July, 2009 - 08:45

जीवा पुन्हा धाडधाड करत घराबाहेर निघुन गेला. त्याची आई मात्र एका खुर्चीवर बसुन राहिली.हे त्याचे नेहमीचेच होते. स्वतः वरच राग करायचा, आदळापट करायची, आणि बाहेर निघुन जायचे. आई मात्र काहिही बोलत नसे. तो बोलत असला की तशीच बसुन राही. तो गेला की सर्वशक्तीनिशी कामाला लागत असे. आजमात्र जीवाने बोललेले शब्द जिव्हारी लागले होते…
*****************************************************************************************************************
५० वर्षांआधी जेव्हा उमाचे लग्न झाले तेव्हा ती जेमतेम १७ वर्षांची होती..लग्नं होऊन ती अनेक स्वप्ने घेऊन सासरी आली होती.नवरा खुप शिकलेला ,हुशार, एका बॆंकेत नोकरीला होता. स्वभावाने बरा होता. त्याला वाचनाची फ़ार आवड होती..नेहमी तो काही न काहीतरी वाचतच राहत असे.

उमाचे नुकतेच खेड्यातुन शहरात स्थलांतर झाले होते. .त्याच्या या वाचनाच्या वेडाबद्दल तिला खुप अप्रुप वाटत असे.त्याच्या मानाने तिची राहणी अगदीच गावंढळ होती.तॊ कुठल्याही लग्नाकार्याला, किंवा कार्यक्रमाला तिला घेऊन जात नसे. पहिल्या वर्षातच उमाला बाळाची चाहुल लागली होती. उमाच्या नवर्याने रीतसर तिला पहील्या बाळंतपणासाठी माहेरी धाडले होते..

अवघ्या नऊ महीन्याच्या काळात तॊ तिला एकदाही बघायला आला नाही की त्याने उमाची विचारपुस केली नाही. ऊमाला त्याला भेटावेसे वाटायचे पण त्याच्या कामाची तिला जाणीव होती.. नवव्या महीन्याच्या सुरुवातीलाच उमाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. तेव्हाही काहीतरी कारण सांगुन त्याने येणे टाळले होते.उमाला आता मात्र राहवले नाही. पण ती काहीच करु शकत नव्हती.

मुलीची अशी अवस्था पाहुन उमाच्या वडिलांना राहवले नाही आणि ते आपल्या जावयाकडे , त्यांना घेऊन यायला म्हणुन गेले. बाबा “त्यांना” घेऊन यायला गेले आहेत हे ऐकुन उमाला फ़ार आनंद झाला. तिच्या शिणलेल्या चेहर्यावर प्रसन्नता आली.

कित्येक दिवसांपासुन तिला त्यांना बघायचे होते. त्यांच्या संसारवेलीवर उमलले फुल त्यांना दाखवायचे होते. आल्या आल्या ते तिला कुशीत घेतील, तिचा पापा घेतील, माझ्याकडे कृतार्थ नजरेने बघतील असे वाटुन तर तिला अधिकच अधिर व्हायला झाले होते.

दरवाज्यात बाबांना बघुन ती जरा सावरुन बसली. ते आले असावेत असा तिने अंदाज लावला. बाबा खुप दु:खी दिसत होते. त्यांनी सांगितले की उमा आता परत सासरी कधीच जाऊ शकणार नव्ह्ती. तिच्या नवर्याचं लग्न ठरलं होतं एका श्रीमंत मुलीशी. बाबांनी त्यांना समजवायचा प्रयत्न केला तर उमाच्या नवर्याने जीवानिशी मारण्याची धमकी दिली. एव्ढे सगळे बोलून ते बाकावर कोसळलेच…. उमाला काय होतंय हे समजण्याआधीच घेरी आली आणि ती बेशुध्द झाली…
*****************************************************************************************************************
लहानगी गोदा हळुहळु मोठी होऊ लागली होती. एवढे दिवसात उमाचा नवरा गोदाला बघायला सुध्दा आला नव्ह्ता..जशीजशी गोदा मोठी होऊ लागली तशीतशी तिचा वाचनाचा व्यासंग वाढु लागला होता..उमाला ह्या गोष्टीमुळे तिचे कौतुक वाटत असे…गोदा आपल्या वडीलांसारखीच हुशार होती..शाळेतही तिचा नेहमीच पहीला नंबर येत असे.. सगळे चांगले चालु होते.

गोदाचे लहानपण बघता बघता उमा आपले पुर्वायुष्य विसरु लागली होती..इतक्यात एक दिवस “ते” आले.. उमाच्या मनात त्यांना पाहून एक आशा निर्माण झाली..

इतक्या वर्षांनंतर सुध्दा त्यांच्यात अजिबात बदल झालेला नव्हता. तोच इन न केलेला कडक इस्त्रीचा शर्ट, शर्टाला सुट होईल असा पॆंट, पायात साध्या चपला आणि हातात एक पुस्तक हा त्यांचा वेष अजुनही तसाच होता. ते आले तेव्हा गोदा शाळेत गेली होती, बाबा कामाला आणि आईसुध्दा देवळात गेली होती..

उमाने त्यांना बसायला सांगितले, आत जाऊन त्यांच्यासाठी पाणी आणले. त्यांनी लगेचच उमासमोर एक कागद पुढे केला आणि तिची सही मागितली. उमाने त्यांच्यावर कुठलीही शंका नं घेता त्याच्यावर सह्या केल्या.उमाने चहासाठी विचारताच नको म्हणाले आणि फ़ार काही नं बोलताच निघुन गेले.

ते गेल्यावर उमाला क्षणभर विश्वासच बसला नाही की ते आले होते. तिने एवढे दिवस त्यांची वाट बघितली होती. कारण त्यांनी दुसरे लग्न जरी केले असले तरी ते पहिले उमाचे पती होते. त्यांचं रीतसर लग्न झालं होतं.ते आले तर त्यांच्यासाठी काय करायचे हे ही तिने योजुन ठेवले होते.

ते आल्यावर मात्र उमा हरखुन गेली होती..त्यांची भेट दोन घडीची का असेना ती उमाला अजुन काही दिवसाकरीता एक आधार देऊन गेली. तिने या भेटीबद्दल कुणालाच काही सांगितले नव्हते.

एके दिवशी उमाने नर्सिंग चा कोर्स करावा असे बाबांनी सुचवले. पैशाबद्दल बाबा काही बोलत नसले तरी उमाला आपण स्वतः कमवावे असे वाटू लागले होते. गोदाही आता स्वतःची कामे स्वतः करु लागली होती.

उमाने कोर्स ला जायला सुरुवात केली.. काही दिवसातच लोकं उमाला सिस्टर उमा म्हणुन ओळखु लागले होते. शासकीय दवाखान्यात उमाला नोकरी लागली होती..आता ती आपल्य़ा वडिलांना आर्थिक मदत करु लागली होती.
*****************************************************************************************************************

कामाच्या व्यापात जरी असली तरी उमा “त्यांना” विसरली नव्ह्ती. कधी कधी तिला अचानक ते आठवत आणि तिचं मन अधिर होत असे. त्यांच्या जवळ जावे,मला तुमची गरज आहे असे सांगावे असे तिला कित्येकदा वाटे. त्यांचा स्पर्श आठवून तिचे मन बंड करुन उठत असे. अश्यातच एके दिवशी ते आले….

आज मात्र त्यांचा मूड काही वेगळाच होता. आल्या आल्या त्यांनी उमाला डोळे भरुन बघितले..तिच्या केसांना सावरले..उमा कित्येक दिवसापासुन त्यांची वाट पाहत होती..ते येतील असा तिला विश्वास होता. हळुच त्यांनी उमाला आपल्या जवळ घेतले..उमाही त्यांच्या मिठीत विसावली.

तिची एवढ्या दिवसांची क्षुधा त्रुप्त झाली….. त्यांच्या येण्याने उमा सुखावली होती…नव्या येणार्या पुढच्या प्रत्येक दिवसाला ती आत्मविश्वासाने सामोरे जाणार होती…..तिने त्यांच्यावर केलेल्या प्रेमाचे सार्थक झाल्यासारखे तिला वाटत होते……….

काही दिवसातच तिला नविन पाहुण्याची चाहुल लागली…..आई, बाबांच्या विरोधाला न जुमानता तिने त्या बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला होता…

*****************************************************************************************************************

गोदाला तिच्या वडीलांचे सुख कधीच मिळाले नाही…आणि लहानग्या जीवालाही नाही….पण दोघांनाही त्यांचे वडील कोण आहेत, कुठे आहेत हे माहित होते. गोदा मोठी झाली..खुप शिकली.तिने आय.ए.एस ची परीक्षा अगदी लिलया पास केली होती. नुकतीच तिची डिस्ट्रीक कलेक्टर म्हणुन पोस्टींग झाली होती…

जीवा ही शिकला. त्याने बर्याच नोकर्या केल्या..पण कुठेही स्थिरावला नाही. त्याला कुणीही त्याच्या वडिलांबद्दल विचारले की प्रचंड चीड येत असे….एकीकडे तेच आपल्या जन्माला कारणीभूत आहे असे वाटुन त्याला सारखे वाईट वाटत असे. त्याच्या मित्रांच्या वडिलांकडे पाहुन त्याला आपल्या वडिलांची घृणा येत असे……

लग्नाचे वय होऊनही त्याने लग्न केले नव्हते…लोकांना तोंड दाखवायची सुध्दा त्याला लाज वाटायची…त्यांच्या प्रश्नांना लहानपणापासुन तोंड देऊन त्याला आता त्याचे जीवनच नकोसे झाले होते.. त्याचा स्वभावच चिडचिडा झाला होता..

त्याच्या वडिलांनी विल तयार केले तेव्हा त्यांनी उमाला दिलेला डिवोर्स आणि त्यानंतर जन्मलेल्या जीवाचा त्यावरचा हक्क यावर बरेच्से वाद निर्माण झाले होते.. जीवाला हे कळल्यापासुन तर तो अधिकच चीडला होता….

*****************************************************************************************************************

उमाच्या डोळ्यातुन एवढे वर्ष साठवुन ठेवलेले दुःख घळाघळा वाहु लागले होते……आज तिची सगळी शक्ती नाहीशी झाली होती….. तिने आयुष्याशी केलेला करार संपुष्टात आला होता………

जीवाने आज आपल्या आईला जाब विचारला होता….

जाब…त्याला जन्म दिल्याचा…!!!

गुलमोहर: 

कथा म्हणून ठिक आहे ... पण पटत नाही.

>>>कधी कधी तिला अचानक ते आठवत आणि तिचं मन अधिर होत असे. त्यांच्या जवळ जावे,मला तुमची गरज आहे असे सांगावे असे तिला कित्येकदा वाटे. <<<

ज्याने तिला कस्पटासारखे आयुष्यातून बाजूला सारले. तिच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली, जो माणूस फक्त घटस्फोटाच्या सह्या घेणे इतका आणि इतकाच हेतू मनात ठेवून गेल्या काही वर्षापूर्वि तिला भेटुन गेला, ज्याने तेव्हा तिची किंवा तिच्या मुलीची साधी चौकशी सुद्धा केली नाही, त्या माणसाबद्दल तिला चिड असेल की ओढ असेल?

त्यानंतर कित्येक वर्षानंतर तो आल्यानंतर अगदी शरिर संबध वगैरे म्हणजे अगदीच अतर्क्य वाटतय.

>> तिने आयुष्याशी केलेला करार संपुष्टात आला होता………<<

कसला करार?

मला ही कथा फार फार आवडली .तिचा निर्णय दिलसे मुलाचा प्रश्न दिमागसे .ही कथा म्हणजे या
दोघातील तफावत .छान .

अमी७९, आणि भाग्या...

ज्याने तिला कस्पटासारखे आयुष्यातून बाजूला सारले. तिच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली, जो माणूस फक्त घटस्फोटाच्या सह्या घेणे इतका आणि इतकाच हेतू मनात ठेवून गेल्या काही वर्षापूर्वि तिला भेटुन गेला, ज्याने तेव्हा तिची किंवा तिच्या मुलीची साधी चौकशी सुद्धा केली नाही, त्या माणसाबद्दल तिला चिड असेल की ओढ असेल??>>

पन्नास वर्षांपूर्वी तिचं लग्नं झालेलं..म्हणजे १९५० चा काळ लक्षात घेतला पाहीजे...
नवर्याचा आदर करणे, त्यालाच आपलं सर्वस्व मानणे..अशी तिची मानसिकता होती. ही मानसिकता तयार होण्यास शिक्षणाचा अभाव, तिचं खेड्यात झालेलं संगोपन ही कारणे असु शकतात..
दुसरं लग्न वगैरे करणं हे तिच्या मानसिकतेत बसणारं नव्हतं..त्यानुसार तिच्या नवर्याचा तिच्यावर हक्क होता..आणि त्याचा तिला नवरा म्हणुन आदर होता...

त्यानंतर कित्येक वर्षानंतर तो आल्यानंतर अगदी शरिर संबध वगैरे म्हणजे अगदीच अतर्क्य वाटतय. >>
शरीर संबंध आपल्याला वाटतायत..पण तिच्यासाठी तो तिच्या नवर्याने केलेला स्पर्श आहे....तिच्या लेखी तिने सही केलेल्या कागदाची काहीच किंमत नव्हती..

हं आजची एखादी पुरोगामी विचारांची मुलगी असती तर तुम्ही जे म्हणताय ते मला पटले असते...

तिने आयुष्याशी केलेला करार संपुष्टात आला होता………>>
इथे मी करार नं लिहिता तडजोड या अर्थाचा दुसरा शब्द टाकायला हवा होता...

प्रतिसादाकरीता सगळ्यांचे मनापासुन आभार......