एका 'सेक्युलर' कॉलेजाची गोष्ट

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

भारतातल्या प्रत्येक शहरात असतो, तसा अकोल्यातही एक महात्मा गांधी पथ आहे. मदनलाल धिंग्रा चौकातल्या बसस्थानकापासून जुन्या शहराकडे जाणार्‍या या रस्त्यावर शास्त्री मैदानासमोर एक उंच, मोठी आणि देखणी इमारत उभी आहे. ‘श्रीमती मेहरबानू कॉलेज ऑफ सायन्स अ‍ॅण्ड कॉमर्स’ अशी या इमारतीवर पाटी आहे. आत शिरलं की एक प्रशस्त जिना आणि समोर कोनशिला. या कोनशिलेवर अकोला गुजराती समाजानं ५ फेब्रुवारी, २००८ रोजी संमत केलेला एक प्रस्ताव कोरला आहे- ‘श्रीमती मेहरबानू ज्यूनिअर कॉलेज ऑफ सायन्स’ ही एक निधर्मी शिक्षणसंस्था आहे. या इमारतीत कुठेही, कोणत्याही धर्माच्या, पंथाच्या कोणत्याही देवाच्या, संतांच्या किंवा प्रार्थनास्थळांच्या तसबिरी किंवा मूर्ती लावण्यास सक्त मनाई आहे. या कॉलेजात विज्ञानाचे शिक्षण दिले जाते. या कॉलेजापुरते बोलायचे, तर देव अस्तित्वात नाही. त्यामुळे या कॉलेजात कोणत्याही देवाची, धर्माची प्रार्थना केली जाऊ नये. हा नियम कॉलेजाच्या दर्शनी भागात कोनशिलेवर कोरून ठेवावा म्हणजे प्रत्येकाला कायम दिसेल आणि वाचता येईल. हा नियम लिहिलेली कोनशिला या जागेवरून हटवू नये, किंवा तिची तोडफोडही करू नये. या नियमाचे उल्लंघन केल्यास कॉलेजच्या ट्रस्टींविरुद्ध कायदेशीर कार्यवाही केली जाईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी’. कोनशिलेशेजारी ’मन्सूरअली कमरुद्दीन यांनी अकोला गुजराती समाजाला दिलेल्या देणगीतून हे कॉलेज उभं राहिलं आहे’, अशी माहिती लिहिलेला एक फलक आहे.

20140902_123709.jpg

पाचसहा वर्षांपूर्वी काही कामानिमित्त या कॉलेजात गेलो होतो, तेव्हा ही कोनशिला दृष्टीस पडली. एरवी मुद्दाम थांबून वाचण्यासारखं कोनशिलांमध्ये काहीच नसतं. इमारतीची पायाभरणी कधी, कोणी केली, किंवा उद्घाटन कोणी, कधी केलं, हे तपशील असतात फक्त. ही कोनशिला मात्र वेगळी होती. एकदा वाचली, मग पुन्हा वाचली. वाचल्यावर भारावलो होतो, घशाशी आवंढा आला होता. जेमतेम दोन महिन्यांपूर्वी अतिरेक्यांनी मुंबई वेठीस धरली होती. ‘ताज’च्या घुमटातून निघणारा काळा धूर, गोळ्यांचे, स्फोटांचे आवाज अजून ताजे होते. सर्वत्र विखार, विषाद होता. हिंसेचा संबंध पुन्हा एकदा धर्माशी जोडला जात होता. शिवाय आमच्या अकोल्याला जातीय दंगलींची फार मोठी आणि उज्ज्वल परंपरा. जाळपोळ, दगडफेक यांचं अकोलेकरांना फारसं अप्रूप नाही. गुजरातेतली दंगल असो, किंवा भारतात कुठेही झालेली एखाद्या पुतळ्याची विटंबना, अकोल्यात त्या घटनेचे पडसाद उमटल्याशिवाय राहत नाहीत. किंबहुना जगात कुठंही खुट्ट झालं की इथली दुकानं धडाधड बंद होतात, आणि शाळा सुटतात. या दंगलींमुळं अकोलेकर अनेकदा होरपळून निघाले असले, तरी इथली धार्मिक तेढ मात्र कमी झालेली नाही. अर्थात ही परिस्थिती अकोल्यापुरतीच मर्यादित आहे, असं नाही. टोकेरी धार्मिक भावना सार्वजनिक जीवनातही सर्वत्रच मिरवल्या जातात. आजच्या काळाशी अजिबात सुसंगत नसलं तरी प्रत्येक बर्‍यावाईट गोष्टीचा संबंध धर्माशी लावला जातो. या पार्श्वभूमीवर मन्सूरअली कमरुद्दीन नावाचा कोणी एक धनिक ‘अकोला गुजराती समाज’ नावाच्या एका ट्रस्टला कॉलेज उभारायला पैसा देतो, शिवाय ‘या कॉलेजात धर्माचं अधिष्ठान असता कामा नये’, अशी त्याची अट मान्य केली जाते, हे जरा नवलाईचंच आणि सुखावणारं वाटलं. नंतर सुरेशभाई वोरा आणि प्रा. एन. एम. शाह हे कॉलेजचे ट्रस्टी भेटले. 'आमच्या देणगीदारांची अट आम्ही मान्य केली, त्यात आमचं मोठेपण काहीच नाही, आम्हांला त्यांच्या मतांबद्दल आदरच आहे. खासकरून आज देशभरातलं वातावरण बघितलं, तर आम्हांला या पाटीकडे बघून जरा बरं वाटतं. कलामसाहेब येणार आहेत कॉलेजात पुढच्या महिन्यात, त्यांनाही ही पाटी बघण्याची फार उत्सुकता आहे'. प्रा. शाहांकडून मग या कॉलेजच्या स्थापनेमागची विलक्षण, अद्भुतरम्य कहाणी कळली.

सध्या अमेरिकेतल्या शिकागो इथं वास्तव्यास असणारे, पण मूळचे अकोल्याचे मन्सूरअली कमरुद्दीन यांनी दिलेल्या चार कोटी रुपयांच्या देणगीतून अकोला गुजराती समाजानं हे अद्ययावत महाविद्यालय सुरू केलं. ज्यांचं नाव या महाविद्यालयाला दिलं, त्या श्रीमती मेहरबानू या मन्सूरअलींच्या पत्नी. मन्सूरअली हे अकोल्यातले एकेकाळचे प्रसिद्ध उद्योजक. पण चाळीस वर्षांपूर्वी धंद्यात त्यांना नुकसान सोसावं लागलं. देणेकर्‍यांना टाळण्यासाठी त्यांनी अकोला सोडलं, आणि सरळ पाकिस्तान गाठलं. तिथं दोन वर्षं काढल्यावर ते अमेरिकेत गेले. कष्ट करून पैसे मिळवले, आणि अकोल्याचं ऋण फेडण्यासाठी कॉलेज उभारण्यासाठी आर्थिक मदत दिली. देणगी देतानाच मन्सूरअलींनी ‘कॉलेज सेक्युलर असायला हवं, कुठल्याही धर्माचा कॉलेजशी अजिबात संबंध असता कामा नये’, अशी अट घातली होती, आणि सर्व ट्रस्टींनाही ती मान्य असल्यानं प्रवेशद्वारापाशी दगडात कोरलीही गेली.

अठराव्या शतकाच्या अखेरीस अकोल्यात स्थायिक झालेल्या गुजराती व्यापार्‍यांची पहिली पिढी ही मुख्यत: कापसाच्या व्यापारात गुंतलेली होती. पुढच्या पिढ्यांनी नंतर इतर व्यवसायांमध्येही बस्तान बसवलं. स्थानिकांशी ते मिळूनमिसळून वागत असले तरी कुठल्याही सामाजिक, सांस्कृतिक कार्याशी या मंडळींचा संबंध फारसा नसे. एकत्र येणं होई ते मुख्यत: एखाद्या सणाच्या किंवा व्यापाराच्या निमित्तानं. अकोल्यातल्या काही व्यापार्‍यांना ही बाब खटकत होती. स्वातंत्र्य मिळून एव्हाना दोन दशकं उलटली होती. नव्या शाळा, सामाजिक आणि सांस्कृतिक संस्था उभ्या राहत होत्या, आणि त्यात अकोल्यातल्या गुजराती समाजाचा सहभाग नव्हता. विदर्भातल्या या छोट्या शहरात शिक्षणाचा प्रसार करण्याच्या कामात आपलाही सहभाग असावा, निदान गुजराती भाषा, संस्कृतीचं संवर्धन करणारी एखादी संस्था असावी, या संस्थेच्या कार्यक्रमांच्या निमित्तानं गुजराती मंडळी एकत्र यावीत, त्यांच्यात विचारांची देवाणघेवाण व्हावी, या हेतूनं १९६७ साली डाह्याभाई पटेल, जंबूभाई शाह यांच्यासारखी अकोल्यातल्या गुजराती समाजातली प्रतिष्ठित मंडळी एकत्र आली, आणि या दृष्टीनं काय करता येईल, यावर बरीच चर्चा केली. गुजराती भाषा आणि संस्कृती टिकवून ठेवायची असेल, तर गुजराती भाषेत शिक्षण देणारी शाळा काढणं उत्तम, असं त्यांना वाटलं. शाळेत गुजराती माध्यमातून शिक्षण देता येईल, शिवाय नवरात्री, सरदार वल्लभभाई पटेल जयंती, गुजराती नाटकं असे कार्यक्रमही आयोजित करता येतील, या विचारातून त्यांनी ‘अकोला गुजराती समाज’ या नावाचा एक ट्रस्ट स्थापन केला. शिक्षणाचा प्रसार करणं, हा या ट्रस्टचा मुख्य उद्देश होता. याबरोबरच गुजराती संस्कृतीचं संवर्धन आणि परंपरांचं जतन हा हेतूही ट्रस्ट स्थापन करण्यामागे होता. ट्रस्टची नोंदणी झाल्यानंतर सरकारकडून शाळेसाठी जागा मिळाली. पण शाळा सुरू करायला पैसे मात्र नव्हते. शाळा बांधण्यासाठी बराच खर्च येणार होता. या खर्चाची जबाबदारी उचलली ती मन्सूरअलींनी. अकोला गुजराती समाजाचे ते पहिले देणगीदार. समाजाच्या शैक्षणिक कार्याची सुरुवात मन्सूरअलींनी दिलेल्या पंधरा हजार रुपयांतून झाली. या देणगीतून मन्सूरअलींच्या वडिलांच्या नावानं बालकमंदिर सुरू करण्यात आलं.

मन्सूरअलींचे आजोबा गुजरातेतून अकोल्याला आले. तिथं त्यांनी एक ऑइल मिल सुरू केली. या ‘अलीभाई विश्राम ऑइल मिल’चा पुढं मन्सूरअलींच्या वडलांनी विस्तार केला. मन्सूरअली हे त्यांचे सर्वांत मोठे पुत्र. लहानपणापासूनच हुशार आणि कष्टाळू. मुंबईत राहून त्यांनी वाणिज्य शाखेची पदवी मिळवली, आणि स्वत:चा व्यवसाय उभारण्याच्या दृष्टीनं हालचाली सुरू केल्या. पण त्यांच्या वडलांचं अचानक निधन झालं. आईची आणि भावंडांची सगळी जबाबदारी आता त्यांच्यावर होती. कारखान्यात अडीचशे कामगार होते. त्यामुळं वयाच्या चोविसाव्या वर्षी त्यांना संपूर्ण व्यवसायाची जबाबदारी सांभाळावीच लागली. पुढच्या चार वर्षांत मन्सूरअलींनी आपला व्यवसाय भरपूर वाढवला. आजोबा आणि वडलांप्रमाणेच शहरात त्यांनाही मान मिळू लागला. अनेक बँकांच्या, संस्थांच्या कार्यकारी मंडळांवर ते होते. अनेक उद्योजक त्यांचा सल्ला शिरोधार्य मानत असत. मूळच्या सुरतेच्या असलेल्या मेहरबानूंशी विवाह झाल्यावर त्यांनी अलिशान बंगला बांधला. मुंबईच्या कुठल्याही पंचतारांकित हॉटेलाला लाजवेल, अशी या बंगल्याची सजावट होती. दाराशी चार गाड्या होत्या. एकुणात तक्रार करायला काही जागा नव्हती.

आणि एक दिवस अचानक हे सगळं वैभव मन्सूरअलींना गमवावं लागलं. आयातनिर्यातीशी संबंधित व्यवसायातला एक अंदाज चुकीचा ठरला आणि प्रचंड आर्थिक नुकसान सोसावं लागलं. हा तोटा भरून काढणंही सोपं नव्हतं. घर, गाड्या विकल्या तरी तूट भरून निघाली नसती. आता काय करायचं, हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. अकोल्यात राहणं आता त्यांना शक्य नव्हतं. ज्या गावात राजाप्रमाणं राहिलो, तिथं दिवाळं निघणं हे त्यांच्यासाठी मानहानीकारक होतंच. शिवाय जवळ पैसे नव्हते. लोकांचं देणं फेडायचं कसं? परत व्यवसाय त्यांच्या एकट्याच्या मालकीचा नव्हता. आई, धाकटी भावंडंही भागीदार होती. देणेकर्‍यांनी कोर्टात केस टाकली, तर त्यांनाही शिक्षा होणार होती. म्हणून अकोला सोडून जाणं उत्तम. हे पळ काढणंच झालं, पण त्या परिस्थितीत दुसरं काही सुचतही नव्हतं. पण अकोला सोडून जायचं कुठे, हा मोठा प्रश्न मन्सूरअलींसमोर होता. महाराष्ट्रात, किंवा भारतात कुठेही गेले असते, तरी कधी ना कधी देणेकर्‍यांना त्यांचा पत्ता लागलाच असताच, आणि कोर्टकचेर्‍या, तुरुंग यांना सामोरं जावं लागलं असतं. शिवाय ते कंपनी भागीदारीत चालवत होते. त्यांचे दोन धाकटे भाऊही भागीदार होते, आणि त्यांनाही तुरुंगाची हवा खावी लागली असती. झालेल्या नुकसानाची जबाबदारी घेऊन देणेकर्‍यांना सामोरं जाण्याची त्यांची हिंमत नव्हती. मन्सूरअलींनी भारत सोडून जायचं ठरवलं. पण जायचं कुठे? पूर्व पाकिस्तानात जाणं सोपं होतं, शिवाय ढाक्यात स्वत:चा छोटा उद्योग सुरू करता येईल, असं त्यांना वाटलं आणि त्यांनी अकोल्यातून आपल्या पूर्ण कुटुंबासह रातोरात पळ काढला. सोबत थोडे पैसे, आणि चार कपडे होते. अकोल्याहून ढाक्याला जाण्यासाठी त्यांनी कलकत्ता गाठलं. ढाक्यात जाऊन नवा उद्योग सुरू करायचा, मग परत येऊन कर्ज फेडायचं, हे त्यांचे मनसुबे कलकत्त्यात पाऊल ठेवताक्षणी कोसळले. पूर्व पाकिस्तानात तोवर स्वातंत्र्याचं वारं वाहू लागलं होतं. मुक्ती बाहिनीनं युद्ध पुकारलं होतं आणि पश्चिम पाकिस्तानानं सुरू केलेल्या अत्याचारांमुळं लाखो पूर्व पाकिस्तान्यांनी कलकत्त्यात आश्रय घेतला होता. अशा परिस्थितीत ढाक्याला जाणं वेडेपणाच ठरला असता. आता पुढं काय, हा प्रश्न उभा राहिला. कोणीतरी सल्ला दिला, पश्चिम पाकिस्तानात जा, कराचीतही तुम्हांला पोटासाठी काहीतरी करता येईल. मन्सूरअलींसमोर दुसरा इलाजच नव्हता. पूर्व पाकिस्तानातल्या वातावरणामुळं कलकत्त्यात जास्त दिवस राहणंही शक्य नव्हतं. कलकत्त्याहून दिल्ली, दिल्लीहून लाहोर असा प्रवास करत त्यांनी कराची गाठलं.

कराचीत त्यांचे काही लांबचे नातेवाईक होते. त्यांच्या मदतीनं मन्सूरअलींनी कराचीतल्या नझमाबाद भागात एक लहान घर भाड्यानं घेतलं. आता पोटापाण्याची सोय बघायला हवी होती, पण नव्यानं पुन्हा सगळं उभारायचा जोम मात्र त्यांच्यात नव्हता. भारत सोडून पळून आल्याचा त्यांना प्रचंड पश्चात्ताप होत होता. अकोल्याची, तिथल्या मित्रांची खूप आठवण येत होती. आपण भेकडासारखं वागलो, हे कळत होतं. अकोल्यात राहून, कष्ट करून पैसे फेडायला हवे होते, असं सारखं त्यांना वाटत होतं. पण आता तिथं परत जाता येणार नव्हतं. परतीचे दोर कापले गेले होते. कराचीत पोहोचल्यावर नवं काम मिळवणंही कठीणच होतं. वणवण हिंडूनही कोणी त्यांना काम देईना. महिन्याभरानंतर एका नातेवाइकांच्या ओळखीनं एक अगदी लहान कारखाना त्यांना चालवायला मिळाला. लेथ मशिनवर काम करण्याचा भरपूर अनुभव असल्यानं मन्सूरअलींना जम बसवायला तशी अडचण आली नाही. ग्राहकांनी दिलेल्या डिझाइनप्रमाणं मन्सूरअली यंत्रांचे भाग बनवून देत. कच्चा मालही ग्राहकच पुरवत असे. हे सुटे भाग शस्त्रास्त्रांच्या निर्मितीसाठी वापरले जात. पण या कामात मन्सूरअली तसे समाधानी नव्हते. आर्थिक प्राप्ती फारशी नव्हती, शिवाय हक्काचे पैसेही बरेचदा मिळत नसत. भ्रष्टाचारही खूप. मेहरबानू भरतकाम, वीणकाम करून हातभार लावत. मन्सूरअलींच्या आईंना पक्षाघाताचा झटका आला होता. औषधोपचारांचा खर्च मेहरबानूंच्या कमाईतून भागत असे. मग पुढे कर्ज काढून त्यांनी एक शिवणमशीन विकत घेतलं. या सगळ्यामुळं मन्सूरअलींना कधीकधी नैराश्य येई. व्यवसायातलं नुकसान, परागंदा होणं, लोकांचे पैसे बुडवणं यांमुळं पश्चात्तापाची भावना सतत उफाळून येई. हतबलता येई. पण या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्गही त्यांना दिसत नव्हता.

मन्सूरअली राहायचे ते घर दुसर्‍या मजल्यावर होतं. वापरासाठीचं पाणी खालून भरावं लागे. एका सकाळी ते पाणी भरत असताना एक अलिशान मर्सिडीज गाडी त्या गल्लीत येऊन थांबली. ड्रायव्हर खाली उतरला, आणि कुठलासा पत्ता तिथल्या दुकानांमध्ये विचारू लागला. कोणालाच तो पत्ता माहीत नसावा, कारण त्यानं नंतर आपला मोर्चा मन्सूरअलींकडे वळवला, आणि विचारलं, ‘‘इथं मन्सूरभाई कुठे राहतात?’’
‘‘पूर्ण नाव काय त्यांचं? इथे आसपास बरेच मन्सूरभाई आहेत.’’
‘‘मन्सूरभाई अकोलावाला..पूर्ण नाव हेच असावं त्यांचं.’’
‘‘मीच मन्सूरभाई अकोलावाला. बोला, काय काम आहे?’’
‘‘तुम्हीच का ते? आम्ही दोन दिवसांपासून तुम्हांला शोधतोय.’’
त्या ड्रायव्हरनं मग मन्सूरअलींना गाडीत बसलेल्या आपल्या मालकाकडे नेलं. थ्री पीस सूट घातलेले ते गृहस्थ मन्सूरअलींचे फुफाजी होते. हे फुफाजी आफ्रिकेतल्या युगांडात असत. तिथं त्यांच्या व्यवसायाचा प्रचंड मोठा व्याप होता. पण इदी अमीननं भारतीयांना तिथून हाकलायला सुरुवात केली म्हणून फुफाजी पाकिस्तानात आले होते नव्या व्यवसायाच्या शोधात. तिथं त्यांना मन्सूरअलींबद्दल कळलं, आणि म्हणून ही शोधमोहीम हाती घेतली गेली होती. ते मन्सूरअलींना म्हणाले, ‘‘तू फार लहान होतास मी भारतातून आफ्रिकेत गेलो होतो तेव्हा. तुझ्या वडलांनी मला खूप मदत केली होती माझ्या अडचणीच्या काळात. आता तुला मदत करणं हे माझं कर्तव्य आहे. तू इथं राहू नकोस. हा देश तुझ्यासारख्यांसाठी योग्य नाही. इथं तुला पैसा मिळवणं कधीच शक्य नाही. तू अमेरिकेत जा. तुला तिकिटाचे पैसे मी देतो.’’
‘‘पण माझ्या भावंडांचं, आईचं आणि बायकोचं काय? मी गेल्यावर त्यांचा खर्च कसा भागणार?’’, मन्सूरअलींनी विचारलं.
फुफाजींनी मग तिकिटाचे पैसे दिलेच, पण पूर्ण कुटुंबाच्या वर्षभराच्या खर्चाची सोयही केली.
अमेरिकेत जाण्यासाठी पैसे तर मिळाले, पण अमेरिकेत जायचं म्हणजे नक्की जायचं कुठं?
मन्सूरअलींनी एक ट्रॅव्हल एजंट गाठला. त्यानंही तेच विचारलं, ‘‘अमेरिकेत कुठे?’’
‘‘मला कुठल्यातरी कारखान्यात काम करायचं आहे. तेव्हा जिथे भरपूर कारखाने असतील, अशा एखाद्या शहराचं तिकीट मला द्या.’’
त्या ट्रॅव्हल एजंटानं मन्सूरअलींना शिकागोचं तिकीट काढून दिलं, आणि १९७३ साली ते अमेरिकेत पोहोचले. खिशात दीडशे डॉलर फक्त होते. कुठं जायचं, काय करायचं हे काही माहीत नव्हतं.

मन्सूरअलींच्या नशिबानं विमानतळावर त्यांना एक भारतीय टॅक्सीड्रायव्हर भेटले. टेक्सीत बसल्यावर तुम्ही कोणकुठले अशा नेहमीच्या गप्पा झाल्या. मन्सूरअलींची अजीब दास्तां ऐकून त्यांनी त्यांना मदत करायचं ठरवलं. स्वस्तात कुठं राहता येईल, याची माहिती दिली, शिवाय कंत्राटी कामगार म्हणून कुठल्या फॅक्टरीत काम करता येईल, हेही सांगितलं. या भल्या टॅक्सीड्रायव्हरामुळं मन्सूरअलींना लवकरच नोकरी आणि राहण्यासाठी जागाही मिळाली. कष्टांची सवय होतीच. वर्षभराच्या आतच मन्सूरअलींनी आपल्या पत्नीलाही अमेरिकेत बोलावून घेतलं. त्यावेळी ते दोन नोकर्‍या करत होते. सकाळी सात ते दुपारी तीन पहिली आणि दुपारी चार ते रात्री बारा दुसरी. मेहरबानूंनीही मग एका फॅक्टरीत नोकरी सुरू केली. दोघांनाही त्यांच्या कौशल्यामुळं आणि कष्टांमुळं पटापट बढत्या मिळत गेल्या. शिकागोच्या उपनगरात मग त्यांनी घर विकत घेतलं. एक नोकरीही सोडली. पण आर्थिक सुबत्ता आल्यावर स्वत:चा व्यवसाय असावा, ही मन्सूरअलींची इच्छा पुन्हा उफाळून आली. स्वत:चं वर्कशॉप सुरू करणं शक्य नव्हतं. म्हणून त्यांनी ‘कन्व्हिनियन्स स्टोअर’ सुरू केलं. मद्य, वर्तमानपत्रं, रोजच्या आवश्यक वस्तू या दुकानात मिळत असत. रहदारीच्या एका रस्त्यावर त्यांनी या दुकानासाठी जागा विकत घेतली होती. पण काहीही सुरळीत पार पडणं, हे मन्सूरअलींच्या नशिबी नसावं. दुकान सुरू केल्याबर महिनाभरातच तो रस्ता रुंदीकरणासाठी बंद केला गेला. रस्ता बंद झाल्यावर तिथली दुकानं बंद पडली. गिर्‍हाइकं येईनाशी झाली. मन्सूरअली पुन्हा निराश झाले. दुकानात गुंतवलेले पैसे वाया गेले होते. ते दुकान पुन्हा कोणी विकत घेण्याची शक्यता नव्हती, आणि पुन्हा नव्यानं सुरुवात करावी लागणार होती. व्यवसायाचं स्वप्न अपूर्णच राहणार होतं. मेहरबानू यावेळी पुन्हा एकदा ठामपणे आपल्या पतीच्या पाठीशी उभ्या राहिल्या. ‘तुम्ही दुकान विकू नका, एकही गिर्‍हाईक आलं नाही तरी चालेल, पण तुम्ही रोज दुकानात जा. घरखर्च मी माझ्या नोकरीतून भागवेन’, असं त्यांनी मन्सूरअलींना सांगितलं. तो रस्ता पुन्हा सुरू व्हायला तीन वर्षं लागली. दरम्यानच्या काळात घराचं, दुकानाचं मॉर्गेज, घरातला खर्च, सगळी बिलं हे मेहरबानूंच्या पगारातून होत राहिलं.
हा कठीण काळ सरला, आणि मन्सूरअलींच्या दुकानाची भरभराट झाली. त्यांनी दुकान वाढवलं, आणि आता त्यांच्या मालकीची इमारत शिकागोमध्ये उभी आहे. या इमारतीत पुस्तकांचं आणि ध्वनिफितींचं मोठं दुकान आहे. मन्सूरअलींचा मुलगा राज ते सांभाळतो. शिकागोच्या उपनगरांमध्ये त्यांची इतर दोन दुकानं आहेत. मन्सूरअली आणि मेहरबानू आता निवृत्त झाले आहेत.

मात्र या दोघांच्या संघर्षाची कथा इथंच संपत नाही. पुरेसे पैसे मिळवल्यावर १९९६ साली मन्सूरअली अकोल्याला परतले. देणेकर्‍यांची यादी त्यांच्या खिशात होती. अकोल्यातली मालमत्ता जप्त करून त्यातून कोर्टानं नेमलेल्या रिसीव्हरनं देणी फेडली होती. ज्यांना पैसे मिळाले नव्हते, त्या सर्वांचे पैसे मन्सूरअलींनी व्याजासकट फेडले. वेळेवर पैसे न दिल्याबद्दल जाहीर लेखी माफीही मागितली. या अकोलाभेटीत ते सुरेशभाई वोरा, सुरेशभाई शाह या आपल्या बालमित्रांना भेटले. हे दोघंही आता अकोला गुजराती समाजाचं काम बघत होते. या दोघांच्या माध्यमातून मन्सूरअलींनी पुन्हा एकदा या संस्थेच्या शाळांना देणगी देण्याची परंपरा सुरू केली.

अशाच एका भेटीत शाळेसाठी देणगी दिल्यानंतर संस्थेच्या सदस्यांबरोबर ते शाळेची पाहणी करत होते. प्रत्येक वर्गात सरस्वती, गणपती, हनुमान अशा देवतांची चित्रं आहेत, हे त्यांना दिसलं. ‘ही चित्रं वर्गात का लावली आहेत?’, असं त्यांनी विचारलं. मन्सूरअली हे इस्माइली खोजा आहेत, आणि त्यांना बहुतेक हे हिंदू देव आवडत नसावेत, असा समज त्या ट्रस्टींचा झाला असावा. ते घाईघाईनं म्हणाले, ‘‘उद्याच आम्ही इथं आगाखानांची तसबीर लावतो’’. मन्सूरअली म्हणाले, नाही, मुद्दा तो नाहीच. ही शाळा आहे, शाळेत देवांचं काय काम? शिवाय इथं फक्त हिंदू विद्यार्थी आहेत का? इथं गणपती, काबा, येशू ख्रिस्त, गुरुनानकदेवजी अशा कोणाच्याच तसबिरी नकोत.’’ ट्रस्टींना ते पटलं, आणि त्या तसबिरी उतरवल्या गेल्या. पुढं गुजराती समाजानं कॉलेज बांधायची तयारी सुरू केली, आणि मन्सूरअलींनी एक कोटी रुपयांची देणगी दिली. कॉलेजला आपल्या पत्नीचं नाव द्यावं, शिवाय उद्घाटन करताना आणि एरवीही कोणताही धार्मिक सोहळा होऊ नये, या त्यांच्या अटी होत्या. मेहरबानू कायमच मन्सूरअलींच्या पाठीशी उभ्या राहिल्या होत्या. त्यांना सतत साथ दिली होती. कुठलीही तक्रार न करता. त्यांच्या हातभारामुळंच मन्सूरअली स्वत:चा व्यवसाय पुन्हा सुरू करू शकले होते. लोकांची देणी फेडून मोकळा श्वास घेऊ शकले होते. मन्सूरअलींना आपल्या पत्नीचं हे ऋण जाहीरपणे मान्य करायचं होतं. ट्रस्टींना याची कल्पना होती, आणि संस्थेनं मन्सूरअलींच्या सगळ्या अटी मान्य केल्या. कॉलेजाचं बांधकाम सुरू झालं. पण पुढे खर्च वाढत गेला, आणि प्रत्येकवेळी मन्सूरअलींनी तो खर्च पुरा केला. एकूण चार कोटी रुपये त्यांनी कॉलेजाच्या बांधकामासाठी दिले. कॉलेजाचं बांधकाम पूर्ण झाल्यावर आजच्या जगासाठी अतिशय प्रेरक अशी ती कोनशिला उभी राहिली. कॉलेजाचं उद्घाटन २८ नोव्हेंबर, २००८ रोजी झालं. दोन दिवसांपूर्वीच मुंबईत धार्मिक कट्टरतेनं आपलं ओंगळवाणं रूप दाखवलं होतं. या घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्घाटन पुढे ढकलावं, असा प्रस्ताव समोर आला. पण कॉलेजच्या ट्रस्टींनी आणि मन्सूरअलींनी याला विरोध केला. 'उद्घाटनाचा कार्यक्रम रद्द करायचा नाही. मन्सूरअली नावाच्या माणसानं आणि अकोल्यातल्या गुजराती समाजानं एकत्र येऊन कॉलेज बांधलं आणि या कॉलेजात धर्माला थारा नाही, तिथे फक्त विज्ञानालाच मान्यता आहे, हे जगाला कळायला हवं,' असं त्यांचं म्हणणं होतं. उद्घाटनाच्या दिवशी या कॉलेजाच्या रूपानं धार्मिक सहिष्णुतेचा, खर्‍या अर्थानं प्रगतीकडे नेणारा एक आदर्श लोकांसमोर उभा राहिला.

मन्सूरअलींच्या नाट्यमय जीवनगाथेपेक्षा महत्त्वाचे आहेत ते त्यांचे धर्मासंबंधीचे विचार. धर्म ही अतिशय खाजगी बाब आहे, असं त्यांचं ठाम मत आहे. माणसानं धार्मिक असावं की नाही, पूजा, उपासना करावी की नाही, हा ज्याचा त्याचा प्रश्न, पण आपापल्या धर्माचं पालन हे स्वत:पुरतं ठेवायचं, त्याचा इतरांना उपद्रव होता कामा नये, असं ते मानतात. मन्सूरअलींचा जन्म एका इस्माइली खोजा कुटुंबात झाला असला तरी ते हिंदू धर्माचं पालन करतात. लहानपणी त्यांनी कुराणाचं पठण केलं आहे. त्यांना धर्मासंबंधीचं शिक्षण देण्यासाठी त्यांच्या वडलांनी एक खास शिक्षकही नेमला होता. पण एका अपघातानंतर मन्सूरअली काही काळ पाचगणीला जाऊन राहिले होते. तिथं त्यांची गाठ जिमी बारिआ या नावाच्या एका पारशी तरुणाशी पडली. जिमीमुळं मन्सूरअलींची श्रीमदभग्वद्गीतेशी ओळख झाली, आणि ते हिंदू धर्माकडे आकृष्ट झाले. नंतर अमेरिकेत आल्यावर त्यांनी गीतेचं इंग्रजीत भाषांतर केलं. गीतासार आंग्लभाषकांना समजावं या हेतूनं केलेलं हे भाषांतर मन्सूरअलींनी नंतर स्वत:च्या आवाजात ध्वनिमुद्रितही केलं. शिकागोच्या हरी ओम मंदिराचं बांधकाम पूर्ण होऊ शकलं ते मन्सूरअलींच्या देणगीमुळं. मंदिराचे ते मुख्य देणगीदार आहेत. पण मन्सूरअलींचा धर्म हा त्यांच्यापुरता मर्यादित आहे. त्यांच्या पत्नी, मेहरबानू या इस्माइली धर्माचंच पालन करतात. त्यांचा एकुलता एक मुलगा राज हा कॅथॉलिक ख्रिश्चन आहे. कॉलेजात असताना त्याची ख्रिस्ती धर्माशी ओळख झाली, आणि त्यानं धर्मांतर करण्याचा निर्णय घेतला. कमरुद्दीन दांपत्यानं आक्षेप घेण्याचा प्रश्न नव्हताच. हे तिघंही आपला धर्म आपल्यापुरता ठेवतात. मन्सूरअली मंदिरात जातात, मेहरबानू जमातखान्यात जातात, तर राज चर्चमध्ये. धार्मिक प्रसंगी तिघंही एकत्रच त्या त्या प्रार्थनास्थळाला भेट देतात. धर्माबद्दलच्या या खुल्या विचारांमुळंच आपल्या पैशांतून बांधलेनं कॉलेज निधर्मी असावं, ही अट त्यांनी घातली. मन्सूरअली सांगतात, धर्माबद्दल विचार करताना शहाणपण वापरणं उत्तम. इतरांचा अनुनय करून काहीच हाती लागत नाही. आपला धर्म, आपला देव आपणच शोधायचा असतो. काय बरोबर, काय चूक यांचा नीट विचार करून धार्मिक आचरण केलं, तरच आपण सुखी होऊ शकू. शिवाय देशाला प्रगती करायची असेल, तर धर्माचं खाजगीपण जपलं गेलंच पाहिजे. सार्वजनिक जीवनात धर्मानं प्रवेश केला की प्रगती खुंटते.

बाबरी मशीद पाडल्यानंतर अकोल्यात दंगल उसळली होती. शाळेत होतो मी तेव्हा. मी अनुभवलेली ही पहिली दंगल. ‘ते’ आणि ‘आपण’ अशी वर्गवारी तेव्हा मला पहिल्यांदा कळली. ‘ये तो पहली झांकी है’ असं कोणीतरी ओरडल्यावर जीव खाऊन ‘काशी-मथुरा बाकी है’ असं मी ओरडलो होतो. अनेक वर्षं मला स्वत:चीच लाज वाटत राहिली होती. पण मग नंतर अशा दंगलींची, बॉंम्बस्फोटांची सवयही झाली. ‘मारून टाकलं पाहिजे साल्यांना’ किंवा ‘हाकलून द्या देशातून त्यांना’ हे ऐकून दचकणं कमी होत गेलं. संताप येणंही कमी झालं. पण कधीकधी एखाद्या पुढार्‍याला पुन्हा मंदिर बांधावंसं वाटतं. कोणीतरी कुठल्यातरी पुतळ्याच्या गळ्यात चपलांचा हार टाकतं. कोणालातरी सार्‍या काफिरांना संपवून टाकायचं असतं. अशावेळी मला महात्मा गांधी रस्त्यावरची ती काळीकुळकुळीत कोनशिला आठवते. ‘हल्ली कशाचंच काही वाटत नाही’, ही भावना तात्पुरती कमी होते. अशा अजून दहापाच कोनशिला जरी उभ्या राहिल्या, तरी आपला देश जरा सुखी होईल, असं मग वाटत राहतं.

IMG_6794.JPG

(श्री. मन्सूरअली कमरुद्दीन आणि श्रीमती मेहरबानू यांचं कॉलेजातलं छायाचित्र श्रीमती मेहरबानू कॉलेज ऑफ सायन्स, अकोला, यांच्या सौजन्याने. छायाचित्रकार अज्ञात)

'माहेर'च्या २०११ सालच्या दिवाळीअंकात पूर्वप्रकाशित.

प्रकार: 

सुंदर माहिती. असे लोक आहेत यावर आता विश्वास बसेनासा झालाय.

मन्सूरअली सांगतात, धर्माबद्दल विचार करताना शहाणपण वापरणं उत्तम. इतरांचा अनुनय करून काहीच हाती लागत नाही. आपला धर्म, आपला देव आपणच शोधायचा असतो. काय बरोबर, काय चूक यांचा नीट विचार करून धार्मिक आचरण केलं, तरच आपण सुखी होऊ शकू. शिवाय देशाला प्रगती करायची असेल, तर धर्माचं खाजगीपण जपलं गेलंच पाहिजे. सार्वजनिक जीवनात धर्मानं प्रवेश केला की प्रगती खुंटते.

भारतात इतक्या शतकात झाला नसेल तेवढा आंधळा धर्मानुनय सुरू आहे सध्या, सगळ्याच धर्माच्या लोकांचा. मन्सुरभाईंचे हे विचार प्रत्येक रस्त्यावरच्या बोर्डावर झळकवले पाहिजेत.

उत्तम आणि प्रेरणादायी लेख. हिकमतीने कठीण परिस्थिती विरुद्ध संघर्ष करुन स्व्तःचे स्थान निर्माण करणार्‍या मन्सुरभाईंना सलाम.
धर्माबाबतचे विचार खरच उत्तम आहेत.
धन्स चिनूक्स या लेखाबद्दल.

शिवाय देशाला प्रगती करायची असेल, तर धर्माचं खाजगीपण जपलं गेलंच पाहिजे. सार्वजनिक जीवनात धर्मानं प्रवेश केला की प्रगती खुंटते. >> +१

मस्त आहे लेख.

खुप सुंदर लेख. इथे शेअर केल्याबद्दल धन्यवाद!

शेवटचा पॅरा वाचताना अंगावर काटा आला सरकन......
अशा व्यक्तींपुढे हातच जोडावेसे वाटतात Happy

उत्तम आणि प्रेरणादायी लेख. हिकमतीने कठीण परिस्थिती विरुद्ध संघर्ष करुन स्व्तःचे स्थान निर्माण करणार्‍या मन्सुरभाईंना सलाम.
धर्माबाबतचे विचार खरच उत्तम आहेत.
धन्स चिनूक्स या लेखाबद्दल.>>> +१

धन्यवाद चिनुक्स!
शिवाय देशाला प्रगती करायची असेल, तर धर्माचं खाजगीपण जपलं गेलंच पाहिजे. सार्वजनिक जीवनात धर्मानं प्रवेश केला की प्रगती खुंटते >> +१ . असे अनेक 'मन्सुरभाई' हवे आहेत.

चांगला लेख.
मन्सूरअलींचा प्रवास अचंबीत करणारा आहे. आणि विचार तितकेच दिलासादायी. चिनूक्स, धन्यवाद या कॉलेजची सविस्तर माहिती करून दिल्याबद्दल.

चिनूक्स नेहमीप्रमाणेच उत्तम. एखाद्याच्या आयुष्यात कसा टर्निंग पोईट येतो आणि सगळ चित्रच बदलून जात .त्यांचे फुफाजी त्याच्या आयुष्यातला टर्निंग पोईट ठरले. नंतर टॅक्सीड्रायव्हर Happy

Pages