स्ट्रक्चर, एजन्सी आणि गायत्री मंत्र

Submitted by अतुल ठाकुर on 18 April, 2014 - 07:31

gaytri-mata.jpg

समाजशास्त्रातला स्ट्रक्चर आणि एजन्सी हा वाद जुनाच आहे. बरेचदा समाजशास्त्राशी फारसा संबंध नसलेली मंडळीदेखिल जेव्हा "फ्री विल" बद्दल बोलतात तेव्हा कळत नकळत स्ट्रक्चर आणि एजन्सी बाबतच बोलत असतात. माणसाला परिपूर्ण स्वातंत्र्य आहे कि तो परिस्थितीच्या हातातील खेळणे आहे? या प्रश्नाचे सावध उत्तर म्हणजे दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. परिस्थीतीचा परिणाम देखिल असतो आणि स्वातंत्र्यदेखिल असते. समाजशास्त्रात मात्र अशा उत्तराभोवती एखाद्या थियरीचे अधिष्ठान असावे लागते. त्याशिवाय त्यासंदर्भात काही बोलणं म्हणजे निव्वळ एखादे विधान केल्यासारखे होईल. परिस्थिती आणि माणसाच्या निर्णय स्वातंत्र्याचा विचार करताना आपल्या प्राचिन परंपरेच्या दृष्टीने मला चटकन गायत्री मंत्र आठवला. त्यात सद्बुद्धीची प्रेरणा देण्याची प्रार्थना सविता देवतेला केली आहे. कुठलाही निर्णय घेण्याआधी बुद्धीला योग्य प्रेरणा होण्याची गरज भासते. आणि ती प्रेरणा भगवान सुर्यनारायण देतात. कारण ते या अखिल जगताला प्रकाशित करतात. असे विवेचन सर्वसाधारणपणे केले जाते. भारतीय परंपरेत गायत्री मंत्राचं महत्व अपार आहे. त्यावर अनेक पुस्तके अधिकारी उपासकांकडुन लिहिली गेलीत. त्या मंत्राच्या वापराबाबत अनेक मतमतांतरे आहेत. या लेखाचा उद्देश या मंत्राचे अध्यात्मिक विवेचन करणे हा नाही. माझा तो अधिकारही नाही. त्यामुळे मंत्रशक्तीबाबत मला काहीच बोलता येणार नाही. मात्र त्याचा जो सर्वसाधारण अर्थ सांगितला जातो त्याचा जर जडवादाच्या दृष्टीने अर्थ लावला तर त्या मन्त्रार्थाचा संबंध कुठेतरी समाजशास्त्राशी आहे असे मला वाटते. प्रस्तुत लेखात याचाच मागोवा घेण्याचा प्रयत्न आहे.

समाजशास्त्राच्या संदर्भात स्ट्रक्चरचा अर्थ माणसाच्या अवतीभेवतीची सामाजिक परिस्थीती. त्यात सर्व तर्‍हेच्या सामाजिक व्यवस्था, नीती नियम, रितीभाती येतात. हे स्ट्रक्चर माणसाच्या निर्णयावर परिणाम करीत असते. त्याच्या पर्यायांवर मर्यादा आणते. माणसाला कुठलाही निर्णय घेताना त्याच्या आसपासच्या परिस्थितीचा विचार करावाच लागतो. काही मर्यादा संस्कारांच्या असतात. या सार्‍यांचा माणसाच्या निर्णयक्षमतेवर कळत नकळत परिणाम होत असतो. समाजशास्त्रात या स्ट्रक्चरचे प्राधान्य सांगणारा वर्ग संख्येने फार मोठा आहे. किंबहुना समाज म्हणजेच एक विशिष्ट स्ट्रक्चर आणि हा समाज माणसाच्या जडणघडणीला कारणीभुत होतो. त्यात माणसाची वर्तणुक ही समाजाच्या दडपणाखाली होत असते. विशिष्ट समाजाच्या ठाशीव साच्यात माणसाची विचारसरणी घडत असते असे समजणारी देखिल मंडळी आहेत. मी काढत असलेला निष्कर्ष अनेकांना टोकाचा वाटण्याची शक्यता आहे. मात्र समाजशास्त्रात सुरुवातीला प्रामुख्याने समाजाचा विचार केला गेला असल्याने स्ट्रक्चरच्या तुलनेत निर्णय स्वातंत्र्याचा विचार कमी केला गेला आहे असे माझे मत आहे. माणसाच्या निर्णयात त्याच्या परिस्थीतीचे प्रतिबिंब पडलेले असते अशीच मांडणी सगळीकडे केलेली दिसते. याबाबत मार्क्सवाद काय म्हणतो? आर्थिक घटक प्रामुख्याने मानणार्‍या या तत्त्वज्ञानाने अर्थ हा पायाभुत मानुन समाजातील सारे आचार, विचार, माध्यमं, तत्त्वज्ञान यांची गणना सुपरस्ट्रक्चरमध्ये करुन टाकली आहे. याचा सोपा अर्थ हा की माणसाचे आचार विचार हे त्याच्या आर्थिक पायावर आणि समाजातील त्याच्या स्थानावर अवलंबुन असतात. या मांडणीमध्ये निर्णयस्वातंत्र्याचा विचार फारसा नाही हे सहज लक्षात येईल.

एजेन्सीचा अर्थ माणसाची स्वतंत्रपणे निर्णय घेण्याची क्षमता. समाजशास्त्रात (सुदैवाने) अशाही थियरीज आहेत ज्या एजेन्सीला प्राधन्य देतात. प्रत्येक व्यक्तीचा व्यवहार आणि त्यांचे आपसातील संबंध हे स्ट्रक्चरला निश्चित करतात. हा अर्थ स्ट्रक्चरच्या अर्थाच्या अगदी उलट आहे. येथे माणसे स्ट्रक्चर घडवतात असेही थोडक्यात म्हणता येईल. पुढे जाण्याआधी शेक्षणिक वर्तुळात स्ट्रक्चरच्या सिद्धान्ताचे प्राधान्य आहे अशी माझी समजुत झाली आहे हे नमुद करणं मला आवश्यक वाटतं. समाजशास्त्रातील बहुतेकांचा कल हा मार्क्सवादासारख्या इतर अनेक "ग्रँड थियरीज" कडे असतो. एका थियरीने अखिल जगताच्या व्यवहाराची मांडणी करता येते. त्यातील बारकावे ओळखता येतात अशी भुमिका त्यामागे असते. याचे आकर्षण अनेकांना असते. इतके की त्यांना या थियरीविरुद्ध काहीही बोललेले चालत नाही. ही माणसे वगळली तर उरतात ती मंडळी माणसाच्या निर्णय स्वातंत्र्याला प्राधान्य देतात असा मात्र याचा अर्थ नाही. समाजामध्ये जन्म घेणार्‍या संस्था या एकमेकांशी सुसंवाद साधुन असतात. त्यांच्या अस्तित्वाने समाजात समतोल राहतो असा दृष्टीकोण बाळगणारी "स्ट्रक्चरल फंक्शनलिझम" ग्राह्य मानणार्‍यांची संख्यादेखिल मोठी आहे. या अन्वये आपल्या शरीराच्या निरनिराळ्या संस्थांची ज्याप्रमाणे शरीराच्या अस्तीत्वासाठी आवश्यकता असते तद्वतच समाजातील संस्थासुद्धा समाजाच्या अस्तित्वासाठी आवश्यक असतात असा यांचा दृष्टीकोण असतो. समाजात "जैसे थे" स्थितीची भलावण करणार्‍या या दृष्टीकोनाबाबत या लेखात यापेक्षा जास्त विचार करण्याची आवश्यकता मला वाटत नाही.

"गायत्री-विज्ञान आणि उपासना" या पंडित श्रीपादशास्त्री किंजवडेकरांच्या पुस्तकात त्यांनी भगवान सायणाचार्यांचे भाष्य दिले आहे. त्यानुसार गायत्री मंत्राचा दिलेला स्थुल सारांश पुढीलप्रमाणे आहे. " चराचर सृष्टीच्या उत्पत्ती, स्थिती आणि लय या अवस्था ज्या परात्पर शक्तीमुळे निर्माण होतात ती शक्ती, ते तेजच सुर्याला प्रकाशित करते. अशा त्या तेजाचे आम्ही ध्यान करतो. ते तेज आम्हाला सन्मार्गाने जाण्याची प्रेरणा देवो." या सारांशातील काही भाग हा या लेखाच्या दृष्टीने मला अतिशय महत्त्वाचा वाटतो. समाजशास्त्राच्या झरोक्यातुन पाहिले तर चराचर सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि लय यात सर्व समाज व्यवस्था येतात. या समाज व्यवस्थांची निर्मिती, त्यांचा विकास आणि त्यांच्या लयाचाही त्यात अंतर्भाव होतो असे मला वाटते. कालानुक्रमाने येणारे नीतीनियम, रीती काही कालापुरता निर्माण होतात, राहतात, कालांतराने कालबाह्य होतात. त्यांची जागा दुसर्‍या व्यवस्था घेतात. या सर्व प्रक्रीयेचे ध्यान आम्ही करतो. त्यातुन सन्मार्गाने जाण्याची प्रेरणा मिळवतो. यातील परात्पर शक्तीचा विचार मला समाजशास्त्राच्या दृष्टीने करता येणार नाही. त्याचप्रमाणे "सन्मार्गाने" या शब्दावरही समाजशास्त्रज्ञ आक्षेप घेण्याची शक्यता आहे. मात्र ज्ञानसुर्याचा उदय झाल्यावर अनेक वाटा प्रकाशित होतात. त्या सर्व वाटांवरुन जाणे शक्य नसते. कुठल्या तरी एका वाटेची निवड करावी लागते असे ज्ञानदेव महाराजांनी कुठेतरी म्हटल्याचे अशा वेळी आठवते. हा मार्ग कुठला हे निश्चित करण्याचे स्वातंत्र्य माणसाला आहे काय हा महत्त्वाचा प्रश्न आहे. मात्र आपण एखादा मार्ग निवडल्यावर त्याचे जे परिणाम दिसतात त्यावरुन तो सन्मार्ग आहे कि नाही हे ओळखणे फारसे कठीण जाऊ नये.

पार्किन्सन्स मित्रमंडळाबरोबर काम करताना माझ्या मनात विचार आला कि हा आजार प्रोग्रेसिव आहे. प्रचलित स्ट्रक्चरचा विचार केला तर काय हाती लागते? माणुस या आजाराबाबत कळल्याबरोबर निराश होतो. आयुष्य त्याला एकदम अंधारल्यासारखे वाटु लागते आणि तो समाजापासुन दुर राहु लागतो. यामुळे त्याचे नैराश्य आणखि वाढते आणि त्याचा परिणाम म्हणजे आजाराची लक्षणे वाढतात. स्ट्रक्चरमध्येच दुसरा मार्ग सपोर्ट ग्रुपचा आहे. माणुस आपल्यासारखाच आजार असलेल्या इतरांमध्ये मिसळतो. त्यामुळे आपण एकटे नाही ही जाणिव त्याला बळ देते. त्यांच्या बरोबर राहुन त्याचे नैराश्य दुर होऊ लागते. आणि आजार हळु हळु ताब्यात राहु लागतो. हे अगदी थोडक्यात विवेचन केलं आहे. यात अनेक घटकांचा समावेश होतो याची मला जाणिव आहे. पण मुद्दा हा कि घरात बसुन कुढत राहायचं कि बाहेर पडुन तोंड देऊन आयुष्य आनंदी करायचं याचा निर्णय कोण घेतं? तर हा निर्णय एजन्सीच घेते. ते स्वातंत्र्य एजन्सीला आहे अशी माझी नम्र समजुत आहे. हा निर्णय समाज व्यवस्था म्हणजेच स्ट्रक्चरचा विचार करुनच घेतला जातो. मात्र तो निर्णय ती व्यक्ती स्वतः घेते, विशिष्ट व्यवस्थेने तो निर्णय त्या व्यक्तीवर लादलेला नसतो किंवा तो मनुष्य ज्या परिस्थितीत राहतो त्याचा तो अटळ असा परिपाकही नसतो.

गायत्री मंत्रात हा विचार आपल्या प्राचिनांनी केला आहे अशी माझी समजुत आहे. समाजाच्या उत्पती, स्थिती आणि लया कडे लक्ष देऊन, त्याच्या नियमांचा अभ्यास करणारे, म्हणजेच त्याचे ध्यान करणारे हे सन्मार्गाची प्रेरणा मागतात. कुठल्याही ऐहीक किंवा अध्यात्मिक गोष्टीची नव्हे तर फक्त सन्मार्गाची प्रेरणा मागतात. ही सन्मार्गाला जाण्याची प्रेरणा निव्वळ अध्यात्मिक आहे काय? ती सामाजिक नव्हे काय? जर एखादा मार्ग अवलंबल्यामुळे माझे आयुष्य आणि त्यामुळे पर्यायाने समाजाचे आयुष्य सुखकर होत असेल तर ती प्रेरणा सामाजिक देखिल असायलाच हवी. गायत्री मंत्रात स्ट्रक्चरचा विचार अशा तर्‍हेने अंतर्भुत आहे असे मला वाटते. हा निव्वळ विचारच मंत्र कर्त्याने केलेला नसुन त्यावर ध्यान करुन त्यापासुन योग्य निर्णय घेण्याची प्रेरणा मिळवण्याचा विचार केलेला आहे. "आपले ऋषी मुनी" या शब्दांनी सुरुवात करुन गहिवरणार्‍या मंडळींमध्ये मी बसत नाही याची चोख जाणीव मला आहे. मात्र असं काही दिसलं, असा काही विचार मनात आला कि त्या थोर ऋषीमुनींबद्दल अपार आदर आणि प्रेम दाटुन येतं हे मान्य करायला मला मुळीच संकोच वाटत नाही.

अतुल ठाकुर

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Structure आणी agency या सन्क्ल्पनाचे चान्गले विवरण केले आहे. De Certeau च्या काहि सन्कल्पना या बाबतीत उपयुक्त आहेत. दोनहि सन्कल्पनाचा आधार घेवुन पुढे नेणार्या.

People follow, draw from, and subvert given structures as they go through life. Many times people 'make do' i.e. tweak their life practices in such a way that allows them to not go against the structure, at the same time giving agency to make space for their needs/changed circumstances.

मी मधुमेहाचया मित्रमण्दलाचा या द्रुष्तिकोनातुन अभ्यास केला आहे. हवतर ते लिखाण पाठवुन देइन.

मराठी लिहिताना दमाछाक होते. अक्शर शोधता शोधता विचार विरुन जातात.

अवांतर आहे.तरीही ......१०-११ वर्षांपूर्वी लोकसत्तेत गायत्रीमंत्राबाबत एक पत्र आले होते.इंग्लंड्मधील काही शाळांत
गायत्री मंत्र म्हणतात.पत्रलेखकाने याबाबत विचारणा केली तेव्हा उत्तर मिळाले की हा मंत्र म्हणण्याने मुलांच्या एकाग्रतेत भर पडत आहे.
.खखोदेजा.

Structure आणी agency या सन्क्ल्पनाचे चान्गले विवरण केले आहे.>>>>>या कावेरीच्या मताशी सहमत.लेख छन झाला आहे.यावर थोडक्यात प्रतिक्रीया देणे अशक्य.मित्रमंडळाचे काम सुरु केले होते.तेंव्हा मी सुद्धा समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून नकळत विचार करायची. हळुहळु केवळ शुभंकर बनत गेले. तुमच्या लेखामूळे कदाचीत पुन्हा असा विचार करण सुरु होइल.एकुणच थीअरीच्या बाबत वादाचे मुद्दे अनेक असतात.प्रत्य्क्ष कृतीची इतकी गरज आहे काही काहीवेळा अशा वादात शिरण म्हणजे.निरर्र्थक शक्ती आणि वेळ घालवण वाटत.(माझ्या वेळेच्या मर्यादांमुळे).

प्रत्यक्ष कृतीची इतकी गरज आहे काही काहीवेळा अशा वादात शिरण म्हणजे.निरर्र्थक शक्ती आणि वेळ घालवण वाटत.

शोभनाताई, अगदी सहमत.

खरं म्हणजे कृतीचीच गरज भासली पाहिजे. समाजशास्त्राच्या सेमिनार्समध्ये अनेकदा निरर्थक गोष्टींवर चर्चा चालते असं मला वाटतं. कांद्याचे पापुद्रे एकामागोमाग एक काढावेत त्याप्रमाणे लोक बोलत राहतात. काही सन्माननीय अपवाद वगळता बहुतेक आर्मचेयर स्कॉलरर्सच असतात अशी आता माझी समजुत झाली आहे. ती चुकिचीही असेल कदाचित.

अतुल, तुमची समजूत अगदी बरोबर आहे.सर्वच क्षेत्रात हे होतय. आणि कृती करत सन्शोधनाला वाहुन घेणारेही आहेत.त्यांचा आदर्श ठेवायचा.समाज शास्त्रज्ञ म्हणून विठ्ठ्ल रामजी शिन्दे या पातळीवर मला आदर्श वाटतात.हे एक उदाहरण इतरही आहेत. आणि प्रत्येकानी कृती केलीच पाहिजे अस मला म्हणायच नव्हत.ज्याचा त्याचा पिंड असतो.प्युअर सन्शोधन्ही हवच.आणि चर्चाही हवीच.त्याशिवाय सत्याचा जवळ कस जाता येणार्?पण चर्चेत सत्यान्वेषण महत्वाचे मानले पाहिजे.व्यक्तिगत गंड,व्यक्तीपूजा नसावी.चौकटीचे गुलाम न होता मुळ मानवी संबंध लक्षात घ्यायला हवेत.अर्थात हे सोप नाही अस करणारे प्रस्थापिताना आवडत नाहीत.
संशोधन करताना त्या समाजाशी भीडायला हव.तुम्ही ते करतच आहात त्यामुळे तुमच कौतुक.आणि अभीनंदन.समाजशास्त्रज्ञ एम.जी.कुलकर्णि आमच्याकडे डाय्रेक्टर होते तेंव्हा त्यांच काम पाहिलय. आदिवासीवर संशोधन करताना ते त्यान्च्यात राहात त्यांच्याबरोबर मुन्ग्यांची चटणी खाल्ल्याचही त्यानी संगितल होत.असे मोजकेच अस्तात.आपण त्या मोजक्यातच असायच.आणि त्यांची संख्या वाढवायची.