लोकशाहीचा सांगावा

Submitted by अभय आर्वीकर on 27 March, 2014 - 23:05

लोकशाहीचा सांगावा

आली भूमाता घेऊन । लोकशाहीचा सांगावा ।
पाचावर्षाच्या बोलीन । गडी-चाकर नेमावा ॥

लोकप्रतिनिधी नको । म्हणा लोकांचे नोकर ।
जनतेच्या मतावर । यांची शिजते भाकर ॥

होऊ नका लोभापायी । कोण्या पालखीचे भोई ।
करा फक्त तेच ज्याने । सुखावेल काळीआई ॥

धन-द्रव्य घेतल्याने । होते कर्तृत्व गहाण ।
नको स्वत्वाचा व्यापार । राखा आत्म्याचा सन्मान ॥

नशापाणी फुकटाची । आणि खानावळी शाही ।
होते अशा करणीने । कलंकित लोकशाही ॥

धर्म-पंथ-जाती-पाती । यांना देऊ नये थारा ।
मतदान करताना । फक्त विवेकाला स्मरा ॥

पाच वर्ष जनतेची । करू शकेल का सेवा ।
पात्रता नी योग्यतेचा । नीट अदमास घ्यावा ॥

कुणी आला शुभ्रधारी । ढग पांघरुनी नवा ।
आत कलंक नाही ना । गतकाळ आठवावा ॥

कधी गाळला का घाम । त्याने मातीत राबून ।
स्वावलंबी की हरामी । थोडे घ्यावे विचारून ॥

पूर्ती केलेली नसेल । पूर्वी दिल्या वचनांची ।
द्यावे हाकलुनी त्यास । वाट दावा बाहेरची ॥

नको मिथ्या आश्वासने । बोला गंभीर म्हणावं ।
कशी संपेल गरिबी । याचं उत्तर मागावं ॥

कृषिप्रधान देशात । नाही शेतीचे ’धोरण’ ।
कच्च्या मालाच्या लुटीने । होते शेतीचे मरण ॥

शेती रक्षणाकरिता । नाही एकही कायदा ।
फुलतात घामावरी । ऐदी-बांडगुळे सदा ॥

शेतीमध्ये जातो जो जो । मातीमोल होतो तो तो ।
अशी अनीतीची नीती । कोण धोरणे आखतो? ॥

सत्ता लोभापायी होतो । हायकमांडचा नंदी ।
प्रश्न शेतीचे मांडेना । करा त्यास गावबंदी ॥

पाचावर्षातुनी येते । संधी एकदा चालुनी ।
करा मताचा वापर । अस्त्र-शस्त्र समजुनी ॥

स्थिर मनाला करून । 'अभय' व्हा निग्रहाने ।
मग नोंदवावे मत । सारासार निश्चयाने ॥

                                     - गंगाधर मुटे 'अभय'
==‍^=0=‍^=0=‍^=0=^=0=‍^=0=‍^=0=^=0=‍^=0=‍^=0==

Group content visibility: 
Public - accessible to all site users

@सुसुकु,

सहमत आहे. पण प्रत्येक अभिव्यक्तीला वाचकांची पसंती मिळालीच पाहिजे, असेही नाही. काही अभिव्यक्ती त्यापलिकडल्या असू शकतात. Happy
----------------------------

<<<"लोकशाहीचा सांगाडा" >>> Rofl

@गंगाधर मुटे -

<पण प्रत्येक अभिव्यक्तीला वाचकांची पसंती मिळालीच पाहिजे, असेही नाही. काही अभिव्यक्ती त्यापलिकडल्या असू शकतात. >> मान्य आहे.

"लोकशाहीचा सांगावा" ही कविता कोल्हापूरवरून प्रकाशित होणार्‍या "शेतीप्रगती" या प्रतिष्ठीत आणि राज्याच्या कानाकोपर्‍यात पोचणार्‍या मासिकाने मे-१४ च्या अंकात प्रकाशित केली आहे.

संपादकांचे आभार.