एक हत्ती आणि चार आंधळे ! ....... माझ्या मित्राचे निदानचातुर्य !

Submitted by SureshShinde on 6 April, 2014 - 11:03

image_10.jpg

सोमवारची सकाळ!
हृदयरोग तज्ज्ञ असलेले माझे चिरंजीव, ऋतुपर्ण , त्यादिवशी सकाळी नेहेमीपेक्षा लवकरच घराबाहेर पडताना मला दिसले.
"ऋतूसर, आज एवढ्या लवकर हॉस्पिटलमध्ये का निघाला आहात? काही ईमर्जन्सी आली आहे का ?"
"बाबा, तुम्हाला आपल्या मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष आठवतात का? त्यांचे एओर्टिक एन्यूरीझमचे निदान मीच केले होते. आज त्यांची 'एओर्टिक रूट रिप्लेसमेंट सर्जरी' प्लॅन केली आहे. मला कार्डीयोलोजीस्ट म्हणून थांबावे लागणार आहे."

'एओर्टिक एन्युरिज़म' हा एक विचित्र आजार. सायकलच्या जुन्या ट्यूब मध्ये जास्त प्रमाणामध्ये हवा भरल्यास त्या ट्यूबला तयार होणारा फुगा आपण निश्चितच पहिला असेल. हृदयापासून निघून संपूर्ण शरीराला शुद्ध रक्ताचा पुरवठा करणाऱ्या महारोहिणीला म्हणजेच एओर्टाला देखील असा फुगा तयार होतो व त्यालाच 'एओर्टिक एन्युरिज़म' असे म्हणतात. हा फुगा मोठा होवून फुटण्याची शक्यता असते. म्हणून त्याचे ऑपरेशन करून त्या फुग्याच्या जागी विशिष्ट प्रकारच्या प्लास्टिकची नळी बसवली जाते. या अतिशय नाजूक व जोखमीच्या ऑपरेशनच्या टीम मध्ये महत्वाचे योगदान ऋतूसर देणार होते.
"बेस्ट ऑफ लक ! टेक केअर" मी म्हणालो.
ऋतू सर लगबगीने घराबाहेर पडले.

गेल्या अर्ध शतकामध्ये हृदय शस्त्रक्रियेच्या क्षेत्रामध्ये वैद्यकीय शास्त्राने प्रशंसनीय प्रगती केली आहे. मी मेडिकल कॉलेज मध्ये असताना अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया होत नसत. या आजाराचे निदान होणेही कठीण असे. आत्ता प्रमाणे त्वरित उपलब्ध असणाऱ्या अल्ट्रासाऊंड, सीटी स्कॅन अथवा एमआरआय ह्या तपासण्यादेखील तेंव्हा नव्हत्या. योग्य निदान करण्यासाठी भरपूर अनुभव आणि ज्ञान असणे आवश्यक असे. मला चांगलाच आठवतोय असा एक पेशंट ..

सन १९७५!
मी नुकताच एमडीची परीक्षा पास होवून ससून हॉस्पिटलमध्ये लेक्चररची नोकरी करीत असतानाची गोष्ट! आमच्या युनिटची दर सोमवारी ओपीडी व ईमर्जन्सी असे. अशाच एका सोमवारी, एक सहा महिन्यांची गर्भवती स्त्री आमच्या युनिट मध्ये दाखल झाली. तिच्याबरोबर तिची आईदेखील होती.
ती सांगत होती, "पोरीची ही पहिलीच वेळ. दिवसही चांगले घेत होती. नाही म्हणायला गेले सात-आठ दिवस सारखे डोके दुखतंय अस म्हणायची. मी थोडं दुर्लक्षच केला म्हणा ना! पण सकाळी सहा वाजल्यापासून सारख्या उलट्या करू लागली आणि .."
बोलता बोलता ती मुसमुसून रडू लागली. भावनांचा आवेग थोडा ओसरल्यावर ती पुढे बोलू लागली,
"तेंव्हापासून पोरीने डावा हात व पाय हालवायचेच बंद केलेत हो!"

वार्डच्या रेसिडेंट डॉक्टरांनी तिच्या सर्व तक्रारी ऐकून पेशंटला तपासण्यास सुरुवात केली. पेशंटचे नाव कल्पना होते. कल्पना तिचा डावा हात व डावा पाय मुळीच हलवू शकत नव्हती. अगदी ग्रेड झिरो पॉवर! तिचे तोंडही थोडे वाकडे झाले होते. याचाच अर्थ असा कि कल्पनाच्या उजव्या मेंदूच्या रक्त पुरवठ्यामध्ये कोठे तरी अडथळा आलेला होता. कदाचित उजव्या मेंदूमध्ये रक्तस्त्राव होऊन रक्ताची गाठ झाली असण्याचीही शक्यता नाकारता येत नव्हती. जरी कल्पना डोके दुखत असल्याचे सांगत होती तरी तिचे ब्लड प्रेशर नॉर्मल होते. कदाचित मेंदूमध्ये जंतूचा संसर्ग होवून मेनिन्जायटीस झाला असण्याचीही शक्यता होती. कल्पनाच्या बाळाच्या हृदयाचे ठोके मात्र व्यवस्थीत पडत होते व तिच्या बाळाची हालचालही तिला जाणवत होती ही त्यातल्या त्यात एक जमेची बाजू होती. ही सर्व निरीक्षणे रेसिडेंट डॉक्टर आगटे यांनी पेशंटच्या चार्टवर नेहेमीप्रमाणे लिहून ठेवली व आपले प्राथमिक निदान व इतर शक्य निदानांची नोंदही करून ठेवली.
"सिस्टर, या पेशंटला पेपरवर लिहिल्याप्रमाणे ट्रीटमेंट सुरु करा आणि पटकन आय व्ही सलाईनपण सुरु करा." इतके सांगून डॉक्टर आगटे पुढील पेशंट तपासायला निघून गेले.

माझा मेल वॉर्डमधील राऊंड संपवून नवीन दाखल झालेले स्त्री-पेशंट तपासण्यासाठी मी फिमेल वॉर्ड मध्ये पोहोंचलो. रेसिडेंट डॉक्टरांनी तपासलेले पेशंट मी लेक्चरर असल्यामुळे पुन्हा तपासण्याची पद्धत होती. माझ्यानंतर युनिटचे मानद प्राध्यापक डॉक्टर गुलाटी व सर्वात शेवटी आमच्या युनिटच्या प्रमुख डॉक्टर सौ. मित्रा यांचा राऊंड असे. सिस्टरांनी मला दिलेल्या नवीन पेशंटच्या यादीमध्ये पहिलेच नाव कल्पनाचे होते. मी कल्पनाजवळ जाऊन पुन्हा एकदा तिची सर्व हिस्टरी घेतली व पुन्हा तिला तपासले. तिच्या उजव्या हाताला सलाईन लावलेले होते. मी त्यामुळे तिच्या डाव्या हाताचे बीपी घेतले. एकदा,दोनदा नव्हे तीनदा! बीपी लागत होते '२३० बाय १४०' एमएम ऑफ मर्क्युरी! नॉर्मल अपेक्षित होते '१२० बाय ८०'! रेसिडेंट डॉक्टरांच्या नोटसप्रमाणे बिपी दिसत होते '१४० बाय ९०'!

डॉक्टर आगटे हे नुकतेच रुजू झालेले नवीन रेसिडेंट होते. मी आत्ता पर्यंत दोन प्रकारचे रेसिडेंट डॉक्टर्स पाहीले होते. एक हुशार व प्रामाणिक तर दुसरे अतिहुशार! हुशार डॉक्टर्स प्रामाणिकपणे आपले काम शिकवल्याप्रमाणे करीत असतात. अतिहुशार डॉक्टर मात्र शॉर्टकट शोधत असतात. स्वतः बिपी न पाहता सीएमओने अथवा वॉर्डच्या सिस्टरने आधीच पाहून लिहिलेलेच रीडिंग लिहून मोकळे होतात. डॉक्टर आगटे यांची 'अतिहुशारी' रंगे हाथ पकडल्यामुळे मी उत्तेजित झालो होतो.

"सिस्टर, डॉक्टर आगटे कोठे आहेत? त्यांना बोलवा पाहू."
निरोप मिळतांच डॉ. आगटे जवळ जवळ धावतच माझ्या टेबलासमोर येवून उभे राहिले.
"गुड मॉर्निंग, सर!"
"गुड मॉर्निंग,डॉक्टर आगटे, या पेशंटचे बीपी किती आहे. तुम्ही स्वतः घेतले होते कां?"
आपले काही तरी चुकले असल्याची जाणीव डॉक्टर आगटेंना झाली.
कल्पनाच्या पेपरवरील आपल्या नोटस कडे पाहत ते म्हणाले,"सर, मी स्वतःच हिचे बीपी पाहीले होते. १४० बाय ९० होते."
"एकदा पुन्हा माझ्या समोर घेवून दाखवा बरे"
त्यांनी माझ्या समोर पुन्हा एकदा कल्पनाचे बीपी पाहीले.
"किती आहे बीपी?"
डॉक्टर आगटे भीतीने थरथर कापत होते.
"सर, आत्ता बीपी '२४० बाय १४०' आहे. पण सर, मी खोटे बोलत नाही. मी घेतले तेंव्हा खरोखरच '१४० बाय ९०' होते, सर, प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा."
डॉक्टर आगट्यांच्या चेहेऱ्याकडे पाहून ते खरे बोलत आहेत याची मला जाणीव झाली. पण दोघांच्या रीडिंगमध्ये एवढा फरक तो कसा? माणसाचे बीपी हे सतत बदलत असते. पण तरी एवढा फरक?
माझ्या मनामध्ये एक विचार आला.
"डॉक्टर, तुम्ही कोणत्या हाताचे बीपी पाहीले होते?"
थोडा वेळ विचार करून ते म्हणाले, "सर, मी मघाशी उजव्या हाताचे घेतले होते पण आता त्या हाताला सलाईन लावलेले आहे त्यामुळे आत्ता मात्र डाव्या हाताचे बीपी घेतले."
"कधी कधी दोन हातांच्या बीपीमध्ये फरक असू शकतो. उजव्या हाताचे बीपी घेवून पाहू या."
आगट्यांनी काळजीपूर्वक उजव्या हाताचे बीपी चेक केले.
"सर, येथे बीपी १४० बाय ९० च लागत आहे. शिवाय ह्या हाताची पल्स देखील नीट लागत नाहीये."

आमची ही चर्चा चालू असतानाच सिस्टर आमच्याजवळ आल्या.
"सर, गुलाटीसर राऊंडला आले आहेत."
आम्ही दोघेही मागे वळलो. डॉक्टर गुलाटी वार्डमध्ये येताना आम्हाला दिसले.
गुलाटीसर म्हणजे एक प्रसन्न आणि आदरणीय व्यक्तिमत्व होते. सर म्हणजे माझेच नाही तर इतर अनेक डॉक्टरांचे रोल-मॉडेल होते.
"गुड मॉर्निंग, एव्हरीबडी !"
"सर, बरे झाले आपण आलात. आम्ही एक डिफीकल्ट केस पाहत होतो."
डॉक्टर आगटे यांनी कल्पनाची केस गुलाटीसरांना प्रेझेंट केली.
सरांनी पुन्हा एकदा कल्पनाची हिस्टरी घेतली व तिला एक्झामिन करू लागले आणि आपली निरीक्षणे सांगू लागले. आगटे त्याची नोंद केसपेपरवर करू लागले.

सरांनी तपासणी केल्यानंतर दोन नवीन गोष्टी शोधून काढल्या.
"हे पहा, ह्या मुलीच्या उजव्या हाताची नाडी वीक आहे व त्यामुळेच ऩॅचरली त्या हातातील बीपीपण कमी लागते आहे. त्याचबरोबर तिच्या मानेमधील उजव्या मेंदूकडे रक्तपुरवठा करणारी क्यारोटीड आर्टरीदेखील नीट फील होत नाहीये. त्यामुळेच उजव्या मेंदूला रक्तपुरवठा कमी होवून हिला डाव्या बाजूला पॅरालीसीस झाला आहे. पण आश्चर्याची गोष्ट तर पुढेच आहे. मला तिच्या हृदयातील आवाजामध्ये एक नवीन आवाज म्हणजे डायस्टोलिक मरमर ऐकू येत आहे. त्या मरमरच्या वैशिष्ट्यांवरून या मुलीची एओर्टिक वाल्व्ह लिक झाली आहे असे मला
वाटते. या पुढील स्पष्टीकरण अगदी सोपे आहे. या मुलीला लहानपणी नक्कीच संधीवात झाला असणार व त्यामुळे तिच्या एओर्टिक वाल्व्हला सूज येवून ती हळू हळू लिक झाली असणार. पुढे या बाधित वाल्व्हला जंतूंचा संसर्ग होवून हिला 'बॅक्टेरियल इंडोकार्डायटीस' झाला आहे. त्या संसर्गित वाल्व्हमधून निसटलेल्या जंतूचे पुंजके हाताच्या आणि मेंदूच्या रक्तवाहिनी मध्ये अडकल्यामुळे आजचे चित्र तयार झालेले दिसते."

गुलाटीसरांच्या या वक्त्तव्यापुढे आम्ही दोघेही थक्क झालो. सरांनी अक्षरशः सिक्सर मारली होती. कल्पनाच्या तब्बेतीचे कठीण गणित सरांनी अगदी लीलया सोडविले होते. असे शिक्षक आम्हाला मिळाले हे आमचे भाग्यच!

तोपर्यंत वार्ड बॉय तिच्या छातीचा एक्स रे घेवून आला होता. एक्स रे पाहून ते म्हणाले,
"डॉक्टर सुरेश, वुई आर ऑन द राईट ट्रक. एक्सरे मध्ये हिचे हृदय मोठे झालेले स्पष्ट दिसते आहे. हिला ताबडतोब पेनिसिलीन टेस्ट करून आयव्ही पेनिसिलीन सुरु करा. टू बी ऑन सेफर साईड, क्लोरोमायसेटीन पण सुरु करू या. त्या आधी ब्लड कल्चर साठी पाठवायला विसरू नका. हिचे बीपी अगदी हळूहळू कमी केले पाहिजे नाहीतर मेंदूचा रक्त पुरवठा आणखी कमी होण्याची शक्यता आहे. पण ..मला तिच्या तब्बेतीची काळजी वाटते. आय थिंक, शी इज नॉट लाईकली टू मेक इट! नातेवाईकांना तिच्या आजाराच्या गांभीर्याची कल्पना द्या व त्यांची सही घेऊन टाका."

"गुड मॉर्निंग, प्रोफेसर गुलाटी ! गुड मॉर्निंग एव्हरी बडी !"
आम्ही सर्वांनी आवाजाच्या दिशेने पाहीले. आमच्या युनिटच्या हेड डॉक्टर सौ मित्रा आत येत होत्या. अबोली रंगाची साडी व गुडघ्यापर्यंत पोहोचणारा पांढरा शुभ्र एप्रन आणि सतत हसतमुख चेहेरा असलेल्या मित्रा मॅडम विद्यार्थी वर्गामध्ये खूपच प्रिय होत्या. श्री व सौ मित्रा म्हणजे एक 'मेड फॉर ईच आदर' कपल होते. दोघेही उत्कृष्ट आणि हाडाचे शिक्षक! श्री बंगाली तर सौ गुजराथी! नागपूरने महाराष्ट्राला जे अनेक नामवंत वैद्यकीय शिक्षक दिले त्यातील ही दोन रत्ने! मॅडम फारच शिस्तप्रिय! आम्ही त्यांना खूपच घाबरत असू. आदरयुक्त भीती! मला आठवते कि मी दुसऱ्या वर्षात शिकत असताना मॅडमची टर्म लागली होती. पेशंट तपासताना 'सुपरफीशियल कार्डीयाक डलनेस' मला दाखविता न आल्यामुळे मॅडमने त्याचा अर्थ पंचवीस वेळा लिहून दाखविण्याची शिक्षा दिली होती. शिक्षा या शब्दाला हिंदीमध्ये शिक्षा का म्हणतात ते तेंव्हा कळले होते.

"एनी थिंग इन्टरेस्टिंग टुडे ?"
"गुड मॉर्निंग, मॅडम! आम्ही एका फारच इन्टरेस्टिंग केसची चर्चा करीत आहोत." डॉ गुलाटी सरांनी मॅडमंना कल्पनाच्या आजाराविषयी सर्व माहिती दिली.
मॅडमनी पुन्हा एकदा कल्पनाला तपासून सर्व फायडिंगज कन्फर्म केली.
"ठीक आहे. गो अहेड!" त्या आपल्या मृदूमधुर आवाजात म्हणाल्या.
डॉ. आगटे यांना पुढील सूचना देवून आम्ही सर्वजण बाहेर पडलो.

तासाभरातच माझा फोन वाजला. डॉ. आगटे बोलत होते.
"सर, वाईट बातमी. आय अम सॉरी, बट कल्पना अरेस्टेड ! खूप प्रयत्न केले पण तिचे हार्ट पुन्हा सुरु झाले नाही. शी ह्याज गॉन!"
"नातेवाईकांचे काय?"
"त्यांना अगोदरच सिरीयस कंडीशन इन्फर्म करून सही घेतली होती. आता ती चोवीस तासांच्या आतच एक्सपायर झाली असल्यामुळे हॉस्पिटलच्या नियमांप्रमाणे शवविच्छेदन तर करावेच लागेल. नातेवाईकांना त्याचीही कल्पना दिली आहे. ते बाहेरगावचे असल्यामुळे शवविच्छेदन झाल्यानंतर लवकर बॉडी ताब्यात मिळावी अशी त्यांची इच्छा आहे. मी आता त्याच कामाला लागतो आहे."
"ठीक आहे. मी मॅडमना कळवतो."

मी ही बातमी मॅडमच्या कानावर घातली.
"अरेरे, पुअर गर्ल ! परमेश्वराची इच्छा! आपण यापेक्षा जास्त काय करू शकलो असतो. शी केम व्हेरी लेट! पण तिचे पोस्ट मोर्टेम होणार आहे ही चांगली गोष्ट आहे. नेमके काय झाले असावे तें तरी समजेल. आणि हो, पॅथोलोजीस्टना विनंती करून तिच्या उजव्या हाताच्या मनगटापर्यंत ओपन करून रेडीयल अर्टेरीपर्यंत नेमका कोठे ब्लॉक झाला होता ते पाहायला सांगा. तुम्ही स्वतः जर पीएम अटेण्ड करू शकलात तर फार उत्तम होईल."
"नक्कीच ! लंच आटोपून मी तिकडेच जाईन." मॅडमची विनंतीवजा आज्ञा ऐकून मी उत्तरलो.

मेडिसिन डिपार्टमेंटमध्ये आम्ही सर्व लेक्चरर मित्र एकत्र जेवण करीत असू. त्याही दिवशी असेच सर्वजण जेवत बसलो होतो. जेवता जेवता गप्पा चालू झाल्या. गिरीश शहा नावाचा माझा मित्रही गप्पा ऐकत होता. मी सर्वांना कल्पनाची केस वर्णन करून सांगत होतो. गिरीश मोठ्या आवाजात आमचे लक्ष्य वेधून घेत म्हणाला, "अरे सुरेश, तुझ्या या बाईला इंडोकार्डायटीस तर वाटत नाही."
"गिरीश, तुला दुसरे काही डायग्नोसीस सुचवायचे आहे का?" मी थोडेसे आश्चर्याने व बऱ्याचशा अविश्वासानेच म्हणालो.
"अरे गिरीश, एवढ्या स्पष्ट आणि स्ट्रेट-फॉरवर्ड केसमध्ये दुसरे निदान असूच शकत नाही. तसे असते तर गुलाटीसर व मित्रा मॅडमच्या तरी लक्ष्यात नसते का आले"
पण गिरीश ऐकून घेण्याच्या मूडमध्ये नव्हता. पटकन हात घुवून गिरीशने मेडिसिनचे जाड पुस्तक बाहेर काढले. पुस्तक चाळून एक विशिष्ठ पान उघडले व म्हणाला, "हे बघ सुरेश, हे वाच."
एव्हढे म्हणून गिरीशने मला त्या पुस्तकातील मजकूर वाचून संक्षिप्त रुपात सांगण्यास सुरुवात केली.
" 'डायसेक्शन ऑफ एओर्टा' - टिपिकली सहा महिन्यांच्या गरोदर स्त्रीमध्ये हा आजार दिसतो. पेशंटला हाय ब्लड प्रेशर असते. बीपी प्रमाणाबाहेर वाढल्यामुळे एओर्टाच्या आतील अस्तराला छेद निर्माण होतो व त्यात रक्त शिरून 'डबल ब्यारल एओर्टा' तयार होतो.
द'बाकी या नामवंत सर्जननी अशा खूप केसेसचा अभ्यास करून काही निरीक्षणे प्रसिध्द केली आहेत. एओर्टामध्ये नेमका कोठे छेद तयार होतो, त्याचा आकार कसा असतो हेही त्यांनी लिहून ठेवले आहे. या डायसेक्शनमुळे उजव्या हाताची व मेंदूकडे जाणारी उजवी रक्तवाहिनी बंद होते. हेच डायसेक्शन मागे हृदयाच्या दिशेने पसरून एओर्टिक वाल्व लिक करते व काही पेशंटामध्ये हा छेद हृदयाच्या बाहेर फुटतो आणि पेशंट दगावतो. धन्य धन्य डॉ द'बाकी ! तुमच्या पेशंटलाही हेच सर्व झालेले दिसते आहे."
आत्ता आश्चर्यचकित होण्याची वेळ माझी होती.
"गिरीश, यु आर रिअली ग्रेट! रिअली ग्रेट डायग्नोसीस ! अभिनंदन !"

माझ्या प्रमाणेच डॉ गिरीश देखील खूपच उत्तेजित झाले होते. आम्ही दोघांनी मिळून ह्या दुर्मिळ आजाराची माहिती इत्यंभूत वाचून काढली.

दुपारी तीन वाजता प्यथोलॉजी डिपार्टमेंटमध्ये कल्पनाच्या पोस्टमोर्टेम मधील अवयवांची शात्स्त्रीय तपासणी ठरली होती. तेथील प्राध्यापकांनी आमचे स्वागत केले.
"काय रे मुलांनो, कसली केस आहे ही?"
आम्ही त्यांना कल्पनाचा सर्व इतिहास ऐकवला.
आमचे बोलणे शांतपणे ऐकून घेतल्यानंतर खास प्रोफेसरीय छाप धीरगंभीर आवाजात ते म्हणाले," मुलांनो, हा तुमचा डॉक्टर रवी गुलाटी माझाच स्टुडन्ट बर का! अतिशय हुशार! त्याचे डायग्नोसिस सहसा चुकत नाही असा माझा अनुभव आहे. शिवाय मी सुद्धा आत्तापर्यंत हजारो पीएम केले आहेत पण एकदाही डायसेक्शन पाहिलेले नाही. आज पाहू या माझा अनुभव खरा ठरतो कि तुमचे पुस्तकी ज्ञान !"
एव्हढे बोलून त्यांनी आपले तपासणीचे काम सुरु केले.

आमची उत्सुकता शिगेस पोहोंचली होती. मी गिरीशकडे नजर फिरवली. गिरीशने सेसिलचे जाडजूड मेडिकल टेक्स्टबुक बरोबरच आणले होते. सेसिलचे टेक्स्टबुक म्हणजे आम्हा वैद्यकीय विध्यार्थ्यांचे जणू 'गुरु ग्रंथसाहेब'च! त्याने माझ्याकडे पाहून त्याचे नेहेमीचेच मंदस्मित केले.
"हे पहा, हे हार्ट व एओर्टा. आता मी पेरीकार्डीयम म्हणजे हृदयाभवतीच्या आवरणाचा छेद घेत आहे."
"अरेच्च्या, ह्या आवरणाच्या आत खूपच रक्ताच्या गाठी दिसताहेत. या ब्लीडींगमुळे हृदयाच्या कामात व्यत्यय येवूनच पेशंटचा मृत्यू झालेला दिसतोय."
"आता मी हृदयाचा छेद घेतो. आत तर सर्व ठीकठाक दिसते आहे. ही एओर्टिक वाल्व. एकदम हेल्दी दिसते आहे. इंडोकार्डायटीसचा लवलेशही दिसत नाही. पण वाल्व्ह पासून सुमारे एक इंच अंतरावर एओर्टामध्ये एक छेद दिसतो आहे."
"तो इंग्रजी ' T ' या आकाराचा आहे ना ?" मी आणि गिरीश एकाच स्वरात उदगारलो.
"अगदी बरोबर" सर म्हणाले.
"सर, म्हणजे हे नक्कीच 'द'बाकी-टाईप वन' डायसेक्शन आहे."
"थांबा. एव्हड्या उतावळेपणे निष्कर्ष काढू नका. मला कनफर्म करू द्या."
सरांनी तारेसारखा एक प्रोब त्या छेदामध्ये धालून त्याचा विस्तार कोठून कसा आहे याचा अभ्यास केला.
"मुलांनो, अभिनंदन! हे नक्की डायसेक्शनच आहे. हा छेद एओर्टाच्या वॉलमध्ये पुढे जावून दोन इंचानंतर दुसऱ्या एका नवीन छेदाद्वारे पुन्हा एओर्टाच्या पोकळीमध्ये प्रवेश करतांना दिसतो आहे. या दुसऱ्या छेदामुळेच हा पेशंट निदान हॉस्पिटल पर्यंत पोहोन्चू शकला. हाच छेद मागे हृदयाच्या दिशेने पसरून हृदयाभोवती लिक झाला व त्यामुळे तिचा अंत झालेला दिसतो."
"सर, डॉ. द'बाकींनी हे सर्व जसेचे तसे नोंदवून ठेवले आहे. केवढा हा व्यासंग! हॅट्स ऑफ टू डॉ. द'बाकीं !"
सरांचे पुन्हा एकदा आभार मानून आम्ही परत आलो.

दुसऱ्या दिवशीच्या 'क्लिनिकल मिटिंग'मध्ये आमच्या युनिटने अभिमानाने ही केस प्रेझेंट केली.
त्यानंतर गिरीशला मित्रा मॅडमने बोलावून त्याचे खास अभिनंदन केले होते.
"वेल डन, डॉ.गिरीश, आय याम प्राऊड ऑफ यू!"
डॉ. गिरीशच्या अंगावर मुठभर मांस चढले होते.

बिचारी कल्पना जीवानिशी गेली पण जाता जाता आम्हाला केवढा मोठा धडाच जणू देवून गेली. अर्थात हे निदान तिच्या मृत्युपूर्वी झाले असते तरी हा शेवट बदलला नसता. पण केवळ शवविच्छेदन केल्यामुळेच खरे निदान होवू शकले होते. आपल्याकडे अजूनही शवविच्छेदना विषयी उदासीनता आढळते. त्यामुळे, अभावितपणे झालेल्या, डॉक्टरांच्या चुकादेखील 'झाकली मुठ सव्वा लाखाची' या न्यायाने गुलदस्तामध्ये राहतात.
****

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा! म्हणजे एका चांगल्या डॉक्टरची जबाबदारी पेशंटच्या मृत्यूनंतरही संपत नाही तर अधिक महत्वाची ठरते! डाॅक्टर गिरीश यांच्याबद्दल खूप कौतुकादर निर्माण झाला आहे!

डॉक्टरसाहेब,

बापरे काय आजार आहे. यावर वेळकाढूपणा न करणे हा एकमेव इलाज दिसतो. बाकी, कल्पनाच्या मेंदूला रक्त कमी पडल्यामुळे डावी बाजू लुळी पडली होती का?

डायस्टॉलिक मरमर म्हणजे कप्पा शिथिल होतांना होणारी झडपेची फडफड का?

आ.न.,
-गा.पै.

बिचार्‍या कल्पनाचा मृत्यू झाला हे वाचून खूप वाईट वाटले ..

....पण हॅट्स ऑफ टू डॉ. द'बाकीं आणि तुमचे मित्रवर्यही ग्रेटच ....

शब्दांकन अतिशय छान आहे .... ( 'डायसेक्शन ऑफ एओर्टा' - सहज शक्य झाले तर याची काही आकृती वगैरे देऊ शकाल का ?)

बापरे यात माझ्यासाठी बर्‍याच नवीन वैद्यकीय संज्ञा होत्या. मेडीकल नॉलेज झिरो असलेल्या माझ्यासारख्याला दोन वेळा वाचावे लागणार ते समजून घ्यायला.
बाकी तुमच्या लेखात कोणी दगावले हे फार सहज येते वा सहज लिहिले जाते. पण इथे वाचतानाही आमचे काळीज तुटते. मृत्युला तुम्ही फार जवळून अनुभवत असाल त्यामुळे असावे हे.

image_13.jpgimage_12.jpg

@गापै : उजवा हात आणि मेंदू कडे जाणारी रक्तवाहिनी एओर्टाच्या वॅालमध्ये निर्माण झालेल्या फुग्याच्या दाबामुळे हळूहळू बंद झाली व म्हणूनच उजव्या हाताचे बीपी कमी झाले. उजव्या मेंदूचा रक्त पुरवठा कमी झाल्याने त्याच्या नियंत्रणाखाली असलेल्या शरीराच्या डाव्या बाजूची शक्ती कमी झाली. हृदय आणि एओर्टा यांच्या मध्यभागी एओर्टिक व्हाल्व्ह असते. एओर्टाचा आकार वाढल्यामुळे ही वाल्व्ह लिक होते व हृदयाने एओर्टा मध्ये पंप केलेले रक्त हृदय प्रसारण होताना पुन्हा हृदयामध्ये येते. त्यावेळी जो आवाज येतो तो स्टेथोस्कोपमध्ये ऐकू येतो त्यालाच डायास्टोलिक मरमर म्हणतात.
ही कथा थोडी किचकट आहे. सोपी करण्याचा प्रयत्न केला आहे. हल्ली या आजाराचे निदान ईको आणि सिटी स्क्यान मुळे लवकर होवू शकते व एओर्टाचा खराब भाग काढून तेथे कृत्रिम भाग बसवता येतो. याच प्रकारच्या दुसर्या कारणामुळे झालेल्या आजाराची कथा यानंतर अपलोड करीत आहे.

http://www.maayboli.com/node/48424
धन्यवाद !

ओह, मनापासून धन्यवाद सर... मी अशी आकृती मागायचा अवकाश ..... तुम्ही इथे लगेच दिलीतदेखील ... Happy

यामुळे समजायला खूपच सोपे जात आहे .... पुनश्च धन्यवाद ......

डॉ. खूप छान ,
गरोदरपण व बाळंतपण यातून सुखरूपपणे बाहेर पडणे म्हणजे बाईचा पुनर्जन्म असे जे म्हणतात त्याची प्रचिती आली हा लेख वाचून.

छान माहिति Happy
>>>> अर्थात हे निदान तिच्या मृत्युपूर्वी झाले असते तरी हा शेवट बदलला नसता <<<<< हे विश्लेशण दिलेत ते देखिल बरे केले Happy