भुतकाळ

Submitted by संतोष वाटपाडे on 28 March, 2014 - 23:36

भूतकाळाची पाने चाळत बसलो होतो काल एकटा
त्यात तुझे नि माझे काही शब्द गवसले सुरकुतलेले..
जागवलेल्या अनेक रात्री स्वप्ने सारी घुसमटलेली
तुझ्या लाघवी हाकांसोबत गोठवलेले स्पर्श गवसले...

मोरपिसाच्या काही काड्या कुंकू होते आणिक सोबत
मधल्या पानामध्ये होते घरटे आपले गवत कुडाचे..
स्वप्नांमध्ये टवटवणारे तुझ्या नि माझ्या आठवणींचे
निशिगंधाचे रोप गोजिरे बागेमधले जाड बुडाचे...

तू पाठवली पत्रे काही मुडपून निजली होती निश्चल
कानावरती आदळत होती काही पत्रांमधली कलकल..
कधीतरी तू मला दिलेला फ़ोटो बालपणातील साधा
पाहत होता गालावरचे टपटपणारे ओझरते जल...

आठवणींच्या कैक पाकळ्या घट्ट चिकटलेल्या पानांना
सहवासाची अंधुक शाई बिलगून होती अन शब्दांना..
गतकाळाची काव्ये सारी आजही तशीच हळवी व्याकूळ
नकळत थोडी स्फ़ुंदत होती असा एकटा मज बघताना...

काही पाने भूतकाळाची कधीच भरली गेली नव्हती
तू आल्यावर लिहिशील काही म्हणून ठेवत होतो कोरी..
पुर्णत्वाला प्रेम जायला हरकत नव्हती जरी आपली
का विरहाने भिजून गेली आयुष्याची वहीच सारी..

-- संतोष वाटपाडे (नाशिक)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शेवटचं कडवं सर्वात विशेष वाटलं.

काही काही ठिकाणी वृत्त नीट सांभाळलं न गेल्याचं जाणवलं.
वृत्तबद्ध कवितांमधे वृत्तभंग हा रसभंगाला वाव देणारा प्रमुख घटक असू शकतो.... वैम.

शीर्षकात भुतकाळ असं झालंय.
ते भूतकाळ असे असणे आवश्यक आहे.