जी. ए. नावाची वेदना…

Submitted by अतुल ठाकुर on 17 March, 2014 - 20:38

30295_439316.jpg

Shallow people demand variety — but I have been writing the same story throughout my life, every time trying to cut nearer the aching nerve. – Strindberg (पिंगळावेळ – जी.ए. कुलकर्णी)

मराठी साहित्याचं वाचन पुर्वीपासून असलं तरी एखाद्या लेखकाने कायमचं पछाडल्याचा अनुभव नेहेमी आला नाही. काही प्रथम आवडले. नंतरही वाचन सुरु राहीलं पण वैचारिकदृष्ट्या काही चालना मिळेल असा भाग त्यात कमी होता. जी.एं. नी मात्र सुरवातीपासूनच डोक्याचा ताबा घेतला, वाचल्याक्षणापासून पछाडलं आणि माझं जी.ए. वेड हे उत्तरोत्तर वाढतंच गेलं. आजदेखिल जी.एं चं पुस्तक हातात घेताना वेगळ्याच विश्वाचे दरवाजे आपण उघडतो आहोत हे जाणवतं. वाढत्या वयाबरोबर जी.एं. चं साहित्य हे आयुष्याचे नवनवीन पैलु उलगडत राहतं. अभिजात साहित्याची माझी कल्पना ही सार्वकालिक शाश्वततेची आहे. जी.एं. चं साहित्य हे आजपासून हजार वर्षांनंतर देखिल टवटवीतच राहाणार कारण त्यांनी आपल्या साहित्यात मांडलेले प्रश्न हे सर्व कालात, सर्व मानवी समाजात त्या त्याकाळच्या तत्त्वज्ञांनी हाताळलेले आहेत. नियती, मानव व मानवेतर शक्ती यांतील संबंध, माणसा माणसांतील द्वंद्व, माणुस म्हणुन भोगावं लागणारं दु:ख, मानवी स्वभाव, त्यातील गुंतागुंत, मन, परमेश्वर, समाज या गोष्टींचं गुढ उकलण्याचा प्रयत्न प्राचीन काळापासून चालत आलेला आहे. पुढेही चालु राहील. या सर्व प्रश्नांची जास्तीत जास्त निर्दोष उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न माणुस करत आला आहे. जी.एं.नी आपल्या कथांमध्ये हेच केलं. वर दिलेल्या “पिंगळावेळ” या कथासंग्रहावरील अवतरणाप्रमाणेच जी.ए. कायम एकच कथा सांगत राहीले. दुखर्या भागाजवळील शीर आयुष्यभर तोडत राहून जी.एंनी हे भरजरी साहित्य लेणं आमच्यासारख्यांना दिलं. आणि हे दान तरी किती श्रीमंत? दहा पंधरा वर्षापूर्वी वाचलेले जी.ए. वेगळे, आताचे जी.ए. वेगळे. दरवेळी नवी जाणीव, नवा अनुभव, नवा पैलु. जी.एं. चं लिखाण हे महासागराप्रमाणे सारंकाही शांतपणे सामावुन घेऊन पुन्हा भरती आल्याप्रमाणे वरचढ, विस्मयचकीत करणारं. अभिजात साहित्याचं हे दान आम्हाला देताना स्वतः जी.एं.नी आयुष्यात अपार दु:ख सोसलं. जी.एं. चं सारं लेखन त्या वेदनेचा हुंकार आहे. किंबहुना आयुष्यभर सोसलेल्या दु:खाने जी.ए. स्वतःच एक वेदना बनुन गेले होते.

जी.एं. चं लिखाण नियतीवादी आहे का? मला हा प्रश्न महत्त्वाचा वाटत नाही. ते नियतीवादी असले किंवा नसले याने खरोखरंच काहीही फरक पडत नाही. आपल्या अवती भवती वावरणारी बहुतेक माणसं नशीबाला दोष देणारी आढळतात. यातील बहुतांश माणसांचा दैववाद हा व्यावहारिक यशाशी निगडीत झालेला असतो. जी.ए, रुढार्थाने अध्यात्मिक नसले तरी देखिल त्यांच्या सार्या लिखाणात “मेटाफिजीकल” धागा कायम दिसुन येतो. किंबहुना स्वतः जी.एं. ना साहित्यिक प्रगल्भता ही अशा तर्हेनेच अपेक्षित होती. व्यावहारिक समस्यांमध्ये त्यांना फारसा रस नव्हता. मानव व मानवेतर शक्ती यांतील संबंध, संघर्ष हाच त्यांच्या आयुष्यभराच्या चिंतनाचा विषय होता. या चिंतनात जी.एं. ना माणसाच्या मर्यादा अपरिहार्यपणे जाणवल्या. या मर्यादा फार क्रूरपणे नियतीने जी.एं. ना स्वतःच्या आयुष्यात स्पष्टपणे दाखवून दिल्या होत्या. जी.एं. ची नियतीशरणता ही यातुन आली असावी. जी.ए. प्रतिभावंताच्या दृष्टीने मानव आणि नियती मधील संबंध निरखित गेले. त्यावर त्यांच्या अफाट वाचनाचा, वैयक्तिक आयुष्यातील अनुभवाचा साज चढवत जी.एं.चं स्वतःचं तत्त्वज्ञान निर्माण झालं. आता हे तत्त्वज्ञान पटणं न पटणं हे ज्याच्या त्याच्या दृष्टीकोणावर अवलंबुन आहे. मात्र भावलेली कला आणि त्यात सांगितलेलं तत्त्वज्ञान हे तात्त्विकदृष्ट्या स्वतःला पटलंच पाहिजे हा आग्रह मला कधीच कळला नाही. कलेच्या आस्वादात त्यामुळे काही फरक पडतो असं देखिल मला वाटत नाही. स्वतः जी.ए. कसल्याच बाबतीत आग्रही नव्हते. नियतीच्या घडामोडीत कसला आकृतीबंध दिसतो आहे का हे पाहण्यात ते गढून गेले होते. या शोधासाठी काहीवेळा आवश्यक असणारा अलिप्त बैरागीपणा त्यांच्यात उपजतच होता. “सांजशकून” आणि “रमलखुणा” सारखे कथासंग्रह वाचताना जी. एं. ची कथा कुठलं वळण घ्यायला लागली होती हे स्पष्टपणे कळुन येते. “सांजशकुन”, “रमलखुणा” मध्ये जी.एं. चा मार्ग स्पष्ट झाला असला तरीही याआधीच्या सर्व कथासंग्रहात जी.एं.ची प्रत्येक कथा विशिष्ठ वळणाने जाणारी आहे हे जाणवते. मानव व नियतीच्या संबंधातील आकृतीबंध शोधाण्याचा प्रयत्न करणार्या जी.एं.च्या कथांना मात्र एक निश्चित आकृतीबंध होता.

आमच्यासारख्या जी.ए. प्रेमींवर सुनिताबाई देशपांडे आणि श्री.पुं. चे खुप उपकार आहेत. त्यांच्याच प्रयत्नांनी जी.एं. ची पत्रं प्रकाशित झाली आणि या कायम अलिप्त, वेगळ्या राहीलेल्या लेखकाच्या आयुष्यावर काहीसा प्रकाश पडला. जी.एं. चं व्यक्तीमत्व अतिशय गुंतागुंतीचं होतं. त्यांच्या आवडीनिवडी काहीवेळा टोकाच्या वाटण्याजोग्या होत्या. स्पष्टपणे आपली मते व्यक्त करताना कुणाचीही भीडमुर्वत न ठेवणारे जी.ए. जवळच्या माणसांबाबत कसे हळवे आणि संपूर्ण शरण होते हे पाहुन गंमत वाटते. पत्रांमध्ये जी.एं. चं नुसतं अफाट वाचनच जाणवत नाही तर त्यावर त्यांनी केलेलं प्रगाढ चिंतन देखिल जाणवतं. जी.एं. ना माणसांप्रमाणेच पुस्तकं सुद्धा वेगळ्या प्रकारची लागत. वेगळ्या वाटेने जाणारी माणसं आणि वेगळे अनुभव देणारी पुस्तकं यांत जी.ए. रमुन जात. मात्र पुस्तकं काय किंवा माणसं काय दोन्ही बाबतीतली जी.एं. ची निवड अत्यंत काटेरी होती. सर्वसाधारण लोकप्रिय पुस्तकं जी.एं. ना फारशी भावली नाहीत. माणसाला, माणसाचे म्हणुन अपरिहार्यपणे पडणारे जे प्रश्न असतात त्यांची चर्चा ज्यांत नसेल अशा लिखाणाच्या जी.ए. वाटेला गेले नाहीत. गुढाचं जी.एं.ना आकर्षण होतं. पारंपारिक अध्यात्म, संतवाड़मय, गांधी हा त्यांच्या कायम टिकेचा विषय राहीला. पण आवडीच्या लेखक, पुस्तकाबद्दल लिहीताना जी.ए, भरभरुन लिहीत. जराही हात आखडता घेत नसत. “सत्यकथा” हा त्यांच्या आवडीचा विषय. काही लेखकांच्या काही आवडलेल्या कथांबद्दल ते हमखास लिहीत. अरविंद गोखले (कातरवेळ), गंगाधर गाडगीळ (तलावातले चांदणे), सदानंद रेगे (चंद्र सावली कोरतो), जयवंत दळवी (रुक्मिणी), ग. दि. माडगुळकर(वीज) यांचे उल्लेख जी.एं. च्या पत्रात वारंवार येतात. मराठी साहित्यात टिकेप्रमाणेच जी.एं. चे खास आवडीचे विषय देखिल होते. गडकरी हा असाच त्यांच्या पसंतीचा विषय. विश्राम बेडेकरांची “रणांगण” कादंबरी, ईरावती कर्वेंची “युगान्त” याबद्दल जी.ए. भरभरुन लिहीत. व्यासांच्या महाभारताला जी.ए. संपुर्ण शरण होते. महाभारत हा त्यांच्या कायम चिंतनाचा विषय राहीला. मात्र जी.एं.च्या प्रचंड वाचनाचा बहुतेक भाग हा इंग्रजी साहित्याने व्यापला होता. इतका कि “माझं सारं ऋण परकिय चलनात आहे” असं ते म्हणत.

जी.एं. च्या पत्रांवरुन सर्वप्रथम जाणवतं ते हे की लहानपणापासूनच जी.एं.ना नियतीचे तडाखे सोसावे लागले. आवडत्या, आपल्या माणसांचे मृत्यु पाहावे लागले. त्यांची जी प्रेमाची माणसं काळाने उचलुन नेली त्यात सख्ख्या बहीणीचाही समावेश होता. जी.एं. मधला कडवटपणा आणि त्यांची नियतीला समजुन घेण्याची सततची धडपड यातुनच आली असावी. सर्वसाधारणपणे कष्टात गेलेल्या बालपणात काही एका मर्यादेत त्यांचे लाडदेखिल झाले. याचा उल्लेख पत्रांत वारंवार येतो. आई, बहीण, गाय याबद्दल लिहीताना जी.एं. भावनावश होतातच. पुढे जी.एं.नी त्यांच्या मावसबहीणींना स्वतःकडे आणुन त्यांचा सांभाळ केला. आपल्या दोन छोट्या भाच्यांबद्दल लिहीताना जी.एं. चा कुटूंबवत्सल चेहरा समोर येतो. लेखक म्हणुन जी.एं. ना अमाप लोकप्रियता मिळाली. मराठी साहित्यात लोकप्रिय लेखक दुर्मिळ नाहीत. मात्र जी.एं. मिळालेल्या लोकप्रियतेची नोंद वेगळ्या तर्हेने करणं आवश्यक आहे. ज्याला “स्टार क्रेझ” म्हणता येईल अशा तर्हेची ही लोकप्रियता होती.लोकांमध्ये फारसं न मिसळणारे, धारवाडसारख्या मुंबई, पुण्या पासून दुर आडवाटेच्या गावात राहणारे, साहित्य संमेलनं, साहित्यीक गप्पा यासर्व गोष्टींपासून अलिप्त असलेले जी.ए. त्यांच्या वाचकांमध्ये तत्त्वज्ञानी लेखकाचं स्थान मिळवुन राहिले होते. आजही त्यांचं हे स्थान अबाधित आहे. लेखक म्हणुन कारकिर्द गाजवत असतानादेखिल नियतीने जी.एं. चा पिच्छा सोडला नाही. त्यांच्या “काजळमाया” कथासंग्रहाला साहित्य अकादमिचं पारितोषिक मिळालं. जी.एं. नी दिल्लीला जाउन ते पारितोषिक स्विकारत बहिणींसमवेत आनंदाचा क्षण उपभोगला. दुर्दैवाने ते पुस्तक प्रकाशन तारीख आणि रजिस्ट्रेशनच्या घोळात अडकलं. अत्यंत मानी असलेल्या जी.एं. नी पारितोषिक रकमेसकट परत केलं. हा जी.एं. चा सर्वस्वी स्वतःचा निर्णय होता. साहित्य अकादमिने याबाबत कसलिही सुचना केली नव्हती. जी.एं.ना पुस्तकावर कसलाही डाग नको होता. मात्र हा सल जी.एं. च्या मनात कायम राहीला. पत्रांमध्ये जी.एं.ची अनेक रुपं समोर येतात. त्यांना अनेक विषयात नुसता रसच नव्हता तर गतीदेखिल होती. संगीत, चित्रकला, फोटोग्राफी अशा अनेकविध विषयांवर ते पत्रात लिहीत. ते स्वतः चित्रकार होते. रेम्ब्रॉचे पेंटिग्ज हा एक त्यांचा अत्यंत आवडता विषय होता. जी.एं. चा अनेक क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींशी पत्रव्यवहार होता. त्यातल्या प्रत्येकाला पत्र लिहीण्याची जी.एं. ची अशी स्वतःची खास पद्धत होती. मात्र ते स्वतःच्या कडव्या मतांना कधीही मुरड घालीत नसत. यादृष्टीने जिज्ञासूंनी सुनिताबाई देशपांडे, श्री. पु. व जयवंत दळवी यांना जी.एं.नी लिहीलेली पत्रे जरुर वाचावीत. फार वेगळे असे जी.ए. त्यात दृष्टीस पडतात.

जी.एं.ची कथा ही माझ्यासाठी सर्वस्वी वेगळ्या वातावरणाची, वेगळ्या विश्वाची, इतकंच नव्हे तर वेगळ्या तत्त्वज्ञानाची सफर असते. त्यांच्या काही कथा वाचताना अक्षरशः दम लागतो. “पिंगळावेळ” मधली “स्वामी” ही कथा या जातकुळीतली आहे. काही कथा वाचवत नाहीत एवढी वेदना त्यात भरलेली असते. “वीज” ही कथा अशा वेळी पटकन आठवते. कथा वाचताना जी.एं. च्या पत्रातील काही ओळी आठवतात. “विशिष्ठ सिच्युएशन मध्ये सापडलेली माणसं” हे जी.एं.च्या कथांचे नायक किंवा नायिका. मग तो “वीज” मधला बळवंत मास्तर असो कि “माणुस नावाचा बेटा” मधला दत्तु. “तळपट” मधला दानय्या असो कि “लई नाही मागणे” मधला बंडाचार्य. जी.एं.च्या कथेतला प्रत्येक माणुस नुसता नियतीशी झगडत नाही. कारण तसे सर्वच जण झगडत असतात. ही माणसं काही एका सापळ्यात अडकलेली आहेत. त्यांच्या सामान्य आयुष्यात त्यांना कायमची मान खाली घालावी लागेल असं काहीतरी त्यांच्या हातुन घडलं आहे. काहीवेळा इतरांमुळे त्यांच्या आयुष्याचा जणु ओघच थांबला आहे. काहींच्या मनात अपमानाचं विष कायमचं राहुन त्यांची आयुष्य वठुन गेली आहेत. सारी परीस्थीतीशी तडजोड करीत झगडण्याचा बरेचदा निष्फळ असा प्रयत्न करताना दिसतात. आणि हर प्रयत्नात त्यांच्या मर्यादा अधोरेखीत होत राहतात. मात्र या मर्यादा फक्त त्या कथा नायक किंवा नायिकेच्या नाहीत तर या एकंदर मानवाच्याच मर्यादा आहेत. कथा “ऑर्फीयस” सारखी ग्रीक पुराणकालीन असो कि “इस्किलार” सारखी मध्ययुगीन, जी.एं. ची कथा या मानवी मर्यादांच्या चौकटीतच वावरत राहते. नाईल नदी विशिष्ठ मार्गानेच का जाते याचं जी.एं. ना आकर्षण होतं. त्याचप्रमाणे, नियतीने कथेतील माणसांसाठी आखलेला व्युह, त्यात बरोबर अडकणारी दुबळी माणसे, योग्य वेळ येताच खेचला जाणारा फास, हे सारं काय कोडं आहे याचाच शोध जी.एं.च्या कथा घेत असतात. जी.एं. ना निव्वळ सामर्थ्यवान माणसांचे मातीचे पाय दाखवायचे नसतात तर ही माणसे देखिल नियतीसमोर कशी हतबल असतात हा त्यांच्या कथेचा विषय असतो. “पडदा” कथेतील प्रिं. जठार आपल्या बायको आणि मुलासमोर असेच हतबल झालेले दिसतात. अत्यंत रसिक अशा, जीवन सर्वार्थाने उपभोगण्याची इच्छा असणार्या या माणसाला सारं काही असुन सुद्धा अरसिक बायको आणि मुलगा लाभतात. त्यातही दुर्दैव असं कि ही दोन्ही माणसं कुठल्याही अर्थाने वाईट नसतात. जठारांची रसिकता समजण्याची कुवतच त्यांच्यात नसते. नेमका हाच आकृतीबंध जी.एं.च्या बर्याच कथांमध्ये दिसतो. पूर्णपणे वेगळ्या स्वभावाची एकत्र आलेली माणसं, त्यांच्या मर्यादा, एकमेकांशी तडजोड करण्याची धडपड आणि त्यात आलेलं अपयश. जी.एं.च्या प्रत्येक कथेवर बरंच काही लिहीता येईल. मात्र या लेखाचा तो विषय नाही. येथे मी इतकंच म्हणुन थांबतो की जी.एं.च्या कुठल्याही कथेत अनेक शक्यता दडलेल्या असतात हे नक्की.

असामान्य लेखक आणि असामान्य माणुस असंच जी.एं. चं वर्णन करावं लागेल. अतिशय मानी आणि अत्यंत कडवी, काटेरी मतं असणारे जी.एं. मित्रांबद्दल आपुलकी, आदर, कौतुकाने बोलताना थकत नाहीत. माधव आचवलांविषयी जी.ए. असेच हळवे झालेले दिसतात. त्रस्त मनस्थितीत असताना दळवींनी युसीस तर्फे त्यांना भाषांतराची कामं दिली होती त्याचा अत्यंत कृतज्ञतापुर्वक उल्लेख न चुकता आणि वारंवार येतो. जी.एं. बद्दल विचार करताना असं जाणवतं कि त्यांनी स्वतःचं आयुष्यंच कथांमध्ये विखरुन ठेवलं आहे. “रमलखुणा” कथासंग्रहातले दोन्ही प्रवासी म्हणजे खुद्द जी.ए.च असं मला नेहेमी वाटतं. त्यातल्या दोन्ही कथांमध्ये त्यांच्या सार्या तत्त्वज्ञानाचा अर्क उतरला आहे. जी.एं. चा शोध घेण्याचे प्रयत्न कमी झाले नाहीत. त्यांच्या कथांमधुन, त्यांच्या खासगी आयुष्यातील घटनांमधुन काहींनी धागेदोरे जुळवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यातुन फारसं काही हाती लागलं नाही. यालेखकाविषयी लोकांचं कुतुहल आजतागायत कायम राहीलं. एखाद्या महासागराप्रमाणे जी.ए. अथांगच राहीले.

अतुल ठाकुर

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विशिष्ट परिस्थितीत एकत्र आलेली अथवा
जन्मलेली माणसं कशी वागतील ते दाखवतात जी एं च्या कथा .परंतू कोणतेही
अनुमान किंवा उत्तर काढून कथा संपवलेली नसते .अशा कथांचा शेवट करणे फार
कठीण काम त्यांना साधले आहे .जी ए गारूड करतात .वाचक सर्व विसरून डोलतच
राहातो अगदी पुंगी वाजायची थांबली तरी .

अतुल लेख आणि विवेचन फक्कड धारवाडी पेढे .

जी. ए. खुप तपशीलवार आणि सुरेख उलगडून दाखवले आहेत तुम्ही. मी जी. एं.चं साहित्य फारसं वाचलेलं नाही, पण 'प्रिय जी. ए.'ची मात्र पारायणं केली आहेत. दर वेळेस भारावल्यासारखं होतं वाचताना.

जी. ए. न वाचल्यामुळे खुप जणांची बोलणी खाल्ली आहेत आणि काहीजणांच्या तर मनातून देखिल उतरलेली आहे. इतके लोक भक्त असतात जी. एं.चे. तुमच्या लेखातूनही त्याच स्वरुपाची भक्ती शब्दा-शब्दातून दिसतेय.

सुरुवातीला दिलेलं रेखाटन अप्रतिम आहे.

.>> काही कथा वाचवत नाहीत एवढी वेदना त्यात भरलेली असते >>

अतुल सुंदर वाक्य, लेख अभ्यासपूर्ण .स्केच अप्रतिम !

कदाचित तुम्ही लिहीलेल्या या वाक्यातील वेदनेमुळेच जी.ए. माझ्याकडून वाचले गेले पण पारायणे झाली नाहीत. मर्ढेकरांच्या भाषेत जुनी ढिली जखम फाडून त्यात डोकावण्याचा प्रकार .

त्यांची भरजरी शब्दशैली पण तीतून व्यक्त होणारं निराश, नग्न जीवनदर्शन महाकाव्याचा पोत असलेलं आहे.त्यांनाही स्वत:चे लेखन सोसवत नसावे एरवी त्यांच्या हातून एखादी महाकादंबरी लिहून झाली असती.

त्यांचं गूढ आत्मविलोपी जीवन, स्वत:ला काळ्या काचांआड लपवण्याचा अट्टाहास.अस्सल प्रतिभावंताच्या गहनगुंफेत , एकांतात महान निर्मिती होत असते याचं उदाहरण आहे.आज एवढ्यातेवढ्याने प्रसिद्धीचे प्रकाशझोत अंगावर घेणारी प्रतिभा का खुरटलेली दिसते त्याचं उत्तरही मिळतं.

अतिशय सुरेख आढावा घेतला आहेत. हा लेख जीएंची ओळख अश्या स्वरुपात नवीन वाचकांसाठी उत्तम आहे. काही काही वाक्ये खूप आवडली. सर्वात सुंदर म्हणजे:

>>> मात्र भावलेली कला आणि त्यात सांगितलेलं तत्त्वज्ञान हे तात्त्विकदृष्ट्या स्वतःला पटलंच पाहिजे हा आग्रह मला कधीच कळला नाही. कलेच्या आस्वादात त्यामुळे काही फरक पडतो असं देखिल मला वाटत नाही. <<

तुती आणि कैरी ह्या माझ्या जीएंच्या अत्यंत आवडत्या कथा. नियतीस शरण जाणारी प्रौढ माणसे जीएंनी अनेकदा रंगवली पण एका लहान मुलाच्या नजरेतून असलेल्या ह्या दोन कथा जबरदस्त आहेत.

जी.ए.कुलकर्णी वा नुसतेच "जी.ए." ह्या नावाचे गारुड मराठी वाचनाच्या प्रेमात असलेल्यांच्या मनावर किती खोलवर पसरले आहे त्याचे अस्सल उदाहरण म्हणजे वरील श्री.अतुल ठाकुर यांचा सर्वार्थाने अभ्यासू लेख. जी.एं.च्या मृत्यूला ३५ वर्षे पूर्ण होत आली....त्यापूर्वीही त्यानी लेखन थांबविले होते असेच म्हटले पाहिजे....म्हणजेच "लेखक" म्हणून त्यांचा कालावधी १९५५ ते १९७७ या २०-२२ वर्षांचाच, त्यातही सारा कारभार केवळ १००-१२० कथांचा.....८ संग्रहाचा प्रपंच. असे असूनही एवढ्याश्या ताकदीवर या नावाची जादू अशी विलक्षण की प्रत्येक कथेच्या वाचनानंतर वाचक "आता परत वाचली पाहिजे, समजण्यासाठी..." म्हणत तिकडे वळतो...."क्षणोक्षणी पडे, उठे परि बळे उडे बापुडा" अशी अवस्था करून सोडणारी ही जी.एं.ची अनन्यसाधारण कथाशक्ती. जी.एं.च्या पहिल्या कथेपासून ही प्रक्रिया चालू आहे....आणि प्रत्येक कथेमध्ये असलेली जी.एं.ची प्रतिभा "मला समजली" असे म्हणण्याइतपत ठीक आहे, पण क्वचितच माधव आचवल, श्री.पु.भागवत वा गंगाधर गाडगीळ, द.भि.कुलकर्णी यांच्यासारखे ज्येष्ठ लेखक-संपादक-वाचक म्हणू शकतील की "मला उमजली"..... हे 'समजणे' आणि 'उमजणे' याच्या मधल्या स्थितीत काही वाचक कात्रीत सापडलेले असतात. त्याना म्हटले तर जी.ए. समजले म्हटले तर जी.ए. समजले नाहीत अशी कुंठीतावस्था प्राप्त होते.

श्री.ठाकुर लिहितात... "यांच्या काही कथा वाचताना अक्षरशः दम लागतो...". नक्कीच. पण जी.ए.नी हे मुद्दाम केले आहे का ? नाही, बिलकुल नाही. त्यांच्या कथेच्या पसार्‍याविषयीच्या व्याख्या स्वतंत्र अशा आहेत. कादंबरीचा आवाका असलेल्या "इस्किलार", "प्रवासी", "रत्न", "विदूषक" ह्या कथांना त्यानी मुक्तपणे फिरविले आहे, पण त्यातील विषय भरकटणार नाही हे पाहिले. जितके लिहिले तेच इतके अंगावर येणारे आहे की कादंबरीचा विचारच केला नाही हे वाचकाच्या दृष्टीने योग्यच म्हणावे लागेल. "ताल" आणि "तोल" या दोन संज्ञा जी.एं.च्या कथांच्या व्यापाच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरल्या आहेत. संवाद असो वा नसो, पण जी.ए. कथेतील ताल कधी सोडत नाहीत. या विषयी उदाहरणेही खूप देता येतील पण मूळ लेखापेक्षा प्रतिसादच दीर्घ होण्याची भीती आहे.

"...जी.एं.च्या कुठल्याही कथेत अनेक शक्यता दडलेल्या असतात हे नक्की...." ~ ह्या शक्यतेचे गणित आपणच सोडवायचे आहे. जी.ए. ते करणार नाही. त्यानी लिहूनच ठेवले आहे की एकदा कथा संपादकांकडे पाठवून दिली की माझे काम संपले अशीच भावना ठेवली...इतकेच काय कथा प्रसिद्ध झालेला अंक देखील मी पाहात नाही, कारण आता त्या कथेवरील माझा हक्क संपला....वाचकानेच त्यातील असलेल्या नसलेल्या शक्यतेचा विचार करावा. इतका अलिप्तपणा त्यानी अखेरपर्यंत जपला होता. लोकसंग्रहाबाबत त्यांच्याविषयी प्रवाद भरपूर, आणि त्याबद्दल त्यानी कधी स्पष्टीकरणही दिले नाही...."मी कसा राहणार, कसे राहिले पाहिजे हे मी ठरविणार" असा काहीसा त्यांचा विचार होता...त्याला विरोध करणेही बरोबर नव्हते. पण ज्याना भेटावेसे वाटत होते त्याना ते जरूर भेटत....वेळही देत...विविध विषयावर तासनतास गप्पाही मारत....समोरच्याला आपलेसे करून टाकत.

जी.एं.ची निवेदनक्षमता खूप ताकदीची....स्वतः प्रसंगी त्या घटनेचे साक्षीदार आहेत पण तो अनुभव शब्दबद्ध करताना त्यानी शब्दात पाळलेली अलिप्तता अवर्णनीय अशीच म्हणावी लागते. खाजगी जीवनाशी निगडीत अशा "तुती", "कैरी", "चंद्रावळ", "गुंतवळ", "वीज" ह्या कथा....या प्रत्येक कथेत जी.ए. कोणत्या ना कोणत्या पात्राच्या भूमिकेत होते....कथांतील दाह त्यानी प्रत्यक्ष भोगला आहे...सहनही केला आहे....पण त्यातील निवेदनता त्यानी अशी काही जपली की वाचकाने त्यांच्यापासून दूर जाऊन कथेशीच एकरुप व्हावे.

लेखाच्या शेवटी श्री.अतुल ठाकुर म्हणतात..."एखाद्या महासागराप्रमाणे जी.ए. अथांगच राहीले...".

तसेच राहतील.

दोन वर्षापूर्वी पहिल्यांदाच मी जी.ए.कुलकर्णी ह्यांच्या बद्दल, त्यांच्या लिखाणाबद्दल ऐकलं. तेव्हाच सांगणा-याने सांगून ठेवलं होत कि जी. ए. ह्यांच्या लिखाणाला समजून घेण्याचा प्रयत्न करू नको. आणि पहिल्यांदा वाचतानाच तुला सगळं समजेल असा अट्टहास अजिबात नको. बस रमून जा. ते वेगळाच जग आहे. दुखरं… तरीही वारंवार अनुभवावसं वाटणारं. प्रत्येक वेळी तीच जखम, तशीच वेदना, तरीही अनुभव मात्र नवा असतो.

जी. ए. वाचल्यावर त्यांचा चाहता होण्यापेक्षा मी त्यांना शरण जाणं पसंद केलंय. आणि अजूनही जी.एं. च्या लिखाणाला माझ्या आकलन कक्षेत आणण्याचा प्रयत्न करतेय. सध्यातरी त्याचं व्यक्तिमत्व समजून घेण्याइतपत ताकत नाहीये.

>> एखाद्या महासागराप्रमाणे जी.ए. अथांगच राहीले. << तसेच राहतील.

नतमस्तक !!!

अशोक,
समर्थ प्रतिसाद. तुमच्याकडून आला नसता तरच नवल. त्या गूढाच्या इतक्या जवळ तुम्ही होता, तेही त्या मंतरलेल्या काळात.
जी.एं. च्या अस्तित्वाचीच कथा तुमच्या काळजात रुतून बसली आहे आणि ती कधीतरी अशी प्रवाही होते.
>>खाजगी जीवनाशी निगडीत अशा "तुती", "कैरी", "चंद्रावळ", "गुंतवळ", "वीज" ह्या कथा....या प्रत्येक कथेत जी.ए. कोणत्या ना कोणत्या पात्राच्या भूमिकेत होते....कथांतील दाह त्यानी प्रत्यक्ष भोगला आहे...सहनही केला आहे >> ही अनमोल वाक्यं जी.एं.चं प्रतिभारहस्य सोडवतात की वाढवतात , कळत नाही..

.म्हणजेच "लेखक" म्हणून त्यांचा कालावधी १९५५ ते १९७७ या २०-२२ वर्षांचाच, त्यातही सारा कारभार केवळ १००-१२० कथांचा.....८ संग्रहाचा प्रपंच. असे असूनही एवढ्याश्या ताकदीवर या नावाची जादू अशी विलक्षण की प्रत्येक कथेच्या वाचनानंतर वाचक "आता परत वाचली पाहिजे, समजण्यासाठी..." म्हणत तिकडे वळतो >>

सिरिएसली. जी ए नावाची जादू कधी ओसरत नाही.

काही कथा वाचवत नाहीत एवढी वेदना त्यात भरलेली असते >> अगदी.

अजूनही ते नवे वाटतात. मला फार पूर्वी कधीतरी एकदा वाटले जी एंच्या कथा इंग्रजीतून उचललेल्या आहेत की काय? इतक्या त्या समकालिनांपेक्षा वेगळ्या आणि जबरदस्त ताकदीच्या होत्या. अर्थात असा समज व्हायचे कारण त्यांचे इंग्रजी वाचन. पण पुढे तो समज गळून पडला.

(नॉट दॅट की इंग्रजी म्हणजे जबरदस्तच - ते कसे एकदम वेगळे होते त्यासाठी ते वाक्य)

लेख सुंदर आणि प्रतिसादही सुंदर.

मी जी. ए. चे साहित्य फार क्वचित वाचले आहे पण आता 'प्रिय जी.ए.' जरूर वाचेन.

मागे एकदा कथांवर मालिका आली होती परंतु पेललेच नाही .दृष्य माध्यमात घटना ,संवाद अधिक चित्रीकरणावर भर असतो .पात्रेही थोडी .स्वगत टाकावे लागते .

अतुल एका विलक्षण समर्थं तितक्याच अगम्य लेखकावर आणि त्यांच्या लिखाणावर तितकाच समर्थं अन समर्पक लेख. लेख एकदा वाचून पुरला नाही. चवीचवीनं पुन्हा पुन्हा वाचीत अगदी अगदी म्हणत राहिले.

भारती - <<कदाचित तुम्ही लिहीलेल्या या वाक्यातील वेदनेमुळेच जी.ए. माझ्याकडून वाचले गेले पण पारायणे झाली नाहीत. मर्ढेकरांच्या भाषेत जुनी ढिली जखम फाडून त्यात डोकावण्याचा प्रकार >>

भारती किती माझ्या मनातलं बोललीये ह्याला तोड नाही. (तरी तिच्यासारखं चपखल शब्दंत ते उतरलं नसतं हे ही तितकच खरय Happy )

एका वर्षी भारतातून येताना समग्र जीए आणले... जीए सलग अन सतत वाचू शकणार्‍यांना लाख सलाम. मला जीएंवर उतारा लागतो.
गाथा वाचायला घेते तेव्हा कुठे अत्यंत सायासाने स्वतःची थोडी सापडा-सापड होते.
जीएंवर उतारा आहे का मुळात?

अतुल,
अतिशय सुंदर लेख.
बर्‍याच वर्षांपूर्वी(कॉलेजच्या काळात) जी.ए.झपाटल्यासारखे वाचले होते.किती समजले होते तेही आठवत नाही.पण वाचताना झालेली दमछाक ,आठवते.आता परत नव्याने वाचायला पाहिजे.
प्रिय जी.ए.'मात्र वाचायचे राहून गेले होते.तेही वचले पाहिजेच.

Daad, prashnahi tuch vicharates ani uttarahi tuch detes... dhanya ahes Happy

सर्व प्रतिसादकांचे मनःपूर्वक आभार Happy

श्री. अशोकरावांना अनेकदा जीएं बरोबर गप्पा मारण्याचे भाग्य लाभले आहे ही गोष्ट मायबोलिकरांना ठाऊक असेलच Happy या निमित्ताने मला पुन्हा त्यांना त्या आठवणी लिहुन काढण्याचा आग्रह करावासा वाटतो Happy

अशोकसर, अतुलचा प्रस्ताव शक्य असेल तर मनावर घ्या प्लीज.
तुम्हाला त्या आठवणी वैयक्तिक पातळीवरच राहू द्यायच्या असतील तर मात्र आग्रह नाही. कारण मग ते जी.एं.च्यादेखिल स्वभावधर्माशी विसंगत होईल.

अतुल आणि सई....

धन्यवाद..... धारवाडच्या ज्या कडेमणी कम्पाऊंड परिसरात जी.ए.कुलकर्णी राह्यचे, त्याच गल्लीच्या अलिकडील बाजूने स्टेशन रोड होता...तसा शांतच भाग. तर या रोडच्या पश्चिमेकडील भागातील वस्तीत माझ्या बहिणीचे सासर होते. तिच्याकडे मी गेलो की मग साहजिकच जी.एं. च्याच एरियातून जावे लागे....[ अर्थात जी.एं. चे घर मुख्य रस्त्यापासून दूर अगदी आतील बाजूस होते....आता हा सारा परिसर नष्ट झाला आहे....फ्लॅट संस्कृतीने ती जागा व्यापली आहे]. जी.ए. आणि मी यांच्यात पत्रव्यवहार होता...त्यानाही माझी बहीण त्या भागात आहे हे माहीत होते. त्यानी "ज्यावेळी सुधाताईकडे याल तेव्हा जरूर माझ्याकडे या....मला बोलायला आवडेल तुमच्याशी" असे पत्र आले होते त्यावेळी मीच भारावून गेलो होतो. कारण जी.एं.चा स्वभाव "मनुष्यप्रेमी" नाही असे जयवंत दळवी आणि तात्कालीक जवळच्या लोकांनी "ललित" मधून रंगविला होता, त्याची भीतीही होती....पण मी लेखक नसल्याने व एक शुद्ध वाचक याच नात्याने [शिवाय हॉलीवूड हे एक माध्यम होतेच आमच्या पत्रव्यवहाराच्या कारणामध्ये] त्यांच्याशी नाते ठेवून असल्याने मला आलेल्या निमंत्रणाला कौटुंबिक नात्याचाही गंध होता. एकदा पत्राद्वारे दिवस वेळ ठरवून त्यांच्याकडे गेलो. प्रथम कडेमणी कम्पाऊंड भागात गेलो तर "प्रो.जी.ए.कुलकर्णी इथे कुठे राहतात ?" असे एकादोघांना विचारले तर त्याना मराठी येत नव्हते...मला कन्नड येत नाही...पण हिंदीत एकाला विचारल्यावर त्याने पोस्टमनकडे बोट दाखविले....त्या पोस्टमनने मात्र मला अचूक ठिकाण दाखविले. आजुबाजूला झाडी...अंगणात फुलांच्या विविध प्रकारांची लागवड....हिरवागार परिसर....वस्तीही दोन घरात योग्य ते अंतर ठेवलेली....आणि कमालीची शांतता...सायंकाळचे चार वाजलेले....आजुबाजूला जवळपास जाग नाही...जी.एं.च्या दुमजली घराचे दार बंद....शिवाय समोर गेट....मी बाहेरूनच हाक मारली..."सर !!" काहीशा मोठ्या आवाजात. पहिल्याच हाकेला दार उघडले गेले आणि चाळीशीतील एक स्त्री समोर उभी....त्या जी.एं.च्या भगिनी प्रभाताई....त्यानी अपेक्षा असल्याप्रमाणे विचारले, "आपण कोण ?"...."ताई, मी अशोक पाटील, कोल्हापूरहून आलो आहे..." प्रभाताई हसल्या "हो, माहीत आहे...या आत...अण्णा येतील खाली...." मी छाती धडधडत असल्याची जाणीव ठेवून आत गेलो....समोर एक आरामखुर्ची होती....आणि त्याच्यासमोर नेहमीची एक....ताईनी त्या खुर्चीकडे बोट केले.... जी.एं. साठी "आल्फ्रेड हिचकॉक" यांचे आत्मचरित्र भेट म्हणून आणले होते....तेही खास इंग्रीड बर्गमनसाठीच....ते बाजूला ठेवले....आणि उभ्या महाराष्ट्राला ज्या व्यक्तीला भेटण्याची आस लागून राहिली आहे अशा एका व्यक्तीला आता दोन मिनिटात प्रत्यक्ष पाहाणार यामुळे निर्माण झालेल्या अधिरतेचा अनुभव घेत तिथे बसलो.

.....आणि दोनच मिनिटात आपल्या नित्याच्या काळ्या चष्म्याच्या अवतारात जी.ए.कुलकर्णी "नमस्ते अशोक..." म्हणत समोर आले....खाडदिशी मी उभा राहिलो....आनंद झाला की त्यानी मला त्यांचे चरण स्पर्श करताना मला अडविले नाही....नमस्कार केला आणि मग ते नाते जुळले असे काही की मग आयुष्यभर आठवणीरुपाने चिकटलेच....ती पहिली भेट होती....जी तासाच्या वर चालली, प्रभाताईच्या हातची खिचडीही खाल्ली, चहाही दोनवेळा झाला. त्या दीड तासाच्या दरम्यान ना त्याना कोणी भेटायला आल्याचे दिसले, ना फोन, केवळ आमच्या दोघांचे बोलणे, अधुनमधून प्रभाताईनी सुधाबद्दलची केलेला चौकशी....नंतर ज्या ज्या वेळी धारवाडला गेलो त्या त्या प्रत्येक वेळी त्यांच्याकडे गेलो असे नाही, पण ज्या वेळी गेलो ती त्यांच्या पूर्वपरवानगीनेच (तसे करणे जरूरीच होतेच), चर्चाही अनेक...पुढे त्यांचा पुतण्या शंतनू कुलकर्णी कोल्हापूरात एम.बी.ए. साठी आला तो जी.एं.चे माझ्यासाठी पत्र घेऊनच....माझ्याकडे हॉस्टेलची सोय होईतोपर्यंत राहिला.... कौटुंबिक आठवणी आहेत असे म्हटले तरी चालेल.

हळवा होऊन जातो मी त्या सार्‍या आठवणींनी....पुण्याला मात्र त्यांच्याकडे जाता आले नाही....निधनाची वार्ताही मी आकाशवाणीवर ऐकली.

धन्यवाद अशोकराव. फार हळव्या आठवणी आहेत आणि सार्‍या लिहिणेही तुम्हाला कदाचित शक्य होणार नाही याची जाणीव आहे. काही गोष्टी जगजाहिर होणे जीएंनाच रुचणार नाही.

पण या क्षणी माझ्या भाग्याची मात्र मला लख्ख जाणीव होते आहे. जीएंना भेटणे तर शक्य झालेच नाही. ते गेले तेव्हा वय लहान होते. त्यांच्या पुस्तकांचे वाचनदेखिल नुकतेच सुरु झाले असावे. मात्र त्यांच्याशी स्नेह असलेला, तुमच्यासारखा अत्यंत रसिक मित्र लाभणे हे भाग्य नव्हे काय?

अतुल....

काही गोष्टी जगजाहीर न होणे लेखकाच्या दृष्टीने फार आवश्यक असते. पण त्याच्या मृत्यूनंतर त्यांच्या परिवारातील काहीना वा प्रकाशकांना प्रसिद्धीची भूल पडल्यामुळे लेखकाचा तो दृष्टीकोण बाजूला ठेवावासा वाटतो...जे अत्यंत चुकीचे आहे. जी.एं.च्या पत्रांचा फार उदोउदो झाला त्यांच्या मृत्यूनंतर....त्यामध्ये मूळ हेतू काय होता त्यावर आता काही लिहिणे योग्य नाही (आता त्याची गरजही उरलेली नाही). पण ज्यावेळी पत्रे गोळा करणे सुरू झाले होते त्यावेळी त्या समितीमध्ये श्री.पु.भागवत, पु.ल.देशपांडे, म.द.हातकणंगलेकर, ग.प्र.प्रधान अशी भरभक्कम नावे घातली गेली...ज्यामुळे ज्यांच्याकडे जी.एं.ची पत्रे होती त्यानी ती बिनदिक्कत समितीकडे जमा केली. खुद्द पु.ल.देशपांडे आणि भगिनी प्रभावती यांची पत्रे मला आली होती "जी.एं.च्या पत्रव्यवहाराबाबत आणि त्याच्या प्रती पाठविण्यासाठी....". मी पुन्हा एकदा ती पत्रे वाचली आणि मला जाणवले की यातील मजकूर थेट 'पब्लिक' करणे योग्य नाही....कारण मजकूर संपादित होईलच याची शाश्वती नव्हती. खाजगीपणाबद्दल मी पु.ल. याना लिहिले. त्याना बहुधा माझी अडचण समजली असणार कारण त्यानी नंतर आग्रह धरला नाही.

प्रत्यक्ष जी.एं.चे खंड प्रकाशित झाल्यावर ते वाचले आणि जाणवले की कुठल्याही पत्रावर संपादकांपैकी कुणीही आपले सोपस्कार केलेले नसून जशी लिहिली गेली तशीच छापली गेली आहेत.....लेखकाची खाजगी पत्रे अशी जाहीररित्या प्रसिद्ध करण्याच्या सक्त विरोधात खुद्द जी.ए. होते.... मला आलेल्या कित्येक पत्रात शेवटी एक ओळ असायची "यातील मजकूर खास तुमच्यासाठी आहे हे ध्यानात घ्यावे..." हाच संदेश सार्‍यानाच गेला असणार.

आता राहिली गोष्ट....तुमच्या भाग्याची....तुम्ही असे म्हणता म्हणजे ते माझेच भाग्य मोठे आहे म्हणून. मी तर बैठा माणूस...तुमच्यासारख्या फिल्ड वर्कर नव्हे....तुम्ही ज्या विभागात काम करीत आहात, संशोधन चालू आहे ते पाहाता मी तुमच्या आसपास राहू शकतो याचेच मला अप्रुप वाटते.

@ अन्जू.....धन्यवाद...तुला टचिंग वाटले याचा मला आनंद झाला. तू वर लिहिले "प्रिय जी.ए." आत्ता वाचेन. मी तुला सल्ला देईन की प्रथम जी.ए. यांचे आठही कथासंग्रह वाच....मगच तू त्या पत्रव्यवहाराकडे जा...कथा वाचनानंतर लेखक वाचणे योग्य होईल.

अतुल, तुमच्याशी अगदी सहमत.

अशोकसर, तुमची आठवणींची झलकसुद्धा हेवा वाटण्यासारखी आहे. कौतुक मला याचंही वाटतं की माझ्यासारख्या सामान्य ते जी. एं. सारख्या असामान्य - कोणत्याही पातळीवरच्या माणसाशी तुम्ही सहजपणे सारखाच संवाद साधू शकता. किती अवघड गोष्ट आहे ही!
असं वाटून गेलं की यापैकी एखादं तरी पत्र बघायला मिळालं असतं तर.. पण तो तुमचाही व्यक्तिगत पत्रव्यवहार आहे तेव्हा तशी अपेक्षा करणं योग्य नाही.

सई....तू येणार आहेसच ना घरी माझ्या घरी....तेव्हा अनेक विषयावर मंथन करीत असताना जी.ए. हा विषय निघेलच... त्यावेळी पत्रेही पाहा.

आणखीन् एक....जी.ए. स्वतःला कधीच असामान्य समजत नसत....नोकरी करीत नेमाने इंग्रजीच्या प्राध्यापकाची... त्या योगे करावी लागणारी कार्यालयीन कामेही ते करत असत...तिथे मी मराठी भाषेतील कुणीतरी अतिशय प्रसिद्ध असा लेखक आहे ही भावना त्यांच्याकडे कधीच नव्हती. ही आठवण त्यांच्यानंतर त्या पदावर... हेड ऑफ द डीपार्टमेन्ट झालेल्या डॉ. मालती पट्टणशेट्टी यानीच सांगितली आहे. ज्या दिवशी ते निवृत्त झाले कॉलेजमधून त्याच्या दुसर्‍या महिन्यात डॉ.मालती यांच्याकडे डीपार्टमेन्टची हेडशिप आली....तो पर्यंत स्टाफरूममधील जी.एं.च्या त्या खुर्चीवर कुणी बसले नव्हते.

हणम काखंडकी नावाचा त्यांचा एक आवडता विद्यार्थी होता [जे नंतर सिंडिकेट बॅन्केत मॅनेजरच्या पदापर्यंत पोहोचले होते]....कन्नड...त्याला जी.ए. हे मराठीतील प्रसिद्ध लेखक आहेत हे माहीत होते, जरी त्याने त्यापैकी काहीच वाचले नसले तरी....पण जी.ए. ना किती मान होता इंग्रजी विद्यार्थ्यांत हे त्याने सांगितले. वर्डस्वर्थ असो वा, कीट्स, बायरन, होमर, डांटे, मिल्टन....सारेच्या सारे जी.ए. यांच्या जिभेवर पुनर्जन्म घेऊन अवतरत....निसर्गसौंदर्य असो, निराशा व्यक्त करणारी कथा असो वा दु:खाचे प्रसंग असोत...जी.एं.ची स्वत:ची अशी शैली खासच....बट ही वॉज शाय अ‍ॅन्ड विथड्रॉविंग. तीस वर्षे एकाच कॉलेजमध्ये त्यानी नोकरी केली..... जे.एस.एस. कॉलेज धारवाड....पण इतक्या वर्षात कॉलेजमधील असे केवळ चार मित्र...पैकी एकही महाराष्ट्रीयन नाही.....जे अगदी निकटचे म्हणावेत ते होते फक्त धारवाड क्लबमधील....रमी गटातीलच.

असो...खूप आठवणी आहेत.

बाकी सगळ्याही आधी तुमच्या स्मॄतीला हॅट्स ऑफ!! Happy
इतकी बारीकसारीक नावं आणि तपशील इतका काळ लक्षात कसे रहातात तुमच्या? अजब आहे!

जी. ए. स्वतःला असामान्य समजत नसतील, हा त्यांचा मोठेपणा. पण ते असामान्य होते हे तर खरंच ना!
मला आवडेल ती पत्रे बघायला नक्कीच. अतुलनाही कोल्हापूरचे आमंत्रण देऊ या त्यानिमित्ताने.
तुमच्याकडे काहीतरी जादूची दुनिया किंवा खजिना आहे असं वाटायला लागलंय आता...

सई...

"काखंडकी" हे आडनावच असे आहे की ते माझ्या लक्षात ठळकपणे राहिले. त्यांचीही ओळख तेथील पब्लिक लायब्ररीमध्ये झालेली.....माझ्या मावसबहिणीमुळे,...ती जे.एस.एस. ची सायन्स विंगची विद्यार्थिनी. त्यांचा एक ग्रुप होता सोशल अ‍ॅक्टिव्हिटीज संदर्भातील. माझे जी.ए. प्रेम ह्या बहिणीला माहीत होतेच. तिने अशाच एका कौटुंबिक कार्यक्रम प्रसंगी ओळख करून दिली पाचसहा मुलामुलींची...पैकी एक हणमशेट....छान बोलायचे मराठी, पूर्णपणे कन्नड शेट्टी असूनही. जी.एं.चे तर ते आवडते विद्यार्थीच होते....तेवढी एकच ओळख मला त्यांच्याजवळ नेण्यास पुरेशी होती....भेटी काही फारशा झाल्या नाहीत. पण कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये जी.ए.सर किती लोकप्रिय होते हे त्यांच्याकडून कळत...विशेषतः "डॅफोडिल्स" शिकवित असत त्यावेळी अन्य वर्गातील मुलेमुलीही त्या वर्गाच्या बाहेर उभे असत.

डॅफॉडिल्स! Happy ग्रेट..
आम्हाला धोपेश्वरकरसरांनी शिकवली तेव्हाचा अनुभव खुप सुंदर होता.. मग जी. ए. किंवा तत्सम लोकं शिकवत असतील तेव्हा आनंद असणारच..

काही गोष्टी जगजाहीर न होणे लेखकाच्या दृष्टीने फार आवश्यक असते. पण त्याच्या मृत्यूनंतर त्यांच्या परिवारातील काहीना वा प्रकाशकांना प्रसिद्धीची भूल पडल्यामुळे लेखकाचा तो दृष्टीकोण बाजूला ठेवावासा वाटतो...

>>>>

जीएंच्या निधनानंतर त्यांच्या प्रसिद्ध झालेल्या कथासंग्रहाबद्दल हेच म्हणता येईल (सोनपावले का तो?). बहुतेक परचुरे प्रकाशनाचा आहे. जीएंना ज्या कथा प्रसिद्ध करावयाच्या नव्हत्या त्या कथा त्यात आहेत हे जाणवते. 'माणसे अरभाट आणि चिल्लार' मात्र त्यांच्या मृत्युंनंतर प्रसिद्ध झाले असले तरी अपूर्ण वाटत नाही. बहुतेक जीएंनी त्यावर एकदोन हात फिरवून घेतले असावे असे मला वाटते.

शंतनू....(काय योगायोग पहा....जे तुमचे नाव तेच जी.ए. यांच्या लाडक्या पुतण्याचे....)

~ प्रकाशन नामक संस्था वा त्या संस्थेचे मालक-पदाधिकारी याना एखाद्या मयत झालेल्या लेखकाबद्दल जितकी आत्मियता त्यापेक्षाही ते नाव किती 'खपाऊ' आहे याकडे धंदेवाईकपणे पाहाण्याची सवय असते. जी.ए. यांच्या आधी वा नंतर किती लेखक स्वर्गवासी झाले असतील याचा विदा गोळा करण्याची काही आवश्यकता नाही, पण अशा किती लेखकांची त्यांच्या मृत्यूपश्चात पुस्तके वा आवृत्त्या बाजारात आल्या ? आज पु.ल.देशपांडे, जी.ए.कुलकर्णी, रणजित देसाई अशी काही मोजकीच नावे दिसतील की राज्यात भरल्या जाणार्‍या हरेक पुस्तक प्रदर्शनात यांनी लिहिलेली पुस्तके ठळकपणे मांडली गेलेली दिसतील....जिवंतपणी जी.ए.ना या पुस्तकाबद्दल किती रॉयल्टी मिळाली, किती रक्कम रोखीत मिळाली याची आकडेवारी असलीच कुठे तर ती फक्त त्यांच्या नंदा पैठणकर या भगिनीकडेच असू शकेल....पण हे नक्की की ते आकडे आपले डोळे कधीच आश्चर्याने मोठे व्हावे असे असणार नाहीत. हयात असताना जी.ए. यानी आपल्या कोणत्याच कथासंग्रहाची दुसरी आवृत्ती काढली नव्हती....आज तो हक्क प्रकाशकांकडे गेला असल्याने तिथून आवृत्या पाठोपाठ आवृत्ती निघत आहे....यामुळे जर मराठी भाषेची मोठी वाटचाल होणार असेल तर त्या कृतीचे स्वागत व्हावे असे म्हटले पाहिजे...पण आहे नाव खपणार्‍या लेखकाच्या यादीत तर काढू या काजळमायाची नवी आवृत्ती ही धारणा असेल तर मग प्रश्नच खुंटला.

अशोक, माझा आक्षेप कथासंग्रहांच्या नवीन आवृत्त्या काढण्यास वा पुनर्मुद्रणास नाहिये. जर तसे केले नाही तर पुढील पिढीस ही पुस्तके कशी वाचायला मिळतील? उदाहरणच द्यायचे तर 'रात्र वैर्‍याची आहे' (का 'वैर्‍याची एक रात्र'?) हे जीएंनी भाषांतर केलेले I survived Hitler's oven ह्या पुस्तकाचे. हे पुस्तक अनेक वर्षे औट ऑफ प्रिन्ट होते. मी माझ्या वडिलांकडून अनेकदा ह्याचा उल्लेख ऐकला होता पण ते कुठेच ग्रंथालयात मिळत नव्हते. ते पुन्हा प्रिन्टमध्ये आल्यानंतर मात्र कित्येकांना ते वाचायला मिळाले.

माझा आक्षेप आहे तो लेखकाने त्याच्या हयातीत ज्या कथा प्रसिद्ध केल्या नाहीत वा पुर्वप्रसिद्ध कथा संग्रहीत करून पुनर्मुद्रीत केल्या नाहीत त्या कथा त्याच्या पश्चात प्रकाशित करण्यास. लेखक अनेक पाने लिहितो पण ती तशीच्या तशी छापत नाही. त्यावर संस्करण होते, कित्येकदा कथा/पानेच्या पाने टाकून दिली जातात. सोनपावलेमधल्या कित्येक कथा मला स्वतःला अश्या वाटल्या. तसेच अजून एका कथासंग्रहाबाबत (नाव आठवत नाहिये).

Pages