आय लव माय ईंडिया ..!

Submitted by अंड्या on 14 March, 2014 - 09:12

आज काहीतरी स्पेशल करायचे हे कालपासूनच ठरवले होते. दरवर्षीपेक्षा काहीतरी हटके, इतरांपेक्षा काहीतरी वेगळे. रात्री बाराच्या ठोक्यालाच कामाला लागलो. जेव्हा कालगणनेनुसार तारीख पलटली.

निव्वळ धमालमस्ती ऐवजी एखाद्या नवीन अंदाजाने आजचा दिवस साजरा करायचा होता. सुरुवात फेसबूक प्रोफाईल वरचा फोटो बदलण्यापासून केली. एक छानसा हवेत फडकणारा, भारतीय सार्वभौमत्वाची आणि प्रत्येक भारतीयाच्या स्वातंत्र्याची साक्ष देणारा तिरंगा प्रोफाईल डिसप्ले पिक्चर म्हणून लावला. ज्या खाली लाल गडद अक्षरात ठळक दिसेल असे कॅप्शन होते - आय लव माय ईंडिया .. लगोलग हाताबरोबर स्टेटस अपडेट केले - भारतमाता की जय .. हेच थोड्याफार फरकाने इतर सोशल साईटसवर आणि व्हॉटसअपवर देखील केले. कुठे ‘सत्यमेव जयते’ तर कुठे ‘वंदे मातरम’ .. तिरंग्याच्या तीन रंगात स्वताला पुरता रंगवूनच मी झोपी गेलो.

सकाळी उठलो तेव्हा उत्सुकतेने एकेका सोशलसाईटवर जाऊन तेथील हालहवाल बघून आलो. ईतर सारे वातावरण तेच तसेच मला अपेक्षित असलेले. माझ्या स्टेटस आणि प्रोफाईल चित्राखाली देखील काही प्रतिक्रिया जमायला सुरुवात झाली होती. पण आता कोणाला प्रत्युत्तर द्यायला वेळ नव्हता. दुकानावर जायची घाई होती. दुपारी मात्र पुन्हा थोडा वेळ मिळाला तसे पुन्हा एकवार नजरेखालून चाळून घेतले. प्रतिसादांचा फुगवटा वाढत होता.

दुकानात मात्र खास काही विशेष घडले नाही. काही ओळखीच्या गिर्हाईकांच्या नजरेत काहीतरी बोलायचे आहे असे वाटले खरे, पण मीच त्या नजरांना टाळून कामात व्यस्त राहिलो.

संध्याकाळी दुकान बंद करायला नेहमीपेक्षा जरा उशीरच झाला. घरी आलो तसे हातपाय धुतले अन कॉम्प्युटर चालू करायचा मोह आवरून थेट कट्ट्याच्या दिशेने निघालो. आपली मित्रमंडळी आधीपासूनच तिथे जमली होती. मला पाहाताच त्यांचे बोलणे थांबून कुजबूज सुरू झाली आणि अचानक हास्याचा फवारा उडाला.

गण्या पुढे येऊन मला टपली मारल्यागत म्हणाला, "काय बे अंड्या, घरात कॅलेंडर नाही का टांगून राहत तुमच्या? काय आज सगळीकडे लाऊन राहिलेलास? आज काय सव्वीस जानेवारी वाटला की पंधरा ऑगस्ट ??"
पाठोपाठ पुन्हा सारे दात काढत सुटले तर काही गोंधळूनच राहिले..

"गण्या लेका तूच तारीख आठव की.. आणि आज काय असते ते पण आठव.." मी उत्तरलो.

गण्या काहीसे आठवत विचारात पडला तर खरे.. मी मात्र एप्रिल फूल .. एप्रिल फूल .. म्हणत बराच वेळ त्या कट्ट्यावर एकटाच हसत होतो.

.o0Oअण्ड्या

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users