शोषित योद्ध्या - भाग २

Submitted by बेफ़िकीर on 12 March, 2014 - 08:54

http://www.maayboli.com/node/48052 - भाग पहिला

रीनाचे आई वडील लहानपणीच गेल्यामुळे तिचा सांभाळ तिच्या आजीने केला. सांभाळ म्हणजे किती? तर रीना सोळा वर्षाची होईपर्यंत! मग घोडेगावहून अचानक बीडला आलेले एक कुटुंब रीनाला मागणी घालू लागले. काळी सावळी, टपोर्‍या आणि बोलक्या डोळ्यांची लाजरीबुजरी रीना मान खाली घालून बसली होती. तिचे बोलणे, संस्कार, सवयी, घरकामाचा अनुभव असे प्रश्न विचारून समाधान झाल्यावर तिथल्यातिथेच सुपारी फोडण्यात आली आणि पंधरा दिवसांनी काही किरकोळ दागिने, मानपान, साड्या यासह रीनाची पाठवणी पुण्यात तिच्या सासरी केली गेली.

नवेच शहर, नवेच घर, नवीन माणसे, असहाय्यता, एकटेपणा, भय, दबाव, तिच्या मनाचा कल काय असेल ह्याच्याशी कोणालाही सोयरसुतक नसणे अश्या वातावरणात रीनाला समजून चुकले की येथे प्रत्येक क्षणाला सिद्ध होत राहावे लागणार आहे. कामासाठी एका पायावर तयार राहावे लागणार आहे. दिवसा सासूच्या शिव्यांच्या वर्षावाखाली राब राब राबणे आणि रात्री नवर्‍याकडून ओरबाडले जाणे ह्यापलीकडे रीनाचे वैवाहिक जीवन जाऊ शकत नव्हते.

ह्या परिस्थितीतही कसेबसे जुळवून घेऊन ती स्थिर होऊ लागली तर मोलमजुरीचे कंत्राटच कंत्राटदाराकडून गेले. कुटुंब कामाच्या शोधार्थ फिरू लागले. येथपर्यंत रीनाची कहाणी लक्षावधी गरीब विवाहित मुलींसारखीच गणावी लागेल. पण ह्यानंतर मात्र ह्या फिरलेल्या दिवसांचे खापर तिच्या अवलक्षणी असण्यावर फोडणे सुरू झाले. उठता लाथ बसता बुक्की असा प्रकार सुरू झाला. नवरा आणि सासू येताजाता मारू लागले. मार खायचा तरी किती हेही रीनाला समजेनासे झाले. असल्या विचित्र वातावरणात तीन वर्षांत तिने दोन मुलांना जन्म दिला. ही मुले आणखीन खायला तोंडे घेऊन आल्याने तो रागही रीनावर निघू लागला.

रीनाने प्रथमच आजूबाजूला जरा चौकशी केली. आजवर कोणाही परक्याशी सलग चार वाक्ये न बोललेली रीना आता बीड कुठे आहे, कसे जायचे ह्याची माहिती मिळवू लागली. जेव्हा पुरेशी माहिती मिळाली तेव्हा घरातलेच काही पैसे उचलून आणि मुलाबाळांची जबाबदारी पळून जाताना घेता येणार नाही हे माहीत असल्याने मुलांना कसेबसे तेथेच सोडून ती रातोरात बीडला पळाली. बीडला उतरली तेव्हा मात्र सगळेच आठवू लागले. आपण कुठे राहतो, आत्ता कुठे आहोत, सगळेच! पहाटेच्या अंधारात रीना बरोब्बर आपल्या आजीच्या घरी पोचली आणि तिचा आजवरचा सर्वात मोठा अपेक्षाभंग झाला. तिला दारातून आतही येऊ न देता आजीने 'तुझे आणि माझे संबंध आता संपले, आता सासरीच राहायचे' असे म्हणून तिला हाकलून दिले.

आभाळ कोसळलेली रीना त्या अचानक परक्या वाटू लागलेल्या शहरात बोचणार्‍या नजरांपासून बचाव करत पुन्हा पुण्याच्या बसमध्ये बसली. कशीबशी ती पुन्हा सासरी पोचली ते एका वेगळ्याच रोषास पात्र होण्यास! तिचा कोणी यार असावा आणि त्याच्याचबरोबर पळण्याचा तिने असफल प्रयत्न केलेला असावा असे समजून तिला आधी गुरासारखे मारण्यात आले. ह्यावेळी मार खाणे खरंच असह्य होत असल्याने प्रथमच रीनाने प्रतिकार केला व तिनेही एक दोन वस्तू फेकून मारल्या. त्याचा अधिकच भीषण परिणाम सहन करावा लागला व शेवटी आजूबाजूचे मधे पडले. मात्र रीनाला तिच्या नवर्‍याने व सासूने मुलांसकट कायमचे हाकलून दिले आणि कोण्या जबाबदार नागरिकाने तिला स्नेहालयात आणले. स्नेहालयात रोज जेथे हजारो जण जेवतात तेथे या तिघांमुळे फरक तर काहीच पडणार नव्हता, पण रीनाला एक मोठा आधार मात्र मिळणार होता.

रीना आता स्नेहालयात राहते. मला म्हणाली, घरी परत जावेसे वाटते का हा विषयही काढू नका! डोमेस्टिक व्हायोलेन्सचे परिणाम तिच्या शरीरावर व मनावर झालेले आहेत. मुले गोंधळल्यासारखी राहात आहेत. पण हळूहळू रमतही आहेत.

रीनाची चूक काय होती?

================

नंदा सावंत! तूर्त वय ४५ वर्षे! दोन डोळ्यात शंभर वर्षांचा अनुभव साठलेला! आपण वेश्याव्यवसायात ढकललो गेलो आहोत हेच वयाच्या पंधराव्या वर्षी समजलेले नव्हते. कित्येक वर्षे शरीरविक्रय हे एकच काम केलेले असल्याने हातांना सवयच तशी लागलेली आहे. दहा वेळा पदर पाडल्यासारखे करून सावरणे, ब्लाऊज खांद्यावरून थोडा खाली घेऊन पुन्हा व्यवस्थित ओढून घेणे! तेथे बसून ह्या हालचाली न्याहाळताना आपल्याला कसेसे होईल! पण नंदा सावंत ह्या महिलेला आपण काही विशेष करत आहोत ह्याची जाणीवही नाही.

पूर्णवेळ स्नेहालयाच्या कामात झोकून देण्याआधी फक्त सहा वर्षे स्वतःच्या घरात काढली. स्वतःचे घर म्हणजे? स्वतःचे घर म्हणजे तिचा त्या घरावर हक्क काहीच नाही. फक्त तिच्यापोटी जन्माला आलेली तीन मुले जेथे राहतात ते घर! ज्याच्यापासून ती मुले जन्माला आली तो तिचा कोण? वाचा तिची कहाणी:

वय पंधरा! जात मराठा! हलाखीची परिस्थिती! शिक्षनाचा गंधच नसलेले कुटुंब! कोणत्यातरी आडगावात राहून स्वतःची प्रजा वाढवत बसणे आणि जमतील तसे कष्ट करून पोट भरणे ह्यापलीकडे आयुष्य नाही. नंदाचा जन्म झाल्यापासून तिला उजवण्याची ही घाई! तेराव्या वर्षी नंदाला एका घरी 'देऊन टाकली'. तो विवाह वाटावा इतपत काय साजरे करायचे असेल ते केले असावे.

लहानशी नंदा सासरी आली आणि सासूने सांगितलेले एकही घरकाम तिला जमेना! तेरा वर्षाच्या मुलीला काय जमणार? रडत रडत ती जसे कसे जमेल तसे काम करू लागली. वजन उचलता आले नाही की मारहाण आणि शिव्या! क्षुल्लक चूक झाली की शिव्यांचा भडिमार! बरं मारणारे कोणी एकच नाही तर ज्याला वाटेल तो येऊन मारणार! त्या वयातही नंदाने निर्णय घेतला. आपण पळूनच जायला पाहिजे. तरातरा घराबाहेर पडली तसे कोणीतरी आणले आणि घरात डांबून ठेवले. मग नवरा आला. सगळ्यांचे मिळून ठरले. ही मुलगी आपल्याकडे फुकटच खपवण्यात आली आहे. हिचा कशासाठीच काहीही उपयोग नाही. हिला खलास करायला हवी. नवरा आणि दोन दिरांनी मुटकुळे उचलले आणि रात्रीच्या अंधारात गावाबाहेरच्या कालव्यात दिले टाकून!

त्या अंधारात आपल्याबरोबर काय केले जात आहे ह्याची काहीही कल्पना नसलेली नंदा अंधारातच हवेत भिरकावली गेली आणि कशालातरी तिची साडी अडकली. ज्या झाडाच्या फांदीला साडी अडकली होती तीच फांदी तिने रात्रभर गच्च धरून ठेवली. खालून पाण्याच्या वाहण्याचा खळखळाट मनाला भिववत होता. कशी काय राहिली असेल तिचे तिलाच ठाऊक रात्रभर! उजाडले तेव्हा पाहते तर खाली हा एवढा ओढा आणि वरून काहीजण ये जा करत आहेत. मग बोंब ठोकली तसे दोघातिघांनी वर घेतले. चौकशी केल्यावर समजले की हिला सासरच्यांनी भिरकावले होते. त्यांनी तिला सासरी न पाठवता स्वतःजवळ ठेवले व खूप दूर असलेल्या एका वस्तीत ते तिला घेऊन गेले. ती त्याच लोकांची वस्ती होती. त्या लोकांना समाज 'भिल्ल' म्हणतो. एक घातक व पराक्रमी मानली गेलेली जमात! एका झोपडीत एक म्हातारी तिच्या नातीसह राहात असे तिच्याच झोपडीत हिला ठेवले गेले. त्या मुलीकडे रात्री गिर्‍हाईके येत असत. चार दिवस त्या मुलीकडे विविध लोक येत राहिले पाचव्या दिवशी एका माणसाने मागणी केली, मला तू नको आहेस, ती नवी मुलगी हवी आहे.

असमंजस नंदा त्या माणसाच्या अत्याचारांना बळी पडली. नंतर कधीतरी ती मोठी झाली तेव्हा त्या आजीने तिला मंथली सायकल्सबाबतचे शिक्षण दिले. नंदाला आता काहीच वाटेनासे झाले होते. कोणातरी भिल्लाबरोबर पुढे कधीतरी अहमदनगरच्या वेश्यावस्तीत पोचली. तेथे एका भलत्याच माणसाला ती आवडली म्हणून त्याच्यासोबत राहू लागली. त्याच्यापासून तिला तीन मुले झाल्यानंतर त्या माणसाचे तिच्यावरील मन उडाले. तिने तीन मुलांना मोठे केले आणि त्यांना त्यांची आई घरात नकोशी झाली. तो माणूस तर केव्हाच घर सोडून गेला होता. नंदाने वेश्याव्यवसाय करूनच मुलांना मोठे केले आणि व्यवसाय सोडून सहा वर्षे कमावत्या मुलांबरोबर राहून उर्वरीत आयुष्य सुखात घालवायची स्वप्ने पाहू लागली. पण मुलांनी वाळीत टाकले. शेवटी पुन्हा वेश्यावस्तीत आली, मात्र ह्यावेळी व्यवसाय करण्यासाठी नव्हे, तर स्नेहालयातर्फे इतर वेश्यांचे आयुष्य अधिक सुकर, सुलभ व्हावे म्हणून! स्नेहालयाच्या 'मुक्ता' ह्या केंद्राचे लोकेशनच अश्या ठिकाणी आहे जेथे अहमदनगरमधील दोन वेश्यावस्ती आहेत. मुक्ताचे कर्मचारी त्या वेश्यांना लैंगीक शिक्षण देणे, निरोध पुरवणे, कित्येक प्रकारचे उपक्रम आयोजीत करणे हे सर्व काही नित्यनेमाने व भक्तीभावाने करत असतात. 'तुम बेसहारा हो तो , किसीका सहारा बनो' ह्या गीताला अनुसरूनच नंदाताईंसारख्या अनेक पूर्वाश्रमीच्या वेश्या तेथे समाजसुधारणेचे काम करत आहेत.

ह्या धाग्यात असलेल्या काही छायाचित्रांपैकी एक छायाचित्र आहे एका वेश्यावस्तीचे! तेथील अवस्था पाहून वाचकांना जाणीव होऊ शकेल की कोणत्या परिस्थितीत माणसाला जगावे लागते. ही छायाचित्रे मी स्नेहालयाच्या परवानगीने घेतलेली असून त्यांना पूर्ण कल्पना आहे की मी संस्थेच्या कार्याबाबत छायाचित्रांसकट लेख लिहिणार आहे.

कमी अधिक फरकाने बहुतांशी शरीरविक्रय करणार्‍या महिलांच्या कथा अश्याच आहेत. डोळ्यांमधील पाणी आता आटलेले आहे. चेहर्‍यावर एक विजयी हास्य आहे ते आयुष्याने निदान आता तरी माणूसकीयुक्त आणि सन्मानाने जगण्याची संधी दिली ह्यातून आलेले!

स्नेहालयाचे सर्वेसर्वा श्री गिरीश कुलकर्णी ह्यांनी त्यांचे एक सहकारी श्री मिलिंद चावरे ह्यांना माझ्यासोबत राहण्यास सांगितले होते. ह्या मिलिंद चावरेंच्या सहकार्याशिवाय माझी कोणतीही भेट सफल ठरली नसती. दोघांचेही आभार मानावेत तितके कमीच! पण महत्वाची बाब अशी, की ह्या मिलिंद चावरेंचा तेथील प्रत्येक आणि प्रत्येक घटकाशी असलेला संपर्क इतका नैसर्गीक, स्नेहयुक्त आहे की स्तिमित व्हायला होते. तसेच एक आहेत मीनाताई! ह्या मीनाताई स्नेहालयात असलेल्या यच्चयावत लहान व तरुण मुलामुलींची आई आहेत. श्री चावरे व मीनाताई ह्या दोघांचेही छायाचित्रही खाली दिलेले आहे. मिलिंद चावरे एखाद्या धनिक मित्राला म्हणतात. 'अरे माझ्या मुलींची लग्नं करायची आहेत, जरा एक पाच हजार देणगी दे की?' मित्र विचारतो, 'पाच हजार? किती मुली आहेत तुला?'. त्यावर चावरे म्हणतात दिडशे मुली!

ह्याच जगात दोन दुनिया वसतात. एक भाग्यवंतांची आणि एक अभाग्यांची! तिकडच्यांना इकडे येताच येत नाही. इकडचे तिकडे जातात ते कॅमेरा घेऊन आणि समाजकार्याचा आव आणून! स्नेहालय मात्र मनापासून दरी मिटवते.

डोमेटिक व्हायोलन्स, जबरदस्तीने देहविक्रयास भाग पाडणे, बलात्कार, कुमारी माता आणि एच आय व्ही पॉझिटिव्ह ह्या सर्वांनी भरलेल्या या जगात खूप लहान लहान मुले आहेत. ती संध्याकाळी खेळतात, प्रार्थना करतात, दिवसा तेथल्याच शाळेत जातात. प्रत्येकाच्या तिथे असण्याचे कारण आपले डोळे पाणावणारे आहे. पण त्यांचे डोळे?

त्यांचे डोळे वाट पाहात असतात ह्या जगातल्यांची! कोणी नुसते भेटायला आले तरी आपल्याभोवती हे एवढे मोठ्ठे बाल्य गर्दी करते आणि चिवचिवाट करते. त्यांची अपेक्षा असते की आपण गोष्ट सांगावी, कविता कशी करायची ते शिकवावे, हस्तांदोलन करावे, त्यांच्यातच बसून मॅगी खावे. पण तेवढा वेळ पाहिजे ना? आपण किती बिझि असतो हे त्यांना कुठे माहीत असते! Happy

===========================

-'बेफिकीर'!

===========================

IMG_0374.JPGIMG_0375.JPGIMG_0379.JPGIMG_0395.JPGIMG_0418.JPGIMG_0382.JPGIMG_0383.JPGIMG_0388.JPGIMG_0380.JPGIMG_0381.JPGIMG_0384.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रीना.... विदारक सत्य ! अजुनही स्त्रिवर हे मारहाणीचे होणारे अन्याय घरोघरी चालूच आहेत याचे योग्य उदाहरण ! सासरच्यांकडून स्त्रिवर होणा-या अन्यायाच एकमेव कारण म्हणजे माहेरच्यांच नसलेल पाठबळ !

आई-वडील नसलेल्या कुटुंबातल्याच मुला-मुलींना या डोमेस्टीक व्हायोलन्सचे बळी पडावे लागते असे नसुन सुशिक्षित म्हणवणा-यांच्या घरातही एखाद्या अतिशय विक्षिप्त व्यक्तिच्या अतिताई स्वभावामुळे मारहाणीचे प्रकार सर्रास पहायला मिळतात बरेच ठिकाणी.

माझ्या अगदी जवळून पहाण्यातल एक सुशिक्षित कुटूंब, वडील तर्कटी, आईला व्हॉईसच नाही, ४ मुले, अतिशिस्तिच्या बडग्याखाली घरातिल मोठ्या मुलाला क्षुल्लक चुकांसाठी पोत्यात डांबून, बेल्टने मारले जाई, कारण काय तर उरलेल्या तिघांना वचक बसावा ! त्या मुलाची मानसिकाता काय घडत जाईल ? तो मोठा झाल्यावर त्याने त्याच्या बायको-मुलांना हीच मारझोड अगदी निर्विकारपणे केली तर त्याची जबाबदारी कुणावर ?

ही एक साखळी असावी न संपणारी... Sad

लैंगिक शोषणाबद्दल तर विचारही करवत नाही !!

<<<त्यांचे डोळे वाट पाहात असतात ह्या जगातल्यांची! कोणी नुसते भेटायला आले तरी आपल्याभोवती हे एवढे मोठ्ठे बाल्य गर्दी करते आणि चिवचिवाट करते. त्यांची अपेक्षा असते की आपण गोष्ट सांगावी, कविता कशी करायची ते शिकवावे, हस्तांदोलन करावे, त्यांच्यातच बसून मॅगी खावे. पण तेवढा वेळ पाहिजे ना? आपण किती बिझि असतो हे त्यांना कुठे माहीत असते! >>>

ह्म्न !!

लिहिते रहा बेफिजी, निदान निर्ढावलेल्या आमच्यासारख्यांच्या मनाला परिस्थितीची कल्पना तरी येत राहिल.

-सुप्रिया.

सुप्रिया - तुम्ही किंवा मायबोलीवरील कोणीच काय, एरवीही जगात कोणी निर्ढावलेले वगैरे नसते. फक्त माणसे खरंच बिझी असतात. प्रत्येकामध्ये एक माणूसकीची भावना असतेच. तेव्हा स्वतःला तसे काही म्हणू नका.

देवकी - सुन्न होण्यासारखेच वास्तव आहे तेथे.

बोबडे बोल व स्वप्निल - आपणा दोघांचेही आभार! मात्र माझा उपक्रम फक्त इतकाच की अश्या घटकांच्या प्रामाणिक मुलाखती असलेले पुस्तक निर्माण करणे, त्यांची आयडेंटिटी न देऊन! खरा उपक्रम स्नेहालयसारख्या संस्थांचा असतो. ह्या संस्थेच्या कार्याला मिळायला पाहिजे ती दाद कृपया व्यक्तिशः मला देऊन मला लाजवू नयेत अशी विनंती!

सर्वांचा आभारी आहे.

-'बेफिकीर'!

स्नेहालया बद्दल वाचले अशा व्यक्ती सामाजिक बांधीलकी कशा कशाचा त्रास सहन करुन जपतात याचे मला नेहमी कौतुक वाटते. आपणही काही करु शकतो असे बर्याचदा वाटते पण पुढे विशेष जात नाही. तरीही अकोल्यात लहान मुलांना टाकुन दिलेल्या अनाथालयाला मधुन मधुन देणगी देतो.

बेफिकीर,

>> एरवीही जगात कोणी निर्ढावलेले वगैरे नसते.

सहमत. साधारणत: आपल्यासारखी सर्वसामान्य माणसे निर्ढावलेली नसतात. आपल्यांत मुळावर घाव घालायची शक्ती नसते. यांस निर्ढावलेपण म्हणत नाहीत. म्हणूनच आपण पालवी खुडून यथाशक्ती मदत करावी. Happy

अर्थात निर्ढावलेले लोक आहेतच. कोण आहेत ते सगळ्यांना माहितीये.

आ.न.,
-गा.पै.

Domestic Violence ची व्याप्ती अक्राळविक्राळ आहे. स्नेहालयसारखी बेटं आपल्यापरीने काम करत असतात.त्यांची हिंमत ग्रेटच.
अलीकडचाच एक अनुभव शेअर करावासा वाटतोय ..माझी कामवाली, २४ वर्षे वय , तीन मुलांची आई , चौथे मूल वारले.अनाथ म्हणून मुसलमान माणसाबरोबर पळून जाऊन लग्न केले. तो मारतो, छळतो,जगू देत नाही म्हणून मला कुठेही माझ्या मुलांसकट नेऊन सोड म्हणून मागे लागली होती.
मी तिच्यासमोरच याविषयी माहिती मिळवून त्यातल्या दोन संस्थांशी संपर्क केले, आश्वासन मिळवले ,appointment ही घेतली . पण तरीही तिला सांगितले की या निष्ठूर जगात ती असुरक्षित आहे अगदी तिच्या मुलांकडूनही, ज्यांच्यासाठी ती पळून जाऊ इच्छिते, तीच उद्या मोठी झाल्यावर तिचा हा निर्णय स्वत:च्या सुखासाठी होता असं म्हणायला कमी करणार नाहीत.
योगायोग असा की तिला तिच्या झोपडपट्टीत हाच सीन शेजारी बघायला मिळाला काही दिवसातच , तिच्या शेजारच्या म्हाताऱ्या आईला मुलांनी अर्ध्या रात्री हाकलून दिले- नवऱ्याला सोडून ती बाई अनेक वर्षांपूर्वी मुलांना घेऊन बाहेर पडली होती ..
या मुलीने पळून जाण्याबद्दल फेरविचार केला.तिचा नवराही सुदैवाने थोडा शांत झाला असावा.तिला ती जिथे कामं करते त्या तीनही घरातून आधार आहे ..

खरच, बेफिजी जी या स्नेहालयसारख्या संस्थांच कौतुक कराव तितकच कमी आहे, पण तुम्हि ज्या प्रकारे ते लीहिलत ना ते अगदी काळजाला भीड्ल.सुन्न झाले वाचुन.
तुमच्या या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा >>>>>१.

बेफ़िकिर जी, तूमच्या लेखाविषयी मनात एक आदराची आनी उत्सुक्तेची भावना नेहमीच व्यापून आहे, पन फक्त आभार अस म्हनून सोडून द्यावा असा तो आदर नक्कीच नाहीये म्हनून ह्या काही ओली तूमच्यासाठी.......... '' आभाराचा भार कशाला ,फुलमालान्चा हार कशाला, उघडी करा मनाची कवाडे, अशा घराला दार कशाला''...............

बेफिकीरजी,

आपले आणि आपल्या लिखाणाचे कौतुक वाटते. मानवी मनाचे अनेक कंगोरे आपल्या लिखाणातून दिसतात. स्नेहालयाच्या फोटो मध्ये दिसणारी स्वच्छता , विशेषतः जेवणाविषयी पाहून फारच चकित झालो. अल्मोस्ट ५ स्टार किचन दिसतेय ! आपल्या विधायक कार्याला शुभेच्छा !

ता. क. आपली '४०२ बुधवार' वाचली, छान लिहिले आहे. बाय-द-वे, ताराबाई हवेरीकर माझ्या पेशंट होत्या.

बेफि, दोन्ही भाग वाचून फार तड्फड झाली मनाची. स्नेहालय पुनर्वसनाचे काम करत आहे ते फार कौतुकास्पद आहे. तुम्ही दिलेले डायनिंग हॉलचे फोटो बघून त्यांच्या कार्याबद्दलचा आदर दुणावला आणि संस्थेचे काम शिस्तबद्ध पद्धतीने चालते याबद्दल खात्रीही पटली.
पुनर्वसनाचे काम खूप महत्वाचे आहे पण कौटुंबिक हिंसा ते वेश्यावस्ती हा प्रवास होऊ नये म्हणून काय करता येइल हा प्रश्न राहून राहून छळत आहे. कागदोपत्री कायदे असले तरी मुळात हिंसेची साखळी तुटायला हवी. पण जेव्हा सासूरवास हा गृहितच धरलेला असतो - as if it's way of life- त्यात पिडीत व्यक्तीच्या भोवतालचा समाजही मदत करायचे नाकारुन पाठिंबा देत असतो तेव्हा हे कसे थांबवायचे तेच कळत नाही. Catch them young उपयोगी पडेल का? अगदी १०-११ वर्षाच्या मुलामुलींशी बोलायला सुरुवात करुन हे थांबवता येइल का?

बेफि, धन्यवाद्...तुमचा उपक्रम आणि लिखाण म्हणजे या संस्थेला आणि आम्हाला जोडणारा दुआ आहे....यामुळे निदान आपण काहीतरी करावे अशा लोकांसाठी / संस्थांसाठी अशी भावना तरी झाली...
खुप विदारक चित्र आहे आजुबाजुला ...डोक सुन्न होत आणि मग स्वताचे प्रश्न फालतु वाटतात ,की अरे मी कशासाठी इतकी चिंता करतेय्...आयुष्य खुप अवघड आहे काही लोकांसाठी ...मी नक्की मदत करणार आहे स्नेहालयाला ..