सावलीचा राहिलो नाही (मतला - भूतकाळाच्या गुढीचा.. - वगळून)

Submitted by रसप on 3 March, 2014 - 01:48

रात्र झाली, सावलीचा राहिलो नाही
आपल्याही मालकीचा राहिलो नाही

कृष्ण झालो देवकीचा राहिलो नाही
राम झालो जानकीचा राहिलो नाही

एकटेपण वाढले गर्दी जशी वाढे
मीच माझ्या ओळखीचा राहिलो नाही

एव्हढी तर पातळी मी गाठली आहे
की जगाच्या पातळीचा राहिलो नाही

चार भिंतीआत माझी धावपळ चाले
पहुडलेल्या ओसरीचा राहिलो नाही

जाहला आहेस तू बंदिस्त गाभारी
मी म्हणूनच पायरीचा राहिलो नाही

तूच घे माझ्या प्रियेची काळजी आता
सागरा, मी मुंबईचा राहिलो नाही

चेहरा झाकायचा तर पाउले उघडी
तू दिलेल्या चादरीचा राहिलो नाही

....रसप....
१ मार्च २०१४
http://www.ranjeetparadkar.com/2014/03/blog-post.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

येस्स !! मिळाली !! लक्षात राहणार्‍या शेरांची तुझी गझल मिळाली
कीप इट अप !!

जान्हवीचा & मुंबईचा अधिक आवडले- भिडले .ओळखीचा, पातळीचा, चादरीचा, हे शेरही मला आवडले सहज लक्षात राहतात . का कोण जाणे ओसरी आणि पायरी कमी आवडले
मतल्याचा अर्थ मला लागलाच नाही पण मी प्रयत्न करतोय जमेल तसा तरीपण मला वाचनांती तरी आवडलाय हा शेर छान वाटते वाचून

अजून एक..ऑब्सर्वेशन : इतके छान झाले की तुझे शेर बेफीजींच्या शेरांसारखे वाटत राहतात ...उगाचच ..कारण माहीत नाही ..जस्ट एक फीलींगही असेल माझे
असो
धन्स आणि शुभेच्छा

थँक्स वैभव..!!

मागे एका गझलेवर बेफीजींनी लिहिलं होतं की, ती गझल जर त्यांनी लिहिली असती, तर तशीच लिहिली असती! Happy

चांगलंय ना.... इसी वजह से कुछ अच्छा लिखा जा पाएगा !

अरे नाही !.. छान होता की तो शेर उलट

देवकी म्हणजे जन्मदात्रीचे प्रतीक जान्हवी म्हणजे पत्नीचे प्रतीक ..आईशी कृष्ण होवून वागायला गेलो आणि पत्नीशी राम होवून...मी आईचाही होवू शकलो नाही बायकोचाही नाही असा अर्थ मी काढला ...राम आणि कृष्ण होवून मी अश्या प्रकारे दु:खी ठरलो ..दोघांच्या नशिबात ह्या नात्यांच्या बाबतीत वियोगच आहेत

कृष्ण झालो देवकीचा राहिलो नाही
राम झालो जानकीचा राहिलो नाही

(जान्हवी हा शब्द मला कितीही आवडत असला तरी जानकी हाच निवडला असता मी कारण र्‍हाईम ...आणि एखाद्या गझलेचा एखादा शेर एकाच वेळी त्याही जमीनीची मजा देतो आणि एक नवी जमीनही ठरतो ही मजाही अनुभवता येते आहे कि नै Happy

देवकी म्हणजे जन्मदात्रीचे प्रतीक जान्हवी म्हणजे पत्नीचे प्रतीक ..आईशी कृष्ण होवून वागायला गेलो आणि पत्नीशी राम होवून...मी आईचाही होवू शकलो नाही बायकोचाही नाही असा अर्थ मी काढला ...राम आणि कृष्ण होवून मी अश्या प्रकारे दु:खी ठरलो ..दोघांच्या नशिबात ह्या नात्यांच्या बाबतीत वियोगच आहेत

>>
हेच म्हणायचं होतं !

हेच म्हणायचं होतं !<<< मग मीही तेच तर म्हणतोय की तुला जे म्हणायचय तेच तुझा शेरही म्हणतोय मग शेर चुकला असे का वाटते आहे तुला ?

जाहला आहेस तू बंदिस्त गाभारी
मी म्हणूनच पायरीचा राहिलो नाही

तूच घे माझ्या प्रियेची काळजी आता
सागरा, मी मुंबईचा राहिलो नाही

चेहरा झाकायचा तर पाउले उघडी
तू दिलेल्या चादरीचा राहिलो नाही<<< वा वा

जाहला आहेस तू बंदिस्त गाभारी
मी म्हणूनच पायरीचा राहिलो नाही

व्वा. एकूण गझल आवडली. चादरीचा शेरही विशेष.

रसप , आवड्लीच.मुंबई विशेष आणि तुमची वैवकुची चर्चाही.
मतल्यातली चित्रमय गूढता, आणि ,
>>चार भिंतीआत माझी धावपळ चाले
पहुडलेल्या ओसरीचा राहिलो नाही >>

यातला विरोधाभास क्लासिक.

मीच माझ्या ओळखीचा राहिलो नाही >>> मस्त ओळ

एव्हढी तर पातळी मी गाठली आहे
की जगाच्या पातळीचा राहिलो नाही

चार भिंतीआत माझी धावपळ चाले
पहुडलेल्या ओसरीचा राहिलो नाही

चेहरा झाकायचा तर पाउले उघडी
तू दिलेल्या चादरीचा राहिलो नाही

वा वा आवडलेच !

मतला बदलला आहे आणि एक शेर, जो आधी वगळला होता, तो परत जोडला आहे.

रात्र झाली, सावलीचा राहिलो नाही
आपल्याही मालकीचा राहिलो नाही

कृष्ण झालो देवकीचा राहिलो नाही
राम झालो जानकीचा राहिलो नाही

ए जा बाबा !असं सारखं सारखं बदलायचं नाही बर्का... Sad

असूदे .. तू वगळलेला मतला लोकांच्या संदर्भासाठी मीच इथे देतो...

भूतकाळाच्या गुढीचा राहिलो नाही
पाठमोर्‍या आकृतीचा राहिलो नाही

रात्र झाली, सावलीचा राहिलो नाही
आपल्याही मालकीचा राहिलो नाही
खूप वेवेगळे अर्थ देणारा मतला. वा..!

कृष्ण झालो देवकीचा राहिलो नाही
राम झालो जानकीचा राहिलो नाही
ज्याच्या अंगी मोठेपण, तया यातना कठीण.. हाही आवडला..

एव्हढी तर पातळी मी गाठली आहे
की जगाच्या पातळीचा राहिलो नाही
मस्त..
चेहरा झाकायचा तर पाउले उघडी
तू दिलेल्या चादरीचा राहिलो नाही
वा..!
वेगळी रदिफ आणि शेरांमुळे रसपची गझल म्हणून लक्षात राहिल.. Happy

वैवकुंना अनुमोदन ..या गझलोतले शेर नेहमीच लक्षात राहतील .

कृष्ण झालो देवकीचा राहिलो नाही
राम झालो जानकीचा राहिलो नाही
<<व्वा ! आईपासून वेगळा होऊन 'मी' एका स्वतंत्र व्यक्तिमत्वाचा झालोय, असा अर्थ लागला आणि भावला .

एव्हढी तर पातळी मी गाठली आहे
की जगाच्या पातळीचा राहिलो नाही
<<सर्वात जास्त आवडला हा शेर ..बेफिजींच्या धाटणीचा वाटला .

तूच घे माझ्या प्रियेची काळजी आता
सागरा, मी मुंबईचा राहिलो नाही

चेहरा झाकायचा तर पाउले उघडी
तू दिलेल्या चादरीचा राहिलो नाही
<<< बहोत खूब !

गझल आवडेश . धन्यवाद . Happy