चिदानन्दरुपः शिवोSहं शिवो S हम ।।

Submitted by किंकर on 26 February, 2014 - 19:56

'महाशिवरात्र ' -शिव शक्ती समोर नतमस्तक होण्याचे भाग्य उपलब्ध करून देणारा सोहळा.महाशिवरात्रीच्या निमित्ताने काही लिहावे म्हणून अनेकदा लेखणी सरसावली, पण शब्द आकार घेण्यास तयारच नव्हते.का बरे असे होत असेल? सर्व सगुण साकार असून हि माझे विचार असे सतत निर्गुण निराकार का होत आहेत? मी नतमस्तक आहे का निष्प्रभ आहे? अश्या अनेक प्रश्नांच्या गर्तेत मी सतत हेलकावे खात होतो.
महाशिवरात्रीच्या निमित्ताने व शिवभक्ती साठी केले जाणारे महारुद्र स्मरणात आले .रुद्र म्हणजे काय ? यावर मनात सतत चिंतन सुरु झाले. आणि मन एकदम शालेय जीवनात गेले.
रुद्राची पहिली ओळख तेंव्हा पाठ्यपुस्तकातून झाली होती. अर्थात तेंव्हा जी ओळख वाटली ती हलकीशी झलक होती. निसटता स्पर्श होता. असे आता मागे वळून पाहताना वाटते. त्यावेळी कविवर्य भा. रा. तांबे यांची एक नितांत सुदर कविता 'रुद्रास आवाहन' अभ्यासास होती आणि त्या कवितेचे ध्रुव पद आज पस्तीस वर्षांनतर देखील -
'डुमडुमत डमरू ये ,खणखणत शूल ये, शंख फुंकीत ये येई रुद्रा ..

हे जसेच्या तसे मनात रुंजी घालत आहे.खरेतर या कवितेने खरोखरच प्रार्थना जशी नतमस्तक होवून केली जाते तशीती अत्यंत त्वेषाने देखील करता येते हेच दाखवून दिले होते आणि म्हणूनच ते या प्रार्थनेस आवाहन असे म्हणतात.या जोशपूर्ण आवाहनाचा शेवट करताना तांबे म्हणतात -'जे जयांचे तया वीरभद्रा '!

आज महारुद्राच्या निमित्ताने त्याच ओळी मला पुन्हा एकदा नव्याने उमजल्या. आपल्या संस्कृती प्रमाणे आपण देव देवतांची अनेक रूपे मानतो. प्रत्येक देव देवतेची स्वतंत्र ओळख आणि एक मूर्त आपण प्रथम मनात मग प्रत्यक्षात साकारतो.आपल्या मनातील त्या देवतेस आपण मनपूर्वक सजवतो. ते सजवणे हीच एक प्रार्थना ठरते.वस्त्रालंकार,आभूषणे यातून सजगतेने आपण त्या मूर्तीत चैतन्य उतरवतो.याच बरोबर आपण आपल्या या मूर्तीस विविध आयुधांसह बलशाली बनवतो.

आपण आज ज्या सांभ सदाशिव ' महादेवास ' आशीर्वाद देण्यास विनवीत आहोत तो महादेव अन्य कोणत्याही देवांपेक्षा या सर्वच बाबतीत भिन्न ठरतो. उंची वस्त्रालंकार किंवा विविध आभूषणे यांनी सजण्या ऐवजी 'रुद्राक्षांच्या गळ्यात माळा, आणि लेवुनिया भस्म कपाळा ' असा सजलेला हा देव कोणत्याही शाही आसनाची अपेक्षा न ठेवता व्याघ्र चामरावर विराजतो.

मात्र या 'शिवशक्ती'ची आयुधे मात्र सर्वस्वी वैशिष्टपूर्ण आहेत.डमरू,त्रिशूळ आणि शंख या तिहेरी आयुधांच्या वापरातून हा त्रिनेत्री देव आपले सातत्याने रक्षण करतो असे वाटते.डमरू नादातून तो आपणास जागरूक करतो, त्रिशुळाच्या खणखणाटातून तो आपणास सजग ठेवतो तर शंखध्वनीतूनतो आपणास भानावर आणतो.

म्हणजेच या रुद्रावतारी देवाचा या आयुधांचा प्रथम वापर हा नादब्रम्हातून आहे. गरज आहे आपण आपले कान उघडे ठेवून ते ऐकण्याची.'डमरू' च्या आवाजातून जागरूक हो हे त्याचे सांगणे म्हणजे जगताना बरे वाईट,मोहमयी काय ते समजून घे.

या डमरू च्या आवाजातील संदेश जर आपल्या पर्यंत पोचलाच नाही तर 'त्रिशुळा' चा खणखणाट आपणास बजावतो.अरे तुझे कान उघडे आहेत पण तू नाद ब्रह्मातील आवाज काय ध्वनित करतोय हेच ऐकत नाही आहेस.आवाज कानावरपडला पण तो आत पोचलाच नाही तर त्याचा उपयोग नाही, हे विसरू नकोस.

जर डमरू आणि त्रिशुळ यांच्या आवाजातील ध्वनित अर्थ भक्तासाठी अपुरे ठरले तर हा भैरव 'शंखा' च्या नाद लहरी अश्याप्रकारे उमटवतो कि त्या लहरीच्या नादमय लाटा भक्तास वास्तव जगाच्या परिघाच्या पलीकडे नेवून जाणीवेतून नेणीवेत नेवूनच भानावर आणतात.

म्हणूनच आपण देखील रुद्राच्या अभिषेकातून स्वतःस शुचिर्भूत करून घेण्याचे भाग्य आपल्या पदरी पडून घेवू.या ओंकार रुपी शिवाचे आत्मषटकात श्री आदी शंकराचार्य यांनी केलेल्या वर्णनाप्रमाणे अनुभूतीच्या पलीकडील त्यास शरण जाऊ, यातच आपले परम भाग्य दडलेले आहे.

कदाचित या महारुद्राच्या निमित्ताने चराचरात दडून राहिलेले माझ्यातील विश्व अथवा विश्वातील मी यांचे परस्परातील नाते उलगडले जाईल आणि थोड्या काळात माझ्यात कालातीत बदल घडेल. कदाचित मला अग्नीची होरपळ,पाण्याची तहान,विश्वाची व्याप्ती आणि श्रद्धेची अनुभूती यांची अल्पशी जाणीव होईल आणि माझ्या ओठी नेहमीच राहिल ते शब्द ब्रम्ह असेल -

अहं निर्विकल्पो निराकार रूपो
विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वन्द्रियाणि ।
सदा मी समत्वं न मुक्तिर्न बन्धः
चिदानन्दरुपः शिवोSहं शिवो S हम ।।

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शास्त्राभ्यास नको श्रुती पढु नको तिर्थासी जाउ नको
योगाभ्यास नको व्रते मख नको..तीव्रे तपे ती नको
काळाचे भय मानसी धरु नको, दुष्टांसी शंकु नको
ज्याचिया स्मरणे पतित तरती, तो शंभु सोडु नको..

ओम नमः शिवाय!

He stotra Times Music chya Grabh-sanskar CD madhe aahe.
Mee garodar asatana te roj aikayachi.
Bal potatun khup chaan pratisaad dyayache.
Tyachi halchal ekdum lay-baddha whyayachi he stotra lagale ki.
Nantar pan bal lahan asatana aswastha zala tar mee hee CD lawayachi tar to shant vyayacha..

Sorry for not able to type in Devnagari script.

सुरेख! हे स्तोत्र गाण्याच्या रुपात पण छान वाटते ऐकायला. छान लिहीलय तुम्ही.

मन्दारमाला कुलितायकाय कपालमालान्कीत शेखराय
दिव्याम्बरायैच दिगम्बराय नमःशिवायैच नमःशिवाय|

AUM

मस्तच Happy धन्यवाद डॉक्टर.
गेल्यावर्षी महाशिवरात्रीचा अंक तुम्ही पाठवला होता ते आठवलं. Happy

करचरणकृतं वाक्कायजं कर्मजं वा
श्रवणनयनजं वा मानसं वापराधम् ।
विहितमविहितं वा सर्वमेतत्क्षमस्व
जय जय करुणाब्धे श्रीमहादेव शम्भो ॥५॥

अतिशय सुंदर लेख ....

कालच शिवलीलामृताचे एक आवर्तन पूर्ण झाले. म्हणजे मी तरी रोज एक असा अध्याय वाचत गेले. पैकी १४ वा अध्याय फार मनोरंजक आहे. मग त्यात गजमुख, षडमुखाचे लुटुपुटीचे भांडाण, शिव-पार्वतीचे खोटेखोटे भांडण असा सर्व भाग येतो ११ वा अध्याय देखील अति शय आवडतो मला. किंकर, आपले सर्व लिखाण वाचून काढणार आहे. छान खजिना सापडल्यासारखे वाटते आहे.