जीवावर बेतले पण निभावले …'ब्लॅक लेबल'वर ! - एक निदानचातुर्य कथा !

Submitted by SureshShinde on 24 February, 2014 - 11:29

जीवावर बेतले पण निभावले …'ब्लॅक लेबल'वर ! - एक निदानचातुर्य कथा !

blacklebal.jpg

मी ससून हॉस्पिटलमध्ये एमडी करीत असतांनाची म्हणजे सुमारे चाळीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही …
बुधवारची संध्याकाळ. आमच्या युनिटचा इमर्जन्सीचा दिवस होता. चोवीस तास अव्याहत काम करणाऱ्या सीएमओ विभागात एक पेशंट आल्याचा निरोप आल्यामुळे मी आणि माझा ज्युनियर सहकारी डॉक्टर तिकडे निघालो. आमच्या युनिटचे प्रमुख तज्ञ डॉक्टर श्री सुळे यांची चिठ्ठी घेवून श्री मोहन भट नावाचे एक पेशंट आमची वाट पाहत थांबले होते. पन्नाशी ओलांडलेले आणि सुखवस्तू दिसणारे भट हे एक वकील असल्याचे त्यांनी पहिल्याच वाक्यात स्पष्ट केले. आधीच सरांचे खाजगी पेशंट आणि शिवाय वकील म्हटल्यामुळे आम्ही थोडे जास्तच सावधगिरीने ऐकू लागलो.
"आज सकाळपासून माझी तब्बेत बिघडली आहे. थोडा तापही वाटतो आहे, सारे अंग दुखते आहे. अंगावर तांबडे पुरळ उठले आहे. तोंडात देखील लाल काळे चट्टे दिसत आहेत. नाक शिंकरले तर रक्ताच्या गाठी पडताहेत."
त्यांना तपासल्यानंतर त्यांच्या पायावर पावलांपासून ते दोन्ही मांड्यांपर्यंत साधारणतः एक ते दोन मिलीमीटर आकाराचे हजारो लाल ठिपके दिसत होते. त्यातील काही ठिपके एकमेकांत मिसळल्यामुळे लालकाळसर असे मोठे धब्बे तयार झाले होते.

230px-Purpura.jpg

"सर, परप्युरा दिसतोय !" ज्युनियर माझी कानात पुटपुटला.
तोंडाच्या आतल्या भागात असेच लाल काळे चट्टे दिसत होते. नाकातून आत्तातरी रक्त येत नव्हते. पोटामध्ये लिव्हर आणि स्प्लीन वाढलेली हाताला जाणवत होती. शंभरपर्यंत ताप होता पण बीपी उत्तम होते. ते कोठलेही औषध घेत नव्हते. पण रोज रात्री तीनचार पेग व्हिस्की मात्र नित्यनेमाने अनेक वर्षे घेत आले होते.
"भटसाहेब, आपल्या शरीरातील प्लेटलेटस नावाच्या पेशी कमी झाल्या असाव्यात असे वाटते. ह्या पेशी आपल्या शरीरामध्ये रक्तस्त्राव झाल्यास तो थांबवितात. पण या पेशी प्रमाणापेक्षा जास्त कमी झाल्यास असा रॅश येतो. तुमच्या तोंडातील चट्टे अथवा नाकातून येणारे रक्तदेखील हेच दर्शवतात. आपल्याला हॉस्पिटलमध्ये दाखल होवून पुढील तपासण्या करून त्याप्रमाणे ईलाज करावे लागतील."

भटसाहेब खाजगी वार्डमध्ये ॲडमिट झाल्यानंतर थोड्याच वेळात सर्व प्राथमिक रिपोर्ट उपलब्ध झाले. भटांचा प्लेटलेट काऊंट जो नेहमी असतो पाच लाख तो केवळ दहा हजार होता ! त्यामुळेच त्यांना आपोआप त्वचा,नाक आणि तोंड येथे कोठलेही कारण नसताना देखील आपोआप रक्तस्त्राव होत होता ! ह्या प्लेटलेट बोनम्यारो म्हणजे अस्थिमज्जा किंवा हाडांच्या पोकळ भागात तयार होतात. प्लेटलेटच्या मूळपेशी तेथेच असतात व त्या आपण ज्याप्रमाणे सांडगे करताना तुकडे करतो त्याप्रमाणे स्वताच्या शरीराचे छोटे छोटे तुकडे रक्तामध्ये सोडत असतात, ते तुकडे म्हणजे या 'प्लेटलेट' ! यांचे आयुष्य सुमारे दहा दिवस असते. रक्तामधील वृध्द झालेल्या सर्व प्रकारच्या पेशी 'स्प्लीन' म्हणजे पाणथरीमध्ये जावून मरतात. प्लेटलेट कमी होण्याची दोन कारणे असतात. एक म्हणजे मूळपेशी कमी झाल्याने त्यांचे उत्पादन कमी होते. कधीकधी काही कारणांमुळे प्लेटलेटच्या शरीरामधील प्रथिनांमध्ये बदल झाल्यामुळे त्यांची ओळख बदलते, त्यामुळे शरीरातील संरक्षण व्यवस्था, इम्यून सिस्टीम, त्यांचा मारून टाकते. भटांच्या बाबतीमध्ये बहुतेक असेच होत असावे कारण त्यांचे इतर सर्व रिपोर्ट नॉर्मल होते आणि, लिव्हर आणि मुत्रपिंड यांचे कार्य उत्तम चालले होते. आम्ही त्यांचे सर्व रिपोर्ट सुळे सरांना कळविले.
"सुरेश, श्री भट हे केवळ आपले पेशन्त्च नव्हे तर माझे मित्र आहेत. त्यांना डेंगीचा ताप असण्याची शक्यता आहे. त्यांना स्टेरॉइडचे इंजेक्शन सुरु करा आणि रात्रीतून एक फ्रेश ब्लडही द्या. उद्या सकाळी पुन्हा प्लेटलेट काऊंट पाठवा. मी त्यांना सकाळी पाहीन."

दुसर्या दिवशी सकाळी भट अगदी फ्रेश दिसत होते. रात्रभरच्या उपचारांनी चांगला परिणाम दिसत होता. नाकातील ब्लीडींग पूर्ण थांबले होते व अंगावरील पुरळ मावळताना दिसत होते. ताप निवला होता आणि आजचा ताजा प्लेटलेट काऊंट होता पन्नास हजार !
"अब आप खतरेसे बाहर है" मी आनंदाने ही बातमी भटांना सांगितली.
पुढील दोन दिवसांत त्यांची तब्बेत आणखीनच सुधारली, प्लेटलेट काऊंट झाला तीन लाख आणि पुढील दहा दिवसांत स्टेरॉइडच्या गोळ्या हळूहळू कमी करायला सांगून आम्ही भटांना घरी पाठवले.

सुमारे पंधरा दिवसांनंतर श्री भट पुन्हा त्याच तक्रारींसह पुन्हा ॲडमिट झाले. यावेळीस पुन्हा तीच औषधे सुरु केली पण त्यांच्या प्लेटलेट्स काही वाढेनात, त्या वीसतीस हजारापर्यंत स्थिरावल्या होत्या. बोनम्यारो टेस्टमध्ये प्लेटलेट्सच्या मूळपेशी तर चारपट वाढलेल्या दिसत होत्या. म्हणजे भटांच्या प्लेटलेट्स स्प्लीनमध्ये जावून मरत होत्या, त्यांना अँन्टीबॉडीज तयार झाल्या होत्या. त्यावेळी अशा अँन्टीबॉडीज मोजण्याची सोय नव्हती.
"सुरेश, भटांना आयटीपी दिसतोय आणि बरेच दिवस स्टेरॉइडस घ्यावी लागतील . भटांच्या प्लेटलेट्स का कमी होताहेत हे शोधले पाहिजे नाहीतर त्यांची स्प्लीन काढून टाकण्याखेरीज गत्यंतर दिसत नाही."
अँन्टीबॉडीजमुळे प्लेटलेट्स कमी होण्याच्या आजाराला आयटीपी असे म्हणतात. जंतुसंसर्गामुळे झालेला आयटीपी काही दिवसांत आपोआप बारा होतो पण इतर कारणांमुळे अँन्टीबॉडीजचे उत्पादन सतत चालूच राहिले तर स्टेरॉइडस किंवा सर्जरी शिवाय पर्याय नसतो. कधीकधी कांही औषधांची ॲलर्जी निर्माण झाल्यामुळे अशा अँन्टीबॉडीजचे उत्पादन सतत चालूच राहते आणि ते औषध बंद करणे हा त्यावर उत्तम उपाय असतो. आम्ही भटांची खूप चौकशी केली पण काही क्लू मिळेना.
एके दिवशी वार्डच्या मुख्य सिस्टरांनी मला बाजूला बोलावून सांगितले,
"सर, हा पेशंट रोज दारू घेत असतो. रोज सकाळी दाढी करायला येणाऱ्या न्हाव्याशी त्याने संधान जुळवले आहे. तो न्हावी त्याच्या फवार्याच्या बाटलीत दारू आणून त्यांना देतो असा मला दाट संशय आहे."
मी ही गोष्ट सुळे सरांच्या कानावर घातली. सरांचा चेहरा हसरा झाला.
"अरे मोहन, तू हॉस्पिटलमध्ये देखील तुझा कार्यक्रम चालू ठेवला आहे असे कळते. काय पितोस ?"
मोहन भट चांगलेच चपापले.
"डॉक्टर, मला त्याशिवाय जमतच नाही. बायको गेल्यापासून 'ब्लॅक लेबल'नेच मला सोबत केली आहे."
क्षणभर मला भटांची कींव आली.
पण सरांच्या मनात काही तरी वेगळेच विचार घोळत होते. सुळे सर हे उत्तम निदान करण्यासाठी प्रसिद्ध होते. सरांच्या टोपीमध्ये अनेक तुरे खोचलेले होते, 'पूना सिंड्रोम' हा त्यापैकी एक ! जुन्नरजवळच्या एका कुटुंबामधील सर्वांना प्रमाणापेक्षा खूपच लघवी होवू लागली. रोज पंधरावीस लिटर्स ! आपल्या अगस्ती मुनींना झाली होती त्याची आठवण करून देणारा आजार ! याला आम्ही डायबीटीस इंसीपिडीस म्हणतो. सरांनी शोधले की ह्या लोकांनी खाल्लेल्या बाजरीवर एक प्रकारची बुरशीचा रोग पसरला होता आणि त्यामुळे हा आजार झाला होता. अचूक निदान ही सरांची खासियत होती. एखाद्या पेशंटविषयी चौकशी करून झाली की सर डोळे मिटून दोन मिनिटे शांत विचार करीत थांबत आणि आम्ही आता सर काय बोलतात याची वाट पाहत थांबत असू. भगवान श्रीकृष्ण अंतर्यामी बघून ज्ञानकोश शोधत असत त्याची आठवण व्हावी ! आजही सर थोडा वेळ भटांच्या शेजारी अशाच ध्यानमग्न अवस्थेत उभे होते.
"भट, व्हिस्किमध्ये काय घालता, सोडा, पाणी की स्ट्रेट, 'ऑन द रॉक्स !"
भट जरा खुशीत आले,
"माझे काही मित्र ब्रिटीश काळातील आर्मीमधून रिटायर झालेले. त्यांना व्हिस्किमध्ये लागते एक स्पेशल पाणी, 'टॉनिक वॉटर'. हे जरा कडू असते पण त्याची मजा काही औरच !"
"मला दाखवता का ते तुमचे 'टॉनिक वॉटर' !"

tonicwater.jpg

भटांनी तातडीने कपाट उघडून एक बाटली काढून सरांच्या हातात दिली आणि स्मितहास्य करीत उभे राहिले.
"अगदी बरोबर ! या मुळेच, या पाण्यामुळेच तुमच्या प्लेटलेट्स कमी होत आहेत."
सर काय बोलताहेत यावर क्षणभर भटांचा आणि इतर कोणाचाही विश्वास बसेना.
"डॉक्टर, मी दारू सोडावी म्हणून तुम्ही असे सांगत असाल तर त्याचा काही उपयोग नाही." भट.
"दारू पिणे हा तुमचा वैयक्तिक निर्णय आहे. पण तुमच्या तक्रारी ह्या टॉनिक वॉटरमुळेच आहेत याची मला खात्री आहे." सर.
"माफ करा, सर पण तुम्ही म्हणता याला पुरावा काय ?" भटांमधल्या वकीलाने प्रश्न केला.
सुळे सर थोडेसे गंभीर झाले आणि मला म्हणाले,
"सुरेश, पटकन दोन काचेचे ग्लास मागवून घ्या."
भटांनीच लगेच कपाटातून दोन ग्लास काढून दिले. सर आता काय करणार असा विचार करीत आम्ही सर्वजण उभे होतो.
सरांनी एका ग्लासमध्ये काठोकाठ 'टॉनिक वॉटर' भरले आणि दुसर्यात साधे पाणी. ते दोनही ग्लास न सांड्वता खिडकीमध्ये भर उन्हात ठेवले.
"आपण दुसरे पेशंट पाहून येईपर्यंत हे ग्लास असेच राहू द्या. आम्ही पंधरा वीस मिनिटात परत येतो असे सिस्टरना सांगून आम्ही बाहेर पडलो. पुन्हा परत येईपर्यंत आता काय जादू दिसणार याचाच आम्ही सर्वजण विचार करीत होतो.
परत येवून पहिले तर ते दोन्ही ग्लासेस तसेच दिसत होते, काहीच फरक दिसत नव्हता.
"सुरेश, सर्वजण जवळ येवून पाळीपाळीने असे बाजूने दोन्ही ग्लासमधील पाण्याच्या पृष्ठभागाकडे नीट पहा."
मी सर्वप्रथम पहिले. 'टॉनिक वॉटर' च्या ग्लासातील पृष्ठभागाच वरील पाव इंच जाडीचा थर निळसर होवून चमकत होता. आम्ही सर्वजण आश्चर्यचकित झालो, अगदी भटदेखील !
"आता या टॉनिक वॉटरच्या बाटलीवरचे लेबल वाचा." सर.
"इंडियन टॉनिक वॉटर - कंटेन्स 'क्विनाईन' " वाचतावाचताच माझी ट्यूब पेटली. भटांना क्विनाईनची ॲलर्जी होती आणि त्यामुळेच त्यांच्या प्लेटलेट्स कमी होत होत्या.
टॉनिक वॉटरमधील क्विनाईनच्या रेणुंवर दुपारच्या कडक उन्हातील सुर्यप्रकाशातील अल्ट्राव्हायोलेट किरण पडल्यामुळे चमकणारे 'फोटॉन्स' तयार होतात व त्यामुळेच तो नीळा रंग दिसला होता.
ते टॉनिक वॉटर पिणे बंद केल्यानंतर काही दिवसांतच भटांच्या प्लेटलेट्स वाढून पूर्ववत नॉर्मलला आल्या. सुळे सरांनी सज्जड पुरावा दिला होता. भटांनी मात्र या प्रसंगाचा एव्हडा धसका घेतला की ब्लॅक लेबल ऑन-द-रॉक्स घ्यायला सुरवात केली !

-----------------------------------------

सूर्याच्या प्रकाशामध्ये, विशेषतः दुपारच्या रखरखीत उन्हामध्ये भरपूर अल्ट्राव्हायोलेट किरण असतात जे आपल्या त्वचेला घातक असतात. त्वचेमधील डीएनए ला इजा पोहोचवितात. हा डयमेज रिपेअर करण्याची क्षमता प्रत्येक व्यक्तीमध्ये असते. काही व्यक्तींमध्ये असलेल्या जनुकीय दोषामुळे त्यांना हा डीएनए रिपेअर करता येत नाही त्यामुळे त्यांच्या त्वचेला खूप ईजा होवून काळे धब्बे पडतात, कालांतराने डोळे आंधळे होतात आणि शेवटी त्वचेचा कर्करोग होतो. अशा genetic DNA repair disorder चे नाव आहे 'xeroderma pigmentosa'. काही दिवसांपूर्वी अशी एक फ्यामिलीचे मी निदान केले होते.
सनस्क्रीन आणि काही औषधांमुळे त्याचे आयुष्य सुखकर करता येते. त्या फ्यामिलीमधील एकच हा फोटो ….

xeroderma.jpg

सूर्यकिरण वातावरणामध्ये प्रवेशताना वातावरणातील ओझोन वायूचा थर हे अल्ट्राव्हायोलेट किरण नष्ट करतो. पण दुपारच्या वेळी सुर्यकिरणे सरळरेषेमध्ये पृथ्वीवर आल्यामुळे त्यात अल्ट्राव्हायोलेट किरण जास्त प्रमाणात असतात. या उलट सूर्याची कोवळी किरणे आरोग्यासाठी जास्त फायदेशीर असतात. असो !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारी लिखाण आहे. मैत्रेयीला अनुमोदन.

इथे बर्‍याचदा डॉक्टरांशी वर्षानुवर्षांची ओळख असते. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवता येतो. शिवाय ते ही हक्काने गोष्टी सांगू शकतात.
ह्या संबंधी अगदी जवळचा किस्सा आहे. परत कधितरी. Happy

माहितीपूर्ण लेख Happy धन्यवाद.

या लेखाने हे "एस्टॅब्लिश" (स्थापित) होतय की सर्वसामान्यांना वाटत असते/अपेक्षा असते तसे डॉक्टरांकडे जादुची कांडी वगैरे नसून, त्यांना देखिल प्रचंड विचारपूर्वक निदान अन उपाययोजना करायला लागते ज्यात रोग्याचे सहकार्य अत्यावश्यक असते.
असे म्हणतात की डॉक्टर(वैद्य) आणि वकिलापासून काहीही लपवुन ठेवू नये. त्याचेही हे एक उदाहरण आहे.
त्या नर्सने जागरुकपणे पिण्याबाबतची ती शंका डॉक्टरांशी बोललीच नसती तर पुढील काहीच घडले नसते हे देखिल तितकेच खरे.

>>>> पण प्रायव्हेट पेशंटशी थोडे वेगळे वागावे/बोलावे लागते, ते कसे, याची थोडी कल्पना येत असे. <<<<< चला, ही कबुली देऊन टाकलित इब्लिसराव ते बरे केलेत. म्हणजे ससुन वगैरे सरकारी इस्पितळातून सामान्य (बकरे) पेशण्ट अन विशेष व्हीआयपी पेशण्ट असा भेदभाव सर्रास केला जातोच हे नविन नसले तरी बकर्‍यांशी बोलणे/चालणे हे वेगळे अस्ते हे देखिल तुम्हाला मान्य आहे तर! Wink Light 1 [तरीच, माबोवरिल हिन्दुत्ववादी/धर्मवादी देखिल तुम्हाला सामान्य बकरे वाटले तर नवल नाही Proud ]

>>>>> पण रोज रात्री तीनचार पेग व्हिस्की मात्र नित्यनेमाने अनेक वर्षे घेत आले होते.<<<<<
डॉक्टर, या धाग्याचा विषय नाही, पण विषय आला म्हणून विचारतो,
रोज ३/४ पेग म्हणजे अल्मोस्ट (जवळजवळ) एक "क्वार्टर" (चपटी) व ते देखिल अनेक वर्षे.
तर माझा प्रश्न असा की, दारू/अल्कोहोलचे सेवन शरिरावर घातक परिणाम करते ते किती प्रमाणाबाहेरचे सेवनानंतर?
असे काही प्रमाण असते का?
कशाप्रकारे दु:ष्परिणाम करते?
कोणत्या हवामानात/जगण्याच्या परिस्थितीत किती प्रमाणात ते कदाचित लाभदायी देखिल ठरते का?

माफ करा, मला दारूचे "व्यसना" विषयी माहित आहे, व्यसन लागते कसे, त्याचे आहारी जाऊन माणूसपण हरवते कसे इत्यादी बाबी या बाह्य घटना / नि:ष्पत्ती झाल्या.
पण शरिरांतर्गत काय परिणाम दारूमुळे होतात, यावर काही प्रकाश टाकलात तर बरे होईल.
(इथे व्यक्ति तितक्या प्रकृती हे देखिल मी लक्षात ठेवतोय, त्यामुळे एकाला जे लाभेल ते दुसर्‍याला लाभेलच असे नाही हे मान्य आहे, तसेच मी कुठेही दारूचे समर्थन करण्याचे दृष्टीने विचारित नाहीये)नाहीये)

माझे बाबा म्हणतात, डॉक्टर, वकिल आणि ज्योतिषी यांच्याशी कधिहि खोटे बोलु नये.... ईथे वकीलच खोटे बोलतोय.. (वागतोय).... (विषयांतराबद्दल क्षमस्व)

बाकी डॉक्टर साहेब, तुमचे लेख खासच..... तुमच्या लेखांनी मायबोली वर येण्यासाठी भाग पाडले......

@अगो : आपल्या बौध्धिक चाळणीतून हा लेख सहीसलामत 'पास' झाल्यामुळे जीव भांड्यात पडला बरे !

>>>> माझे बाबा म्हणतात, डॉक्टर, वकिल आणि ज्योतिषी यांच्याशी कधिहि खोटे बोलु नये.... ईथे वकीलच खोटे बोलतोय.. (वागतोय).... (विषयांतराबद्दल क्षमस्व) <<<<<< LOL
अहो, तुम्ही वकिलाशी खरे बोलायचे अस्ते, अन खोट्यांच्या या दुनियेत तुमच्या खर्‍याला जागा मिळवुन देण्यासाठी तुमच्या "खर्‍याच्या"बाजुने वकील कोर्टात "खोटे" बोलणार अस्तो..... ! कारण खर्‍याचे खोटे व खोट्याचे खरे करणे ही या बोटावरची थुन्की त्या बोटावर करण्याइतकी सोपी बाब नाही अन व्यवहारातला वकिल बहुधा त्याकरताच असतो भले "बिजनेस इथिक्स" (व्यावसायिक तत्वप्रणाली) काहीही असतील.

फारच सुरेख डॉक्टरसाहेब. Happy

आपले सर्व लेख वाचतेय. सगळेच आवडले आहेत.

वैद्यकचार्तुर्य कथा या विषयावर एक पुस्तक नक्की काढाच ही विनंती. Happy

लेख आवडला. Happy

एक सुचवायचं होतं. क्विनाईनमधून निघणार्‍या निळसर प्रकाशासंदर्भात 'फ्लुरसन्स' हा शब्द वापरला जातो. 'चमकणारे फोटॉन्स तयार होतात' हे जरा अशास्त्रीय आहे, आणि इतक्या चांगल्या लेखात असा प्रयोग अयोग्य वाटतो. Happy
तसंच, क्विनाईनमधला फ्लुरसन्स फक्त वरच्या थरात दिसेल, असं वाटत नाही.

@चिनुक्स : चमकणारे 'फोटॉन्स' तयार होतात>>>हे वाक्य फ़्लुओरेसन्स या फेनोमेनन मागील खरे मूळ शास्त्रीय कारण सांगते म्हणून तसे लिहिले आहे. वास्तवामध्ये अल्ट्राव्हायोलेट किरण शोधण्यासाठी quinine चा उपयोग केला जातो. अर्थात फ़्लुओरेसेन्स हा शब्द जास्त प्रत्ययकारी आहे हे खरे आहे, पटले ! आपण केमिस्ट्रीचे जाणकार आहात हे मला माहित आहे. Happy

क्विनाईनमधला फ्लुरसन्स फक्त वरच्या थरात दिसेल, असं वाटत नाही.>>>पण हे १०० % सत्य आहे.

इतरांसाठी थोडी आणखी माहिती - Quinine is highly fluorescent and it is widely used as a standard for fluorescence measurement.The UV absorption peaks around 350 nm (in UVA). UV प्रकाशाला ब्ल्याक लाईट असे म्हणतात व त्याचे अनेक उपयोग आहेत, खोट्या नोटा ओळखण्यासाठी वापरला जाणारा देखील हाच. ४०० nm चे टॉर्च स्वस्त असतात. मी आणि इतर सर्व त्वचारोगतज्ञ दैनंदिन तपासणीमध्ये ३६५ नानोमीटर चा UV टॉर्च 'वूड्स ल्याम्प' वापरतो. त्याविषयीची कथा पुन्हा कधीतरी !

आपल्यासारख्या तज्ञाकडून आलेला प्रतिसाद वाचून आनंद झाला. Happy

थोडेसे जास्त वाचल्यानंतरची मिळालेली मनोरंजक माहिती आणि स्पष्टीकरण …

१. UV लाईट आपल्या डोळ्यांना दिसत नाही. ( मात्र मधमाशांना दिसतो !)

२. quinine सारखे पदार्थ UV किरण शोषून त्यांची वेव्हलेंग्थ वाढवून परावर्तीत करतात. त्यामुळे अदृश्य असा UV लाईट दृश्य होवून दिसू लागतो, हाच तो fluorescence ! अतिनील किरणांचे नील किरणांमध्ये रुपांतर होते. पण असा बदल होतांना विघातक असे UV किरण बदलल्यामुळे त्यांचा घातकपण नाहीसा होतो. त्यामुळे सनस्क्रीन म्हणून असे पदार्थ उपयोगी पडतात.

३. मायक्रोस्कोपखाली TB चे जंतू पटकन ओळखण्यासाठी फ़्लुओरेसेन्ट अन्तीबोडीज वापरतात.

४.माझ्या पहिल्या लेखात लिहिलेल्या फिश टेस्टमध्ये बदललेला DNA शोधण्यासाठी हे तंत्र वापरतात.
असो.

क्विनाईन कुठे मिळेल? कोणत्या दुकानात काय म्हणून मागायचे? Happy प्रयोग करुन बघायला हवा.
बायदिवे, इथला विषय नाही, पण, पावसाळ्यात रस्त्यावरील तेलाचा तवंग साचलेल्या पाण्यात तरंगु लागतो तेव्हाही निळसर झाक असलेला प्रकाश दिसतो त्यात. ते काय असू शकेल? की ते फक्त तवंगामुळे झालेले प्रकाशाचे विकिरण असते?

लिंबूटिंबू,
ते वेगळं. अशा थरांना लँगम्यूर लेअर म्हणतात आणि दिसणारे रंग 'थिन-फिल्म इंटरफेरन्स'मुळे दिसतात.

पाण्यात न मिसळणार्‍या (हायड्रोफोबिक) आणि पाण्याकडे आकर्षित होणार्‍या (हायड्रोफिलीक) अशा दोन्ही प्रकारच्या गुणधर्मांनी युक्त अशा (अ‍ॅम्फिफिलीक) रेणूंमुळे मुख्यत्वे असे थर बनतात (उदा. पाण्यावर सांडलेले पेट्रोल). पाण्याशी अजिबात न पटवून घेणारे अणू-रेणू अधिक असल्यानं वरचा थर पाण्यात मिसळत नाही. शिवाय घनतेतला फरकही कारणीभूत असतो. या दोन थरांमधल्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्समध्ये फरक असतो. आता पुढचं मराठीत लिहिणं अवघड आहे. त्यामुळे http://en.wikipedia.org/wiki/Thin-film_interference हे वाच कृपया. Happy

>>>> पण प्रायव्हेट पेशंटशी थोडे वेगळे वागावे/बोलावे लागते, ते कसे, याची थोडी कल्पना येत असे. <<<<< चला, ही कबुली देऊन टाकलित इब्लिसराव ते बरे केलेत. म्हणजे ससुन वगैरे सरकारी इस्पितळातून सामान्य (बकरे) पेशण्ट अन विशेष व्हीआयपी पेशण्ट असा भेदभाव सर्रास केला जातोच हे नविन नसले तरी बकर्‍यांशी बोलणे/चालणे हे वेगळे अस्ते हे देखिल तुम्हाला मान्य आहे तर! डोळा मारा दिवा घ्या [तरीच, माबोवरिल हिन्दुत्ववादी/धर्मवादी देखिल तुम्हाला सामान्य बकरे वाटले तर नवल नाही फिदीफिदी ]
<<
लिंबूराम,
सरसकट पैसे देणारे यजमान असलेत, तरी विशिष्ट जातींत जन्मलेल्यांसाठीच फक्त मंत्रोच्चार करताना 'श्रुति-स्मृती-पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम्', अन इतरांना फक्त 'पुराणोक्त फल' मिळो, अशी हरामखोरी परमेश्वराच्या दारात प्रार्थना करताना करणार्‍या तुमच्यासारख्या धर्मपुंगवांचे, वेगळे वागायचे म्हणजे कसे, याचे आकलन तुमच्याइतकेच अभदरं असणार, हे पुन्हा एकदा सिद्ध केलेत तुम्ही Wink भेदभाव कसा करायचा, त्याची तर सदियों पुरानी ट्रेनिंग तुमच्यात मुरलेली, नसानसात भिनलेली आहे. तेव्हा, जाऊच द्या.

लेकिन इस बात पे, 'आपण हसे लोकाला, शेंबुड आपल्या नाकाला' अशा म्हणीचा किस्सा मभदिनानिमित्त तयार झाला बघा!

@लिंबूटिंबू: quinine हे औषध आम्ही आत्ता choroquin या औषधाला resistant असलेला मलेरिया ट्रीट करण्यासाठी वापरतो. बाजारात ResQ या ब्रांडनेम ने मिळते.
आपल्यामध्ये एक शास्त्रज्ञ लपला आहे असे वाटते ! तेलाचा तवंग मीही पाहिला पण हा विचार नाही सुचला. त्यात असे फ़्लुओरेसेन्ट केमिकल असू शकेल. Happy
तुमचे लिंबूटिंबू हे नाव फारच फसवे आहे Happy

ता. क. लिहितच होतो तेव्हड्यात श्री चिनुक्स यांचा प्रतिसाद वाचला. अरेरे, हा शोध अगोदरच कोणीतरी लावलाय ! बेटर लक नेक्स्ट टाईम !:-)

डॉक्टर, अहो इकडे माबोवर एकेका क्षेत्रातले एकसे एक दिग्गज वावरतात जसे तुम्हि वैद्यकीय क्षेत्रातील. Happy चिनुक्स रसायनशास्त्रासोबतच मराठी व्याकरण व भाषाविषयक देखिल छान सांगतो.
चिनुक्स, अन डॉक्टर, माहितीबद्दल धन्यवाद. Happy चिनुक्स, सवडीने नीट वाचून काढतो ती लिंक.

>>>>> तुमचे लिंबूटिंबू हे नाव फारच फसवे आहे स्मित <<<<< Happy तुमचे निरीक्षण अचूक आहे. पण.....
अहो, लिम्बी तर आजही ठामपणे म्हणते की " लिम्ब्या तू फारच फसवा आहेस" Proud असो.

>>>>> विशिष्ट जातींत जन्मलेल्यांसाठीच फक्त मंत्रोच्चार करताना 'श्रुति-स्मृती-पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम्', अन इतरांना फक्त 'पुराणोक्त फल' मिळो, अशी हरामखोरी पर <<<<<
तुमचा अनुभव काय ते माहित नाही, पण काही वर्षांपूर्वी (नेमकी किती माहित नाही) कुणीतरी (कोण ते आठवत नाही) जेव्हा वेद अन श्रुति:स्मृति जाळून "आंदोलन" वगैरे केले (त्यास आम्ही हरामखोरीवगैरे म्हणत नै बर्का इब्लिसा) , तेव्हापासूनच, अशांकरता पुराणोक्तचा वापर सुरू झाला, न जाणो, श्रुति:स्मृति चा उच्चार झाला, अन यजमान जाळणार्‍यांमधला असला, तर पुजे ऐवजी इथेच धुलाई होईल..... अन हेच रास्त कारण आहे.

बाकी एखादा शब्द उच्चारला वा न उच्चारला तर त्याने "पुण्य" मिळविण्याच्या कामात हरामखोरी होत असते असे तुम्हि मानता याचे नवल वाटते. यच्चयावत श्रद्धांना अंधश्रद्धा संबोधत त्या नष्ट करायच्या मागे लागलेले असे सोईस्कररित्या मात्र एखादा श्बद वापरला/नै वापरला याचे गणित माण्डू लागतात तेव्हा गंमत वाटते. असो, दुसरीकडे कुठेतरी भेटा, या धाग्यावर नको.

आहेत की ते शास्त्रज्ञ!
लिंबूशास्त्री म्हणतात त्यांना.

डॉक्टर तुम्ही सर्व किती सोपं आणि इंटरेस्टींग करून पोहोचवता आमच्यापर्यंत.
फारच छान लेख.
मी तुमच्या लिखाणाची फॅन झालेय.

डॉक्टर , खूपच छान माहिती पूर्ण लेख खरेतर तुमच्या अनुभवांवर आधारित एखादी T . V वर सिरियल यायला हवी म्हणजे अजून जास्त लोकापर्यंत पोहचेल . एकतर तुमचे लेख माहितीपूर्ण आहेतच तसे वाचनीय पण आहेत.

Pages