एक कविता

Submitted by -शाम on 10 February, 2014 - 23:15

एक गोष्ट .. शेवट विस्कटलेली
एक गाठ .. करकचून सुटलेली

एक पत्र .. सुगंध विटलेलं
एक काळीज .. गलबलून दाटलेलं

एक पुस्तक .. मोरपीस जपलेलं
एक वही .. पान अन पान ओलं

एक नदी .. वळसा घालून गेलेली
एक वाट .. गाव टाळून निघालेली

एक चंद्र .. कुंकू माळणारा
एक किनारा .. लाटा ढाळणारा

एक पाऊस .. डोळ्यातून निसटलेला
एक मोर .. पिसारा मिटलेला

एक झरा .. बेफिकीर कोसळणारा
एक कातळ .. आत आत ढासळणारा

एक पक्षी .. आभाळ जपणारा
एक पारधी .. पिसे विकणारा

एक दोर .. मध्येच तुटलेला
एक पतंग .. काट्यात रुतलेला

एक दिवा .. रात्र पेटवणारा
एक पारा .. काळ गोठवणारा

एक जखम .. भरूच नये अशी
एक आठवण .. स्मरुच नये अशी

एक भास .. आंबट गोड खारट
एक सत्य .. कडू तिखट तुरट

एक कविता .. रद्दीत गेलेली
एक सीता .. माती झालेली

अजूनही बरच लिहता येईल

आपल्या दोघांबद्दल!
______________________________शाम

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ज ह ब ह री!!

एक पक्षी .. आभाळ जपणारा
एक पारधी .. पिसे विकणारा
>> व्वा!!

शेवट तर अफाट आवडला... Happy

___/\____

१०

छान कविता, छान आशय.

सुरवातीला यादी भासणारी आणि अखेरच्या ओळींतून आधीच्या ओळींना एकसंध अर्थ प्राप्त करून देणारी कविता.

सुंदर!

प्रतिसाद संख्येवरून लिखाणाचं कौतुक जोखत नाही आम्ही... तेरा नाम ही काफी है! स्पेशल वाचायला मिळणार ह्याची गॅरेंटी Wink Happy

बागेश्री +१ Happy
काल पासुन ब्राऊझर मध्ये उघडून ठेवलेली पण कामाच्या व्यापात वाचायची राहीली.
आण खास वेळ देऊन वाचयची इच्छा होती Happy

+१

+२

+३

+४

+५

Pages