सलामात दातांग - वेलकम (टू इंडोनेशिया) - भाग १

Submitted by वर्षू. on 3 February, 2014 - 01:53

इंडोनेशिया आर्किपलागो जवळ जवळ १७,५०८ बेटांचा समूह आहे. यापैकी ,'जावा' या आकारमानानुसार पाचव्या नंबरावर असलेल्या बेटावर दहा वर्ष राहण्याची संधी मिळाल्याने इंडोनेशियाशी स्नेह जुळला. इंग्लिश स्क्रिप्ट असल्याने इथली भाषा शिकायला अतिशय सोपी आहे. कोणत्याही देशात राहायला गेलो असता तिथली भाषा शिकली की आपोआपच तिथल्या संस्कृतीशी , लोकल लोकांशी समरस होता येते.

या डिसेंबर मधे एक गम्मतच झाली.. ध्यानीमनी नसता मला ,' जाते थे जापान ,पहुँच गये चीन' चा पुरेपूर अनुभव आला. फक्त जाते थे चीन ,पहुँच गये इंडोनेशिया असं झालेलं!!!

आम्ही चायनाला जायचे म्हणून हाँगकाँग ला उतरलो.. त्याच दिवशी नेमका माझ्या इंडोनेशियाच्या एका मैत्रीणीने फोन केला आणी मला जकार्ताला यायची गळच घातली. मी पण इंडोनेशियाला मिस करतच होते तिथल्या जुन्या मैत्रींणी आणी विद्यार्थ्यांना.. विजा ऑन अरायवल असल्याने ती ही काळजी नव्हती. बास!!मग काय पुढचं रिझर्वेशन कँसल केलं, लगेच दुसर्‍या दिवशीचं जकार्ता हाँगकाँग जकार्ता चं तिकिट काढलं आणी जाऊन पोचले की जकार्ताला.
नवराही कामानिमित्त चायनाला रवाना झाला.

जकार्ताला पोचल्यावर सर्वांच्या भेटीगाठीआचा आनंदसोहळा पार पडला.
इंडोनेशियन जेवणाची मी सुपर सुपर फॅन असल्याने रोजच मेजवान्या घडत होत्या.
या काही खासमखास डिशेज

क्रॅब ची झणझणीत करी

निखार्‍यावर भाजलेली फिश

तोफू,लीफी वेजीस्,कबुतराची अंडी

अमेझिंग फ्राईड फिश

तोफू, स्टीम राईस, केळ्याच्या पानात गुंडाळून भाजलेले चिकन ,कुरड्या , बीन स्प्राऊट्स

आठवडाभर भेटीगाठींचा आनंदसोहळा झाला.
दुसर्‍या आठवड्यात मी जकार्ताहून विमानाने केवळ पाऊण तासात ,' योग्यकार्ता' या शहरात येऊन पोचले. हे लहानसे गाववजा शहर येथील बाटिक् कला,बॅलेनृत्य, लेदर पपेट शोज, संगीत नाटकं, चांदीवरच्या कोरीव कामामुळे जावानीज कला आणी संस्कृती चं माहेरघर समजलं जातं.
याव्यतिरिक्त येथील ९व्या शतकात बांधलेले ,' प्रम्बानान' हे हिंदू मंदिर, नवव्या शतकातच बांधलेले ,' बोरोबुदूर' हे जगातले सर्वात भव्य बौद्ध मंदिर आणी शहरापासून केवळ २८ किमी वर अंतरावरचा जागृत ज्वालामुखी ,' मेरापि', ही प्रमुख आकर्षणाची स्थळे जगभरातील पर्यटकांना इथे खेचून आणत असतात.

योग्याकार्ता एअरपोर्ट वर माझा इंडोनेशियन गाईड एक गाडी आणी ड्रायवर घेऊन हजर असलेला पाहून बरं वाटलं. गाडीत बसल्यावर लगेच १७ किमी दूर असलेल्या ,'प्राम्बानान' या हिंदू देवळांचा समूह पाहायला निघालो.ही देवळे UNESCO World Heritage Site मधे सम्मिलीत आहेत.

हा माझा गाईड ,' पा सुदिरमान' . गेली २० वर्षे गाईड चं काम करत असलेला पन्नाशी चा सुदिरमान हसतमुख आणी काटकुळा होता. सर्व माहिती अगदी डीटेल मधे सांगत होता.

९ व्या शतकात ,'संजय" डायनेस्टीच्या एका राजाने बौद्ध धर्मा चा प्रभाव कमी करण्याकरता आणी हिंदू धर्माच्या प्रचाराकरता हा संच बांधला. मध्यभागी ४७ मीटर उंचीचे शिवमंदिर आहे जे साऊथ ईस्ट एशिया मधील सर्वात आधिक उंचीचे देऊळ मानले जाते.त्याच्या आजूबाजूला कमी उंची ची दोन देवळे अनुक्रमे (उत्तरेला)विष्णु आणी (दक्षिणे कडचे)ब्रम्हा ला समर्पित आहेत.

इथे असलेल्या एकूण २४० मंदिरां च्या संचातील तीन देवळे ब्रम्हा,विष्णु आणी शंकरा च्या वाहनांना अर्थात हंस, गरूड आणी नंदी ला समर्पित आहेत.

सोळाव्या शतकात वारंवार होणार्‍या लहानमोठ्या भूकंपांत आणी २००६ सालच्या भीषण भूकंपात या मंदिरांची भयंकर पडझड झाली.
१९३० साली या जागेची डागडुजी करण्यात आली जी आजतागायत सुरु आहे.

शिव आणी ब्रम्ह मंदिराच्या पायर्‍या चढत असताना असलेल्या गोलाकार बाल्कनीवजा पॅसेजेस वर रामजन्मापासून संपूर्ण रामायणातील गोष्टी ,' लो रिलीफ' स्कल्पचर टेक्निक वापरून दाखवलेल्या आहेत.
( low relief is a sculpture in which forms extend only slightly from the background; no figures are undercut)
देवळाच्या भल्या मोठ्या प्रांगणातील ओपन एअर थिएटर मधे , पौर्णिमेच्या चांदण्यात रामायणावर आधारित नृत्य नाटिका सादर करण्याची प्रथा १९६० साली सुरु झाली. या कलेला आजही तितकेच महत्व आहे. आजही दर्शक या नृत्यनाटकांचा आनंद लुटण्याकरता मोठ्या प्रमाणात येत असतात.

प्रम्बानान देवळांचा समूह. इंडोनेशियामधे कोणत्याही मंदिरांना भेट देण्यापूर्वी , सर्वांना कमरेला ,'सारोंग' हे बाटिक वस्त्र गुंडाळण्याचा सरकारी हुकुमच आहे.

दुर्गेची मूर्ती

ही बहुतेक विष्णु ची मूर्ती होती

शिव मंदिरा च्या गर्भगृहात फार काळोख असल्याने एक ही फोटो आला नाही.

आतापर्यन्त बरीच पायपीट झाली होती . त्यामुळे होटेल वर जाऊन बालीनीज मसाज घ्यायची स्वप्ने पाहात परतले. परतीच्या रस्त्यावर काही बाटिक काम करत असलेल्या वर्कशॉप ला भेट दिली , तिथे तयार झालेले काही नमुने म्हणून स्कार्फ सारख्या काही सटरफटर वस्तू विकत घेतल्या . लोकल बाजारात भटकले. टूरिस्ट्स स्पॉट असूनही शहर शांत होतं, सुपर मधे वस्तू वाजवी किमतीत विकायला होत्या.

टिपिकल इंडोनेशियन बाटिक डिझाईन्स

योग्यकार्ता शहर

कोणताही देश असो किंवा शहर असो.. एक चायनीज देऊळ हवंच तिथे..

दुसर्‍या दिवशी योग्याकार्ता पासून २८ किमी वर असलेला जागृत ज्वालामुखी,' मेरापि' ला भेट दिली.

१५४८ पासून आपल्या आस्तित्वाची सतत जाण देणारा ,'मेरापि' पाहण्याचं माझं बर्‍याच वर्षांचं स्वप्न यावर्षी

पूर्ण झालं. मेरापि चा अर्थ इंडोनेशिअन भाषेत ,' आगी चा पर्वत' असाच आहे. जावानीज भाषेत

पर्वताला ,'मेरू' आणी आगीला ,' आपि' म्हणतात .

या ज्वालामुखी ने २०१० सप्टेंबर पासून वेळोवेळी लावा आणी गॅस ओकून , आसपास

राहणार्‍या जनतेला वॉर्निंग्स द्यायला सुरुवात केली होती. त्याच्या पोटात आग धुमसत धुमसत शेवटी २५ ऑक्टोबर ला त्याचा स्फोट झाला.

इंडोनेशियन सरकारने मेरापि च्या उतारावर वसलेल्या साडे तीन हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी अगोदरच

हलवले होते. पण काही गावकरी आणी गावा चा प्रधान यांनी गाव सोडण्यास नकार दिला आणी घरादारा सकट

मेरापी च्या लाव्याचे बळी ठरले. लाव्यामुळे आसपासचे वेजीटेशन नष्ट झाले. बाजूने वाहणार्‍या नदी च्या

पाण्यात लावा चे प्रवाह मिसळल्यामुळे नदी चे रूप बदलून ती खडकाळ बनली.

मेरापि कडे जायचा हिरवागार रस्ता..

वाटेत दिसलेली नदी.. तिच्या प्रवाहात लावा मिसळल्याने संपूर्णपणे खडकाळ झालेली

मेरापि च्या उतारावर वसलेले ,' सेलो' गाव. जिथून मेरापि केवळ ८ किमी च्या अंतरावर आहे.

मागे दिसणारा चित्तथरारक ,' मेरापि'

यंदाच्या वर्षी मेरापिने ,जून पासूनच वॉर्निंग सिग्नल द्यायला सुरुवात केलीये. अधून मधून त्यातून राखेचे फवारे उडत आहेत, बारीक सारीक स्फोट होत आहेत, २०१० मधे सेंटर ला पडलेली क्रॅक ,रुंद होत चाललीये, १ डिसेंबर ला तर थोडा मोठा स्फोट ही झाला आणी त्यातून ५०० मीटर उंचीपर्यन्त गरम राखेचा फवारा उसळला.
मला २० डिसेंबर ला मेरापि ला जायचे होते,. माझी भेट घडेस्तोवर तरी शांत राहा रे बाबा अशी त्याला मी
मनातल्यामनात रिक्वेस्ट करत होते. कुठे त्याच्या पोटात गडगडायला लागले तर त्याच्या पासून २० किमी पर्यन्त च्या परिसरात जायला बंदी घातली जाते.

मेरापी पासून उतारावर केवळ ८ किमी अंतरावर असलेल्या सेलो खेड्यात येऊन पोचले. सकाळी सकाळी गेल्याने मेरापि चे दर्शन छान घडले. थोड्याश्या ढगांची टोपी घातलेला ,किती बिचारा शांत दिसत होता. तरीसुद्धा त्याच्या २०१० मधल्या प्रतापाची चिन्हे ठिकठिकाणी विखुरलेली दिसत होती .

गावावर वरचेवर ज्वालामुखीतून फेकल्या जाणार्‍या वोल्केनिक राखेचा थर

रोज दुपारी इथे ढगाळ वातावरण होते, आणी मेरापि चे मुख ढगांच्या आवरणाखाली गडप होते.

मेरापि च्या कुशीत राहणारे लोकं नेहमीची कामं शांतपणे करत होते. त्यांच्या चेहर्‍यावर रिलॅक्स्ड स्मित होतं,कोणीच येणार्‍या संकटा च्या ओझ्याखाली दबलेले दिसत नव्हते. उतारावरच्या खोपटीवजा दुकानातून लोकल भाज्या,फळं,, बिस्किटं,चॉकोलेट्स्,चिप्स,टोप्या,हॅट्स्,स्कार्फ, टीशर्ट्स असं काहीबाही विकत होते.तिथेच टूरिस्ट्सना लावा टूर वर घेऊन जायला ७,८ हेवी ड्यूटी ,ओपन जीप्स रांगेने उभ्या होत्या.

जीप्स मधे बसून खडबडीत लाव्यावरून , ३,४ तासात मेरापि जवळ जाता येते. ८,१० किमी अंतरावर मेरापि चे मुख दिसू शकते. हा प्रवास अत्यंत जिकिरीचा आहे. तळपत्या सूर्याच्या प्रखर प्रकाशात डोकं भाजून घ्याची , हाडं खिळखिळी करून घ्यायची तयारी असावी लागते. वरती पोचल्या वर लाव्या ची धार दिसते. आसपास ची जमीन इतकी गरम असते कि तीत अंड पुरल्यास साताठ मिनिटात ते पूर्णपणे उकडून निघते.

पण मेरापि च्या पोटात चाललेल्या रीसेंट अ‍ॅक्टीविटीज लक्षात घेता आज जीप टूर्स ना बंदी होती.

इतर , जवळच्या साईट्स पाहण्याकरता ,'ओजेक' (मोपेड-((एक लाख रुपिया (८$) ताशी ) भाड्यावर घेता येतात. माझ्या गाईड च्या मागे बसून मेरापि च्या जितक्या जवळ शक्य होते तितक्या चढाईवर जाऊन , लाव्याने नष्ट केलेल्या साईट्स पाहिल्या.

तीन वर्षापूर्वी गरम लाव्या मुळे वितळलेल्या वस्तू पाहून सुद्धा थरकाप उडाला..

मेरापि चे दर्शन घेऊन, परतीच्या वाटेवर ,' बोरोबुदूर' हे जगातले सर्वात मोठे बुद्धिस्ट टेंपल पाहिले.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फोटोज आणि वर्णन दोन्ही आवडले. तू पण छान दिसतेयस Happy
ज्वालामुखीचे फोटो बघून काटा आला अंगावर! त्याला शरण जाणा-या त्या सरपंच आणि गावक-यांना सलाम!
'खादाडी'चे फोटो भराभर पुढे सरकवले Uhoh

मस्तच वर्णन आणि फोटो वर्षू..
तू छान दिसतीएस...
ते पदार्थ बघुन मलापन खुप भुक लागली...
तो तू बघितलेला लावा कॅमेरात पकडता नाही आला का?
आणि लिहित जा गं अधे मधे..तेवढाच माबोवर विरंगुळा होतो..नाहीतर आजकाल माबो डोकेदुखी जास्त झाली आहे..

>>>> प्रम्बानान देवळांचा समूह. इंडोनेशियामधे कोणत्याही मंदिरांना भेट देण्यापूर्वी , सर्वांना कमरेला ,'सारोंग' हे बाटिक वस्त्र गुंडाळण्याचा सरकारी हुकुमच आहे. <<<<
तिकडे कुणी "संस्कृतीरक्षकांच्या" नावाने बोम्बामारत उठले नाही वाट्ट? Wink

>>>> ही बहुतेक विष्णु ची मूर्ती होती <<<<
मुर्तिपुढिल पायापासच्या घोडा सद्रुष ७ रचना पहाता, ही उभ्या सूर्यदेवाची (एकमेव) मुर्ति देखिल असु शकेल.

>>>> योग्यकार्ता शहर <<<<
लगेचच्याच फोटोतील झेब्राक्रॉसिंगच्या अलिकडेच उभे राहिलेले बाईकस्वार बघुन गहिवरुन आले हो.... ! ते बघितले, अन लग्गेच भारतातिल सर्वांचीच फक्त बेशिस्तच आठवली.

बाकी वर्णन छानच. फोटोसहित इथे दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. Happy
(नशिबवान आहात, केल्याने देशाटन होते आहे..... अन ते इथे सांगत/दाखवतही आहात. Happy
जळ्ळं मेलं आमच नशिब घर ते ऑफिस अन ऑफिस ते घर यातच अडकुन बसलयं... Proud )

Pages