अन्या - १२

Submitted by बेफ़िकीर on 3 February, 2014 - 02:25

महिला हवालदार सुलक्षणा बराटेची पाच बोटे खाडकन रतनच्या गालावर उमटली आणि हेलपाटून रतन खुर्चीतून खाली पडली. डोके भिंतीवर आपटले. झिणझिण्या आल्या. अंधेरी आली. बराटेच्या उजव्या पावलातील बूट खाली अस्ताव्यस्त पडलेल्या रतनच्या उजव्या मनगटावर दाबला गेला. वळवळणार्‍या रतनच्या तोंडातून वेदनांमुळे विचित्र आवाज आले. आधीच काल सायंकाळी मशालकरने बाथरूममध्ये तिला ढकलल्यानंतर तिचे एक मनगट, एक कोपर आणि कंबर दुखावलेली होतीच. त्यात गेले पाऊण तास बराटे तिला छळत होती. त्यातल्या त्यात बरे एकच होते ते म्हणजे आता मशालकर तिच्यावर अत्याचार करायला जिवंत राहिलेला नव्हता. बराटेला प्रकार समजूच शकत नव्हता. जी तुळई खाली पडली ती आकड्यातून काढण्याचे काम एकट्या रतनच्याने होईल हे तिला स्वतःलाच अशक्य वाटत होते. त्यात पुन्हा मशालकरची सख्खी मुलगी तिथेच पाच फुटांवर असताना रतन हे कृत्य करू धजावेल हेही तिला पटत नव्हते. पण तुळई तर पडलेली होती. बरं इतकी जड तुळई इतक्या जाड आकड्याने अडकवलेली असताना आणि गेले कित्येक वर्षे जागचीही हाललेली नसताना नेमकी रतन तेथे राहायला आल्याच्या सहाव्या रात्रीच कशी काय पडली होती? आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मशालकर जेव्हा झोपाळ्यावर होता तेव्हाच कशी काय पडली होती? हे ठरवून केलेलेच कृत्य आहे असा कौल मन देत असले तरीही रतन एकटी ते करेल हे अशक्य वाटत होते आणि सुकन्या तिला मदत करेल हे त्याहून अशक्य! बरं रतन आणि अवलिया बाबा गावात आल्यापासूनच्या वेळची चौकशी केली तर प्रत्येक गावकरी स्वतःच्या गळ्यावर दोन बोटे ठेवून शपथेवर सांगत होता की मशालकर आणि त्यांचे कुटुंबीय ह्या दोघांसमोर नतमस्तक होते, ह्यांना देव समजत होते.

गुन्हा होण्याचा मोटिव्हच समजत नव्हता आणि एवढे करून जे झाले ते गुन्हा की अपघात हेही समजत नव्हते. रतनला जास्त वेळ चौकशीच्या नावाखाली अडकवून तिचा छळ करणे अशक्य होते. चौकीबाहेर गर्दी वाढतच होती. जय गोरखनाथ आणि जय रतनदेवी असा जयघोष सुरू झाला होता. मूर्ख लोक या मुलीला देवीचा अवतार समजत आहेत हे पाहून बराटे अधिकच संतापलेली होती. एकीकडे सुकन्या खणखणीतपणे सांगत होती की आवाज झाल्यावर ती दचकून उठली आणि तिच्याचसमोर रतनही दचकून उठली. काही झाले तरी मशालकरच्या मुलीवर तरी विश्वास ठेवणे भाग होते.

गुन्हा करण्याचे कारण माहीत न होणे, रतनने मार खाऊनही तोंड न उघडणे, सुकन्याने रतनची बाजू घेणे, वीर गावचे गावकरी चौकीबाहेर जमून दबाव वाढवणे ह्या सर्वाचा परिणाम होऊन बराटे कामतसाहेबांकडे येऊन म्हणाली...

"अ‍ॅक्शिडेन है!"

बराटेच्या तोंडातून निघालेल्या या दोन शब्दांचा अर्थ वेगळा होता आणि ज्या टोनमध्ये ती ते शब्द बोलली होती त्या टोनचा अर्थ वेगळा! टोनचा अर्थ होता की 'खरे काय असेल ते असो, आत्ता अ‍ॅक्सिडेन्ट म्हणून फाईल होणेच आवश्यक आहे'. चाणाक्ष कामतला हे समजायला अर्धा सेकंद पुरे होता.

गावकर्‍यांच्या प्रचंड दबावामुळे गंभीर झालेला कामत बराटेकडे रोखून बघत आणि नंतर काही क्षण टेबलकडे रोखून बघत निर्धाराने म्हणाला......

"शेवटचा चान्स घ्या. ती यडी है ना? तिची चौकशी करा आन् मग बघू"

आणि एरवी तोंडातून चमत्कारीक आवाज काढणार्‍या, सरकत सरकत चालणार्‍या, ओंगळवाण्या, भयावह दिसणार्‍या वेडीने, म्हणजे सुकन्याच्या थोरल्या सावत्र बहिणीने चौकीवर आणले गेल्यावर नि:संदिग्ध शब्दात जवाब देऊन एक आणि एक माणसाला अवाक केले.

"आबांनी पैली प्वारगी झाली म्हनून मी ल्हान आस्ताना माह्या डोक्यात कांबी घातल्याली व्हती. तवापासून मी अशी झाल्ये. तिन्मुर्ती दत्तानं त्या पापाची शिक्षा दिल्याली हाय आबांन्ला"

सरकत सरकत वेडी चौकीच्या दारातून बाहेर निघाली तेव्हा कामत बराटेला 'वीर गावाचे प्रमुख मशालकर ह्यांचा राहत्या घरी अपघाती मृत्यू' अशी नोंद करायची सूचना देत होता.

चार वर्षापूर्वी ज्याला चोरीचे किंवा कोणीतरी फेकून दिलेले अन्न खायला मिळाले नाही तर उपासमार सहन करावी लागत होती, त्या अन्याला, म्हणजेच अवलिया बाबाला आता अख्खे वीर गाव लोटांगण घालत होते. कोडगेपणा, निर्लज्जपणा, बनवाबनवी करण्याची चलाखी आणि नशीब ह्या चार खांबांवर उभारलेला हा बुवाबाजीचा डोलारा आज अचानक इतका मजबूत झाला होता की अख्खा मशालकरच्या खुनासारखा एक भयंकर प्रकार सरकार दरबारी अपघात म्हणून नोंदवला गेला होता. वीर गाव आता खासगीत नव्हे तर सुस्पष्टपणे म्हणत होते की मशालकरचाच बळी दत्ताला हवा होता आणि ते योग्यच होते. मशालकर नष्ट झाल्यामुळे कित्येकांनी सुटकेचा नि:श्वास टाकलेला होता. तालुक्याच्या गावाहून तावडे पाटील आणि कुटुंबीय त्यांच्या ह्या पारंपारीक प्रतिस्पर्ध्याला शेवटची सलामी द्यायला वीर गावात आले होते. पंचक्रोशीतून माणसांचा ओघ सुरू झाला होता. जो ओघ सुरू व्हावा हे मशालकरचे स्वप्न होते तो ओघ त्याच्या मृत्यूमुळे सुरू झाला होता. ही सर्व माणसे मशालकरच्या प्रेताला किंवा फोटोला नमस्कार करून जातानाच मनात बसलेल्या दहशतीमुळे तिन्मुर्ती दत्ताच्या अवतारासमोर वाकून जायला विसरत नव्हती. एवढंस तर पोरगं आहे हे असे कोणाच्या मनातही येत नव्हते. जे झाले ते अद्भुत होते. जवळपास अशक्यप्राय होते. मशालकर एकाचवेळी स्वार्थी पुढारी, खमका नेता, रंगढंग करणारा पाटील, अव्वल शिकारी आणि अनेकांचा आश्रयदाता म्हणून ख्यात होता. नाही नाही ती मंडळी वीर गावात येऊ लागली होती. पण आज चमत्कार म्हणजे मशालकरच्या निर्जीव देहापेक्षा किंवा फोटोपेक्षा साडे पाच फुटी किरकोळ देहाच्या अवलिया बाबांचे महत्व अधिक होते. मशालकरच्या दोन्ही बायका आणि दोन धाकट्या मुली ओक्साबोक्शी रडत होत्या. सुकन्या सर्वांना सावरत होती, सांत्वन करत होती, पण तिच्या डोळ्यात मात्र टिपूस नव्हते. आणि ती वेडी? ती वेडी तिच्य स्वतःच्या खोलीत शांतपणे बसलेली होती. तिच्या मनासारखे झाले होते. वाड्यावरील एकमेव जबरदस्त पुरुष माणूस मेलेले होते. आता येथे इस्टेटीवरून वाद होणार हे नक्की दिसू लागलेले होते. आजवर ज्या दोन बायका सख्या बहिणीप्रमाणे राहात होत्या त्यांच्यात आता काय होईल ते सांगता येत नव्हते.

निवासामध्ये रीघ लागली होती. नरसूला वेड लागायची वेळ आली होती. त्याने स्वतंत्र सहा माणसे हाताशी धरून निवासाचे व्यवस्थापन सुरू केले होते. ह्याचे कारण म्हणजे माणसेच तितकी येत होती तेथे! अवलिया बाबांसमोर प्रत्येकजण काही ना काही ठेवून जात होते. माया साचतच होती. बाबांच्या शेजारी बसलेल्या रतनचे सुजलेले गाल पाहून लोकांच्या मनात पोलिसांबद्दल अढी बसू लागली होती.

जे घडले होते, घडत आहे, त्यावर अन्याचा विश्वासच बसू शकत नव्हता. आपण इतके नशीबवान कसे हेच त्याला कळत नव्हते. परस्परं तेरंभारे मशालकर मारला गेला होता. त्याच्या खुनात अन्याचे नांवही गोवले गेलेले नव्हते. खून परस्पर रतननेच केला होता. त्यात पुन्हा ती स्वतःही सुटली होती. आणि एवढे सगळ एकरून पुन्हा गाव आपल्यालाच ओवाळत आहे हे त्याच्या मनात न मावणारे सुख होते. त्यामुळे समुद्रातील लाटा झेलणार्‍या एखाद्या डुंबणार्‍या माणसाप्रमाणे तो फक्त बसून आदर, नमस्कार आणि जयघोषाच्या असीम लाटा झेलत होता. अवाक्षर काढत नव्हता तोंडातून. समोर जमत असलेला मायेचा ढीग पाहून डोळे फिरू लागले होते. त्यातले कोणी काही रुपये चोरले तरी कळले नसते अशी वेळ आलेली होती.

आणि रतन? अंगातले बळ गेल्यासारखी रतन शेजारी बसलेली होती. खरंच बळ गेलेलेच होते. काल रात्री बाथरूममध्ये मशालकरने दिलेली अब्रूची धमकी, त्यानंतर त्या लोखंडी बादलीवर ती पडणे, मुका मार लागणे, त्या वेडीच्या भयावह खाणाखुणा, तुळई उचलता न येणे, सर्वात शहारवणारी बाब म्हणजे ऐनवेळी सुकन्यानेच सहाय्य करणे, त्या क्षणापासून निर्माण झालेला प्रचंड तणाव, पोलिस चौकशी, बराटेने केलेला छळ आणि आता अचानक लोकप्रियतेच्या शिखरावर पोचणे! कितीही झाले तरी हे सगळे सहजपणे झेलणे, स्वीकारणे, पचवणे हे तिच्या मनःशक्तीच्या क्षमतेतच नव्हते. आत्ता ह्या क्षणी तिला जर कोणी नुसते म्हणाले असते की रड, तर ती ढसाढसा रडली असती.

सुकन्याने ऐनवेळी असे का केले हेच रतनच्या आकलनाबाहेरचे होते. अजूनही जर सुकन्याने तोंड उघडले तर आपली खैर नाही हे रतन जाणून होती. त्यामुळे इतक्या गर्दीतही रतनचे कान लागले होते ते गावकर्‍यांच्या कुजबुजीकडेच! कोणाच्याही बोलण्यात सुकन्यताईंचे नांव आले की तिच्या पाठीच्या कण्यातून एक भीतीची लहर वरखाली होत होती. तिच्या वयात इतकी समज असणे अवघड होते की आता निव्वळ वीर गावाचाच इतका प्रचंड दबाव शासकीय यंत्रणेवर आहे की यंत्रणा आपल्याविरुद्ध काम करणारच नाहीत.

एक मशालकर गेला तर फार काही बिघडत नाही असा विचार करणे शासनाला शक्य होते. सुकन्या आणि तिची मोठी वेडी सावत्र बहिण ह्या दोघी तर मशालकरच्या जीवावरच उठलेल्या होत्या. मशालकरच्या बायकांचे स्वारस्य इस्टेटीत होते, मशालकर जिवंत असणे व नसणे ह्यापैकी 'नसणे' हे त्यांना इस्टेटीच्या अधिक जवळ नेणारे होते हे त्या जाणून होत्या. गावकर्‍यांना एक सच्चा, निष्पाप, उद्दाम नसलेला, स्वार्थी नसलेला, गावकर्‍यांचे व गावाचे हित जपणारा असा तिन्मुर्ती दत्ताचा अवतार नेता म्हणून मिळालेला होता हे त्यांच्यासाठी अधिक सुखद होते. बाहेरगावाहून येणार्‍यांना मशालकरचा खून करण्याचे कोणाला काही कारण असेल हेच वाटत नव्हते.

एकुणात काय, तर जाणार्‍या प्रत्येक क्षणाबरोबर मशालकर नावाचे एक अजस्त्र व्यक्तीमत्व विस्मृतीत ढकलले जात होते, ढकलण्याची जणू कित्येकांना घाईच होती.

तसेही, मशालकरच्याच रुपाने गावातील पापही संपले हेही गावाला आता चांगले वाटत होते.

अन्या आणि रतनला अजुनही अंदाज आलेला नव्हता की ह्या झालेल्या प्रकाराचा त्या दोघांना नेमका किती फायदा होणार आहे. आरामात बसून खाता यावे आणि तरीही लोकांनी येताजाता रामराम करावा इतके थिल्लर स्वप्न बघणार्‍या अन्याला आता त्याच्या नशीबाने अश्या ठिकाणी आणून ठेवले होते की आता कर्तव्य पालन करावे लागणार होते. आचरण निदन वरकरणी तरी शुद्ध ठेवणे, देवभक्ती, लोकांना सन्मार्ग दाखवणे, सत्तेची मांड घट्ट करणे, त्यातून माया जमवणे, कोणीही आपल्याला स्थानावरून ढळवू शकणार नाही अश्या ठिकाणी जाऊन पोहोचणे! आता जबाबदारी येणार होती. सत्तेच्या स्थानाकडे विनाजबाबदारी झेपावता येतच नाही.

करायला गेलो एक सारखी अवस्था झालेली होती. आता काहीही आवरणे, नियंत्रीत करणे शक्य नव्हते. रिव्हर्सल शक्य नव्हती. आता येथेच थांबणे किंवा पुढे जाणे शक्य होते. आणि जोवर रतनसारखी महामहत्वाकांक्षी साथीदार सोबत होती तोवर एका जागी थांबण्याचा विचारही करता येणार नव्हता.

एक विचित्र, मानवी श्रद्धांच्या लहरींनी बनलेलं चक्रीवादळ घोंघावत आपलं स्थान बदलत होतं! मशालकरच्या वाड्याकडून त्या लहरींचं ते चक्रीवादळ फिरत फिरत 'निवास' ह्या अन्याच्या निवासाकडे आलेलं होतं! गावातील सत्ताकेंद्र बदलत होतं. अननुभवी अन्या हे वैचारीकदृष्ट्या पचवू शकत नव्हता. पचवू तर रतनही शकत नव्हती, पण रतनची मूळ प्रवृत्ती ह्याहीपेक्षा घनघोर स्वप्ने सत्यात आणण्याची होती.

दैवाने ह्या दोन जिवांना एक विचित्र शिकवण दिली होती. जगातील अब्जावधी माणसांना दैव शिकवण देते ती ही, की पाहिलेली बहुतेक स्वप्ने सत्यात उतरणार नाहीत असेच धरून चाला. म्हणजे अपेक्षाभंगाचे दु:ख होणार नाही. प्रयत्न करत राहा, पण अपेक्षा ठेवू नका. स्वप्ने पाहा, पण ती सत्यात आणण्यासाठी योग्य प्रयत्न करा, अयोग्य नव्हेत.

ह्या दोघांना दैवाने शिकवण दिली होती ती ही, की पाहाल ते स्वप्न खरे होत गेले तर कसे जगावे लागते ते शिका!

'सुकन्या' हे एक गूढ उकलत नव्हते, तेवढे सोडले तर मशालकरच्या मृत्यूला पंधरवडा लोटल्यानंतरही माणसांचा ओघ कमी होत नव्हता. निवासामागे गेल्या आठ दिवसांत एक वेगळी लहान खोली बांधून तिच्यात एक भलीमोठी अलमारी हळूच आणून ठेवण्यात आली होती रात्रीची! साठलेली सगळी माया त्या अलमारीत जाऊन बसू लागली होती. रतनदेवी आता मशालकर त्यांना जेथे ठेवू इच्छीत होता त्या मशाकरच्या बागेमधील घरात राहात होत्या. त्यांच्यासाठी मजबूत सुरक्षाव्यवस्था होती. रतन आणि अन्याने अजुन काही दिवस एकत्र न राहण्याचा अतिशय सूज्ञ निर्णय घेतलेला होता.

एकुण प्रकाराचे वाढते दडपण लक्षात घेऊन अन्याने आता वर्तनात सुधारणा केली होती. उगाच मांसमच्छीची अपेक्षा तो आता ठेवत नव्हता. दारू वगैरे तर लांबच! बिड्या तेवढा ओढायचा. तेलकट, स्वस्त, असात्विक पदार्थ आता तो लांब ठेवत होता. दिवसातून तीनतीनदा आंघोळ करत होता. व्यायाम आणि नियमीत भरपेट सात्विक भोजनाचा परिणाम त्याच्या शरीरावर दिसू लागला होता. रतनचा विरह एक सहन होत नव्हता, पण सवय होऊ शकत होती. मुळात मिळणारा मानसन्मानच इतका होता, नुसते नजरेच्या इशार्‍यावरच इतके काही काही घडत होते की असल्या 'किरकोळ' बाबी आता ध्यानातही राहात नव्हत्या.

दोन महिन्यांनी कधीतरी मशालकरची जयंती आली तेव्हा त्याच्या अर्धपुतळ्याचे अनावरण अन्याच्या हस्ते झाले. जगाचा अजब कारभार अन्या बघत होता. भाषण देणे तर दूरच, चार साधी सरळ वाक्ये बोलणेही अन्याला जमायचे नाही. तोंड उघडले की लाळ तरी गळायची नाहीतर शिव्या तरी! रतनलाही सभाधीटपणा नव्हताच. मग नुसतेच जपजाप्य झाले. भलत्यांनीच भाषणे ठोकली.

आणि एक दिवस असाच नरसू अन्याच्या ताब्यात आला. भोळ्या नरसूला अन्याने पैशाचे आमीष दाखवले, पैशाची सवय लावली. हे सगळे त्याने रतनच्याच सांगण्यावरून केले. अन्याला एक हक्काचा विश्वासू साथीदार मिळाला. नरसूला अस्मान ठेंगणे झाले.

तिकडे मशालकरच्या वाड्यावर धुसफूस होऊ लागली. दोन्ही बायका एक दिवस एकमेकींच्या झिंज्या उपटण्याच्या पातळीला गेल्या तेव्हा अवलिया बाबांच्या आज्ञेने गप्प झाल्या. त्यांच्यात न्यायनिवाडा करायची जबाबदारी बाबांवर येऊन पडली. आणि अश्या रीतीने, पुन्हा एकदा सुकन्याचे अन्या आणि रतनच्या आयुष्यात आगमन झाले.

======================

सुकन्याच्या अंगात मशालकराचे रक्त होते, मशालकराची रग होती आणि मशालकराचीच वृत्ती होती. फक्त तिला स्वतःचा बाप नजरेसमोर नकोसा होता. कारण मशालकर स्वार्थी होता. पराकोटीचा स्वार्थी! ह्या स्वार्थापायी तो कधी कोणाला काय करेल ह्याचा नेम उरलेला नव्हता. सुकन्याची आई त्याची धाकटी बायको! दोन बायकांमधील वादात मशालकर उघडपणे पहिल्या बायकोची बाजू घ्यायचा. रात्री मात्र दुसर्‍या बायकोकडे जायचा. सुकन्याला हे दुटप्पी वागणे अजिबात सहन होत नव्हते. तिला वाड्यावर आणि पर्यायाने गावावर स्वतःची सत्ता हवी होती. ही सत्ता मिळवण्याच्या कामी अन्या आणि रतनने तिला मदत करावी असा प्रस्ताव तिने मांडला होता. तिने तोंड उघडले तर पुन्हा आपली फाईल उघडली जाईल ह्याची भीती मनात बसलेली रतन तत्क्षणी ह्या प्रस्तावाला मान्यता देऊन मोकळी झाली होती. ह्या सगळ्या राजकारणात केंद्रस्थानी असलेल्या पण अननुभवी असलेल्या अन्यालाही आता आता जरा अंदाज येऊ लागले होते. कोण कधी जड जाईल आणि कोणाचा वेळीच खातमा करणे आवश्यक आहे हे त्याला थोडेफार समजू लागले होते. पण रतनने थेट प्रस्ताव मान्य केल्यामुळे त्याला तिचा थेट विरोध करणे प्रशस्त वाटले नाही.

एके रात्री ही बैठक झाली होती. सुकन्याने मोठ्या चतुराईने घरातील राजकारण, मशालकरचा हिंस्त्र स्वभाव व तिची स्वतःची ध्येये ह्या दोघांच्या गळी उतरवली होती. गावातील सत्तेचे समीकरण बदलण्यास आपण आज हातभार लावला तर उद्या आपल्यालाच कोणी जुमानणार नाही अशी सार्थ भीती अन्याला वाटत होती. पण रतनला तिच्या स्वतःच्याच पोलिस केसची भीती वाटत असल्याने ती होकार देऊन बसलेली होती. त्यामुळे तूर्त प्रस्ताव स्वीकारून हळूहळू सुकन्याला लोकांच्या नजरेत अयोग्य ठरवू असा बेत आखून अन्या पुन्हा नेहमीप्रमाणे जपजाप्य करू लागला होता.

सुकन्याच्याच सुचवणीवरून अन्याने काही छुप्या शिकवण्या लावल्या. भाषा सुधारणे, मराठीऐवजी हिंदी बोलणे, नवनवे सुविचार व त्यांचा चपखल वापर करण्यास शिकणे, हजरजबाबीपणा, थोडक्यात एक पोचलेल बुवा होणे ह्यासाठी लाहिरी नावाचे एक बिलासपूरचे गृहस्थ 'आयात' करण्यात आले. हे लाहिरी बिलासपूरला अध्यात्मिक वर्तुळात नावाजलेले होते. ह्यांच्यावरही अनेक केसेस होत्या. पण त्यांचे वाक्चातुर्य वादातीत होते. हे लाहिरी येथे का आलेले आहेत हे गावकर्‍यांना ठाऊक नव्हते. सर्वांसमोर हे लाहिरी अन्याचे सर्वोत्कृष्ट साथीदार असल्याचे भासवत. मात्र एकांतात हे लाहिरी अन्याच्या शिकवण्या घेत. पाठांतर करून घेत. त्याला हिंदीच बोलायचा आग्रह करत. भाषा वेगळी असली की सामान्य माणसाच्या मनावर उगाचच अधिक प्रभाव पडतो हे त्यांना ज्ञात होते. सुकन्याने मोठा घाट घातला होता. मशालकरप्रमाणेच ह्या दोघांचे महत्व सतत वाढवत राहणे व त्या माध्यमातून स्वतःची सत्ता विस्तारणे! पण मशालकर आणि तिच्यात एक मोठा फरक होता. मशालकर ह्या दोघांना एकांतात छळत होता, सुकन्या त्यांना एकांतातही योग्य तो सन्मानच देत होती, माणसासारखे वागवत होती. त्यामुळे हळूहळू दोघांनाही तिचा आधार वाटू लागला आणि तिला ह्या दोघांचा!

लाहिरींनी अन्यामध्ये आमूलाग्र बदल करण्याची जणू शपथच घेतली. अन्याची दिनचर्या बदलली. अफाट व्यायाम, दणदणीत खाणे, ह्याच बरोबर सतत धार्मिक वचनांचा, सुविचारांचा मारा, भक्तीची ओढ लावणे असे अनेक प्रकार लाहिरींमुळे सुरू झाले. हळूहळू अन्याच्या व्यक्तिमत्वातही बदल घडू लागले. वेडाविद्रा दिसणारा अन्या आता अचानक जबाबदार, ज्ञानी व आधारदायी वाटू लागला. त्याचे तोंड उघडले की आता सुविचार ऐकू येऊ लागले. भाषा, भाषाशैली, सगळेच बदलू लागले. हा आपल्यापेक्षा कोणी वेगळा आहे हे गावाला मान्य होऊ लागले. आधी असलेल्या नुसत्याच श्रद्धेमध्ये आता एक प्रकारचे भीतीयुक्त कुतुहल मिसळले गेले. आधी जेमतेम मिसरूड फुटलेल्या अन्याचा चेहरा आता दाढीने झाकला जाऊ लागला. आहारामुळे आणि व्यायामामुळे डोळे तेजस्वी होऊ लागले. काही वेळा तर तो लाहिरींपेक्षाही भेदक दिसू लागला. लाहिरींनी अन्याला एक मोठीच शिकवण दिली. ती म्हणजे काहीच न करता बसलास तर भक्तांमध्ये उदासीनता पसरते. सतत काहीतरी घडवत राहिले पाहिजे. मग ते काहीही असो!

परिणामतः अन्याच्या अजब मेंदूतून निघालेल्या शक्कली गावात उत्साह पसरवू लागल्या. पुन्हा एकदा स्वच्छता अभियान, शिक्षण, संस्कार वर्ग, ज्येष्ठ नागरिकांसाठी उपक्रम, महिलांना शिक्षण, दारूबंदी असे प्रकार होऊ लागले. गवगवा होऊ लागला. हे गाव धार्मिक गाव असून येथे गैरप्रकार केल्यास अद्दल घडते हा संदेश दूरवर पोचू लागला.

रतनदेवींनीही लाहिरींच्या उपस्थितीतून लाभ मिळवावा ह्या सुकन्याच्या कल्पनेला त्याचमुळे अन्याने मान्यता दिली. रतनदेवीची भाषाही गावरानच होती. तिच्यावर लाहिरी संस्कार करू लागले. ती अधिकाधिक तेजस्वी, प्रभावी दिसावी म्हणून प्रयत्न करू लागले. अंगात येण्याच्या विविध प्रकारांची त्यांनी तिच्याकडून उजळणी करून घेतली. कोणत्या प्रकारच्या भक्तांना काय आशीर्वाद द्यावा ते शिकवून झाले. भक्तांमध्ये चार दोन माणसे आधीच पेरून त्यांची माहिती काढून सर्वांसमोर अश्या भक्तांना अचानक उपाय सुचवून जमावाला अवाक करण्याचे कसब निर्माण केले.

दोन वर्षे! दोन वर्षात प्रचंड बदल झाले. शासन दरबार आणि गाव मशालकराला विसरले. अन्याच्या मुखातून तेजस्वी वाणी पाझरू लागली. अन्याची भाषा अजब दर्जेदार झाली. रतनचा आवाज खणखणीत आणि भाषा मधुर झाली. अन्याचा अवतार पाहताक्षणीच हात जोडावेसे वाटावेत असा झाला. दोघांची कांती झळाळू लागली. भक्तांचा ओघ कायम राहिला. सुकन्या वाड्याची प्रमुख झाली. मशालकरच्या इस्टेटीची चाळीस, चाळीस व वीस असे भाग पडले. वीस टक्के भाग 'निवास'च्या सहाय्यतेसाठी अन्याकडे सुपूर्द करण्यात आला. मशालकरच्या मोठ्या बायकोला चाळीस टक्क्यांवर समाधान मानून धाकट्या मुलीचे लांबवर लग्न करावे लागले. तिची रवानगी वेड्या मुलीच्याच खोलीत झाली व ती वेडीसोबत राहू लागली. धाकटी बायको बाकी वाड्यावर अधिराज्य गाजवू लागली. तिकडे तालुक्याच्या गावी तावडे पाटील निवडणुकीत हारला. गावातून अवलिया बाबांना घालवण्यास कारणीभूत ठरण्याचे त्याचे पाप त्याला निवडणुकीत धडा शिकवून गेले. स्वतःचीच आठ दहा माणसे पेरून अन्या आणि रतन आता गावाला सातत्याने चमत्कार दाखवत राहू लागले. लहिरी महाशयांचे महत्व अतिशय वाढले. त्यांच्याशिवाय दोघांचे पान हालेना!

आणि एक दिवस नरसूने नको ती बातमी आणली.

रतनदेवी आणि लाहिरी महाशयांना त्याने नको त्या अवस्थेत पाहिले. काय करावे हे न सुचल्यामुळे त्याने हिय्या करून शेवटी हे अन्याच्या कानावर घातलेच.

अन्याचे सगळे विश्वच उलटेपालटे झाले. केवळ महाराज होण्याच्या जबाबदारीमुळे लांब राहावे लागत असल्याने तडफडत असलेला अन्या केव्हाच रतनवर प्रेम करू लागला होता. त्याच्या मनात रतनशिवाय कोणीही येऊ शकत नव्हते. आणि रतन उलट्या काळजाची होती. तिला कशाचेच जणू सोयरसुतक नव्हते. आपण अन्यासाठी जिवावर उदार होऊन मशालकरला खलास केले आहे म्हंटल्यावर अन्या आता आयुष्यात आपल्याला काहीही विरोध करणार नाही असे तिचे गृहीतक होते. पण त्याला तडा गेला. अन्याने पुढचा मागचा विचार न करता दोघांना निवासावर बोलावणे धाडले. मोठ्या सन्मानाने दोघे तासाभरात निवासावर आले. एकांत हवा आहे असे सांगून अन्या दोघांना आतल्या खोलीत घेऊन गेला. आत त्याने आधीच ठेवलेल्या फोकाचे फटके ह्या दोघांना हाणायला सुरुवात केली. आपला ओरडण्याचा आवाज बाहेर गेला तर आपली खैर नाही हे लाहिरी आणि रतन दोघांनाही चांगले ठाऊक असल्याने दोघे मूकपणाने मार सहन करत राहिले.

अठरा वर्षाचा तरणाबांड आणि ताकदवान अन्या बेभान होऊन दोघांना बडवत राहिला. शेवटी तो स्वतःच दमला तसे त्याने लाहिरीची गचांडी धरली आणि आजवर त्याच्याकडूनच शिकलेले सुविचार त्याला ऐकवून्ब दाखवले आणि मूळची भाषा उफाळून आल्यासारखा म्हणाला......

"भाडखाव, तुझाबी मशालकर क्येला आस्तान्, पर लय काय काय शिकिवलंयस तवा जित्ता सोडतूय. पुन्न्हा थोबाड दावायचं न्हाई. काय समजलायस?"

अंगभर मार खाल्लेला लाहिरी पडलेल्या चेहर्‍याने अंधारातच गावाबाहेर पळून गेला. चेहरा पडलेला असला तरी त्याचे डोळ्यात खुनशी भाव एकवटलेले होते हे कोणालाच दिसले नव्हते.

अवलिया बाबांच्या अफाट प्रगतीच्या आलेखात अधेमधे काही काळ्या खुणा होत्या...... ते होते त्यांचे शत्रू!

ह्या शत्रूंची संख्या वाढतच चालली होती......

तावडे पाटील...इग्या...पवार...मशालकर...लाहिरी...

......आणि रतनदेवी!!!

=================

-'बेफिकीर'!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त...

काय म्हणाव या प्रकाराला समजत नाही जितके वेळा पुढचा अंदाज लागला अस वाटतय की लगेच भलतच काही घड्ते
साष्टांग दंड्वत बेफी तुम्हाला
तुमच्या सारखा पाताळयंत्री विचार करणारे तुम्हीच

तुमच्या सारखा पाताळयंत्री विचार करणारे तुम्हीच>>>>>>>>>> चुकुन मी विचार वाचलेच नाही ना.... Lol
एकदम झकास.