युद्धपातळी

Submitted by aschig on 24 June, 2009 - 03:41

लमाल: २० जुन २००९; विषय: युद्ध;
आशिष महाबळ
युद्धपातळी

फु चा पहिला जन्म झाला तेंव्हा तो आपला पहिला जन्म आहे याची त्याला मुळीच कल्पना नव्हती. असणार तरी कशी म्हणा? अजुन कल्पनेचाच जन्म व्हायचा होता. आले अनेक अणु एकत्र, एकमेकांच्या सानिध्यात राहिले, पसरले, दुसऱ्यांनी त्यांची जागा घेतली. फु ला अज्ञात अशा बळांनी त्यांना खेळवले. फु नी नकळत, नवळत ज्याला कुणी आयुष्य म्हणेल ते कंठले व नकळतच उर्वरीत विश्वात सम्मिलीत झाला.

सर्व जीवांचे बीज एकसमान असते, पण काही जीव वेगळे जगवले जातात.

फुचा हा कितवा जन्म होता कुणास ठाऊक. त्याला तर खचितच नाही. आपल्यासारखे अनेक आजुबाजुला आहेत हे त्याला जाणवले होते. स्वत:सारखे नसलेले पण अनेक होते. आपण कोण आहोत हा विचार देखिल त्याच्या मनाला शिवला नाही. अजुन त्याला विचार करता कुठे येत होता? त्याच्या नायट्रोजन अणुंवर जे पडायचे ते पडायचे.

एका कोणत्यातरी हायड्रोजन अणु मधुन निघालेल्या प्रकाशकणाच्या आपल्या लहररुपी अवतारात एकावर अनेक पुज्य इतक्या खालीवर उड्या मारुन झाल्या आणि फु पुन्हा एकत्र आला. जरा जास्त गर्दी जाणवत होती का आसपास? ज्योत तेवली आणि विझली. त्यादरम्यान ट्रोजन असा काहिसा भास त्याला होऊन गेला होता. कुठे गेला होता?

पुन्हा एकावर अनेक पुज्य उलटली.

सर्व रेणु रंगरहीत असतात, पण काही जथ्थे लाल बनवता येतात.

आता फु ला चक्क थोडेफार कळत होते. ते एकमेकांशी संवाद साधु शकत. ते ज्याला फळ म्हणत ते सपाट नसुन गोलाकार होते. त्यांच्यासारख्या अनेक टोळ्या सर्वदूर होत्या. इतर प्रकारचे जीव (हा शब्द त्याला नवीन होता) देखिल आसपास होते. आपण बांडगुळ या धर्माचे आहोत हे कळले होते.

पुन्हा अंध:कार आणि प्रकाश. आधी साधे सरळ जगणे म्हणजेच बांडगुळ धर्माचे पालन करणे असे होते. आता मात्र काही परमाणु बदललेले त्यांचे सवंगडी खास पेशींमध्ये शिरुन जास्तीत जास्त यजमान पेशींना अपाय कसा करायचा याचे प्रशिक्षण देत. आधी गरजेपुरताच यजमान पेशींना त्रास दिल्या जायचा. थोडेफार फरक असलेले जे जीव यजमानांना जास्त त्रास देऊ शकत ते आपसुक जास्त मान मिळवुन जात. त्यांना अधिक जीवन, अधिक अणुरेणुंचे जथ्थे बनविण्याची संधी मिळे. पांढरीशुभ्र वस्त्रं परिधान केलेल्या यजमानांच्या सैन्याशी यांना अनेकदा लढावे लागे. त्यांच्यासारख्याच इतर जिवांशी देखील. ही युद्धे अंगवळणीच पडली होती. कधी याचे पोर मरे तर कधी त्याचा भाऊ. पण सोयरसुतक मात्र कुणाला नसे. कोणी पराक्रम करुन मोठा विजय मिळवला तरी आनंद साजरा करायला कुणाला फुरसत नसे. त्या आघाडीचा फायदा उचलायला मात्र सर्व सतत तत्पर असत. या प्रकाराला न कोणी इब्लीसपणा म्हणे, न शैतानपणा. युद्ध हेच जीवन असे. बळी तो कान पिळी हे सर्वांना जणु ज्ञात होते. आपली पिढी, आपला धर्म हेच सर्वोत्तम हे त्यांच्या रेणुरेणुत भरले होते. स्टारट्रेक मधिल बोर्ग प्रमाणे किंवा ब्रेव्ह न्यु वल्ड मधिल स्वत:चे मन नसलेल्या लोकांप्रमाणे विचार न करता कोणत्यातरी अनामिक, अज्ञात, अनाकलनीय लक्षाकडे कुच करीत.

या रंगवलेल्या रेणुंवर लक्ष ठेवणे शक्य आहे. ते कुठे जातात, कसे बदलतात, ई.

अनेक खापरयुद्धं उलटली. गोलगोल जिन्यासारखा किंवा सापासारखा अणुरेणुंचा एक पुंजका आपले वर्चस्व गाजवु लागला. हा हा म्हणता फळावर सर्वत्र वेगवेगळ्या जिवांचे राज्य पसरले. कॉनवेच्या गेम ऑफ लाईफ प्रमाणे काही जीव जागच्या जागी ब्लिंकर्स प्रमाणे लकाकत तर काही तोफांच्या गोळ्याप्रमाणे संचारत. अतिशय गुंतागुंतिचे परस्परावलंबी असे ते जाळे बनले होते. पण फक्त सालीवरच त्यांचे राज्य होते. खोलवर थोडाफारच प्रवास झाला होता.
गर्दी होऊ लागली तशी गरजेपेक्षा अधिक जागा मिळवायचे जास्त प्रयत्न सुरु होते. कधीतरी तत्वज्ञानाचा अजाणता जन्म झाला. आपण कोण आहोत, का आहोत या बद्दल फु चा विचार सुरु होता. आपले इतर जन्म आधी होऊन गेले आहेत असे आपल्याला का वाटते याचा तो विचार करे. इतर फळंच नाही तर इतर विश्व असतील का असा चोरटा पापी विचार कधीमधी त्याला शिवुन आणि रोमांचीत करुन जात असे.

निळ्या, पिवळ्या वाट्टेल त्या रंगाचे अतिसुक्ष्म मार्कर्स बनवणे शक्य आहे.

अनेक परपिढ्या उलटल्या.

विचारांमध्ये, संशोधनांमध्ये बऱ्यापैकी प्रगल्भता आली होती. त्यांच्या फळाबद्दल त्यांना बरेच ज्ञान प्राप्त झाले होते. अनेकदा आसपासच्या जगाचेच ज्ञान कमी असते. वेडी युद्धे मात्र सुरुच होती. त्यामुळे जणु पुर्ण फळ पोखरल्या जात होते, सडत होते. अनेकांनी इतर फळांची स्वप्ने पहाणे सुरु केले होते. युद्धांमुळे तिथे जाणे आवश्यक आहे असे अनेकांचे मत होते. त्यादृष्टीने विचार व प्रयत्न सुरु होते. काहींनी त्या फळांवर देखिल इतर जीव असु शकतात असे भाकीत केले होते. इतर काही त्या जीवांना पदाक्रांत करायची भाषा बोलु लागले होते.

अशातच त्यांचे विश्व हलले. जणु काही त्यांना सर्वकाही पुरवणारी नाळच उर्वरीत विश्वापासुन कापल्या गेली होती.
आपला अंत जवळ आल्याचे फु ला जाणवले. पण त्याचे मन प्रसन्न होते. कोणत्यातरी स्वरुपात आपले रुपांतर होणार हे त्याला माहीत होते. आणि ते रुप कॉन्शस नसले तरी फरक काय पडणार होता? आकाशातुन कोणत्यातरी वाणीत त्यांच्या फळावर काही शब्द आदळले:
"ऍडम, काय करतो आहेस?"
"इव्ह, तुझ्याप्रमाणे मी देखिल फळ खाणार. व्हायचे ते होईल. पण माझा कयास आहे की ही केवळ सुरुवात आहे."

गुलमोहर: 

सुंदरच!! अभिनव कल्पना!! सवडीने वाचली... वैज्ञानिक भाषा समजायला थोडी जड असते ना? Happy

Searching for guaranteed search engine optimization services at affordable rates? Your search ends here!!! Find your website on the top of popular search engines with our seo services...

foo नाव आवडले.

मस्त जमलीये कथा. कल्पना खूपच मस्त आहे. आणि वैज्ञानीक गोष्टींचा वापर एकदम चपखल केला आहे.

<<पांढरीशुभ्र वस्त्रं परिधान केलेल्या यजमानांच्या सैन्याशी>> - रक्तच नाही तर WBC कुठून येतील?

ते italics मधे लिहिलेले काही समजले नाही.

फू, खापरयुद्ध Happy
आपली पिढी, आपला धर्म हेच सर्वोत्तम हे त्यांच्या रेणुरेणुत भरले होते. >>> ह्म्म... 'आमचे अस्तित्व संपत असेल, याचा अर्थ आम्ही जगण्यास लायक नाही/सक्षम नाही/आमची गरज नाही' असा विचार करून 'अस्तित्वाचा नाश' स्वीकारता येईल का ? प्रगल्भता वाढत गेली तर 'आमचे अस्तित्व व त्याचे संरक्षण' हे आदिम गृहितक 'गृहितक' म्हणून नाकारलेही जाईल.

    ***
    I get mail, therefore I am.