गाणी मनातली (आवडलेली मराठी गाणी)

Submitted by जिप्सी on 10 June, 2010 - 23:38

मराठी संगीत भावगीत, चित्रपटगीत, लोकगीत, नाट्यगीत अशा विविध दालनांनी सजले आहेत.
गीतकारांचे अर्थवाही शब्द, संगीतकारांनी बांधलेली सुयोग्य चाल आणि गायकांची कर्णमधुर कारागिरी, अशा अनेक गाण्यांचा खजिना मराठी गीतांमध्ये आहे.
इथे आपण आपल्याला आवडलेल्या मराठी भावगीत, चित्रपटगीत, नाटयसंगीत, लोकगीत, लावणी इ. गाण्यांची चर्चा करुया. यात नेमके तुम्हाला काय आवडले (शब्द, संगीत, आवाज की सगळेच) तेच सांगायचे आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ते ए री मै तो प्रेमदिवानी आहे>> ओहो!!

केलं गं दुरुस्त दक्षिणा Happy

सुवासिनी चित्रपटातलं आहे.. ओक्के दिनेशदा. ऐकते.

पण एकंदरीतच आशापेक्षा लताने मीरेची भजनं मराठी आणि हिंदीतही खूप गायलीत असं वाटतं.

चारच गाणी होती त्या संग्रहात.

राजसा जवळी जरा बसा, जीव हा पीसा... हे चौथे गाणे.

मीरेची भजने जुत्थिका रॉय, गीता दत्त, एम सुब्बलक्ष्मी, वाणी जयराम यांनी पण गायलीत.
माझ्याकडे या सगळ्यांचे कलेक्शन होते.
बाकीच्या गायिकांना ऐकले असेल पण जुत्थिका रॉयना नसेल. कोहीनूर गीत गुंजार या कार्यक्रमात निवेदकाने सांगितले होते कि जुत्थिका रॉयना पुनर्जन्म घेतलेली मीराबाई समजत असत.

उदयपूरला पॅलेसच्या जवळ एका मंदीरात एका वृद्धाने उस्फुर्तपणे एरी मै तो प्रेमदिवानी सुरु केले आणि त्यावर तितक्याच उस्फुर्तपणे एका वृद्धेने नृत्य केले होते, ते बघायला केवळ मी आणि माझे २ मित्र होते.
तसले जीव ओतलेले गायन आणि नृत्य ना पुर्वी मी कधी अनुभवले ना नंतर कधी.

शालू माझा रंगाने भिजला.. ही गवळण पण मी एकदा मुंबईला ट्रेनमधे एका ग्रुपकडून ऐकली होती. मी एवढा गुंतलो कि ठाण्याला उतरायचेच विसरलो.

आशाने दूरदर्शनसाठी कार्यक्रम केला आहे. नेहमीसाररखा स्टुडियोत माइकसमोर उभे राहून गाणी म्हणणे असा नव्हे. सुधीर गाडगीळ यांच्याबरोबर गप्पा आणि गाण्यांचे वेगळे शूटिंग होते. (जानम समझा करो स्टाइल). माझ्या आठवणीप्रमाणे त्यात : मलमली तारुण्य माझे (याचे शुटिंग बहुतेक त्यांच्या घरातले : सोबत मुलगी का सून कोणीतरी होती आणि तिच्या केसांबरोबर खेळ....अरे देवा मूमेन्ट), सांज ये गोकुळी किंवा/आणि ऋतू हिरवा (लोणावळ्याचे पावसातले का थंडीतले शुटिंग...ज्यामुळे ताप भरल्याची तक्रार आशाने केली ), जिवलगा कधी रे येशिल तू , जय शारदे वागीश्वरी (यासोबत दोन मुलींचा क्लासिकल डान्स) . एकाच दिवशी बरीच गाणी रेकॉर्ड केल्याची आठवण सांगितली होती.

हे लिहिताना आशाने दोन कार्यक्रम केले (एक चित्रपटगीतांचा आणि एक ऋतू हिरवा या अल्बमचा) आणि त्यांची माझ्या डोक्यात सरमिसळ झाली की काय असे वाटू लागले आहे.

ना धो महानोर : प्रिया तेंडुलकर या कार्यक्रमाचे नाव 'माझ्या आजोळची गाणी' होते.
'आज उदास उदास दूर पांगल्या साउल्या' आणि 'घन ओथंबुन येती' ही दोन गाणीही याच अल्बममधली असावीत.

ना धो महानोर : प्रिया तेंडुलकर या कार्यक्रमाचे नाव 'माझ्या आजोळची गाणी' होते.>>>>येस्स भरत!!!!

हिंदीत वर उल्लेख झालेला चित्रपटगीतांचा कार्यक्रम होता. त्यात आरडीही आला होता. गाणे म्हणता म्हणता दोघांनी एकमेकांचे हात हातात गुंफले, ते पाहून माझ्या बालमनाला मोठाच धक्का बसला होता. आशा- आरडीचे लग्न बिग्न झाले आहे हे माहीत नव्हते. कदाचित तेव्हा पेपरात असल्या बातम्याही नसत. या कार्यक्रमात बबन प्रभूही आले होते.
आशाने मूळ पाकिस्तानी गझलांवरून (तेच म्युझिक ठेवून : थँक गॉड) कशिश नावाचा एक अल्बम काढला. त्यातल्या सगळ्या गझला नॅशनल नेटवर्कसाठी तिने सादर केल्या होत्या.

ऋतू हिरवा मला अंधूकसा आठवतोय. पण त्याचे चित्रीकरण अगदीच बेकार होते.
तिने स्वतः संगीत दिलेला पण एक अल्बम होता ना ? तो पण नाही गाजला.

आशाला मी प्रत्यक्ष गाताना बघितलेय. जबरदस्त परफॉर्मर आहे ती. सळसळता उत्साह !

शालू माझा रंगाने भिजला.. ही गवळण पण मी एकदा मुंबईला ट्रेनमधे एका ग्रुपकडून ऐकली होती. >>> दिनेश, ते गाणे मला कधी पासून हवी आहे. मी पण लोकल ट्रेनमध्येच ऐकले होते ते.

जिप्सी, त्या थाणी कायी कायी च्या लिन्कबद्दल धन्यवाद. बर्‍याच दिवसांत ऐकले नव्हते ते. लहानपणी खूप ऐकले आहे. शब्द कधीच नीट कळाले नव्हते.

ते आशाचे 'हरीनाम मुखी रंगते...' गाणे तर माझे एकदम फेवरिट आहे. मीराबाईचे नसावे पण अतिशय प्रसन्न गाणे आहे.

चैतन्य दिक्षित, जिप्सी >>+१ मी आठवणीतली गाणी वर जावून सगळी गाणी ऐकली! सगळीच मस्त गाणी आहेत! एका लाडवावरून अख्खा डबा सापडावा असं झालं!

राजसा जवळी जरा बसा ही फारच उच्च लावणी आहे! त्यात काहीतरी haunting आहे असं वाटतं मला नेहमी!

लता दिदींनी गायलेली मीरेची भजनं ही त्यांची देखील अत्यंत आवडती आहेत असं कुठेसं वाचलं होतं. मी सगळी ऐकली नाहीयेत पण जी तीन ऐकली आहेत ती अप्रतिम आहेत. ही तीनही युट्यूबवर आहेत.
१. केनू संग खेलू होली
२. माई माई कैसे जियू
३. करम की गती न्यारी (याचं मराठी रूपांतर आहे पण मला आत्ता काहीच डीटेल्स आठवत नाहीयेत!)

मीराबाईंची ८ भजने सावनी शेंडे च्या आवाजात माझ्याकडे आहेत. अप्रतिम आहेत ८ ही गाणी. बरसे बदरिया असा अल्बम आहे. संगीत बहुतेक सलील कुलकर्णी ( हे जर खरं असेल तर या आणि फक्त याच गाण्यांसाठी मी त्याची पंखा नाहीतर सलील चं संगीतकार म्हणून काम मला मुळीच आवडत नाही.)

या सावनीच्या अल्बमची कितीक पारायणे केली आहेत मी. त्यातल्या त्यात गली तो चारों बंद हुयी मैं हरीसे कैसे मिलु आणि कळस म्हणजे करना फकीरी ही दोन भजने.
याचे शब्द खरंच छान आहेत - करना फकीरी तो क्या दिलगिरी सदा मगन मन रहना रे
कोई दिन बाडी तो काई दिन बंगला कोई दिन जंगल रहेना रे

<करम की गती न्यारी (याचं मराठी रूपांतर आहे पण मला आत्ता काहीच डीटेल्स आठवत नाहीयेत!)>

दैव किती अविचारी
ऊधो ! जीवनगति ही न्यारी
शान्ताबाई - पं अभिषेकी - रामदास कामत- हे बंध रेशमाचे

जिज्ञासा-
त्या मीरेच्या भजनांचे राग-
किनु संग खेलू होली- यमन
करम की गति न्यारी- हंसध्वनी (ह्यातलं जलतरंग काय सुंदर आहे.)

यूट्यूबवर ज्याने हे अप्लोड केलंय त्याने (SJisBack) त्याने त्या गाण्यांचे इंग्रजीत स्पष्टीकरणही दिलंय.
खूप छान लिहिलंय ते.
(ओव्हर ऑल त्याने अपलोड केलेली इतर मराठी गाणीही तशीच आहेत.)

मला अभिषेकी बुवांनी गायिलेलं "अनंता तुला कोण पाहू शके" हे गाणं प्रचंड आवडतं.
फक्त एका कडव्याचा अर्थ उमगला नाहिये नीट.
"भुकी बालका माय देवा चुके, तया पाजुनी कोण तोषू शके?"
(माय देवा चुके म्हणजे काय?)

जिप्सी, मलाही आठवतोय तो कार्यक्रम माझ्या आजोळची गाणी. त्यात बहुतेक शांता शेळके पण होत्या का? नक्की आठवत नाही, खूपच लहान होते त्यावेळेस मी

धनश्री,
हे मिळाले.
हे सुरांनो, चंद्र व्हा
चांदण्याचे कोष माझ्या
प्रियकराला पोचवा ॥

वाट एकाकी तमाची
हरवलेल्या मानसाची
बरसुनी आकाश सारे
अमृताने नाहवा ॥

जयमाला शिलेदार यांनी संगीत दिलेला सखी मीरा हा एकपात्री कार्यक्रम किर्ती शिलेदार सादर करत असे.
का कोणास ठाऊक पण याचे केवळ दहाबाराच प्रयोग झाले. मी बघितला होता हा प्रयोग. यातले एक गाणे यू ट्यूबवर आहे, अवश्य ऐका.

गोव्याच्या आरती नायक ने, कशी जाऊ मी वृंदावना हि गवळण कारवार संगीत महोत्सवात सादर केली होती.
आरती तयारीची गायिका असल्याने तिने ती भजनी अंगाने न गाता गायकी अंगाने गायलीय. अप्रतिम गायन आहे ते. तिने गायलेले अभंगही यू ट्यूबवर आहेत. माझ्याच पावलांची, हे बिर्‍हाड बाजलं नाटकातले गाणेही आहे. मी तर तिचा फॅन आहे. गेल्या वेळेच चौकशी केली तर तिची एकही सिडी बाजारात नाही असे कळले,

आरती नायक या नावाने यू ट्यूबवर सर्च करा, खजिना सापडेल. तिचे सादरीकरणही उत्तम असते.

चैतन्य, माता आणि बालकाची ताटातूट असा अर्थ असावा,
तुकोबांच्या अभंगातही, चुकलीया माये बाळ हुरुहुरु पाहे, अशी ओळ येते. ( कन्या सासुर्‍यासि जाये.. लता )

आता येताना "रंगल्या रात्री अशा " या मराठी चित्रपटाची सिडी घेऊन आलो होतो.
सीमा, अरूण सरनाईक, शाहू मोडक, मिनू मुमताज असे कलाकार आहेत. वसंत पवार, दत्ता डावजेकर आणि छोटा गंधर्व असे तीन संगीतकार आहेत.

सुरवातीलाच धनी तूमचा आणि माझा एक काढा फोटू आणि मला हो म्हंत्यात लवंगी मिरची अशा सुलोचना चव्हाणच्या दोन फर्मास लावण्या आहेत.
मग छोटा गंधर्वांच्या आवाजात शूरा मी वंदिले आणि रजनीनाथ हा नभी उगवला अशी दोन अप्रतिम पदे आहेत. त्यांच्या रेकॉर्डपेक्षा जरा वेगळ्या ढंगात गायली आहेत ती.
कल्पना करा अल्लारखाँ साहेबांनी वाजवलेला तबला, गायकाच्या भुमिकेत शाहू मोडक, तबलजीच्या भुमिकेत अरुण सरनाईक, सारंगीयाच्या भुमिकेत शरद तळवलकर.. डोळे आणि कान अगदी तृप्त झाले.. पुढचा चित्रपट बघितलाच नाही आज... त्याच मधाळ सूरांवर तरंगत राहणार आहे रात्रभर..

रंगल्या रात्री अशा मधे नंतर छोटा गंधर्वांनी... दे हाता शरणागता, आणि पतिप पावन नाम ऐकूनी ही गाणी पण अप्रतिम गायलीत. आशाची ३ गाणी आहेत ती पण छान आहेत. पण ती हिंदीत आहेत.

माझ्याकडे एका सिडीत, होडी चाले... असे शब्द असलेले गाणे आहे. उषा मंगेशकर आणि सुरेश वाडकरने गायलेय.
चाल थेट महानंदा मधल्या, माजे राणी माजे मोगानची आहे. पण महानंदा मधले आहे असे आठवत नाही.
कुठल्या चित्रपटातले आहे ?
( सिडीचे कव्हर आणले नाही. )
बाळासाहेबांचेच संगीत असणार. आशाच्या जिवलगा राहिले रे दूर घर माझे, च्याच चालीवर एक हिंदी गाणे
ऐकल्याचे आठवतेय. ओ बावरी ... असे शब्द होते. आशाच्याच आवाजात होते. संगीत सरीता मधे, भीपललासी
रागासाठी वाजवत. त्याचे पण डीटेल्स आठवत नाहीत.

माझ्याकडे एका सिडीत, होडी चाले... असे शब्द असलेले गाणे आहे. उषा मंगेशकर आणि सुरेश वाडकरने गायलेय. चाल थेट महानंदा मधल्या, माजे राणी माजे मोगानची आहे. पण महानंदा मधले आहे असे आठवत नाही.>>>>>दिनेशदा, हे गाणं "जानकी" चित्रपटातील आहे. चित्रपट सुरू होताना, नाव दाखवताना हे गाणं आहे.:-)

होडी चाले लाटेवरी, कोण चालवे उमगे ना
खेळ नियतीचा कळेना, दैव कळले ना कुणा

बाळासाहेबांचेच संगीत असणार>>>>हो बाळासाहेबांचेच संगीत आहे. Happy

आज सकाळपासून एकच गाणं मनात रुंजी घालतंय..

मायेवीण बाळ क्षणभरी न राहे..
न देखता होय कासावीस...

राग ओळखीचा वाटतोय.. पण कळत नाहीये. पुन्हा ऐकते.

Pages