तिने लग्न मोडलं..

Submitted by वेल on 27 January, 2014 - 08:08

एक छोटीशी कथा.

*********************************

तिने घरी गेल्या गेल्या आई बाबांना हाक मारून समोर बसवून घेतलं. तिचा निर्णय झाला होता पण तो निर्णय त्याला सांगण्यापूर्वी तिला आपल्या आई बाबांना सांगायच होतं. कपडे बदलून हात पाय धुण्याइतका वेळही तिला वाया घालवायचा नव्हता.
"आई, बाबा मला तुमच्याशी बोलायचय."
"भांडण झालम का कौस्तुभशी तुझं"बाबांनी थट्टेच्या स्वरूपात म्हटलं.
"मला कौस्तुभ बरोबर लग्न करायचं नाहीये."
"अग महिन्यावर लग्न आलं आणि आज असं का म्हणते आहेस अचानक? काय केलं त्याने?"आईने काळजीने विचारलं.
"मला त्याच्या सवयी नाही आवडत."
"अग दोन माणसांच्या सवयी नेहमीच वेगळ्या असतात. थोडं फार अ‍ॅडजस्ट करायलाच लागतं. तुझ्या आईला नाही का घर अगदी स्वच्छ लख्ख लागतं आणि मला नाही जमत म्हणून काय आम्ही लग्न मोडलं का? तुझी आई आवरते आहे आणि तिने पसारा कॉर्नर बनवला आहे माझ्यासाठी."
बाबा नेहमीच मस्करीच्या मूडमध्ये असत.
"अग तू आज त्याच्य मित्राच्या लग्नाला गेली होतीस ना मग काय झालं तिथे?"
"बाबा हे आजचं नाही आहे, मी लग्न ठरण्याआधीपासून पाहाते आहे आणि आज त्याचा कळस झाला."
"अग काय झालं ते बोल ना, नुसतं गोल गोल काय फिरते आहेस." आई
"आज त्याच्या मित्राचं केव्हिनच्या लग्नाची होतं. पार्टी एकदम मस्त होती, भरपूर खायला प्यायला. हो अगदी प्यायला सुद्धा होतं. आणि जेवणात भरपूर प्रकारचं नॉन व्हेज होतं "
"अच्छा म्हणजे तो नॉन व्हेज खातो आणि ड्रींक्स घेतो का? आणि म्हणून तुला लग्न मोडायचं आहे का?"
"आई नॉन व्हेज मीसुद्धा खाल्लय. मी त्यावर टिका करत नाहीये. तू ऐकणार आहेस पूर्ण का मधे मधे प्रश्नच विचारत राहणार आहेस."
"नमनाला घडाभर तेल ओतू नकोस, लवकर सांग काय ते."
"आई लग्न ठरल्यापासून आम्ही जेव्हा जेव्हा फिरायला गेलो आहोत तेव्हा तेव्हा मी पाहिलय त्याचं लक्ष माझ्याकडे कमी आणि आजूबाजूच्या मुलींकडे जास्त असतं. मी कधी फारसं मनावर घेतलं नाही. शिवाय दर वेळी हॉटेलात खायला गेल्यावर तीन चार डिशेस मागवायच्या आणि अर्थातच सगळं खाऊन होत नाही त्यामुळे त्या फुकट घालवायच्या. आज सुद्धा तसच झालं. एक तर केव्हिनच्या पार्टीत ड्रींक्स होते. हा बराच प्यायला त्यासोबत त्याने बरेच स्टार्टर्स खाल्ले. पार्टीत डान्स चालू होता तर तो डान्स करायलाही गेला. केव्हिनच्या बायकोची ज्युलीची एक मैत्रिण होती तिच्यासोबत डान्स करत होता. परक्या मुलीशी लगट करावी ती किती? काही सीमाच नाही. त्या मुलीनेच कंटाळून डान्स पार्टनर बदलला. तिच्याशी डान्स करून झाल्यावर मग अजून एका मुलीबरोबर डान्स केला त्याने, तेव्हाही तेच. मला पाहूनच संताप आला.
त्याचा डान्स करून झाला, मग आम्ही दोघं जेवायला गेलो, मी त्याला म्हणत होते, तुझ्या मित्रांसाठी जेवायचं थांबूया, पण त्याने जेवायला घेतलं. पूर्ण ताट भरून फक्त नॉन व्हेज. अर्धसुद्धा खाल्लं नसेल बाकीच फेकून दिलं. तेव्हा आम्ही दोघांनीच जेवायला घेतलं होतं. मग केव्हिन आणि ज्युली जेवायला बसले तेव्हा मित्रांसोबत पुन्हा हा जेवायला बसला, पुन्हा तेच, ताट भरून जेवण घेतलं पण अर्ध्याहून जास्त फुकट घालवलं. शेवटी मी त्याच्या मित्राशी परमिंदरशी बोलले, ह्या त्याच्या सवयीबद्दल, तो म्हणाला, कौस्तुभ नेहमी असाच वागतो, खूप डिशेस मागवतो, खूप वाढून घेतो, आणि फुकट घालवतो. पूर्वी तो ड्रींक्स सुद्धा फुकट घालवायचा. तो जेवायला सोबत असला की त्याचे मित्र त्याच्या आधी वाढून घेतात आणि त्याला जास्तीची कोणतीही ऑर्डर द्यायला बंदी असते. तरी त्याने जर ऑर्डर केलेच तर त्याचं बील त्यालाच भरायला लावतात. परमिंदर केव्हिन श्रीराम आणि कौस्तुभ इंजिनियरिंगपासून एकत्र आहेत. परमिंदर म्हणाला गेली दहा वर्ष तरी त्याचं वागणं बदललं नाही. एकदा तर त्याच्या मित्रांनी त्याला मानसोपचार तज्ञाकडेही नेलं होतं. त्याने सांगितलं ह्याला कोणताही आजार नाहीये, फक्त पैशाचा माज आहे.
मला किळस आली हे सगळं पाहून आणि ऐकून आणि म्हणून मी ठरवलय मी कौस्तुभशी लग्न करणार नाही. आता मला प्लीज हे सांगू नका की स्वभाव बदलेल आणि एवढ्याश्या कारणासाठी लग्न मोडायची गरज नाही. मी अशा माणसासोबत आयुष्य काढू शकत नाही. तेव्हा आता आपण बसून हे ठरवू की त्याच्या घरी हे कसं कळवायचं. "

अशा तर्‍हेने इतर सर्व गोष्टी मेळ खात असतानाही जुईने लग्नाच्या एक महिना आधी स्वतःच लग्न मोडलं. कौस्तुभच्या घरी लग्न का मोडलं ह्याचं कारण सांगताना जुईच्या आईवडिलांना खूप त्रास झाला, पण जुईने ठरवलं होतं खोटं बोलायचं नाही. कौस्तुभ आणि जुईचे घर जवळ जवळ असल्याने त्यांच्या कुटुंबियात मित्रमंडळी कॉमन होते.त्या कॉमन मित्रमंडळींपैकी कोणीच जुईसाठी स्थळ आणले नाही.
यथावकाश जुईच लग्न झालं. कौस्तुभचं लग्न देखील झालं परंतु आजही कौस्तुभचे आईवडिल जिथे शक्य असेल तिथे - कॉमन मित्रमंडळींमध्ये जुईला दोष देतात.

तिचं चुकलं की बरोबर हे तुमचं तुम्हीच ठरवा.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्या कौस्तुभ सार्खे २ मित्र माझे होते... ( होतेच ) आता नाही.....GPL दिले त्यांना......... आता प्लीज विचारु नको....GPL म्हणजे काय......

आणि वल्ली दी प्लीज प्लीज....सिता पुर्णत्वा कडे ने......

झकास !

तिचं चुकलं की बरोबर हे आता वाचकांनी ठरवा. >> हे कशासाठी ? ही कथा , कल्पनाविलास असेल तर त्यामधे चूक किन्वा बरोबर हा प्रश्न कशाला ? त्यातून मुलगी पुरेशा आत्मविश्वासाने हा निर्णय घेताना दाखवली आहे त्यामुळे हा निर्णय तिच्यासाठी योग्यच आहे असे गोष्टीत दिसतेच आहे. मग लोकांचे / वाचकांचे 'अ‍ॅप्रूव्हल' कशाला हवेय ?
सत्य घटना असेल तरीही आयुष्य त्या मुलीचे आहे त्यावर इतरांनी चूक का बरोबर हा काथ्याकूट करण्याचे काहीच कारण नाही. जो निर्णय तिने घेतलाय त्याचे चांगले वाईट परीणाम तिच भोगणार आहे.
मुलीने / स्त्रिने व्यक्तिगत कोणताही निर्णय घेतला तरी जगाला त्याचे जस्टीफिकेशन देणे , पटवून देणे का गरजेचे वाटते ?

मुलीने / स्त्रिने व्यक्तिगत कोणताही निर्णय घेतला तरी जगाला त्याचे जस्टीफिकेशन देणे , पटवून देणे का गरजेचे वाटते ? >>+१

सगलम ही टायपो चूक होती. बदलून सगळं केलं आहे.

माझ्या माहितीत तरी ही सत्य कथा नाही. पण असे लोक असू शकतात. ही सत्य घटना नाही म्हणूनच वाचकांनी ठरवा किंवा तुमचे तुम्ही ठरवा असे लिहिण्याचे स्वातंत्र्य घेतले आहे. माझ्या मते, वाचकांनी ठरवा म्हणजे वाचकांना जे योग्य वाटतं ते त्यांनी मानून चाला. कोणाला ती चूक वाटेल तर कोणाला बरोबर. कदाचित कोणी कन्फ्युज असेल. ...

मुलीने / स्त्रिने व्यक्तिगत कोणताही निर्णय घेतला तरी जगाला त्याचे जस्टीफिकेशन देणे अजिबात गरजेचे नसते. मी ही कथा पात्र उलट सुलट करून लिहिली असती - म्हणजे जुईचे वागणे कौस्तुभ सारखे आणि कौस्तुभ लग्न मोडतो अशी - तरी अशीच लिहिली असती.

रिया. - पण... हा पण काय सांग ना.

कथा म्हणून नाही आवडली. खरं तर कथा अशी न वाटता अनुभव लिहिल्या सारखेच वाटतंय - लग्न का मोडले याची कारण मिमांसा.

कथेची नायिका ही तुमची निर्मिती आहे. तिने कसे वागायचे हे फक्त तुम्ही ठरवायचे. प्रत्येक वाचकाचे विचार, दृष्टीकोन वेगवेगळे असतात. त्यामुळे प्रत्येकाचे मत विचारात घ्यायचे म्हटले तर नुसताच गोंधळ उडेल.

कथेचा शेवट आवडला तर सोन्याहून पिवळे. पण जर तर्कसुसंगत शेवट असेल तर शेवट न आवडताही कथा आवडू शकते. कारण अशा वेळेस शेवट आवडला जरी नसला तरी पटलेला असतो.

ही कथा वास्तव आहे की कल्पना विलास ते माहिती नाही पण एक गोष्ट नक्की कि लग्नाच्या १ महिना आधि योग्य निर्णय घ्यायला आणि त्यावर ठाम राहुन लग्न मोडायला जी प्रचंड हिम्मत लागते ,ती ह्या मुलीनी दाखवली .
माझ्या एका अत्यंत जवळच्या मैत्रिणिनी लग्नाच्या आधि होणार्‍या नवर्या बद्द्ल सगळी माहिती मिळून सुद्धा फक्त समाज काय म्हणेल या भिती पोटी ,सगळे समजावत असताना देखिल पुढे तो बदलेल या आशेवर लग्न केले आणि लग्नानंतर ६ महिन्यांनी आत्महत्या केली.आजही मी आणि आमच्या आणखी दोन मैत्रिणि ती ला लग्न मोडायची हिम्मत देताना कुठे कमी पडलो याचा विचार करुन रडतो.

लग्नानंतर ६ महिन्यांनी आत्महत्या केली.आजही मी आणि आमच्या आणखी दोन मैत्रिणि ती ला लग्न मोडायची हिम्मत देताना कुठे कमी पडलो याचा विचार करुन रडतो.>>> Sad

वेल,

आधुनिक काळात जुईचा निर्णय योग्यच धरला जाईल.

कथा बाळबोध वाटली. कौस्तुभ केवळ वस्तू फुकट घालवतोय म्हणजे त्याला पैशाचा माज असेलंच असं होत नाही. इतर कारणेही असू शकतात. त्यातूनही त्याला माज असलाच तर इतर प्रकारे ठळकपणे व्यक्त व्हायला हवा.

आ.न.,
-गा.पै

माधवशी सहमत. कथा म्हणून मांडणी नाही आवडली. हे एक कथाबीज म्हणून खरच सशक्त आहे... एक कथा म्हणून फुलवायला हवं. वेल, पुढल्या लेखानासाठी खूप शुभेच्छा.

दाद +१. काही गोष्टी एका प्रसंगातून नाही कळत. किती दिवस मुलाशी ओळख होती? मुलीचा स्वभावच धरसोड वृत्तीचा होता? थोड तिचे व्यक्तिमत्त्व कळले असते तर जास्त पटली असती कथा.

कथेची नायिका ही तुमची निर्मिती आहे. तिने कसे वागायचे हे फक्त तुम्ही ठरवायचे. >> +१००

ही सत्य घटना नाही म्हणूनच वाचकांनी ठरवा किंवा तुमचे तुम्ही ठरवा असे लिहिण्याचे स्वातंत्र्य घेतले आहे. >> नको हो, मायबोलीच्या वाचकांना नका सांगू कथानायिकेचे वागणे ठरवायला. मागे एका लेखकाने असेच मायबोली वाचकांना 'शेवट सुचवा' असे म्हणले होते त्यातून असे भन्नाट भयंकर प्रतिसाद आले होते.
( http://www.maayboli.com/node/14896 )

आजकालच्या तरुण मुली स्वत: चे निर्णय स्वत: घेणाऱ्या आहेत. त्यामुळे नायिकेने लग्न मोडले हा निर्णय योग्यच आहे परंतु धक्कादायक नाही किंवा अपेक्षितच वाटला . छोट्या कथांमध्ये जर शेवट काहीतरी वेगळाच असेल( surprise element )तर जास्त कथा भावते असे वाटते .

डेलिया Rofl

वेल, पण च्या पुढे काय ते माधव, दाद वगैरेंनी लिहिलं बघ Happy
आता नाही लिहित Happy
दादने तर जे मला म्हणायचंय सगळंच्या सगळं तेच लिहिलं Happy

कथाबीज आवडले .

पण कौस्तुभचे लंपट असणे नायिकेच्या निर्णयाला धाडसी म्हणायला मारक ठरते .
जर केवळ त्याच्या खाण्याच्या सवयीवर चिडून तिने हा निर्यण घेतला असता तर काहीतरी वेगळ वाटल असतं

बर्याचदा समोरच्याच्या सवयी समाजप्रथेप्रमाणे वाईट नसतात ( अतिदारू पिणे , बाहेर्ख्याली , लंपट्पणा , भ्रष्टाचारी वगैरे )
पण आपल्या संस्काराप्रमाणे आपल्याला वाईट वाटु शकतात .

उदा. लहानपणापासून गोतावळ्यात रहिलेल्या , लोकमताचा आदर करणार्या मुलीला , एखाद्या मुलाचा उठसूठ 'personal comments करून मस्करी करयचा स्वभाव जाचक वाटु शकेल . पण तेवढ्या कारणावरून मुलाला नकार देण ही गोष्ट बर्याच लोकाना अनाकलनिय वाटेल .

आपल्या मतांशी आणि मूल्यांशी प्रामणिक राहून , समाज काय म्हणेल याचा विचार न करता निर्णय घेतला तर तो धाडसी .

Pages