प्याला

Submitted by UlhasBhide on 25 January, 2014 - 09:59

प्याला : (कविता/गीत)

मी प्यायलो, मलाही गेला पिऊन प्याला
धुंदीत तृप्ततेच्या गेला बुडून प्याला

स्वर्गीय त्या सुरेचा अंमल असा मनस्वी
हृदयात, रोमरोमी गेला भिनून प्याला

बहरेत सर्व गात्रे, हर स्पंदनी अलामत
शब्दांविनाच मिसरे गेला रचून प्याला

प्याल्यांतल्या नशेला लाभे खरी खुमारी
साकी परस्परांना देता भरून प्याला

त्या स्वप्नवत् क्षणांना हृदयात साठवूनी
सत्यात स्वप्न अवघे गेला जगून प्याला

.... उल्हास भिडे (२५-१-२०१४)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मोहक शब्दांच्या पेरणीने बहरलेली गझलरचना! एकंदर आशयाची मध्यवर्ती संकल्पना व द्विपदींची प्रवृत्ती बघता गझलेपेक्षा गझलरचना ठरावी असे काव्य!

शुभेच्छा!

धन्यवाद बेफीजी.

"मोहक शब्दांच्या पेरणीने बहरलेली गझलरचना! एकंदर आशयाची मध्यवर्ती संकल्पना व द्विपदींची प्रवृत्ती बघता गझलेपेक्षा गझलरचना ठरावी असे काव्य!" >>> म्हणूनच तर शीर्षकात कविता/गीत असं आधीच स्पष्ट केलंय.
आकृतीबंध गझलेचा असल्याने, पोस्ट करताना 'वाचकवर्गा'त गझल विभाग समाविष्ट केला आहे.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------

किती प्याला? >>> सच्चे पिणारे मोजत नसतात. Proud ...... धन्यवाद.

बेफीजींचा प्रतिसाद पटलाच पण तो आला नसता तर मी ह्या रचनेत अधिकाधिक गझलियत शोधण्याचा प्रयास करून एखादे मत दिले असतेच असते
आता ही रचना गझल आहे की कविता ह्यावर विचार न करून मी हे मत देइन की मला ही ठीकठाक वाटते आहे

बहरेत सर्व गात्रे, हर स्पंदनी अलामत
शब्दांविनाच मिसरे गेला रचून प्याला<< ही द्विपदी मला सर्वोत्तम वाटली

आणि ही ओळ >>धुंदीत तृप्ततेच्या गेला बुडून प्याला<<
धन्यवाद

*आणि क्षमस्व की कितीही प्रयत्न करून 'किमान दोन' द्विपदी 'सर्वाधिक' आवडून घेता आल्या नाहीत काका Wink

सच्चे पिणारे मोजत नसतात. << +१००००० ....

"आणि क्षमस्व की कितीही प्रयत्न करून 'किमान दोन' द्विपदी 'सर्वाधिक' आवडून घेता आल्या नाहीत काका" >>>
वैवकु, प्रांजळ मताबद्दल धन्यवाद. क्षमस्व कशाला म्हणताय ? एखादी गोष्ट न आवडणे ही चूक/गुन्हा आहे का ?
नकारात्मक प्रतिसाद मला स्वीकारार्ह असतात हे तुम्हाला ठाऊक आहेच. मुळात रचनेची दखल घेतली जाणं हे सर्वात महत्वाचं नाही का !
प्रयत्न करून आवडून घेणं हे मला कळलं नाही बुवा .... असो.

प्रयत्न करून आवडून घेणं हे मला कळलं नाही बुवा <<< अहो काका तुम्हाला नाही का मोस्ट ऑफ दि टाईम इतरांच्या गझलेत तुम्हाला दोनच शेर आवडतात एक नाही की तीनही नाही दोनच ...तर त्यात आपण सर्व शेर आवडले असले तरी त्यातही दोन विषेष शेर आपल्या काही क्रायटेरियानुसार ठरवलेले असतात आणि ते दोन जास्त आवडून घेतलेले असतात बाकीचे कमी आवडून घेतलेले असतात ...तेच म्हणालो मी Happy
अमूक शेर सर्वाद्शिक आवडले असे म्हणत असतो तेव्हा बाकीचे आवडले नाहीत कमी आवडले असे कुठे असते पण आपण त्यातल्यात्यात दोन शेर निवडतो नाही का !-ते निवडणं म्हणजेच आवडून घेणं

ज्याच्या जिभेला जशी चव आवडत असेल / जसा मूड असेल तशीतो खायला बघतो ...तसे आहे ते !

छान.

ह्या कवितेला चालबद्ध करण्याचा हा एक प्रयत्न...ह्यावेळी सोबत तालही वापरलाय...आता कितपत जमलंय ते ऐकून आपणच ठरवा.
http://www.divshare.com/download/25111734-f7d

सर्वांना धन्यवाद.

प्रमोदजी,
छान चालीत प्यायलात आणि पाजलात हा प्याला Happy
धन्यवाद.