कवी विरुद्ध कविता

Submitted by करकोचा on 19 November, 2012 - 11:39

स्वस्थता नाही जिवाला, षोक ठरला जीवघेणा
सोडुनी कवितेस सार्‍या संपवाव्या शब्दवेणा ||धृ||

सर्जनाने होत होतो वर्णनापल्याड पुलकित
होत गात्रे तृप्त अन्‌ सौदामिनीने देह उर्जित
सौख्य निमिषार्धात सरते, रिक्तता सरता सरेना ||१||

का असा छळवाद माझा मांडला आहेस, कविते?
दंश हा कसला तुझा, ज्याने विषाची झिंग येते?
पोखरे तनमन तरीही हे व्यसन सुटता सुटेना ||२||

मी किती घासू-पुसू, आकार देऊ कल्पनांना,
खेळवू दररोज ह्या न्हात्या-धुत्या पद्यांगनांना?
यापुढे उठणार नाही बाव्हळ्यांना काव्यमेणा ||३||

यापुढे, कविते, तुला शृंगारणे जमणार नाही
चंचले, दुसरा कवी बघ; मी तुला पुरणार नाही
मान्य, तू चिरयौवना, पण काळ माझ्याने अडेना ||४||

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर...!

मी किती घासू-पुसू, आकार देऊ कल्पनांना,
खेळवू दररोज ह्या न्हात्या-धुत्या पद्यांगनांना?
यापुढे उठणार नाही बाव्हळ्यांना काव्यमेणा ||३||
सुंदर...!!

इथे बाव्हळ्यांना असा शब्दप्रयोग केला आहे. तो नेमका कशासाठी?

टॉप क्लास
खूप दिवसानी आलात कविराज !!
तुमचे नाव पहताच अपेक्षा गगनाला भिडवून ठेवल्या होत्या............स्सार्थक झाले

धन्यवाद या कवितेसाठी
पण सीरीयसली असा विचार करत असाल तर प्लीज नका करू..........आम्हाला तुमच्याकडून अशाच उत्तमोत्तम कविता आजन्म खूप हव्या आहेत

यापुढे, कविते, तुला शृंगारणे जमणार नाही
चंचले, दुसरा कवी बघ; मी तुला पुरणार नाही (व्वा)
मान्य, तू चिरयौवना, पण काळ माझ्याने अडेना <<<

सुंदर!

सौख्य निमिषार्धात सरते, रिक्तता सरता सरेना <<< उत्तम ओळ

रिक्तता सरता सरेना<<< वा वा, रिक्तता सरता सरेना! वा!

पद्यांगना शब्द फार आवडला.

एकंदर कविता सरस. मुद्दे सरस. थेटपण सरस.

महत्वाची पद्यरचना!

-'बेफिकीर'!