'वेगळेपण' सामावताना... - श्रीमती चित्रा पालेकर

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

भारतात कलम ३७७अंतर्गत 'अनैसर्गिक' लैंगिक संबंध बेकायदेशीर आहेत. भारतीय कायद्यानुसार समलिंगी संबंध ठेवणंही अर्थातच बेकायदेशीर आहे. इंग्रजांनी एकोणिसाव्या शतकात लिहिलेला, दोन सज्ञान व्यक्तींच्या खाजगी आयुष्यात ढवळाढवळ करणारा, त्यांना गुन्हेगार ठरवणारा हा कायदा भारतात पाळला जातो.

काही वर्षांपूर्वी दिल्ली उच्च न्यायालयानं हा कायदा घटनाविरोधी ठरवला. या निकालाविरुद्ध अनेक धार्मिक संघटना सर्वोच्च न्यायालयात गेल्या. दिल्ली उच्च न्यायालयाचा निकाल भारतात सर्वत्र लागू व्हावा, म्हणून काही सामाजिक संघटना आणि समलिंगी मुलामुलींचे एकोणीस पालकही न्यायालयात गेले. गेल्या महिन्यात सर्वोच्च न्यायालयानं दिल्ली उच्च न्यायालयाचा निकाल रद्द केला.

उच्च व सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार्‍या पालकांपैकी एक होत्या श्रीमती चित्रा पालेकर. चित्रा व अमोल पालेकर यांची मुलगी शाल्मली समलिंगी आहे. ऑस्ट्रेलियात एका विद्यापीठात ती प्राध्यापक आहे. गेली अनेक वर्षं चित्राताई भारतात समलैंगिकांना गुन्हेगार ठरवलं जाऊ नये, त्यांना समान हक्क मिळावेत, यासाठी लढा देत आहेत.

२०१२ साली 'माहेर'च्या दिवाळी अंकात चित्राताईंनी समलैंगिकतेबद्दल एक लेख लिहिला होता. हा लेख प्रकाशित झाल्यावर अनेकांचे फोन, ईमेल आले. आपला मुलगा / मुलगी समलिंगी असल्याची शंका असणारे पालक, आपला मुलगा / मुलगी समलिंगी आहे, हे माहीत असणारे पालक हा लेख वाचून पुढे आले. भारतात अजूनही या विषयाबद्दल किती अज्ञान, भीती, संकोच आहे, हे या निमित्तानं लक्षात आलं.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आलेल्या प्रतिक्रियांमधूनही हे जाणवलं. समान हक्क नाकारणार्‍या या कायद्याच्या बाजूनं किती मोठा समुदाय उभा आहे, हे समोर आलं. म्हणूनच चित्राताईंनी लिहिलेला लेख इथे (सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर काही बदलांसह) पुन्हा प्रकाशित करत आहे.

CP and Shal.jpg

`माझा मुलगा जर समलिंगी असेल, तर समलैंगिकतेला वाईट समजणार्‍या पारंपरिक रूढ कल्पनाच साफ चुकीच्या, असं मी ठामपणे मानतो.'

एका ख्रिस्ती बिशपचे हे उद्गार. मुलानं स्वतःची लैंगिकता उघड केल्यावर त्याची निर्भर्त्सना करण्याऐवजी, त्याला नाकारण्याऐवजी, मुलावर विश्‍वास ठेवून त्याला पूर्ण पाठिंबा देताना काढलेले! दोन वर्षांपूर्वी ’स्ट्रेट पेरेंट्स्, गे चिल्ड्रन : कीपिंग फॅमिलीज टुगेदर’ असं लांबलचक शीर्षक असलेलं पुस्तक वाचताना ते शब्द माझ्या नजरेस पडले. एका धर्मप्रचारकानं त्याच्या धार्मिक नीतिनियमांची तमा न बाळगता अशी भूमिका उघडपणे घ्यावी, याचं खूप बरं वाटलं. त्याचबरोबर, वीस वर्षांपूर्वी माझ्या मुलीनं ती लेस्बियन आहे, असं मला सांगितल्यावर मला काय वाटलं होतं, ते पुन्हा एकवार आठवलं.

त्या काळी समलैंगिकतेबद्दल मला फारशी माहिती नव्हती (आता साठीत असलेल्या माझ्या पिढीला स्त्री-पुरुष संबंधांबद्दलसुद्धा उघड बोलायला संकोच वाटे, तिथे समलैंगिकतेचं काय घ्या?). ही गोष्ट कधीच स्वप्नातदेखील न आल्यामुळे, मुलीनं तसं म्हटल्यावर मी चकित होणं साहजिक होतं, पण मी अजिबात हादरून वगैरे गेले नाही. वर उल्लेख केलेल्या बिशपप्रमाणेच मला वाटलं, की जर माझी मुलगी लेस्बियन असेल, तर ती गोष्ट वाईट असणं शक्यच नाही. लेक म्हणाली, ''तू काळजी करू नकोस. लैंगिकता ही गोष्ट सोडून बाकी सर्व बाबतींत मी अगदी तीच आहे... माझ्या जन्मापासून आत्ता, काही क्षणांपर्यंत मी जी होते, जिला तू जाणत होतीस तीच... तुझी शाल्मली". वास्तविक तिनं हे बोलून दाखवायची गरज नव्हती. तिच्या वागण्याबोलण्यात कुठलाच फरक नाही, हे मला स्पष्ट दिसत होतं. मी केवळ हलकंसं स्मित करून होकारार्थी मान हलवली. शाल्मली बरीच रिलॅक्स झाली.

''अम्मा, समलिंगी असणं हा आजार नाही, बरं का! हे व्यंग किंवा विकृतीदेखील नाही", लेक समजावत होती. "समलैंगिकतेला अनैसर्गिक मानणं तर साफ चुकीचं आहे. तू लहान असताना डाव्या हाताचा वापर वाईट मानला जाई, नाही का? बिचार्‍या डावर्‍या मुलींना पूर्वी फटके मारून उजव्या हातानं लिहा-जेवायला भाग पाडत, हे तूच मला सांगितलं होतंस, पण आज डाव्या हाताला मान्यता मिळाली आहे. त्याचा वापर अनैसर्गिक, असं कुणी म्हणत नाही. अशा लोकांचं प्रमाण कमी असतं. समाजातल्या बहुतेक लोकांहून ते वेगळे असतात, पण त्यांच्या कृती नैसर्गिकच मानल्या जातात. समलिंगी असणं हे एका परीनं डावरं असण्यासारखंच आहे.''

''समाजात बहुतांश लोकांची लैंगिकता स्त्री-पुरुष संबंधाशी निगडित असते. त्यांच्या तुलनेत समलिंगी लोकांची संख्या कमी; पण ते बहुतेकांपेक्षा वेगळे आहेत म्हणून समाजानं त्यांच्यावर अनैसर्गिक असा शिक्का मारणं योग्य आहे का? खरंतर लैंगिकता केवळ बायोलॉजिकल फॅक्ट आहे. डोळ्यांच्या रंगांप्रमाणे. सर्व माणसांचे डोळे जसे एकाच प्रकारचे असत नाहीत - काळे, निळे, राखाडी असे वेगवेगळ्या रंगांचे असतात, त्याचप्रमाणे लैंगिकतादेखील केवळ एकाच प्रकारची - स्त्री-पुरुषसंबंधी नसते. समलैंगिकता हे ऐतिहासिक वास्तव तर आहेच. त्याशिवाय आता समाजशास्त्रीय, मानसशास्त्रीय, तसंच जीवशास्त्रीय संशोधनांतून या विषयावर अधिकाधिक प्रकाश पडत चाललाय आणि अशा सगळ्या अभ्यासांतून जो निष्कर्ष निर्विवादपणे निघालाय, तो हाच, की गे किंवा लेस्बियन (होमोसेक्शुअल) असणं हे स्ट्रेट (हेटेरोसेक्शुअल) असण्याइतकंच नैसर्गिक आहे.''

वीस वर्षांची माझी लेक तर्कशुद्ध विचार अतिशय सुसंगतपणे मांडत होती. वास्तविक मी व तिचे वडील अनेकदा तिच्याबरोबर वेगवेगळ्या विषयांवर वाद घालत असू, चर्चा करत असू, पण आज केवळ तात्त्विक चर्चा होत नव्हती. तिच्या-माझ्यातला हा संवाद अतिशय नाजूक होता... आम्हां दोघींचं नातं, जवळीक पारखणारा, आणि म्हणूनच अतिशय महत्त्वाचा होता. शाल्मली पोटतिडिकीनं बोलत होती, पण मधूनच अम्माला हे पटतंय का, अशी शंका तिच्या चेहर्‍यावर उमटून जात होती... कधी निराशेचा सूर डोकावत होता. मी तिला कुशीत घेऊन म्हटलं, ''तू मुळीच काळजी करू नकोस. या सगळ्या गोष्टी सांगण्यापूर्वी तू जी माझ्यासाठी होतीस, तीच अजूनही आहेस... माझी लाडकी लेक. बस्स...'' आणि मग एकमेकींना मिठी मारून आम्ही खूप हसलो आणि थोडंसं रडलोसुद्धा. आपल्या वडलांना, जवळच्या कुटुंबीयांना व मित्रमंडळींना तिनं सांगितल्यावर सगळ्यांनी तिचा सहजपणे स्वीकार केला. माझ्यासारखंच सर्वांना वाटलं, तिचं-आपलं जे प्रेमाचं, आपुलकीचं नातं आहे, त्यात तिच्या लेस्बियन असण्यानं काय फरक पडतो? तो तिचा खासगी प्रश्‍न आहे! तिला आपल्या पुढच्या आयुष्यात सोबती म्हणून स्त्री हवी आहे, पुरुष नाही, इतकंच. सर्व जवळच्या, प्रिय लोकांनी स्वीकार केल्यामुळे माझ्या लेकीचं मानसिक बळ खूप वाढलं, यात शंका नाही. आज ती परदेशात एका महत्त्वाच्या विश्‍वविद्यालयात प्राध्यापक आहे. स्वतःच्या विषयात आंतरराष्ट्रीय स्तरावर तिला मान्यता मिळाली आहे. इतकंच नव्हे, तर तिचं खासगी जीवनदेखील अतिशय सुखी, समृद्ध आहे. याचं श्रेय तिच्या आत्मविश्‍वासाला आणि कर्तृत्वाला जातं, तिच्या सहचरणीच्या प्रेमाला जातं, तसंच तिच्या जवळच्या सर्व माणसांच्या पाठिंब्यालाही जातं, अशी माझी खात्री आहे.

''आपण लेस्बियन आहोत हे जाणवल्यावर तू लगेच मला का नाही सांगितलंस? मध्ये इतका काळ का जाऊ दिलास?'' मी लेकीला विचारलं. बालपणापासून कुठलीही गोष्ट तिनं माझ्यापासून लपवली नव्हती, पण या बाबतीत ती चार-पाच वर्षं गप्प राहिली, हे मला थोडंसं खटकलं होतं. ''मी तेव्हा चौदा-पंधरा वर्षांची असेन. एव्हाना माझ्या मित्रांना मुलींबद्दल आणि मैत्रिणींना मुलांबद्दल 'गुलुगुलु' वाटायला सुरुवात झाली होती. सगळे मला त्यांची गुपितं सांगत. आवडणार्‍या मुलीशी किंवा मुलाशी ओळख करून द्यायची विनंती करत! मी सगळ्यांची दोस्त! त्या वेळी माझ्या लक्षात आलं, की मला स्वतःला मुलांबद्दल निर्भेळ मैत्रीपलीकडे काही वाटत नाही... मी इतर मुलींपेक्षा वेगळी आहे. त्या वयात वेगळेपणाची भीती वाटते, तशी मलाही वाटली. मी लेस्बियन तर नसेन, अशी शंका मनात डोकावल्यावर तर फारच. अर्थात, हे सगळे शब्द तेव्हा माझ्या परिचयाचे नव्हते. माझ्या मनाचा गोंधळ उडाला. कुणाशी तरी बोलणं आवश्यक होतं, पण आजूबाजूच्या माणसांत कुणीही समलिंगी नव्हतं, किंवा कुणी असल्याचं मला माहीत नव्हतं. मी कुणाचा सल्ला घेणार?'' 'म्हणूनतर माझ्याकडे यायचंस ना...' असं मी म्हणणार, इतक्यात शाल्मली पुढे म्हणाली, ''तुझं व बाबांचं या विषयी नेमकं काय मत आहे, मला ठाऊक नव्हतं. आपल्या घरी अनेक कलात्मक, राजकीय, सामाजिक, साहित्यिक विषयांवर चर्चा चालत, पण समलैंगिकतेचा कधी कुणी उच्चारही केला नाही. तुम्ही केवळ या विषयाकडे दुर्लक्ष करत होतात, की त्याच्या विरोधात होता, हे मला कसं कळणार? मी तुम्हांला सांगितलं, तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? तुम्हांला माझा राग येईल का... शरम वाटेल का... तुम्ही माझ्यापासून दूर जाल का... माझ्यावर पूर्वीसारखं प्रेम कराल का? नाहीनाही त्या शंकाकुशंका मला सतावत होत्या. तुमच्यापाशी यायला मी धजावत नव्हते. याशिवाय अनेकदा अनेक ठिकाणी गे किंवा लेस्बियन माणसांबद्दल गलिच्छ कुजबूज, विनोद माझ्या कानी येत होते. अतिशय वाईट शब्दांत, अश्‍लील पद्धतीनं त्यांचा उल्लेख होताना मी ऐकलं होतं. क्लबमध्ये वा शाळेत नाजूक दिसणार्‍या मुलांना इतर मुलं किती वाईट वागवत, हे मी पाहिलं होतं. साहजिकच मी लेस्बियन आहे असं कळलं, तर माझ्याशी सगळे असंच वागतील, अशी भीती माझ्या मनात घर करून होती. हे सगळे धोके पत्करण्यापेक्षा गप्प राहणंच शहाणपणाचं होतं, नाही का?'' मी सुन्न होऊन तिचे अनुभव ऐकत होते.

काही क्षण गप्प राहून शाल्मली हसली आणि म्हणाली, ''पण गंमत म्हणजे जसजशी मी मोठी झाले, तसतसं माझ्या लक्षात आलं, की 'आपल्यात काही कमी आहे, तिरस्कार वाटण्यासारखं आहे, आपलं मन गलिच्छ आहे' असलं काही मला अजिबात वाटत नाहीये. मी मित्रमैत्रिणींपेक्षा 'वेगळी' असेन पण माझ्यात कमतरता मुळीच नाही. उलट अभ्यास, खेळ, गाणं सगळ्यांत मी पुढेच आहे. हळूहळू या विषयावरचे अभ्यासपूर्ण निबंध, लेख वाचायला मी सुरुवात केली. त्यावर विचार करायला लागले. माझा आत्मविश्‍वास बळकट झाला आणि वाटलं, अम्मा-बाबाला सांगायला का घाबरावं? शेवटी तुम्हीच तर मला सत्याची चाड धरायला शिकवलं होतं. निर्भय होण्याचे धडे दिले होते. शिवाय लेस्बियन असण्यानं मी कुणाचंही वाकडं करत नव्हते, कुणालाही इजा करत नव्हते! हो ना?''

उत्तरादाखल मी तिला पुन्हा मिठीत घेतलं. माझ्यापाशी शब्द नव्हते. आईच्या नात्यानं मी तिच्या सर्वांगीण वाढीची सदैव काळजी घेतली होती. प्रत्येक बाबतीत तिला प्रोत्साहन दिलं होतं, पण जेव्हा तिच्या किशोरवयात तिला समलैंगिकतेची, स्वतःच्या 'वेगळेपणा'ची जाणीव झाली आणि ती गोंधळून गेली, तेव्हा तिला माझ्या मायेची, आधाराची खरी गरज होती आणि नेमकी तेव्हाच, मुलीची हेटेरोसेक्शुअ‍ॅलिटी गृहीत धरण्याची चूक केल्यामुळे मी कमी पडले होते!

समलैंगिकता मुलीच्या आयुष्यात एक महत्त्वाचा घटक आहे, हे कळल्यावर त्या बाबतीत सर्व काही व्यवस्थित जाणून घेण्याची मला आवश्यकता वाटली. मी तिला प्रश्‍न विचारायला, शंका बोलून दाखवायला सुरुवात केली आणि तीदेखील मनमोकळेपणानं, कसलाही संकोच न करता समजावून देऊ लागली. लेख, पुस्तकं वाचायला देऊ लागली. पुढे बर्‍याच समलिंगी स्त्री-पुरुषांशी माझी ओळख झाली, अनुभवांची देवाणघेवाण सुरू झाली. या सर्व प्रयत्नांतून, पूर्वी धूसर असलेलं समलैंगिकतेचं विश्‍व हळूहळू माझ्यापुढे साकार होऊ लागलं. समाजात त्यांच्याबद्दल ज्या समजुती प्रचलित आहेत, त्यांत वास्तव किती, दंतकथा किंवा फोल कल्पना किती, हे स्पष्ट व्हायला लागलं.

***

माझी या जगाशी ओळख झाली त्या वेळी म्हणजे १९९०च्या दशकात, समलैंगिकतेबद्दल भारतात सर्वसाधारणपणे प्रतिकूल वातावरण होतं. शतकानुशतकं ज्यांच्यावर अन्याय झाला, ज्यांचा आवाज दडपला गेला, हक्क हिरावले गेले अशा दलित, स्त्रिया, आदिवासी इत्यादी घटकांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी स्वतंत्र भारताच्या चाळीस वर्षांत संघटना उभ्या राहिल्या होत्या, चळवळी सुरू झाल्या होत्या. सामाजिक कार्यकर्त्यांच्या जोडीनं खुल्या विचारांचे बुद्धिजीवी, कलाकार, पत्रकार यांत भाग घेत होते. सरकारवर दबाव आणत होते. अल्पसंख्याकांच्या प्रश्‍नांबद्दलही त्या सर्वांना सहानुभूती वाटत होती. आणीबाणीनंतर घटनेत नमूद केलेल्या व्यक्तिस्वातंत्र्याविषयी व प्रत्येक नागरिकाच्या मूलभूत हक्कांविषयी समाजात अधिक जागरूकता होती; पण समलैंगिक मात्र अल्पसंख्य, अन्यायाचे बळी असून, त्यांचे मूलभूत हक्क हिरावले गेले असूनदेखील उपेक्षित व अंधारात राहिले. एकदा स्त्रीमुक्ती चळवळीशी संबंधित एका प्रसिद्ध कार्यकर्त्रीला ''तुम्ही स्त्रियांच्या प्रश्‍नांबरोबर लेस्बियन्सचे प्रश्‍नही हाती घेता का?'' असं मी विचारलं. यावर त्या बाई म्हणाल्या, ''छे! तो तर वरच्या वर्गातल्या बायकांचा प्रश्‍न आहे. आम्ही ज्या बायकांबरोबर काम करतो, त्यांचा नाही.'' ही त्यांची समजूत साफ चुकीची होती, हे अर्थात मला पुढे कळून चुकलं. (आज मात्र परिस्थिती बदलली आहे. स्त्रीमुक्ती चळवळीत काम करणार्‍या अनेक कार्यकर्त्या एलजीबीटी चळवळींत सक्रीय सहभाग घेतात.) वास्तविक समलैंगिकता दुनियेतल्या सर्व वंशांत, खंडांत, आर्थिक घटकांत, सामाजिक स्तरांत, जाती-जमातींत, तसंच धर्मांत सापडते. पाश्‍चात्त्य-पौर्वात्य, श्रीमंत-गरीब, शहरी-ग्रामीण अशा सगळ्या समाजात अस्तित्वात आहे. अगदी प्राचीन काळापासून आजपर्यंत.

समलैंगिकता मूळ भारतीय नाही, तर ती पाश्‍चात्त्य संस्कृतीतून आपल्याकडे आली, असं आपले संस्कृतिरक्षक सांगतात; पण तेही खरं नाही. प्राचीन भारतीय संस्कृतीत समलैंगिकता प्रचलित असल्याचे पुरावे पुरातन शिल्पांमध्ये व ग्रंथांमध्ये संशोधकांना सापडले आहेत. उलट ज्या नीतिमत्तेच्या कल्पनेतून समलिंगी लोकांवर हल्ला चढवला जातो, ती बुरसटलेली नीतिमत्ता राणी व्हिक्टोरियाच्या काळात आपल्यावर लादली गेली, तेव्हा खरंतर ही नीतिमत्ताच पाश्‍चात्त्य आहे!

समलैंगिकांबद्दलच्या चुकीच्या कल्पनांची यादी लांबलचक. अशी माणसं ठरावीक (बायकी?!) क्षेत्रांत वावरतात, ही अशीच एक गैरसमजूत! वास्तविक, समलिंगी माणसं कुठल्याही क्षेत्रात सापडतील. ती डॉक्टर, इंजिनीअर, वैज्ञानिक, राजकीय पुढारी, अर्थतज्ज्ञ, बँकर, पत्रकार, खेळाडू असे कुणीही असू शकतात. पोलिस, सैन्य वगैरे 'पुरुषी' क्षेत्रांतदेखील ही माणसं आढळतात. कला, फॅशन, जाहिरात यांत वावरणारे अनेकदा ओळखू येतात. प्रस्थापित क्षेत्रांत, करीअरवर घाला येऊ नये म्हणून बहुतेक जण समलैंगिकता लपवतात. देशातला समलैंगिकतेबद्दलचा कायदा, समाजातली सहिष्णुता यांवर या लोकांचं 'प्रकाशात येणं' बरंच अवलंबून असतं.

इतिहासात अनेक प्रसिद्ध समलिंगी व्यक्ती होऊन गेल्या. उदा. 'मोनालिसा' या प्रख्यात चित्राचा जनक लिओनार्दो दा विंची. चित्रकला, शिल्पकला, वास्तुशास्त्र, विज्ञान अशा सर्व तर्‍हेच्या विषयांतलं त्याचं श्रेष्ठत्व आज सहाशे वर्षांनंतरदेखील अबाधित आहे; पण त्याच्या काळात (पंधराव्या शतकात) इटलीतल्या कायद्याप्रमाणे, समलिंगी असल्याच्या आरोपावरून त्याला त्रास देण्यात आला, धार्मिक चित्र रंगवण्यास मनाई करून त्याचा अपमान करण्यात आला. एकोणिसाव्या शतकात ऑस्कर वाइल्ड या थोर आयरिश लेखक-नाटककाराला तो समलिंगी असल्याचं उघडकीला आल्यावर व्हिक्टोरियन कायद्यानुसार तुरुंगवास भोगावा लागला; पण विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जेव्हा मार्टिना नवरातिलोवा या प्रसिद्ध टेनिसपटूनं आपण लेस्बियन असल्याचं जाहीर केलं, तेव्हा अनेकांच्या भुवया जरी वर गेल्या, तरी तिला क्रीडाजगतात (आणि त्याबाहेरही) मानाची वागणूकच मिळाली. आणि एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच व्हिक्टोरिया राणीचा वंशज प्रिन्स विलियम याच्या लग्नसोहळ्यात एल्टन जॉन हा प्रसिद्ध समलिंगी गायक व्हीआयपी पाहुणा म्हणून आमंत्रित केला गेला!

आपल्या देशात 'इंडियन पीनल कोड कलम ३७७' खाली समलैंगिकता हा गुन्हा आहे. 'लैंगिक क्रियेचा एकमेव हेतू 'गर्भधारणा व त्यातून प्रजोत्पत्ती' हाच असायला हवा आणि म्हणून, केवळ सुख-समाधान देणारी लैंगिकता पाप आहे', असं मानणार्‍या सनातन धार्मिक विचारांतून, तसंच व्हिक्टोरियन काळातल्या संकुचित नीतिमत्तेतून या कलम ३७७चा उगम झाला. कायद्याच्या पाठिंब्यामुळे बुरसटलेल्या विचारांना पुष्टी मिळाली. समाजानं समलैंगिकांना वाळीत टाकलं. धर्म आणि समाज यांच्या दडपणाखाली कुटुंबीय आपल्या समलिंगी मुलांना नाकारायला लागले, लैंगिकता उघड झाल्यास नोकरी मिळणं मुश्किल, समाजात अवहेलना, वर कुटुंबाचा आधारही नाही! एखादा पुरुष 'गे' असल्याची नुसती शंका जरी आली तरी इतर पुरुषांकडून मारहाण, छळ, बलात्कार होण्याची शक्यता असे. असे समलिंगी पुरुष पोलिसांच्या अत्याचाराचेही वारंवार बळी होत, पण कायदाच प्रतिकूल असल्यावर दाद कुणाकडे मागणार?

लेस्बियन बायकांची कमीजास्त फरकानं अशीच स्थिती होती, पण यांना कुटुंबीयांचीच जास्त भीती होती. आपल्या पुरुषप्रधान समाजात मुलींची किंमत कमीच. मुलींच्या नियमबाह्य वागण्यामुळे कुटुंबाच्या प्रतिष्ठेला किंचित जरी धक्का बसला, तरी मुलीला कठोर शिक्षा करायला (प्रसंगी तिची हत्या करायला) घरचे पुरुष मागेपुढे पाहायचे नाहीत. स्ट्रेट मुलींची ही गत, तर लेस्बियन मुलींना वाली कुठून असायचा? अशा अनेक कारणांमुळे समलैंगिकतेभोवती अंधार पसरला; त्यांच्याविषयी सच्ची, वस्तुनिष्ठ माहिती मिळणं मुश्किल झालं आणि परिणामी चुकीच्या कल्पना, गैरसमजुती वाढत गेल्या. हे दुष्टचक्र चालत राहिलं आणि त्यातून समलिंगी मुलं आईबापांच्या प्रेमाला मुकली, स्वाभिमानास पारखी झाली, खरं रूप लपवावं लागल्यामुळे अस्मिता गमावून बसली, दुहेरी जीवन जगू लागली. अनेकदा त्यांच्यावर लग्नाची सक्ती झाल्यामुळे, त्यांचं स्वतःचं, तसंच त्यांच्या वधू/वराचं आयुष्य उद्ध्वस्त झालं.

२००९ साली दिल्ली उच्च न्यायालयानं ३७७ या कलमात बदल करून सम व अन्य लैंगिकांना न्याय मिळण्याच्या दृष्टीनं पहिलं पाऊल टाकलं. न्यायालयाचा निकाल होता- 'दोन प्रौढ समलिंगी व्यक्तींचा परस्पर संमतीनं खासगीत केलेला संग गुन्हा नाही.' कायद्यातल्या या अतिशय महत्त्वाच्या बदलामुळे देशातल्या एलजीबीटी (लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्ससेक्शुअल) लोकांत चैतन्याची लाट पसरली, त्यांचा आत्मविश्‍वास वाढला. यांच्या विरोधात सनातन विचारांचे लोक सर्वोच्च न्यायालयात गेले, तेव्हा समलैंगिकांना सहानुभूती दर्शवणारे लोक वेगवेगळ्या शहरांतून, निरनिराळ्या क्षेत्रांतून खूप मोठ्या संख्येत पुढे आले. त्यात वकील, प्राध्यापक, डॉक्टर, मानसशास्त्रज्ञ अशांचा समावेश होता. अनेक तज्ज्ञांनी ऐतिहासिक, वैद्यकीय दाखले देऊन समलैंगिकतेच्या बाजूनं शपथपत्रं न्यायालयात सादर केली. एक महत्त्वाचं शपथपत्र सर्वोच्च न्यायालयात सादर केलं ते एकोणीस आईबापांनी- ज्यांत मीही होते- आपल्या मुलांवर आजपर्यंत (म्हणजे दिल्ली उच्च न्यायालयानं कलम ३७७मध्ये बदल करण्यापूर्वीपर्यंत) कसा अन्याय झाला,त्यांना मानसिक, प्रसंगी शारीरिक छळ समाजात कसा सहन करावा लागला, आई-बाप या नात्यानं आमची कशी घुसमट झाली अशा अनेक गोष्टी त्यात मांडल्या होत्या. त्याचबरोबर लैंगिकता ही आमच्या मुलांची खासगी बाब आहे. त्यामुळे आमच्या मुलांत काहीही कमी आहे, असं आम्हाला वाटत नाही. ते सगळ्या बाबतींत आदर्श नागरिक आहेत. त्यामुळे त्यांना गुन्हेगार मानणं अन्याय्य आहे. आमच्या मुलांना त्यांचे घटनांतर्गत हक्क मिळायला हवेत आणि त्यासाठी कलम ३७७मधला बदल अत्यावश्यक आहे, हे आम्ही ठामपणे शपथपत्रात लिहिलं.

आमच्या या कृतीचा खूप मोठा परिणाम झाला. आई-बापांनी विरोधकांना न भिता उघडपणे मुलांची बाजू घ्यावी, त्यांच्या व आपल्या भावना व्यक्त कराव्यात, हक्कासाठी झगडावं, याचं अनेकांना आश्‍चर्य वाटलं, कौतुक वाटलं. तशातून टीव्ही, वर्तमानपत्रं, मासिकं यांनी आजवर दुर्लक्षित असलेल्या (किंवा केवळ अश्‍लीलतेच्या संदर्भात उल्लेख झालेल्या!) समलैंगिकतेची बाजू उचलून धरली. आई-बापांच्या, मुलांच्या मुलाखती, मान्यवर तज्ज्ञांबरोबर चर्चा, लेख, इत्यादींमधून या लोकांची वस्तुस्थिती, त्यांचे अनुभव, या विश्‍वाबद्दलची शास्त्रोक्त माहिती समाजातल्या इतर लोकांपर्यंत पोचू लागली. समाजातल्या सहानुभूतीचा ओघ काही अंशी वाढला.

आता दरवर्षी निरनिराळ्या शहरांत एलजीबीटी लोकांचे, त्यांच्याबद्दल सहानुभूती असणार्‍यांसह मेळावे भरतात, सार्वजनिक जागेत कार्यक्रम होतात, मिरवणुका निघतात. आई या नात्यानं मी अशा बर्‍याच गोष्टींत भाग घेतला आहे. भोवती जमलेल्या बघ्यांच्या चेहर्‍यावर नवल असतं, कुतूहल असतं; पण तिरस्कार मात्र मी आजकाल कधी पाहिलेला नाही. दगडफेक, अश्‍लील शेरे असलंही काही अनुभवलेलं नाही. तेव्हा एकूण वातावरण बर्‍याच अंशी निवळलंय. निदान मोठ्या शहरांत तरी होमोफोबिया कमी झालाय, यात शंका नाही; पण उत्साहाच्या भरात हे विसरून चालणार नाही, की गुन्हेगारीचा ठप्पा पुसला जाणं ही निव्वळ पहिली पायरी आहे. एलजीबीटींना त्यापुढेही खूप मजल मारायची आहे. नागरिक या नात्यानं लागू होणारे भारतीय संविधानातले सगळे हक्क मिळवायचे आहेत. नोकरी, आईवडलांची मालमत्ता, आर्थिक मदत अथवा सरकारी कर्ज इत्यादी बाबतींत समलैंगिकतेवरून भेदभाव (डिस्क्रिमिनेशन) होऊ नये, यासाठी जागरूक राहायचं आहे. समलिंगी जोडीदाराला साहचर्याचे हक्क मिळावेत, समलिंगी जोडप्याला 'कुटुंब' मानलं जावं, या जोडप्यांना मुलं दत्तक घेता यावीत, अशा अनेक गोष्टींत कायदेशीर तरतुदी करून घ्यायच्या आहेत. निव्वळ मोठ्या शहरांतच नाही, तर छोट्याछोट्या गावांतही समलैंगिकांना स्वीकारलं जावं, यासाठी झटायचं आहे. परंतु या सर्वांपेक्षा अधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपापल्या आईवडलांची, भावाबहिणींची, जवळच्या इतर कुटुंबीयांची मानसिकता पालटून, त्यांचा मनापासूनचा पाठिंबा मिळवायचा आहे.

आज समलैंगिकतेविषयीचं संशोधन खूप पुढे जात आहे. समलिंगी असणं म्हणजे पाप आहे, अनैसर्गिक आहे इत्यादी कल्पना चुकीच्या असून, त्या निव्वळ अज्ञानातून उद्भवल्या आहेत, असं मत तज्ज्ञांनी पूर्वीच व्यक्त केलं होतं (आणि माझ्या मुलीनं ते वीस वर्षांपूर्वी मला सांगितलंही होतं). त्याच्यापुढे जाऊन हल्ली वैद्यकीय संशोधनातून हेही सिद्ध झालं आहे, की 'सम अथवा विषम लैंगिकता जन्मतःच निश्‍चित होते.' जन्मतः निश्‍चित झालेली, नैसर्गिक समलैंगिकता ही 'बायोलॉजिकल फॅक्ट' असेल, तर 'आईवडलांना पसंत नाही, समाजाला पटत नाही' असल्या कारणांवरून ते बदलणं कसं शक्य आहे? अशा मुलांवर दडपण आणून, त्यांना साधूंच्या पायांवर घालून, अंगारे लावून, किंवा एखाद्या पैसेखाऊ डॉक्टरकरवी शॉक ट्रीटमेंट देवऊन त्यांची समलैंगिकता नाहीशी होईल, असं मानणंदेखील साफ चुकीचं आहे. खरी लैंगिकता लपवून, खोटं जीवन जगायला भाग पाडल्यास मुलं दुःखी होतात, तणावाखाली जगतात, कधी आत्महत्या करतात. अनेकदा तर आपल्या दबल्या लैंगिकतेला कसा ना कसा वाव देण्याच्या प्रयत्नांत रोगांची अथवा नीच लोकांची शिकार बनतात.

याउलट, आज उपलब्ध असलेल्या आधुनिक शास्त्रीय ज्ञानाचा/माहितीचा आधार घेऊन आईबापांनी जुन्या, चुकीच्या कल्पनांना तिलांजली दिली, तर त्यांना कौटुंबिक/सामाजिक विरोधाची काळजी करण्याचं कारण उरणार नाही. आपल्या समलैंगिक मुलांना तोडून, त्यांचं जीवन नष्ट करण्याऐवजी आईबाप त्यांचा मनापासून स्वीकार करू शकतील. आपल्या इतर मुलांसारखंच प्रेम व आधार त्यांना देऊ लागतील. अशा स्वीकृतीमुळे मुलंही आनंदानं जगतील, कर्तृत्ववान होऊ शकतील. समलैंगिकांना आईबापांचा पाठिंबा लाभल्यास, समाजाच्या मुख्य धारेत सामावलं जाणं त्यांच्यासाठी मुळीच अशक्य नाही, अशी माझी खात्री आहे.

***

समलैंगिक मुला-मुलींच्या पालकांना, किंवा समलिंगी मुलामुलींना काही शंका असतील, किंवा संवाद साधायचा असेल तर श्रीमती चित्रा पालेकर यांच्याशी parents@queer-ink.com या इ-मेल पत्त्यावर संपर्क साधता येईल. तुमचा पत्रव्यवहार, तुमची ओळख यांबाबतीत संपूर्ण गोपनीयता पाळली जाईल.

***
विषय: 
प्रकार: 

१ <बाबा आमटे आणि त्यांच्या कार्याचा आदर आहेच. नक्कीच आहे. त्यांनी आयुष्य वेचले नसते तर कुष्ठरूग्णांना अजुनही समाजाने वाळीत टाकलेच असते.
जर रस्त्यात कोणी कुष्ठरूग्ण भिकार्‍याने जर अंगाला हात लावून भिक मागितली तर जास्तीत जास्त लोकांची प्रतिक्रिया काय असते अजुनही. दचकून किळसवाण्या चेहर्‍याने लांब होतात ना.
अशा लोकांसाठी एक वेगळे जग निर्माण केले गेले हे चांगलेच झाले ना त्यांच्यासाठी ? की नाही ?
मग "या विशेष" लोकांसाठी पण असे एक वेगळे जग निर्माण झाले तर चांगले होईल की वाईट ?>

माझ्याकडे यावर आणखी एक सोप्पा उपाय आहे. समाजात काही व्यक्ती अशा असतात की ज्यांना या ना त्या कारणाने दुसर्‍या काही लोकांबद्दल किळस, घृणा, तिरस्कार, इ. वाटतो. अशा लोकांनी स्वत:च समाजापासून दूर करून घ्यावे. आपले असे एक नंदनवन वसवावे.

कुष्ठरोग्याबद्दल आपल्याला किळस वाटण्यात काही चुकीचे नाही. त्याबद्दल माझ्या मनात अपराधी भावना येण्याची गरज नाही. त्यांच्यासाठी वेगळे जग निर्माण झाले(?) हे त्यांच्यासाठी चांगलेच आहे असे आपणच ठरवायचे.
हे लिहिता लिहिता राग येण्याऐवजी मला रडू येऊ लागले आहे.
३.आपला जवळचा मित्र, सहकर्मी, नातेवाईक समलिंगी आहे हे कळले तर अचानक त्याच्याबद्दलच्या आपल्या भावना बदलून जातात. सतत डोळ्यांसमोर तो त्याच्या शय्यागृहात काय करत असतो याची चित्रे येऊन तोंड कडू होत राहते. बाकी आयुष्यात तो कसा का असेना, माझ्या जगातून तो वजा होतो. आता सांगा, आपल्या आजूबाजूला वावरणार्‍यांतले कोण लोक समलिंगी आहेत हे माहीत असते का? ते माहीत नाही झाले तर माझ्या डोक्याला कोणताही ताप नाही म्हणून ते मला माहीत व्हायला नको. त्यांनी कायम आपली ओळख लपवूनच राहायचे. इथे मला हिटलर आणि ज्यू लोकांची आठवण होते आहे. जसे कुष्ठरोगी दिसल्याने मला किळस वाटते म्हणून त्याने समाजापासून दूर राहायचे तसेच समलिंगी व्यक्तीच्या समलिंगी असण्याचा मला मानसिक त्रास होतो म्हणून त्याने समाजातून निघून जावे किंवा आपले समलिंगीपण लपवून/दडपून ठेवावे.

<पुढे मागे जेव्हा खुप मोठ्या प्रमाणावर "तथाकथित" जनजागृती होइल तेव्हा हे जग मुख्य प्रवाहात सामावून घेतले जाईलच. पण सद्ध्या असे होणे फार अवघड आहे.>

आता बहुसंख्य जनमत समलैंगिकतेच्या विरोधात आहे असे वादासाठी मानू. पुढे जर ते बदलले तर आपण कुठे जाणार?

समलैंगिकता ही विकृती आहे हे मानणार्‍यांना बुरसटलेल्या विचारांचे म्हणायला बर्‍याच लोकांची हरकत दिसली. यातल्या अनेकांच्या इतर विषयांवरच्या विचारांवरही बुरसटलेपणाचा शिक्का बसलेलाच आहे. बुरशी हाही निसर्गाचा एक घटक आहे आणि त्यालाही अस्तित्वाचा अधिकार आहे हे मान्य आहे.

http://maharashtratimes.indiatimes.com/international/smoking/articleshow...

हे अर्थातच मटातील बातमी आहे. मुळ सम्शोधन काय म्हणते ते जाणुन घेणे महत्त्वाचे. नाहीतर सुतावरुन स्वर्ग गाठणारे मिडीयावाले कमी नाहीत. Wink

गापैजी, आपले लेखन म्हणजे homophobia चा वस्तुपाठच आहे.

आपले सर्व मुद्दे कुणीतरी खोडून काढेलच पण गे पुरुष केवळ मजा मारण्यासाठी तसे झालेले असतात हे वाक्य तर प्रचंड अज्ञानमूलक आणी भयावह आहे.

सुदैवाने नव्या पिढीत जागरूकता वाढलेली आहे आणी प्रबोधनाचा हा रेटा प्रबळ होईल आणी हे सारे समाजमान्य होईल.

>> गे चळवळीच्या मागे कोण आहे ते मी सांगत बसत नाही. वाचकांची इच्छा असल्यास लिहीन.

प्लीजच सांगाच. माझा अंदाज नंतर लिहीन.

गापै, अत्यंत दिशाभूल करणारा असा प्रतिसाद तुम्ही दिला आहे. त्यातही शेवटी गे लोकांबद्दल मला सहानुभूती वाटते वै. म्हणून स्वतःला redeem केलंय! तुम्ही गे लोकांच्या अशा एका गावातल्या एका वस्तीबद्दल लिहिलं आहे! Heterosexual लोकांची जगातल्या सर्व देशांत आणि जवळजवळ प्रत्येक गावात ही अशी वस्ती असते (जिला रेड लाईट एरिया असे म्हणतात)! तिथेही कुणा वासनांध व्यक्तीच्या सुखासाठी कोवळ्या मुलींचा बळी जात असतो! अनेक व्यसने चालू असतात. ह्यावर उपाय म्हणून आपण भिन्नलिंगी संबंध देखील आजाराच्या यादीत टाकूया का? कशाला हवीय सहानुभूती अशा लोकांना?
म्हणजे लक्षात येतंय का? तुम्ही साप साप म्हणून भुई धोपटताय! खरा साप आहे तो अज्ञानाचा, गैरसमजुतींचा आणि समाजाचा आणि कायद्याचा आधार नसल्याचा! आणि इथे बोलणारी लोकं समलिंगी संबंधांचा उदोउदो करत नाहीयेत तर त्यांना समाजात समान न्याय आणि सन्मान मिळावा ह्यासाठी प्रयत्न करत आहेत. तुमच्या sexual orientation चा जसा आणि जितका आदर राखला जावा असं तुम्हाला वाटतं तसाच आणि तेवढाच आदर ह्या व्यक्तींना मिळावा ह्यासाठी प्रयत्न चालू आहेत.

चिनूक्स,

तुम्ही दिलेल्या लिंक्स ओपन केल्या आणि त्या वेळेपासून आत्तापर्यंत त्या वाचायला वेळ झालेला नाही व आजही होण्याची शक्यता नाही. पण जे काही पटकन वचले त्यावरून ते मला सहज समजणार नाही इतके तरी समजले. (मी आधी अशी विनंती केली होती की समजायला सोप्या भाषेत काही असले तर कृपया शेअर केले जावे, पण ते बहुधा अवघड असावे). तरीही आज उद्या त्या लिंक्स वाचायचा व समजून घेण्याचा प्रयत्न करतो व त्या वाचून काय वाटले ते लिहितो. लिंक्स देण्याबद्दल आभारी आहे.

नंतरच्या चर्चेत मात्र वाचनापुरतेही सहभागी होता आलेले नाही.

चित्रा पालेकरांचा लेख इथे शेअर केल्या बद्दल धन्यवाद , चिनुक्स !
लेख आवडला ..
बाकी इथली चर्चा नेहेमीच्या दिशेने चाल्लेली पाहून काही आश्चर्य वाटलच नाही .. काही पोस्ट्स तर खरच निषेधार्‍ह !
जिज्ञासा,
पोस्ट्स आवडल्या .
बाकी 'अनैसर्गिक' आणि नैसर्गिक वाद नेव्हर एंडींग आहे ..
तसं शोधलं तर ' monogamy is unnatural' या theory ला सपोर्ट करणारी अर्टीकल्सही भरपूर सापडतील मग !
त्याबद्दल उद्या एखाद्या गृपने याबद्दल कायद्याला चॅलेंज केलं आणि लग्नसंस्था मोडीत काढली तर आश्चर्य वाटून घेउ नये मग :).

या एकंदरीतच प्रकरणाबद्दलचे मला झालेले आकलन असे आहे:

१.
कलम ३७७ मध्ये 'अनैसर्गिक' संभोग म्हणजे काय त्याची व्याख्या केलेली आहे.
त्यात अनेक प्रकार नोंदविलेले आहेत. या प्रकारात सहभागी होणारा जेनेटिकली हेटेरोसेक्सुअल वा होमोसेक्सुअल ओरिएंटेशनचा आहे किंवा कसे, याबद्दल काहीही गृहितक नाही.
याच कलमाने त्या प्रकारे वर्तणूक करणार्‍यास शिक्षा नोंदविलेली आहे.
न्यायालयाने दिलेल्या निर्णयात, हे कलम बदलायचा अधिकार न्यायालयाकडे नसून तो संसदेकडे आहे, सबब, या प्रकारच्या संभोगक्रीयांना शिक्षापात्र ठरवायचे किंवा कसे, या बद्दलची प्रक्रिया संसदेने चालवावी इतकेच म्हटले आहे.
(यात काही चूक असल्यास कृपया सांगावे)

२.
सज्ञान समलैंगिकांना त्यांच्या शय्यागृहात, परस्परसंमतीने, त्यांना हवे त्याप्रकारे शरीरसुख भोगताना, या 'अनैसर्गिक' संभोग कायद्याचा आधार घेऊन त्यांच्यावर गुन्हेगारी करीत असल्याचा जो ठपका ठेवला जाऊ शकतो, तो हटवावा, अशी मागणी आहे.

३.
यापुढल्या पायरीत,
अ] समलिंगी आकर्षण वाटते म्हणजे काहीतरी विकृतीच आहे, असे नव्हे, हे समाजाने मान्य करावे,
ब] ज्याप्रकारे विषमलिंगी संबंधांसोबत विवाहसंस्थेसारखी मालमत्ता वाटणी व सामाजिक आंतरक्रीयांसाठीची प्रणाली आहे, तशी उभारण्यास एल्जीबीटी लोकांना प्रयत्न करू द्यावे, गरज पडल्यास त्याला कायद्याने मान्यता द्यावी अशी मागणी आहे.

*
आता थोडे लिहितो. चूभूद्याघ्या.

आहे त्या समाजमान्य प्रणालींत बदल घडवायचे प्रयत्न सुरूच असतात, या अनुषंगाने बालविवाह, सती प्रथा बंद करणे. विधवा विवाह सुरू करणे. इ. उदाहरणे देण्यात आलेली आहेत. (या सर्व प्रथा लैंगिकतेशी, मग विवाहाशी व संपत्तीच्या वाटपाशीच निगडीत आहेत, हे कृपया लक्षात घ्या. आपल्या परम-धार्मिक गापैंच्या हे लक्षात आणून देवू इच्छितो, की शिवराळ तोंडाने निबर सांडसोट्या असले शब्द लिहिले, तेव्हा ६०-७० वर्षांपूर्वी सर्रास समाजमान्य असलेली बालविवाह प्रथा नक्की काय करीत होती, याचा विसर पडला होता का?)

यापुढचे उदाहरण मनात आले, ते लिव्ह इन रिलेशनशिप बद्दलचे आहे. याप्रकारे संबंध ठेवणे हे प्रस्थापित विवाहसंस्थेच्या विरुद्ध आहे. पण, या प्रकारास समाजमान्यता मिळाल्यानंतर मालमत्ता, अपत्यांची जबाबदारी इ. बद्दलचे नियम तयार होऊ शकतात.

यासंदर्भात न्यायालयाने आधीच लिव्ह इन ला अनुकुल निर्णय देणे सुरू केलेले आहे. याच बेसिसवर समलैंगिकांनी कायदेशीर मान्यता मिळवण्यासाठी लढा देण्यात काहीच चूक नाही.

*

'धार्मिक' लोकांचा विरोध, हा 'विवाह' किंवा लैंगिक संबंध ही 'धार्मिक' बाब आहे, कारण ती वागणूक 'नैतिकता' सदराखाली येते. नीती, संस्कार ही आमचीच मक्तेदारी आहे, व म्हणून याबद्दल आम्ही म्हणू तीच नीती व संस्कार, म्हणू आम्ही म्हणू तेच कायदे, अशा प्रकारचा आहे.
इथे ऑलरेडी कायद्याचा हस्तक्षेप होऊन चुकलेला आहे, व भिन्नलिंगींच्या विवाहपद्धतींतल्या धर्ममान्य प्रथा कायदे करून बदलल्याही गेल्या आहेत. त्यामुळे यांच्या अकांडतांडवाकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही.

*

राहिला प्रश्न समलैंगिकता नॉर्मल की अ‍ॅबनॉर्मल? नॅचरल की अननॅचरल? समाजमान्यता द्यावी की नको?

एकाद्या कुटुंबात सुमारे ९९% लोक शाकाहारी आहेत, तर त्यांत अंडी/मांस खाणारा सदस्य 'अ‍ॅबनॉर्मल' होतो. पण 'अन-नॅचरल' नाही. (अर्थात मांसाहार वा मिश्राहार करणे हे मानवाच्या दृष्टीने अननॅचरल आहे असा प्रचार शाकाहारी करतात, तो भाग अलाहिदा.)

२५ वर्षांपूर्वी दारू पिणार्‍यास दारूडा म्हणत, आज बापलेकांनी एकत्र बसून ड्रिंक्स घेणे प्रतिष्ठित व समाजमान्य आहे. तेव्हा समाजमान्यता कधी कशास मिळेल, ते सांगता येत नाही..

फक्त नॅचरलबद्दल माझे मत थोडे वेगळे आहे.
यातही 'निसर्गात आढळते ते नॅचरल' अशी व्याख्या केली तर समलैंगिक हे या निसर्गातच आढळतात, या अर्थाने नैसर्गिक.

पण, निसर्गातच उभयलिंगी प्राणी आढळतात, वा लिंग नसलेले प्राणी देखिल, उदा अमिबा, जे प्रजोत्पादन करून स्वतःची जात (स्पेसीज) पुढे नेण्यास सक्षम असतात.

याच नैसर्गिक उत्क्रांतीतून भिन्नलिंगी प्राणी निर्माण झाले, व त्याद्वारे उत्पन्न होणारी प्रजा त्या स्पेसीजला टिकवून ठेवण्यासाठी अधिक सक्षम बनली. (याची जेनेटिक कारणे इ. लिहिली तर वेगळा लेख होईल Wink )

या दृष्टीने विचार केला, तर आजतरी, विषमलिंगी शरीरसंबंध हे 'नैसर्गिक' आहेत. समलिंगी नव्हेत.

पण आजच्या मानवी उत्क्रांतीच्या पायरीचा विचार केल्यास, गेली कित्येक वर्षे मानव शरीरसंबंध हे निव्वळ प्रजोत्पत्तीसाठी ठेवीत नाही. प्रजोत्पत्ती होऊच नये अशी कॉन्शस विचारधारणा करून, संततीनियमनाचि साधने वापरून हे संबंध ठेवले जातात. मग या न्यायाने, समलिंगी संबंध योग्य. (प्रजोत्पादनासाठी एका लेव्हलला, आजतरी स्त्रीशरीरातल्या गर्भाशयाची गरज आहे. बाकी फलन गर्भधारणा इ. परिक्षानळीत केली जाऊ शकते. कदाचित काही दिवसांनी संपूर्ण कृत्रीम गर्भाशय व क्लोनिंग आले, तर ही एक उत्क्रांती समजून संभोगातून प्रजोत्पादन वेगळे निघून समलैंगिकता / विषमलैंगिकता हे केवळ एक वेळ घालविण्याचे सुखद साधन म्हणूनच उरेल व वेगळीच समाजरचना येईल.)

पण तोपर्यंत तरी, वर म्हटलो तसं, विषमलिंगी = नैसर्गिक.

अरे, कमाल आहे कुष्ठरोग्यांबद्दल सर्वसामान्य माणसांच्या मनात काय भावना असते हे मी जर उघडपणे लिहिले तर रडू का यावे कोणाला ? याचा अर्थ मी खुप दुष्ट आहे असा नाहीये, तर सहजपणे लोकांना अशा गोष्टींची किळस वाटतेच, मग अशा स्थितीत या लोकांना समाजात राहून त्रास होत असेल दुय्यम वागणूक मिळत असेल तर त्यांच्यासाठी आनंदवन सारखी संस्था चांगले जीवन जगण्याची संधी देत असेल तर ते चांगलेच नाही का ? असो, या मुद्द्यावर मी परत लिहिणार नाही.

@सायो - येस तुझे निरिक्षण बरोबर आहे आणि माझी मते तीच आहेत, आधीच्या धाग्यावरची.

@गापै - बरीच महत्वाची (?) दिल्याबद्दल धन्यवाद.

>>आता बहुसंख्य जनमत समलैंगिकतेच्या विरोधात आहे असे वादासाठी मानू. पुढे जर ते बदलले तर आपण कुठे जाणार?
असे प्रबळपणे वाटत आहे की माझ्या हयातीत तरी असे काही पहावे लागणार नाही. आणि जर चित्र बदलले तर त्यावेळच्या परिस्थितीनुसार रिअ‍ॅक्शन असेल.

हार्मोन्सच्या असंतुलनामुळे निर्माण झालेली ही एक मनोवृत्ती आहे, आणि वैद्यकीय जग यावर उपाय शोधायचा सोडून याला पाठिंबा का देत आहे तेच कळत नाहीये.

@ सर्वजण - कृपा करून एक लक्षात घ्या जेव्हा काही ठराविक लोकांमधे वेगळेपण असते तेव्हा ते कायम वेगळेच गणले जातात. तुम्हाला पटो न पटो हे असेच निसर्गात.

<अशा स्थितीत या लोकांना समाजात राहून त्रास होत असेल दुय्यम वागणूक मिळत असेल तर त्यांच्यासाठी आनंदवन सारखी संस्था चांगले जीवन जगण्याची संधी देत असेल तर ते चांगलेच नाही का ? >

'या' लोकांना समाजात राहून त्रास होत असेल तर त्याचा दोष कुणाचा? समाजाचा की त्या लोकांचा? ज्याचा दोष असेल त्याने तो दोष दूर करायचा प्रयत्न करायचा की निर्दोष घटकाला समाजाबाहेर काढायचे? समाजाने त्या माणसाचे जीवन खराब करायचे आणि आनंदवनाने ते सुधारायचे हा कुठला न्याय आहे?

हा परिच्छेद प्रथम कुष्ठरोग्यांना, मग विधवा स्त्रियांना आणि मग समलिंगींना डोळ्यांसमोर ठेवून वाचता येतो का ते पहा.

इब्लिस केवळ भिन्नलिंगी शरीरसंबंधच नैसर्गिक का याचे तुम्ही लिहिलेले कारण कळले नाही.

उजवा हात वापरणारेच नैसर्गिक डावरे नाहीत का? असा प्रश्न पडला.

बाबा रामदेव यांच्या मते हो. सचिन तेंडुलकर डावखुरा असूनही उजव्या हाताने फलंदाजी करतो, तर समलिंगींना आपले ओरिएन्टेशन बदलणे सहज शक्य आहे असे त्यांचे म्हणणे आहे.

@इब्लिस- मुद्देसूद प्रतिसाद, आवडला.

आजच्या टाईम्समधे 'इंडियन सायकियाट्रिक सोसायटी' च्या नुकत्याच निवृत्त झालेल्या अध्यक्ष डॉ. इंदिरा शर्मा यांचे या विषयासंदर्भात (बरेच वादग्रस्त असलेले) मत आलेले आहे, त्यांच्यामते असे संबंध 'अनैसर्गिक'च मानले जावेत. ज्यांना आपल्या लैंगिकतेसंबंधी 'संभ्रम' आहे त्यांनी मानसोपचाराची मदत घ्यावी असेही सुचवले आहे !

>>आजच्या टाईम्समधे 'इंडियन सायकियाट्रिक सोसायटी' च्या नुकत्याच निवृत्त झालेल्या अध्यक्ष डॉ. इंदिरा शर्मा यांचे या विषयासंदर्भात (बरेच वादग्रस्त असलेले) मत आलेले आहे, त्यांच्यामते असे संबंध 'अनैसर्गिक'च मानले जावेत. ज्यांना आपल्या लैंगिकतेसंबंधी 'संभ्रम' आहे त्यांनी मानसोपचाराची मदत घ्यावी असेही सुचवले आहे !
बघा ज्यांचा अभ्यास आहे असे लोक काय म्हणत आहेत.

मयेकरजी,
त्या आधीच्या परिच्छेदात समलैंगिकता नैसर्गिक, हे देखिल म्हटले आहे. ज्या प्राण्यांत दोन लिंगे सापडतात, त्यांच्यात समलिंगी संभोग होत असला, तरी दोन लिंगे ज्या कारणाकरता निर्माण झालीत, त्या कारणासाठी तो होत नाही, या अर्थाने 'अनैसर्गिक'
नैसर्गिक शब्दाच्या व्याख्येबद्दल आहे.
चिनुक्स यांच्या लिंका वाचा Happy

ता.क.
उभयलिंगी = स्त्री व पुरुष 'जननेंद्रिये' एकाच शरीरात आढळतात असे प्राणी.

Any act of sex which is not of reproductive nature is unnatural or not what nature meant असे म्हणायचे आहे का? ठीक आहे.

ज्यांना आपल्या लैंगिकतेसंबंधी 'संभ्रम' आहे त्यांनी मानसोपचाराची मदत घ्यावी असेही सुचवले आहे ! >>>> संभ्रम असेल तर कन्क्लुजनवर येण्यासाठी लागली तर मानसोपचाराची मदत घ्यायला हवी.

अल्बिनो आणि ड्वार्फ्स जसे जीन्समधल्या म्युटेशनमुळे जन्माला येतात आणि त्यांच्यासाठी ते नैसर्गिकच असतं तसंच समलैंगिकता ही जेनेटिक कारणाने असेल तर त्या व्यक्तींसाठी ती नैसर्गिकच नाही का? तीनही बाबतीत कुणाचाच दोष नसतो, त्यात निसर्गाव्यतिरिक्त कुणीही ढवळाढवळ केलेली नसते.

ज्यांचं होमोसेक्श्युअल ओरिअंटेशन नसेल आणि तरीही एक थ्रिल म्हणून किंवा आपणही करुन बघावं अश्या विचाराने किंवा सेक्शुअल एक्स्प्लॉयटेशन करण्यासाठी कुणी स्वतःला तसं प्रोजेक्ट करत असेल तर त्याच्याबाबतीत नो कमेंट्स / निगेटिव्ह वोटिंग. पण अश्या लोकांमुळे निव्वळ निसर्गाच्या करामतीमुळे समलैंगिक असलेल्या लोकांना भरडले जाऊ नये इतकंच वाटतं. समाजाच्या वाईड स्पेक्ट्रममध्ये विविध ठिकाणी असलेल्या वेगवेगळ्या घटकांसाठी आपण संवेदनशील असतो तर ह्यांच्यासाठी का नाही?

एक्झॅक्टली मयेकरजी.
त्याच अर्थाने ते त्या कायद्यात आलेले आहे.

Using reproductive organs for purposes they were not made for,. या व इतक्याच अर्थाने अ‍ननॅचरल असे मी म्हटलो.

But then again, people can derive 'sexual pleasure' without using reproductive organs or from non-reproductive acts too. Wink

पण मी हे जे सगळे लिहिले आहे त्याचा अर्थ, समलैंगिकता हा गुन्हा आहे असे मी म्हणतो, असा कुणी निष्कर्ष काढला, तर तो चुकीचा आहे, हे नमूद करतो.

त्या हिटलरला कशाला नावं ठेवायची? इथेही बरेच दयाळू हिटलर दिसत आहेत.

गापै तुम्ही जे लिहिलं आहे ते कोणत्याही घेट्टो ला लागू होईल. अगदी नैसर्गिक लोकांना जरी अशा बंदिस्त वस्तीत नेऊन ठेवलं तरी अशीच परिस्थिती उद्भवेल. असेच घेट्टो समाजात, देशात, जगात बनले जावेत अशी तुमची इच्छा आहे का? कारण ती सिस्टीम अनैसर्गिक आहे.

शिवाय, एकूण समाजातील (२०% अथवा २५% जे काही असतील त्या सर्व) समलिंगी व्यक्तींना मुख्य धारेपासून वेगळं काढल्याने समाजाचं किती नुकसान होईल ते लक्षात घ्या. इतक्या लोकांची क्रयशक्ती, क्रिएटिव्हिटी , टॅलेंट याला समाज मुकेल.

ज्यांचं होमोसेक्श्युअल ओरिअंटेशन नसेल आणि तरीही एक थ्रिल म्हणून किंवा आपणही करुन बघावं अश्या विचाराने किंवा सेक्शुअल एक्स्प्लॉयटेशन करण्यासाठी कुणी स्वतःला तसं प्रोजेक्ट करत असेल तर त्याच्याबाबतीत नो कमेंट्स / निगेटिव्ह वोटिंग. >> सध्या हेच जास्त होतयं असं मला वाटतं. अमेरिकेत आणि आपल्या देशातही. मीडिया आणि चित्रपट समलैंगिकतेला प्रमाणाबाहेर पब्लिसिटी देतायेत. त्यामुळे तरूण मुलांना समलैंगक असणं काहीतरी थ्रिल वाटू लागलयं. ह्याला कुठेतरी आवर घातला जावा असं वाटतं.

>>शिवाय, एकूण समाजातील (२०% अथवा २५% जे काही असतील त्या सर्व) समलिंगी व्यक्तींना मुख्य धारेपासून वेगळं काढल्याने समाजाचं किती नुकसान होईल ते लक्षात घ्या. इतक्या लोकांची क्रयशक्ती, क्रिएटिव्हिटी , टॅलेंट याला समाज मुकेल.

मुद्दाम वेगळे काढावे असे म्हणत नाहीये कोणी. त्यांनी जर तथाकथित मान्यतेचा मुद्दा लावून धरला नाही आणि आत्ता जसे चालू आहे तसेच कोणालाही न कळता गुपचूप संबंध (परस्पर संमतीने) चालू ठेवले तर कोण कशाला वेगळे व्हा म्हणेल.

अनैसर्गिक आणि अनैतिक या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. यावर नंतर लिहिन. तो पर्यंत कोणी लिहिले तर स्वागत.

>>सध्या हेच जास्त होतयं असं मला वाटतं. अमेरिकेत आणि आपल्या देशातही. मीडिया आणि चित्रपट समलैंगिकतेला प्रमाणाबाहेर पब्लिसिटी देतायेत.
अनुमोदन !

>>सध्या हेच जास्त होतयं असं मला वाटतं. अमेरिकेत आणि आपल्या देशातही. मीडिया आणि चित्रपट समलैंगिकतेला प्रमाणाबाहेर पब्लिसिटी देतायेत.
अनुमोदन !

आत्ता जसे चालू आहे तसेच कोणालाही न कळता गुपचूप संबंध (परस्पर संमतीने) चालू ठेवले तर कोण कशाला वेगळे व्हा म्हणेल.
<<
या वाक्याची "दांभिकता अ‍ॅक्सेप्टन्स इन्डेक्स" किती? Wink

गेल्या वर्षी माझ्या एका मित्रानं आत्महत्या केली. त्याच्या आईवडिलांनी त्याला घराबाहेर हाकललं होतं. ते फक्त थ्रिल म्हणून?? हा लेख आणि या लेखामुळे 'माहेर'कडे यावर्षी आलेला एक लेख, असे दोन लेख वाचून आलेले असंख्य फोन निश्चितच 'थ्रिल' म्हणून आले नव्हते. आईवडिलांशी, नातेवाइकांशी तुटणारे संबंध, हेटाळणीयुक्त टोमणे यात कसलं आलंय थ्रिल?

Pages