राग

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

संगीत!

संगीत कशामधे नाही? आपल्या रोजच्या जीवनात संगीत भरून राहिलेले आहे. नाद! साद! आलाप! भारतीय शास्त्रीय संगीत जगात सर्वश्रेष्ठ आहे हे तर आता नासानेही कबूल केलेले आहे. त्यामुळे भारतीय शास्त्रीय संगीताचा नाद नाही करायचा.

आजच्या वैश्विकीकरणाच्या काळात इंग्लंड-अमेरिका आणि इतर अशा अनेकविध जोगरफीच्या संगीताचे सूर आपल्या कानावर पडतात. काही सूर आवडतात, काहींची कानाला सवय होत जाते. थोडक्यात काय, तर कुठल्या जोगरफीमधे, कुठल्या प्रकारचे म्युझिक फेस करायला लागेल ह्याचा अंदाज बांधणे आता अशक्य आहे!

आपल्या भारतीय शास्त्रीय संगीतामधे विविध राग आहेत. प्रत्येक रागाचे नेमलेले सूर निराळे आणि वर्ज्य सूर निराळे. त्यामुळेच रागाची वेळ वेगळी, त्याचा परिणाम वेगळा आणि तदनुषंगाने मैफिलीच्या सुरुवातीचा राग वेगळा आणि मैफल संपवतानाचा राग वेगळा.

इतके सारे राग आहेत. त्यातला माझ्या आवडीचा राग कोणता असा प्रश्न विचारला, तर उत्तर अवघड आहे. पण सध्याचा आवडीचा राग जर कोणता असेल, तर तो म्हणजे "म्यानेजर राग". हा राग आता दिवसरात्र माझ्या मनात रुंजी घालतो. झोपेतून जागं करतो. आपल्या हातून काहीतरी घडावं अशी प्रेरणा देणारा हा राग आहे!

म्यानेजर राग -

वैशिष्ट्ये : -
१. ह्या रागाचे पहिले वैशिष्ट्य म्हणजे ह्या रागात कुठलेही स्वर वर्ज्य नाहीत.
२. ह्या रागाची कुठलीही निश्चित वेळ वगैरे नाही. हा राग कधीही गाता येतो. मात्र मार्च महिन्यात(वार्षिक सायकल संपताना) हा विशेष करून गायला जातो.
३. हा राग एकट्याने अर्थात सोलो पद्धतीनेही गायला जातो, परंतु सामुहिक गायनात तो विशेष खुलतो.
४. ह्या रागाला संगीताची साथ हवीच असे बंधन नाही.
५. काही काही रागांचं कसं असतं नां, की ते नवशिक्यांना गायला अवघड वाटू शकतात. हा राग मात्र नवशिक्यांनादेखिल हमखास जमतो. सहसा एका वार्षिक सायकलमधे ते गाऊ लागतात.
६. एकदा का ह्या रागाची मजा समजू लागली, म्हणजे इतर रागांमधे एकपट, दुप्पट, तीप्पट, चापट वगैरे न करता डायरेक्ट चापटीने सुरुवात करता येते.

मला ह्या रागाची "एस्पेरांतो"शी तुलना करण्याचा मोह कधीकधी अनावर होतो. ऐकीव माहितीनुसार ही जगभरातल्या लोकांची एकच अशी भाषा (उपभाषा) आहे. त्याद्वारे सगळे एकमेकांशी सहजगत्या संपर्क साधू शकतात. म्यानेजर रागही तसाच आहे. खरे तर संगीताला देश-भाषा वगैरे त्रिज्या नाही हे आता नासानेदेखिल मान्य केलेले असल्याने सदर मुद्दा स्वतंत्रपणे लिहीण्याची तितकीशी गरज नाही. पण हा राग प्रत्यक्ष मैफिलीतूनच नव्हे तर ईमेल - चॅट - व्हॉट्सॅप - ट्वीटर आणि फोन अशा कुठल्याही माध्यमातून गाता येतो. भावना व्यक्त करण्याचा भाव असावा मग माध्यम कोणतं का असेना असा तो तुलनेचा मुद्दा!

म्यानेजर रागाबद्दल किती लिहावं तितकं कमीच. त्यातून प्रत्येक दिवस ही एक नवी मैफल आहे अस मानणारा मी माणूस आहे. त्यामुळे सतत काही नवं सापडत राहतं आणि शिक्षण घडत जातं. बेफिकीरजींची एक प्रसिद्ध रचना किंचितशी बदलून इथे देऊन हा लेख संपवावा म्हणतो.

मारली मी नाईट तेव्हा थांबले नाही कुणी,
चांगले सारे परंतु, पाहिले नाही कुणी...

टीप : ह्या रागाविषयी विपुल लेखन झालेलं आहे हे मी प्रांजळपणे कबूल कर इच्छितो. परंतु, हा राग इतका महान आहे, की माझ्या परीने त्याचा विचार करून पहावा असं मला वाटू लागलं आहे. सदर वर्णनात जर काही कमी आढळली तर तो दोष सर्वस्वी माझा आहे, माझ्या म्यानेजरचा काहीही दोष नाही. अगदी नासाचा दोष असेल, पण माझ्या म्यानेजरचा? चक्! केव्हाही, कशातही, किंचीतही, कदापि नाही!

आभार - एस्पेरांतो
बेफिकीर साहेब - तुम्ही काही राग मानणार नाही. Happy
नासा - असो.

प्रकार: 
शब्दखुणा: 

१. ह्या रागाचे पहिले वैशिष्ट्य म्हणजे ह्या रागात कुठलेही स्वर वर्ज्य नाहीत.>>>>>>> मस्त लिहीलय.:फिदी: आवडले.

थोडक्यात का लिहीले? अजून खुलवता आले असते. उदा. सेक्रेटरी/ क्लार्क राग. चहावाले/ कॅन्टीनवाल्यान्चा राग.

ट्रॅफिकचा टेरेफिक राग.

अजून लिवा की ओ भाऊ.

आमच्याकडे क्लायंट राग असा एक प्रकार असतो. त्यातली मजा तर काय वर्णावी?

का रे इतकं आटोपतं लिहिलंयस?
अजून मस्त लिहू शकला असतास की...
पण, जे लिहिलंय्स तेही भारीच Proud

हे जबरी आहे Lol

त्यामुळे भारतीय शास्त्रीय संगीताचा नाद नाही करायचा. >> येथे जबरी लोल झाले. नुकताच चहा संपला होता म्हणून बरे Happy

ऋयामा...
लेख सुंदरच... असेच विविध राग शोधुन काढ, खरं तर शक्य असल्यास त्यांच्या 'आळवण्या'च्या वेळे बद्दल देखिल लिही... सगळ्यांनाच मजा येईल... Happy

@वाचक लोक...
तुम्हाला देखिल असेच वेग-वेगळे राग (... आणि त्यांचे उप-प्रकार) सापडू शकतील, तेव्हा तुम्ही देखिल या 'राग-दरबारा' मधे महत्वाची भर घालु शकता... Happy