हळवेपण कोडगे बनवणे जीवन माझे

Submitted by बेफ़िकीर on 10 January, 2014 - 12:41

हळवेपण कोडगे बनवणे जीवन माझे
माझ्यासोबत बहरत आहे मीलन माझे

कृष्णाने पुरुषाचा जन्म दिलेला आहे
वस्त्र कसे फेडेल कुणी दु:शासन माझे

तोच चेहरा दुर्दैवाने ठरला माझा
वेळोवेळी होई जो आच्छादन माझे

मिटरप्रमाणे सुखे कुठे देतात कधी ती
ही दु:खे वापरती निव्वळ वाहन माझे

ज्यांना क्षणभरचा सहवास हवासा होता
त्यांना जीवनभर पुरले आश्वासन माझे

तुला नकोसे व्हावे मी चोरीला जाणे
तुझ्या रोमरोमात वसावे चंदन माझे

तुझे खुळे आयुष्य निमुळते......प्रसरू शकते
विचारांतुनी बघ करुनी उच्चाटन माझे

रोज ठोकतो टाळा रात्री अस्तित्वाला
रोज सकाळी करतो मी उद्घाटन माझे

==============================

(अपूर्ण गझल)

==============================

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मतल्यात दोन मिसर्यांतील संबंध समजला नाही...

बाकी सगळे शेर आवडले...

मक्ता खूपच छान.

अपूर्ण्?

डॉ.कैलास गायकवाड | 10 January, 2014 - 23:17

मतल्यात दोन मिसर्यांतील संबंध समजला नाही...<<<

माझ्यामधील हळवेपणाला कोडगे करण्यासाठी मला 'हे' जीवन मिळालेले आहे. माझ्यातील हळवेपणाचे माझ्यावर असलेल्या कोडगेपणाच्या जबाबदारीशी (जबरदस्तीने) घडवण्यात आलेले मीलन रोज बहरतच आहे. (मी हळवेपणाकडून कोडगेपणाकडे यशस्वी प्रयास करत आहे - उपरोध).

(आशा आहे की आता संबंध समजला असावा)

=============

बाकी सगळे शेर आवडले...<<< धन्यवाद!

मक्ता खूपच छान.<<< आभार! तो मक्ता नाही, तूर्त रचलेल्या गझलेतील शेवटचा शेर आहे. Happy

अपूर्ण्?<<< काही गोष्टी सांगायच्या राहिलेल्या आहेत, बहुधा दोन किंवा तीन! नीट मांडता आल्या तर मांडेन!

धन्यवाद Happy

अपूर्ण गझल <<< उत्सुकता कमालीची वाढून बसली आहे

उद्घाटन << माबोवर हा शब्द असाच टाईप होतो हे आत्ता प्रतिसाद देताना लक्षात आले मी ह्याला टायपो मानून बसलेलो
मतल्याबाबत डॉ.साहेबांचे मत पटले मक्त्याबाबत नाही (कारण कुठल्याच शेरात तखल्लुस कुठे आहे ह्या गझलेत ? :))
दु:शासन आणि वाहन सर्वाधिक हटके आहेत ..
उच्चाटन हा शेर व्यक्तिशः मला सर्वाधिक छान आकळून आला आहे असे वै. म.

आभार

ज्यांना क्षणभरचा सहवास हवासा होता
त्यांना जीवनभर पुरले आश्वासन माझे

व्वा. शेवटचा शेर खिळवणारा.

संपादित.

मला एक कळत नाहीये की ह्या रचनेत मक्ता कुठे आहे?..मक्ता म्हणजे सहसा शेवट लिहिला जाणारा असा शेर ना ज्यात तखल्लुस असते ? की माझे आकलन कमी पडत आहे Uhoh

ज्यांना क्षणभरचा सहवास हवासा होता
त्यांना जीवनभर पुरले आश्वासन माझे

रोज ठोकतो टाळा रात्री अस्तित्वाला
रोज सकाळी करतो मी उद्घाटन माझे

>> व्वा!

मतलाही आवडला.

मतल्याबाबत यथामती माझ्या कुवतीस जमेल तितका अधिक विचार करत आहे मी
माझ्या मते याला मक्ता (तखल्लुसाचा शेर ह्या अर्थी )बनवता येइल.....

हळवेपण कोडगे बनवणे जीवन माझे
'बेफिकीर' राखत आहे मी वर्तन माझे

कुणाला आवडेल न आवडेल ह्याचा विचार न करता नेहमीप्रमाणे मनात येइल ते लिहून टाकले
न आवडल्यास क्षमस्व !

तोच चेहरा दुर्दैवाने ठरला माझा
वेळोवेळी होई जो आच्छादन माझे

ज्यांना क्षणभरचा सहवास हवासा होता
त्यांना जीवनभर पुरले आश्वासन माझे

रोज ठोकतो टाळा रात्री अस्तित्वाला
रोज सकाळी करतो मी उद्घाटन माझे

वा.. !

आच्छादन आणि चंदन हे विशेष आवडले

दु:शासन शेरात पुरुषाचा जन्म "कृष्णाने" दिलाय म्हणण्याचे नक्की प्रयोजन काय?

गझल आवडली. "तुझ्या रोमरोमात वसावे चंदन माझे" ही ओळ सर्वाधिक आवडली.

पुढील शेर सर्वाधिक आवडला-

ज्यांना क्षणभरचा सहवास हवासा होता
त्यांना जीवनभर पुरले आश्वासन माझे

धन्यवाद.

गझल आवडली!
<< रोज ठोकतो टाळा रात्री अस्तित्वाला
रोज सकाळी करतो मी उद्घाटन माझे >>
हा शेर खूप आवडला!