जे शक्य साध्य आहे निर्धार दे कराया...

Submitted by अतुल ठाकुर on 14 January, 2014 - 02:09

muk.jpg

जे टाळणे अशक्य दे शक्ती ते सहाया
जे शक्य साध्य आहे निर्धार दे कराया
मज काय शक्य आहे आहे अशक्य काय
माझे मला कळाया दे बुद्धी देवराया

मुक्तांगण फॉलोअपच्या सुरुवातीला आणि शेवटी ही प्रार्थना म्हटली जाते. या प्रार्थनेची प्रचिती यावेळच्या मिटींगमध्ये आली. या प्रार्थनेला मुक्तांगणचे योद्धे कशा तर्‍हेने अंमलात आणतात याचं प्रात्यक्षिकच यावेळी पाहायला मिळालं. माधवसरांनी सुरुवातीला मुक्तांगणची माहिती सांगताना नवा रुग्ण भरती करणे हे जबाबदारीचे काम कसे असते हे सांगण्यावर भर दिला होता. व्यसनाच्या अतिरेकामुळे रुग्णाला मधुमेह असुन शकतो. हृदयविकार, रक्तदाबाचा त्रास असु शकतो. त्याला फीटस येण्याचा आजार असु शकतो. दारु पिऊन पडल्याने डोक्याला मार बसलेला असु शकतो. आणि सर्वात गंभीर म्हणजे जर आत्महत्या करण्याकडे प्रवृत्ती असेल तर अनेक समस्या उद्भवु शकतात. मुक्तांगण हे हॉस्पीटल नाही. त्यामुळे रुग्णाची बारकाईने तपासणी करुनच प्रवेश दिला जातो. माधवसरांनी तेथे नवीन आलेल्यांना काहीही न लपवण्याची सुचना केली.

यावेळचे पहिले शेअरींग हे विशाल या नवोदित लेखकाचे होते. शाळेपासुन लिहिण्याची आवड असलेल्या विशाल यांची दोन पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. ते आपले चारोळ्यांचे पुस्तक दाखवायला घेऊन आले होते. सावळ्या रंगाच्या या तरुणाने वर्षभरापूर्वी सात नोव्हेंबरला मुक्तांगणमध्ये दाखल होण्यापूर्वी आपण पाच नोव्हेंबरलादेखिल प्यायलो होतो हे मोकळेपणाने सांगितले. त्यांची कॅलिग्राफीची आवड मुक्तांगणमुळे जोपासली गेली. माधवसरांच्या सल्ल्याने विशाल यांनी अच्युत पालव यांचा बेसिक अभ्यासक्रम पूर्ण केला आणि आता विशाल कॅलिग्राफीची कामे घेतात.

दीपावहीनींनी यावेळी शेअरींग करताना नुकत्याच झालेल्या ३१ डिसेंबरचा उल्लेख केला. पुर्वी ३१ डिसेंबर म्हणजे तणावाचा दिवस असे. दारु आणि पार्ट्या याशिवाय काहीच नसायचं. मात्र यावेळी त्यांचं कुटुंब सिंगापूर मलेशियाला गेलं होतं. तेथे जाताना विमानात ड्रिंक सर्व केलं जातं त्यामुळे काही क्षण दीपा वहिनींना मनातुन शंका आली होती. मात्र त्यांचे पती अगदी शांत होते. काहीही घडलं नाही. ट्रीप उत्तम तर्‍हेने पार पडली. नंतर लगेच त्यांच्या पतीने बोलताना आपली सरकारी नोकरी दारुमुळे गमावण्याची वेळ आली होती असे सांगुन आपल्या शेअरींगला सुरुवात केली. बायको, मुलगी आणि चांगले मित्र दुरावले होते. प्रकाश आपल्या मुलीबद्दल बोलताना हळवे झालेले दिसले. व्यसनाच्या काळात त्यांची मुलगी त्यांना प्रचंड घाबरत असे. बुवा, महाराज अनेक झाले. कसलाही उपयोग झाला नाही. दारु सोडण्याची चर्चा मित्रांबरोबर करतानाच दारुचे प्राशन चालत असे. रक्तदाबाचा विकार जडला होता. मात्र मुक्तांगणमधुन उपचार घेऊन बाहेर पडल्यावर सारेच बदलले. दारु सुटली. रक्तदाबाचा विकार आटोक्यात येऊन गोळी सुटली. मुलीशी आता नाते हे मैत्रीचे झाले आहे. व्यसनात असताना अतिआत्मविश्वास असायचा आता तो ताब्यात आला. आता ते स्वत: ड्रायव्हींग करतात. सारे शारिरीक त्रास संपले आहेत. आर्थिक त्रास संपले आहेत. कुणाचीही उधारी नाही. आता आहे ते फक्त आनंद नी समाधान.

उन्मेशना मुक्तांगणबाहेर येऊन फक्त एक आठवडाच झाला होता. घरापासुन दुर सलग पस्तीस दिवस राहण्याची सवय नव्हती त्यामुळे ते थोडे तणावाखाली होते. दाखल झाल्यादिवशी काही कारणाने त्यांना रात्री जेवावेसे वाटेना. तेव्हा मुक्तांगणच्या माणसाने त्यांना जेवण्याचा आग्रह केला. जेवण नको होते तर रात्री फ्रीजमधुन थंडगार दुध काढुन प्यायला दिले. त्या दिवसापासुन त्यांची तेथील माणसांशी मैत्रीच झाली आणि त्याना अगदी घरच्यासारखे वाटु लागले. उन्मेशना आधी वाटले होते आपण इतके वर्ष दारु प्यायलो. त्यापायी अनेक गोष्टी केल्या. पण मुक्तांगणमध्ये आल्यावर त्यांना जाणवले की व्यसनामध्ये आपल्यापेक्षाही फार पुढे गेलेली माणसे आहेत. उन्मेशना मुक्तांगण मध्ये दोन वर्षापुर्वीच यायचे होते. कळत होते पण वळत नव्हते. आता ते म्हणाले की जर दोन वर्षापुर्वीच आलो असतो तर जी शेवटची दोन वर्षे अत्यंत त्रासदायक अशी गेली ती वाचली असती. त्यानंतर एका त्र्याहात्तर वर्षीय आर्मी मेजरने बोलायला सुरुवात केली. या माणसाने अनेक वर्षे व्यसन केलं पण त्यांचा कुणाला त्रास नव्हता. बाटल्या घरी घेऊन येत. आणि पीत बसत. व्यसन प्रचंड वाढले होते. मुक्तांगणमध्ये उपचार झाले. आता चौदा वर्षे दारुला स्पर्श नाही. आयपीएच चे अकरा मजले हा माणुस त्र्याहात्तराव्या वर्षी पायी चढुन आला होता. त्यांच्या पत्नी "जे टाळणे अशक्य" ही प्रार्थना रोज सकाळी म्हणतात. ३३ वर्षे व्यसनी माणसाबरोबर त्यांनी संसार केला. त्यापरमेश्वराचे आभार यासाठी मानतात की पतीच्या व्यसनाचा मुलांवर परिणाम झाला नाही. मात्र त्यांनी अत्यंत तणावात ही वर्षे काढली. त्या स्वतः जबाबदारीच्या पदावर काम करीत होत्या. तेथे ऐन मिटींगमध्ये आपल्या पती कुठल्या अवस्थेत येईल याची काही खात्री नसे. त्यांनी त्यावेळची त्यांची मनस्थीती कशा तर्‍हेची झाली होती हे कळावे म्हणुन त्यांच्या मुक्तांगण प्रवासाबद्दल सांगीतले. त्यांनी पतीसाठी फक्त दिवसाच्या उपचारांची सोय घेतली होती. रात्री पुण्यात ते दोघे आपल्या नातेवाईकांकडे राहात. रिक्षावाल्यालादेखिल आपण मुक्तांगणमध्ये चाललो आहोत हे कळु नये अशी त्यांची इच्छा असे. त्यामुळे मुक्तांगणला जाताना ते दोघेही बर्‍याच आधी रिक्षा थांबवीत आणि तेथुन चालत जात. परततानाही तसेच. त्या स्वतः लेखिका आहेत. पतीचे व्यसन सुटल्यापासुन आपले पती आपल्यापेक्षाही चांगले लिहितात हे त्यांनी अभिमानाने सांगीतले. आता मेजर उत्तम कॅसिओ वाजवतात हे देखिल त्यांनी आवर्जुन नमुद केले. आता दोघे पती पत्नी सिनीयर सिटीझन्स साठी काम करतात. आणि त्यांचा ग्रुप अतिशय नावाजला गेला आहे. मेजरनी शेवटी एकच सांगीतले. दारुडा वाईट माणुस नसतो. आपण सर्व हिरे माणकेच आहोत. मुक्तांगणमध्ये आपल्यावरील व्यसनामुळे चढलेली धुळ झटकली जाते.

सर्वांचे शेअरींग झाल्यावर जाधव उठले. आजचा दिवस त्यांचाच होता. त्यांना बोलायला किंचीत त्रास होत होता. जीभ जड वाटत होती. प्रकृतीने सशक्त वाटणार्‍या या माणसाने अडखळत बोलायला सुरुवात केली. त्यांना व्यसन सोडायला खुप प्रयत्न करावे लागले होते. अनेक अ‍ॅडमीशन्स झाल्या. शेवटच्या वेळी पस्तीस दिवसांनंतर त्याना सोडण्यात आले नाही. मुक्तांगणमध्ये आफ्टर केअर नावाचा विभाग आहे. तेथे त्यांना हलवण्यात आले. ज्यांना आणखि उपचाराची गरज आहे किंवा बाहेर पडल्यावर ज्यांचे कुणीच नाही अशांना तेथे ठेवले जाते. ती माणसे मुक्तांगणसाठी कामे करतात. जाधवना तर घरी जाण्याची इच्छा होती. आफ्टरकेअरला हलवल्यावर तर ते खचुनच गेले. दोन आठवडे त्यांनी काहीच काम केले नाही. मग हळुहळु ते काही कामे करु लागले. पुन्हा काही दिवस गेल्यावर त्यांना वाटले आता आपल्याला बाहेर सोडतील. तर त्यांना वॉर्ड इनचार्ज बनवले गेले. ही हकीकत सांगताना जाधव स्वतः आणि ऐकणारे देखिल हसत होते. ते काम इमानेइतबारे पार पाडले. काही दिवसांनी घरी जाण्यासाठी वाट पाहात असलेल्या जाधवांना स्टोअर चे काम देण्यात आले. सहा महिने झाले. अजुनही घरी सोडण्याचा काही पत्ता नव्हता. जाधव यावेळी पुर्ण बरे झाल्याशिवाय मुक्तांगण त्यांना सोडणार नव्हते. पुढे मुक्ता मॅडमनी त्यांना आपल्या ऑफीसमध्ये बोलावले. आपली गाडी चालवण्याचे काम कराल का असे विचारले. हे काम मात्र जाधवांना पसंत पडले. हळुहळु ते तेथेच रमायला लागले. आणि मग ती घटना घडली.

जीभेवर फोड आला होता. अल्सर समजुन उपचार केले तरी बरा होत नव्हता. शेवटी कुणाला तरी पाहायला हॉस्पीटलमध्ये गेलेल्या जाधवांनी डॉक्टरना गाठुन आपली जीभ दाखवली आणि ते दुखणे कॅन्सरचे निघाले. जाधवांवर तर वीज कोसळल्यासारखे झाले. सर्वप्रथम ती बातमी ऐकल्यावर त्यांनी काय केले असेल तर ते मुक्तांगणमध्ये आले. त्यांनी ती बातमी तेथील माणसांना सांगीतली. घरी जाण्याची परवानगी मागीतली. जाधवांचा व्यसनाचा इतिहास असा होता की त्यांना एकटे पाठवणे अवघड होते. त्यातुन अशा बातमी नंतर निराश होऊन ते व्यसनाकडे वळण्याची शक्यता खुप होती. सर्वांच्याच मेहनतीवर पाणी पडले असते. यापुढील हकीकत सांगताना जाधवांना अश्रु आवरत नव्हते. जाधव गाडीत बसले. घरी पोहोचेपर्यंत दोन वेळा मुक्ता मॅडमचा फोन आला होता. दोन वेळा माधवसरांनी फोन केला होता. फक्त याच साठी की त्यांच्या मनात वाटेत एकटे असताना व्यसनाचा विचार येऊ नये. वेळोवेळी धीर दिला गेला. "हे ही दिवस जातील" हे मुक्तांगणचं स्लोगनच आहे. ते सतत त्यांच्यापुढे ठेवलं गेलं.

उपचारांच्या दरम्यान जाधवांच्या पत्नीची कसोटी लागली होती. नेहेमी मिटींगला येणार्‍या वहिनी या कसोटीला पुर्णपणे उतरल्या. टाटा हॉस्पीटलच्या रांगा, तेथल्या वेळा, तेथील औषधोपचार सार्‍यात त्या माऊलीने पतीला खंबीरपणे साथ दिली. जाधवांकडे पाहुन ते कॅन्सर पेशंट असतील असे वाटत नव्हते त्याचे रहस्य उलगडले. जेवण जात नव्हते, नाकातुन नळ्या घातल्या होत्या. तेव्हा वहीनी ज्युस पाजत असत. त्या नळ्याही खुप लहान बारीक होत्या त्यामुळे अगदी पाण्यासारखा ज्युस करावा लागत असे. टाटाला ऑपरेशनची तारीख होती आणि ती रद्द झाली आणि त्या दोघांना प्रचंड डिप्रेशन आले. नेमके त्याचवेळी माधवसरांनी घरी येऊन धीर दिला. पत्नीबद्दल बोलताना जाधवांचा गळा वारंवार दाटुन येत होता. पुढे वहीनीही बोलायला उठल्या त्याच्या डोळे आधीच अश्रुंनी भरले होते. जाधवांचे ऑपरेशन यशस्वी झाले होते. आता ते रिकव्हरीच्या मार्गावर होते. या सार्‍या प्रवासात मुक्तांगणने खुप साथ दिली. ऐन नैराश्याच्यावेळी माधवसरांचे घरी येऊन धीर देणे फारच मोलाचे होते हे सांगायला वहिनी विसरल्या नाहीत.

सर्वजण ही हकीकत ऐकुन भरल्यासारखे झाले होते. एका व्यसनात बुडालेल्या आणि त्यानंतर रिकव्हर झालेल्या माणसाला कॅन्सरशी तोंड देण्याची, त्याच्याशी दोन हात करण्याची ताकद आली कुठुन? अनेक वेळा जाधव अ‍ॅडमीट झाले होते. त्यांना त्यांच्या व्यसनाच्या विळख्यातुन सुटायला खुप प्रयत्न करावे लागले. मात्र कॅन्सरच्या विळख्याला जिद्दीने तोंड देऊन ते त्यातुन बाहेर पडले. जाधवांनी शेअरींग करताना सांगितले की मुक्तांगणमध्ये जे आठ महिने काढले त्यामुळे मन इतके खंबीर झाले होते कि मी कॅन्सरसारख्या दुखण्याला तोंड देऊ शकलो. जाधवांबद्दल विचार करत होतो. मुक्तांगण माणसाला व्यसनातुनच मुक्त करत नाही तर कसे जगावे हेही शिकवतं. एकेकाळी व्यसनाने विकल झालेली माणसे छातीत पोलाद भरुन बाहेर येतात. कुठल्याही संकटाला तोंड देण्यास सज्ज होतात. शेवटी पुन्हा प्रार्थना झाली. त्यातील "जे शक्य साध्य आहे, निर्धार दे कराया" या ओळीचा अर्थ मला आज उमगला होता.

अतुल ठाकुर
(मुक्तांगण फॉलोअप मिटींग रविवार दि. १२/१/२०१४ वेळ : १०:४५ सकाळी स्थानः आयपीएच, ठाणे)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक मला अतिशय आनंद देणारी गोष्ट आज घडली ती मायबोलीच्या मित्रांमध्ये शेअर करावीशी वाटते. आज दस्तुरखुद्द डॉ. अनिल अवचट यांनी फेसबुकवर माझ्या लेखाला प्रतिसाद दिला. काहींना माझा हा आनंद निव्वळ बालिशपणा वाटण्याची शक्यता आहे. बट आम रियली हॅपी!!!

muktangan_0.jpg

वाह... आज बर्‍याच चांगल्या गोष्टी वाचायला मिळत आहेत. मुक्तांगणबद्दल कित्येकदा वाचलय. नेहमीच मनाला उभारी देणार्‍या गोष्टी अनुभवायला मिळतात.
अभिनंदन आणि आभार, इथे लिहिल्याबद्दल.

वा, वा. छान लेख!
काय शक्य नि साध्य नि शिवाय बहुजनहिताय आहे तेहि माहित आहे.निर्धार तर आहेच. फक्त आळस! तो कसा घालवायचा?

हनुमानासारखे आहे लोकांचे. कुणि तरी उत्तेजन द्यायला पाहिजे. निदान एक सणसणित लाथ तरी हाणायला पाहिजे.