वाफाळलेला कटींग चहा .. !!

Submitted by तुमचा अभिषेक on 12 January, 2014 - 05:19

शनिवारची संध्याकाळ, सात-साडेसातचा सुमार, नेहमीपेक्षा बरीच रिकामी ट्रेन. हा थंडीचा प्रताप म्हणून ट्रेन रिकामी, की ट्रेन रिकामी असल्याने वारा अंगाला येऊन जास्तच झोंबत होता माहीत नाही. पण खिडक्या बंद करूनही सुरसुरत आत शिरत होता. किंबहुना बारीकश्या फटीतून तीरासारखा अंगावर झेपावत होता. कसलाही आवाज न करता. जे चार चौदा सहप्रवासी होते त्यांची वार्‍याचा विरुद्ध दिशेला बसायला मारामारी चालू होती. कसलेही भांडण न करता. निदान उबेसाठी म्हणून कोणाच्या तरी सोबतीची गरज यावेळी भासते तसे माझ्याबरोबर कोणी नव्हते. खरे तर एखादी शाल ओढून आपले स्टेशन येईपर्यंत मस्तपैकी ताणून द्यावी अशी ती थंडी, पण तीच शाल नसली की झोपही लागू नये अशी ती थंडी. एका शालेची कमतरता गुलाबी आणि बोचरी थंडीतील फरक उघड करून जात होती. पण तसाही माझ्याकडे झोपण्याचा पर्याय नव्हताच. मध्ये काही कामासाठी पाचच मिनिटांसाठी का होईना वाशी स्टेशनला उतरायचे होते.

वाशी स्टेशन ! शनिवार असो वा रविवार, गरमी असो वा थंडी, एक गजबजलेला परीसर ! पण स्टेशनबाहेरचा भलामोठा पटांगणासारखा आवार त्याच वेळी तितकाच मोकळा वाटणारा. स्टेशनबाहेर पडल्यावर समोरच्या रिक्षा वा बस स्टॅंड पर्यंत जाईस्तोवर याच मोकळ्या पटांगणातून थंडीशी लढत जायचे होते. पण जायचेच होते. माझे काम तिथेच होते. पाचच मिनिटांचे काम, पाचच मिनिटांत उरकले. आता पुन्हा त्या पटांगणातूनच परतायचे होते. पण त्याआधी शरीराला काहीतरी रसद पुरवणे गरजेचे समजले.

हि तेथील आणखी एक तुफान गर्दीची जागा. रिक्षास्टॅडला लागूनच. कित्येक चहा वडा सामोश्याच्या टपर्‍या. झालेच तर ऑमलेट अन भुर्जीपाव. चायनीज वा मसाला डोसे खायचे असल्यास त्याचीही सोय. उभे राहणे जीवावर आले असल्यास बसण्याजोगे ओपन रेस्टॉरंटस. जे सभोवतालच्या मॉल्सच्या फूडकोर्टमध्ये मिळते ते थोड्याफार फरकाने इथेही उपलब्ध. एक गर्दीची टपरी मी देखील पकडली. भूक अशी नव्हतीच, किंबहुना काहीतरी गरमागरम तोंडात पडावे एवढीच इच्छा. इथे चहाला पर्याय नसतो. वाफाळलेला गरमागरम कटींग चहा. सोबत वडापाव नुसता तोंडी लावण्यापुरता. पण मला त्याचीही गरज नव्हती. तरीही सवयीने सर्वांच्या किंमतीवर नजर टाकली. अन अखेर बोर्डाच्या तळाशी ठळक खडूने लिहिलेल्या चहापाशी येऊन स्थिरावली. ठळक खडू, म्हणजे किंमत नुकतीच वाढवलेली दिसत होती.. कटींग चहा - ६ रुपये.. फुल्ल चहा - १० रुपये..

आजूबाजुला दिसणार्‍या चहाच्या गिलासांवर नजर टाकली तर कटींग चहाला छोटा ग्लास तर फुल्ल चहाला मोठा. छोट्या ग्लासाचा आकार दोन बोटांच्या चिमटीत लपून जावा इतपत. कधी दोन घोटांत संपून जावी समजू नये. घरी असताना बरेचदा यापेक्षा जास्त चहा मी आज मूड नाही, जात नाही, म्हणत मोरीत ओततो. तेवढा चहा आज बाहेर सहा रुपये झालीय हे समजले. नाहीतर मी अजूनही कॉलेजला मिळणार्‍या दोन रुपये कटींगच्याच विश्वात होतो.

फुल्ल चहा घ्यायचे ठरवून पाकीटातले दहा रुपये काढायला हात बाहेर काढले, जे एवढावेळ जीन्सच्या पुढच्या खिशात खोचले होते. अन पुन्हा त्यांना गार वारा झोंबला तसे कधी एकदा पटकन पैसे ढिले करून चहा घेतोय असे झाले. पण चहा होता खरा दहा रुपये वसूल करणारा, हे त्याला हातांत घेताच समजले. दोन्ही हातांना एक छानसा चटका बसला. काठोकाठ भरलेला तो गरम काचेचा ग्लास माझ्या थंड हातांना जास्त वेळ धरवणे कठीण व्हायच्या आत खिशातून रुमाल काढून त्यात तो धरला. त्याच्या बाहेरच्या बाजूने काही चहाचे ओघळलेले डाग तर नाहीत ना याचा विचार न करता. त्या वाफाळणार्‍या चहाचा आस्वाद घ्यायला आता मी तयार होतो. ओठाला लावायच्या आधी मी तोंडाजवळ आणून त्यातून निघणारी वाफ नाकांत भरून घेतली. एवढावेळ प्रत्येक श्वासागणिक थंड वाराच आत शिरत होता. श्वास घेणे गरजेचेच असल्याने त्याला रोखायचीही सोय नव्हती. पण आता मात्र श्वासांमार्फत त्या चहावर दरवळणारी वाफ जितकी प्राशन करता येईल तितकी करून घेतली. पण पिण्यास एकदा सुरुवात करताच झरझर संपू लागला. शेवटचा घोट किंचित कोमटच भासला, अन अजून एक चहा प्यायची इच्छा झाली. चहापेक्षाही त्या वातावरणात अजून थोडावेळ वावरायची इच्छा होती. तेथील सिगारेटचा धूरही आज फारसा त्रासदायक न वाटता वातावरण गरमच करत होता. मूड बदलला तसे भोवतालचे जग अनुभवायची नजर बदलली. नेहमीच्या तरुणाईच्या हिरवळीला आज मफलरीचा साज चढल्याने ती वेगळ्याच रुपात खुलून आली होती. आता मी स्वताही तिचाच एक हिस्सा झालो होतो. पुनश्च लागलेल्या चहाच्या हुक्कीला न्याय द्यायला दहा रुपये जड नव्हतेच.

दुसरी चहा संपताच मात्र मी तडक तिथून निघालो. चहाने अंगात आलेल्या उबेचा इफेक्ट ओसरायच्या आधी पाऊले झपाझप उचलत. दोन्ही हात खिशांत टाकून, अंगाचे मुटकुळे करून. अन आजूबाजुला माझ्यासारख्याच अवस्थेत दिसणार्‍या जीवांना न्याहाळत. ईतक्यात एक नजर एका वृद्ध जोडप्यावर पडली. सदरा लेंगा अन लुगडे असा मराठमोळा पोशाख म्हणून साहजिकच वाटणारा एक आपलेपणा. एका मळलेल्या गाठोड्यात संसार बांधून एक आडोसा पकडून बसले होते. मात्र दुसर्‍या बाजूने येणारी वार्‍याची लाट थोपवायला उपाय नव्हता. याआधी कधी असे कोणाला रस्त्याच्या कडेला पाहिले नव्हते असे नाही, पण या वातावरणात.. अन या वयात.. कसे सहन करत असतील हा विचार मनात आल्याशिवाय राहिला नाही. लांबून पाहता कुडकुडताना दिसले नाहीत, कदाचित त्यांच्या वेदना मेल्या असाव्यात वा माझी नजर. माझा स्टेशनवर जायचा रस्ता थोडाफार त्या कडेनेच जात होता. त्यांच्यावर पडलेली नजर आता त्यांना पार केल्याशिवाय फिरवणे शक्य नव्हते. आणि म्हणूनच मी माझी पावले जरा जास्तच झपझप उचलू लागलो. त्यांना मदत न करता पुढे जातोय हि टोचणी जास्त वेळा सहन करावी लागू नये हा एकच हेतू. मदत करायची म्हटली तरी त्यांना द्यायला एखादी शाल वा चादर बरोबर नाही असे स्वताच्या सोयीने अर्थ काढत मी माझी वाट धरली. पण अखेरच्या क्षणाला, मनात काही आले आणि थोडीशी वाट वाकडी करून त्यांच्यासमोर दहा रुपयांची नोट सरकवून पुढे गेलो..

ते तिथे भीक मागायला बसले होते की नाही हे माहीत नव्हते. त्यांना मदतीची गरज होती की नव्हती हे ही माहीत नव्हते. अन असली तरी काय येणार होते त्या दहा रुपयांत.. दोघांत एक फुल्ल चहा.. की वाफाळलेली एकेक कटींग. पोटाची आग त्यापेक्षा जास्त असल्यास कदाचित त्या दहा रुपयांत एखादा वडापावच घेतला गेला असता. अन तो ही कदाचित थंडगार.. पण मला मात्र एवढा विचार करायची गरज नव्हती. माझे काम झाले होते, मला समाधान मिळाले होते. आता मनाला कोणतीही टाचणी लागणार नव्हती. पण जर तेच दहा रुपये सरकवले नसले तर कदाचित रात्री झोपताना मला चादरीतून ऊब मिळाली नसती. स्साला कुणाला मदत करतानाही आपण आपलाच स्वार्थ बघतो. स्वताच्या वाट्याचे सुखं उपभोगताना मनात कसलीही अपराधीपणाची भावना उपजू नये म्हणून आणि ईतपतच मदत करतो. स्वताला थंडी वाजली तरच दुसर्‍याच्या थंडीची जाणीव होते, स्वताला भूक लागली तरच दुसर्‍याच्या पोटाची आग कळते. ती सरकवलेली दहा रुपयांची नोट म्हणजे माझी स्वतासाठीच एक वाफाळलेला गरमागरम कटींग चहा होता, जी मला स्वतालाच उब मिळावी म्हणून खर्च केली होती. बाकी मुंबई म्हटले की बस्स चार दिवसांची थंडी.. त्यानंतर ना मला थंडी वाजणार होती ना कोणाला वाजतेय याची मी पर्वा करणार होतो..

- तुमचा अभिषेक

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुंबईत(ही) थंडी पडते, हे मजेदार वाटले. पण चहाच्या आठवणी ताज्या केल्या. चहाड्यांना चहा तो का ती, याचा फरक पडत नसावा Happy
शेवट मनाला टोचुन गेला. ४-५ वर्षांपुर्वी मुजफ्फरनगरपासुन जवळच २ वर्षे राहिलो होतो. आज तिथली परिस्थिती ह्या लेखातला शेवट वाचुन आठवली.
मित्रा, तु मदत केलीस, हे खुप आहे.

ती वाफाळती चाय कदाचित बरोबर ठरू शकले असते किमान
पण पुलंच्या नुसार मुंबईत चहा प्यालो ऐवजी चा पिली म्हणणारी मंडळी आहेत.

असो, लेखाबद्दल..तुमचे साधे सरळ सोपे अनुभव नेहमीच वाचायला आवडतात. थोडक्या गोष्टीत खूप अर्थ दडलेला असतो.

स्वताला थंडी वाजली तरच दुसर्‍याच्या थंडीची जाणीव होते, स्वताला भूक लागली तरच दुसर्‍याच्या पोटाची आग कळते.

या वाक्याला जोरदार टाळ्या...फारच भिडले हे वाक्य

मुंबईत(ही) थंडी पडते, हे मजेदार वाटले. >>>> आपण पुणेकर का Wink
असाल तर सांगा, तरच उत्तर देण्यात मजा Happy

सर्वच प्रतिसादांचे आभार आणि धन्यवाद,

आणि हो, मराठीची बोंब आहे खरी.. किंबहुना लिहायला लागल्यापासून सुधारतेय अन्यथा बोलीभाषेत आणखी जाणवते.. नक्कीच एवढे काही चांगले नाही की लिहितानाच आपसूक व्याकरणप्रूफ लिहिले जाईल, त्यामुळे बरेचश्या चुका प्रूफरीडींगमध्ये सुधारल्या जातात, तर उरल्यासुरल्या इथे निघतात ..

मुंबईत(ही) थंडी पडते, हे मजेदार वाटले. >>>> आपण पुणेकर का डोळा मारा
असाल तर सांगा, तरच उत्तर देण्यात मजा स्मित >>>>>>>>>>

नाही, मी विदर्भातला. दोन वर्ष मुंबईतही होतो. त्यावेळी (२००५~२००७) फक्त काही द. भारतीय लोकांनाच स्वेटर घालतांना बघितलं होतं. अर्थात त्यावेळी हिवाळ्यात रात्री गार वाटायचंच. पुणे शहराला माझ्या वास्तव्याचे फक्त ४ च महिने लाभ झाला. Biggrin

अभिषेक मस्तच !!!

स्साला कुणाला मदत करतानाही आपण आपलाच स्वार्थ बघतो. स्वताच्या वाट्याचे सुखं उपभोगताना मनात कसलीही अपराधीपणाची भावना उपजू नये म्हणून आणि ईतपतच मदत करतो. > हे वाक्य आवडले आणि पटले सुद्धा.

सामी सृष्टी धन्स Happy

विदे __ मी सुद्धा विदर्भ अनुभवलेय, गडचिरोली येथील ६-७ महिन्यांच्या वास्तव्यात, Happy इथे विषय थंडीचा आहे पण तिथला उन्हाळा न झेपल्याने अक्षरशा पळून आलो होतो.. Sad

असो, मुंबईतली थंडी, तिची आपलीच एक मजा असते, तो वेगळ्याच धाग्याचा विषय बनावा Happy

स्साला कुणाला मदत करतानाही आपण आपलाच स्वार्थ बघतो. स्वताच्या वाट्याचे सुखं उपभोगताना मनात कसलीही अपराधीपणाची भावना उपजू नये म्हणून आणि ईतपतच मदत करतो. स्वताला थंडी वाजली तरच दुसर्‍याच्या थंडीची जाणीव होते, स्वताला भूक लागली तरच दुसर्‍याच्या पोटाची आग कळते. ती सरकवलेली दहा रुपयांची नोट म्हणजे माझी स्वतासाठीच एक वाफाळलेली गरमागरम कटींग चहा होती, जी मला स्वतालाच उब मिळावी म्हणून खर्च केली होते - खर आहे .....