मालिका परीक्षण: स्टार प्लसवरचे महाभारत !! ( दर्जा: * * * * )

Submitted by निमिष_सोनार on 9 November, 2013 - 03:10

मालिकेचे नाव : महाभारत
निर्माते : स्वस्तिक पिक्चर्स
वाहिनी : स्टार प्लस (भाषा : हिंदी ) वेळ : सोम शुक्र रात्री 8:30 pm
वाहिनी : स्टार प्रवाह (भाषा : मराठी - डब) वेळ : सोम शुक्र संध्या ६:30 pm
मालिकेचा दर्जा : उत्तम ( * * * * )
संगीत दर्जा : उत्तम ( * * * * )

पुनर्प्रसारणाबद्दल :

सोमवार ते शुक्रवार रात्री 8:30 pm आणि पुनर्प्रसारण दुसऱ्या दिवशी सकाळी 8:00 am. तसेच शनिवारी आठवड्याभराचे एपिसोड संक्षिप्त स्वरूपात सकाळी 8 to 9 am या वेळेत आणि शनिवारी संध्याकाळी 5 to 7:30 pm संपूर्ण आठवड्याभराचे एपिसोडस असतात. रविवारी सुद्धा सकाळी संपूर्ण आठवड्याभराचे एपिसोडस असतात.

प्रस्तावना :

स्टार प्लस वर १६ सप्टेंबर २०१३ पासून महाभारत सुरू झाले आहे. ते छान आहे. नक्कीच!
जेव्हा विदुर दृतराष्ट्रा ऐवजी पांडूला राज्याभिषेक करावा असे सांगतो त्या एपिसोड पासून मी बघायला सुरुवात केली आणि विशेष म्हणजे मला हे महाभारत सुरू झाले याबद्दल कल्पना नव्हती, पण जेव्हा चॅनेल बदलता बदलता एक एपिसोड पाहिला तेव्हा त्याचा दर्जा पाहून लगेचच लक्षात आले की होय, हे महाभारत नक्कीच लोकप्रिय होणार आणि ते लोकप्रिय होत आहे हे नंतर विविध बातम्यांतून कळत गेले.

परीक्षण :

बऱ्याच काळानंतर एक सरस आणि दमदार सादरीकरण असलेले महाभारत आले आहे आणि त्यानंतरचे एपिसोड बघितल्यावर हा समज अधिक दृढ होत गेला. आपण बघत नसाल तर बघायला सुरुवात करा असे मी सांगेन. आधी महाभारता बद्दल माहिती असेल आणि नसेल तरीही हे बघताना मजा येईल. ज्ञान वाढेल. बोध मिळेल. दृष्टिकोन बदलेल.

मी लहान असताना दूरदर्शनवर 1988-90 साली बी. आर. चोप्रांचे महाभारत लागत होते. पण त्यातले संदर्भ वयानुसार कळत नव्हते.
त्यात "समय" आपल्याला कथा सांगताना दिसायचा (म्हणजे ऐकू यायचा). त्यात त्या काळाच्या मानाने स्पेशल इफेक्ट्स चांगले होते, निदान रामानंद सागर च्या रामायणाच्या तुलनेत ते इफेक्ट्स उच्च दर्जाचे होते.

त्यानंतर एकता कपूर ने 9X वाहिनीवर "कहानी हमारे महाभारत की" ही सिरियल सुरू केली होती पण त्याची भट्टी काही जमून आली नाही. टीकेमुळे ते बंद पडले. ते बरेच झाले.

आता चे हे स्वस्तिक प्रकाशनाचे स्टार प्लस वरचे महाभारत अधिक अभ्यास आणि मेहनत करून बनवले आहे, हे नक्की बघताना जाणवते! अबाल वृद्धांना आवडेल असेच ते बनवले गेले आहे आणि या महाभारतातले स्पेशल इफेक्ट्स लाजवाब आहेत. आपण एखादा चित्रपट बघतो आहे असेच वाटत राहते.

त्यातले वेळोवेळी पात्रांच्या तोंडी येणारे सुविचार, अधून मधून कृष्ण येऊन घडलेल्या प्रसंगावर भाष्य करतो ही कल्पना छान आहे. दर वेळेस तो म्हणतो, "स्वयं विचार किजिये" आणि खरेच त्याचे ते भाष्य आपल्याला विचार करण्यासारखे असते आणि आपल्याला जाणवते की आपल्याच भारतातल्या प्राचीन ग्रंथांमध्ये ऐतिहासिक व्यक्तींनी असे अनेक प्रकारचे तत्त्वज्ञान लिहून ठेवले आहे की त्यात आजच्या खासगी आणि व्यावसायिक, कोर्पोरेट जीवनातल्या अनेक प्रश्नांचे उत्तर सापडते. (महाभारत, चाणक्य, रामायण, शिवाजी, पेशवे, महाराणा प्रताप वगैरे)

अगदी सोप्यात सोप्या शब्दांत कृष्ण हे तत्त्वज्ञान सांगतो ते अगदी वाखाणण्याजोगे !!!

महाभारताच्या कथेबद्दल दोन तीन वेगवेगळी मते नक्कीच असतील. त्या अनुषंगाने निरीक्षणा अंती मला असे जाणवले आहे की रोज "कल देखिये" मध्ये जे प्रसंग दाखवतात ते थोडे बदलवून दुसऱ्या दिवशी मात्र वेगळेच दाखवतात. मला वाटते अगदी सूक्ष्म अभ्यास करून अगदी भव्य दिव्य प्रमाणात सढळ हाताने खर्च करून हे बनवलेले दिसते. म्हणून त्यांनी एकच प्रसंग वेगवेगळ्या प्रकारे चित्रित केलेला दिसतो पण वेळे अभावी त्यांना ते सगळेच दाखवता येत नसावे. म्हणून ते "कल देखिये"मध्ये थोडे वेगळे दाखवतात.

सेट्स उत्तम आहेत. इस्माइल दरबार आणि अजय अतुल यांचे संगीत सुद्धा अप्रतिम आहे. त्यामुळे हे महाभारत अक्षरशः जिवंत बनले आहे.

कालपर्यंत गोष्ट इथवर आली आहे:

भीमावर दुर्योधन आणि शकुनी यांनी मिळून खिरीतून विषप्रयोग करतात आणि मेल्यानंतर त्याला नदीत फेकून देतात. त्यानंतर वासुकी कडून विष नष्ट होवून भीमाला शंभर हत्तींचे बळ मिळते आणि स्वतःच्या तेराव्याला भीम हस्तिनापुरात परतून भीष्म, पांडव आणि कुंती यांना आश्चर्याचा सुखद धक्का आणि दुर्योधन शकुनी यांना आश्चर्याचा दुःखद धक्का देतो. त्यानंतर भीष्म कठोर पावले उचलून सर्व कौरव आणि पांडव यांना शिक्षणासाठी द्रोणाचार्यांकडे पाठवायचे ठरवतात आणि शकुनीला गांधार राज्यात हाकलून देण्याची तयारी करतात.

मराठीतून :
स्टार प्रवाह वर सुद्धा मराठीत डब करून हेच महाभारत सुरू झाले आहे. ते संध्याकाळी साडेसहा ला प्रसारित होते. पण त्याचे पुनर्प्रसारण नसते. त्याची कथा बरीच मागे आहे.

अधिक माहितीसाठी खालील दुवे बघा
http://en.wikipedia.org/wiki/Mahabharat_(2013_TV_series)
https://www.facebook.com/OfficialMahabharat

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कालच्या भागातला कर्ण पाहून हे महाभारत लॉस्ट अँड फाउण्ड ब्रदर्सचा हिंदी सिनेमा होणार असे वाटू लागले.
झक्की, भीष्माने चार बायकांच्या आयुष्याचे वाटोळे केले म्हणताहेत आणि एक स्त्री आयडी त्याने तसे काही केले नाही असे म्हणताना पाहून सुडोमि. Light 1

फक्त जास्ती हुशार लोकानी मिळवलेला विजय इतकाच .
<<<<

एकदा तुम्ही युद्ध करुन कोण जास्त हुशार हे दाखवायचे ठरवलेत तर जो जास्त हुशार तो जिंकणारच. दुर्योधन आधी हे मान्य न करता कपट करुन स्वतःला जास्त हुशार समजत होता त्याला स्वतःचे व स्वतःच्या सर्व भावांचे, मित्र-नातेवाइकांचे प्राण गमावुन हे मान्य करावेच लागले कि त्याचे देखील बाप आहेत या जगात. बळी तो कान पिळी तोच न्याय त्याला लावला गेला. मग कृष्णाला देव माना अथवा अतिहुशार माणुस. शेवटी जो जिंकला तोच सिंकदर. इथे पांडव सिंकदर ठरलेत.

बाकी मला वाटते युधिष्ठिराने द्रोपदीला जुगारात लावले नसते तरी येनकेनप्रकारे तिचा अपमान कौरवांनी केलाच असता. युधिष्ठिराने तिला जुगारात लावुन कौरवांच्या हाती आयते कोलीत दिले.

शेवटी जो जिंकला तोच सिंकदर >> १००% मान्य .
फक्त त्यात धर्म , अधर्म आणू नका इतकाच .
बाकी महाभारत मला स्वतःला फार आवडते .

बळी तो कान पिळी तोच न्याय त्याला लावला गेला >> असे काही नाही .
On Paper , कौरव जास्त शक्तीशाली होते , पण काहीही करून जिंकायचे होते पांडवानाही Happy

बाय द वे , युधिष्ठिराने द्रोपदीला जुगारात लावले हाच प्रचंड मोठा गुन्हा वाटत नाही का तुम्हाला ?

बाय द वे , युधिष्ठिराने द्रोपदीला जुगारात लावले हाच प्रचंड मोठा गुन्हा वाटत नाही का तुम्हाला ?<<< वास्तविक, द्रौपदी आणि इतर चार भाऊ यांना जुगारात लावण्याचा त्याला काहीही हक्क नव्हता.

बाय द वे , युधिष्ठिराने द्रोपदीला जुगारात लावले हाच प्रचंड मोठा गुन्हा वाटत नाही का तुम्हाला ?
<<<<<

प्रचंड मोठा गुन्हाच आहे... पण युधिष्ठिराचा स्वभाव बघता त्याने नेहमी दुसरयाच्या चांगुलपणावर अतिविश्वास दाखविला. "ठगासी व्हावे महाठग" असे न करता नेहमी आपण बाबा चांगले वागावे, नाकासमोर चालावे मग कोणी आपल्याला त्रास देणार नाही असे त्याचे विचार होते. वेळोवेळी सर्वांनी त्याला स्मार्ट वागण्याचा सल्ला दिला पण शेवटी त्याने "ऐकावे जनाचे,करावे मनाचे" केले. त्याच्या स्वभावानुसार त्याला वाटले कि मी स्वतःला, भावांना व स्वतःच्या बायकोला जुगारात लावले तर होउन होउन काय होईल तर आपल्याला व आपल्या भाउ-बायकोला कौरवांचे दास बनावे लागेल. पण द्रोपदीचा अश्या प्रकारे अपमान होईल असे त्याला वाटले नसावे.

On Paper , कौरव जास्त शक्तीशाली होते , पण काहीही करून जिंकायचे होते पांडवानाही
<<<<<

अहो तिच तर खरी मजा आहे महाभारताची, फक्त पाच पांडव व एक श्रीकृष्ण यांनी शंभर कौरव, एक कर्ण, एक भिष्म, कुरु राजसत्ता व प्रचंड सैन्यबळ या सर्वांना हरवले. दुर्योधनाने आधी केलेले पराक्रम,कपट व अपमान बघता त्याला पांडवांनी दिलेली मात हेच सर्वात मोठे यश आहे महाभारताचे. आधी दुर्योधन देखील काहीही करुन राजा बननारच असा वागला होता. त्याला जशास तसे पांडव वागले इतकच. तुम्ही आधी चुका करणार, वाईट वागणार व जेव्हा तुमच्यावर वेळ आली तर समोरचे वाईट असे नसते काही. वडिलोपार्जित संपदेवर कौरव पांडव दोघांचा सारखाच हक्क होता. कौरवांनी तो मान्य करुन दिला असता तर महाभारत का झाले असते. तसेही असे महाभारत अजुनही जमिनीच्या लहानश्या तुकडयासाठी भाउबंदकित होते. इथे तर मोठया राज्याचा प्रश्न होता.

<अहो तिच तर खरी मजा आहे महाभारताची, फक्त पाच पांडव व एक श्रीकृष्ण यांनी शंभर कौरव, एक कर्ण, एक भिष्म, कुरु राजसत्ता व प्रचंड सैन्यबळ या सर्वांना हरवले.>

त्याकाळातले अनेक राजे दोन्ही बाजूंनी या युद्धात उतरले होते. द्रौपदीच्या माहेरचे राज्य पांडवांच्या बाजूने होते (हे फक्त वानगीदाखल). यादवांतले काही पांडवांच्या बाजूने होते. तर माद्रीच्या माहेरचा एक राजा (शाल्य?) कर्णाचा सारथी होता.
भारतीय युद्धात दोन्ही बाजूंनी किती सैन्य(+हत्ती+घोडे, इ.) होते याच्या आकड्यांचीही नोंद आहे.

अहो तिच तर खरी मजा आहे महाभारताची, फक्त पाच पांडव व एक श्रीकृष्ण यांनी शंभर कौरव, एक कर्ण, एक भिष्म, कुरु राजसत्ता व प्रचंड सैन्यबळ या सर्वांना हरवले. दुर्योधनाने आधी केलेले पराक्रम,कपट व अपमान बघता त्याला पांडवांनी दिलेली मात हेच सर्वात मोठे यश आहे महाभारताचे.>>> एकदा युद्ध सुरू झाले की कपटीपणा, वाईटपणा पांडवांनी केलेला आहे. द्रोण, भीष्म, कर्ण यासारख्याना तर युद्धाचे नियम मोडूनच मारलंय. खुद्द दुर्योधनालादेखील असमंच नियम मोडून मारलंय. भारतीय युद्धामधे बहुतेक सर्व राजे सामिल झाले होते. त्यामधे पांडवांचे सैन्य करुवांच्या तोडीस तोड होते. त्यामुळे युद्धामधे "फक्त पाच पांडव" होते असं नाही.

वडिलोपार्जित संपदेवर कौरव पांडव दोघांचा सारखाच हक्क होता. कौरवांनी तो मान्य करुन दिला असता तर महाभारत का झाले असते. >>> "वडीलोपार्जित" संपत्ती असं म्हटलं की पांडवांकडे मु़ळात काही केस राहतच नाही ना!! तरीपण इंद्रप्रस्थाचे राज्य म्हणूनच दिले होते पांडवांना, मग युधिष्ठीर (सो कॉल्डधर्माव्ने वागणारा इत्यादि) जुगार खेळून सर्व काही हरतो. तिथे दुर्योधनाची चूक कशी काय? जुगारामधे बायको भाऊ पणाला लावणार्‍ञाला कसला धर्म समजतोय बोडक्याचा.

त्या काळाच्या नैतिकतेत बायको, भावाला पणाला लावणे बसत असेल. तो स्वतः दास झाला असला तरी दासांचाही स्वत:च्या बायका, भावांवर अधिकार असे.
मुळात त्याला जुगार खेळावासा वाटणे, सगळी दाने उलट पडत असूनही ट्यूब न पेटणे हे खटकते.

महाभारत युद्धात दोन्ही पक्षाचे सैन्यबळ लक्षात घेतले तर कौरवांचे जास्तच होते. पाच पांडव व एक श्रीकृष्ण यांनी मिळुन फक्त युद्ध केले असे नाही तर पांडवांचे सैन्यबळ मिळुन जे काही संख्याबळ होते त्यासमोर कौरवांचे संख्याबळ तुलनेने जास्त होते. श्रीकृष्णाने स्वतः व त्याचे सैन्य असा पर्याय दिला होता अर्जुनाला. अर्जुनाने श्रीकृष्णाची निवड केली तर दुर्योधनाने श्रीकृष्णाचे सैन्य मिळविले.

राजा शाल्य नकुल सहदेवाचा मामा होता. पण दुर्योधनाने त्याची चांगली खातिरदारी करुन आपल्या बाजुला वळविले. बहुतेक असे वाचले आहे कि राजा शाल्यने पांडवांना सांगितले कि तो कर्णाचा सारथी बनुन वेळोवेळी त्याचा आत्मविश्वास डळमळीत करण्याचा प्रयत्न करील.

आधीच्या पोस्टमधले वाक्य " फक्त पाच पांडव व एक श्रीकृष्ण यांनी शंभर कौरव, एक कर्ण, एक भिष्म, कुरु राजसत्ता व प्रचंड सैन्यबळ या सर्वांना हरवले." असे आहे. असो.

"वडीलोपार्जित" संपत्ती असं म्हटलं की पांडवांकडे मु़ळात काही केस राहतच नाही ना!!
<<<<<

ठिक आहे पांडवांचा हक्क नाही वडिलोपार्जित संपत्तीवर... मग एखाद्या स्त्रीला नवरयाकडुन मुल होत नाही म्हणुन तिने मुल दत्तक घेतले ( त्या काळाप्रमाने इतर पुरुषाशी संबध करुन) व त्याला नवरयाचे नाव दिले तर त्यांचा नामधारी वडिलांच्या संपदेवर हक्क नसतो का?

जुगारामधे बायको भाऊ पणाला लावणार्‍ञाला कसला धर्म समजतोय बोडक्याचा.
<<<<<

त्यावेळी जुगार खेळणे हे राजवंशात कॉमन होते. क्षत्रियाला युद्धाचे, जुगाराचे आव्हान केले तर त्याने ते स्विकारणे आवश्यक होते. पाच पांडव व द्रोपदी हे एवढे एकोप्याने राहत होते कि युधिष्ठिराला ते आपले हक्काचे व आज्ञेतले वाटायचे. ज्यावेळी तो एका एका भावाला जुगारात लावत असतो तेव्हा एकही पांडव याविरुद्ध बोलत नाही. कदाचित द्रोपदीचा चिरहरणासारखा अपमान न होता फक्त कौरवांची दासी बनुन जगावे लागले असते तर द्रोपदीने देखील मनात राग धरुन का होईना दासी बनुन जगण्याचे मान्य केले असते.

पण तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवुन, तिला भरसभेत वस्त्रहिन करण्यापर्यंत कौरवांची मजल गेली व तेदेखील भिष्म, धृतराष्ट्र,विदुर, द्रोण या सर्वांच्या समोर ( यावेळेला हे सर्वजन खरोखर काय करत होते हाच माझ्यासाठी मोठा प्रश्न आहे. खरोखर भारताची स्थिती अजुनही बदलली नाही हेच खरे... अजुनही वस्त्रहरण होतच असतात व मोठे मोठे रथी-महारथी फक्त हात चोळत बघे बनुन राहतात.) याचा द्रोपदीने चांगलाच समाचार घेतला.

आधीच्या पोस्टमधले वाक्य " फक्त पाच पांडव व एक श्रीकृष्ण यांनी शंभर कौरव, एक कर्ण, एक भिष्म, कुरु राजसत्ता व प्रचंड सैन्यबळ या सर्वांना हरवले." असे आहे. असो
<<<<<

मान्य... मला कदाचित मुद्दा नीट मांडता आला नाही.

<"वडीलोपार्जित" संपत्ती असं म्हटलं की पांडवांकडे मु़ळात काही केस राहतच नाही ना!!>
महाभारतात काळातल्या रीतीप्रमाणे स्त्रीला नियोगाने झालेल्या मुलाला तिच्या नवर्‍याचाच मुलगा मानले जाते. धृतराष्ट्र, पांडूही असेच जन्मले तरी त्यांना राजवंशातलेच मानले गेले.

या महाभारतात मला दुर्योधनचे कास्टींगला सर्वात भारी वाटला.

युधिष्ठिर हा लहान वाटतोय. नकुल सहदेव पण गंडले आहेत. त्यातल्या त्या नकुल बरा. भींम तर तब्येत सोडता माठ वाटतोय आणी अर्जुन तर बावळट्ट, एकदम बुळ्या रडका. बदला म्हणावं त्याला.

बाकी सेट, स्पेशल इफेक्टला १०० मार्क.

भींम तर तब्येत सोडता माठ वाटतोय
<<<<<<

भीम म्हणुन जो कलाकार घेतला आहे. त्याची एकदा मुलाखत बघितली होती. त्याचा बॅकग्राउंड एक्टिंग रिलेटेड नाही. तो मुळचा पैलवानच आहे. त्याने सांगितले कि त्याचे आजोबा जुने महाभारत पहायचे त्यावेळी आपल्या नातवाने भीमासारखे बलवान बनावे असे त्यांना वाटायचे. म्हणुन त्याने शरीरसंपदा कमावली. योगायोगाने त्याला भीमाचाच रोल मिळाला. आजोबा जाम खुश आहेत म्हणे त्याच्यावर. तो पुर्ण शाकाहारी आहे तेव्हा मुलाखत घेणारयाने त्याला याबद्दल छेडले तर तो बोलतो कि पुर्ण शाकाहारी राहुन सुद्धा अशी शरीरसंपदा कमवता येते. पुढे एक्टिंगमध्येच करियर करणार का तर तो बोलतो. हे त्याचे क्षेत्र नाही. त्याला कुस्ती स्पर्धेत भाग घेउन भारताचे प्रतिनिधीत्व करायचे आहे.

महाभारतात धर्म - अधर्म हा जवळपास प्रत्येकाने केला आहे म्हणून कुणाचीही बाजू घेतांना वादा-वादी होणारच. जो जिंकला तो हुशार, शूर , धर्म मानणारा होता हे मानने म्हणजे या अमर कलाकृती चा अपमानच . बाकी सिरियल च चालू द्या ....

महाभारताबद्दल मिपावर एक लेख वाचला. वेगळ्या परस्पेक्टिव्हमधुन महाभारताची ओळख होतेय.

http://www.misalpav.com/node/26554

( इथे दुसरया वेबसाईटची लिंक देणे योग्य नसेल तर प्रतिसाद डिलीट करीन)

एकदा युद्ध सुरू झाले की कपटीपणा, वाईटपणा पांडवांनी केलेला आहे. द्रोण, भीष्म, कर्ण यासारख्याना तर युद्धाचे नियम मोडूनच मारलंय. खुद्द दुर्योधनालादेखील असमंच नियम मोडून मारलंय. >> +१

त्याला जशास तसे पांडव वागले इतकच > +१ . सहमत . फक्त ते धर्माने वागले म्हणू नका इतकच . वाटल्यास त्यातल्या त्यात कमी अधर्माने (तेही तुमच्या मते) अस म्हणा . आपल्या आजोबाना , गुरूना कपटीपणाने मारण्यात कसला आला आहे धर्म . उलट यात धर्म असेल तर ते जास्त घातक आहे .

वडिलोपार्जित संपदेवर कौरव पांडव दोघांचा सारखाच हक्क होता. कौरवांनी तो मान्य करुन दिला असता तर महाभारत का झाले असते. >> अजिबात नाही . असे राज्याचे किती तुकडे करणार होते ?

यशस्विनी,
चार बायका म्हणजे अंबा, अंबिका, अंबालिका नि गांधारी.
अंबेचे काय झाले ते माहित आहेच. ज्या सत्यव्रत का कोण त्याच्यासाठी बायका आणायच्या तो काय लायकीचा होता हे आधीच माहित होते. फुकट दुसर्‍या देशात जाऊन दादागिरी करताना मार खाल्ला, नि भीष्माने सोडवले. मग स्वतः ला बायको आणायला स्वतः का नाही गेला? धृतराष्ट्र आंधळा आहे हे माहित होते मग गांधारीला नुसत्या आपल्या बळाचे प्रदर्शन करून, भीति दाखवून आणले!

भीष्माने सगळे कर्तव्यापोटी केले, कुरु कुळासाठी केले हे सगळे मान्य आहे. जो तो आपापल्या कुळासाठी, कुटूंबा साठी काही तरी करतच असतो. जसे गल्लीतला दादा दादागिरी करून गोष्टी करत असतो तसे त्या भीष्माने केले. गल्लीतल्या दादामुळे पण कुणाचे तरी कल्याण होतच असते.

पण एकच गोष्ट जर श्रीमंत, सुशिक्षित, उच्च दर्जाच्या माणसाने केली किंवा एखाद्या झोपडपट्टीतल्या दादाने केली तर लोकांचा दोन्हीकडे बघण्याचा दृष्टीकोण वेगळा असतो.

तसे भीष्माने इतर बरेच काही चांगले केले, तो विद्वान होता वगैरे सगळे मान्य, पण काही कृत्ये बरोबर वाटत नाहीत एव्हढेच. त्याने इतर अनेक पराक्रम केले, चांगल्या गोष्टी केल्या व त्याबद्दल इतरांपेक्षा जास्त आदरणीय, अनुकरणीय आहे. पण ....

हे सगळे त्या काळी बरोबर असेल पण आज विचित्र वाटते एव्हढेच. इथे कुणाच्याहि श्रद्धास्थानाला धक्का पोचला असेल तर क्षमस्व.

झक्कीकाका मान्य. मला फक्त एवढच सांगायचे आहे भीष्मामुळे त्या राजकन्यांचे आयुष्य वाया गेले असे वाटत नाही. तर त्यांच्या नवरयांच्या नाकर्तेपणामुळे जास्त गेले. एखादा मुलगा नाकर्ता असला तरी त्याचे आईवडिल त्याचे लग्न कसेबसे लाउन देतातच. का? कारण त्यांना ते त्यांचे कर्तव्य वाटते. मग मुलगा लग्नानंतर सुधारला तर बोनस. नाहीतर त्यांच्याही मनाला टोचणी लागतेच कि आपल्या वाया गेलेल्या मुलामुळे या मुलीचे आयुष्य वाया गेले. इथे हस्तिनापुराचे राजपुत्र म्हणुन राजकन्या मिळविण्याचा प्रयत्न झाला. या राजकन्यांचा आईवडिलांनी अश्या लग्नाला प्रखर विरोध केला असता. तर कोणीतरी साधी कन्या शोधुन देखील भिष्माने त्याच्या सावत्र भावाचा, आंधळ्या पुतण्याचा विवाह करुन दिलाच असता.

आता अंबेचे प्रकरण घडले कारण तिने आधीच दुसरया कोणाला वरले होते. ते तिने स्वयंवराच्या आधीच पित्याला सांगुन स्वतः स्वयंवरातुन बाजुला झाले पाहिजे होते. एकदा स्वयंवर घोषित केले कि कोणताही राजा किंवा राजपुत्र प्रबळ ठरुन स्वयंवर जिंकु शकतो. मग नंतर भांडण करण्यात काय अर्थ.

इथे गांधारीचा भाउ शकुनी असल्या असमतोल लग्नाचा व भिष्माचा राग धरुनच हस्तिनापुरात असंतोष पसरवण्याचे काम इमानेइतबारे करतो. योगायोगाने पांडु वनात गेल्यामुळे गांधारी सम्राज्ञी बनते. त्यामुळे काही काळ शकुनी शांत रहातो. पण पांडुपुत्राच्या आगमनाने भाच्याच्या हातुन निघुन जाणारे सिंहासन त्याला दिसु लागते व तो पुन्हा आपले काम सुरु करतो.

आपल्या आजोबाना , गुरूना कपटीपणाने मारण्यात कसला आला आहे धर्म . उलट यात धर्म असेल तर ते जास्त घातक आहे
<<<<<

इथे आजोबांना, गुरुंना कपटीपने मारणे अधर्म/ चुक आहे हे मान्य. फक्त इथे ते युद्ध करत असतात. त्यामुळे कोणीतरी एक जिंकणार कोणीतरी एक हरणार. यांनी आजोबांना मारले नाहीतर आजोबांनी यांना मारले असते. एकदा तुम्ही युद्ध सुरु केले की मग साम, दाम, दंड, भेद असे सर्व प्रयोग केले जातात. इथे ते ऑफिशियली युद्ध करत असतात. युद्ध होण्याच्या आधी दुर्योधन व पार्टी यांनी केल्याप्रमाने लपुनछपुन काटा काढायचा प्रयत्न करत नसतात. इथे जे काही पांडव करत होते ते उघड होते. इतर सर्व राजा, सैन्य या सर्वांसमोर घडत होते.

अजिबात नाही . असे राज्याचे किती तुकडे करणार होते ?
<<<<<<<

इथे राज्याचे १०५ तुकडे करुन कोणी मागत नव्हते. तर शेवटचा पर्याय म्हणुन पाच गावे मागत होते. पांडवांचा हक्क याहुन कितीतरी मोठया भागावर होता. पण तोही दुर्योधनाला मान्य नव्हता. हि त्याची दादागिरी किंवा हटवादीपणा नव्हता का?

फक्त इथे ते युद्ध करत असतात. त्यामुळे कोणीतरी एक जिंकणार कोणीतरी एक हरणार. यांनी आजोबांना मारले नाहीतर आजोबांनी यांना मारले असते. एकदा तुम्ही युद्ध सुरु केले की मग साम, दाम, दंड, भेद असे सर्व प्रयोग केले जातात >>> माझ्या मते त्या काळी तरी असे कशाही प्रकारे मारणॅ मान्य नसेल . युद्ध आहे म्हणून , सगळ्यांसमोर केला म्हणून कपटीपणा कसा चालतो बुवा ?अन चालत असेल तरी तो धर्म नसेल ना ?

इथे राज्याचे १०५ तुकडे करुन कोणी मागत नव्हते. तर शेवटचा पर्याय म्हणुन पाच गावे मागत होते. पांडवांचा हक्क याहुन कितीतरी मोठया भागावर होता. >>
पांडवांचा हक्क म्हणजे काय ? युधिष्ठीर राजा झाला पाहिज्रे इथपर्यंत त्यांचा युक्तीवाद कदाचीत (?) ठीक आहे . पण एकदा राजा दुर्योधन म्हटल्यावर विषय संपला .
राज्याचे तुकडे अगदी २ झाले तर घातकच (कितीही लहान , पाकिस्तान पाहतोयच ना आपण ). तेही शेजारी इतकी बलशाली देश असताना .

एकूण काय , तुम्ही मनातून आधीच पांडव बरोबर अन कौरव चूक हे मानले असल्याने तुम्ही त्ययस्थपणे याकडे पाहू शकत नाहीये Happy

ओके... पण मनाचा कौल घ्यायचा तर मला पांडवांबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे व कौरव कोणीतरी खुप मोठे व्हिलन वाटत आहेत असे नाही. मी आधी इथेच कोणत्यातरी प्रतिसादात सांगितले आहे कि महाभारतात प्रत्येक पात्र ग्रे शेड आहे.पण जेवढे महाभारत वाचले आहे त्यावरुन तरी दुर्योधनात तो जास्त गडद वाटतो तर पांडवांमध्ये कमी. असो.

महाभारत कथा संपल्यावर उपसंहार म्हणुन जे कथानक येते. त्यामध्ये पांडवांनादेखील नरकवास भोगावा लागतो असे लिहीले आहे. युधिष्ठिराला सर्वात कमी वेळ म्हणजे फक्त त्याला नरक दाखवुन घेउन येतात. ज्यात त्याला स्वतःचे बंधु व पत्नी द्रोपदी दिसते. त्याला ते पाहुन वेदना होतात. तिच त्याची शिक्षा. त्याचे नरकवासाचे कारण काय तर त्याने "नरो वा कुंजरो" असे बोलुन अर्ध सत्य बोलले. सर्व पांडव नरकवास भोगुन जेव्हा स्वर्गात केलेल्या चांगल्या कामाचे फळ भोगायला येतात त्यावेळी तिथे आधीच दुर्योधन आलेला दिसतो. याचे अर्जुनाला आश्चर्य वाटते. त्यावर श्रीकृष्ण त्याला त्याने केलेले चांगले काम सांगतो. स्वर्ग-नर्क कल्पनामात्र आहेत हे जरी मान्य केले. तरी ज्याने हि कथा लिहीली त्याने पांडवदेखील नरकवासास पात्र होते हे दाखविले.

त्यामुळे पांडव धुतल्या तांदळासारखे होते असे नाही पण त्यांनी कौरवांपेक्षा जास्त चांगला मार्ग वेळोवेळी आपलासा करायचा प्रयत्न केला इतकच.

द्रौपदीने द्यूताच्या प्रसंगानंतर भर दरबारात भीष्मादी न्यायनीतीज्ञांना प्रश्न विचारला होता की स्वतःच जो द्तूतात हरलाय त्याला इतर कोणालाही पणाला लावायचा अधिकार कसा उरतो?! मग ती त्याची स्वतःची पत्नी असो किंवा भाऊ असोत...

यावर धृतराष्ट्र अनुत्तरित होऊन तिला याऐवजी २ वर माग असं सांगतो. अन्य कोणाकडेही या प्रश्नाचं उत्तर नसतंच. द्रौपदी दास्यमुक्तीचा वर मागते अशी कथा आहे.

आता धर्म-अध्रर्म याबद्दल. महाभारतात प्रत्येक व्यक्तिरेखा ग्रे शेडची आहे. पण परिस्थितीनुसार काही व्याख्या बदलाव्या लागतात आणि धर्माची संकल्पना तपासून बघावी लागते. श्रीकृष्ण "धर्मसंस्थापनार्थाय" असं म्हणतो, नुसत्या स्थापनेसाठी नाही तो जन्मे घेत! संस्थापना म्हणजेच काळानुरूप अत्याश्यक बदल. त्याप्रमाणे भीष्मांनी केलेल्या प्रतिज्ञेपायी झालेलं नुकसान तो भीष्मांनाही ऐकवतो. डोळ्यासमोर अन्याय घडतोय तरी "अर्थस्य पुरूषो दासः" (अर्थात मी धृतराष्ट्राचं मीठ खाल्लंय, हस्तिनापुरच्या राजगादीचा मी सेवक आहे त्यामुळे राजाच्या इच्छेपुढे मी हतबल आहे असा भीष्मांचा युक्तिवाद) या सबबीखाली घडलेलं पुढचं सगळं टाळता आलं असतं हेही श्रीकृष्ण सांगतो असा एक प्रसंग आहे. अर्थात त्यांच्या वयाचा मान ठेवून, पण स्वतःच्या कार्याचीही जाण ठेवून तो हे करतो.

आणि "कोणाचेही नुकसान नसेल, कोणाचे भले होत असेल तर असत्य बोलणे चांगले" या एका वाक्यात धर्मनियमांची लवचिकता खुद्द श्रीकृष्णानेच दाखवून दिली आहे. जशास तसे वागून पुढचे अनेक प्रश्न, ज्यांची उत्तरं सर्वनाशाकडे जातात, ते रोखता येत असतील तर तसे वागले पाहिजे हा अर्थ.

असो. गीतेत हेच सर्व सांगितले आहे. धर्म-अधर्माबद्दल अर्जुनाचीही संभ्रमावस्था होते, प्रश्न पडतात ज्याची सगळी उत्तरं मिळल्यावरच तो युद्धाला सुरूवात करतो. आणि त्यात श्रीकृष्ण कोणा एकाच्या वागण्याचं समर्थन करतच नाही.

कर्णाला अधर्माने मारणं, भीष्मादी मंडळींच्याही बाबतीत तसंच... या सगळ्यात काहीतरी त्या परिस्थितीला अनुसरून असलेलं आणि कदाचित न पटणारंही, पण स्ट्राँग लॉजिक आहे.

स्टार प्लसवरचे महाभारत भव्य दिव्या वाटले. बाकी इकडे अमेरिकेत नेहमी बघायला मिळतेच असे नाही ,परंतु youtube वर पाहतो कधीकधी !

त्याला जशास तसे पांडव वागले इतकच > +१ . सहमत . फक्त ते धर्माने वागले म्हणू नका इतकच>>>>>>>>>>>>>>>>>>>>>> ++++++!११११११११११११

लाक्षागृहाचा भाग फार छान जमून आला आहे...
सोमवारी काय होईल?

पांडवांनी भुयार अजून तयार केलेले दिसत नाही आणि पुरोचन वगैरे आग लावायला सुरुउवात करत आहेत, त्यांना वाटतंय की कुंतीसह पांडवांनी विषयुक्त जेवण खाल्ले आहे. ???

मग ते कोणत्या भुयारात लपतात ?
खरी कथा नेमकी काय आहे?

कर्णाला वाईट वाटलेले दाखवणे प्रक्षिप्त वाटते.

खरी कथा व्यासांशिवाय कोणाला माहीत असणार? माझ्या वाचनात आलेल्यानुसार पांडव भुयार खणून निघून जातात. त्याआधी एक आदिवासी स्त्री आणि तिचे पाच मुलगे यांना पाहुणे म्हणून ठेवून घेतात. लाक्षागृहात हे लोक जळून मरतात आणि कौरवांना पांडव मेले असेच वाटते.

Pages