क्षणिक उन्माद

Submitted by बेफ़िकीर on 25 December, 2013 - 00:19

एक पाऊल मागे घेऊन किंवा आहोत तेथेच क्षणभर शांत उभे राहून विचार केला तर मनात येते की नेमके काय बदलते? ११.५९.५९ आणि १२.००.०० ह्या एका क्षणात अशी कोणती उलथापालथ होते? आपली नोकरी, नोकरीची आपल्याला असलेली गरज, आपली प्रकृती, आर्थिक स्तर, क्लेष, चीड, संताप, ताण, जबाबदार्‍या, स्वप्ने, आपला स्वभाव ह्यातील काहीही बदलत नाही. त्या एका क्षणात मिळणारे भासात्मक स्वर्गीय सुख किंवा काहीतरी खूप नवीन, ताजेतवाने वाटण्याची जाणीव हे मनाचे खेळ असतात हे आपल्यालाही माहीत असतेच.

पण त्या क्षणी दिवे घालवले जातात. त्या क्षणीच काय, साठ सेकंद आधीपासूनच दिवे घालवले जातात. मगाचच्या क्षणापर्यंत जोषात उत्सव साजरे करणारे सगळे इहलोकी जीव पुतळ्यासारखे स्तब्ध होऊन घड्याळाकडे पाहू लागतात. पापणीही न लवता तसे पाहणे म्हणजे जणू कोणत्यातरी विटलेल्या, ऑब्सोलेट, त्रासदायक संस्कृतीचा लवकरात लवकर त्याग करण्याची आणि एका स्वप्नवत, निव्वळ समाधानदायी असलेल्या नव्या सभोवतालाच्या आगमनाची घाईच! टाचणी पडली तरी आवाज येईल अशी ती शांतता शेकडो मनांना एकाचवेळी उचंबळवत असते. हातात हात धरले जातात. दुसर्‍या हातात ग्लास धरला जातो. आपण कोणत्यातरी एका अत्यंत महत्वाच्या क्षणाचे प्रत्यक्ष साक्षीदार होणार असल्याचा अनुभव मनावर व्यापू लागतो आणि येऊन ठेपतो तो क्षण! ११.५९.५९

आणि काही कळायच्या आत एक स्फोट होतो. सहस्त्रावधी दिवे एकदम प्रकाशमान होतात आणि परिसर उजळून निघतो. शुभवाद्ये किंवा नशील्या ट्यून्स वातावरण भारून टाकतात. कार्बन डायऑक्साईडचे ढग हवेत जाऊ लागतात. नृत्यांगना विजेसारख्या नाचू लागतात. ऑर्केस्ट्राचा सूत्रसंचालक माईक घशात घालून बेंबीच्या देठापासून खच्चून ओरडतो.

"हॅपी न्यू इयर"

या क्षणाचे प्रत्यक्ष साक्षीदार असलेले मग एकमेकांना मिठ्या मारून आवळतात. ग्लासेस खणखणतात. चुंबनांची बरसात होते. एकमेकांच्या कंबरेत हात घालून नृत्याचा जल्लोष सुरू होतो. लहान मुले कधी नव्हे इतक्या जोरात ओरडून सर्वांना विश करत नाचत राहतात. हीच व्यक्ती, जिच्याशी गेल्या महिन्यात आपण तीन वेळा भांडलो, हीच व्यक्ती जिच्या नोकरीवर लाथ मारावीशी वाटते, हीच व्यक्ती जिचे तोंडही पाहावेसे वाटत नव्हते, आता ती व्यक्ती म्हणजे जणू सर्वस्व झालेली असते. कोणत्यातरी मनोवस्थेच्या मोहापायी क्षण दोन क्षण भुरळ पडते आणि वास्तवतेचा विसरही पडतो. आत्तापर्यंत पोटात गेलेले पाच पेग कमी की काय म्हणून नव्या वर्षाच्या आगमनासाठी फ्रेश आणि नीट ड्रिंक ऑफर केले जाते, स्वीकारलेही जाते. पैसे खर्च करण्याला धरबंध राहिलेला नसतो. डेसिग्नेटेड ड्रायव्हर नेमलेला असण्याचा माज पावले पुन्हा बारकडे वळवतो.

आपल्या स्वतःमध्ये या नवीन वर्षी आमूलाग्र बदल करण्याची योजना आखली जाते. कोणी व्यायाम करणार असतो, कोणी व्यसन सोडणार असतो, कोणी कुटुंबाला किमान तीन सहलींना नेणार असतो, कोणी वाचन वाढवणार असतो. एव्हरीटाईम इज राईट टाईम टू स्टार्ट अ राईट थिंग, हे तत्व विसरले जाते. त्यासाठी नवीन वर्षाचा पहिला क्षण आवश्यक वाटू लागतो. उद्या तर सुट्टीच असते. एस एम एस, ग्रीटिंग कार्ड्स, ईमेल्स, कॉल्स, फेसबूक स्टेटस, प्रत्यक्ष भेटी, सर्वाला उधाण येते. आपल्या सर्वात जवळच्या माणसांबरोबर हा सोहळा साजरा केला जातो. मग एकाहून अधिक ग्रूप्स असतील तर सायंकाळी सात ते रात्री अकरापर्यंत विविध ग्रूप्समध्ये हजेरी लावून त्यातल्यात्यात सर्वाधिक जवळच्या ग्रूपमध्ये सव्वा अकराला येऊन पोचण्याचे ठरते.

महिना महिना आधीपासून ह्याचे नियोजन सुरू होते. हॉटेल्स दर वाढवतात, थीम्स शोधून काढतात, जाहिराती करतात, पेपर इन्सर्ट्स वाटतात, नॉईज क्रिएट करतात. रिसॉर्ट्सना ऐतिहासिक रोषणाई होते. पॅकेज डील्स ऑफर होतात. कुटुंब, दहा जण, वीस जण, शंभराचा ग्रूप अशी वेगवेगळी आकर्षणे निर्माण केली जातात. वाचकाला, पाहणार्‍याला वाटते की अरे, हेच तर खरे लाईफ आहे. आपण घरी बसून काय करणार आहोत? हे लोक जे ऑफर करत आहेत ते स्वीकारून अधिकाधिक आनंद मिळवायला हवा. जग कुठे चालले आहे आणि आपण नुसता टी व्ही बघत बसणार घरी? मग मुले वेगवेगळे हट्ट करू लागतात. महागाहून महाग पॅकेजेस निवडताना कोण अभिमान वाटू लागतो आपला आपल्यालाच. दोन हजार पर पर्सन विथ अनलिमिटेड बीअर, अनलिमिटेड व्हेज नॉन व्हेज स्नॅक्स अ‍ॅन्ड बूफे कपल्ड विथ डान्स फ्लोअर! चौथ्या बीअरला कर्ता पुरुष सटपटत बडबडू लागतो. कर्ती स्त्री मुलांना अधिकाधिक खायला घालण्यावर लक्ष केंद्रीत करते. कोणीतरी भलतेच लोक अक्राळविक्राळ डरकाळ्या फोडत नाचत असलेले पाहून न नाचणारे नाके मुरडू लागतात. ह्या सर्व सेट अप मधील आपल्याला नेमके काय काय एन्जॉय करता येत आहे आणि काय नाही ह्याची यादी करणे सुरू होऊन शेवटी त्याचाही वैताग आल्याने तेही थांबते. मुलांना डान्स करायचा असतो पण मोठ्या व अनोळखी लोकांमध्ये करण्यास ती बुजत असतात. मग त्यांचा वेगळा धिंगाणा सुरू होतो. पुरुष लोक आपल्या आवडीचे विषय काढून वेगळा ग्रूप करून गप्पा मारत आणि पीत बसतात. बायका स्वतंत्र ग्रूप करून स्वतःच्या वेगळ्या गप्पा काढून बसतात. हळूहळू पावणे अकरा वाजले की धड नाही न्यू इयर लवकर येत धड नाही बारापर्यंत जागवत अशी अवस्था येते आणि मग कोणीतरी उरल्यासुरल्या उत्साहावरही विरजण घालून म्हणते 'ए मी पडते एक अर्धा तास, साडे अकराला उठवा मला'!

आपण नेमके काय केले हेच आता कळेनासे होते. आलेला वैताग कृतीत उतरायला लागणे, पहिला राग मुलांवर, दुसरा पुरुषांवर किंवा वेटरवर, तिसरा सर्व्हीसवर, चौथा एकुणच क्वॉलिटीवर आणि शेवटचा एकमेकांवर काढला जाऊ शकतो. पण तोवर अकरा पन्नास झालेले असतात. तारवटलेल्या डोळ्यांमध्ये दारूला बाजूला सारून काही कृत्रिम व अतार्किक स्वप्ने स्वतःसाठी जागा करून घेतात. हे वेडावलेले आणि जडावलेले डोळे मग हळूहळू डीम होत चाललेल्या दिव्यांकडे आणि ११.५९.५९ कडे नेहमीइतक्याच वेगाने धावणार्‍या घड्याळाकडे रोखले जातात. काही मिनिटे सर्व क्लेष, मनस्ताप, सर्वाचाच विसर पडतो. मुलांना मुद्दाम जागे केले जाते आणि त्यांचे लक्ष घड्याळाकडे वेधले जाते. जल्लोषाच्या क्षणी मग अचानक जल्लोष सुरू होतो. सगळे काही गोड वाटू लागते. तीच माणसे, जी मगाशी वैतागाचे कारण झाली होती, मग भले तो वेटरच काय, क्लीनिंग करणारा छोकरा का असेनात, त्याच्याहीबरोबर डान्स केला जातो. जणू एका क्षणाने धरतीचा स्वर्गच बनवला.

आणि मग डेसिग्नेटेड ड्रायव्हरला भरघोस टीप देऊन उद्दामपणे स्वतःच्या घरी पोचायचे आणि शूजही काढण्याचा उत्साह राहिलेला नसल्याने आडवे व्हायचे.

थोड्याफार फरकाने काहींचे वेगवेगळे घडते. कोणी पीत नाही. कोणी घरीच थांबतो पण असाच उन्मादतो.

दुसर्‍या दिवशी सूर्य डोक्यावर येतो तेव्हा जगणे जीवावर आलेले असते. डोके दुखत असते. नवीन वर्ष असण्याचा उत्साह कृतीतून दाखवावा तर लागतो, पण शरीर नाही म्हणत असते. काल रात्री कोण कसे वागले आणि कोणी कसे वागायला नको होते ह्याचे गॉसिप सुरू होते. वादावादी होऊ शकते. घातलेले पैसे फुकट गेल्याची निराशा मनावर पसरते. मूर्खपणा केला आणि न्यू इयर साजरे करत बसलो असे काहीतरी मनात येऊनही ते व्यक्त करायला लाज तरी वाटते किंवा बेभानपणे व्यक्त केले तरी जाते. अजुनही जो भेटेल त्याला सस्मित चेहर्‍याने नववर्षाच्या शुभेच्छा देणे भागच पडत असते. मग मनात असो वा नसो!

काय बदलते नेमके त्या क्षणामध्ये? तर काहीही नाही. फक्त आपण क्षणभर बदलतो. मग आपण तर हवे तेव्हाही बदलू शकतो. पण हे उत्सवप्रेमाचे व्यसन आपल्याला आपणच लावलेले असते. इतर कोणाचा दोष नसतोच त्यात!

बदलायचे तर जून महिन्यात वगैरेही बदलायला काय हरकत आहे? त्यात पुन्हा इंग्रजी नववर्ष आणि आमचे नववर्ष असा एक मुद्दा घेऊन काहीजण स्वतःचे आग्रही विचार मांडत असतात ते वेगळे!

पण हे सगळे पाहून मला तरी इतकेच वाटते, की आपण क्षणिक सुखांचे चाहते, काहीसे अविचारी व काहीशी दिशाभूल झालेला समाज आहोत. संयम, आंतरिक समाधान, सबूरी ह्यापासून दूर चाललो आहोत.

नवल वाटू नये, जर काही काळानंतर फक्त विलास म्हणजे सुख आणि जेथे विलास नाही ते फक्त दु:खाचेच कारण ठरणे अशी अवस्था आली तर! नवल वाटू नये, जर क्षणिक सुख न मिळण्यामुळे मारामार्‍या होऊ लागल्या तर! नवल वाटू नये, जर उन्माद नसला तर जगण्यास पात्रच नसल्याचे वाटू लागले तर!

उन्माद! क्षणिक उन्माद दीर्घकालीन समाधानाच्या मुळावर घाव घालत आहे. मात्र बहुतेकांना घाई आहे ती क्षणिक समाधान असलेले अधिकाधिक क्षण जगण्याची किंवा जीवनात फक्त क्षणिक समाधान असलेलेच क्षण येतील हे बघण्याची!

असो, आपणा सर्वांना इंग्लिश नववर्षाच्या मनापासून शुभेच्छा, पण तसे पाहिले तर प्रत्येक क्षणी एक नवीन वर्ष सुरू होतेच म्हणा!

-'बेफिकीर'!

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< तसे पाहिले तर प्रत्येक क्षणी एक नवीन वर्ष सुरू होतेच म्हणा ! >> अगदी खरेय भूषण जी

लेख चांगलाय.
फाटे बरेच फोड्ता येतील.
म्हणजे दिवाळीलाच काय विशेष? दसर्‍यालाच का सोनं असे बरेच.

मी मात्रं चक्क यावर्षी पहिल्यांदाच हे सर्वं अनुभवायचे ठरवलेय.
एकदा बारावीच्या घाण्यातून बाहेर पडल्यावर मागची सतरा वर्षे न्यू यिअर सेलिब्रेट केले नव्हते.
यावर्षी करून बघूया असं ठरवलंय. (दारू पिणं सोडून बाकी सगळं )
Wink

मस्त लेख. मला पण हे फार बोअर होतं. आणि आउट डोअर पार्टीत फार थंडी वाजते. एका न्यू इअरला घरी चित्र रंगवत बसले होते ते आठवतं. मनाला येइल ते कधीही काहीही करता येतं हे लिमिट्स कशाला? आणि या रात्री अनेक मुलींवर अत्याचार होतात हे वाचल्यापासून तर टोटल
टर्न ऑफ.

मस्त बेफी! आवडलच. मनात असलेले सुंदर शब्दबद्ध केले तुम्ही. पण ते ते दिवस असतात. आता कुणी म्हणेल करुन सवरुन भागले आन देवपुजेला लागले! न्यु इयर सेलिब्रेशन हा समूह उन्मादाचा मोठा सण.
न्यू इयर मधे सुरवातीला बहुतेकांच्या चेकवरील तारखा चुकतात. Happy

अतिशय पटला लेख.

आजतागायत मलाही हा अनुभव घ्यावा अस प्रकर्षान कधीच वाटलेल नाहीय पण या वर्षी तो क्षण अनुभवणार आहोत निसर्गाच्या सानिध्यात,मी नि माझा मुलगा !... त्याची फोटोग्राफी, अन माझी समुद्राच्या लाटेच्या गाजेशी तादात्म्य पावण्याची अनामिक ओढ ..... लाटांवर हेंदकाळणारं चांदण, क्षितीजापार हरवलेली नजर !

आय एम जस्ट एक्साईटेड !

-सुप्रिया.

लेख आवडला.
इतके देहभान हरपून जाण्यासारखे न्यू इअरला काय असते हा प्रश्न नेहमीच पडतो. अशा पार्ट्यांना कधीही पैसे भरून किंवा फुकटसुद्धा जावेसे वाटले नाही, अजूनही वाटत नाही.
पुण्यात होतो तोपर्यंत मी आणि माझा मित्र सतीश दरवर्षी एक जानेवारीचा सुर्योदय पाहण्यासाठी भंडारा डोंगरावर दुचाकी घेऊन जायचो, हे आठवले. मरणाची थंडी असायची.. हाल व्हायचे. खरं तर हासुद्धा नुसता निरर्थक उपचारच होता, पण मजा यायची हेसुद्धा तितकेच खरे.
मानवी मनाला असे काही विरंगुळे हवे असतात बहुधा.. आपला अजिबात ताबा नसलेल्या काळाच्या चक्रावर सण, उत्सव, वाढदिवस असे काही काल्पनिक बिंदू निर्माण करून त्याच्या आधाराने आयुष्याला अर्थपूर्ण करण्याचा, किंवा निदान ते अर्थपूर्ण आहे असा भ्रम निर्माण करण्याचा एक प्रयत्न, दुसरे काय !

न्यू इयर मधे सुरवातीला बहुतेकांच्या चेकवरील तारखा चुकतात. >> एकदम छान ऑब्झर्वेशन Happy

बाकी न्यु इयर काय कुठल्याच दिवशी दारू पिण्याचं समर्थन करणार नाही.

न्यु इयरच्या निमित्ताने जर मित्रमैत्रिणी, घरचे, स्नेही, नातेवाईक ह्यांचे (न पिता) गेट टुगेदर झाले तर मात्र मजा येते. पण एक निमित्त ह्यापलिकडे फार महत्व नाही देणार मी त्याला. ह्याउलट समहाऊ मला दसर्‍याच्या किंवा पाडव्याच्या दिवशी खुप भारी वाटतं. आता ह्याचं कारण सोशल कंडिशनींग का अजुन काही ते माहित नाही. कदाचित हे सण सकाळी साजरे होतात म्हणुनही असेल.

'आपण क्षणिक सुखांचे चाहते, काहीसे अविचारी आणि काहीशी दिशाभूल झालेला समाज आहोत. संयम, आंतरिक समाधान, सबूरी ह्यापासून दूर चाललो आहोत.'
बेफिकीरजी....अतिशय चपखल शब्दांत आपल्या सद्य मानसिकतेतल्या वैचारिक तृटींवर नेमकं बोट ठेवलं आहे आपण.

विचार छान मांडलेत.
"काय बदलते नेमके त्या क्षणामध्ये? तर काहीही नाही. फक्त आपण क्षणभर बदलतो. मग आपण तर हवे तेव्हाही बदलू शकतो. पण हे उत्सवप्रेमाचे व्यसन आपल्याला आपणच लावलेले असते. इतर कोणाचा दोष नसतोच त्यात! "

"बहुतेकांना घाई आहे ती क्षणिक समाधान असलेले अधिकाधिक क्षण जगण्याची किंवा जीवनात फक्त क्षणिक समाधान असलेलेच क्षण येतील हे बघण्याची! "

ही वाक्ये अधिक आवडली.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------

"आपला अजिबात ताबा नसलेल्या काळाच्या चक्रावर सण, उत्सव, वाढदिवस असे काही काल्पनिक बिंदू निर्माण करून त्याच्या आधाराने आयुष्याला अर्थपूर्ण करण्याचा, किंवा निदान ते अर्थपूर्ण आहे असा भ्रम निर्माण करण्याचा एक प्रयत्न, दुसरे काय !" >>> ज्ञानेश यांच्या या विचारांशी सहमत.

>>उन्माद! क्षणिक उन्माद दीर्घकालीन समाधानाच्या मुळावर घाव घालत आहे. मात्र बहुतेकांना घाई आहे ती क्षणिक समाधान असलेले अधिकाधिक क्षण जगण्याची किंवा जीवनात फक्त क्षणिक समाधान असलेलेच क्षण येतील हे बघण्याची!<<
जमतय तोवर माज करुन घ्या! नंतरच कुणी पाह्यलय! कल क्या होगा किस को पता अभी जिंदगी का ले लो मजा|
अशी विचारश्रेणी त्यामागे असते.

बेफिकीर,

अगदी मनातलं लिहिलंय. ३१ तारखेला मौजमजा करायचं तर्कट जाणत्या वयापासून ध्यानी आलंच नाही. मौजमजा करायची तर ३१ तारखेपर्यंत वाट का पहा? पार्टीबिर्टी असेल ती आत्ताच करूया की. उगाच वाट पहात खोळंबून का रहायचं? अशी एकंदरीत विचारसरणी होती. वयापरत्वे मौजमजेचे संदर्भ बदलत गेले. शेवटी तुम्ही शब्दबद्ध केलेत त्या विचारांशी नाळ जुळवावीशी वाटते. Happy

आ.न.,
-गा.पै.

विचार चांगला आहे.

पण जग नवनविन उन्मादातच जगत असतं. मग तो उन्माद वैयक्तीक असेल तर कधी सार्वजनिक. सार्वजनिक उन्मादात काहिंना अजुनच मजा येते. काहींना गर्दी बघायला जायचं असतं, तर काहिंना थ्रिल अनुभवायचं असतं.

१ जानेवारीला पहाटे ४ ला उठुन, (कडाक्याच्या थंडीत) आंघोळ करुन तास-दोन तास लोकलचा प्रवास करुन देवळात जाणारे तरी काय वेगळे? तिथे जाउन लांबलचक रांग... त्याचं त्यांना कौतुकच.

प्रत्येकाची मौज करण्याची पद्धत वेगळी. कोणाला काय आवडेल, हे सांगता येणार नाही. वर्षातुन एकच दिवस असा घालवला, याची वर्षभर उजळणी होते. भलेही काही गोष्टी चुकत असतील, पण मला तरी रांगा लावुन देवदर्शन घेणारे, दारू पिऊन डान्स करणारे, एखाद्या क्रिकेटच्या मॅचसाठी १०००-२००० चं तिकिट घेऊन लाईव्ह बघणारे, कोण्या जॅक्सनसारख्या गायकाच्या गाण्यावर बेधुंद होणारे... सगळे सारखेच वाटतात. नशा सारखीच, फक्त दारू आली म्हणुन वाईट म्हणणं योग्य नाही. Sad

चांगला लेख. हे असं वाटायचं एक वय असतं असं मला वाटतं. माझं पण ते वय झालय Happy
मला तर ह्याच गोष्टी, दिवाळी, दसर्‍याबाबत पण वाटतात.

सर्वात धमाल आठवण आहे ती मिलेनियमची. १००० वर्षाने येणार म्हणुन बर्याच जणांनी त्यावेळी हजार वर्षे अस्तित्वात असलेल्या ठिकाणी (पिरॅमिड वगैरे) त्या दिवशी प्रवास केलेला. कुणाची कल्पना कोणास ठाउक, प्रवासी कंपन्यांनी खुप फायदा केला त्या साली.

पुलंच्या "सखाराम गटणे" मधे ते म्हणतात.."स्वाक्षरी देण्यात काही अर्थ नाही हे खरे..तसे ते न देण्यातही काही विशेष अर्थ आहे असे नाही".. तसेच नववर्ष साजरे करण्यात काही अर्थ नाही हे खरे तसेच ते न साजरे करण्यातही काही विशेष अर्थ असतो असेही नाही. (जर ड्रग्ज..अतिमद्यपान वगैरे न करता तसेच दुसर्‍याना त्रास होइल असे काही वर्तन न करता - गेट टुगेदर टाईप केले तर तेवढेच दोन क्षण आनंदाचे)
गेल्या ४ वर्षात प्रत्येक ३१ डिसेंबर/१ जानेवारी कामात गेलेय जेव्हा सुटी होती तेव्हाही "पिझा" खाउन टीव्ही पाहत घालवलेय..याही वर्षी तसेच आहे. असो.

नववर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

'आपण क्षणिक....... दूर चाललो..आहोत.'
यातले आपण म्हणजे सगळी मानवजात म्हणा. आणि हे इंग्लिश नववर्ष नसून ख्रिश्चन नववर्ष आहे.
तुमचा रोख दारू पिणार्‍यांवर आहे का? दारू न पिणारे देखील भरपूर तमाशे करतात. कारणच लागते जरा सगळे दू:ख विसरून थोडा वेळ आशेचे किरण दिसतील अशी अपेक्षा बाळगायला. म्हणूनच ख्रिश्चन नसलेले देखील उत्साहाने या तमाशात भाग घेतात.
म्हणजे जे होते ते चांगले आहे असे मा़झे मुळीच म्हणणे नाही.
पण जे असे तुमच्या सारखे इतके बुद्धिमान, सुसंस्कृत, सुदृढ, मनाचे खंबीर असणारे लोक आहेत त्यांनी तसे नसणार्‍यांवर जरा दयाबुद्धीने बघायला शिकावे असे मला वाटते. प्रेम नको, दया असावी. सहनशक्ति असावी.

खरे तर संकल्प करा किंवा नका करू, पण क्रोध, अहंकार कमी करावे, दया, क्षमा, जास्त व्हावी असा प्रयत्न आयुष्यभर करीत रहावे.

मला वाटलं सगळे गेले उन्माद((सेलिब्रेशन) करायला. Proud
छान लिहिलय.पण अगदिच वाईटही नसतं सेलिब्रेशन करणं 'मरीन ड्राईव्ह' ला गेलात तरी समजेल.आनंदी आणि चांगल्या पद्ध्तीनेही नवीन वर्षाचं स्वागत करता येतं. मी नवीन वर्षाचं स्वागत माझ्या आवडीच्या गोष्टीने करतेय टीव्ही वर अ‍ॅवॉर्डस् बघत घरच्या घरी मेजवानी. Happy
'तसे पाहिले तर प्रत्येक क्षणी एक नवीन वर्ष सुरू होतेच म्हणा! ' >>+१०० हे मात्र पटले .

तुम्हालाही, हॅपी न्यु इयर (चित्रपट नाही ) Happy

वा! खुप छान विचार मांडले आहेत. अशा पार्ट्या करणार्यांच्या डोक्यात पण हे येत असणार पण विचार कोण करतोय. उन्माद प्रकरण तर गंभीरच आहे.

बेफिकीरजी, मीं व्यक्तीशः तुमच्या मताशीं सहमत आहे व आनंद घेण्यासाठी विशिष्ठ दिवस , वेळच आवश्यक असण्याची गरजच नसावी. पण बर्‍याच जणाना आनंद सामुहीकपणेच साजरा करतां येतो [ माणूस कळपप्रिय प्राणी आहे, म्हणूनही असेल ], हेंही सत्य आहे व त्याकरतां सर्वमान्य अशी १५ ऑगस्ट, ३१ डिसें. अशी निमित्तं शोधली जातात व मग व्यावसायिक हितसंबध [ हॉटेल्स, टूर एजन्सीज इ.इ.] त्याला खतपाणी घालतात. फक्त, याचा अतिरेक होणं हें मात्र निषिद्धच आहे.

glassfull.jpg