नजराना

Submitted by श्रद्धा on 8 May, 2009 - 11:47

राजेश खन्ना याच्या कारकिर्दीला उतरती कळा लागली असताना त्याने हा सिनेमा केल्यासारखे वाटते. (८७ साली त्याची कारकीर्द कशी चालू होती, कुणी सांगू शकेल काय?) सर्व सिनेमाभर तो 'अमिताभ फारच चमकतोय, आपण आता काय करावे?' अशा विचारात मख्खासारखा वावरत असतो.

सिनेमा सुरू होतो, तेव्हा राजेशबाबूंना कोर्टात आणण्यात येत असते. शीतल पुरी नावाच्या एका बाईचा 'हाप मर्डर' केल्याचा आरोप त्यांच्यावर असतो. स्मिता पाटील कुठूनशी धावतपळत येते आणि 'तू कोर्टात सगळे काही खरेखरे सांगून का टाकत नाहीस?' वगैरे नेहमीचे रडगाणे गाते. कोर्ट सुरू होते तेव्हा विरुद्ध पार्टीचा वकील जोरजोरात ओरडून 'आज तुमने शीतल पुरी को जीने और मरने के बीच लाके छोड दिया है...' अशा भावार्थाची काही वाक्ये म्हणतो. त्यावरून केस हाप मर्डर आहे, हे आपल्याला कळते मग स्मिता पाटील त्यांची जीवनकहाणी सांगू लागते.

स्मिता पाटील दिल्लीत राहणारी श्रीमंत बापाची मुलगी असते. तिचे रजत वर्मारुपी राजेशावर (म्हणजे त्याचे नाव सिनेमात ते आहे!) प्रेम बसते. तिचा बाप 'रजत गरीब आहे' (खेरीज अनाथदेखील असतो वाटतं!), वगैरे नेहमीच्या कारणांचा आधार घेऊन लग्नाला विरोध करतो. मग हे दोघे दोन मिन्टात लग्न आटोपून मुंबईत येतात. तिथे रजत हा संगीतक्षेत्रात काही प्रयोग करत असल्याचे आपल्याला समजते. प्रयोग काय तर तो पियानो वाजवणार आणि नर्तिका त्यावर भरतनाट्यम वा कथक पद्धतीचा नाच करणार. ती नाचणारी बाई 'शीतल पुरी' (प्रीती सप्रू नावाची दुय्यम दर्ज्याची एक नायिका) असते. आणि शफी इनामदार हा त्या कार्यक्रमावर पैसे लावलेला शो मॅनेजर वगैरे असतो.

आता आपल्याला हेही कळते की, आता रजत आणि मुक्ता यांच्या लग्नाला काही वर्षे उलटून गेली आहेत. पण मूलबाळ नाही. रजत अजून संगीतक्षेत्रात धडपडतच असला तरी राहायला बंगला आहे, घरी जयश्री गडकर मोलकरीण म्हणून आहे. एक दिवस रजत आणि मुक्ता बाहेरून कुठूनसे येतात तो जयश्री गडकर घरात रडवेली, सचिंत होऊन उभी असल्याचे त्यांना दिसते. मुक्ता कारण विचारते तेव्हा जयश्री सांगते की, तिची मुलगी तुलसी ही शिक्षण पूर्ण करून परत येत असून ती जबरदस्त सुंदर दिसू लागल्याने (होय, याच अर्थाचे संवाद तिच्या तोंडी आहेत) तिला घोर पडला आहे. कारण ती 'बस्तीत' राहते. शिक्षणाने आत्मिक, बौद्धिक सौंदर्य वाढत असावे असे आजपर्यंत वाटायचे, नुसते सौंदर्यही वाढते हे या चित्रपटामुळे नवीनच कळले.

लगेच पुढच्याच दृश्यात खाटेवर लोळत पडलेला आर्थिकदृष्ट्या निम्नस्तरीय गुंड दलिप ताहिल दिसतो आणि जयश्रीला बस्तीत राहण्याबद्दल घोर वाटण्याचे कारण उघड होते. हे लोक बकासुराचा आधुनिक अवतार असतात. ते बस्तीत जाऊन कुणाच्याही घरावर फुली मारून येतात. म्हणजे फुली मारलेल्या घरातील तरुण मुलगी यांच्याकडे सोपवायची, नाहीतर ते समक्ष येऊन तिला उचलून नेतील.

मुक्ता आणि जयश्रीबाई यांनी डोके चालवून काढलेल्या युक्तीनुसार श्रीदेवी मूळची गोरी असली तरी काळा रंग लावून घेऊन घरात दरवाजा बंद करून बसत असते. जेव्हा एका गरीब बापाच्या सुंदर पोरीला उचलायला (आईवडील, इतर भावंडे काळीबेंद्री, मात्र ही एकुलती पोरगी गोरी नि सुंदर!) दलिप ताहिलाची माणसे येतात तेव्हा श्रीदेवी रंग पुसून, अतिशय दिलखेचक घागराओढणी नि चार दागिने घालून त्या गुंडांसमोर जाते, त्यांना स्वतःचे आमिष दाखवते नि ते जवळ येताच त्यांची बेसुमार पिटाई करून पुन्हा गायब होऊन, रंग लावून घरात साळसुदासारखी जाऊन बसते. लोकांना 'वह कौन थी?' वगैरे काही कळत नाही. इतकेच नव्हे, तर आपले कन्यारत्न सकाळी 'या हलकट माणसांना चांगले मारायलाच पाहिजे' अशी बडबड करत होते तेव्हा तेच मारामारी करून आले असेल असा तिच्या आईला संशयसुद्धा येत नाही.

इकडे मुक्ता-रजत यांच्या संसारात काय चालले आहे ते आता आपण बघू. शीतल पुरी ही बाई रजतावर प्रेम करत आहे आणि मुक्तेचा द्वेष करत आहे. ती सकाळीसकाळी माणसे साधारणतः चहा वगैरे घेतात त्यावेळेस रजताच्या घरी येऊन त्याचा पियानो ऐकत बसलेली असते. सकाळी पियानो वाजायला लागलेला पाहून मुक्ता घाईघाईने बाहेर येऊन रजताला ओढून चहानाश्त्यासाठी नेते आणि शीतलबाईंना टोमणा हाणते की, माझा नवरा 'नौ से नौ तक' मला वेळ देऊ शकतो तेव्हा तू जरा थांबच. मग ते तिथून गेल्यावर 'नौ से नौ तक? मै तुम्हारे पती को तुमसे छीन लूंगी. फिर देखती रहना घडी. नौ से नौ तक..' हा डायलॉग पुरीबाई ज्या ताकदीने टाकतात, ते पाहता त्यांना नौ तरी बक्षिसे अभिनयात मिळाली असावीत.

आता पुढे उभी राहणारी सिच्वेशन दिग्दर्शकाने मोठ्या कल्पकतेने गुंफली आहे.

१. मुक्तेच्या वडलांचा तिच्यावरील राग निवळतो व ते धाकट्या बहिणीचा नवरा मुक्तेने पसंती दिल्याशिवाय पक्का करणार नाही असे सांगतात. म्हणजे मुक्तेला दिल्लीला जाणे आले. (नायतर काय, दोन्ही बाजूंचे नातेवाईक नाहीत, म्हणजे ही बाई नातेवाईकांकडे म्हणून बाहेरगावी जाणार नाही. नोकरी वगैरे करत नाही म्हणजे मीटिंग किंवा बिझनेस के सिलसिले मे बाहेरगावी जाणार नाही. मग बाहेरगावी जाणार कशी? प्लीज नोट: ती बाहेरगावी जाणे आवश्यक आहे.) तशी ती जातेही.
२. वस्तीत होळीचा नाच असतो तेव्हा दलिप ताहिल पुन्हा येतो. यावेळी गडकरकाकू घरीच असतात, त्यांच्यासमोरच चुकून त्यांची रत्नासारखी कन्या पुन्हा मारामारी करते आणि काकूंचा रक्तदाब वाढतो. बहुधा त्यांच्या शरीरात लपून बसलेले अंगदुखी, संधिवात, लिम्फोसर्कोमा ऑफ इन्टेस्टाईन वगैरे रोग एकदम उफाळून येतात आणि त्यांना मुक्तेकडे घरकामाला जाणे अशक्य होऊन बसते. सांगा बरं, आता कामाला कोण जाईल? Proud
३. त्या प्रायोगिक पियानोवादन आणि नृत्य या संयुक्त कार्यक्रमाची वेळ जवळ येत असताना सरावासाठी म्हणून शीतल पुरीबाई रजताच्या घरी येतात आणि थेट बेडरूम गाठून, तिथे अनावश्यक कपडे काढून त्याला आपल्या जाळ्यात ओढण्याच्या प्रयत्न करतात. पण श्रीदेवी तिथे मालकिणीचा संसार वाचवायचा म्हणून ऐनवेळेस येऊन पुरीबाईंचा डाव उधळून लावते.
४. पुरीबाई चिडून शफी इनामदाराला 'मी शो करत नै जा' म्हणून निघून जातात. आणि शफी इनामदार 'तू माझे नुकसान केलेस' म्हणत राजेशावर डाफरतात. राजेश घरी येऊन श्रीदेवीला रागे भरतो आणि 'कहांसे लाऊ मै शीतल पुरी जैसी डान्सर?' असे म्हणतो तोच बाहेर पाऊस सुरू होतो आणि श्रीदेवी एकदम नाच करत पावसात जाते आणि तिचे 'गुण' खन्नाकाकांसमोर एकदम उघड होतात.

आता पुढे:

शीतल पुरीच्या जागी तुलसी (म्हंजे श्रीदेवी) नाचणार, हे चाणाक्ष वाचकांना कळले असेलच. शफी इनामदाराकडे राजेश तिला घेऊन जातो तेव्हा ती 'देवताओं का इमान डोल जाये' इतकी सुंदर असल्याने तो तिच्याकडे भलत्याच नजरेने पाहतो. ते रजताला न पटल्याने तो तिला सरळ घरी घेऊन येतो. रात्रीची वेळ असते, पाऊस पडत असतो. रजत तिला तिच्या बस्तीजवळ सोडतो. मग घरी येऊन दारू पीत बसतो. श्रीदेवी घरी जाते पण तिला आठवते की, आपण आज मालकिणीची साडी नेसली होती आणि ती लौकरात लौकर परत करणे तिचे कर्तव्य आहे. लौकरात लौकर म्हणजे आत्ताच्या आत्ता असा विचार करून ती रात्री, पावसात तिथे जाते. राजेशाला 'जास्त पिऊ नका' असे दटावते. आत जाऊन साडी सोडते, तेवढ्यात पाऊस असला की वीज जाते या नियमाप्रमाणे वीज जाते. Proud

मुक्ता दुसर्‍याच दिवशी सकाळी परत येते पण श्रीदेवीचे एक पैंजण तिथे सापडूनही मुक्तेला शीतलचा संशय येतो. (हे कसे काय ते विचारायचे नाही.) आता मुक्ता रजत यांच्या संसारात 'संगीत संशयकल्लोळ' सुरू होतो. शीतल पुरी ही बाई मुक्तेला वेळीअवेळी नाही नाही ते बोलून त्यात तेल ओतत असतेच. शेवटी एक वेळ अशी येते की, राजेश शीतलबाईंबरोबर अमेरिकेला जायला निघतो. मुक्ता धावतपळत त्याला भेटायला जाते तर शीतल ही तिला वेळीच अडवून भेटू देत नाही.

इकडे श्रीदेवीला (साहजिकच!) दिवस जातात. तिच्या वस्तीतल्या एका चाणाक्ष सुईणीला हे कळते आणि वस्तीवाले तिला वस्तीतून हाकून लावतात. ते पाहून जयश्री उभ्याउभ्या कोसळते आणि तिचे प्राणोत्क्रमण होते. श्रीदेवी एका महिलाश्रमात राहायला जाते. एकटीनेच घरी काय राहायचे म्हणून मुक्तादेखील बंगला सोडून तिथेच राहायला येते. (अजाब आहे की नाही?)

श्रीदेवीला झालेले मूल हे आश्रमाची संचालिका (जी मुक्तेची नातलग की काहीतरी असते!) युक्तीप्रयुक्तीने मुक्तेला दत्तक देते आणि अमेरिकेत रजताला फोन करून 'मुक्ता आई झाली' वगैरे सांगते. मग असे कळते की, मुक्तेने लिहिलेली पत्रे ही शीतल रजतापर्यंत पोचूच देत नाहीये. मग फोन वगैरे स्वस्त मार्ग चोखाळण्याऐवजी श्रीदेवी थेट शफीकडे जाते आणि म्हणते की, तुझे शो कॅन्सल झाल्याने झालेले नुकसान आपण अमेरिकेत शो करून भरून काढू. मग ते थेट अमेरिकेत शो करायला येतात.

अमेरिकेत राजेश सकाळचा पेपर पाहतो तेव्हा त्याला शोची जाहिरात दिसते आणि शो सुरू होतो. हा इथे पहा: ऐ बाबा रिका/रेका

मग रजताला समक्ष भेटून शीतलेचे दुष्कर्म तुलसी राजेशासमोर उघड करते. तेव्हा पिस्तुल काढून चाललेल्या वादावादीत श्रीदेवीच्या हातून शीतलेला गोळी लागते आणि अमेरिकेत घडलेल्या गुन्ह्याचा खटला भारतात सुरू होतो.

इथे श्रीदेवीचा फ्लॅशबॅक संपतो. मुक्तेचा फ्लॅशबॅक रजत अमेरिकेला जातो तिथे संपतो.

श्रीदेवी कोर्टात येतायेताच दलिप ताहिलाला मारून आलेली असते. तिने सत्यकथन करताच राजेश दोषमुक्त होतो आणि श्रीदेवी आपले मूलरूपी नजराना मुक्ता रजताच्या हवाली करून कोर्टातच (तिच्या आईप्रमाणेच) उभ्याउभ्या कोसळून मरून पडते.

बहुधा सिनेमा प्रदर्शित झाला तेव्हा अख्खा सिनेमा पाहिलेले प्रेक्षकदेखील सिनेमागृहात (बेशुद्ध होऊन) उभ्याउभ्या कोसळले असावेत.

आखिर में: पुरीबाई बर्‍या होतात की नाही, हे काही शेवटपर्यंत कळले नाही. शफी इनामदाराने राजेश, पुरीबाई, श्रीदेवी सगळ्यांना मारायची सुपारी दलिपाला दिलेली असते. त्याला श्रीदेवी नुस्तं ढकलून, पाडून मारते. (त्याला फक्त डोक्याला खोक पडते; पण श्रीदेवीच्या साडीवर खांद्यांपासून खालपर्यंत रक्ताचे डागच्या डाग!) शफीच्या सुपारीचे पुढे काय होते तेही कळत नाही. हा सिनेमा पूर्ण का पाहिला, हेही मला अजून कळत नाही. Proud

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

देव आनन्द आता ८६ व्या वर्षी 'चार्ज शीट' नावाचा चित्रपट (त्याच्या स्टाईलमध्ये) बनवीत आहे...
***

ये कहांकी दोस्ती है, के बने है दोस्त नासेह,
कोइ चारासाज होता, कोइ गम गुसार होता...

(नासेह्=सल्ले देणारा, चारासाज= दु:खावर फुंकर घालणारा, गम गुसार= दु:खात भागीदार)

Biggrin
हायला, ज्या सिनेमाचे अस्तित्वही मला ठाउक नव्हते त्याचे असे साक्षात्कारी परीक्षण लिहिणार्‍या श्रमातेचा विजय असो

श्रीदेवीचं ते पावसात नाचून काळ्याचं पांढरं (का गोरं) होणं आठवलं. भयंकर चित्रपट!
श्रमाते, तुमने जो दिग्दर्शकके दिमागको समझा है, तुस्सी ग्रेट हो! Happy हल्ली फारेंड आणि तू चित्रपट बघेनासे झालात की काय?

इतकेच नव्हे, तर आपले कन्यारत्न सकाळी 'या हलकट माणसांना चांगले मारायलाच पाहिजे' अशी बडबड करत होते तेव्हा तेच मारामारी करून आले असेल ..
मै तुम्हारे पती को तुमसे छीन लूंगी.<<
<<श्रीदेवी तिथे मालकिणीचा संसार वाचवायचा म्हणून ऐनवेळेस येऊन पुरीबाईंचा डाव उधळून लावते.
<< श्रीदेवी एकदम नाच करत पावसात जाते आणि तिचे 'गुण' खन्नाकाकांसमोर एकदम उघड होतात.<<खतर्नाक!!
<<श्रीदेवी घरी जाते पण तिला आठवते की, आपण आज मालकिणीची साडी नेसली होती आणि ती लौकरात लौकर परत करणे तिचे कर्तव्य आहे. लौकरात लौकर म्हणजे आत्ताच्या आत्ता असा विचार करून ती रात्री, पावसात तिथे जाते<<
<<एकटीनेच घरी काय राहायचे म्हणून मुक्तादेखील बंगला सोडून तिथेच राहायला येते.<<
<<शो कॅन्सल झाल्याने झालेले नुकसान आपण अमेरिकेत शो करून भरून काढू<<
___/\___ Rofl Rofl वारले!

Pages