याचना संपोत माझ्या !

Submitted by सुप्रिया जाधव. on 18 December, 2013 - 21:04

वेदना रक्तात थोड्या ओत माझ्या
जीर्ण झाला जाणिवांचा पोत माझ्या

मार्ग दर्शवण्यास केली आर्जवे मी
टाकला डोळ्यांवरी तू झोत माझ्या

जीवनाचा खेळ झाला एकपात्री
नाटकाला लोटले गणगोत माझ्या

पूर्णता त्याच्या घरी पाणी भरू दे
वंचना माझ्या घरी नांदोत माझ्या

गुंतण्यातिल यातना माझ्या मला दे
वागती संदिग्ध होता होत माझ्या

कळकळीचे मागणे आहे सख्या हे....
तोड नाते, याचना संपोत माझ्या !

-सुप्रिया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वेदना रक्तात थोड्या ओत माझ्या
जिर्ण झाला जाणिवांचा पोत माझ्या

जीवनाचा खेळ झाला एकपात्री
नाटकाला लोटला गणगोत माझ्या

पूर्णता त्याच्या घरी पाणी भरू दे
वंचना माझ्या घरी नांदोत माझ्या..,. . ......

हे फार आवडले !!!

मार्ग दर्शविण्यास केली आर्जवे मी
टाकला डोळ्यांवरी तू झोत माझ्या

जीवनाचा खेळ झाला एकपात्री
नाटकाला लोटला गणगोत माझ्या

पूर्णता त्याच्या घरी पाणी भरू दे
वंचना माझ्या घरी नांदोत माझ्या<<< शेर फार आवडले. खयालही वेगळे मिळाले. या गझलेबद्दल अभिनंदन!

गझल अतिशय आवडली.

वेदना रक्तात थोड्या ओत माझ्या
जिर्ण झाला जाणिवांचा पोत माझ्या

सुरेख मतला.('जीर्ण' हवे.)

मार्ग दर्शविण्यास केली आर्जवे मी
टाकला डोळ्यांवरी तू झोत माझ्या

व्वा !

पूर्णता त्याच्या घरी पाणी भरू दे
वंचना माझ्या घरी नांदोत माझ्या

अत्यंत सुंदर ! दीर्घकाळ लक्षात राहणार आहे हा शेर.

वागती आलिप्त होता होत माझ्या
या ओळीत गडबड जाणवली.

कळकळीचे मागणे आहे सख्या हे....
तोड नाते, याचना संपोत माझ्या !

छान.
माझ्यामते ही तुमची आजवरची सर्वोत्तम गझल.
शुभेच्छा.

पूर्णता त्याच्या घरी पाणी भरू दे
वंचना माझ्या घरी नांदोत माझ्या
>> अत्त्त्तिशय आवडला हा...

'जीर्ण' आणि 'दर्शवण्यास' चालेल असं वाटतंय..

मतला आणि वंचना हे शेर फार आवडले.

बाकीचे शेरही छान फक्त डोळ्यांवरी, आलिप्त अशा शब्दांवर अधिक विचार झाल्यास सुलभ बदल होऊ शकतील.

शुभेच्छा!

<गुंतण्यातिल यातना माझ्या मला दे
वागती आलिप्त होता होत माझ्या>शेर कळला नाही.

<<<

शेर क्लिष्ट व उत्तम आहे. (असे शेर मला खरे तर आवडतात, पण अभिव्यक्ती क्लिष्ट करणे मात्र नाही भावत फारसे). विचार फार सूक्ष्म आला आहे या शेरात!

मी तुझ्यात गुंतल्यामुळे मला होणार्‍या मानसिक यातना फक्त मलाच होवोत, तुला होत असल्या तर त्या माझ्या मला परत दे. (पहिल्या ओळीत असे सुचवले आहे की त्या यातना तुला होतच नाहीत, ही बोच वर्णिली आहे पण वेगळ्या तर्‍हेने, दोष वगैरे न देता, हे अधिक छान)

आणि मग दुसर्‍या ओळीतः

(वृत्तासाठी अलिप्तचे आलिप्त करणे खटकते)

(पण प्रत्यक्षात) त्या यातना तू मला दिल्यास तर त्याही माझ्या पूर्णपणे होत नाहीत तर त्याही तुझ्यासारख्याच अलिप्त राहतात माझ्यापासून.

व्वा!

असे शेर फार कमी होतात, पण ते प्रभावी ठरण्यासाठी जमीन बदलावी व उपलब्ध जमीनीचा मोह त्यागावा असे मला वाटते.

सुप्रियांनी स्वतःचा दृष्टीकोन सांगितल्यास चर्चेतून चांगले काहीतरी निघावे.

प्रत्येक शेराचा इतक्या सूक्ष्मतेने विचार केल्यास सगळ्यांच्याच गझला अधिक प्रगल्भ व्हाव्यात.

परवा डॉ. अनंत ढवळेंनी एक बशर नवाझ साहेबांची आठवण सांगीतली,

आपण वाचलेला शेर त्यांना भावला नाही तर ते 'अच्छा है' असे म्हणतात आणि आवडला असेल तर त्याच्यावर भरभरून बोलायला लागतात.

इथे विचारल्या गेलेल्या शंका, मांडलेल्या चिकीत्सा, रसग्रहणे ह्या दुसर्‍या प्रकारात मोडतात असे प्रत्येक कवीला वाटले तर किती मजा येईल.

धन्यवाद बेफिकीर,
म्हणजे 'वागती अलिप्त, होता- होता माझ्या' अशी ओळ अभिप्रेत आहे का?
नाहीतर 'होता होत' मधून हा अर्थ कसा निघतो ते कळत नाही.

<<<<सुप्रियांनी स्वतःचा दृष्टीकोन सांगितल्यास चर्चेतून चांगले काहीतरी निघावे.>>>>>

विदिपा,

माझ मन आरशासमोर धरावं आणि त्याच हुबेहुब प्रतिबिंब पुढ्यात साकारावं तसच काहीस वाटून दाटून आलं बेफिजींच या शेराबद्दलच रसग्रहण वाचून. इतके भावनिक बारकावे अचूक ओळखून घेवून इतक्या चपखल शब्दात झालेल त्याच विश्लेषण वाचून माझ्या शेराचा मलाच हेवा वाटून गेला क्षणभर !

'अलिप्त' तेच्या बाबतीत १००% सहमत.

<<<असे शेर फार कमी होतात, पण ते प्रभावी ठरण्यासाठी जमीन बदलावी व उपलब्ध जमीनीचा मोह त्यागावा असे मला वाटते.>>>>

हे कळत असत पण वळत मात्र नाही . ( अजून तेव्हढ्या मात्रेत गझल भिनलेली नसावी माझ्यात Sad )

मतल्याबाबतही बहुतांशी सहमत आहे मी बेफिजींशी, तो पूर्ण झाल्यावर चढणारी नशा जाणवलीच नाही माझी मलाही. असो !

विदिपा ' डोळ्यांवरी' आपल्याला का खटकतोय हे सविस्तर जाणून घ्यायला नक्कीच आवडेल मला.

मयेकर साहेब 'होता होत' मधून अगदी तोच अर्थ अभिप्रेत आहे. ( 'होत' काफिया).

सगळ्यांचे मनःपुर्वक आभार !

ज्ञानेशजी, बेफिजी, नचिकेत ऋणी आहे आपली.

-सुप्रिया.

मतल्याबाबत एक गंमतीशीर अवांतरः

या मतल्यावरून मला माझा एक जुना मतला आठवला.

वेचा नवीन आशा माझ्या नसानसांनो
बदल्यात व्हा प्रवाही रक्तातल्या रसांनो

अभिप्रेत अर्थ - मी माझ्या शरीरातील प्रत्येक शिरेला आवाहन करत आहे की (निष्क्रीय बसण्यापेक्षा कशाचीतरी) आशा धरा (आणि ती आशा तुमच्यामध्ये साचलेल्या रक्ताला बहाल करा) आणि नंतर साचलेल्या रक्ताला आवाहन करत आहे की नसांकडून ती आशा घेऊन त्या बदल्यात प्रवाही व्हा (म्हणजे लाईव्हली, चैतन्यमय व्हा).

हा एकप्रकारे डीप थॉट आहे आणि म्हंटले तर हास्यास्पद मतला आहे. हास्यास्पद ह्यासाठी की काहीतरी करून जुळवाजुळव केल्याचा भास अगदी सहज होऊ देणारी शब्दरचना आहे आणि डीप अश्यासाठी की एका अतिशय तंद्रीमय अवस्थेत (वैचारीक तंद्री, अंमल वगैरे नव्हे) हा शेर आपोआप आला व तो माझ्या त्या काळातील मनस्थितीचे अचूक वर्णन करणारा व मलाच धीर देणारा वगैरेही ठरला. (त्याकाळी माझ्या गझलेवर गालिबची शायरी वाचल्यामुळे पडलेला प्रभाव अधिक होता).

मात्र गंमत ही की तेव्हा माझी गझल लेखनाची जेमतेम सुरुवात होऊन सहा एक महिने झालेले असावेत, त्यामुळे ह्या मतल्याला तेव्हा योग्य तो प्रतिसादच कोणी दिला नाही, ह्याचे कारण म्हणजे हा नवोदीत माणूस असे काही लिहू इच्छित असेल व लिहू शकेल हेच जवळपास अमान्य होते. (ह्यात दोष कोणाचाच असू शकत नाही, असे होणारच). पण हा मतला आजही माझ्या मनात ताजातवाना आहे. हे आठवण्याचे कारण म्हणजे वरील चर्चित शेर 'होता होत' वाला असाच काहीसा क्लिष्ट शेर आहे.

आणखी एक गंमत म्हणजे सव्वा वर्षापूर्वी माझे रक्त खरंच आधी हृदयात आणि मग फुफ्फुसात साचून त्याची गाठ झाली, तेव्हा आशा कशाची करावी हेही ठरवण्याच्या मनस्थितीत मी नव्हतो, व्हेंटिलेटरवर होतो.

शेवटी, सगळे आलबेल असते तेव्हा शायरी अधिक जोमदार होते आणि प्रत्यक्ष दु:ख कोसळते त्या क्षणी काहीही सुचत नाही हा अनुभव पुन्हा घेतला.

अवांतरासाठी क्षमस्व!

(एकुण चर्चा रंगत आहे, अशीच चर्चा, आठवणी, शेर बनण्याची प्रक्रिया वगैरे ह्याच धाग्यावर एकत्रीत करण्याची कल्पना सुचत आहे).

पूर्णता त्याच्या घरी पाणी भरू दे
वंचना माझ्या घरी नांदोत माझ्या

खूपच सुंदर द्वीपदी!

गज़ल तशी आवडली... पण सुप्रियाची सर्वोत्तम खचितच म्हणता येणार नाही. Happy

<<<(एकुण चर्चा रंगत आहे, अशीच चर्चा, आठवणी, शेर बनण्याची प्रक्रिया वगैरे ह्याच धाग्यावर एकत्रीत करण्याची कल्पना सुचत आहे).>>>

अर्रे व्वा !

जर अशी शेर बनण्याच्या प्रक्रियेमागची भूमिका इथे नमूद केली गेली तर अलिबाबाची गुहाच ठरेल हा धागा !

स्वागत ! स्वागत !! स्वागत !!!

-सुप्रिया.

वा वा अफलातून खयाल बेफिजी ! अगदी हटके !!

यावरून माझा एक अशाच धर्तीचा शेर आठवला.....

शुध्द ताजे रक्त अजुनी वाहती धमन्या तरीही
भोगल्या अवहेलनेची वेदना ह्रदयात जाते

<<शेवटी, सगळे आलबेल असते तेव्हा शायरी अधिक जोमदार होते आणि प्रत्यक्ष दु:ख कोसळते त्या क्षणी काहीही सुचत नाही हा अनुभव पुन्हा घेतला.>>>

अगदी !!

पण परमोच्च आनंदाच्या क्षणीही शब्द दगा देतात असाही माझा वैयक्तिक अनुभव आहे Happy

-सुप्रिया.

Pages