सिनेरीव्हू.....मंगलाष्टक वन्समोअर!

Submitted by मी मधुरा on 26 November, 2013 - 11:19

मंगलाष्टक वन्समोअर पाहिला आणि ‘बदाम राणी गुलामचोर’ मधला मुक्ता बर्वेचा एक डायलॉग आठवला...
”कस आहे न, कि आपण एखाद्या दुकानात एखादी वस्तू घ्यायला जातो, तिथे आपल्याला दुसरीच कुठलीतरी वस्तू आवडते आणि आपण तिसरीच गोष्ट घेऊन बाहेर पडतो....” तसच काहीसं या चित्रपटाबद्दल आहे.
नीटस कळल नाही न??? सविस्तर सांगते...

म्हणजे मी ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ फेम आणि माझे सर्वात आवडत्या राधा-घना म्हणजेच (स्वप्नील-मुक्ता)साठी सिनेमा पाहायला गेले. तिथे चित्रपट पाहताना मला त्यातले संवाद खूप आवडले, आणि मग कथेतून दिली गेलेली नवीनच संकल्पना घेऊन मी थिएटरमधून बाहेर पडले....आता कळल???

सुरवात ‘दिवस ओल्या पाकळ्यांचे’ या कर्णमधुर गाण्याने होते आणि शेवटसुद्धा एका ठसकेबाज गाण्याने होतो....’नवरी नि नवऱ्याची स्वारी!!!’ आणि कथेत प्रसंगांशी जुळणारी किंवा प्रसंगांना अनुसरून येणारी गाणी हि प्रसंगांना अधिक प्रभावीपणे मांडण्यात यशस्वी ठरली आहेत.

आता कथेबद्दल..... साधे, सोप्पे आणि मनाला भावणारे तरीही ‘रिअल-लाईफ’ संवाद, एक गोड आणि छान संकल्पना घेऊन येणारी हि कथा एका जोडप्याच्या जीवनावर असली तरीही प्रत्येक नवरा-बायकोच्या नातेसंबंधांना एका नव्या दृष्टीकोनातून उजाळा देत पुढे सरकते.

मुळात लग्न हे नातच असं आहे कि त्यात भांडण हि होतच राहतात. पण म्हणून ‘नात तोडण’ हा त्यावर उपाय असू शकत नाही, हाच संदेश देण या चित्रपटाच उद्दिष होत आणि ते खूप प्रमाणात चित्रपटाने साकारही केलेलं आहे.

कथेत आरती (मुक्ता बर्वे) हीचं आयुष्य पूर्णपणे तिच्या नवऱ्याच्या / सत्यजितच्या (स्वप्नील जोशी) भोवती, त्याची काळजी घेण्यात, तिन गुंफून टाकलेलं आहे. ती त्याची इतकी जास्त काळजी घेते कि तिच्याही नकळत सत्यजितला तिचा सहवास म्हणजे नरकवास वाटू लागतो. आपलं व्यक्तीस्वातंत्र्य, आपली स्पेस कुठेतरी हरवत चालली आहे असं त्याला वाटायला सुरवात होते...मग हळू हळू भांडण, वादावादी यामुळे त्यांच्या नात्यातला गोडवा निघून जायला लागतो....... मग विरह, गैरसमज सगळ्या गोष्टी कथेत दाखवल्या जातात.

अनपेक्षितपणे चित्रपटात विजय पटवर्धन, सई ताम्हणकर, हेमंत ढोमे हे हि कलाकार हजेरी लावतात आणि ते अभिनयाची उधळण करून चित्रपटाला एक नवा रंग देतात, हे मान्य करावंच लागेल. कादंबरी कदमने देखील ‘रेवाच्या’ पात्रात जीव आणलेला आहे. विशेष म्हणजे चित्रपटात कोणीही कृत्रिम अभिनय करत नाही...(एखादा कलाकार याला अपवाद असेलही!!!) एकंदरीत, सर्वांनीच चांगला अभिनय केलेला आहे, अस म्हणायला हरकत नाही. कथेतील संवाद खूपच सुंदर आहेत आणि यातली गाणी तर आधीच सुपर-डुपर हिट आहेत.

त्यातले मला आवडलेले संवाद....

“करियर इझ लाईक अ व्हायरस!!....हि अशी पाउलवाट आहे, जी पायाला चिटकून बसते, आणि जेव्हा ती संपते, तेव्हा आपण एकटेच उरलेले असतो.”

“आपण पैसा कमावतो पण तो खर्च करायलाही आपल्याकडे वेळ नसतो आणि ज्याला खर्च करता येतो, त्याच्या फोन आला कि ‘आत्ता मी बिझी आहे’ अस सांगण्याशिवाय बोलण्यासारख काहीच नसत आपल्याकडे!!!”

“आपल्याला न, हवं तेव्हा हवं ते करता आला पाहिजे....हसता आलं पाहिजे, रडता आलं पाहिजे, धरून ठेवता आलं पाहिजे, सोडून देता आलं पाहिजे...अगदी आरती सारखं!!!”

“सगळीकडे सगळ नॉर्मल ए......फक्त तू नाहीस...!!!”

“घरात सोफा आहे, बेड आहे; पण त्यांचा एक कॉर्नर सोडला तर आपलं अस काहीच वाटत नाही....हे सगळ थांबवता येईल???”

“एक डाऊनलोडचं बटण दाबून सॉफ्टवेअर अपडेट करता येत पण नाती अपडेट करायला आपल्यालाच मेहनत करावी लागते.”

“आपण माणूस नाही, मशीन बनलो आहोत.....टार्गेट सेट, दौडना शुरू!!!”

“ तू सांग मी काय करु....” “फक्त ३ किलो वजन अजून कमी कर.”

कथेत काही खूप छान विचार मांडण्यात आलेले आहेत....

‘लग्न झाल्यावरही माणसाने हे जाणून वागलं पाहिजे, कि आपण आणि आपला / आपली जीवनसाथी एक स्वतंत्र व्यक्ती आहे. आपल्याला आणि आपल्या जीवन साथीला एक ‘स्वतःच’ अस एक अस्तित्व आहे, विचार आहेत, मत आहेत. आणि आपण एका मर्यादेपलीकडे समोरच्यावर मत लादण चुकीच आहे, अन्यायकारक आहे.’

‘स्त्रीने नवऱ्याभोवती सतत फिरत राहण्याऐवजी आपली अशी समाजात जागा निर्माण करावी, नोकरी करावी, बिझनेस करावा... कारण आर्थिक स्वतंत्र माणसाला फक्त पैसाच नाही तर कॉन्फीडन्स सुद्धा मिळवून देतो.’

काही गोष्टी मात्र सांगाव्याश्या वाटतात.....

१. एक म्हणजे ‘नवरा नि नवऱ्याची स्वारी’ हे गाण शेवटी घ्यायला नको होत. त्यामुळे त्या गाण्याला न्याय मिळाला नाही अशी खंत मनाला वाटते.

२.चित्रपट हा ३-३.३० तासांचा असायला हवा होता; त्यामुळे कथा दाखवताना घाई झाली नसती. कुठे न कुठे कथेचा वेग जरा जास्त वाटतो. कथेत करियर, नोकरी या गोष्टींना दोन्ही (चांगल्या आणि वाईट) बाजूंनी दाखवल्यामुळे थोडासा चित्रपटाचा पाया कमकुवत बनतो असे वाटते.

३.लग्नाआधीचा भाग जास्त दाखवला असता तर कथा जास्त सुरस वाटली असती.
थोडक्यात,

व्हिलनवाले सिनेमे आणि सलमानचे दबंग चित्रपट पाहून थकला असाल तर एकदा आवर्जून पाहावा असा चित्रपट.

रेटिंग- ***

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलय. वाचताना वपुंच्या कथेतले वाक्य वाचतोय की काय असं वाटुन गेलं.
नाईलाजाने का म्हणा "आपली मराठी" वर येइल तेंव्हाच बघता येईल.

वाचताना वपुंच्या कथेतले वाक्य वाचतोय की काय असं वाटुन गेलं. >>>विजय, मी अगदी हेच लिहायला आले की संवाद लेखक वपु फॅन दिसतोय.

Happy ___/\___

मंगलाष्टक वन्स मोअर :

बंडल एकदम.

त्यात ते घोडनवरा व घोडनवरी कपल्स( स्व जो व मुब). त्यांच्या सिरियलचाच भाग पाहतेय असे वाटले. त्यात टाईमप्लीज मूवीजचे घुसड आहे असे सुद्धा वाटले.

स्वजो ला मुक्ता, सोनुल्या,राजा वगैरे विचित्र. फिदीफिदी

आजच्या काळात नवर्‍याच्या हातात अगदी रीमोट देणारी, त्याला योगा करायला लावणारी बायको असते काय्? त्याला अंघोळीचे कपडे सुद्धा हातात देणारी.. Proud

हा एकदम कुक्क्कुल बाळ...

मुक्ताचे ते , कसं आहे न? सुरुवात डोक्यात जाणारी आहे. Proud

झंपी - अगदी सहमत....मुक्ता पहिल्या दोन तीन मिनिटांमध्येच डोक्यात जायला लागते...
आणि स्वप्नील जोशी हा आळशी कलाकारांचा मेरूमणी आहे असे वाटू लागले आहे. व्यक्तीरेखेप्रमाणे आपण बदलणे आवश्यक असते हे या बाब्याच्या ध्यानीमनीच नाही...
एका लग्नाचीच गोष्ट पुढे पाहतो आहोत असे वाटले...त्यात त्याचे काम म्हणजे लॅपटॉप उघडणे आणि बंद करणे आणि अमेरिकेला जायचे स्वप्न पाहणे...
आणि इथे तर तो तेवढेही करत नाही. ऑफीस मिटींगमध्ये जो भरलेल्या पोत्यासारखा बसलेला असतो ते पाहूनच कुणीही त्याची जागीच हकालपट्टी करेल.
सेल्सचा माणूस असला बावळट श्या बघूनच चीड येते त्याची....
आणि त्याच्याबरोबर तो दारू पिणारा मित्र...कसला नाटकी बोलतो...
मला फक्त आणि फक्त कादंबरी कदम आवडली...

अगदी भंपक सिनेमा. मात्र गाणी खूप छान आहेत. शेवटचं अवधूत - वैशालीचं गाणं अप्रतिम आहे. दिग्दर्शकाचं नाकर्तेपण, की ते गाणं सिनेमात टाकायला त्याला सिच्युएशन तयार करता येऊ नये?
बाकी आशुचँप याच्या पोस्टशी सहमत.
मुक्तानी अशा भूमिका करणं थांबवून तिचं रेप्युटेशन जपलं पाहिजे.

मि मुव्हि नाहि पाहिला आजुन पण ति मुक्ता अशीच माझा डोक्यात जाते.
तो तर ४० शि ला आला,तोच तो पणा

टाइटल मध्ये एक इंग्रजि नाव घुसडल कि मोव्हि एक्दम हाय फाय झालि असे वाटते कि काय त्या निर्माता आणि दिग्द. ला

तीच ति थीम्.

अवांतर : एकदा एक थीम सुरु झालि कि जवळ जवळ २ वर्षे तरि त्या पट्टितले सिनेमे येतात.शाळा,एलतिगो.हे एक झाले कि बाकि सगळे सिनेमा त्याच थीम मध्ये.कलाकार हि नाहि बदलत

अरारा! अगदिच बकवास चित्रपट, मुक्ताच ते राजा,सोन्या म्हणण अगदी डोक्यात जात, .... काही काही गाणि बरी आहेत..

रिया, सिनेमा संपल्यावर, अवधूत - वैशाली सामंत हे गाणं गाताना (कदाचित रेकॉर्डींग करताना) दाखवलंय-- नवरी नि नवर्‍याची स्वारी .... असे काहीतरी बोल आहेत.
http://www.youtube.com/watch?v=29uNb3_OqVQ

वरील विडीओतलं गाणं जरा एडिट करुन वगैरे दाखवलंय.

मिपाने एकदम तोडलय ह्या रीव्युत. Happy एखाद्या शाळेतल्या मुलाला तयार करावे तशी ती तयारी करते राजाची. Proud

इतका फालतु चित्रपट पहाण्यात वेळ गेला... जीवनाचा अर्धा तास गेला. Proud
फास्ट फॉरवर्ड करत मी बरोबर ३३ मिनीटाला बंद केला.

एवढ्या प्रतिक्रिया वाचुन फास्ट फॉर्वर्ड करुन पाहिलाच.

आरारारा...काय ति हिरॉइन.तो स्कर्ट (आम्हि त्याला डायना स्कर्ट असे म्हणतो) घालुन ति कशि क्॑अय पुणे मनपा चि बस चडु शकलि Uhoh मनपा चि बस पकडायचि तर ड्रेस आधि घळ घळित हवाच.कारण त्यात अस दाखवलय कि ति बस ने प्रवास करते.

लाइफ रिपब्लिक रेडि तो मुव्ह इन झाले वाटते.त्याचे ब्रोशर्स इत्के भारितले होते ना (अवांतराबद्दल माफ करा)

माझा मते रेडिओ च ओफिस हे पुण्यात आहे आणि त्या स्वजो आणी सता ला ति रेवा ज्या रेस्ट्रॉ मध्ये बघते ते मेझा ९ होते जे पार हिंजवडित आहे.काहि हि ताळ तंत्र नाइ बुआ.पुण्या सारख्या शहरात हे लोक काय उडत प्रवास वगरे करतात कि काय.

'अरे तु माझा दिवस फोन नाहि उचललास्,इतक बिझि होतास का' अस कित्ति गोड आणि प्रेमाने ति त्याला विचारते,आगदि 'ईईSSSSS' अस म्हणायला होत.आपल्या पैकि कोण इतक प्रेमाने विचारत असेल ते हि दिवस भर फोन उचललेल नसताना.आपल तर अस झालेल असत कधि एक्दा भेटेल आणि तोंड सुख घेउ... Angry एवढच काय, फोन न उचललेला साथिदार हि आगदि वार तयार करयचा तयारिनेच घरि परततो.राजा फारच नशिब्वान आहे

बघूच नाही शकले ते गोडमिट्ट राजा सोन्या ऐकून... अर्धा तासही नाही.
मुक्ता बर्वे ला वाया घालवलंय असला रोल देऊन.

मिपा वरचा रिव्ह्यु एकदम भारीयं !!
आधीच वाचला असता तर बरं झाल असतं .. फास्ट फॉर्वड पण केला नसतं

शुगोल, Uhoh
मी हे गाणं अजिबातच पाहिलं नाहीये Uhoh
बहुदा मी सिनेमा संपल्यावर थांबायच्या भानगडीत न पडल्याने मिसलं.
थँक्स Happy