मुंबरी -तांदळाच्या पीठाची केळीच्या पानावर थापून केलेली भाकरी

Submitted by मेधा on 25 November, 2013 - 19:42
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

दोन कप तांदळाचे पीठ
अर्धा कप खोवलेले खोबरे
अर्धा कप सायीचे दही
एक-दोन चमचे घरचे लोणी - ऐच्छिक - इथलं अन्सॉलटेड बटर मी घातलं नाही.
पाव वाटी बारी़क चिरलेली कोथिंबीर
पाव वाटी बारीक चिरलेली कांद्याची पात किंवा कांदा - हे पण ऐच्छिक
२-३ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
मीठ

केळीची पाने

क्रमवार पाककृती: 

केळीची पाने धूवुन पुसून, तुमच्याकडच्या तव्यावर मावतील एवढ्या आकाराचे चौकोनी तुकडे करुन घ्या.
बाकीचे सर्व जिन्नस एकत्र करुन थोडे पाणी घालून थालिपीठापेक्षा थोडे सैल, साधारण मेदुवड्याच्या कंसिस्टंसी एवढे मिश्रण करुन घ्या.

केळीच्या पानाच्या एका तुकड्यावर हे पीठ गोल पसरा. वरुन दुसरे पान ठेवा. हे सर्व सँडविच तव्यावर ठेवा.
मध्यम आचेवर खालचे पान करपल्याच्या वास आला की पटकन पूर्ण सॅंडविच पलटा . एक ते दीड मिनिट लागेल.
आता तव्यालगत असलेले पान पण करपायला लागेल. एक ते दीड मिनिटाने वरचे पान काढून टाकून मुंबरी थेट तव्यावर टाका. दुसरे पान वर आलेले असेल, ते ही काढून टाकून भाकरी दुसर्‍या बाजूने पण खरपूस भाजून घ्या.

गरम गरम मुंबरी - कढीपत्ता-डाळं चटणी - खोबरेल तेल हे क्लासिक कॉम्बो आहे.
खोबर्‍याच्या चटणी बरोबर पण सर्व्ह करु शकता.

चिल्लर पार्टी खाणारी असेल तर हिरवी मिरची वगळली तरी चालेल. किंवा मोठाले तुकडेच घालून, केळीच्या पानावर पसरताना ते तुकडे वगळता येतील ,

वाढणी/प्रमाण: 
माणशी दोन तरी लागतील
अधिक टिपा: 

ओहास दे प्लातानो ( hojas de platano) या नावाने स्पॅनिश मार्केटात फ्रोझन पाने मिळतात. ती असतील तर फ्रीझरमधून काढूनफ्रीज मधे ८-१० तास ठेवून थॉ होतात .

पानाच्या वरच्या बाजूला पीठ पसरायचे असते , दुसर्‍या तुकड्याची सुद्धा पानाची वरची बाजू पीठाला चिकटून असली पाहिजे - अशी पद्धत आहे . का ते माहित नाही.

फोटो टाकते एक दोन दिवसात.

माहितीचा स्रोत: 
पारंपारिक
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त.

मस्स्त! ही भाकरी मी ओला नारळ खवून घालून करते. सोबत डाळ्या-मिरच्या-ओलं खोब्रं-कडीपत्याची चटणी. भाकरीवर घरी कढवलेलं साजुक तूप म्हणजे स्वर्ग! Happy
दही, कांदा, मिर्ची घालून पाहीन आता.

छान प्रकार आहे.
आपल्याकडे पानगे म्हणतात पण ते जास्त करून गोडाचे करतात. बाकी कृती अशीच. रुचिरातही मुख्य प्रकार गोडाचाच आहे, अवांतर म्हणून तिखट प्रकार सुचवलाय.

छाने. एक ? <<केळीच्या पानाच्या एका तुकड्यावर हे पीठ गोल पसरा.>>>पसरण्याच्या आधी non-stick spray मारायची गरज आहे का? चि़कटले तर माझा पुढचा सगळा ऊस्ताह निघून जाईल.

अरे ही पानगीची बहीण दिसते आहे. >> +१

पानगी + ताज्या लोण्याचा गोळा = स्वर्ग! हा प्रकार पण मस्तच लागेल. पानगीला राहिलेला पानाचा जळका छोटासा तुकडा मस्त खरपूस चव आणतो पण पूर्ण काळा झालेला हवा