कल्लोळ!

Submitted by मुग्धमानसी on 31 October, 2013 - 03:10

येता जाता कधीतरी
येऊन जाईन तुझ्या घरी
दचकुन किंवा हरखून मला
घरात घे हं... तेंव्हातरी!

दाराबाहेर चप्पल सोडून
मोकळ्या पायांनी येईन आत
हसून म्हणेन तुला सहज...
"झाली का रे वर्षं सात?"

तुही हसशील छानसं आणि
देशिल बसायला खुर्ची एक
गोंधळलेल्या डोळ्यांत तुझ्या
आठवणींचा तरळेल मेघ?

"आलोच" म्हणत जाशील आत
आणशील घोटभर गार पाणी
तेवढ्यात ओढणीआड माझे
झाकून घेईन काळे मणी....

नजर जराश्या घाईघाईनं
फिरवून आणिन घरभर
नोंदून घेईन काही खुणा...
काही तस्विर भिंतीवर!

अंगठ्याखाली दाबलेलं
स्वप्नं अलगद करीन सुटं
हळूच घालीन फुंकर आणि
स्वच्छ होतील जळमट पुटं

तेवढ्यात तूही येशील तिथं
बसशील समोर, बघशील वर
दोन्ही टोके कल्लोळाची
मधे शुन्यता आभाळभर!

तसेच तिथेच बसून आपण
मनाचं मनाशी बोलत राहू
ओठांतून मागे परतणार्‍या
बिचार्‍या शब्दांची गंमत पाहू

बोलता बोलता विषय पुन्हा
फिरून परत येईल तिथेच...
तेंव्हा मात्र सावध होऊन
समजूत घालशील नजरेनेच.

’खरंय तुझं... नकोच ते...’
मीही झालेय समजुतदार
ओढणीने का झाकता येतं
अंतर सगळं... आरपार...

दाराबाहेर माझ्याच चपला
चुळबुळत मला घालतील साद
म्हणतील, ’बये अनवाण्यानी
कुठवर जाशील आत आत?’

उठेन मग मी... तूही उठ...
म्हणेन, ’निघते... झालंय लेट...’
तेवढा एक क्षण सावरून घे...
टाळच बघणं डोळ्यांत थेट!

दाराबाहेर पडताच पुन्हा
घसरेल ओढणी, अडकेल पाय
भिंतीवरल्या तस्विरीला
सांग हं... माझं नाव काय...?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रसंग तर डोळ्यापुढे उभा राहिलाच पण वाचून कविता पूर्ण केल्यावरही काही वेळ प्रचंड हुरहुर लागून राहते ...
हेच कवितेचं सगळ्यात मोठ्ठं यश !
ग्रेट !!

छान. Happy

>>दोन्ही टोके कल्लोळाची
मधे शुन्यता आभाक्लास!....

हाय क्लास!

खरे तर अख्खी कविता अशक्य सुंदर अनुभूती आहे.

दोन्ही टोके कल्लोळाची....
मधे शून्यता आभाळभर !!!!.................. क्या बात है !!!

’बये अनवाण्यानी
कुठवर जाशील आत आत?’....... किती सुंदर एक्स्प्रेशन !!!

मुग्धमानसी ,

अशक्य दुष्ट आहेस तू … काय कमाल सुंदर लिहून ठेवलंयस… किती वेळा वाचली मी ही कविता आणि किती वेळा डोळे पाणावले । गणतीच नाही ….

खुप खुप आतवर पोचली... !!

दोन्ही टोके कल्लोळाची
मधे शुन्यता आभाळभर! >> हे तर अगदी सही उतरलंय.. खुप छान Happy

वा

खूप सुंदर !!

मुग्धमानसी, तुझ्या कविता, आपण त्यातील भावनांच्या कमानीखालून गेलो असलो नसलो तरीही अनुभुती देतात.

1000000000000 लाइक्स आणि 1000000000000000000000 वेळा वाह वाह ! महामहिम काव्य ।

1000000000000 लाइक्स आणि 1000000000000000000000 वेळा वाह वाह ! महामहिम काव्य ।

किती आणि कसं अचाट लिहून जातेस माहितीये का तुला? ते सांगण्यासाठीसुद्धा शब्द नाहीत माझ्याकडे. >>>+१११११

कशी सुटली माझ्या नजरेतुन ही! अशक्य छान आहे!

Pages