हसत खेळत स्पोकन इंग्लिश शिकवू शकणारे स्वयंसेवक हवे आहेत!

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 27 June, 2013 - 02:57

''एकसाथ नमस्तेऽऽ!'' इयत्ता पहिली व दुसरीतील ती चिटुकली मुलंमुली आम्हाला वर्गाच्या दाराबाहेर पाहूनच एकसुरात आमचे स्वागत करू बघत होती. जुनाट वाड्यात भरणार्‍या त्या शाळेतील लाकडी तुळया, पोपडे उडालेल्या भिंतींवरच्या रंगीबेरंगी कागदी पताका, तक्ते, चित्रे व फळ्यांनी सजलेल्या भिंती, बुटक्या उंचीची बाकडी यांना आम्ही न्याहाळत असतानाच वर्गातल्या मुलामुलींची लगबग सुरु झाली होती. वर्गाच्या दारात आम्ही थबकलो. त्यांच्या त्या लगबगीला, उत्साहाला आणि निरागसतेला मनात आणि कॅमेर्‍यात साठवून घेऊ लागलो. ''आम्हाला फोटू दाखवा ना!''च्या त्यांच्या गजरात शाळेपर्यंत येताना आजूबाजूच्या बकाल वातावरणाने मनावर आलेली किंचित मरगळ आपोआप झटकली जाऊ लागली. त्यांचे निरागस हसू आणि दंगा बघून आपल्या येण्याचे सार्थक झाले आणि ह्या मुलांसाठी आणखी काहीतरी केले पाहिजे हीच भावना मनावर तरंगत राहिली.

मायबोलीकर साजिरा, केदार, मो आणि मी गेल्या गुरुवारी खास वेळ काढून पुण्याच्या बुधवार पेठेत भर वेश्यावस्तीत चालविल्या जाणार्‍या व सावली सेवा ट्रस्ट तर्फे मदत केल्या जाणार्‍या नूतन समर्थ विद्यालयातील मुलांना भेटायला गेलो होतो. आपल्या संयुक्ता सुपंथ उपक्रमातून गेली दोन - तीन वर्षे आपण ह्या ना त्या प्रकारे या मुलांना शिक्षणासाठी मदत करत आहोत. या वस्तीत राहणार्‍या व व्यवसाय करणार्‍या वेश्यांच्या मुलांना या शाळेत इयत्ता सातवी पर्यंत विनामूल्य शिक्षण दिले जाते. बरीचशी मुले याच पार्श्वभूमीची असतात आणि खूप विचित्र आणि खडतर असते त्यांचे हे जगणे! आपले वडील कोण हे या मुलांना माहित नसते. आई वेश्या व्यवसायात असल्यावर त्या व्यवसायात असणारे शोषण अनेक प्रकारे ह्या मुलांच्या वाट्यालाही येते. रात्री ही मुले रस्त्यावर असतात. पहाटे तीन-चार च्या पुढे कधीतरी त्यांना घरात घेतले जाते. उपेक्षा, कुपोषण, उपासमार, व्यसने, कुसंगती, शिवीगाळ, अत्याचार, संघर्ष व असुरक्षिततेच्या दुष्टचक्रातून - तसेच वेश्याव्यवसायाच्या किंवा गँगवॉर-गुन्हेगारी जगताच्या फेर्‍यातून या मुलांना बाहेर काढायचा एकच मार्ग म्हणजे त्यांना चांगले शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर, समाजात मानाने जगण्यासाठी सर्वतोपरी मदत करणे.

नूतन समर्थ विद्यालयात मुलांना शिक्षणाबरोबरच दुपारची पोळी-भाजी आणि नाश्त्याला सरकार तर्फे दिली जाणारी खिचडी किंवा उपमा मिळतो. या मुलांच्या रात्रीच्या जेवणाची बर्‍याचदा वानवाच असते. उपासमार ही ठरलेली! सावली सेवा संस्थेकडून मुलांना शैक्षणिक साहित्य, गणवेष, स्वेटर, रेनकोट, दप्तर, इतर काही गरजेचे कपडे व वस्तू घेऊन दिल्या जातात. तसेच शाळेच्या काही शिक्षकांचे पगारही केले जातात. वर्षातून एकदा या मुलांचे स्नेहसंमेलन आयोजित करणे, त्यांना पिकनिकला घेऊन जाणे, त्यांच्या मनोरंजनासाठी जादूचे प्रयोग, पपेट शो इत्यादी कार्यक्रम हेही केले जातात. ह्या मुलांना शिक्षणात रुची वाटावी व स्वतःच्या हिमतीवर पुढे येऊन, चांगले शिक्षण घेऊन त्यांना अर्थार्जन करता यावे व समाजात मानाने जगता यावे यासाठी ही संस्था विशेष प्रयत्न घेते.

आपल्यातील काही मायबोलीकर या मुलांना आर्थिक किंवा वस्तूरुपाने मदत दर वर्षी आवर्जून करतातच! परंतु त्या शिवाय आणखी कशा प्रकारे मदत करता येईल असा आमचा विचार चालला असतानाच शाळेच्या मुख्याध्यापिकांनी व सावली संस्थेच्या भाटवडेकर बाईंनी ''मायबोलीकरांपैकी कोणी या मुलांना दर शनिवारी येऊन स्पोकन इंग्लिश (बोली इंग्लिश) शिकवू शकेल का?'' असे आम्हाला विचारले.

तर इयत्ता पाचवी, सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांना दर शनिवारी शाळेत जाऊन स्पोकन इंग्लिश शिकवायचे आहे. वेळ साधारण सकाळी अकरा ते बारा अशी असेल. कधी मुलांच्या व शाळेच्या सोयीनुसार पंधरा-वीस मिनिटे अलीकडे किंवा पलीकडे. आपल्यातले अनेक मायबोलीकर शनिवारी सुट्टीवर असतात. आपल्या वेळातला मौल्यवान वेळ या मुलांसाठी काढून त्यांना स्पोकन इंग्लिश शिकवू शकतात व त्यांचा इंग्रजीतून बोलण्याचा सराव घेऊ शकतात.

शाळेने अशी विनंती करण्याचे मुख्य कारण म्हणजे गेल्या वर्षी प्रायोगिक तत्त्वावर एका संस्थेमार्फत या मुलांना सहा महिने स्पोकन इंग्लिश शिकविले जात होते. येणार्‍या शिक्षिका मुलांशी इंग्रजीतूनच संवाद साधत व फ्लॅश कार्ड्स, गेम्स इत्यादी माध्यमांतून मुलांना सहज, हसत-खेळत, त्यांच्या कलाकलाने इंग्रजी बोलायला शिकवित होत्या. मुलांचे इंग्रजी त्यानंतर बरेच सुधारले व त्यांच्या आत्मविश्वासातही चांगला फरक दिसून आला. त्यामुळे शाळेला या वर्षीही मुलांना स्पोकन इंग्लिश स्वयंसेवा धर्तीवर शिकविणारे शिक्षक हवे आहेत. शाळा मराठी माध्यमाची आहे. संपूर्ण शालेय वर्षात (जुलै / ऑगस्ट २०१३ ते मार्च २०१४) या मुलांना शिकवायचे आहे.

आपल्यातील कोणी मायबोलीकर जर या मुलांना स्पोकन इंग्लिश शिकवू इच्छित असतील तर कृपया ह्या बाफावर तसे कळवावे व मायबोली संपर्कातून आपला संपर्क क्रमांक, खरे नाव, आपण देऊ शकणारा वेळ इत्यादी तपशील कळवावेत. लवकरच आपल्याशी संपर्क साधला जाईल. स्पोकन इंग्लिश खेरीज आपण शालेय अभ्यासक्रमातील इतर कोणत्या विषयांबद्दल या मुलांना अनुभवी मार्गदर्शन करू इच्छित असाल तर तसेही कृपया कळवावे. आपल्यातील प्रत्येकाचा सहभाग व योगदान हे अनमोल असणार आहे! Happy

शाळेचा पत्ता : नूतन समर्थ विद्यालय, सोन्या मारुती चौक, सिटी पोस्टाजवळ, बुधवार पेठ, पुणे २.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

उपक्रमात सहभागी असलेल्या आपल्या स्वयंसेवक शिक्षकांच्या टीमबरोबर केलेल्या गटगच्या वेळी घेतलेले छायाचित्र :

gtg1.jpg

(मुग्धमानसी, आर्या, शकुन, समीर देशपांडे, साजिरा, अनया)

धन्यवाद अरूंधती. Happy
सर्व स्वयंसेवकांकडे सांगण्यासारखं भरपूर आहे. आणि त्याचं डॉक्युमेंटेशन 'एक पथदर्शी प्रकल्प' या दृष्टीने होणे आवश्यक आहे. आपणा सर्वांना आणि शिवाय भविष्यात काम करू पाहणार्‍या स्वयंसेवकांना आणि टीम्सना त्यातून शिकण्यासारखं नक्कीच असेल. सर्वांनी कृपया आपापले अनुभव लिहा.

काही कारणास्तव या आढावा गटगला हजर न राहू शकलेले इतर स्वयंसेवक-
शैलजा, निकिता जोशी, हर्शलसी, सिद्धेश.

या मुलांमध्ये वावर सुरू केल्यावर वरकरणी ती आपल्या नेहमीच्याच शाळांतल्या आणि इतर सामान्य मुलांसारखीच अवखळ, खेळकर, हुड, शांत, बोलघेवडी, उत्साही, नाठाळ- इ. इ. वाटतात. मात्र काहीच दिवसांत हळुहळु कळायला लागतं- या मुलांनी कायकाय बघितलं, भोगलं, सोसलं आहे ते.

सर्वात मोठा प्रश्न- या मुलांचा पाया खूप कच्चा आहे. शिक्षक जेमतेम आहेत, शिवाय अनेक शिक्षकांनाच प्रशिक्षित करण्याची गरज आहे. नीट लक्ष न देता तसंच वरच्या इयत्तेत ढकलणं- हे होत गेलं. कारण शाळेत येतात हेच खूप झालं- असं म्हणण्याजोगी परिस्थिती आहे. इथं आले नसते, तर कुठे आणि कुठच्या मार्गाला लागले असते- याची कल्पना करवत नाही- इतकं वाईट वातावरण आजूबाजूला आहे. यापेक्षा शाळेत फारसं काही आलं नाही तरी चालेल, नुसतं बसू दे- हा हतबल दृष्टीकोन. याला इलाज नाही.

आणखी एक प्रश्न- या सार्‍यांना एकत्रित अशी एकच एक ट्रीटमेंट देता येणे शक्य नाही. जास्त आणि कमी हुशार मुलं असणं हे नैसर्गिक आहे, सार्‍या शाळांत असतं, आणि इथंही तसं आहेच. पण इथं त्याव्यतिरिक्त इतर अनेक गोष्टी आहेत. काही मुलांना उशिरा शाळेत घातलं आहे. कारणं अनेक- घरी शाळेबद्दल फारसं गम्य नसणं, आईचाच मुळात एक ठिकाणा न ठरणं, आर्थिक प्रश्न असणं, इतर कामधंद्यांसाठी मुलं हवी असणं, मुलांवर कुणाचाच कंट्रोल नसणं इ. इ. कितीतरी. यामुळे एका वर्गात वेगवेगळ्या वयोगटाची मुलं दिसू शकतात. एकाच वर्गात असली तरी वयानुरूप असलेली समज वेगळी असते. सहावीतले प्रकाश आणि चिलिया- हे दोघे असे आहेत. हे इतरांवर दादागिरी करतात. अचानक बाकावर चढून बसणे, दप्तरातून खाऊ काढून अचानक खायलाच चालू करणे, (त्यांच्या रोजच्या / नेहमीच्या) शिक्षकांची पाठ वळली, की टर उडवणे - हे प्रकार हे दोघे बिनधास्त करतात. काही दिवसांनी कळलं, हे दोघेही हुशार आहेत. पण हुड आहेत. प्रकाशला 'डांसर' आणि चिलियाला 'बिल्डर' व्हायचं आहे- हे ते दोघे ठणकावुन सांगतात. या दोन्ही शब्दांचं स्पेलिंग मात्र त्यांना माहिती नव्हतं.

घरातली परिस्थिती अनेक वेळा फारच विपरित असते. आपण सामान्य कुटुंबं कल्पनाही करू शकणार नाही, असं दैनंदिन आयुष्य आणि परिस्थिती या मुलांच्या वाट्याला आलेली आहे. आजूबाजूला, राहत असलेल्या जागेत आणि घरात शिव्या, व्यसनं, मारहाण, आरडाओरडा, पिळवणुक, दारिद्र्य, जीवघेणे आजार, अस्वच्छता, हतबलता, परावलंबित्व अशा अनेक गोष्टी आहेत. नाती आणि सोशल आयुष्य- ही आश्वासक कवचं फार नाहीत किंवा अजिबातच नाहीत. प्रेम, माया, जिव्हाळा- हे फारतर आईकडून आणि तेही जसं मिळालं तसं. काही मुलांनी स्वतःला मिटवुन घेतलं आहे. त्यांच्याशी कितीही बोललं तरी ती तोंडातून अवाक्षरही काढत नाहीत. प्रतिभाला तर वहीत लिहिलेलं स्वतःचं नावही दाख्गवण्याचा आत्मविश्वास राहिलेला नाही. ती बाकावर बसते खरी, पण वही कुणाला दिसू न देता खाली मांडीवर ठेवते. बघायला गेलं की पटकन मिटते. बाकावर सोबत सहसा कुणाला बसू देत नाही. भिंतीच्या कडेचं बाक, आणि त्यावर भिंतीच्या कडेची जागा, आणि उरलेल्या बसायच्या जागेवर दप्तराची पिशवी- आडोसा म्हणून. असा एकंदर कार्यक्रम. हिला आजवर मी हसताना पाहिलेलं नाही. कचकचुन भांडताना मात्र एकदोनदा पाहिलं आहे. एकदा मी तिच्या बाकावर तिच्याशेजारी हट्टाने एक तास बसलो. त्या दिवशी छोट्या मराठी वाक्यांचं सोप्या इंग्रजीत भाषांतर अशी असाईनमेंट होती. मोठ्या मिनतवारीनंतर तिने लिहायला सुरूवात केली तेव्हा मी अवाक झालो. प्रतिभाचं अक्षर सुंदर होतं! 'माझी आजी आजारी आहे' या वाक्याला ती अडली. पुन्हा पुन्हा खोदून विचारल्यावर किरट्या स्वरात पण निर्विकारपणे ती म्हणाली, 'मला आजी नाही.' मला माझी चूक कळली. मी पटकन ते वाक्य ओलांडून पुढे गेलो.

लहान वयातच अत्यंत शार्प असलेली काही मुलं आहेत. शबाना आणि अरूण ही अशीच आहेत. खूप गोड आणि चुणचुणीत आहेत हे दोघे. अरूणने एकदा वर्ग संपल्यावर सारे गेल्यावर त्याने हात धरून मला त्याच्या शेजारी बसवलं आणि विचारलं, 'मला शास्त्रज्ञ व्हायचं आहे. त्यासाठी आतापासून काय करावं लागेल ते सांग.' शबानाला फळ्यावर लिहायला खूप आवडतं. तिने एकदा सलग दोन तीन आठवडे 'तू कुठच्या लायब्ररीतली पुस्तकं वाचतोस? किती पुस्तकं आणि कपाटं आहेत तिथं? मला घेऊन चल. मी कधीच बघितली नाही लायब्ररी आजवर.' असा हट्ट धरला. आता हे कधी नि कसं शक्य होईल ते मला उमजेना. शेवटी मी तिला एकदा छावा आणि किशोरचे दिवाळी अंक दिले तेव्हा तिचा चेहरा सुपाएवढा झाला. पण अजूनही ती सांगतेच, 'एकदा शाळा सुटल्यावर आईला विचारून मला तुझ्या लायब्ररीत घेऊन चल. मी तिथं खूप वेळ बसेन.'

मुलांच्या अ‍ॅकडमिक प्रगतीबद्दल लिहिणं हा वेगळा विषय आहे. इतर स्वयंसेवकही त्यातलं जमलं तेवढं लिहितील. मात्र आम्ही तिथं गेल्यावर मुलांच्या चेहर्‍यावर फुलणारा आनंद आणि त्यांचा वाढलेला उत्साह-चैतन्य, त्यांचे वाढलेले आवाज आणि बदललेली देहबोली आणि त्यांना आमच्याबद्दल वाटलेला विश्वास - ही आमची सध्याची सर्वात मोठी कमाई आहे, असं मला वाटतं. इथून पुढे जाता आलं, तर ही कमाई सोबत घेऊनच. नाहीतर शक्यच नाही. Happy

या सर्व टीमचे खूप कौतुक आणि शुभेच्छा.खूप मस्त वाटलं साजिर्‍याचे अनुभव वाचून. अशा कामातून मिळणारा आनंद जाणवला की समाधान काय असतं ते कळतं. इतरांनीही प्लीज लिहा आपले अनुभव. Happy

साजिर्‍या, खूप मनापासून लिहिलं आहेस! तू म्हणालेलास, 'इथल्या एकेका मुलाच्या आयुष्यावर कादंबरी लिहिता येऊ शकेल!' हे किती खरं आहे हे तुझे अनुभव वाचताना पटतं. अशा सर्व मुलांना तुम्ही कमालीच्या पेशन्सने, प्रेमाने आणि कळकळीने शिकवत आहात, मुलांचा अभ्यासातला रस कसा वाढेल, त्यांच्यासाठी आणखी काय करता येईल ह्याचा साग्र विचार करत आहात... आपल्या सर्व शिक्षकांमधील ही जाणीव मला खूप मोलाची वाटते. Happy

या सर्व टीमचे खूप कौतुक आणि शुभेच्छा.खूप मस्त वाटलं साजिर्‍याचे अनुभव वाचून. अशा कामातून मिळणारा आनंद जाणवला की समाधान काय असतं ते कळतं. इतरांनीही प्लीज लिहा आपले अनुभव. +१

अकु, आढाव्याबद्दल धन्यवाद.
सगळेजण खरंच अतिशय उत्तम काम करत आहात. अभिनंदन.
साजिरा, खूप छान लिहिलयस. Happy

साजिरा, मस्त लिहिलंय.
या मुलांकरता वाचनालय करण्यासाठी जागेची सोय आहे का ?
१५०-२०० मराठी व सोपी इंग्रजी पुस्तकं ठेवण्याइतकी सोय होऊ शकत असेल तर ती पुस्तके देण्याची व्यवस्था मी करु शकते.
त्यांना सहज जाता येईल अशा वाचनालयाची माहिती मिळाली तर या मुलांची वर्षाची वर्गणी सुद्धा मी आनंदाने भरेन

साजिरा अत्यंत सुंदर लिहिले आहेस, मनापासुन लिहिले आहेस. परिस्थितीची सर्व कल्पना आली.

साजिरा, मुग्धमानसी, आर्या, शकुन, समीर देशपांडे, अनया, शैलजा, निकिता जोशी, हर्शलसी, सिद्धेश, अकु - तुम्हा सर्वांसाठी कडकडुन टाळ्या. फार आनंद झाला उपक्रम किती चांगला चाललाय हे वाचुन.

(मेधाची कल्पना खुप आवडली. मुलांसाठी वाचनालय करता आले तर नक्की लिहा).

अकु, साजिरा - असाच एक विचार सुचलाय. गणित आयुष्यभर वापरावे लागतेच मानवाला, तेव्हा मुलांना थोडेफार गणितपण शिकवायचा विचार आहे का?

अकु, सुंदर आढावा घेतला आहेस.

साजिर्‍या, तुझं पोस्ट वाचून गलबललं.

तुम्ही सगळे पोटतिडकीनं शिकवता, वेळ देता ही प्रचंड कौतुकाची बाब आहे.

माबोवर वावरायला लागले, तेव्हापासून चालणाऱ्या निरनिराळ्या समाजोपयोगी उपक्रमांबाबत वाचत होते. पण घरच्या- दारच्या जबाबदाऱ्या सांभाळून हे आपल्याला नाही जमणार, अस वाटायचं. ही इंग्लिश स्पिकिंगची माहिती वाचून वाटलं, की हे जमेल. आठवड्यात एक तास इतकी ‘ लिमिटेड’ समाजसेवा करायला हरकत नाही. शिकवण्याचा अनुभव आजिबात नव्हता, तरी सुरवात करायची ठरवली.

सुरवात करताना माझ्या डोळ्यासमोर माझ्या शाळेतील चित्र होती. प्रत्येक बाकावर दोन-दोन अश्या शिस्तीने बसलेली मुल-मुली. शिक्षकांच्या करड्या नजरेखाली होणाऱ्या शिस्तशीर हालचाली, इत्यादी. ह्या शाळेत मात्र एकदम भलतच चित्र होत. पटसंख्या अत्यंत कमी. पहिली ते सातवी मिळून ६०-७० च्या घरात विद्यार्थी. मराठी माध्यमाची शाळा. पण काही मुलांशी हिंदीत बोलाव लागत. त्यांची पार्श्वभूमी माझ्यासारख्या सुरक्षित, मध्यमवर्गीय व्यक्तीच्या कल्पनेच्या पूर्ण बाहेरची.

आता मराठी माध्यमाच्या शाळांनाही पहिलीपासून इंग्रजी आहे. पण इथे मात्र चौथीच्या मुलांनाही A, B, C, D ची ओळख नाही. काही विद्यार्थी चांगल्यापैकी हुषार आहेत. तर काहींना मराठीही वाचता येत नाही. मग आम्ही बेसिकपासून सुरवात केली. गाणी, गप्पा, प्रश्नोत्तरे ह्यांचे निरनिराळे प्रयोज केले. दोन्ही लिपी दरवेळेला फळ्यावर लिहून दाखवायचो. अस बरच काही.

शाळेच पाहिलं सत्र तर संपल सुद्धा. आता राहिले चार महिने. म्हणजे १५-१६ शनिवार. त्यात काय शिकवायच, हे ठरवून तसे प्रयत्न तर करू. पण खर तर इतकं काही करण्याची गरज आहे, त्या मानाने अगदी तोकडा, तुटपुंजा वेळ देतोय, ह्याची खंतच जास्त वाटतेय.

मेधा, शाळाचालकांशी बोलून तुला अवश्य काय ते कळवतो. खूप थँक्स अशी तयारी दाखवल्याबद्दल! Happy

सुनिधी, सध्या (ह्या वर्षी) इंग्रजीने सुरुवात केली आहे. पुढील वर्षी आणखी जोमाने व जास्त संख्येने प्रयत्न करता येतील. त्यात गणिताचे जमले तर छानच! सध्या तरी शाळेचे वेळापत्रक कोणत्याही प्रकारे विचलित न होऊ देता फक्त शनिवारची सकाळ/दुपार हाताशी मिळते. त्यामुळे मर्यादित वेळेत जे जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न करायचा हे सध्याचे धोरण आहे. ह्या वर्षीचा मुलांचा व शाळेचा एकंदर प्रतिसाद पाहून पुढच्या वर्षीसाठी प्लॅन करता येतील. थँक्स हे सुचवल्याबद्दल.

मंजू, मो, मृण्मयी, मिलिंदा, थँक्स.

मिलिंदा, मोस्ट वेलकम! Happy

अनया, तो 'बालमित्र'च्या अंकाचा किस्सा लिही ना! Happy

अकु, साजिरा आणि सर्व स्वयंसेवकांना सलाम! मला मेधाची कल्पना आवडली. असे काही करायचे ठरल्यास मलाही हातभार लावायला आवडेल.

आता माझी पाळी अनुभव सांगण्याची Happy

अरुंधतीने हा धागा काढला आणि मी वाचला त्यावेळेस मीही अशा काही उपक्रमांत सहभागी होता येईल का अशाच विचारात होते. हा धागा आणि अरंधतीचं कळकळीचं आवाहन योगायोगाने त्याचवेळेस वाचलं आणि ठरवलं... ही संधी सोडायची नाही. सुरुवात तर करुयात! शाळेला भेट दिली आणि जाणवलं अशी समर्पित आणि प्रामाणिक.. तरिही अत्यंत साधी माणसं सापडायला भाग्य लागतं! हे भाग्य आपल्याला लाभलं आहे तर या संधीचं आपल्यापरिने सोनं करायचा प्रयत्न करुयात. कदाचित या छोट्याच्या सुरुवातीतूनच एका मोठ्या क्रांतिकारी उपक्रमाची सुरुवात होईल... आणि त्यात एक खारीचा वाटा आपला ठरेल!

मी आधी एका कॉलेजमध्ये काही महीने शिकवायला होते. त्यामुळे हे जमेल असे वाटले. पण पहिल्या काही मिनिटांतच जाणवले कि हे काही वाटते तितके सोपे नाही. 'शाळेतली मुले' असे म्हटल्यावर आपल्या समोर जे चित्र सहसा उभे रहाते ते चित्र मला 'या' शाळेत नक्किच दिसले नाही. मुले बरिच चंचल आहेत. सामान्य शाळांमध्ये मुलांना असते तशी शिस्त या मुलांकडून अपेक्षित असणेच चुकीचे आहे हे मला स्वत:च्या मनाला बजावावे लागले. त्यामु़ळे तास चलू असतानाच मुलांनी डबा उघडून खात बसणे, मध्येच बसण्याची जागा बदलणे, मी शिकवत असताना मला ने विचारताच वर्गातून काहिही कारण सांगून बाहेर निघून जाणे, कधी कधी चक्क एका वर्गातले मूल दुसर्‍या वर्गात येऊन बसणे... या प्रकारांची सवय करून घ्यावी लागली. हळूहळू न चिडता मीही त्यांचे हे सगळे प्रताप एंजोय करू लागले. आणि खरंच कामाची मजा आली. कारण कितीही बालसुलभ चंचलपणा असला तरी ही मुलं स्वत:चं एक स्वतंत्र व्यक्तिमत्व बाळगून होती आणि ते फुलवायला उत्सुकही होती. मला फक्त त्यांच्यातल्या या उर्जेला योग्य दिशा द्यायची आहे हे लक्षात आले आणि मग त्या दृष्टीने काय काय करता येईल याचा विचार करता करता माझ्यातल्याच सृजनतेला आव्हान मिळत गेलं. मला खरंच खूप मजा आली हे काम करताना.

मला या कामासाठी अजून काही वेळ देता आला तर मी प्रयत्न करणार आहे. अशा उपक्रमात मला सहभागी करून घेतल्याबद्दल धन्यवाद अरुंधती आणि समस्त टिम! Happy

साजिरा, अनया, मुग्धमानसी - सुंदर शब्दांकन.

अनया - बालमित्राचा काय किस्सा आहे?

मेधाची कल्पना आवडली. असे काही करायचे ठरल्यास मलाही हातभार लावायला आवडेल. मी पण तयार आहे. Happy

मी हा धागा सुरुवातीपासून वाचतोय. तुमच्या सगळ्यांच्या कामाबद्दल भारी वाटतंय.

मुलांसाठी वाचनालयाच्या संबंधाने : मेधा यांनी लिहिलेच आहे, तसेच..
http://www.bookwallah.org/ ही संस्था अंडरप्रिव्हिलेज्ड मुलांसाठी वाचनालये करून देते. (यात पुस्तकेच नाही तर बहुतेक कपाटे वगैरेही आली.) पण बहुतेक पुस्तके अमेरिकेतून देणगीरूपाने मिळालेली असल्याने इंग्रजी, भारतीयेतर असतात. मी ज्या ऑर्फनेजमध्ये शिकवायला जातो तिथेही त्यांनी मस्त वाचनालय, पुस्तकांचा अफलातून संग्रह दिला आहे.

आता हे लिहीत असताना माझ्या डोक्यात कल्पना आली की मायबोलीकरांनाही असे काम करणे शक्य आहे. ज्यांना असा वेळ देणे, प्रवास करणे शक्य आहे ती मंडळी पुढाकार घेऊ शकतात. पुस्तके, पैसा गोळा करणे हे त्यापुढे अजिबात कठीण नसेल.

वर सर्वांनी बरेचसे अनुभव व विचार मांडले आहेतच. थोडे आता माझे अनुभव.

शिस्त, आज्ञापालन, नियमितपणा या सर्व गोष्टी नॉर्मल शाळेत नैसर्गिक / साहजिक वाटतात. कारण बहुतांश विद्यार्थाना कुटुंब संस्थेचा सपोर्ट असतो, सर्वांकडून कौतुक मिळवण्यासाठी पीअ र प्रेशर असते, एकमेकांत चढाओढ असते.

या शाळेत मुलांना शाळेत चांगले मार्क मिळवले म्हणून घरी शाबासकी कधीतरीच मिळाली असेल किंवा कमी मार्क मिळवले म्हणून घरी ओरडा क्वचितच मिळाला असेल. त्यांचे पीअर प्रेशर किंवा चढाओढ काय तर वाण्डपणा, हुडपणा, दंगा, मस्ती इ.

नॉर्मल शाळेत साधारणपणे इयत्ता सातवीच्या मुलांची समज १२ -१३ एवढीच असते. पण आसपासच्या अनुभवांमुळे या शाळेतील मुले निश्चितच १७-१८ ची वाटतात.

शाळेतील दोघांनी स्वता:ची व्हिझीटिंग कार्ड्स तयार केली आहेत. कुठलातरी ग्रुप आणि स्वता:चे नाव - ते सुद्धा इंग्लिशमध्ये; पण स्वत:च्या नावाचे स्पेलिंग चुकीचे - अशी त्यांची कार्ड्स आहेत. हे दोघे इतर उद्योंगांबरोबर काम काय करतात तर सण-समारंभात ढोल, ताशे वाजवतात. !

काही मुले तर gap / drop घॆउन ३-४ वर्षांनी शाळेत परत आली आहेत. त्यांना आता इंग्लिशची अक्षरओळखसुद्धा राहिली नाही आहे. एकाने त्याच्याकडचा Samsung S-3 दाखवला तर एकाने त्याच्याकडचे किमान १०,००० रु. चे १०० च्या नोटांचे बंडल दाखवले.

एक मुलगी चक्क इंग्लिश मीडियम मध्यॆ दुसरी पर्यंत शिकत होती. तिचे इंग्लिश अर्थातच चांगले आहे.

अशा सर्वांना एकत्र शिकवायला शाळेतील शिक्षकांना केवढे अवघड होत असेल, हे आता कळते.

अर्थात काही मुलांच्या बाबबतीत असेही वाटते की ही मुले अशा शाळेत कशाला आहेत ? नॉर्मल शाळेतसुद्धा ते अतिशय चांगल्याप्रकारे झळकले असते. काही जण उत्तम प्रकारची चित्रे काढतात, एकाने शाळेचा प्रकल्प म्हणून शनिवारवाड्याचे हुबेहूब मॉडेल तयार केले.

त्याचबरोबर आधी साजिरा म्ह्णाला तसं या मुलांकडून मिळणारा प्रतिसाद म्हणजे अगदी धन्य व्हायला होते.

शेवटी एक गमतीची गोष्ट सांगतो. शाळा सध्या ७वी पर्यंतच आहे. ७वी नंतर काही मुले सरस्वती विद्या मंदिर शाळेत जात आहेत. त्यातील २ मुले सुद्धा स्पोकन इंग्लिश शिकण्यासाठी यायला लागली आहेत. !!

समीर, ७वी नंतरची मुलंही स्पोकन इंग्लिशच्या तासांना शिकण्यासाठी येत आहेत, मुलांनी स्वतःची छापलेली व्हिजिटिंग कार्ड्स हे वाचून गंमत वाटली. शाळा सोडून गेलेली मुले पुन्हा शाळेत येतात हे वाचूनही बरे वाटले.
तू आणि बाकी सर्व टीम प्रत्येक मुलाकडे जातीने लक्ष देता, त्याची क्षमता - आकलनशक्ती इत्यादी समजून घेऊन त्याला इंग्रजीची गोडी लावायचा प्रयत्न करता हे खूप स्तुत्य आहे.

भरत, कल्पना उत्तम आहे. आपण नक्की या कल्पनेवर विचार व प्रयत्न करुयात. ती साईटही पाहते, धन्यवाद!

ह्यावरून आमच्या शाळेत आठवड्यातून एकदा वाचनाचा तास असायचा ते आठवले. पालक शिक्षक संघाच्या बाई गोष्टीच्या पुस्तकांची पेटी घेऊन त्या तासाला वर्गात यायच्या. त्या पेटीतील आपल्याला आवडतील ती (किंवा बाई देऊ करतील ती) गोष्टीची पुस्तके वर्गात बसून वाचता यायची. पुस्तक घरी घेऊन जायचे असेल तर तशी नोंद करून ती घरी नेता यायची. आठ दिवसांनी पुस्तक पुढच्या तासाला परत करावे लागायचे. जर पुस्तक घरी न्यायचे नसेल तर वाचनाचा तास संपताना ते परत करावे लागायचे. ह्या उपक्रमातून वाचनाची गोडी लागायला मदत झाली.

असा काही वाचनालय उपक्रम किंवा पुस्तकांबद्दलची मदत करायचे ठरले तर फारच छान होईल. शाळा काय म्हणते ते बघूयात.

स्वाती२, चेरी, हर्पेन, तुमची नावेही अशा उपक्रमासाठी नोंदवून घेत आहे, धन्यवाद! Happy

इथं कौतुक करणार्‍या लोकांना थँक्स! यामुळे आलेला हुरूप नक्कीच आमच्या कामात मदत करेल. Happy

स्वयंसेवक लोकहो, धन्यवाद. सागण्यासारखं खूप आहे, याची कल्पना आहे. त्यातल्या त्यात थोडक्यात तुम्ही जे मांडलंय, ते प्रातिनिधिक आहे, असं म्हणता येईल.

समीरच्या वर्गात खरंच अचाट पोरं आहेत. मात्र समीर त्यांना छान मॅनेज करतो.
निकिता सध्या बहुधा इथं नसते. तिच्याकडे सांगण्यासारखं सर्वात जास्त असावं- विशेषतः तिने आणि अनयाने मिळून स्पोकनइंग्लिश + खेळ असे काही प्रयोग केले आहेत. तिने ईमेल केल्यास ते इथे टाकेन.

येत्या शनिवारी शाळा पुन्हा सुरू झाल्यानंतर हेडमास्तरांशी अनेक मुद्दे (आढावा गटग मध्ये बोललेले आणि अरूंधतीने इथं तिच्या पोस्ट मध्ये लिहिलेले इ.) बोलायचे आहेत, त्यात पुस्तकं / लायब्ररीचा मुद्दा घेऊ. त्यानंतर इथं पुन्हा लिहिन.

--
अपडेट-
पुस्तकं / लायब्ररीसंदर्भात मदतीची तयारी दाखवलेले मायबोलीकर-
मेधा, सिंडरेला, स्वाती२, चेरी, हर्पेन.

माझ्याकडून २ "अनुभवाचे बोल" Happy

नूतन समर्थ शाळेला माझी पहिली भेट मी कधीच विसरणार नाही. माझं बालपण पुण्यातल्या सगळ्यात वेगानं विस्तारलेल्या उपनगरात, सुशिक्षित कुटुंबात आणि सुरक्षित वातावरणात गेलं. शाळा सुद्धा तशीच. अभ्यासावर भर असला तरी विविध उपक्रम चालवणारी, शिस्तप्रिय मध्यमवर्गीय वातवरणातली. सिमेंट ची बिल्डींग असलेली, स्वतःचं छोटं ग्राउण्ड असलेली (हो, नूतन समर्थ शाळा पहिल्यावर आपल्या शाळेची सिमेंट ची ४ मजली बिल्डींग होती हे सुद्धा खूप वाटतंय).

ह्या उपक्रमात सहभागी होताना साजिरा नी मला फोन वर मुलांच्या पार्श्वभूमीची आणि शालेच्या वातवरणाची कल्पना दिली होती. पण तरीही पहिल्यांदा भर वस्तीतल्या शाळेच्या जुन्या पुराण्या इमारतीमधे शिरताना, अति-अरूंद जिन्याच्या उंच उंच पायर्‍या चढताना मनावर दडपण आलं होतं. 'दीपक दादांसोबत क्लास घ्यायला आलेय' म्हणल्यावर तिथल्या एका बाईंनी मला डायरेक्ट मुख्याध्यापिका बाईंच्या खोलीत न्हेउन बसवलं. तिथल्या बायकांच्या चेहर्यावर मला खूप कौतुक दिसलं अमच्या टीम बद्दल. थोडी हुशारी आली मला.

नेहमीची वेळ झाल्यावर साजिरा सर आले. त्यांनी मला शाळेचे छोटे छोटे वर्ग दाखवले. पुन्हा ते अति-अरूंद आणि उंच वगैरे जिने चढून आम्ही तिसर्‍या मजल्यावर गेलो. पाचवी च्या वर्गावर शिकवायला कोणि नव्हतं म्हणून मला तो वर्ग दिला. मनात म्हणलं अरे बापरे, पहिल्याच दिवशी पाचवी च्या मोठ्या मुलांना शिकवायचंय ? पण सुरुवात केली आणि ५ च मिनिटात लक्षात आलं की इंग्रजीच्या बाबतीत ह्या शाळेतली ५ वी ची मुलं म्हणजे सामान्य शाळांमधली पहिली-दुसरीतली मुलं आहेत.

माझ्या ५ वी च्या वर्गात ५ च मुलं असतात. चौघांचं बेसिक A-B-C-D तयार आहे. एकाला नुसती अक्षरं पण ओळखता येत नाहीत. मग काय, सुरुवात अगदी साधा अक्षरं लिहिण्याचा खेळ खेळण्यापासूनच केली. आमच्या मुलांना नुसतं 'ही ही अक्षरं लिहून दाखवा' म्हणलं तर अजिबात लिहावसं वाटत नाही. पण २ गट करून स्पर्धा आणि फळ्यावर मार्कं लिहिणार म्हणलं की हिरिरीनं लिहितात सांगाल ते :). म्हणजे प्रयत्न करतात. अडेल तिथे इतर जण प्रॉम्प्टिंग करू लागतात किंवा आम्ही सांगायचं. आपल्या टीम ला १ मार्क मिळवून देउन जागेवर परत जाताना चेहर्‍यावर अगदी लढाई जिंकल्याचा आवेश असतो Happy

सरळ साध्या पद्धतीनी अभ्यास घेऊ लागलं तर ही मुलं लक्षच देत नाहीत. खिडकीतून बाहेर च बघतील, हळूच मारामारी सुरू करतील किंवा वेगळा च विषय काढून बोलायला लागतील. (त्यातल्या त्यात माझ्या वर्गातल्या मुली शांत तरी बसतात. पण मुलं ? शक्यच नाही). त्यामुळे आमचा बहुतांश अभ्यास खेळातून चालू असतो. त्यातही चित्रं काढून अभ्यास असेल तर उत्साह बघण्यासारखा असतो. साधे साधे इंग्रजी शब्दं माहीत नाहीत मुलांना. clean म्हणजे काय, आपली country/city कोणती हे सांगता येत नाही. त्यामुळे सध्या तरी वेगवेगळ्या प्रकारे जमतील तितके रोजच्या वापरातले शब्दं शिकवत आहे. तास सुरू केला की पहिला जो विषय निघेल तो घेऊन आमचा अभ्यास सुरू. कधी सकाळी उठून आपण काल केलं त्यावर इंग्रजी शब्दं वापरून बोलायचं, कधी भुगोलाचं पुस्तक पाहून country/city शिकायचं असं चालू असतं. कधी एखादा आज्जी चिडली की कशी ओरडते त्याची नक्कल करून दाखवतो. मग आज्जी, चिडणे ह्यांना इंग्रजी शब्दं शोधतो आम्ही.

अजून खूSSSप लांबचा पल्ला गाठायचा आहे. पण मुलांना आम्ही घेतो ते तास आवडतायत, त्यांच्या शाळेच्या आणि घरच्या एरवीच्या वातावरणापेक्षा वेगळं काहीतरी घडतंय त्या एका तासात हे बघून खूप बरं वाटतं. आणि त्यात आपला खारीएवढा का होइना वाटा आहे हे जाणवलं की अभिमान सुद्धा वाटतो.

मुलांच्या सोबत माझा पण वैयक्तिक फायदा आहेच ह्यात. समाजातल्या ह्या वर्गाच्या परिस्थितीची थोडीफार जाणीव होऊन आपण किती सुखात आहोत ते कळतंय. मनात आणलं तर आपण आपल्या आवडीच्या कामाकरता वेळ काढू शकतो हे लक्षात येतंय. आमच्या टीम मधले सगळेच जण नोकरी-व्यवसाय सांभाळून इतर काय काय सामाजिक उपक्रम करतायत ते पाहून प्रेरणा मिळतीय. आणि महत्वाचं मिळतंय ते म्हणजे IT च्या बोअरिंग दिनक्रमापेक्षा वेगळं, जिवंत असं काहीतरी केल्याचं अतीव समाधान....

मला या उपक्रमात सहभागी व्हायला आवडेल. अकु तुम्हाला संपर्कातून मेल केली आहे.

दर तासाला निकीता अक्शरे,त्यांचे उच्चार, त्यापासूनचे शब्द शिकवते. मग मी काहीतरी वेगवेगळे टॉपीक बोलण्यासाठी घेते. शेवटी सगळे गाणी म्हणतो. असा साधारण तास होतो. एका शनीवारी मी 'चित्रावरून प्रश्न' असा विषय ठरवला होता. म्हणून सकाळची बालमित्र पुरवणी घेउन गेले. आमचे विद्यार्थी प्रचंड खूश! (आमच्या घरचा बाल आता १८ चा झाल्याने घरी त्या पुरवणीला कोणी हातही लावत नाही.)

'दिदी,तास संपल्यावर मला द्याल तो पेपर" सनीचा प्रश्न. मी होकार दिला. तास संपला, तेव्हा सनी कुठेतरी गायब झाला होता. मग साहिलने पेपर हातात घेतला आणि तेवढ्यात सनी अवतरला!! मग दोघांच तुंबळ युध्द... पेपरची ओढाओढ.. शेवटी त्या पेपरच्या चिंध्या!!!

आता दिवाळीच्या सुट्टीत मी माझ्या आणि इतरांच्याही घरचे बालमित्र जमवले आहेत. येत्या शनीवारी सगळ्यांना शेपरेट पेपर देणार आहे.

'बालमित्र' म्हणजे सकाळ पेपरची पुरवणी होय...तरीपण धन्यवाद अनया, आम्ही पण आमच्याकडचे बालमित्र देऊ का?

पुस्तकं / लायब्ररीसंदर्भात मदतीची तयारी दाखवलेले मायबोलीकर-
मेधा, सिंडरेला, स्वाती२, चेरी, हर्पेन.
>> परत एकदा दुजोरा.

मी ज्योत्स्ना प्रकाशनाची (शिकवणार्‍यांनी वयोगटानुसार निवडलेली) नवीन पुस्तके देऊ इच्छितो. तसेच माझ्याकडे 'अक्षरधारा'चे नित्यवाचक सभासदत्व आहे. त्या योजने अंतर्गत पुस्तकांच्या किंमतींच्या पटीत मिळणार्‍या सूट मधे वाढ होत जाते. (जसे ५०० रुपयांच्या खरेदीवर १०%, ५०१ ते १०००च्या खरेदीवर १५% त्याहून अधिक वर २०% वगैरे हे उदाहरणार्थ आहे त्यात त्यांचे अजून काही पोट्नियम आहेत जसे रामकृष्ण मठाच्या पुस्तकांवर सूट नाही, एन्बीटीच्या पुस्तकांवर फक्त ५% सूट वगैरे) तर सांगायचा मुद्दा की नवीन पुस्तके खरेदी करायची ठरल्यास, एकत्र खरेदी केली तर त्याच पैशात अधिक सूट मिळवून एखादे तरी जास्तीचे पुस्तक घेता येईल.

(वि सू - अक्षरधाराच्या ह्या योजनेतून सभासदाद्वारे एका वर्षात खरेदी केलेल्या पुस्तकांची किंमत १०, ००० च्या वर (कितीही) गेली असता त्याला काही वाढीव रुपयांची पुस्तके मिळतात. माझी या वर्षीची खरेदी ऑलरेडी त्यावर गेलेली आहे) Happy

शकुन, छान लिहिले आहेस. आपल्या वैयक्तिक फायद्याबद्दल अगदी अगदी! Happy

अनया, बालमित्राचा किस्सा लिहिल्याबद्दल थँक्स!

हर्पेन, लहान मुलांचे वाचायचे अंक, पुरवण्या, मासिके इत्यादी असतील तुझ्याजवळ तर मोस्ट वेलकम. पुस्तकांच्या माहितीबद्दल थँक्स! इमेल/ फोनवर बोलूच.

अश्विनी, इमेलला उत्तर दिले आहे. Happy

Pages