आईची रेसिपी - मूगागाठी

Submitted by स्वप्ना_राज on 18 November, 2013 - 04:38
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मूग, हिरवी मिरची, ओलं खोबरं, साजूक तूप, हळद, हिंग, जिरं, मोहरी, हळद, कढीपत्ता, मीठ, चिंचेचा कोळ, गूळ, कोथिंबीर, काजू

क्रमवार पाककृती: 

रात्री मूग भिजत घालायचे.
दुसर्‍या दिवशी सकाळी उपसून स्वच्छ रुमालात घट्ट बांधून ठेवायचे.
त्या दिवशी रात्री गरम पाण्यात भिजत घालून सोलून घ्यायचे.
दुसर्‍या दिवशी सकाळी पाणी उकळत ठेवून त्यात हळद घालून मोड आलेले मूग शिजवून घ्यायचे.
तूप गरम करून त्यात हिरव्या मिरचीचे तुकडे आणि ओलं खोबरं भाजून घ्यायचं. त्याचं मिक्सरमधुन वाटण करून घ्यायचं.
पातेल्यात साजूक तूप गरम करुन त्यात हिंग, जिरं, मोहरी, हळद, कढीपत्ता ह्यांची फोडणी करायची.
मग त्यात वाटण, शिजवलेले मूग, मीठ, चिंचेचा कोळ आणि गूळ घालायचा.
उकळी आली की कोथिंबीर घालायची.

mugagathi.JPG

गरमगरम भात, लिंबाचं अथवा आंब्याचं लोणचं ह्यांच्यासोबत कॅलरी़जची पर्वा न करता ओरपायची. एखादं रायतं सोबत हवं असल्यास ढोबळी मिरची किंवा भेंडीचं रायतं करु शकता.
(रायत्यांच्या रेसिपीला एकट्या साधनानेच प्रतिसाद दिला होता [थॅन्क्स साधना!] म्हणून मी रिक्षा फिरवत आहे हे चाणाक्ष वाचकांनी ओळखलंच असेल!)

अधिक टिपा: 

१. भिजवलेले काजू आमटी शिजताना घालू शकता. ते भिजत घालायला विसरलात तर कच्चे काजू मूग शिजताना घाला.

२. 'लागणारा वेळ' ह्यामध्ये दिलेल्या अर्ध्या तासात मूग सोलायला लागणारा वेळ समाविष्ट नाही ह्याची कृपया नोंद घ्या. हा वेळ मूगाचा आकार, सोलायला बसलेली जनता, जनतेचा वेग, कौशल्य, चिकाटी तसंच मूगाचं प्रमाण अश्या अनेक बाबींवर अवलंबून आहे. तरी 'एकमेकां करू सहाय्य' ह्या तत्त्वाचा वापर केल्यास कमी वेळ लागतो. हे काम करायला सहजासहजी कोणीही तयार होत नाही हेही लक्षात ठेवा.

३. करायला थोडी किचकट असली तरी तयार झाल्यावर बोटं चाटायला लावेल अशी ही सारस्वती आमटी आहे.

माहितीचा स्रोत: 
जिच्या हातात आधी माझ्या पाळण्याची दोरी असायची आणि सध्या माझी मानगूट असते ती
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जियो स्वप्ना. Happy
माझी खूप आवडती आमटी. नुसती वाटीत घेऊन ओरपायला खूप आवडते मला. Happy

मेधानेपण अशीच रेसिपी 'मुगा घशी/मुगा मोळो' या नावाने लिहिली आहे.

मस्तच लागतं. याला आम्ही मुगाचं बिरडं म्हणतो. फक्त चिंचेच्या कोळाऐवजी आंबोशी/आमचूर घालतो.....

मस्त...

जिच्या हातात आधी माझ्या पाळण्याची दोरी असायची आणि सध्या माझी मानगूट असते ती >> हे पण मस्त.

मूग का सोलून घ्यायचे?
इथे मूग म्हणजे हिरवे मूगच अपेक्षित आहेत ना? की वालांसारख्या कठीण सालीचे अजून कुठले मूग असतात?
इकडे मेधाने मूगागाठीची पाकृ लिहिली आहे, त्याप्रमाणे मी मुगाची उसळ कधीतरी करते. मस्त लागते चव. त्य पाकृप्रमाणे केलेली मसुराची उसळही मस्त लागते.

मंजूच्या प्रश्नाला अनुमोदन. मुग सोलल्याने काही वेगळी चव येते का? शॉर्टकट मारून न सोलता रेसेपी केली तर नाही का चालणार?

मुगाची साले काढताना, एकेक दाणा घेऊन सोलावे लागत नाही. मोड आलेले मू़ग कोमट पाण्यात घालून जर ते भांडे पाण्याच्या धारेखाली धरले तर साले आपोआप सुटी होऊन वर तरंगू लागतात. ती अलगद हाताने काढून टाकता येतात. एखाद दुसरा चुकार मूग राहतो, तो सोलावा लागतो.

स्वप्ना, छान कृती. गोव्यात काहीजण डब्यात घेऊन यायचे आणि मला मुद्दाम खाऊ घालायचे. प्रत्येक व्यक्तीच्या हातची चव निराळी असते.

साध्यासुध्या मुगाला एकदम ग्लॅमरस रूप दिलंय. क्रमवार पाककृतीतून काजू गायब आहेत; ते डायरेक्ट टीपांमध्येच उगवलेत.

मेधाची रेसिपी : http://www.maayboli.com/node/4126

दोन्ही सेमच आहेत. फक्त मेधाने जास्तिचे धणेही भाजायला सांगितले आहेत.
परवाच केलेली मी. थोडी उग्र वाटली मला.

मस्त आहे रेसिपी. मुगाची सालं काढणं हा प्रकार जरा किचकट वाटतोय खरा. पण जेव्हा मूड असेल तेव्हा करून बघेन.
अदिती, ह्यात साजूक तुप आहे म्हणजे उग्र वाटणार नाही बहुतेक.

सायो, मुगाला आधी मोड आणून मग "पाणी उकळत ठेवून त्यात हळद घालून मोड आलेले मूग शिजवून घ्यायच" ही स्टेप केली तर सालं आपोआप निघून येतात. वरच्यावर काढून टाकायची. अगदी १००% रिझल्ट मिळत नाही पण सोपं पडतं सालं काढणं.

बिरडं आणि हा प्रकार एकदम वेगवेगळे ना? मुगाघशी माइल्ड लागतं चवीला. बिरडं तसं उग्र लागतं.

मूग सोलल्यामुळे त्यातील फायबर वाया जात नाही का? मी न सोलताच करून बघेन.
मूगाची पिवळी डाळ घेऊन हीच कृती केली तर चव तीच असेल का?

सही पाककृती आहे! नक्की करून बघणेत येईल.

मूग सोलायला किचकट, फायबर वाया या किंवा अशा कारणांनी मूग सोलायला नकार असणार्‍यांना फुकटचा सल्ला....:P
खरंच, सालं काढणं अजीबात कठीण नाही. मोड चांगले लांब आले की अर्धा तास कढत पाण्यात घालून, हलक्या हातांनी चोळलं तर सालं निघतात. सालं काढून केलेल्या कर्‍या, बिरडी चवीला वेगळी आणि (जास्त) छान लागतात. फायबरची चिंता असणार्‍यांनी त्या जेवणात/नंतर हवंतर चमचाभर मेटाम्युसिल/बेनेफायबर पाण्यातून घ्या, पण सालं काढा(च). Proud

फायबरची चिंता असणार्‍यांनी त्या जेवणात/नंतर हवंतर चमचाभर मेटाम्युसिल/बेनेफायबर पाण्यातून घ्या, पण सालं काढा(च).
>>>>>>>>>>> मृ..........ठीक आहे मग सालं काढूच! :स्मित :
छान रेसिपी.

>>थंडीमध्ये रात्री खायला छान लागेल असं वाटतंय रेसेपी वाचून.

एकदम बरोबर. प्राची म्हणते तसं नुसती गरमागरम वाटीत घालून खायलाही मस्त लागते.

>>मूग का सोलून घ्यायचे? इथे मूग म्हणजे हिरवे मूगच अपेक्षित आहेत ना?

सालं ठेवून ह्या आमटीला तीच चव येईल असं मला वाटत नाही. सालासकट उसळ किंवा सॅलड ठीक आहे पण ही आमटी सोललेल्या मुगाचीच हवी. मूग म्हणजे हिरवे मूगच.

>>मोड आलेले मू़ग कोमट पाण्यात घालून जर ते भांडे पाण्याच्या धारेखाली धरले तर साले आपोआप सुटी होऊन वर तरंगू लागतात.

हो दिनेशदा, पण इथे कधीकधी खूप छोटे मूग मिळतात. ते चवीला जास्त छान असतात पण सालं काढताना फार त्रास होतो. सालं मूगाला घट्ट चिकटलेली असतात...गरम पाण्यातून काढून सुध्दा. थोडे चिकटही असतात.

>>क्रमवार पाककृतीतून काजू गायब आहेत; ते डायरेक्ट टीपांमध्येच उगवलेत.
ही ऑप्शनल स्टेप आहे म्हणून टीपेमध्ये आहे.

आज केली होती मूगागाठी. स्वैपाकामध्ये कधीच ओला नारळ वापरत नसल्याने नारळ किती घ्यावा आणि किती भाजावा याचा नीट अंदाज येत नव्हता. Happy चिंच-गूळाची पण फारशी सवय नाहीये. पण भरपूर नारळ घातलेली आंबट-गोड मूगागाठी मला खूप आवडली. नवर्‍याने पण बर्‍यापैकी आवडीने खाल्ली..फक्त लेकाला मात्र आवडली नाही. (तसंही त्याला मोड आलेली कडधान्यं फक्त कच्चीच आवडतात... शिजवलेली चालतचं नाहीत. )

आज करतेय ही भाजी. खरेतर गाठी वाचुन शेव गाठिया असे कायतरी वाटलेले।, पण हेही चालेल.

मिर्चिचे रायते मस्त लागले ग।

अवांतर - मला मोड़ आलेले मुग साल kaadhunaच खाल्ले जातात। सालिसकट केलेली भाजी खास्य्ला नको वाटते.

अल्पना, मी आईला विचारलं पण ती इतक्या वर्षांच्या सवयीने सगळं अंदाजाने करते. Sad

>>मला मोड़ आलेले मुग साल kaadhunaच खाल्ले जातात। सालिसकट केलेली भाजी खास्य्ला नको वाटते.

मला पण. Happy