तिची आठवण आणि डायझापँन..

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 13 November, 2013 - 10:56

सोळा वर्ष उलटली ती जावून
सहा महिन्याचा सोनेरी संसार
क्षणात गेला होता विस्कटून
औषध गोळ्या खावून खावून
कसबस स्वत:ला त्यानं
घेतलं होतं सांभाळून
रडतरखडत पडत धडपडत
मार्गी लागले होते जीवन
आणि काही महिन्यांनी
पुन्हा लग्न केलं त्यानं
बायको मिळाली चांगली
मुलंही झाली गोड दोन

पण तरीही त्याच्या मनातून
जात नाही ती अजून
आणि ती का गेली
हा अनुत्तरीत प्रश्न
त्याला सतावतो अजून
पुन्हा तेच वादळ
येते भिरभिरून
तो तिचा चेहरा
शांत स्तब्ध
नुकताच निजल्यागत
डोळ्या समोर येतो
पंख्याच्या वाऱ्यानं
हलणारे तिचे केस
जाणवतो तो भास
पुन:पुन्हा होणारा
जणू काही बसेल
ती आता उठून

आणि मग
कपाटात ठेवलेली
डायझापँनची गोळी
टाकतो तो घेवून
उरात रुतलेला तो प्रश्न
आणि ती आठवण
पुन्हा खोलवर गाडून
तिच्या त्या
दडपून ठेवलेल्या
फोटों सारख्या
कुठे आहे माहित असून
विस्मृतीचे त्यावर
खोटे ओझे ठेवून
अन कधी काळी दिसलेच तर
एक गोळी नेहमीच असते
कपाटात ठेवलेली राखून
त्या न संपणाऱ्या
व्याकूळ आठवणींना
टाकण्यासाठी
पुन्हा एकदा खुडून ?

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

Group content visibility: 
Public - accessible to all site users