चित्रपट समीक्षा: क्रिश ३

Submitted by निमिष_सोनार on 4 November, 2013 - 06:53

चित्रपट समीक्षा - क्रिश ३
दर्जा- * * *
चित्रपटाचा प्रकार - वैज्ञानिक कल्पना, फॅण्टसी आणि ऍक्शन
कलाकार -
निवेदकाचा आवाज - अमिताभ बच्चन
क्रिश आणि रोहित मेहेरा - हृतिक रोशन
प्रिया - प्रियांका चोप्रा
काया - कंगना राणावत
काल - विवेक ऑबेरॉय

सुरुवातीला थोडक्यात कथा पाहू :

हा खऱ्या अर्थाने सिक्वेल आहे. मागच्या दोन्ही चित्रपटांची (कोई मिल गया, क्रिश) कथा यात खरोखर पुढे सरकते. क्रिश ३ ची कथा क्रिश प्रमाणेच खूप किचकट आहे.
रोहित मेहेरा हे त्यांचा मुलगा क्रिश आणि क्रिश ची पत्नी प्रिया सोबत राहत असतात. ते सूर्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेवर एक प्रयोग करत असतात.
पण सुरुवातीला तो प्रयोग ऊर्जा आवश्यकतेपेक्षा जास्त झाल्याने अयशस्वी होतो. दरम्यान क्रिश भारतात अनेक ठिकाणी संकट आले असल्यास मदतीला जात असतो.

काल नावाचा एक शास्त्रज्ञ असतो. त्याला लहानपणापासूनच टेलिकायनेसीस चे वरदान मिळाले असते (ते का मिळाले असते ते नंतर शेवटी आपल्याला कळते आणि त्याला ही कळते. त्याच्या वडिलानंही ते माहिती नसते)
तो अपंग असून व्हीलचेअर वर बसल्या बसल्या अनेक गोष्टी इकडच्या तिकडे करू शकतो.
त्याने अनेक मानवर (मानव + जानवर) प्रयोगशाळेत बनवले आहेत आणि स्वत:ला ठीक करण्यासाठी तो अनेक प्रयोग करत असतो.
त्यासाठी लागणारा पैसा तो एका रोगाचे विषाणू बनवून नामिबिया, भारत अशा देशांत मार्फत पसरवून लोकांना आजारी पाडून, त्याचा इलाज करण्यासाठी स्वतःच्या रक्ता पासून ऍंटीडोट बनवून ते विकून मिळवतो.

पण इकडे रोहीत स्वतः वर आणि क्रिश वर त्या विषाणू चा परिणाम न झाल्याने क्रिश च्या रक्तापासून ऍंटीडोट बनवण्यास सफल होतात आणि तिकडे काल ला धक्का बसतो की हे कसे शक्य आहे? त्याच्या रक्ताविना इतर रक्तापासून हे ऍंटीडोट बनवणे कसे शक्य झाले? त्या अनुषंगाने रोहीत ला (सिंगापूरला जाऊन) एक सत्य कळते... ते काय असते? पडद्यावरच बघणे योग्य!
रोहित सिंगापूरला जाणार आहे हे क्रिशला घरात असून सुद्धा माहिती नसते आणि त्याचे कारण प्रिया असते असे रोहितला दिसते पण तसे नसते...

काल च्या अनेक मानवरांपैकी (मान्यवर नाही बरे!) एक मादक मानवर स्त्री काया ही सरड्याचे गुणधर्म असलेली मानवर असते. ती कोणाचेही रंग रूप घेऊ शकते. "काल" च्या पयोगशाळेत जे चालते त्याचा भांडाफोड करण्यास निघालेल्या एका व्यक्तीला ती रूप बदलवून धोक्याने मारते.

क्रिश आणि त्याच्या पूर्ण कुटुंबावर हे मानवर एके दिवशी हल्ला करतात.... त्यात प्रिया जखमी होते....क्रिश त्यांचेशी लढतो,
नंतर डॉक्टर क्रिश ला सांगतात की प्रिया च्या पोटात त्याचे वाढणारे बाळ हल्ल्यात मृत्यू पावले आहे.....

पुढे काय होते? पडद्यावर बघा!

परिक्षण :

सुरुवातीचा विमानातल्या प्रवाशांना वाचवण्याचा प्रसंग अगदी अस्सल आणि नवीन! ज्याने कुणी हि शक्कल लढवली त्याला शाबासकी!!

मानवर रात्री क्रिश कुटुंबावर हल्ला करतात तेव्हाची ऍक्शन अगदी वेगळी. वर्णन करण्यापेक्षा मी म्हणेन ती पडद्यावर अनुभवा!

ऍक्शन आणि स्पेशल इफेक्ट हॉलिवूडच्या तोडीचे आहेत. त्याबद्दल १०० मार्क. आणि विशेष म्हणजे स्पायडर, सुपर, एक्स अशा अनेक मॅन पेक्षा क्रिश आपले करामतीतले आणि ऍक्शन मधले वेगळेपण टिकवून ठेवतो. त्यात कुणाचीही नक्कल नाही.

चित्रपटाची कथा अस्सल आहे. फक्त "काल" चे शेवटचे दृश्य आयर्न मॅन ३ सारखे वाटते पण ते तरीही वेगळे आहे कारण त्याचा शरीराला चिकटणारे पत्रे टेलिकायनेसिस मुळे चिकटतात. आयर्न मॅन ची संकल्पना वेगळी आहे

कथेचे थोडेफार स्पायडर मॅन ३ शी साधर्म्य वाटते पण नंतर कळते की हे वेगळेच आहे.

यात चित्रपटात अनेक वैज्ञानिक कल्पना एकाच वेळी हाताळल्या गेल्या आहेत. (विषाणू तयार करणे, टेलिकायनेसीस, प्राणी मानव बनवणे, सूर्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेचा वापर करून वनस्पतींना जिवंत करणे)

"दिल तूही बता" हे गाणे श्रवणीय आणि प्रेक्षणीय (गाण्यातले लोकेशन्स बघण्यालायक आणि गाण्यातली कंगना अतिशय मादक दिसली आहे) तसेच "रघुपती राघव" या गाण्यात हृतिकचा नाच छान आहे.
पूर्ण चित्रपटात कंगना खूप सुंदर आणि मादक दिसली आहे. सुपर वूमन च्या चपळाईला साजेसे तिचे शरीर असल्याने ती भूमिका तिला फिट बसते. दिपिकाला (पडूकोण) ही ही भूमिका करता आली असती.
कायाच्या भूमिकेतली कंगना ची वेशभूषा थोडी कॅटवूमन सारखी वाटते पण कॅटवूमन ची भूमीका करणाऱ्या "हॅले बेरी " इतकी कंगनाची फिगर मात्र सुडौल वाटत नाही.

जीभ लांब करणारा मानवर आणि काया वगळता इतर मानवरांचा म्हणावा तसा उपयोग कथेत करता आला नाही. शेवटच्या प्रसंगात फक्त काल शीच लढाई दाखवण्यापेक्षा हे सगळे मानवर सुद्धा त्यात दाखवायला पाहिजे होते. तसे राकेश रोशनने टाळले असावे कारण कदाचित मग तो स्पायडरमॅन ३ चा क्लायमॅक्स वाटला असता, ज्यात सगळे खलनायक एकत्र येतात.
क्लायमॅक्स थोडासा ट्रान्स्फॉर्मर्स ३ च्या एका ऍक्शन सीन सारखा वाटतो.

"क्रिशच्या आजूबाजूला अनेक मानवर" असे चित्रपटाचे एक पोस्टर बघून चित्रपटाबद्दल एक जी कल्पना आणि उत्सुकता तयार होते ती या चित्रपटात पूर्ण होत नाही.
राजपाल यादव चा रोल विनोदासाठी थोडा अधिक करता आला असता.
हृतिकचा अभिनय (तिन्ही भूमिकांमधला) अतिशय उत्तम.

क्रिश चित्रपटासारखा सिद्धांत आर्य च्या प्रयोगशाळेत जसा क्लायमॅक्स होतो तसा आता क्रिश ३ याही चित्रपटाचा क्लायमॅक्स "काल" च्या प्रयोगशाळेत होणार आणि चित्रपट एवढ्यात संपणार की काय असे वाईट वाटत असतांना काल तेथून पसार होतो, आणि आपल्याला अजून क्लायमॅक्स बाकी आहे असे समजून हायसे वाटते.

एकूण राकेश रोशनचा एक अतिशय चांगला सफल प्रयत्न असे या चित्रपटाबाबत म्हणता येईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हृतिकसाठी बघणार हे नक्की, पण त्याने या प्रतिमेतून बाहेर पडून आणखी वेगळे रोल्सही करायला हवेत.
एकतर तो अगदी कमी चित्रपट करतो आणि त्यात सिक्वेल्स करत राहिला तर तो त्यातच अडकून पडेल.

अर्थात मोठ्या पडद्यावरच बघणार हा चित्रपट... फक्त तो विवेक ओबेरॉय सहन होतो की नाही तेवढे सांगा..

हो! विवेक ऑबेऱोय अतिशय आश्चर्यकारकरित्या सहन होतो. पण तोपर्यंयच जोपर्यंत तो व्हिल चेअर वर असतो. तोपर्यंतचा त्याचा अभिनय अतिशय उत्तम आहे. गंभीर आहे.
....पण जेव्हा तो पत्रे अंगाला चिकटवून शहरात येवून क्रिश चा पुतळा फोडून त्या जागी ऊभा राहून बडबड करायला लागतो त्यामुळे त्याचे खलननायकी गांभीर्य नष्ट होते. तो विनोदी वाटायला लागतो.
आता हा बावळट आतापर्यंतचा त्याचा अभिनय शेवटी वाया घालवतो की काय असे वाटायला लागत असतांनाच शेवटची दे धमाल हाणामारी सुरू होते आणि आपल्याला हायसे वाटते आणि विवेक पुन्हा सहन व्हायला सुरूवात होते....

मानवर रात्री क्रिश कुटुंबावर हल्ला करतात तेव्हाची ऍक्शन अगदी वेगळी
.
खरेच तो प्रसंग मस्त जमून आला आहे. उत्कंठावर्धक वगैरे म्हणतात अशी ती ऍक्शन आहे. ह्रितिकने क्रिश / कृष्णा आणि खास करून म्हातारा रोहित मेहरा तिन्ही भूमिका उत्तम साकारल्या आहेत. फक्त त्या म्हातार्या रोहितच्या हालचाली वयाच्या मानाने जास्त चपळ वाटल्या. विवेक ओबेरॉय आणि कंगनाची कामे पण चांगली झाली आहेत. प्रियांकाला मात्र जास्त वाव नाहि. केवळ चित्त थरारक ऍक्शन आणि ह्रितिक हेच या चित्रपटाचे प्लस प्वाइण्ट आहेत. पटकथा , संगीत तितकेसे जमून आले नाहि मात्र अगदीच सुमार म्हणता येईल असेही नाहि. एकुणात एकदा तरी बघायला हरकत नाहि. खरे तर हा चित्रपट ३डी मध्ये पाहायला जास्त मजा आली असती.

फक्त त्या म्हातार्या रोहितच्या हालचाली वयाच्या मानाने जास्त चपळ वाटल्या.
>>>>>>>>>>>>
म्हातार्‍या रोहितमध्ये सुद्धा सुपरनॅचरल शक्ती होत्या ना.... तोच ना तो, ज्याने कोई मिल गया संपताना चेंडू ढगात पाठवला होता..

विशेष म्हणजे स्पायडर, सुपर, एक्स अशा अनेक मॅन पेक्षा क्रिश आपले करामतीतले आणि ऍक्शन मधले वेगळेपण टिकवून ठेवतो. त्यात कुणाचीही नक्कल नाही.
>>

पाहिला पण कॉपी वाटला ३-४ अ‍ॅनिमेशन चित्रपटांची स्पायडर मॅन, एक्स मेन, सुपरमॅन. शेवटची लढाई तर ढापली आहे सुपर मॅन मधून

जेव्हा तो पत्रे अंगाला चिकटवून शहरात येवून क्रिश चा पुतळा फोडून त्या जागी ऊभा राहून >>>>> मला वाटले तसा उभा राहुन जोरात "मायाआआआआआआआआआआआआआआआ" म्हणुन किंचाळतोय की काय आता Biggrin

काल पाहिला क्रिश३. प्रयत्न चांगला. स्पेशल इफेक्ट्स सुपर्ब! रितिक , कंगना पर्फेक्ट वाटले
काल - त्या व्हिलन ला पण सर्व बाबतीत रितिक च्या तोडीस तोड दाखवलं असतं तर मजा आली असती.
पण पापा रोशन फार सेफ खेळलेत असे वाटले. रितिक समोर कुणी डोईजड नको अशा विचारात त्या व्हिलन वर अन्याय झालाय. त्याला अपाहिच दाखवलंय, कायम फक्त डोळे अन चेहरा हेच दिसते. जेव्हा फायनली उठून उभा राहतो तेव्हा लगेच पत्र्याच्या तोंड आणि फुल बॉडी झाकणार्‍या सुटात ! तेव्हाही फक्त डोळेच दिसतात त्यामुळे! एकूण त्याचा धाक मर्यादित झालाय. मला सारखं वाटत राहिलं, समोर एखादा लार्जर दॅन लाइफ वाटेल असा, किमान अर्जुन रामपाल सारखा वेल बिल्ट, देखणा व्हिलन असता तर रितिक च्या स्टारडम चे काही बिघडले नसते!
प्रियंकालाही काही काही वाव नाहिये.
स्टोरी ठीकठाक आहे खर तर. आणि टेक्निकल इफेक्ट्स, बायोटेक वॉर, मानवर कॉन्सेप्ट हे सगळं फार जास्त चांगलं वापरता आलं असतं. त्यावर जास्त स्ट्रेस द्यायला होता. पण इथे मार खाल्लाय रोशनांच्या अट्टाहासाने. रितिक ची एकूण एक टॅलेन्ट्स दिसलीच पायजेत.. हा तो हट्ट.!. मग त्या रितिक ला विमानं - गाड्या उचलताना फुरसत मिळेल तेव्हा नाचायला वगैरे लावलेय. तसेही तो नाच, ते विचित्र अंगविक्षेप करत नाचणे त्याच्या कॅरेक्टर ला मुळीच शोभले नाहिये. एक से एक तद्दन फालतू गाणी टाकायची काहीएक गरज नव्हती.
लहान मुलांना आवडण्यासारखा आहे पण सिनेमा. माझ्या लेकीने इन्टरेस्ट घेऊन पाहिला.

मला वाटते आहे की आता क्रीश वर जरूर कॉमिक्स निघतील ...
या चित्रपटाने दोनशे कोटी च्या वर गल्ला जमावाला आहे.
म्हणजेच हा सिनेमा सगळ्यांना आवडतो आहे.

स्पायडरमॅन सुपरमॅन पण सारे एकमेकांचेच कॉपी असतात ओ, तोच इकडम तिकडम मालमसाला, तंत्रात थोडेसे ते सरस अन पॉलिशिंग चक्काचक बस्स.

मला "कोई मिल गया" जास्त आवडला होता कारण त्यात इमोशन्स होते, सुपरनॅचरल असूनही रिलेट होऊन भिडायचा. आपण भारतीय पब्लिक आहे, आपल्याला मुजिक आणि इमोशन हवेतच.