आता सुरू नव्याने

Submitted by निशिकांत on 11 November, 2013 - 01:56

ध्येयास गाठल्याचा नुसताच भास झाला
आता सुरू नव्याने माझा प्रवास झाला

खेडे नकोनकोसे, शहरी विकास झाला
अन् पार मारुतीचा आता भकास झाला

नेता गुन्हा करोनी मोकाट मस्त फिरतो
फर्जीच पंचनामा, जुजबी तपास झाला

गरिबार्थ योजनांना, खाती किती गिधाडे !
अन् आम आदमीला, निर्जळ उपास झाला

शब्दात मांडण्याला आहे असे कितीसे?
लिहिण्या कथा, पुरेसा अर्धा समास झाला

आजी घरात नाही, बाळास पाळणाघेर
एकत्र नांदण्याचा केंव्हाच र्‍हास झाला

फुटली जशी गुन्ह्याला वाचा, तिच्या शिलाला
डागाळण्या किती तो ओंगळ प्रयास झाला !

भांडून दूर झाले पत्नी, पती परंतू
त्यांचा गुन्हा नसोनी गुदमर मुलांस झाला

घरचे नकोच जेवण, बर्गर, पिझा हवासा
पाश्चात्त्य संस्कृतीचा वावर झकास झाला

"निशिकांत" पाडसांना लावू नकोस माया
उडता पिले मलाही भरपूर त्रास झाला

निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users

समास पर्यंत खूपच मजा आली सहजता दिसत होती पुढेही मजा आली पण जरा फिकी होत गेली काका यमानुसारीत्व जाणवत राहिले
मुलांस मधला अनुस्वार अलामतीच्या जागेवर नाही चालणार बहुधा

कधी नव्हे तो; मक्ता नाही आवडला आजचा.. फसल्यागत जाणवतो आहे(वै.म. काका )पाडसे उडत नाहीत ती जनावरांची खास करून हरणाची असतात कुठल्या पक्ष्याची नव्हेत तसेच वर "निशिकांत" आल्या वर मला असे खाली आल्यानेही मलातरी कमी मजा आली
असो
मतला समास जास्त आवडले (त्यातही समास अख्ख्या गझलेत सर्वाधिक )आणि मारुतीचा पार तर फारच छान काका ती ओळ फार फार आवडली

सुंदर