हलके व्हा .. !!

Submitted by तुमचा अभिषेक on 30 October, 2013 - 14:17

त्रास झालाय त्रास.. गेले आठवडाभर ऑफिसमध्ये एवढे मरमरून काम करावे लागतेय जेवढे मी महिन्या महिन्याला मिळून नाही करत. जणू काही यंदा सर्व कर्मचार्‍यांचा दिवाळी बोनस मला एकट्यालाच काढायचा आहे. जेव्हा दिवसभरात आंतरजालावर (ईंटरनेटवर) एखादी चक्कर टाकायलाही वेळ मिळत नाही तेव्हा जशी जगाशी संपर्क तुटल्याची प्रकर्षाने जाणीव होते, ती गेले काही दिवस मी अनुभवतोय. पंधरा मिनिटांसाठी टॉयलेटला जाऊन हलके होणे आणि तिथेच गपचूप मोबाईल काढून व्हॉटसअपवरचे मेसेज बघणे हा एवढाच मनोरंजनाचा कार्यक्रम दिवसभरात उरलाय. रोजच मनाविरुद्ध ऑफिसला थांबणे होतेय, मनाविरुद्ध एवढ्यासाठीच कारण बदल्यात ओवरटाईम मिळत असला तरी मला अतिरीक्त पैसा अतिरीक्त कामाच्या मोबदल्यात नेहमीच नकोसा वाटतो. त्यापेक्षा मला माझी आरामाची जिंदगीच जास्त प्रिय आहे आणि या नादात नेमकी तीच गंडली आहे. रोजच मी थकथकून आणि गलितगात्र होऊन घरी परततोय पण जीव जास्तच जळतोय कारण तुलनेने इतरांकडे फारसे काम नाहीये. बब्बाय करत माझ्यासमोर हात हलवत साडेपाचच्या घंटीलाच वंटी होतायेत आणि मी मात्र सलग आठव्या दिवशी ७.१७ ची ट्रेन पकडून घरी जातोय. हे ही काय कमी म्हणून गेल्या शनिवारी साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी सुद्धा ऑफिसला जावे लागले. आईशप्पथ घेऊन सांगतो, हवे तर फोटोही टाकतो, पण ४००-५०० स्टाफ असलेल्या ऑफिसात मी एकटाच भूतासारखा बसलो होतो.. नव्हे वसलो होतो.. नाही नाही.. नाही म्हणायला ऑफिसबॉय होते साफसफाई वगैरे करत.. पण ते देखील आपले काम आटोपून अर्ध्या दिवसानेच वंटास झाले. माझ्यापुढे मात्र एवढे काम पडले होते की पुन्हा ७.१७ च्या ट्रेनलाच थांबायचे होते.. आणि थांबायचेच होते कारण माझा एक फिनलॅंडचा गोरा अंकल तिथून माझ्या मानगुटीवर बसला होता.. स्साला.. (कितीही राग आला तरी शिव्या तश्या मी देत नाही, पण गोर्‍याला कुठे कळतेय..) तर स्साला तो तिथे मस्त घरात सोफ्यावर आडवातिडवा पसरून काम करत होता, आणि मी इथे ऑफिसातल्या खुर्चीत अवघडलो होतो. फोनवर त्याच्याशी बोलताना आजूबाजुला त्याच्या बायकापोरांचा ईंग्लिश कि फिनिशमध्ये रडण्याचा आवाज ऐकू येत होता आणि इथे माझ्या आसपास एअरकंडीशन दुरुस्त करणार्‍या मेंटेनेंन्सवाल्याची खुडखुड चालू होती....

एसी वरून आठवले.... शनिवार म्हणून बायकोने उठायला आळस करत डबा दिला नव्हता म्हणून भूक शमवण्यासाठी दुपारी बाहेर हॉटेलात जावे लागले. काहीतरी पराठा वगैरेच खाऊया म्हणत जवळच नव्यानेच उघडलेल्या पराठा हाऊसमध्ये शिरलो तर तिथे सतराशे साठ पराठे बघून डोके भनभणून उठले. आधीच वेळ कमी, पटकन काहीतरी गिळून निघायचे होते अश्यात कुठे मेनूकार्ड चाळत बसणार म्हणून पहिलेच पान उघडले तर अगदी वरतीच वेज पराठा थाली दिसली ज्यात एका गोलाकार पराठाच्या सोबत दोन भाज्या, रायता, डाळभात, पापड, लोणचे असा काहीसा बेत होता. समोरच जो पहिला बंड्या दिसला त्याला ऑर्डर देऊन मोकळा झालो अन अचानक लक्षात येऊन राहिले की आल्यापासून फारच उकडतेय राव. सुरुवातीला शिरल्याशिरल्या धुंद नशीले वाटणारे मंद प्रकाशयोजनेचे वातावरण विद्युत महामंडळाच्या अवकृपेने तयार झाले होते हे लक्षात यायला अंमळ वेळच लागला... आणि अंमळ जास्तच वेळ माझी वेज थालीची ऑर्डर यायला लागला. एवढा वेळ आतमध्ये काय कसले पराठे शेकत होते देव जाणे, पण मी मात्र इथे ओवनमधल्या बटाट्यासारखा उकडून निघालो होतो. एखादी माशी डोळ्यासमोरून उडून जायची तीच काय ती कोमट हवेची झुळूक..! मगाशी एसीवरून आठवले म्हणालो होतो ना, ते याचसाठी. अचानक शीतप्रदेशातून उष्णकटीबंधात आल्यावर जे व्हायचे होते तेच माझे झाले. सकाळी घाईघाईत उरकलेली अर्धवट आंघोळ आता घामोष्णधारांनी पुर्ण होणार होती. आज घरी गेल्यावर माझ्या शारीरीक अंगमेहनत नसलेल्या आरामाच्या(?) ऑफिसजॉबचे अजिबात कौतुक नसणार्‍या आई आणि बायकोला नक्कीच सांगू शकत होतो की आज मी घाम गाळला.. मेहनत केली.. आज कमावला.. खरा कामाचा पैसा.. घामाचा पैसा...

आता प्रत्येक घास फक्त सोळाच वेळा चाऊन, गिळून, इथून लवकरात लवकर निघायचे आणि मग ऑफिसमध्ये जाऊन सावकाश रवंथ करत पडायचे असे ठरवून थाळी समोर आल्याआल्याच पराठ्याचा लचका तोडून भाजीवर आक्रमण करणार तोच.. दहा वीस तीस चाळीस.. अक्कड बक्कड बंबे बो.. आणि ऐंशी नव्वद पुर्ण शंभर.., दोन्ही भाज्यांमध्ये सुटून झाले पण कोणाचा लावावा पहिला नंबर.., हे काही समजत नव्हते कारण दोन्ही माझ्या खास नावडीच्या.. एक वांगे बटाटा तर दुसरी राजम्याची उस्सळ..!!

मोजक्याच भाज्या खाणारा मी, हॉटेलात नेहमी वेज थाली मागवताना आधी कोणत्या भाज्या बनल्यात याची आठवणीने चौकशी करणारा मी, आज इथेही गंडलो होतो. वांगे बटाट्यापैकी मला खाऊ झेपणारे बटाटे वेगळे केले तर ते एकूण भाजीच्या एकूणतीस टक्के देखील भरले नाहीत. ते प्रमाण देखील साली काढल्यावर घटेल या भितीने त्यासकटच ताव मारायचे ठरवले. राजमाच्या उसळीतना तितकेही काही निघणार नव्हते. दालभाताच्या नावावर जी दाल दिली होती त्यात कोणते कडधान्य वाया घालवले होते हे मला शेवटपर्यंत काही समजले नाही, पण या दाल बरोबर भात काही घश्याखाली उतरणार नाही हे मात्र सुरुवातीलाच समजले. अश्यावेळी मी नेहमीच स्मार्टनेस दाखवून भाजी बदलवून घेतो, अगदीच काही नाही तर मसाला डोश्याबरोबर दिली जाणारी बटाट्याची भाजी तरी मिळतेच मिळते. पण या पराठा हाऊसच्या मेनूकार्डवर साधा सादा डोसाही नव्हता..... पण तरीही हिंमत का किंमत करत विचारलेच तर समोरून उत्तर आले, "शेपू का भाजी है साब, चलेगा क्या?" असे म्हटल्यावर त्याला तुझा गळा चेपू का म्हणून विचारावेसे वाटले... हॉटेल हि काय शेपूची भाजी विकायची जागा असते का लेकांनो???

खाण्यापिण्याचा हा आर्थिक फटका कितीला पडणार होता हे वदनी कवळ घेता म्हणायच्या आधी पुन्हा एकदा मेनूकार्ड बघून चेक केले तर जवळपास माझा तासाभराचा ओवरटाईम होता तो.. ते पाहता त्याला तितक्याच सन्मानाने संपवणे क्रमप्राप्त होते. क्रमाक्रमाने एकेक वाटी बाजूला सरकवत, सरते शेवटी रायताच्या नावावर महागलेल्या कांद्याचा थोडासा किस आंबट दह्यात टाकून, त्यावर सजवण्यापुरता एक तांबाट्याची फोड असलेल्या मिश्रणात, पराठा बुडवून बुडवून अन पुरवून पुरवून खाऊ लागलो.

मेनूकार्डवरच्या चित्रात दिसणारे लोणचे ताटात नव्हतेच याची अगदी शेवटच्या क्षणाला अत्रुप्तीचा ढेकर देताना बडीशेप चघळताना आठवण झाली अन त्याच तिरमिरीत एका वेटरला जाब विचारला तर त्याने टेबलावरच्या कोपर्‍यात ठेवलेल्या बरण्यांकडे हात दाखवला. प्रत्येक टेबलावर सेल्फ सर्विस म्हणून दोन प्रकारच्या दोन लोणच्यांच्या बरण्या ठेवल्या होत्या. ज्यावर नजर जाताच माझा चेहरा पोपटासारखा पडला.. ते म्हणतान ना, टेबलावर बरणी आणि..... सोडा ते, तुम्हीच बनवा ती म्हण.. पण त्यातली एखादी बरणी सरळ खिशात टाकून घेऊन जावी इतका सात्विक असात्विक संताप त्यावेळी मला आला होता... पण यात माझाच खिसा रंगण्याची शक्यता जास्त असल्याने नाही केला तो नाद.

ऑफिसात परत आलो आणि स्टीम बाथ घेतात तसे चिल्लड बाथ घेण्यासाठी म्हणून एसीच्या खाली पाच-दहा मिनिटांसाठी उभा राहिलो. पण आता वातावरणबदलनिर्मिती नेमकी मगासच्या उलटी झाल्याने वेगळाच दुष्परीणाम होऊन सटासटा दोन शिंका आल्या तसा त्यापासून दूर झालो. माझे काम आणि माझी खुर्ची माझी वाट बघत होती. या अर्धपेट जेवणाचा एकच काय तो फायदा झाला आणि तो म्हणजे पस्तावलो पण सुस्तावलो नाही.. दुपारच्या वेळी चार चौदा घास कमी खाल्ले कि काम कसे चटचट होते नाही.

दुपारवरून आठवले, घड्याळावर नजर गेली तर दुपारचे दोन वाजून गेले होते. दिड वाजताची ईंडिया-ऑस्ट्रेलिया मॅच होती. क्रिकेटची हे भारतीय वाचकांना वेगळे सांगायला नकोच. पण श्या, कामाच्या नादात स्कोअर चेक करायचे देखील लक्षात आले नव्हते. आता तर सात-आठ ओवर उलटूनही गेल्या असतील आणि आपल्याला कोणाची फलंदाजी चालू आहे हे देखील माहीत नाहीये याची जाणीव झाली. क्रिकेटमॅचच्या बाबतीत जेव्हा माझ्याशी असे होते तेव्हा दिवसातले टाईम मॅनेजमेंट बेक्कार चुकलेय हे मी समजून चुकतो.. काही का असेना आता पुढचे दिवसभराचे काम साईड बाय साईड स्कोअर बघता बघता उत्साहात होणार होते हे नक्की. पटकन स्पोर्टस चॅनेलची वेबसाईट उघडून चेक केले तर कसला स्कोअर अन कसली मॅच. लोकांच्या उत्साहावर पाणी पडते पण माझ्या उत्साहावर पाऊस पडला होता. तो देखील मुसळाधार. क्रिकेटच्या मैदानावर पाण्याचे साचलेले तळे बघण्यासारखे मरगळलेले द्रुष्य जगात दुसरे नसावे.. आणि आता हिच मरगळ घेऊन उरलेला दिवस कामाचा किल्ला लढवावा लागणार होता.

घड्याळाचे काटे आपल्याच वेगाने सरकत असावेत, कारण ते संथ सरकत आहेत असे वाटावे, वा वेगाने पळत आहेत असे भासावे, या सार्‍या जाणीवांच्या पलीकडे जाऊन मी कामात बुडालो होतो. आज डिस्टर्ब करायला म्हणून माझ्या एकट्यासाठी चहावाला देखील येणार नव्हता. दूरदेशी फिनलॅंडचा सूर्य तर काही एवढ्यात मावळणार नव्हता पण मला इथे भान आले ते आता काम आवरते घेतले नाही तर ७.१७ देखील मिळणार नाही हे लक्षात आल्यावरच. अर्थात तरीही ती नशिबात नव्हतीच. कारण शॉर्टकटचा दरवाजा बाहेरून टाळे मारून केव्हाचा बंद झाला होता. आता पुर्ण मजल्याला वळसा मारूनच ऑफिसच्या बाहेर पडावे लागणार होते आणि धावत पळत जाण्याचा प्रश्नच उदभवत नव्हता कारण जेव्हा मी एसी बरोबर लाईटचे बटण बंद केले तसे सर्व ऑफिसभर अंधाराचे साम्राज्य पसरले. काळ्याकुट्ट अंधाराचा बाकी एक फायदा मात्र असतो, सावल्यांची भिती वाटत नाही.. या मला नव्यानेच गवसलेल्या तत्वज्ञानाला उराशी बाळगून मोबाईलच्या प्रकाशाचा आधार घेत मी दरवाजाच्या दिशेने कूच केले. आजच्या काळ्या दिवसाची अखेर अशी काळोखातच व्हायची होती. आयरनी आयरनी म्हणतात ती हिच काय ! हो तर हो, नाय तर नाय !!

.
.
.

असो,
तर मित्रांनो, सुख सुख म्हणजे आणखी काय असते म्हणणार्‍याच्या आयुष्यात दु:ख नावाची चीजच नसते असा गैरसमज झालेल्यांसाठी हा खास लिखाणप्रपंच, कृपया मनावर घ्या Happy

आयुष्यात त्रासाचे क्षण बरेच येतात. कोणावर तरी राग काढावासा वाटतो. पण यात माणसे दुखावली जातात. तसेच स्वताचा राग स्वतावर काढणेही वाईटच नाही का.. या दोहोंमध्ये कोण्या दुसर्‍याचे नाही तर स्वताचेच नुकसान होते, अन त्यातही आत साचवून ठेवले तर जरा जास्तच.. म्हणूनच ठरवलेय, लिहून बाहेर काढायचे.. आणि हलके व्हायचे..!!

( जमल्यास क्रमश: )

- तुमचा अभिषेक

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तर मित्रांनो, सुख सुख म्हणजे आणखी काय असते म्हणणार्‍याच्या आयुष्यात दु:ख नावाची चीजच नसते असा गैरसमज झालेल्यांसाठी हा खास लिखाणप्रपंच, कृपया मनावर घ्या >>> हे भारी आहे

आणि ऑफीस मधला ताण हलका करण्याची ही रीत आवडली. Happy

अगदी सेम पिंच! जोरदार चिमटा!!!!!!!

दसर्‍याच्या दिवशी पुर्ण ओडीसी सुट्टी वर आणि मी एकटीच ऑफिसात Angry
हेच आता भाऊबिज, पाडवा आणि आले ऑनसाईट लिडच्या मनात तर लक्ष्मीपुजनच्या दिवशीही असणार आहे Angry

अगदी फोन सुद्धा अलाऊड नाही आणि सगळ्याच्या सगळ्या मनोरंजनाच्या साईट्स ब्लॉक्ड Angry
नशिब माबो चालतं (त्यातही मनोरंजनासारखं काही घडेना Angry )

बाप्रे, अजून क्रमशःच? आणखी थोडे लिहीलेस तर खूप्पच हल्का होऊन उडून वगेरे जाशील Proud
वैसे आयडीया बुरा नहिये Happy

बब्बाय करत माझ्यासमोर हात हलवत साडेपाचच्या घंटीलाच वंटी होतायेत आणि मी मात्र सलग आठव्या दिवशी ७.१७ ची ट्रेन पकडून घरी जातोय.
>>
७.१७ ची ट्रेन किती सुखी आहात? आम्हाला अनेकदा १२-१२ तास बोनसविना राबावे लागते. Sad

नशिब माबो चालतं (त्यातही मनोरंजनासारखं काही घडेना)

>> ह्या एकाच बाबतीत काय ते आम्ही तुला मदत करु शकतो Lol

पण ऑन अ सिरियस नोट.. फोन सुद्धा अलाऊड नाही म्हणजे फारच वैतागली असशील ना..
सणासुदीला कित्तीतरी कॉल्स आणि मेसेजेस येत असतात आपल्याला..

प्रतिसादांचे धन्यवाद,
तसेच मी तुलनेत खरेच नशीबवान आहे हे कबूल आणि माहित आहे मला, किंबहुना हे वेळोवेळी घरचेही ऐकवतातच मला.. तरीही त्यातूनही थोडेफार काम माझ्या क्षमतेपेक्षा आणि सवयीपेक्षा जास्त करावे लागले त्याचा त्रास आणि त्रागा कुठेतरी बाहेर काढायचा होता, तो असा अलगदपणे काढला.

आज मात्र वर्कलोड उतरले, आणि पुढचे ४ दिवस दिवाळीचे नो झिग झिग नो चिकचिक.. तुम्हालाही सर्वांना हि दिवाळी आरामाची अन सुखाची जाओ यासाठी शुभेच्छा Happy

चिन्नु __ आता झालोय हलका, त्यामुळे याचे क्रमशः नाही... पण आयुष्यात जेव्हा पुन्ह्यांदा त्रस्त होईल तेव्हा नक्की..

रिया __ तूच माझी मैत्रीण, तुझे माझ्यापेक्षा बुरे हाल बघून मला खरेच हलके वाटू लागलेय Happy

देवाआआआआआआआआआआआआआआ
ऑफिसात बसुन चकली खातेय तर त्याचा कुडुम कुडुम आवाज पण घुमतोय इथे Angry
टाईप करायलाही भिती वाटतेय कारण बटणांचा आवाजही घुमतोय Angry
आजिबात ही असली शांतता आवडत नाही मला...,
नाही म्हणायला मॅनेजर आलाय तेवढा एकटाच मला सोबत द्यायला (पण कशाला आलाय??? तो नसता तर गाणी तरी लावून बसले असते मी Angry )

"आवडत्या बटाट्याच्या भाजीत त्याने वांगी पण घातली होती" हि तुमची दु:खाची आणि त्रासाची व्याख्या काय रे? इतका भुक्कड आणि टुकार दर्जाचा लेख आयुष्यात कधी वाचला नव्हता. ह्यांना प्रवासवर्णन लिहायला सांगितले तर रस्त्यात छोटे मोठे खड्डे किती आणि कुठे कुठे होते व त्यामुळे पार्श्वभाग कसा आपटला आणि त्रास कसा झाला हे सगळे डिटेल हे लिहिणार. ग्रो अप गाईज.