आठवणींशी खेळत असतो

Submitted by निशिकांत on 26 October, 2013 - 02:56

का स्वप्नांची तुझ्याच पाने चाळत असतो?
झोप मोडता आठवणींशी खेळत असतो

तुझ्या घराच्या सभोवती रेंगाळत असतो
सैरभैर नजरेने तुज धुंडाळत असतो

प्राक्तनात जे आहे ते कुरवाळत असतो
दु:खाच्याही बिछायतीवर लोळत असतो

दु:ख दडवतो, नकोस समजू सुकल्या जखमा
शांत वरूनी अंतरात रक्ताळत असतो

शहारणे, भिजंणे, मोहरणे मला न ठावे
तू नसताना ओला श्रावण पोळत असतो

मनी रितेपण, रिताच प्याला हाती उरतो
भान हरवुनी लडखडतो, ठेचाळत असतो

जरी बेगडी, हास्य फुलोरा फुलवायाचा.
आव आणतो, खोल मनी भेगाळत असतो

एकच उरतो ऋतू शेवटी वार्धक्याचा
वसंतातही कणाकणाने वाळत असतो

"निशिकांता"ला व्यसन एवढे दु:खाचे की,
मीठ आपुल्या जखमांवर तो चोळत असतो

निशिकांत देशपांडे.मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मक्ता सुंदर!

गझलही छान झाली आहे. मुसल्सल मूड चांगला साधला आहे. (मतल्यातील दोन काफियांमध्ये अलामत बिघडली आहे, ती मात्र दुरुस्त केलेली बरी).

मतला व मक्ता बद्दल बेफीजींशी सहमत इतर शेरही आवडले
भिजंणे<< ज वर मला टिंब दिसत आहे त्यामुळे वाचताना ४-५ वेळा अडखळलो मग समजले की टायपो असावा Happy