मीर तकी़ मीर - भाग २

Submitted by समीर चव्हाण on 20 October, 2013 - 14:45

मीर तकी़ मीर - भाग १ लिहिल्यानंतर जाणवलं की मीरवर आपण फारच कमी लिहिले. ब-याच दिवसांनी काल मीर पुन्हा वाचायला घेतला आणि लिहिण्याची प्रबळ इच्छा झाली. मीरचा एक हस्तलिखित दीवान अजूनही हैदराबादच्या इदारः-ए-अदबियात-ए-उर्दू मध्ये उपलब्ध आहे. त्यात मीरची दिल्लीपासून दूर गेल्यानंतरची एक मस्नवी (दीर्घ-कविता) आहे. त्यात वा-याला संबोधित करून तो दिल्लीला निरोप देतो (इथे मेघदूत ह्या काव्याची आठवण होते). कवितेचा सार दीवान-ए-मीर, अली सरदार जाफ़रींच्या प्रिफेसमध्ये दिला आहे. तो इथे देत नाही पण सांगावेसे वाटते की काळीज पिळवटून काढतील असे दिल्लीची खबर देणारे मीरचे बरेच शेर आहेत. मीरची मनःस्थिती ह्या अवघड स्थितीत कशी असेल ह्याचा पुढील शेरांवरून अंदाज येतो.

जो हो मीर भी उस गली में, सबा
बहुत पूछियो तू, मेरी ओर से

तिथे कुणीही असो, अगदी मीरही, माझ्याकडून खुशाली पुसशील.

दिल्ली में अब की आकर, उन यारों को न देखा
कुछ वे गये शिताबी, कुछ हम भी देर आये

शिताबी=जल्द

ह्या वेळेस दिल्लाला जाऊनही काही मित्रांना भेटू शकलो नाही. ते थोडे घाईत गेले म्हणा वा थोडा उशीर मी लावला.

खात्री नाही पण अश्याच बकाल परिस्थितीतला हा शेर वाटतो:

अब सबके रोज़गार की सूरत बिगड़ गयी
लाखों में एक-दो का कही कुछ बनाओ है

जे काही होतेय ते आपलेच भोग आहेत. कोणाला काय बोल लावावा, असे काहीसे म्हणणारा हा शेर.

अपने ही दिल का गुनह है, जो जलाता है मुझे
किसको ले मरिए मियां, और किसे तोहमत दीजे

तोहमत=आरोप

ह्या शेरात तो आपली मन:स्थिती सांगतो. किंबहुना शेर इतका चित्रदर्शी आहे की वाचकाला तो स्वतःच्या स्थितीच घेऊन जातो:

तस्वीर के से ताइर, खामोश रहते है हम
जी कुछ उचट गया है, अब नालः-ओ-फु़गां से

नालः-ओ-फु़गां=आर्तनाद

मनाचा आर्तनाद असा काही आहे की आता आम्ही चित्रातले पक्षी; चुपचाप राहतो.

आपल्या दशेकडे पहात तो म्हणतो:

मेरे तग़ईर-ए-हाल पर मत जा
इत्तिफा़का़त है जमाने के

तग़ईर-ए-हाल = दशा परिवर्तन, इत्तिफा़का़त = संयोग

अखेरचे रितेपण अतिशय बारकाईने पकडणारा हा शेर पहालः

रहते है दाग़ अक्सर, नान-ओ-नमक की खा़तिर
जीने का इस समय में, अब क्या मजा़ रहा है

स्वतःला तो असे म्हटला नाही तर नवलः

तेरी आह, किस से ख़बर पाइये
वही बेख़बर है, जो आगाह है

आगाह = परिचित

एक नैराश्यापूर्ण भाववस्थेत तो म्हणतो:

मिजा़जों मे यास आ गई है हमारे
न मरने का ग़म है, न जीने की शादी

यास = निराशा, शादी = खुशी

ह्या सगळ्या घडामोडींतून जाताना प्रेम-संबंधाचा त्याला झालेला समज विचार करायला भाग पाडणारा आहे:

रोज़ आने पे नही निस्बत-ए-इश्की़ मौकूफ़
उम्रभर एक मुलाका़त चली जाती है

मौकूफ़ = निर्भर

प्रेम-संबंध रोजच्या भेटीगाठीपुरते थोडेच मर्यादित आहे.
आयुष्यभर एक भेट होत राहणे आवश्यक आहे.

मुझे मीर ता गोर कांधा दिया था
तमन्ना-ए-दिल ने तो यां तक निबाही

ता गोर = कबरीपर्यंत

मीर म्हणतो, माझ्या इच्छा-अपेक्षा आजन्म इच्छाच राहिल्या. त्यांनी अगदी शेवटापर्यंत साथ दिली.

ह्या भागाचा शेवट मीरच्या सेलिब्रेटेड शेराने करतो (पाइमाल-ए-ग़म = दु:खाने ठोकरलेला).

जो है सो पाइमाल-ए-ग़म है, मीर
चाल बेडौल है ज़माने की

भाग १ http://www.maayboli.com/node/43004

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मीर शतायुषी झाले, पण आयुष्यात दारिर्द्य आणि कष्ट यांनी त्यांची पाठ कधी सोडली नाही. स्वत;च्या दीर्घायुष्याबद्दल ते म्हणतात,
'कैसे है जीते है सदरसाल- हम तो 'मीर' !
इस चार दिन की जीस्त से बेजार हो गये..

अप्रतिम समीर, लेखमाला सुरूच राहूदे.
--------------------------------------------

'मीर' हा जिव्हाळ्याचा विषय असल्याने सर्वांच्या माहितीकरीता न राहवून काही गोष्टी लिहीत आहे,

आज तीनशे वर्षांनंतरही मीरला उर्दू शायरीचा 'मीर' म्हणजे सेनापती का म्हटले जाते हे त्याचे शेर वाचले की लक्षात येते आणि वाचलेल्या प्रत्येक शेरागणिक ही भावना मनात अजून दृढ होत जाते.

ह्या अशा कारणानेच कदाचित महाकवी 'गालिब' म्हणून गेला असावा,

रेखते के तुम्ही उस्ताद नही हो गालिब
कहते है अगले जमाने मे कोई मीर भी था

'नासिख' एक ठिकाणी म्हणतो,

आप बे-बहरा है जो मोतक़दे-‘मीर’ नहीं।

हाच धागा पकडून पुढे 'गालिब' म्हणतो,

ग़ालिब’ अपना को अक़ीदा है ब-क़ौले-नासिख़’।
आप बे-बहरा है जो मोतक़दे-‘मीर’ नहीं।

रेख्ता - उर्दूचे जुने नाव

महान शायर मिर्जा़ मोहम्मद रफी सौदा म्हणतात,

सौदा’ तू इस ज़मीं से ग़ज़ल-दर-ग़ज़ल ही लिख।
होना है तुझको ‘मीर’ से उस्ताद की तरफ़।।

जौ़क म्हणतो,

न हुआ पर न हुआ मीर का अंदाज नसीब
यारो ने बहुत जोर गज़ल मे मारा

एके ठिकाणी फि़राक म्हणतो,

गज़्ल का साज उठाओ बडी उदास है रात
नवा-ए-मीर सुनाओ बडी उदास है रात

नवा - कथन्/शब्द

‘अकबर’ इलाहाबादी म्हणतो,

मैं हूँ क्या चीज़ जो इस तर्ज़ पे जाऊं ‘अकबर’।
‘नासिख़ो’-जौक़ भी जब चल न सके ‘मीर’ के साथ।

मौलाना ‘हसरत’ मोहानी म्हणतात,

शेर मेरे भी हैं पुर-दर्द वलेकिन ‘हसरत’।
‘मीर’ का शैवाए-गुफ़्तार कहां से लाऊं।।

‘दाग़’ चे शागिर्द नाखुदाए-सुकन जनाब ‘नूह’ नारवी ह्यांचा एक मिसरा आहे

बड़ी मुश्किल से तक़लीदे-जनाबे ‘मीर’ होती है।

मात्र एवढे सगळे असले तरी मीर काय म्हणतो पहा,

हमको शायर न कहो 'मीर' कि साहिब हमने
दर्दो गम कितने किये जमा तो दिवान किया

--------
मीरचे आयुष्य जाणून घेताना आपण अंतर्बाह्य हलून जातो हा एक वैयक्तिक अनुभव!

धन्यवाद!

सगळ्यांचे आभार.

मीरचे आयुष्य जाणून घेताना आपण अंतर्बाह्य हलून जातो हा एक वैयक्तिक अनुभव!

सहमत.
तुकारामाबाबतही माझा असाच अनुभव आहे.

तुकारामाबद्दल माझा असाच अनुभव आहे+अनुमोदन

आयुष्याची खडतर वाटचाल चालतानाही मीर यांच्या काव्यात हळूवार भावना तरळून जात असे..जसे की

कह्ते तो हो यूं कहते जो आ जाता
सब कहने की बाते है, कुछ भी न कहा जाता...

किंवा

इक निगाह करके उसने मोल किया
बिक गये आह, हम भी क्या सस्ते...

मिर्झा गालिब यांच्या एका काव्यात 'मीर' यांच्या जीवनाचे सार दिसते,

कैदे-हयातो बंदे गम अस्ल मे दोनो एक है
मौतसे पेह्ले आदमी गमसे निजात पाए क्यू...

लेखमाला अशीच सुरू ठेवावी ...परिचयाबद्दल अनेकानेक आभार !!

रोज़ आने पे नही निस्बत-ए-इश्की़ मौकूफ़
उम्रभर एक मुलाका़त चली जाती है

तेरी आह, किस से ख़बर पाइये
वही बेख़बर है, जो आगाह है
व्वा व्वा !!

रोज़ आने पे नही निस्बत-ए-इश्की़ मौकूफ़
उम्रभर एक मुलाका़त चली जाती है

वा वा वा!!! क्या बात कही है... अशी एक मुलाकात फक्त हवी... आणि असा एक शेर फक्त लिहिता यावा... अनुभवता यावा.

मनापासून धन्यवाद समीर.

धन्यवाद, सुशांत आणि पुलस्ती.

असा एक शेर फक्त लिहिता यावा... अनुभवता यावा.

अगदी खरे आहे.