मोमिन खां मोमिन

Submitted by समीर चव्हाण on 16 October, 2013 - 04:21

एकोणिसाव्या शतकातील उर्दू साहित्यातील महत्त्वाच्या कवींमध्ये गा़लिब, जौ़क, आणि मोमिन ही नावे प्रामुख्याने घेतली जातात. गा़लिबच्या गझलेत बहुधा सगळेच रंग दिसून येतात त्यामुळे साहजिकच वाचकांनी आणि समीक्षकांनी गा़लिबला पुरेपूर अटेन्शन दिले. मागे म्हटल्याप्रमाणे जौ़कचे न्याय मिळण्याइतपत साहित्य उपलब्धच नाही. मोमिनचा स्वतःचा वेगळा रंग निश्चितच आहे त्यामुळे काही प्रमाणात जनमानसात आपले स्थान निश्चित करूनही समीक्षकांकडून तो दुर्लक्षला गेल्याचे दिसते (संदर्भः मोमिन खां मोमिन, ज़हीर अहमद सिद्दीकी, साहित्य अकादमी, १९८४). ह्याचे एक कारण असे दिसते की मोमिनच्या कवितेचे विषय मर्यादित होते (तसव्वुफ विषयीची त्याची अनास्था दुसरे कारण असावे). तसेच मोमिनच्या अनेक रुचीं (उदा: ज्योतिष आणि गणित) पैकी कविता एक रुची. निश्चितच गालिबच्या विचारांतील खोली मोमिनच्या इथे अभावाने जाणवते. मात्र मानवी स्वभावातील गुंतागुंत मोमिन अनेकदा अचूक हेरतो. एक प्रसिध्द गोष्ट आहे. मोमिनने एक शेर ऐकवला:

तुम मिरे पास होते हो गोया
जब कोई दूसरा नही होता

म्हटले तर अर्थ स्पष्ट आहे. विचार केला तर विचार गुंतागुंतीचा आहे.
जेव्हा दुसरे कुणी नसते, मी एकटा असतो, तेव्हा तू असतेस.
इथे फिजिकल प्रेझेन्स अपेक्षित नाही.
पारंपारिक उर्दू शायरीहून अतिशय वेगळी कल्पना आहे.
अशी कथा आहे की गालिबने शेर ऐकल्यावर म्हटले: माझी तमाम शायरी ह्या एका शेराच्या बदल्यात मी द्यायला तयार आहे. ह्यावरून एवढे लक्षात येते की गालिब सारख्या महाकवीनेही मोमिनची महानता मान्य केली.

ह्या लेखाचा उदेश्य मोमिन आणि त्याच्या काही कवितांचा परिचय आहे.
मोमिनचा जन्म १८०० मध्ये चेलान येथे झाला. मृत्यू बाबत साशंकता आहे मात्र १८५१ च्या सुमारास एका दुर्दैवी अपघातानंतर झाला असावा, असे त्याच्या स्वतःच्या एका कवितेवरून दिसून येते. गा़लिब आणि मोमिन ची घनिष्ट मैत्री काही पत्रांवरून स्पष्ट होते. असो, आता मोमिनला त्याच्या कवितेतून समजून घेऊया.

वर म्हटल्याप्रमाणे मोमिनमध्ये गालिब इतके विषयांचे वैविध्य नाही आहे. मात्र त्यातही (उदा. इश्किया शायरी) तो कमाल करतो:

माशूक़ से भी हमने निभाई बराबरी
वां लुत्फ़ कम हुआ तो यहां प्यार कम हुआ

लुत्फं= मजा, आनंद

त्याच्या विचारांतील गुंतागुंत पाहण्यासारखी आहे.
तो शत्रू (प्रेयसी) ला म्हणतो की तुझ्याविना जीवन कठीण आहे.
मी स्वेच्छेने मरणाची उपेक्षा करतोय (ह्या म्हणण्यात एक अप्रगट स्वार्थ दडलाय):

है आरजू़ से मर्ग की बेइल्तिफा़तियां
जीना मेरा मुहाल तू दुश्मन अगर न हो

मर्ग=मृत्यू
बेइल्तिफा़तियां=उदासीनता

असाच एक शेरः

गै़र अयादत से बुरा मानते
कत्ल किया आपने अच्छा किया

भलाईही परक्यांना भावत नाही.
सबंध संपवलेस, तू केलेस ते चांगलेच केले.

मोमिनच्या शायरीचा एक महत्त्वपूर्ण घटक सांगताना मौलाना जि़या अहमद बदायूनी सांगतातः
``शायर प्रकट रूप में ऐसी बात कहता है जिससे पता चलता है इससे प्रिय का हित है लेकिन परिणाम स्वयं प्रेमी पक्ष में जाता है"

एक उदाहरण पाहूया म्हणजे वरील मुद्दा कळू शकेल:

गर जिक्रे वफा़ से यही गुस्सा है तो अब से
गो क़त्ल का वादा हो तकाजा़ न करेंगे

परत दिसलास तर जीव घेईन असे तू म्हटलीस (दिलेले वचन). मी तुला तुझ्या वचनाची आठवण करून दिली तर तू नाराज होशील म्हणून मी आठवण करून देत नाही आहे. स्वतःला वाचविण्याचा आणि भेटण्याचा एक बहाणा नाहीतर अजून काय.

साधेपणा आणि भावनिक तीव्रता एकत्र पहालः

मैं भी कुछ खुश नही वफा करके
तुमने अच्छा किया निबाह न की

विरहातील व्यथा मांडणारा हा शेर:

मै कहां और कहां खु़द आराई
बेखुदी हो गई तमाशाई

मोमिन स्वतः तत्वज्ञानाला रिता घडा म्हणत असला तरी त्याच्या काही कवितेतून तत्वज्ञान वेगळे करणे अशक्य आहे. हा एक जबरदस्त शेर पहालः

किस काम के रहे जो किसी से रहा न काम
सर है मगर गुरूर का सामां नही रहा

मोमिनची एका प्रसिध्द गझलेतील दोन शेर पाहूया:

किसी का हुआ आज कल था किसी का
न है तू किसी का न होगा किसी का

किया उसने कत्ले जहां इक नज़र में
किसी ने न देखा तमाशा किसी का

दुस-या शेरातील लौकिक अर्थ सामान्य असूनही
सादरीकरणातून मोमिनने त्याला कमालीची उंची दिली आहे.

एक अतिशय अवघड शेर; शब्दार्थाने आणि विचारानेही:

फिरने से शामे वादा थके ये कि सो रहे
आराम शिक्वा-ए-सितम-ए-इज़्तिराब था

पहिली ओळ स्पष्ट आहे. दुसरीत ओ म्हणतो की जो आराम घेतला तो जणू काही माझ्यावर झालेल्या अत्याचाराच्या अस्वस्थतेची तक्रार होती.

हे दोन शेर पहावे (गालिबच्या कोई उम्मीदबर ची आठवण व्हावी):

तुम हमारे किसी तरह न हुए
वरना दुनिया में क्या नही होता

उसने क्या जाने क्या किया लेकर
दिल किसी काम का नही होता

अजून एक साधा आणि सुंदर शेरः

देखो, मत देखियो कि आईना
गश तुम्हे देखकर न हो जाये

मोमिनच्या जनमानसांत पोहोचलेल्या गझलांमध्ये ठानी थी दिल में अब न मिलेंगे किसी से हम आणि वो जो हममें तुममें क़रार था ह्या दोन गझल अविस्मरणीय आहेत.
शेवट त्याच्याच शब्दात करूया (मुब्तिला=आसक्त):

जिसे आप गिनते थे आशना, जिसे आप कहते थे बावफा़
मैं वही हूं मोमिन-ए-मुब्तिला, तुम्हे याद हो कि न याद हो

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मोमीन आधी माझ्या आवडत्या शायरांपैकी एक होता. काही कालावधीनंतर मला त्याचा एक गझलसंग्रह मिळाला. (आठवते - सांगलीची सहल, कैलास गायकवाड व निशिकांत देशपांडेंबरोबरची). हा संग्रह वाचून मात्र हळूहळू निराशा होत गेली. समीर, तू म्हणतोस त्याप्रमाणेच मोमीनची भरारी मर्यादीतच वाटली. तरीही, काही शेरांमधील साधेपणा आणि भावनिक तीव्रता अचाटच! मुख्य म्हणजे बुद्धिबळपटू, ज्योतिषी, अतीश्रीमंत आणि पुन्हा गालिब वगैरेंच्या मांडीला मांडी लावून दरबारातील मुशायर्‍यात बसणारा शायर इतकी बिरुदे मिरवणारा माणूस महानच असला पाहिजे. पण तो नुसताच गालिब वगैरेंच्या छायेत 'राहुल द्रविड' झाला नाही तर खरोखरच तो त्यांच्याइतका जबरदस्त शायर होता असेही (हल्ली हल्ली) वाटत नाही. अर्थात, ही त्याची तुलना फक्त गालिबवगैरेंशी केल्यानंतरचेच मत आहे. स्वतंत्ररीत्या मोमिन महान होता हे कोणीही मान्यच करेल.

लेख आवडला.

तुम्हे याद हो के न याद हो या मोमीनच्या गझलेच्या शीर्षकाची एक प्रेमकहाणी मी एका कादंबरीत रंगवली होती ती आठवली. समीर, तुला ही कथा आवडेल असे वाटत आहे. (अर्थात फुरसत असेल तेव्हाच वाच, कारण तिचे काही भाग आहेत).

मोमिन दिसायलाही अतिशय रुबाबदार होता असे वाचल्याचे आठवते. एकुणच, सहज म्हणून शायरी करणाराही अफाट शायरी रचू शकतो याचे ते एकमेव उदाहरण असावे.

सुखनवर बहुत अच्छे या मालिकेत मी मोमीनवर लिहिणार होतो, पण माझ्यापेक्षा तू अधिक महत्वाचे लिहीत असल्याचे प्रामाणिकपणे जाणवल्याने मी तुझेच लेखन वाचेन असे ठरवत आहे.

धन्यवाद या लेखाबद्दल!

-'बेफिकीर'!

गै़र अयादत से बुरा मानते
कत्ल किया आपने अच्छा किया

भलाईही परक्यांना भावत नाही.
सबंध संपवलेस, तू केलेस ते चांगलेच केले.

वाह वा वा !

तुम हमारे किसी तरह न हुए
वरना दुनिया में क्या नही होता

उसने क्या जाने क्या किया लेकर
दिल किसी काम का नही होता

आहाहा मस्त मस्त !

माझ्याजवळ "मोमिन की शायरी" सूरज पाकेट बुक्स मेरठ चे एक पुस्तक आहे.मनाची पाटी कोरी करुन पुस्तक वाचले तर फारचह मजा येते....मात्र मी हे पुस्तक "कुल्लियाते मीर"नन्तर वाचायला घेतल्याने फार दाद द्यावी असे वाटले नाही.

समीर यांनी कोट केलेले शेर वाचल्यानंतर मात्र नव्या ने मोमिन वाचणार आहे.

धन्यवाद समीर.

मस्त परीचय.

तुम मिरे पास होते हो गोया
जब कोई दूसरा नही होता

मैं भी कुछ खुश नही वफा करके
तुमने अच्छा किया निबाह न की

तुम हमारे किसी तरह न हुए
वरना दुनिया में क्या नही होता

उसने क्या जाने क्या किया लेकर
दिल किसी काम का नही होता

अप्रतिम शेर.

बर्‍याच दिवसांपूर्वी घेऊन वाचायचे राहिलेले 'मोमीन की शायरी' हे पुस्तक वाचायला काढेन आता.

बेफिकीरांच्या 'तुम्हे याद हो के न याद हो' मधले जुनैद खान हे पात्र कादंबरीच्या पूर्वार्धात फार आवडले होते असे आठवते.

धन्यवाद समीर!

>>
मैं भी कुछ खुश नही वफा करके
तुमने अच्छा किया निबाह न की
<<
मस्त.
या लेखमालेबद्दल धन्यवाद द्यावे तितके कमी आहेत, समीर. Happy

मनापासून धन्यवाद.
बहुतेक कवी आणि त्यांच्या कविता निवडून निवडून वाचाव्या लागतात.
अनेकदा चांगले चयन हातात न आल्याने भूषण म्हणतो त्याप्रमाणे निराशा होते.
अनेक लोकल प्रकाशक फायद्यासाठी पुस्तके काढतात. ज्या संकलनामागे विचार नसतो, ना धड अर्थ दिलेला असतो.
मला वाटतं ज़हीर अहमद सिद्दीकी ह्यांचे साहित्य अकादमीने प्रकाशित केलेले संकलन उत्कृष्ट आहे.
मिळाले तर जरूर वाचावे.

भूषण लि़कसाठी धन्यवाद, नक्की वाचतो.

एक 'गझल' नावाचं पुस्तक वाचलं होतं. नाव विसरलो, बहुदा सुधाकर नाडकर्णी की काहीतरी आहे. त्यात वेगवेगळ्या गझलकारांचा खुप चांगला परिचय करुन दिला होता. त्या पुस्तकातुन गझलेची गोडी लागली होती, पण पुढे काही ती टिकवल्या गेली नाही. Sad

त्याप्रमाणेच मोमीनची भरारी मर्यादीतच वाटली

भूषण, असहमत आहे. मी म्हटले की मोमिनकडे विचारांचे वैविध्य नाही. मात्र जे काही आहे त्यात अनेकदा तो कमाल करतो. मीर आणि गालिब हे महाकवी होते. मोमिन आणि जौ़क इतके महान नसले तरी अतिशय महत्त्वाचे शायर आहेत.

तरी अतिशय महत्त्वाचे शायर आहेत.<<<

सहमत आहे.

भरारी व विचारांचे वैविध्य यासंदर्भात माझे मत काही काळाने देतो, या दोन्हींमध्ये फरक नक्कीच आहे, पण असेही वाटते की विचारांचे वैविध्य नसणे हा मर्यादीत भरारीचाच एक प्रकार म्हणूनही गणता येईल.

(म्हणजे - वैविध्यपूर्ण विचार हेही वैचारीक भरारीतूनच येतात / येऊ शकतात असे म्हणायचे आहे).

विचारांचे वैविध्य नसूनही अधिक खोलीत जाऊन लिहिण्याची शक्यता आहे.
विचारांचे वैविध्य असूनही मर्यादित शायरी लिहिणारे ढिगाने आहेत.
एक उदाहरण द्यायचे म्हटल्यास अहमद फ़राज़, ज्याच्या शायरीत उंचीचे शेर वा मानवी स्वभावातील गुंतागुंत क्वचितच सापडते.

मी सुध्दा 'गझल' या पुस्तकातच मोमिन यांच्याविषयी वाचलं होतं ...या परिचयातून मात्र अधिक माहिती मिळाली .
फक्त यांच्या शेरात मला भाषा थोडी अवघड वाटते .जौकप्रमाणे तितकीशी सुलभता नाही .तरीही अनेक शेर आवडले. आमच्यासारख्या नवोदितांसाठी असेच माहितीपूर्ण लेख लिहित राहावेत ही विनंती .

जौकप्रमाणे तितकीशी सुलभता नाही

काही प्रमाणात मी सहमत आहे.
मात्र असे ग्लोबल स्टेटमेंट करणे योग्य ठरू नये (विशेषकरून पूर्ण जौ़क आणि मोमिन न वाचता).
असे कदाचित म्हणता येईल की मोमिनचेही वरकरणी सुलभ शेरही गुंतागुंतीचे आहेत. उदा.

रहम कर खस्मेजान गै़र न हो
सबका दिल एक-सा नही होता

खस्मेजान=रकी़ब अथवा शत्रू

धन्यवाद.