सॉरीचा वैताग

Submitted by मयुरा on 18 October, 2013 - 03:35

सध्या सॉरी या शब्दाने नुसता वैताग आणलाय. कोणीही उठावं... काहीही करावं.... त्यावर सॉरी म्हणून मोकळं व्हावं...या शब्दाच्या वापराने वाट्टेल तसं बोलायची परवानगी दिली आहे का? सॉरी म्हणण्याने बेफिकिरी वाढत चाललीय का? कसंही वागायची आणि नंतर फक्त माफी मागायची संधी उपलब्ध करुन दिली आहे का? केवळ माफी मागण्याने जबाबदारी संपते का हो?

सध्या सॉरी या शब्दाने वैताग आणलाय नुसता. या शब्दाचा गैरवापर इतका वाढलाय, तो शब्द वापरून पार गुळगुळित झालाय की त्याच्यामागची भावनाच नाहिशी झालीय, तो शब्द पार बथ्थड झालाय असं नाही वाटत तुम्हाला? दिवसातून शंभर वेळा सॉरी म्हणण्याने अनेकांचे पहिले पाढे पंचावन्नच रहातात हे लक्षात येतंय का आपल्या?
पोरगं जेव्हा पहिल्यांदा सॉरी म्हणायला शिकलं तेव्हा कोण आनंद झाला होता. आपलं पोरगं मॅनर्स शिकायला लागलं याचं समाधान वाटलं होतं. चार माणसात त्याने हा शब्द पहिल्यांदा वापरला तेव्हा उगाचच मान ताठ झाली होती. वाटलं किती वळण लावलं त्याला.
पण आता मात्र त्यानंच काय कोणीही कधीच सॉरी नाही म्हटलं तरी चालेल असं ठामपणे वाटायला लागलंय.
होतं काय की माणसं अनेक चुका करतात, एकच चुक पुन:पुन्हा करतात आणि टोकलं की सरळ सॉरी म्हणून मोकळे होतात. पण बदलायचे, चुक सुधारायचे नाव काढत नाहीत. सॉरी म्हटलं की जबाबदारी संपली असंच सगळ्यांना वाटायला लागलंय का?
कोणाचं नाव कशाला घ्यायला हवं?आपल्या प्रत्येकाचं असंच होतंय का? माणूस माफी मागून कर्तव्यभावनेतून मोकळा होऊ पहातोय का?
सॉरीच्या सतत वापराने चूक सुधारायची असते ही भावनाच संपवून टाकली. सॉरी म्हटलं की जबाबदारी संपते. माफी मागून सगळं संपवून टाकलं जातं. एखाद्याने टोकलं तर, ‘सॉरी म्हटलंय ना...’ असं वाक्य तोंडावर फेकून आवाज बंद केला जातो.
घरातील एखादा साधा प्रसंग. आईने मुलाला सांगितलं होतं, आज मला लवकर ऑफीसला जायचंय. तू पाणी भरुन ठेव. संध्याकाळी आई घरी गेली तर सगळी भांडी रिकामी. त्याला विचारलं तेव्हा गोड हसला. सॉरी म्हणाला आणि खेळायला निघून गेला. पाणी न भरल्यामुळे आता अडचण होणार आहे हे त्याच्या गावीही नव्हतं. सॉरी म्हणून पाणी मिळणार नव्हतं हे लक्षात सुद्धा आलं नव्हतं. किती सहज सॉरी म्हणून त्याने पाणी भरण्याची जबाबदारी टाळली होती.
एक दिवस थोडीशी घरकामात मदत मागितली तर खांदे उडवले. वेळ नाही म्हणाला. त्याबद्दल आठवणीने सॉरी म्हणून त्याच्या कामात दंग झाला.
काही माणसं कुटुंबातील प्रत्येक सदस्याशी असं वागतात की त्यांना आयुष्यभर फक्त याच शब्दाचा जप करावा लागेल. अशा प्रसंगांची कितीतरी मोठी यादी देता येईल
वानगीदाखल सामाजिक जीवनातला एखादा प्रसंग पहायला काय हरकत आहे?
पूर्वी चुकून कोणाला पाय लागला तर समोरचा माणूस पटकन वाकायचा आणि त्यांना नमस्कार करायचा. हा संस्कार म्हणा नाहीतर मोठ्यांचा आदर म्हणा. पुर्वीची माणसं अजुनही असंच वागतात. आता काय होतं? चालता चालता आपला पाय कोणाला लागला तरी माणूस जरासंही न वाकता सॉरी म्हणून मोकळा होतो आणि सरळ पुढे निघून जातो. आपला पाय लागला ही आपली चुक आहे. तो पुन्हा कोणाला लागता कामा नये हे लक्षातच येत नाही.
जरा आपल्या आजूबाजूला आणखी थोडंसं डोकावून पाहू. काहीतरी कारणावरुन माणसं भांडतात. एकमेकांची कॉलर धरतात. तेवढ्यात कोणीतरी मध्यस्थी करतो. भांडणार्‍यांना तेवढं पुरतं. ते एकमेकांना शेकहॅण्ड करतात. एकमेकांची माफी मागतात आणि घरचा रस्ता पकडतात. काही वेळाने आपण एकमेकांची माफी मागितली आहे हे विसरुन पुन्हा भांडायला मोकळे होतात.
राजकारणात तरी वेगळं काय घडतंय? राजकीय नेते लोकांच्या खासगी आयुष्यापर्यंत पोहोचतात. त्यावर तद्दन फालतु जोक मारतात. वादळ उठलं की सरळ माफी मागून मोकळे होतात. मगु्ररी मात्र तशीच रहाते. माफीचे मोठेपण मिरवले जाते. संस्कारहिनता बदलत नाही. ताठा अजिबात जात नाही. या प्रसंगाने ते बदलले असं होतं नाही. कारण त्यांनी सॉरी म्हटलेलं असतं ना. तेवढंच पुरेसं आहे असं त्यांनी गृहित धरलेलं असतं.
माफी मागण्याने सगळं संपतं का हो? तीव्र बोलण्याने, गृहित धरण्याने, वागण्याने मनावर जे ओरखडे उठतात ते केवळ माफी मागून भरुन निघतात? इतके का ते वरवरचे असतात? माणसाचा स्वभाव बेशिस्त होत जातो हे नुकसान केवळ माफी मागण्याने भरुन येऊ शकतं?
खरं तर सॉरी..मला माफ करा हा किती सुंदर शब्द. आपलं काहीतरी चुकल्याची जाणीव करुन देणारा. ती चुक सुधारण्याची नवी संधी प्राप्त करुन देणारा. पण आपण अतीवापराने तो इतका गुळगुळीत करुन टाकलाय की माफी मागण्यामागची भावनाच संपवून टाकली. त्यात विलक्षण कोरडेपणा आणला. स्वत:ला, इतरांना पुन:पुन्हा चुकण्याची, त्याच त्याच चुका पुन्हा करण्याची संधी उपलब्ध करुन दिली. जबाबदारीची भावना मारुन टाकली. सॉरी या शब्दाने चुका सुधारण्याऐवजी पळपुटेपणाच वाढला.
पटतंय ना तुम्हाला? तुमच्याही बाबतीत असं घडतं ना अनेकदा? त्यामुळेच आजकाल कोणी सॉरी म्हणालं की, त्याला थांबवून विचारावंसं वाटतं, बाबा रे, तुझ्या चुकीबद्दल तु माफी मागितली हे बरंच झालं. माफी मागायला मनाचा मोठेपणा लागतो. पण ती चुक सुधारण्यासाठी तु काय प्रयत्न करणार आहेस? पुन्हा असे होऊ नये म्हणून कोणती काळजी घेणार आहेस? असं काही करणार असलास तर त्या सॉरी म्हणण्याला अर्थ प्राप्त होईल अन्यथा माफी नाही मागितलीस तरी चालेल....
तुम्हाला काय वाटतं?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सॉरी

<सॉरीच्या सतत वापराने चूक सुधारायची असते ही भावनाच संपवून टाकली. सॉरी म्हटलं की जबाबदारी संपते. माफी मागून सगळं संपवून टाकलं जातं. एखाद्याने टोकलं तर, ‘सॉरी म्हटलंय ना...’ असं वाक्य तोंडावर फेकून आवाज बंद केला जातो.> एकदम पटले.

छान लेख.
पु.ले.शु

चुक झालि कि सॉरी म्हणायचे हे आम्ही मुलाला लहान असताना शीकवले.
आता सॉरी म्हणाला की आमचा पुढचा प्रश्न, सॉरी कशासाठि मागतो आहेस ?

किती कळकळीनी लिहिलंयस गं! खुप दुखावली गेलीयेस या सॉरी मुळे. सगळं मनोमन पटण्यासारखं आहे. वाचल्यावर जिंदगी ना मिलेगी दोबाराचा हृतिक आणि फरहानचा सीन आठवला...

लेखातील भावनेशी सहमत.
बरेच शब्द विचार न करता अतोनात वापरले जातात - त्यातलाच हा एक शब्द.
पण अजिबात 'सॉरी'ही न म्हणणारे पाहिले की वाटतं - यांना निदान शाब्दिक पातळीवर स्वतःची चूक स्वीकारायला का नाही जमत?
म्हणजे सॉरी म्हटलंच नाही - तर तेही त्रासदायक.
समोरच्या माणसाने करावं तरी नेमकं काय - हाही प्रश्न आहे!!

" जस्ट किडिंग " हा शब्द ही या " सॉरी " सारखाच प्रचंड डोक्यात जाऊ लागलाय. लोकं मुद्दामहूनच बोलतात आणि अगदी मोठ्याने हसत ( खरे तर दात काढत ) म्हणून मोकळे होतात.

तुमच्या मताशी सहमत! खरेच त्रास होतो या खोटेपणाचा.

प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद.
यामुळे लिहिण्याची, विचार व्यक्त करण्याची उमेद वाढते हे अगदी नक्की.

हं..........खरंय! काही वेळा हा "सॉरी" असा तोंडावर फेकला जातो की .........."म्हटलंय ना सॉरी एकदा? आता काय? आता गप्प बसा" अश्या टाइपचा अर्थ त्या सॉरीतून निघू शकतो.