शुद्ध देसी रोमांस : चित्रपटपरीक्षण

Submitted by अमेय२८०८०७ on 7 September, 2013 - 15:05

shuddh-desi-romance_660_062013054808.jpg (नेटवरून साभार)

लिव्ह-ईन रिलेशनशिप्स, प्रेमाचे त्रिकोण, वि.पू.सं. आणि वि.बा.सं. या गोष्टी यशराज बॅनरसाठी नव्या नाहीत. 'दाग', 'सिलसिला', 'चांदनी', 'सलाम नमस्ते' ते अगदी अलीकडच्या 'बँड बाजा बारात' पर्यंत या विषयांना यश चोप्रांनी दिग्दर्शक म्हणून आणि नंतर निर्माता म्हणून समर्थपणे सादर केले आहे. 'शुद्ध देसी रोमांस' हा चित्रपटही अशाच एका प्रेमाच्या त्रिकोणाची हल्लीच्या जाणिवांचा तडका मारलेली 'हटके' कहाणी आहे.
बॉलिवूडच्या कथा जसजशा महानगरे सोडून भारताच्या इतर छोट्या-मोठ्या शहरांकडे वळत आहेत तसतसे त्यांच्या नायक-नायिकांची भाषा, देहबोली आणि एकूणच सादरीकरण यातही लक्षणीय बदल होत आहेत. शुदेरोची कथाही बहुतांश जयपूरमध्ये घडते. अशा ठिकाणी वावरणार्‍या, टिकून राहतानाच एकेक पायरीसाठी झगडणार्‍या तरुणाईत एक अंगभूत स्ट्रीट-स्मार्टनेस आणि आक्रमकता दिसून येते. सुशांत राजपूत (रघु), परिणीती चोप्रा (गायत्री) आणि वाणी कपूर - उत्कृष्ट हिंदी पदार्पण (तारा) - या तीनही मुख्य अभिनेत्यांनी हा देसी बाज मस्त वठवला आहे. कथेप्रमाणे आणि अभिनयातही दोघी नायिका दमदार आहेत, केवळ शोभेच्या बाहुल्या अजिबात नाहीत. या दोघींसमोर सुशांतचा रघु झाकोळू न देणे हे लेखक-दिग्दर्शकासाठी आणि अर्थातच सुशांतसाठी मोठे आव्हान होते, जे त्याने छान पेलले आहे. या तिघांचीही आपसातील केमिस्ट्री एकदम नैसर्गिक वाटते. निभावत असलेल्या व्यक्तिरेखांमध्ये तिघेही शोभून दिसतात. एखाद दुसर्‍या वेळी प्रेमभंग, अपेक्षाभंग झालाच तरी आयुष्य संपत नाही, नवीन नात्याला संधी मिळू शकते आणि नव्याने प्रेमही होऊ शकते असे मानणारी ही पिढी. कुठलाही अनुभव घ्यायला यांची ना नाही आणि 'सावध तो सुखी', 'स्लो अँड स्टेडी' सारखे वाक्प्रचार ऐकूनही माहीत नाहीत अशा ह्या तरूणांचा प्रेम, नातेसंबंध याबाबत काय विचार आहे (की नाही?) याचा आलेख बहुतांशी विनोदी ढंगाने मांडायचा प्रयत्न हा चित्रपट करतो. लग्नसंस्थेबाबत आणि त्यासोबत येणार्‍या कमिटमेंटच्या दडपणामुळे काय काय उलाढाली होऊ शकतात आणि त्या प्रसंगांना मुख्य कलाकार आपल्यापरीने कसे सामोरे जातात हे बघणे मनोरंजक आहे.
मनीष शर्माचे दिग्दर्शन, जयदीप साहनीचे बोलीभाषेतील चमकदार संवाद (डाऊट कभी घडी देखकर थोडी ना आते है), गतिमान कथानक, छायाचित्रण (जयपूर आणि आजूबाजूचा प्रदेश कॅमेर्‍यातून दाखवणार्‍या मनु आनंदचा मला वाटते हा पहिलाच चित्रपट) आणि मुख्य कलाकारांचा अभिनय यासोबत चित्रपटाचा ह्यूज प्लस-पॉईंट म्हणजे ऋषी कपूरने साकारलेला गोयल. लग्नाच्या केटरिंगचे आणि भाडोत्री 'बाराती' पोचवण्याचे कंत्राट घेणारा गोयल ऋषीने अशा काही बोल्ड स्ट्रोक्समध्ये साकारलाय की त्याच्या वाक्यावाक्याला टाळ्या आणि हसू मिळणार हे निश्चित आहे. परतीच्या पावसासारखा उधाणास आलेला, हा उतारवयातील कॅरॅक्टर भूमिका करणारा ऋषी दिवसेंदिवस प्रचंड आवडू लागला आहे.
अर्थात पटकथेत मर्यादा नाहीत असे नाही. मांडलेल्या प्रश्नांची उकल करण्याची, त्यांच्यावर सविस्तर विचार करण्याची वेळ येते तेव्हा कथानक जरा गडबडते. त्रिकोणाचे प्रमेय सोडवताना लावलेले लॉजिकही जरासे कमकुवत आहे पण असे असूनही परिणीतीचा भावपूर्ण चेहरा, वाणी कपूरचे क्षणात चेहरा उजळवणारे तर क्षणात विषादातून आलेले हास्य आणि सुशांतचा शुद्ध देसीपणा या त्रुटींना सांभाळून घेतो. वाणी कपूरचा अभिनय खास उल्लेखनीय कारण पदार्पणातच तिच्या वाट्याला जराशी स्लिपरी व्यक्तिरेखा आली आहे. तिने इतका चांगला अभिनय केला नसता तर ताराशी रिलेट होणे कदाचित अवघड झाले असते.
आयुष्यातील नातेसंबंध, व्यवहार, प्रेम या तशा गुंतागुंतीच्या गोष्टी. चित्रपटातून त्यांना गंभीरपणे साकारून दाखवायचे तर मग दाग, सिलसिला, मासूम निर्माण होतात. पण तसला पीळ झेपणारासा नसेल तर मग उडत्या ढंगाने प्रश्न मांडून दाखवत भरपूर करमणूक करणार्‍या 'शुदेरो' चा पर्यायही वाईट नाही.
माझा तर पैसा वसूल Happy

ता.क. - टायटल सीक्वेन्स चुकवू नका, फर्मास जमलाय. त्यातली एक दोन सेकंदांसाठी चमकून जाणारी, ठुमके मारुन नाचणारी कठपुतळी एकदम बेष्ट.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला आवडला. वाणी कपूर बेष्टच. फारच सुंदर दिसली आहे. आणि खोडकर / व्रात्य मुलीच्या भूमिकेत परिणिती क्लास. सुशांतने बावळट, चान्स मारणारा, नॉन कमिटेड मुलगा छान उभा केला आहे.

तेरे मेरे बीच में क्या है. गाणे फार गोड आहे. परिणीती क्यूट आहे. प्लास्टिक प्रियांका पेक्षा ती मला आव ड्ते.
चोप्रा बहिणींची स्पर्धा असे इथे मार्केटिंग होत आहे.

अमेयदा....

चित्रपट परीक्षण ! वाह !! व्हॉट अ सर्प्राईज !!

मस्त लिहिलंय..

हाच पाहायला हवा होता.... झक मारलीन तो 'जंजीर' बघितला..!

मस्त गाणी, दोन दोन गोड हिरविणी, सर्वच कलाकारांचा छान अभिनय असूनही पटकथेत मार खाल्ला असे माझे मत. प्रेक्षकांना बांधून ठेवण्यात कमी पडतो सिनेमा. 'अरे, ये ऐसा क्युं कर रहा है? पागल है क्या?' असे उद्गार ऐकू येत होते थिएटरमध्ये. नायकाचे/ नायिकेचे वागणे अगदी चूकीचे नसले तरीही कन्विन्सिंगली प्रेक्षकाच्या गळी उतरवण्यात दिग्दर्शक कमी पडला आहे.
अगदी सिनेमा हॉलमध्ये जाऊन बघायलाच हवा असा सिनेमा नाहीये. कदाचित, गाणी आणि प्रोमोज् बघून जास्त अपेक्षा ठेवून गेल्याने असेल पण आमचा तरी अपेक्षाभंग झाला.

विशेष टीप - लहान मुलांबरोबर बघता येऊ नये अश्या सिनेमांच्या यादीत अजून एक भर पडली आहे.

प्रोमोज, गाणी बघितली नाहीयेत पण तरी चित्रपट बघावा असा विचार होता. पण प्राचीच्या विशेष टीपेनंतर आता डळमळीत झालाय आमचा प्लान. Happy

अरे वा अमेय ,छान केलंयस परिक्षण !!

,'मस्त गाणी, दोन दोन गोड हिरविणी, सर्वच कलाकारांचा छान अभिनय असूनही पटकथेत मार खाल्ला असे माझे मत. :प्रची +१०० ,कालच पाहिला....

वेस्ट ऑफ गुड अ‍ॅक्टर्स वाटला... परि तर मेरी ऑल टैम फेव झालीये...

मी तर सुशांत राजपुत साठी बघितला....इंटर्वल नंतर जरा बोर वाटला....पण सुश आणि परी ची अ‍ॅक्टिंग द बेस्ट........ आय जस्ट लव्ह सुशांत........ Happy

परीक्षण बघून बघायचा ठरवलाच होता त्याप्रमाणे आज बघितला. सुशांत राजपूत भयंकर डोक्यात जातो. त्याच्या अ‍ॅक्टिंगमध्ये मला अजिबात कॉन्फिडन्स दिसत नाही तसाच ह्या पिक्चरमध्ये वाटला. परिणीती चोप्रा आवडतेच. वाणी कपूरही आवडली. ऋषी कपूरचं कामही छान. सुरूवात बरी झाली पण नंतर मेजर ड्रॅग होत होत बोअर झाला. त्या दोघी एकमेकांसमोर येतात त्यानंतर बघायची इच्छा राहिली नाही. माझ्याकडून दोनच स्टार्स.

मला पाहायची इच्छा होती पण मित्रांनी बघितलाआधी आणि टिवीवर फुकट लागला तरी बघु नकोस हा सल्ला दिला......:(

मला पाहायची इच्छा होती पण मित्रांनी बघितलाआधी आणि टिवीवर फुकट लागला तरी बघु नकोस हा सल्ला दिला
>>>
+१

पहावा की नाही?:अओ:

परवाच पाहिला. अभिनय सगळ्यांचाच छान. सुशांत सिंग तर खूपच आवडला. त्या दोन पोरी त्याला टोमणे मारताना दरवेळी त्याच्या चेहर्‍यावर जे बारा वाजलेले दिसतात ते अप्रतिम. क्षणातच त्याच्या कॉन्फिडन्स परत येतो, हिंमत करून खडे टाकत राहतो ते त्यानं खूपच छान दाखवलंय. सहज अभिनय.

वातावरण अतिशय सुरेख उभं केलंय. अगदी खरंखुरं, जिवंत. साध्यासुध्या घरात जे आणि जसं काही सामान असेल तसंच वापरलंय. लग्नातलं वातावरण वगैरे मस्त निर्माण झालंय.

मात्र अनेक संवाद सतत तेच येत राहतात. पटकथेकरता ते गरजेचेही आहेत कदाचित पण जरा बोअर होतात. कारण ही रिपीटिशन ८-१० वेळा झालीये. बाथरूमचा वापर अपरिहार्य असला तरी जरा जास्तच होता. ते ही जरा बोअर झालं.

शेवटी तारा त्या त्रिकोणातून का बाहेर पडते हे पटकन आणि काहीही कारण देऊन उरकलंय.

बाकी सिनेमा छान. ऋषीकपूर नेहमीच आवडतो. पण राजस्थानी संवादफेकीत काहीसा कमी पडतो. 'शाद्दी' वगैरे शब्द त्याच्या तोंडून जरा कृत्रिम, प्रयत्नपूर्वक काढल्यासारखे वाटतात. परिणती कोंकणाची आठवण करून देते. वाणी कपूर ओकेच वाटली.

>सर्वच कलाकारांचा छान अभिनय असूनही पटकथेत मार खाल्ला असे माझे मत. प्रेक्षकांना बांधून ठेवण्यात कमी पडतो सिनेमा. 'अरे, ये ऐसा क्युं कर रहा है? पागल है क्या?' असे उद्गार ऐकू येत होते थिएटरमध्ये. नायकाचे/ नायिकेचे वागणे अगदी चूकीचे नसले तरीही कन्विन्सिंगली प्रेक्षकाच्या गळी उतरवण्यात दिग्दर्शक कमी पडला आहे.

पटकथेत ग्रिप नसेल तर पिक्चर फसतो. प्राचीशी सहमत.

शु दे रो बघितला, आवडला ..

मामी +१ एक्सेप्ट फॉर "परिणीती कोंकोना ची आठवण करून देते " ..

दोन वाक्यआंची story quirky संवाद, सफाईदार directions, तिन्ही कलाकारांची भन्नाट chemistry ह्याच्या जोरावर engaged ठेवतो.

सुशांत सिंग ज्या निरागसपणे त्याची भूमिका मांडतो, त्याच्या चेहर्‍यावरचे हावभाव खासच. परीणीती तर नेहमीच आहे तो सीन उचलून जाते. वाणी कपूरची dialogue delivery मस्त आहे. लग्नाच्या प्रसंगानंतर ती "अरे थंडा लावो कोई" कसल्या ठसक्यात बोलते तेंव्हाच कळाते कि हे पात्र पुढे येणार आहे Happy

एक ऋषी कपूर सोडला तर सिनेमात मला काहीही आवडले नाही.
नायकाचे/ नायिकेचे वागणे अगदी चूकीचे नसले तरीही कन्विन्सिंगली प्रेक्षकाच्या गळी उतरवण्यात दिग्दर्शक कमी पडला आहे. हे प्राची यांचे मत अत्यंत पटले. सुरूवातीला 'विनोदी' वाटणारे प्रसंग आणि संवाद नंतर इतक्या वेळा रिपीट होतात की जांभया यायला लागतात. शेवटच्या सीनमधे विवाह आणि लिव-इन बद्दलचा मोठा तत्वज्ञान सांगीतल्याच्या आव आणणारा संवाद तर अगदीच डोक्यात गेला.

(वाणी कपूर छान दिसते. कदाचित तिच्यामुळे असेल, पण 'गुलाबी' हे गाणे अत्यंत आवडले. घरात आणि कारमधे असंख्य वेळा वाजवून झालेय. बायको वैतागते जाम ! Happy )

आवडले परीक्षण! बरोबर लिहीले आहे एकदम.

आपल्याला जबरी आवडला पिक्चर, पण मुख्य कारण म्हणजे प्रमुख कलाकार! कथा यथातथाच आहे, पण सादर भन्नाट केलेली आहे. "बाथरूम" जोक शेवटी "वन टू मेनी" झालाय, आणि शेवटही अशा चित्रपटाला तितकाच भन्नाट क्लायमॅक्स हवा तसा जमलेला नाही. पण तेवढे वैगुण्ये सोडली तर बाकी भट्टी एकदम मस्त जमलीय.

माझ्या दृष्टीने पिक्चर "खाल्ला" तो वाणी कपूर ने. मिस अमुक/मॉडेल वगैरे ख्याती घेऊन चित्रपटात आलेल्यांची पहिल्याच चित्रपटात अभिनयाबद्दल इतकी तारीफ क्वचित झाली असेल (महेश भट च्या चित्रपटात 'फॅशन डिझायनर' चा रोल घेउन आपला प्लॅस्टिकपणा लपवत गूढ चेहरे घेउन फिरायचे हा सहसा कॉमन असलेला पॅटर्न Happy ). वाणी कपूर खूप सुंदर दिसते असे नाही पण एकदम एक्स्प्रेसिव्ह चेहरा आहे तिचा आणि साध्या साध्या शॉट्स मधे ती सुशांतला कशी गुंडाळतीये ते तिच्या चेहर्‍यावरूनच जाणवते. त्या लग्नात सुशांत व परिणिता कारमधून जाऊन आल्यावर बुफेच्या लाईन मधे ती त्याला हैराण करते तो सीन अफलातून दिलेला आहे तिने. "तुम आम दिन बिझी नही रहते हो, संडे को क्या बिझी रहोगे" सारखे संवादही तिने चपखल दिले आहेत.

परिणिता चोप्रातर मस्त रोल करतेच. तिचे आत्तापर्यंत मी पाहिलेले सगळे रोल मला आवडले. हा ही. सुशांत सिंग राजपूतने ही खूप छान काम केले आहे. काय पो चे मधला अ‍ॅग्रेसिव्ह रोल पाहिल्यावर तर येथे मामी म्ह्णतात तसे चेहर्‍यावर बारा वाजल्याचे त्याने जे बेअरिंग चित्रपटभर घेतले आहे त्याला तोड नाही.
"शादी कोई सिम्पल मॅटर तो है नही, कि गये, और हो गयी!" हा संवाद मी पुन्हा पुन्हा बघितला आणि दर वेळी हसू आवरत नाही.

ऋषी कपूरचेही काम मस्त आहे. येथे हाच का तो पूर्वीचा चॉकोलेट हीरो अशी शंका येइल इतका भूमिकेत शिरलाय तो.

यातील आणखी एक कॅरेक्टर म्हणजे "जयपूर". मी जयपूर प्रत्यक्षात अजून पाहिलेले नाही, पण तेथील वातावरणाचे अस्सल देसी शूटिंग मस्त जमले आहे. विशेषतः गाण्यांमधे. जुन्या वाड्यांच्या चित्रात असतात तशा खिडक्या बर्‍याच फ्रेम्स मधे दाखवल्या आहेत, पेंटिंग्ज दाखवल्यासारख्या. तसेच पहिल्या गाण्यातील फोटो साठी पोज देणारे लोक, शेवटच्या गाण्यातील कोरस गाणारे ते दोन पिढ्यांचे ग्रूप्स, सगळेच एकदम अफलातून आहे. त्याव्यतिरिक्त सर्वांचेच संवाद जबरी आहेत. जयदीप साहनी म्हणून नाव दिसले म्हणून सर्च केल्यावर कळाले की बर्‍याच गाजलेल्या चित्रपटांचे संवाद त्याने लिहीलेले आहेत (बंटी और बबली, चक दे इंडिया ई). येथेही नेहमीच्या संवादांत हिन्दी व इंग्रजीचा एकदम चपखल वापर जाणवतो.

मला सर्वात आवडलेला शॉट म्हणजे तो वरती लिहीलेला वाणी कपूरचा - बुफेच्या वेळचा. नंतर ती व परिणिता बसलेल्या असताना सुशांत तेथे येतो, तेव्हा बॅकग्राउंडला "बचना ऐ हसीनों". भन्नाट! Happy

फारेण्ड, एकदम सहमत ..

पण वाणी कपूर तुला जेव्हढी भावली तेव्हढी मला काय फार नाहे आवडली .. "मोडेल"पणा माझ्या दृष्टीने लपला नाहीच पूर्णपणे ..