स्टेप मदर....

Submitted by kalpana_053 on 12 May, 2009 - 08:53

गौरी आंणि स्वप्ना...... दोघीही ७-८ वर्षाच्या जिवलग मैत्रिणी. स्वप्नाची आई 'स्वप्ना' अगदी लहान असतानाच देवाघरी गेलेली. मग लहानग्या स्वप्नाचा संभाळ करण्यासाठी स्वप्नाच्या वडिलांनी नाईलाजाने दुसरे लग्न केलेले. गौरीला मात्र ही गोष्ट शाळेतल्या मैत्रिणींकडून कळल्यापासून खूपच वाईट वाटत होते. रामायणातील रामाची सावत्र आई कैकेयी, सिंड्रेलाची दुष्ट सावत्र आई अशा अनेक कथांमुळे "सावत्र आई" म्हणजे 'खूप छळ करणारी आई' असा समज गौरीने करून घेतलेला. त्यामुळे स्वप्नाच्या कधीही ती घरी गेली तरी त्या भावनेनेच तिच्या सावत्र आईकडे पाही!
एकदा शेवटी ती स्वप्नाला म्हणते, "स्वप्ना, तुझी आई, स्टेप मदर आहे याचं मला खूप वाईट वाटतं गं!"
पण यावर स्वप्ना गौरीला म्हणते, "अगं माझ्या सख्ख्या आईला तर मी पाहिलेलं देखील नाही. पण माझी ही आई सावत्र असली तरी ती खूप चांगली आहे. गोष्टीतल्या स्टेप मदर सारखी नाही. मला तर तीच माझी खरी आईच वाटते."
पण गौरीच्या मनांतून ही गोष्ट काही जात नव्हती. आपल्या प्रिय मैत्रिणीचे दु:ख तिच्या मनांतून काही जात नव्हते. गौरीच्या आईला देखील ही गोष्ट खूप खटकत होती. ती अनेकवेळा स्वप्नाची आई सावत्र असली तरी चांगली आहे हे तिला पटवण्याचा प्रयत्न करी. पण गौरीला मात्र हे पटतच नव्हते. गौरी अनेकवेळा स्वप्नासाठी डब्यातून खाऊ घेऊन जाई. तिची आई नेहमीच तिला डब्यातून पोळी-भाजी देते याचा तिला राग येत असे. कधीकधी तर गौरी आईला "स्वप्नाला आपल्या घरी कायमचे घेऊन यायचे कां?" असा आईला वेड्यासारखा आग्रह देखील धरी.
गौरीच्या आईला स्वप्नाची आई चांगलीच माहिती होती. ती स्वप्नाच्या जबाबदारीमुळे उच्चशिक्षण घेतलेली असूनही नोकरी करत नव्हती. स्वप्नाला संभाळताना दुजाभाव मनांत यायला नको म्हणून तिने स्वतःला मूल देखील होऊ दिले नव्हते. कायम स्वप्नाला अभ्यासात, खेळण्यात, वागण्यात हुषार बनवणे हेच तिने स्वतःचे आयुष्याचे ध्येय ठरवले होते. स्वतःची कामे स्वतःच करायला शिकवून स्वप्नाला स्वावलंबी बनवण्यामागे तिचा खूप मोठा वाटा होता. त्यामुळे घरी स्वतःचे शूज, कपडे, पुस्तके, दफ्तर सर्व जागचेजागी ठेवी. वेळेवर शाळा, अभ्यास, ग्राऊंडवर खेळणे असा तिचा दिनक्रम चाले. पण गौरीला मात्र तिला घरात असे काम करताना पाहिले की खूप वाईट वाटे. तिची आई स्टेप मदर आहे म्हणूनच तिला स्वतःचे काम करायला लावते असा समज तिच्या मनांत पक्का बसलेला होता. गौरीच्या आईलाही गौरीचा हा समज कसा दूर करायचा हे कळत नव्हते.
एक दिवस स्वप्नाच्या वाढदिवसाचे निमंत्रण स्वप्नाच्या आईने गौरीच्या आईकडे देते. पण स्वप्नाची आई सावत्र.... ती काय स्वप्नाचा वाढदिवस साजरा करणार? असा विचार गौरीच्या मनांत येतो व त्यावेळी न जाण्याचे तिने ठरवते. त्यामुळे ती शाळेतच स्वप्नाला स्वतः तयार केलेले ग्रीटिंग व छानसे गोष्टीचे पुस्तक स्वप्नाला भेट म्हणून देते. सायंकाळी बराच वेळ गौरी न आल्याने शेवटी "अजून गौरी का आली नाही?" म्हणून स्वप्नाची आई गौरीच्या आईला फोन करते..... करण गौरी स्वप्नाची जिवलग मैत्रिण आहे हे तिला माहित असते. त्यामुळे मग गौरीला स्वप्नाच्या घरी तिची आई आग्रहाने पाठवते. स्वप्नाच्या घरातील हॉल फुले, फुगे, झुरमुळ्या यांनी छान सजवलेला असतो. स्वप्नाने खूप छान परीसारखा निळ्या-पांढर्‍या रंगाचा फ्रीलचा फ्रॉक घातलेला असतो. तिच्या इतर मैत्रिणीही जमलेल्या असतात. सर्वाना एकत्र करून स्वप्नाची आई प्रथम स्वप्नाचे औक्षण करते. स्वप्नाही मग आई-बाबांना नमस्कार करते. नंतर केकवरील मेणबत्ती पेटवते. पण आईच्या सांगण्यावरून विझवत मात्र नाही. मग तिची आई तिला केक कापायला लावते. स्वप्नाच्या तोंडात केक भरवून तिची छानशी पापी घेते. तिला आणलेली दोनचाकी सायकल देते. तिचे तिच्या मैत्रिणींबरोबर फोटो काढते. मग सर्व मैत्रिणी स्वप्नाला त्यांनी आणलेल्या भेटवस्तू देतात. गौरीला आपण सकाळी शाळेतच प्रेझेंट दिल्याचे आता वाईट वाटू लागते. मग ती तिला नुसतेच "हॅपी बर्थ डे स्वप्ना" असं थोडं हिरमुसल्या स्वरात म्हणते. स्वप्नाच्या आईने सर्व मुलांसाठी शिरा, पुरी व बटाट्याची भाजी असा छानसा बेत केलेला असतो. त्यानंतर सर्वाना थंडगार दूध कोल्ड्रिंग मिळणार असते. सर्वाना स्वप्ना एक छानशी ड्रॉईंग वही व कलर पेन्सिलचा बॉक्स स्वप्ना "रिटर्न भेट" म्हणून देते. काहीजण मग तिथेच आपले ड्रॉईंग सुरू करतात. स्वप्नाची आई मग काही वेळ सर्वांचे खेळ घेते. गौरी बर्थ डे मधे इतकी रंगून जाते की तिला नेहमीप्रमाणे स्वप्नाची आई सावत्र आई आहे याची आठवण देखील रहात नाही. ती नकळत तिच्या आईशी खूप गप्पा मारते. गप्पा मारताना तिची आई किती छान बोलते असं तिच्या सारखं मनांत आल्यावाचून रहात नाही. तिला आपल्या आवडत्या टिचरची आठवण येते. स्वप्ना आणि गौरी देखील खूप गपा मारतात व खेळतात. स्वप्नाला आलेली सर्व प्रेझेंट बघतात. आणि मग गौरीला बराच उशीर झाल्याने गौरीच्या आईचा गौरीला घरी येण्यासाठी फोन येतो. स्वप्नाला परत वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन तसंच तिच्या आईकडे खूप आनंदाने पाहून खुशीतच ती घरी परतते.
रात्री झोपताना आईच्या कुशीत हळूच शिरत गौरी आईला म्हणते, "आई, अगं मला उगीचच वाटायचं स्वप्नाची आई...... स्टेप मदर म्हणजे खूप वाईट असणार. पण मी तिच्या आईला आज जवळून पाहिलं. तिच्याशी बोलले. तिच्याशी गप्पा मारल्या. अगं ती खूप चांगली आहे. अगदी तुझ्यासारखीच. म्हणजे सख्ख्या आईसारखीच. तू मला नेहमी सांगत होतीस. पण मला पटतच नव्हते. मला वाटलं स्वप्नाची सावत्र आई तिचा वाढदिवस चांगला साजरा करणारच नाही. पण अगदी माझा वाढदिवस तू साजरा करतेस तसाच तिच्या आईने तिचा वाढदिवस साजरा केला. खरंच माझं चुकलं. सॉरी. उगीचच मी तिच्या आईला वाईट समजत होते. खरंच ती खूप चांगली आई आहे. मी उद्या स्वप्नाच्या आईला भेटल्यावर "सॉरी" म्हणणार आहे. आता मला कळलंय, सर्वच स्टेप मदर.... सावत्र आई वाईट नसतात. काही स्वप्नाच्या आईसारख्या खूप चांगल्याही असतात."
गौरीच्या आईला स्वप्नाची आई सावत्र असली तरी चांगली आहे हे गौरीला कळले म्हणून मनापासून समाधान वाटते. खूप आनंद होतो. अन् थकून पण समाधानाने झोपलेल्या गौरीच्या शांत आनंदी चेहर्‍याकडे पाहून गौरीच्या आईला "सावत्रपणाचे गौरीच्या मनावरील सावट" दूर झाल्याचे पाहून आनंद होतो. तिच्या गालाची छानशी पापी घेऊन ती झोपलेल्या गौरीला "माझं शहाणं लेकरू ते....." असं म्हणत कुरवळते.

गुलमोहर: 

माझी बहिण अचानक २ लहान मुलाना सोडून देवाघरी निघून गेली तेन्व्हा त्या पोरान्चा साम्भाळ त्यान्च्या स्टेप मदर ने अतिशय प्रेमाने केला. स्वताच्या पोराला एकवेळ शिळे खाऊ द्यायची पण माझ्या बहिणीच्या मुलाना मात्र कधीही शिळे खाऊ दिले नाही. आमच्यापासून त्याना तोडून टाकले नाही.तर अजूनही आमचे सम्बन्ध अतिशय चान्गले आहेत. आता तर माझ्या भाचरान्ची लग्ने होऊन त्याना मुले पण झाली आहेत. मला तर ती माझ्या बहिणीच्या जागीच आहे.

मस्तच आहे गोष्ट. आणि खरी सुद्धा.
धनु.