....फक्त एकदाच!

Submitted by बागेश्री on 6 September, 2013 - 11:42

आयुष्यावर आयुष्याने
बेसुमार बरसताना,
रक्ताने उंच उसळावे..
फक्त एकदाच!

रंगांनी त्वचेत जिरताना,
बेरंग भावना रंगताना
मुसमूसून जगणे ल्यावे
फक्त एकदाच....

कानाचे गीत होताना
सुरांनी आत जिरताना
ताल शरिराचा ह्या व्हावा,
फक्त... एकदाच...

श्वासांनी गंधित होताना,
मिठीने घट्ट होताना,
अंतर मनांतले सरावे,
फक्त...एकदाच!

क्षणी कासाविस होताना
जगण्याला कोरड पडताना
आयुष्याने गार नीर व्हावे
......... एकदाच....!!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप छान बागेश्री. पुर्ण कविताच सुंदर आहे.
श्वासांनी गंधित होताना,
मिठीने घट्ट होताना,
अंतर मनांतले सरावे,
फक्त...एकदाच! >> हे खूप आवडले.

श्वासांनी गंधित होताना,
मिठीने घट्ट होताना,
अंतर मनांतले सरावे,
फक्त...एकदाच! >> मस्तच गं.. किती सुंदर लिहीतेस
आवड्ली Happy

क्षणी कासाविस होताना
जगण्याला कोरड पडताना
आयुष्याने गार नीर व्हावे
......... एकदाच....!!

हे आणि असं फक्त बागेश्रीनेच लिहावे. ................. Happy अतिशय दुर्मिळ आवका आहे हा .... !!

अज्ञात, तुमचा "नेमक्या" ओळींवर आला अभिप्राय..जिंकली कविता.

सर्व वाचकमित्रांचे मनःपूर्वक आभार.

बागेश्री,
क्या बात है! कवितेच्या जगात उस्फुर्तपणाला खरंच तोड नाही! आणि पुन्हा पुन्हा असं 'फक्त एकदाच' व्हावं वाटावं इथपर्यंत ताणली जाणारी तहान.. ओढ! पुरता अंदाज नाही पण मी तुमचं 'फक्त एकदाच' अशा अंगाने घेतलंय. पण शेवटी, खरंच एकदाच व्हावं असं जे ग्रेस बोलले तेच..

करा अंगण मोकळे
त्यात विझू नये दिवा
एका झुळुकीने माझा
जन्म मातीत मिळावा!

नमस्कार,

तुमची कविता खूप सुंदर आहे. परत परत वाचावीशी वाटते. का कुणास ठाऊक, शेवटचे कडवे वाचतांना मला "प्रश्नार्थक शेवट" या द्रुष्टीकोनातून वाचले तर ते जास्त भावले...

क्षणी कासाविस होताना
जगण्याला कोरड पडताना
आयुष्याने गार नीर व्हावे
......... एकदाच..?

श्वासांनी गंधित होताना,
मिठीने घट्ट होताना,
अंतर मनांतले सरावे,
फक्त...एकदाच!

..... छानच.