वान्या - पॅपिलॉन - भाग ३

Submitted by bedekarm on 5 April, 2008 - 07:51

तारेच्या कंपाउंडला जाळी बांधून घेऊन त्याने कृतकृत्य झाल्याप्रमाणे एकवार सभोवताली नजर फिरविली. आता पक्काच बंदोबस्त झाला. वान्याला पळून जायला कुठेही फट उरली नाहीये. त्याने विजयी मुद्रेने वानूकडे बघितले. घरात येउन त्याने चहा केला. चहाचा कप घेउन पेपर वाचत तो व्हरांड्यात येऊन बसला. दोन घोट पिऊन होतात न होतात तोच वानू रस्त्यावर शेपूट हलवित ऊभा दिसला. हा उडालाच. कुठून बाहेर पडला? त्याने कपाळाला हात लावला. आता वानू मागून हिंडणे आले. एकदा का वानू बाहेर सटकला की मग तो कुणाचाही नाही. आपल्यापासून चार हात अंतरावर राही पण हातात मात्र सापडत नसे. पळून खेळून दमला की मग कधीतरी हाती लागे. तोपर्यंत त्याचा अवतार बघण्यालायक होइ. छोट्या चौकोनी बिस्किटांसारखा गव्हाळ वानू निम्मा काळा झालेला असे. बाहेर पडला की प्रथम गटाराच्या गार पाण्यात बसायचे. मग भटक्या कुत्र्यांबरोबर हिंडायचे, खेळायचे, भांडायचे. या सगळ्यात त्यांच्या अंगावरच्या माश्या, गोचिडी पिसवा याच्या अंगावर स्थलांतर करीत.
घरात आणून मग बोअरच्या पाण्याने आंघोळ घालायची. घरात त्याला घेऊन येताना अगदी लाज वाटते. लोकपण काय गावठी कुत्रा पाळलाय अशा नजरेने बघतात. आंघोळ घालताना वान्याची जात, लायकी, औकात, आइ बाप सगळ निघत. कुठेतरी सोडून देऊ या. पाळायच्या लायकीच कुत्र नाही. अशा घोषणाही होतात. पण एकदा घरात आला की वानूला तोडच नाही. त्याच्यासारखा तोच. त्याला अस बोलल्याबद्दल गिल्टी वाटाव इतका गरीब चेहरा करून वान्या डोळे मिचकावतो. अपराधी चेहर्‍याने वावरतो. आंघोळ घालून स्वच्छ पुसताना हा म्हणे, साल्या तुझ्या बापाला तरी अशी आंघोळ कुणी घातली होती का. तू तो लावारिस की तरह जियेगा और लावारिस की तरह मरेगा.
वानू जन्मजात पॅपिलॉन होता. त्याची आई धनगर होती. जन्मतः जनुकांच्या नकाशांबरोबरच त्याला रस्ते, माळ, शेत, नदीकाठ, ओढे, डोंगर, निळ्या आभाळाखालच मुक्त वास्तव्य, शेळ्या मेंढ्यांच्या कळपाचे नेतृत्व, राखणदारीचे कर्तृत्व याचेही नकाशे मिळालेले होते. त्याला बंदिस्त करण्याच्या कितीही युक्त्या करा, या खेळात शेवटचा चेकमेट वान्याचाच असे. हा पळून जाताना मात्र दिसत नाही. एकदम रस्त्यावरच उगवतो. आणि त्याला बंदिवान करून आणण्याची यातायात आठवून वैताग येतो. हा तर त्याला हौडिनी म्हणतो. हौडिनी हा जगप्रसिद्ध जादुगार होता. साखळदंडांनी बांधून काचेच्या बंद पेटीत घालून त्याला क्रेनने समुद्रात सोडले तरीही, श्वास रोखून पाहात असलेल्या प्रेक्षकांसमोर तो काही क्षणात प्रकट होइ.
वानू घरातून पळाला की गल्लीत ब्रेकिंग न्युज होते. गल्लीतली मुल ओरडतात, मम्म्ये वानू पळाला. कदाचित आजुबाजूच्या गल्ल्यात आया मुलांना झोपवताना सो जा वानू आया अस म्हणत असाव्यात. रस्त्यावरन जाणारे येणारे याला घाबरत. गाड्यांमागून माणसांमागून धावत जाइ. भुंके. किंवा गुपचुप मागे जाउन पाय पकडे. रस्त्याच्या मधोमध जाउन बसे. मग इकडचा ट्रॅफिक इकडे, तिकडचा तिकडे. घरासमोर वाघा बॉर्डर होते. नो थरोफेअर. नवीन माणस कुणाचा कुत्रा आहे म्हणून शिव्या घालतात. मग आम्ही आपला नाही असा चेहरा करुन उगाच इकडे तिकडे बघत उभे राहतो.
घरात परक्या माणसाला यायला भिती वाटते. कुणी दारात आले की वानू धावत दारात येतो. पण जर कुणी गेट उधडून आत आल तर हा गेटमधून बाहेर सटकतो. धनंजय कामासाठी दोनदा घरी आला. येताना घाबरत नाही पण आत आला की वान्याला बघून घाबरून गेट उघडे ठेवतो. आणि आत येऊन सांगतो की वानू बाहेर गेलाय म्हणून. आम्ही वैतागलो. मग याने माळ्यावर चढून एक सिमेंटच्या पत्र्याचा छोटा तुकडा काढला. त्यावर ओल्या खडूने 'कुत्रा खतरनाक आहे ' असे लिहिले. बाजूच्या कोपर्‍यात एक कुत्र्याचे चित्र. सुळे जाम धारधार काढले. पण तरीही देखणे. पाटी गेटवर लावली. रस्त्यातून येणारा जाणारा थबकून पाटी वाचे व हसत पुढे जाइ. बाबा करमरकर अधूनमधून घरी येत. बाबा नव्वदीच्या पुढचे पण इरसाल. पाटी वाचून म्हणाले, पुढे लिहि की मालक महाखतरनाक आहे.
दोन दिवसांनी धनंजय पुन्हा आला. आत येणार तोच पाटी बधितली. मग तिथूनच आम्हाला दार उघडायला बोलावल. गोळी बरोबर लागू झाली. आम्ही खूष. मग एकदा खूप मोठा पाउस आला आणि पाटीवरची अक्षर पुसुन गेला.
कंपाउंडचा बंदोबस्त करण्यासाठी याने किती मॅनअवर्स आणि पैसेही खर्च केले. जाळ्या विकत आणायच्या, गडी बोलावायचे, वेळ खर्च करून उभे राहून काम करून घ्यायचे. वानूला बांधलेले आवडत नसे. पण गडी कामाला आले की त्याला बांधावे लागे. मग भुंकुन तो जीव नको करी. आणि या सगळ्या त्रासाची फलनिष्पत्ति काय तर थोड्याच काळात वानू त्याला खिंडार पाडून पळून जाइ. मध्यंतरी काही काळ या सगळ्याला कंटाळून वानूला घरातच कोंडायला सुरुवात केली. मग बाहेर कोण आल आहे ते बघायला दिवसातून शंभर वेळा वानू जिन्यातून वर खाली करे. गच्चीच्या कोपर्‍यात बसून लांबवर न्याहाळत पलायनाच्या नवीन योजनांवर विचार करत बसे. एकदा अगदी पक्का बंदोबस्त केला व वानूला मोकळे सोडले. दुसर्‍या दिवशी दारावरून कुत्री हिंडताना बघून बेभानपणे वानूने गेटवरून उडी मारली. बहुधा त्यावेळी कुत्र्या हीटवर आलेल्या असाव्यात. अशा कुत्र्या बाहेर हिंडू लागल्या की वानूला फार जपावे लागे. कारण तो बाहेर पळायचा आटापिटा करी. आणि बाहेर पळालाच तर बाहेर प्रेम आणि युद्ध दोन्हीतही वानू घायाळ होउन परत येइ. मग त्या जखमा, त्यांच ड्रेसिंग, इंजक्शन्स हे सत्र सुरु होइ. अशा काळात मग वानू या सक्तीच्या ब्रम्हचर्याच्या निषेधार्थ गच्चीत जाउन रडत बसे.
लहान असताना वानू पळून जायला लागल्यावर आम्ही त्याला पकडून आणून चांगला चोप दिला. हेतु हा की त्याने पळून न जाण्याचा धडा घ्यावा. पण वान्याने वेगळाच धडा घेतला. पुन्हा पळून गेल तर आम्ही बोलावल तर आमच्याकडे यायच नाही अस वानून ठरवल. पण समोरच्या अथर्वकडे मात्र लगेच जाइ. वान्याच्याच उंचीचा एवढासा अथर्व त्याला पट्ट्याला धरून पकडे. किंवा शेजारच्या भटवहिनींकडे येइ. ही दोघे नसतील तर मग हा हिंडत, मुलुखगिरी करत आमच्या दादांकडे जाउन बसतो. दादा व आम्ही एकाच कुटुंबातले आहोत हे वान्याला कस कळत कुणास ठाउक. दादा मग सुतळी दोरी चिंधी कशानेही त्याला बांधून आम्हाला फोन करत.
हे सगळे पर्याय संपले तर सरळ मोटरसायकलवरून वान्याला मागे पळत यायला लावायच. दोन तीन किलोमीटर नंतर तो धापा टाकीत उभा राही मग त्याला चालत घरी घेउन यायच. एकदा तर मी माझी ओढणी त्याला बांधून घरी आणल.
वानू एकदोनदा पळून गेला की कंपाउंड्ची तपासणी करून रातोरात खिंडार बुजवायची. वानू कसा पळतो ते बघायला हा एकदा गच्चीत लपून बसला. वानू शांतपणे खाली बसला होता. शेवटी कंटाळून हा खाली आला मग वानू पळून गेला. त्याच्या पळण्याच्या संभाव्य जागांचा शोध घेण्यासाठी याने त्या जागांवर खडूच्या रेघा मारून ठेवल्या, त्या जागी दोरा बांधून बघितला, पण शर्यत वानूनेच जिंकली, कारण अशावेळी तो जाळीखाली खड्डा खणून बाहेर जाइ.
आता मात्र वानू थकायला लागलाय. त्याला बाहेर जायला खूप जागा आहेत पण आम्ही घरात असलो तर सहसा बाहेर जात नाही. दुपारभर मी एकटीच घरात असते, आणि वानू अंगणात. मी दुपारी काहीतरी वाचीत किंवा कॉम्प्युटरवर टाइमपास करत असते. वानू बाहेर राखण करतो. परवाच शंतनूने काही चांगले पिक्चर्स डाउनलोड करून दिले. रोज दुपारी एकेक बघू अस ठरवल. मी पिक्चर बघत आहे हे वानूला बाहेर कळत, इतर काही करीत असेन तर वानू बसून राहतो, मी पिक्चरमधे गुंगले तर मग तो हळूच बाहेर जातो. पण आता तो फार लांब जात नाही. शेजारी शालिनीकडे जाउन बसतो. गेल्यावर्षी शेजारी रहायला आलेली शालिनीही आमची कुटंबिय आहे हे वान्याला कस समजत असेल?

गुलमोहर: 

फार छान लिहिताय. अगदी वानू डोळ्यासमोर आला, कुठे दिसला तर नक्की ओळखेन की हा तर बेडेकरांचा वानू म्हणून. पुढचे भाग अजून येऊद्या.

काय झक्कास लिहिताय, बेडेकर्(म)!
(एकच सुचवावसं वाटतय. ह्यात चौथ्याच वाक्यात आलेला 'तो' कोण? ते कळत नाहीये. त्याने काही बाधा येत नाहीये... वान्याला!)
खूप आवडला लेख. हा पठ्ठ्या आमच्याच घरचा वाटतोय...

मजा आली. आमच्या लालूची खुप आठवण आली. तोही माझ्या आजीशी अगदी शहाण्यासारख वागायचा आणि आईला मात्र रोज पाडायचा फिरायला नेल की.आईही स्वप्न पहात असायची की तो शहाण्यासारखा तीच्याबरोबर फिरतोय.....

दाद, लेखमालेतला 'तो' हा घरचा मालक आहे .. लेखिकेचा नवरा ..

माझा अंदाज बरोबर आहे ना?

तुझा अंदाज बरोबर आहे sashal. तो म्हणजे घराचा मालक माझा नवरा. हे वानूही जाणतो. वानूला आमच्या सर्वांपेक्षा त्याच्याबद्दल ज्यास्त आदर आणि प्रेम. खर म्हणजे वानूशी खूप खोलवरच नात, आणि ही गोष्ट सांगण्याचा हक्कही त्याचच. तोच त्याचा मायबाप. त्याच्या खूप मागे लागले होते तू लिहि म्हणून. त्याला चांगली नर्म (मर्म, वर्म , -र्म इ. सुद्धा) विनोदबुद्धी आहे. बघू, या मालिकेत गेस्ट आर्टिस्ट(रायटर) म्हणून त्यालाही बोलवेन.

हे खुप झकास लिहिले आहे.ते वाचुन आम्चा खन्डु आठव्ला

प्रत्येक वाक्याला अगदी अगदी. सर्व मालिका वाचली होती आज परत. परवाच जिन्याचे दार उघ्डे राहिले तर आमची वीनी कुत्री लगेच धूम खाली उतरत गेली. तिला कितीही जिने द्या ती पू र्ण वर तरी जा ते ना हीतर पार खाली तरी. आता पूर्ण २९ मजले उतरावे लागतात का म्हणून भी ती वाटलेली. पण २४ ला ती थकली आणी उभी राहिली. नशीबाने! कुत्रे असे हरवले कि मला दर मजल्यावर थांबून शोधा वे लागते. कारण ते कुठे ही असू शकतात. त्यांना सारखा आवाज द्यावा लागतो. नाहीतर ते विसरून गायबच होतात. वान्या इज बेस्टेस्ट
डॉग एव्हर.