श्री. संदीप पाठक यांच्याशी 'इन्व्हेस्टमेंट'च्या निमित्ताने गप्पा

Submitted by हर्षल_चव्हाण on 6 September, 2013 - 01:47

'हरिश्चंद्राची फॅक्टरी', 'एक डाव धोबीपछाड', शहाणपण देगा देवा' यांसारख्या चित्रपटांतून, 'फू बाई फू', 'घडलंय बिघडलंय', 'असंभव', 'एका लग्नाची दुसरी गोष्ट', अशा मालिकांतून, 'असा मी असामी', 'लग्नकल्लोळ', 'जादू तेरी नझर', 'ज्याचा शेवट गोड', 'सासू माझी धांसू' या नाटकांतून, 'वर्‍हाड निघालंय लंडनला' या एकपात्री प्रयोगातून श्री. संदीप पाठक आपल्याला भेटले आहेत. या कलाकृतींतील त्यांच्या अभिनयामुळे एक चतुरस्र अभिनेता अशी त्यांची ओळख बनली आहे.

'इन्व्हेस्टमेंट' या २० सप्टेंबरला प्रदर्शित होणार्‍या चित्रपटात त्यांची एक अतिशय महत्त्वाची भूमिका आहे. या निमित्ताने त्यांच्याशी मारलेल्या गप्पा...

inves2.jpg

’इन्व्हेस्टमेंट’मध्ये तुम्ही श्री. गांगण ही व्यक्तिरेखा साकारली आहे. त्याबद्दल सांगाल?

हा चित्रपट प्रदर्शित होतोय, याचा मला खूप आनंद आहे. आपल्याकडे कोणत्याही अभिनेत्याला एका साच्यात अडकवलं जातं. ’अरे, हा कॊमेडी चांगली करतो’, ’अरे, तो फाइट उत्तम करतो’, असाच उल्लेख केला जातो. यात लोकांची चूक नसते कारण लोकांनी या अभिनेत्यांना बर्‍याचदा त्याच भूमिकांमध्ये पाहिलेलं असतं. त्यामुळे त्यांना वाटतं की हा नट त्याच प्रकारच्या भूमिका चांगल्या करू शकतो. विनोदी भूमिका करणारे नट तर याबाबतीत फार दुर्दैवी. त्यांना वेगळ्या भूमिका मिळणं कठीण असतं. मी स्वत:ला नशीबवान समजतो की रत्नाकर मतकरीसरांनी माझी निवड ’इन्व्हेस्टमेंट’मधल्या या भूमिकेसाठी केली. माझं आणि त्यांचं रंगभूमीवरचं नातं फार जुनं आहे. मी त्यांच्या तीन नाटकांमध्ये काम केलं आहे. रत्नाकर मतकर्‍यांनी ’असा मी असामी’चं नाट्यरूपांतर केलं होतं. त्यात मी होतो. ’जादू तेरी नझर’मध्ये मी प्रशांत दामले आणि सतीश तारे यांच्या बरोबर होतो. या नाटकातली माझी व्यक्तिरेखा म्हणजे एक अर्कचित्र होतं. आणि आता तिसरं नाटक आलं आहे नुकतंच, ’ज्याचा शेवट गोड’, त्यात माझ्या वेगवेगळ्या व्यक्तिरेखा आहेत. तर या तिन्ही नाटकांतल्या भूमिका विनोदी होत्या. म्हणून मी मतकरीसरांना विचारलं, की तुम्ही मला या गंभीर भूमिकेसाठी का घेतलंत? तर ते म्हणाले, की विनोदी भूमिका उत्तम केली, की गंभीर भूमिका उत्तम करता येतात. सरांनी माझ्यावर विश्वास टाकला, याचा मला आनंद आहे.

या चित्रपटातला गांगण हा मनुष्य कनिष्ठ मध्यमवर्गीय आहे. तो एक कारकून आहे. त्याची बायको आजारी असते. बायकोचं आजारपण, त्याची आर्थिक परिस्थिती, एकटेपण यातून तात्पुरत्या सुटकेसाठी तो दारू पितो.

ही आजच्या काळाशी मिळतीजुळती भूमिका आहे. ती साकारताना तुमची नक्की काय भावना होती? कारण, ’इन्व्हेस्टमेंट’मध्ये उच्च मध्यमवर्गही आहे. त्यांच्याही वेगळ्या समस्या आहेत.

या चित्रपटात दाखवलेला उच्चमध्यमवर्ग अतिमहत्त्वाकांक्षी आहे. या वर्गाकडे पैसा आहे, आणि तरी त्यांना जास्त पैसा हवाय. मग हा पैसा मिळवण्यासाठी ते वाट्टेल ते करायला तयार आहेत. आपल्या मुलांकडेसुद्धा ते एक इन्व्हेस्टमेंट म्हणूनच बघतात. कारण ही त्यांची मुलं अधिक पैसा कमावणार असतात. त्यामुळे मुलांना फक्त पैसा मिळवायचा कसा, याचंच शिक्षण दिलं जातं. हेच त्यांच्या लेखी संस्कार असतात. या चित्रपटातला दुसरा वर्ग हा जगण्यासाठी धडपडतोय. रोजच्या गरजा भागवताना त्याची दमछाक होते आहे. पण तरीही आपल्या मुलांकडे त्यांचं लक्ष आहे.

गांगण जरी दारू पीत असला तरी तो त्रासदायक नाही. तो स्वत:चं दु:ख हलकं करायला दारू पितो. समाजाला उपद्रव व्हावा, असं तो काही करत नाही. आपल्या मुलीवर त्याचं निरतिशय प्रेम आहे. तिला तो जपतो. ही भूमिका साकारताना मला या गोष्टीचं भान होतं. त्यामुळे कुठेही लाऊड न होता ही भूमिका मी साकारली आहे.

रत्नाकर मतकरी, सुलभा देशपांडे, तुषार दळवी यांच्यासोबत काम करण्याचा तुमचा अनुभव कसा होता?

या चित्रपटातले माझे सगळे सहकलाकार आणि अर्थातच दिग्दर्शकही रंगभूमीवरचे आहेत, याचा मला आनंद आणि अभिमान वाटतो. या सगळ्यांचा अभिनय मी पूर्वीपासून बघत आलो आहे. मुंबईत येऊन मला साधारण बारा वर्षं झाली. मुंबईत आल्यापासून सुप्रिया विनोद ही माझी खूप चांगली मैत्रीण आहे. तिची सगळी नाटकं मी बघितली आहेत. तिचं आणि तुषार दळवीचं ’तनमन’ हे नाटक मला फार आवडलं होतं. संजय मोने, तुषार दळवी यांचीही नाटकं मी पाहिली आहेत. सुलभाताईंच्या अभिनयाचा तर मी लहानपणापासून चाहता आहे. अशा रंगकर्म्यांबरोबर काम करायला खूप मजा येते, शिकायलाही मिळतं. सुलभाताईंबरोबर माझा एक खूप महत्त्वाचा प्रसंग या चित्रपटात आहे.सुलभाताईंना तर लहानपणापासूनच बघत आलेलो आहे. हा प्रसंग करताना मला खूप आनंद झाला. अगोदर थोडं दडपण होतं, पण चित्रीकरणाच्या वेळी अगदी सहज आम्ही हा प्रसंग चित्रीत केला. त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे. पडद्यावर हा प्रसंग बघितल्यावर तुम्हांला माझ्या भावना नक्की कळतील.

inves1.jpg

तुमच्या अभिनयाची सुरुवात कशी झाली? बीड, औरंगाबाद, मग मुंबई या तुमच्या प्रवासाबद्दल थोडं सांगाल का?

माझं मूळ गाव माजलगाव. बीड जिल्ह्यात हे गाव आहे. बालवाडीपासून बारावीपर्यंत तिथे होतो. माझे आईवडील कलावंत. शाळेत, कॉलेजात मी नाटकात कामं केली होती. पण मी जेव्हा नाट्यक्षेत्रात जायचं ठरवलं, तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपला पाया पक्का नाहीये. त्यासाठी शिक्षण घेणं आवश्यक आहे. म्हणून मी पुण्याच्या ललित कला केंद्रात प्रवेश घेतला. नाटकात ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन केलं अभिनयामधे केलं. नंतर मग मी मुंबईत आलो. या क्षेत्रात येण्यासाठी उत्सुक असणार्‍या तरुण पिढीला मी सांगू इच्छितो की, नाटकाचा पाया नसेल, तर शिक्षण घेणं गरजेचं आहे. तुमचा दृष्टी विस्तारते, अनुभव मिळतो. तुमचं वाचन वाढतं. त्यामुळे सुलभाताई, मतकरीसर, तुषार दळवी, संजय मोने, सुप्रिया विनोद अशा नावाजलेल्या कलाकारांसमोर आत्मविश्वासानं काम करता येतं. भूमिकेला तुम्ही न्याय देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू शकता. तुमच्याकडे अभिनयाचं सर्टिफिकेट असलं तरच तुम्ही चांगला अभिनय करू शकता, असं मला म्हणायचं नाहीये. पण प्रशिक्षणामुळे अनेक गोष्टी समजतात, सोप्या होतात, असं मला वाटतं. प्रशिक्षण ही काही तुमची गरज नव्हे, प्रशिक्षणामुळे फायदा मात्र होतो.

ललित कला केंद्राव्यतिरिक्त तुम्ही अजून इतरत्र प्रशिक्षण घेतलं का?

नाही, अभिनयाचं प्रशिक्षण फक्त ललित कला केंद्रात घेतलं. नंतर मी मुंबईला आलो. कसं आहे, की आपल्याकडे खूप मोठं काम करणारे अनेक नाट्यकर्मी आहे. उदाहरणार्थ, शाहीर साबळे, विठठल उमप, सत्यदेव दुबे, दामू केंकरे, विजया मेहता, वामन केंद्रे, रत्नाकर मतकरी. या लोकांनी नाट्यचळवळ चालवली, मोठी केली. अशा लोकांसोबत जेव्हा तुम्ही तीनपाचदहा वर्षं काम करता, तेव्हा तुम्ही खूप काही शिकत जाता. या व्यक्ती म्हणजे प्रशिक्षणाच्या संस्थाच आहेत. तुम्हांला एनएसडी, ललित कला केंद्र यांच्या प्रमाणपत्रांची गरज आहे, असं नाही. या व्यक्तींकडे जेव्हा तुम्ही काम करता, शिकता, तिथे झाडू मारता, सेट लावता, लाईट करता, म्यूझिक देता, तेव्हा तुम्ही प्रशिक्षणच घेत असता. अशा व्यक्तींच्या शोधात तुम्ही सतत असलं पाहिजे.

तुम्ही नाटक, दूरचित्रवाणी आणि चित्रपट या तिन्ही माध्यमांशी जोडले आहात. यांपैकी कुठलं माध्यम तुम्हांला सर्वांत जास्त आवडतं?

रंगभूमीवरून आलेल्या कुणाचंही पहिलं प्रेम हे नाटकच असतं. कारण नाटक हे नटाचंच माध्यम आहे. कारण नट जे बोलतो ते प्रेक्षक ऐकतात. चित्रपट हे दिग्दर्शकाचं माध्यम आहे, आणि लेखकाला खूप वाव आहे दूरचित्रवाणी मालिकांमध्ये.

हे जरा सविस्तर सांगाल का?

हो. तिन्ही माध्यमांचं आपापलं एक बलस्थान आहे. आणि एक नट म्हणून मला तिन्ही माध्यमं महत्त्वाची वाटतात. नाटक हे एक प्रचंड ताकदीचं माध्यम आहे. खूप मोठी परंपरा आपल्या नाटकाला लाभली आहे. चित्रपट करताना तुम्हांला खूप शिकायला मिळतं. नाटकांत आणि चित्रपटांत भावना व्यक्त करताना थोडा बदल करावा लागतो, आणि तिथे नटाचा कस लागतो. दूरचित्रवाणी मालिकासुद्धा नटासाठी महत्त्वाच्या आहेत. कारण एखादी ’असंभव’सारखी मालिका केल्यावर संदीप पाठकला अजून तीन मालिकांसाठी विचारणा होते.

नट म्हणून मला अनेक गोष्टी आव्हानात्मक वाटतात. मी दहीहंडीचंसुद्धा सूत्रसंचालन करतो कारण मी स्वत:ला गारुडी समजतो. एखादा गारुडी जसा बसस्टॅण्डावर आपला खेळ दाखवत तासदीडतास लोकांना खेळ दाखवत खिळवून ठेवतो. तो काही मुंगसाची आणि सापाची लढाई लावत नाही, पण तरीही लोक त्याचा खेळ बघत थांबतात. मला असं प्रेक्षकांना खिळवून ठेवायला आवडतं. मग ती दहीहंडी असो, गणपतीतला कार्यक्रम असो, नाटक असो किंवा चित्रपट असो. मला स्वत:ला कुठल्याही बंधनात अडकवून घ्यायचं नाहीये. माझ्यातला नटाला सतत आव्हानात्मक काहीतरी मिळालं पाहिजे, याची मी काळजी घेतो.

’विनोदी अभिनेता’ हा शिक्का तुम्हांला नको, असं तुम्ही म्हणालात..

नकोय. मला कुणी ’विनोदी नट’ म्हटलेलं आवडत नाही. कुणी जर सातत्यानं ’गंभीर भूमिका’ करत असेल तर त्यांना आपण ’गंभीर अभिनेते’ म्हणतो का? ’आज आपल्याकडे एक गंभीर अभिनेते आले आहेत’, असं कोणी कधीच म्हणत नाही. अशोक सराफांसारखे कलावंत हे विनोदाचं विद्यापीठ आहेत. पण गंभीर भूमिकाही ते तितक्याच परिणामकारक करतात. हेच राजा गोसावी, शरद तळवलकर यांच्याही बाबतीत खरं आहे. खरं म्हणजे किती जबरदस्त कलावंत होते ते.. पण त्यांना आपण ’विनोदी कलावंत’ म्हणूनच ओळखतो. अगदी चार्ली चॆप्लिनपासून आमच्या पिढीपर्यंत विनोदी भूमिका करणार्‍या कलावंतांचं हे दु:ख आहे. आम्हांला सतत ’विनोदी कलावंत’ असं संबोधलं जातं. पुरस्कारांमध्येसुद्धा ’सर्वोत्कृष्ट कॉमेडीयन’ असा पुरस्कार असतो. का? ते सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या श्रेणीत का नाहीत? बोमन इराणी, परेश रावल किंवा अशोक सराफ यांना द्या ना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचं बक्षीस. सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता का म्हणायचं त्यांना?

तुम्हांला ’इन्व्हेस्टमेंट’कडून काय अपेक्षा आहेत? प्रेक्षकांना या सिनेमातून काय मिळेल, असं तुम्हांला वाटतं?

बर्‍याच जणांना वाटतं की मनोरंजन म्हणजे फक्त विनोदी सिनेमा. एखादा गंभीर विषय मांडणारा चित्रपट ’मनोरंजक’ असूच शकत नाही, असं आपल्याला वाटतं. पण हे खरं नाही. अतिशय गंभीर विषय मांडणारं ’शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’ हे मनोरंजनात्मक नाटकच आहे. हे नाटक प्रबोधन करतं, पण त्याआधी एंटरटेन करतं. ’इन्व्हेस्टमेंट’ही असाच चित्रपट आहे. हा चित्रपट एक गंभीर विषय प्रेक्षकांसमोर ठेवतो, पण मनोरंजनही करतो. हा चित्रपट बघताना दोन तास कसे गेले, हे तुम्हांला कळणार नाही. म्हणजेच तुमचं रंजन झालं. पुढचे काही दिवस मात्र तुम्ही या चित्रपटाच्या विषयाचा विचार कराल. दुसरी गोष्ट म्हणजे, हा चित्रपट एका कुटुंबाचा आहे. आईवडील आणि मुलं यांच्यातल्या संवादाबद्दल आणि आजची पिढी कुठल्या मार्गानं चालली आहे, याच्यावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या घरात घडणारा चित्रपट आहे. अशा चित्रपटांना प्रेक्षकांनी हजेरी लावणं आवश्यक आहे. कारण दर्जेदार कलाकृतीला पाठिंबा देणं, हे प्रेक्षकांकडून घडायला हवं.

तुमच्या पुढच्या प्रोजेक्ट्‌स्‌बद्दल सांगाल का?

’हजाराची नोट’ नावाचा चित्रपट मी नुकताच केला आहे. हा चित्रपट सिनेमा सुप्रसिद्ध चित्रपटसमीक्षक श्रीकांत बोजेवार यांनी लिहिलेला आहे. श्रीहरी साठे हे दिग्दर्शक आहेत. त्यांनी अमेरिकेत काही लघुपट तयार केले आहेत. हा त्यांचा पहिलाच चित्रपट आहे, आणि माझी त्यात प्रमुख भूमिका आहे. आजच्या सामजिक-राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. ’एका लग्नाची दुसरी गोष्ट’नंतर मी अजून कुठली मालिका केलेली नाहीये. पण कुणी विचारणा केली आणि तेवढा वेळ मिळाला तर मी जरूर मालिका करेन. मी स्वत:ला नशीबवान समजतो की ’घडलंय बिघडलंय’. ’एलदुगो’, ’असंभव’ अशा खूप चांगल्या आणि वेगळ्या बैठक असलेल्या, मेहनत घेतलेल्या मालिकांमध्ये मला काम करायची संधी मिळाली.

investposter2.jpg

टंकलेखनसाहाय्य - नंदिनी

***
विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडली मुलाखत. संदीप पाठक आमच्या भागातला आहे माहित नव्हते.
फक्त मालगावचे तेवढे मालगाव करा.