निराशा आणि आशा... असे नसतेच काही

Submitted by बेफ़िकीर on 16 August, 2013 - 11:28

निराशा आणि आशा... असे नसतेच काही
मनाला वाटते ते... तसे नसतेच काही

फुका काहीजणांना... दिली आमंत्रणे मी
किनार्‍यावर मनाच्या... ठसे नसतेच काही

खरे मी बोलतो तर... असा जगलोच नसतो
ससे तिसरेच असते... ससे नसतेच काही

मला जाणीव आहे... इथे आहे तसा मी
भिकार्‍याच्या नशीबी... कसे नसतेच काही

तिला बघतो असा मी... जणू सर्वस्व माझे
मला बघते अशी ती... जसे नसतेच काही

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तिला बघतो असा मी... जणू सर्वस्व माझे
मला बघते अशी ती... जसे नसतेच काही
>>> Happy
किती मस्त

निराशा आणि आशा... असे नसतेच काही
मनाला वाटते ते... तसे नसतेच काही
<<<<आज या क्षणाला माझ्यावर प्रत्यक्षात असेच म्हणण्याची वेळ आलेली असल्याने हा शेर अंतःकरणात थेट घुसला धन्यवाद सर ह्या शेरासाठी
बाकी सर्वच शेर खूप सुंदर आहेतच
ससे नसतेच काही हा जरा कमी भिडला
ठसे नसतेच काही ह्यात रदीफ खूप छान वापरलीत

..अजून एका उत्तम गझल साठी मनःपूर्वक धन्स बेफीजी

मतला सुरेख !

तिला बघतो असा मी... जणू सर्वस्व माझे
मला बघते अशी ती... जसे नसतेच काही.........अफलातून .

छान.....

मला राधा हि बावरी मधले दोन शेर आठवले....

विसरता येत नाही असे नसतेच काही,
मनाला सांधणारे नवे मिळतेच काही....

चुकांना टाळण्या मी बरी केली हुशारी,
नवे दिसताच कोणी, पुन्हा चुकतेच काही....

तिला बघतो असा मी... जणू सर्वस्व माझे
मला बघते अशी ती... जसे नसतेच काही

व्वा व्वा

" तिला बघतो असा मी... जणू सर्वस्व माझे
मला बघते अशी ती... जसे नसतेच काही "

एकदम जबरदस्त!!!

नमस्ते बेफीजी
आपल्या गझल पाहून पाहून मी शिकत आहे आज अनेक दिवसानी प्रतिसाद देत आहे तो याकरिता की
आज आपली गझल वाचून म्या पामराला एक शेर सुचला

रडावे वाटल्यावर ...तुझ्यावर हासती ते
तसे जे हासती ते ....हसे नसतेच काही

जमलाय का ?? अवश्य कळवावे Uhoh
प्रतिक्षेत
आपला नम्र
नवाच एक कुणीतरी Happy

मला चांगली गझल करायला शिकवाल ना बेफीजी ? प्लीज ........ Sad

तिला बघतो असा मी... जणू सर्वस्व माझे
मला बघते अशी ती... जसे नसतेच काही

हा एकच आवडला पण जाम आवडला.

बाकी काही समजले नाही, काही रुचले नाही अन काही पटले नाही. क्षमस्व.