माझे ड्रायव्हिंग व्हेकेशन - लेह लडाख - भाग ९

Submitted by केदार on 10 August, 2013 - 16:22

लेहवरनं मनालीला येताना डिब्रिंग नावाच्या गावात नुकताच टांगलांग ला संपतो, इथे तुम्ही उजवीकडे वळलात की त्सो कारचा कट आहे. आम्ही ह्या गावात डावीकडे वळून मनालीच्या रस्त्यावर लागलो. इथे जेवायला फारसे काही उपलब्ध नाही. गाव म्हणजे फारतर दोन पाच घर असावीत. ते गाव असेल हे कळत नाही. इथून पुढे लिंजडरी मूर प्लेन्स सुरू होते. मूर प्लेन्स हा साधारण ३५ किमीचा रोड आहे. त्याचे नाव प्लेन्स का? तर मनाली ते लेह ह्या संपूर्ण रस्त्यावर इतका सरळ रस्ता आणि इतके किमी दुसरा कुठलाही नाही. तुम्ही नेहमीच डोंगर दर्‍यातून जात असताना अचानक लेह-मनाली चा अर्धा रस्ता पार केला की मूर प्लेन्स लागते. ह्या रस्त्याचे वैशिष्ट्य म्हणजे ४००० मिटर्स वर सरळ रेषेत जाणारा आणि दोन्ही बाजूने माऊंटेन्स असणारा रस्ता. मग इथे लोकं १०० च्या स्पिड ने गाड्या चालवतात हे ह्या रस्त्याचे महत्त्व ! अगदी सरळ रोड! मूर प्लेन्स च्या उच्चारात मात्र अजून एकवाक्यता नाही, कोणी मोरे प्लेन्स म्हणते तर कोणी मूर. (लॉर्ड ऑफ द रिंग्स मध्येही मूर प्लेन्स आहे. माऊंटेन्स मधून त्या हॉबिटसला मूर प्लेन्स मधून परत माऊंटेन्स मध्ये जावे लागते. - योगायोग)

तर हा मूर प्लेन्स रस्ता सध्या पार लयाला गेलेला आहे. ह्या रस्त्यावर काम चालू आहे त्यामुळे अर्धा रस्ता तर केवळ धुळीतून जावे लागले. पुढचा साधारण १५ एक किमी मात्र टार रोड होता. रस्त्याच्या बाजूला वाळू आहे आणि वाळूतून तुम्हाला अनेक ट्रॅक्स गेलेले दिसतील. खूप सार्‍या 4 X 4 वाल्यांना मूर प्लेन्सच्या रस्त्याऐवजी ह्या ट्रॅक वरून गाडी चालवणे जास्त आवडते. हा लेह मनाली रोड वरील मोस्ट फोटोग्राफ्ड स्पॉट आहे. मला विचाराल तर मला चुमथांग रोड समोर ह्या रोड मध्ये तेवढे काही जाणवले नाही. काल मी जे रोडचे फोटो टाकले तसेच काहीसे इथून ही दिसते त्यामुळे मला मूर प्लेन्स वर फोटो काढावा असे अजिबात वाटले नाही हे खरेच. पण खूप लोकं मनाली - लेह असे जातात त्यामुळे त्यांना पहिल्यांदाच दिसणार्‍या ह्या व्हियूज मुळे हा मोस्ट फोटोग्राफ्ड स्पॉट आहे हे ही खरेच.

मूर प्लेन्स संपल्यावर पांग आले आणि मस्त पैकी जेवून घेतले. डोरजेलाही थोडे बरे वाटत होते. त्याला माझी गाडी चालवायची इच्छा होती. तशी काल त्याला मी लेक वर गेल्यावर चावी दिली होती, पण त्याचे आणि XUVचे फोटोसेशन नीट झाले नव्हते. मग पण आज फोटोसेशन उरकले. पांग मध्ये वल्डस हायस्ट मिल्ट्री ट्रांझिट कॅम्प आहे.

हे मला फार आवडले. Happy

आता आजचे तीन मोठे पासेस लागणार होते. पहिला लुंगलाचा ला ५०६० मिटर्स - १६,६०० फुट. हा पास पांग नंतर लगेच चालू होतो. पांगची उंची देखील १५००० + फुट आहे. आम्ही जेवण करून थोडे टंगळमंगळ करतोय तितक्यात एक भयानक आवाज आला. जणू कोणी खूप मोठा बॉम्ब टाकला. आमच्या सारखे जे लोक जेवण किंवा चहा प्यायला थांबले होते ते एक क्षण घाबरले. पण दुसर्‍या क्षणी जिथून आवाज आला तिकडे नजर टाकली तर अर्ध्या किमी पासून गाड्यांची रांग लागली होती, म्हणजेच BRO ने सुरूंग लावला होता. BRO अनेकदा डोंगर फोडण्यासाठी सुरुंग लावते. तिथून नवीन रस्ता होणार होता. बरे झाले आम्ही जेवायला थांबलो अन्यथा परत त्या लाईनीत अडकलो असतोच.

लेह मध्ये दोन रुल्स पाळावेत. ( हे दोन्ही माझेच रुल्स आहेत Happy )
१. व्हेन यु स्पॉट फूड इट इट. आणि
२. व्हेन यु स्पॉट पंप फिल इट

लेह मध्ये जे गेले आहेत त्यांना ह्या दोन्हीचे महत्त्व कळेल. व जे जाणारे आहेत त्यांनी हे रुल्स आधीच बिंबवून घ्यावेत.

त्यामुळेच जेंव्हा पांग मध्ये जेवण दिसले तेंव्हा जेवायला थांबलो होतो. लुंगलाचा ला ची चढाई सुरू केली आणि हळू हळू न असलेल्या रस्त्यावरून वर आलो. तिथे डोंगरामध्ये विविध आकार बघायला मिळतात.

आजचा रस्ता.

माझ्या पाठीमागच्या व्हॅन मध्ये सर्व फॉरेनर्स बसले होते ते आज पांग पासून आमच्या सोबतच होते. लुंगलाचाला उतरताना मग मी आणखी थोडे साहस करायचे ठरविले आणि 4 X 4 ची एक शॉर्ट कट घेतली. मी घेतली हे बघून डोरजेला पण स्फुरण चढले आणि त्यांनी ही घेतली. ही शॉर्टकट खूप वेळ चालली पण साधारण ८-९०० फुट तरी आम्ही खाली आलो असू. जे यायला दोन एक किमी चे आठ नऊ Z पार करावे लागले असते. शॉर्ट कट वरून पाहिल्यावर नदीत उतरताना दिसत होता. आणि नदी पार केल्यावर मुख्य रस्ता लागणर होता. खाली आलो, तर नदीत प्रवाह ! मग परत उतार पाहून नदी (अर्थात लेहच्या भाषेत नाला) पार केला. आणि मुख्य रस्त्यावर येऊन थांबलो. तितक्यात ती दुसरी गाडी आली. त्यातील लोकांनी खूप आनंदाने टाळ्या वाजवून थंब्स अप दिले.

चला मै जंहा ले चला मुझे रस्ता !

वरच्या फोटोत मुख्य रस्त्याच्या बाजूला एक आणखी ट्रॅक गेलेला दिसतोय ना, तो मी घेतलेला ट्रॅक !. जायच्या आधी फोटो काढून घेतला. Happy

ला उतरल्यावर लगेच इथेच गाटा लुप्स लागतात. हे २१ लुप्स आहेत. ज्यात आपण २००० फुट खाली उतरतो (मनाली कडे येताना) किंवा चढतो. आज आम्हाला भरपूर सायकलिस्ट भेटले. प्रत्येकाला थंब्स अप करून आणि मला त्यांच्या जागी इमॅजिन करून मी प्रत्येकाचे निरोप घेतले. अनेक एकेकट्या फॉरेनर स्त्रिया देखील होत्या.

पुढे मग बारालाचाला (परत एकदा १६००० फुट) पार केला आणि खाली उतरायला सुरू केले. तिथून दिसणारी काही दृष्य

बारलाचा ला च्या आधी किलिंग सराय नावाचे गाव येते आणि तो पार केल्यावर सुरज ताल येतो. आता त्सो जाऊन 'ताल' यायल सुरूवात झाली. हळू हळू आम्ही हिमाचल प्रदेशात प्रवेश करत असल्याची जाणीव झाली. अर्थात हिमाचल अजून लांब आहे.

ह्या मंदीरापाशी हिमाचल प्रदेश मध्ये आपण प्रवेश करतो. इथे एक चौकी आहे. तिथे गाडीची नोंदनी करावी लागते.

वाटेत सर्चू आणि पांग इथे टेन्ट्स आहेत. इथे झोपायची सोय होऊ शकते. खूप लोकं मनाली ते सर्चू आणि सर्चू ते लेह असा प्रवास ब्रेक करतात. सर्चूची उंची ४००० मिटर्स आहे त्यामुळे इथे AMS येऊ शकतो. त्यापेक्षा मनाली वरून येताना मनाली ते जिस्पा किंवा केलाँग हा पहिला दिवस आणि केलाँग / जिस्पा ते लेह असा दुसरा दिवस ठेवावा. फक्त दुसरे दिवशी सकाळी ५ ला निघावे लागेल कारण हे अंतर खूप लांब आहे.

पांगला जेवताना दोरजे म्हणत होता की त्याच्या कझिनचे लग्न जवळच आले आहे तर आजची रात्र केलाँगला काढण्याऐवजी मनालीला जायचे का? तेंव्हा दिड एक वाजला असल्यामुळे मलाही वाटले की चला आपण "कॅनन बॉल रन" करूयात. ( ही टर्म डोरजेची नाही, तर जे लोकं लेह-मनालीचा रस्ता एक रात्रीचा मुक्काम न करता जाता पार करतात त्याला कॅनन बॉल रन म्हणतात). पण आम्ही जसे जसे पुढे जाऊ लागलो तसे तसे मी त्यावर विचार करू लागलो. जिस्पा आले आणि आम्ही हिमाचल मध्ये आलो. आम्ही पुढे केलाँग पर्यंत जाऊ अन चहा पिऊ असे विचार करून पुढे निघालो. इथे चहा पिताना मी ठाम विचार केला की आज रोहतांग पार करायचा नाही. इथे मी पोलिस आणि काही टॅक्सी ड्रायव्हर जे तिकडून इकडे आले त्यांना विचारले की रोहतांग कसा आहे? तर त्या सर्वांनी बहोत धूंद है पर आप उधरसे आये तो तो निकालोगे असे उत्तर दिले. तर पोलिसाने मात्र, काय गडबड आहे भाऊ, झोपा इथेच असे उत्तर दिले. आम्ही अजूनही हो की नाही स्टेज मध्ये पुढे निघालो.

चहा पिताना एक गडबड झाली. केलाँगला भागा नदी आहे. तिचे रौद्र रूप इथे बघायला मिळेल. तर टपरीपाशी मी गाडीचा हॅन्ड ब्रेक लावला आणि मी पुढच्या चाकाला दगड आपोआप लागेल अशी गाडी ठेवली होती. मला गाडी गिअर मध्ये ठेवायची अजिबात सवय नाही. आम्ही चहा पितोय, तर थोड्या उतारामुळे गाडी पुढे "भागाची" भेट घ्यायला पुढे निघाली ! हळूहळु गाडी पुढे सरकू लागली. लोकं ओरडले, मी चहा टाकून पुढे गेलो आणि झटकन अनलॉक करून गाडीत बसलो व ब्रेक्स मारले. आणि रिव्हर्स मध्ये घेऊन गाडी दुसरी कडे ठेवली. हे कसे झाले? ब्रेक तर मारला होता. तर अचानक काय झाले असावे. कॅन यु इमॅजीन, टपरीवालीने गाडीच्या चाका खालचा दगड उचलून टपरीत नेला !!

केलाँग आणि जिस्पा हेच मुळी व्हेकेशन पाँईट होऊ शकतात. ते मनाली पासून अंतराने दुर नाहीत पण मध्ये उभा आहे रोहतांग! रोहतांग जोट इज अ डिफरंट बॉल गेम. पटनीटॉप सारखेच इथेही गाढ धुके असते. फरक इतकाच की ते धुके भर दिवसा ११ वाजताही असू शकते. आणि डोरजे रात्रीच मनाली गाठू म्हणत होता. गाठता आले असते पण मग मी रस्त्यावर एका तिकडून येणार्‍या बसवाल्याला थांबवले आणि तो म्हणाला की नका जाऊ. हो नाही असे करत आम्ही टंडीला आलो. टंडीच्य पंपापाशी एक बुलेट रायर्डर्सचा ग्रूप होता. त्यांनाही विचारले तर ते काल रात्री तिथे अडकले. त्यांनी माझीच पटनीटॉपची स्टोरी रिपीट केली आणि सांगीतलं की वर तुफान पाऊस होता त्यामुळे ते पूर्ण भिजले आणि रिकव्हरीसाठी आजही टंडी सोडलेच नाही. मग ऑलमोस्ट शिक्कामोर्तब झाले की आता डोरजेला नाही सांगायचे. पण इतर दोघे तिघेही जाऊ असेच म्हणत होते आणि ऑलमोस्ट मग वाद होण्याच्या स्थितीवर गाडी आली, मी उतरलो , " There is difference is braveness and stupidity,! हवं असल्यास तुम्ही जा मी अलिकडेच रात्र काढेन" शिवाय वर पाऊस होता. रोहतांग जोट हा खूप खराब आहे. तेथे चिखल, ग्रेव्हल सगळं असतं आणि त्यातून गाडी चालवयची व उजेड नाही अन धुके. खोकसार पर्यंत जाऊ असे ठरले पण आधीच थांबलो. ते गाव होते सिसू ! सिसूलाच ते दोन मराठी मध्यमवयीन बायकर्स भेटले, ज्यांचा उल्लेख मी एका भागात केला आहे. रात्री जेवून तिथेच थांबलो.

सकाळी निघून रोहतांग पार केला. रोहतांग वर आलो की एकदम खडकवासल्या सारखी किंवा चौपाटी सारखी गर्दी दिसते. प्लेन्स मधून मनालीला येणारं सर्व पब्लिक रोहतांग पर्यंत येतचं. त्यांची ही गर्दी! वर मस्त चहा, भुट्टे, गाणी असा माहौल असतो खुद्द रोहतांग पार करायला अवघड नाही पण पार करता करता दम निघतो कारण चिखलातून गाडी चालवावी लागते. खूप गर्दी असते आणि मध्येच मोठ मोठे दगडं तुमची वाट पाहातात. इथे नेहमीच धुके आणि पाऊस असू शकतो. पण वरनं दिसणारे दृष्य अफलातून! आता हिमालय ग्रे नसतो तर परत हिरवा होतो. सकाळी ९:३० ला ही धुके होते. रात्री तर हालच झाले असते.

येथील एक धबधबा.

आणि परत डोंगरातून रस्ता काढणे सुरू.

येत्या काही वर्षात रोहतांग पार करावाच लागणार नाही कारण सिसू पर्यंत एक टनेल होत आहे. ज्याने बहुदा ४० किमी वाचतील.

सोलो व्हेकेशन बिगन्स !

आम्ही साधारण ११ च्या आसपास मनालीला पोचलो. इथे माझ्या आणि मित्रांच्या वाटा वेगळ्या होणार होत्या. त्यांना चंडिंगडवरनं दुसर्‍या दिवशी ट्रेन होती त्यामुळे त्यांनी मनाली मध्ये राहणे पसंद केले. पण केवळ दुपार झाल्यामुळे मी मनालीत न थांबता त्यांच्या निरोप घेऊन पुढे निघालो.

माझा मनाली ते पुणे राऊट - अजून मला २११५ किमी प्रवास करून पुणे गाठायचे होते !

manali_pune.JPG

२१०० किमी अंतर कापायचे असल्यामुळे मग उगाच टंगळमंगळ न करता पुढे निघालो. पुण्याला जायला दोन रस्ते लागतात. एक NH8 जो गुजराथ मधून जातो, दुसरा NH79 जो मध्य प्रदेश मधून जातो. मला दिल्ली येईपर्यत तो निर्णय घ्यायचा होता आणि दिल्ली मनाली पासून ६०० किमी असल्यामुळे निर्णय घ्यायला माझ्याकडे खूप वेळ होता. दोन्ही रस्ते चंडिगड वरून एनीवे जाणार होतेच. त्यामुळे मी निदान आज सध्यांकाळ पर्यंत ३०० किमीवरील चंडिगड गाठू असा विचार केला.

मनाली वरून कुलू कडे निघालो. कुलू शहर पण खूप सुंदर आहे. पण लडाख समोर कुलू वगैरे मध्ये थांबन्याची इच्छा नव्हती.

बियास तिरी वसलेले कुलू !

पुढे बिलासपूर पर्यंत हिमालयच आहे आणि सगळा रस्ता नागमोडी, त्यामूळे वेळ लागत होता. शिवाय मध्ये निदान ११,३७२ ट्रक तरी लागले. त्या सर्वांना ओव्हरटेक करू करू बोअर होत होते. सिव्हिलाईज वल्डची सवय राहिली नव्हती. पुढे मैलोनमैल कोणीही बघायची सवय लागल्यामूळे गाड्यांची ट्रॅफिक जेंव्हा रोहतांगला सुरू झाली तेंव्हा कंटाळा आला होता.

दुसरेदिवशी एक तर इंदोर किंवा उदयपूर (त्या त्या मार्गाप्रमाणे) गाठायचा विचार केला आणि रात्री चंडिगड गाठले आणि झोपलो. हा दिल्ली चंडिगड रस्ता पण खूप चांगला आहे. मैलोनमैल सरळ रस्ता आणि मध्ये चांगले ढाबे पण. चंडिगड - पंजाब - हरयाना भागात एक अपस्केल ढाबा चेन आहे. हवेली. हवेली मध्ये मस्त नाष्ता करून ग्रँट ट्रँक रोड घेऊन पुढे आलो. वाटेत पानिपत लागते.

पानिपतला मला खूप दिवसांपासून जायचे होते त्यामुळे गावात शिरलो. इथे काही लोकांना मराठा वॉर मेमोरियल कुठे आहे हे विचारले. तर कोणीही नीट सांगेना. कारण कोणालाच माहिती नव्हते. मग एका पोलिसाने मला सांगीतले की काला आम्ब नावाच्या ठिकाणी जा. काला आम्ब ला जाण्यासाठी पानिपत गावात जायचे आणि (हायवे वरून उतरल्यावर) पहिला डावा टर्न घ्यायचा. ४ किमी गेल्यावर ( जिथे आपल्याला डेहराडून बायपास लागतो) तिथून पुढे २ किमी जायचे जायचे आणि परत डावीकडे वळायचे. इथे साधारण २ किमी गेल्यावर रस्ताच संपतो आणि गेट लागते. ते गेट म्हणजेच वॉर मेमोरियल !

Panipat.jpg

इथे अक्षरक्षः काही नाही ये. तीन तीन मोठे युद्ध पाहिलेल्या जागी (आणि ज्याने भारताचा पुढचा इतिहासच बदलला अश्या जागी) निदान मला एखाद्या म्युझियमची अपेक्षा होती. पण इतर प्रत्येक ऐतीहासिक जागी जसा अपेक्षाभंग होतो तसाच झाला. आणि मी तिथून पुढे राजधानीत निघालो.

राजधानी येण्या अगोदर जयपूर बायपास आहे पण इथे येईपर्यंत मला उगाच "यमुना" वरून जायची इच्छा होऊ लागली आणि मी जयपूर करण्यापेक्षा आग्रा करू हा विचार घेऊन गाडी दिल्लीत नेली. फरिदाबाद कडे जायचे असल्यामुळे तसाही पर्याय नव्हता. दिल्लीची ट्रॅफिक अतिशय बेकार आहे. गाडीतिल जी पी एस ने मला राजमार्ग ते इडिंयागेट ते लाल किला असे सर्व फिरविले आणि मी अधिकाधिक बोअर होऊ लागलो. शेवटी फरिदाबाद आले आणि मी आग्र्याच्या रस्त्याला लागलो. ( दिल्ली आग्रा म्हणजेच यमुना एक्सप्रेसवे)

इथे टोल भरून पुढे आलो आणि साधारण १० एक किमी नंतर मला वाटले की आपण जर इंदोरच्या रस्त्यावर गेलो आणि तिथे बांधकाम चालू असले किंवा रस्ता खराब असला तर? ताजमहाल नंतर बघू असा विचार करून मी येणारा पुढचा एक्झिट घेतला आणि वापस निघालो. पण यमुना पाहण्यात आला ! मग परत GPS मध्ये जयपूर टाकले. हरयानातील कूठल्याश्या स्टेट रोड ने निघालो, कारण मी NH8 आधीच सोडला होता. आता NH8 कुठेतरी गाठणे भाग होते. मग GPS नेईल तसे ६५ एक किमी गेलो आणि NH8 ला लागलो. ऑस्सम ! आता येथून पुढचा रस्ता माहित होताच कारण येताना उदयपूर हून आलो होतो. होता होता जयपूर यायला सध्यांकाळ झाली. ( मी उगाच दिल्ली मध्ये शिरलो आणि यमुनाकडे गेलो, ह्यात आणखी १५० किमी अ‍ॅड झाले शिवाय ४ एक तास वेळ वाया गेला).

जयपूर बायपास आपल्याला आमेर ह्या गावी नेऊन सोडतो. (अंबर) तिथून जयपूर सिटी केवळ ६ किमी आहे. इथेच आमेर पॅलेस नावाचा खूप प्रसिद्ध राजवाडा आहे. पॅलेस पाहायला ऑलमोस्ट अर्धा दिवस लागतो आणि रात्री लेझर लाईट शो पण असतो. मी साधारण संध्याकाळी साडेसात वाजता पॅलेस पाशी होतो पण रात्रीचा लाईट शो पाहायला बॉडी ने नकार दिला.

हे चित्र मी ऑलमोस्ट संध्याकाळी ७:४० च्या काढलेले आहे. हाच तो पॅलेस.

आमेर पॅलेस मध्येच शिश महलही आहे. पण तो पाहायची फारशी इच्छा उरली नव्हती. अबंर मध्ये असे म्हणले जाते की येथील देवळं प्रत्येक दिवशी एक असे पाहायला सुरू केले तरी सर्व देवळं पाहायला किमान ३ वर्षे लागतील ! अंबर मध्येच रात्री एका पॅलेशियल हॉटेल मध्ये राहिलो. २२०० रू मध्ये चांगली रूम मिळाली. आणि जेवण ही. दुसरे दिवशी उठून जयपूर मध्ये गेलो. तिथे दोन चार टूरिस्टी जागा पाहिल्या आणि पुढे निघालो.

हवा महल !

येथील सिटी पॅलेस व इतर जागा देखील पाहिल्या. पूर्ण सिटी खरोखरच पिंक सिटी आहे. सिटी पॅलेस मध्ये शाळा पण आहे. आणि आत्ता असणारे वंशज हे सिटी पॅलेस मधील एका भागात राहतात.

आज विचार केला की जयपूर ते पुणे गाठावे. जयपूर नंतर जेंव्हा किशनगड येते तेंव्हा NH8 ऐवजी Nh79 घ्या कारण तो रस्ता खूप चांगला आहे. भिलवाडा, चित्तोडगड आणि मग उदयपूर असा तो रस्ता आहे. उदयपूरला परत आपण Nh08 ला लागतो.

मी तसा ऑन ट्रॅक होतो. पण भरूच आले आणि परत एकदा भरूच टोल नाक्याच्या आधिच्या १९,८९० कार आणि ट्रकच्या ट्रॅफिक जाम मध्ये अडकलो. इथे तीन तास अडकून होतो. तीन तासांनंतर अर्धा एक किमी समोर गेलो आणि हाय वे एक्झिट घेतला व भरूच गावात जाऊन जेवण केले.ऑलमोस्ट संध्याकाळचे ८ वाजले होते. इथून पुढे मग टोल नाक्याला न जाता भरूच-अकंलेश्वर रस्ता घेऊन टोल नाका चुकवून परत NH8 लागलो. आणि अहबदाबाद , वडोदरा वगैर पार करून कडोदरा ह्या गावी आलो. खरे तर येथून जर जोरात गेलो असतो तर केवळ ५ तासात घर आले असते. एकटाच असल्यामुळे अनेक जाम्स लागूनही ( दिल्ली / भरूच इत्यादी) मी तसा जोरातच जात होतो. पण मग प्रज्ञाचा फोन आला की रात्री जर ट्रॅव्हल करून आलास तर घरात घेणार नाही! मग तिथेही घेतले नसतेच तर इथेच तंबू टाकू म्हणून कडोदराला राहिलो आणि सकाळी उठून मग पुण्याला निघालो.

भारताच्या नवीन रक्तवाहिन्या - मी देशात वापस आल्यापासून पार कर्नाटक - आंध्रा ते काश्मिर पर्यंत माझ्यागाडीने स्वतः ड्राईव्ह केले आहे. पूर्ण रस्ते आता कात टाकत आहे. (दुर्दैवाने महाराष्ट्रातील रस्ते फारच खराब आहेत). येत्या १० एक वर्षात अनेक दु पदरी महामर्ग तीन पदरी करायच्या योजना पण आहेत. हा खालचा रस्ता आहे गुजरात मधील.

डहाणू - ठाणे रस्ता त्या दिवशी असा दिसत होता.

मी ठाण्यात लवकर आलो पण पुढे एक्सप्रेस वे च्या आधीच्या १० किमीची जी काही दशा झाली आहे तिने पुढे खूप उशीर झाला.

आज यामिनीचा वाढदिवसही होता म्हणून मला आज पुण्यात पोचायचेच होते ! २४०० किमी एकट्याने प्रवास केल्यावर शेवटी मला पुण्यात यायला दुपारचे तीन वाजले.

इटस व्हेरी नाईस टू गो ट्रॅव्हलिंग - फ्रँक सिनाट्राi

It's very nice to go trav'ling
To Paris, London and Rome
It's oh, so nice to go trav'ling
But it's so much nicer
Yes, it's so much nicer to come home

हा प्रवास संपला. गाडीने मला खूपच चांगली साथ दिली. केवळ दोन तीन वेळाच त्रास झाला. एकदा खार्दूंगलाला जेंव्हा BRO ने जाऊ द्यायला सुरवात केली तेंव्हा दुसर्‍या गाड्यांना जाता यावे म्हणून मी खूप डावीकडे (दरीकडे ) घेतली. माझी जायची वेळ आली तेंव्हा गाडी पुढेच जात नव्हती ! मग अजून एकदा ट्राय केला तर फर्स्ट मध्ये असूनही चाक गोल फिरले. कारण मी जिथे थांबलो तिथे दुपारनंतर पाणी येते आणि खालचे दगडं सगळे गोल गोल झाले होते त्यामुळे ट्रॅक्शन मिळत नव्हते. शिवाय मी रिव्हर्स आणली होती त्यामुळे पुढच्या चाकाखाली एक मोठा दगड आहे नीट दिसले नाही. दोनदा ती फर्स्ट मध्ये असतानाही पुढे जायच्या ऐवजी पाठीमागे गेली आणि दरीकडे सरकली. माझ्या सोबतचे मित्र घाबरून गाडीतूनच उतरले होते. बट आल वॉज वेल कारण माझं डोकं गाडी दरीकडे खेचली जातीये हा विचार न करता पुढे कसे नेता येईल हा विचार करत होते. हाफ क्लच मध्ये दोन तीन ट्राय केल्यावर निघाली ! असे एक दोनदा पॉवर लॉस झाला तेवढेच. ह्या प्रयत्नात गाडीच्या अण्डर बेली कव्हरला मात्र मार लागला कारण खाली मोठा दगड होता आणि एक छिद्र पडले. पण ते प्लास्टिक कव्हर होते, जे नंतर मी किरातपूरला महिंद्रा वर्कशॉप (मनाली चंडिगड रस्ता) दिसल्यावर बदलून देखील घेतले. ज्यात केवळ १५०० रू गेले. पण तेवढेच!

ह्या पूर्ण प्रवासानंतर गाडी आणि मी एकमेकांना चांगले ओळखू लागलो आहोत ! तिचा आणि माझा हिमालयातील हा शेवटचा प्रवास असणार नाही हे नक्की ! सो लाँग !

भाग एक
भाग दोन
भाग तीन
भाग चार
भाग पाच
भाग सहा
भाग सात
भाग आठ

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

केदार ,मराठीत लिहिलेस त्याबद्दल धन्यवाद .इतके विस्तृत travelogue प्रवासवर्णन मराठीत हाताच्या बोटावर मोजता येतील .असे पण इंग्रजीत आहेत ते सर्व आपापल्या देशांतील प्रवाशांना उपयुक्त असे लिहितात .दर दहा वर्षांनी नवे करावे लागते .वाहने ,रोड ,भौगोलिक परिस्थिती आणि उपकरणे बदलतात .एक प्रश्न : भारतासाठी नोकिआचे 'HERE MAPS' ( Lumia phone मधले) फार चांगले आहेत असे वाचले आहे त्याचा काही अनुभव ?( जिथे जायचे असेल ते नकाशे अगोदरच फोनमध्ये साठवायचे आणि नंतर तिकडे रेंजची जरूरी नाही फक्त GPS वर टन बाइ टन सूचना मिळतात .!

केदार, पूर्ण लेखमाला आवडली. अगदी सविस्तर वर्णन केलं आहेस. फोटोही सुरेख आहेत. नविन जाणार्‍यांना मार्गदर्शन करण्यार्‍या बर्‍याच गोष्टीही आहेत. एकूणात एक परिपूर्ण प्रवासवर्णन आहे आणि तेही मराठीत. वाचुन मजा आली.. तुझ्या बरोबरच संपूर्ण प्रवास अनुभवल्याचे समाधान मिळाले.. Happy

सुरेख! मजा आली... सगळे भाग वाचले.. जणू आपणच जाऊन आलो इतकं प्रभावशाली लेखन आहे.
अवांतर - XUV माझी आवडती गाडी आहे.. भारतात परतलो कि घ्यायचा मानस आहे.. गाडीचं माईलेज किती आहे सर्वसाधारणपणे..

सर्वच लेख व फोटो...अप्रतिम...प्रत्येक गोष्टिंचे इतके डिटेल्स लिहिले आहेत..व्वा..हि टिपण कधि त्या त्या दिवशि रात्रि करत होतात का?.माझे ड्रायव्हिंग व्हेकेशन च्या एवजि आमचे ड्रायव्हिंग व्हेकेशन झाले.

अतिशय सुंदर प्रवासमय वर्णन..छायाचित्रेही तितकीच डोळ्यांना सुखावणारी..मागील काही दिवस अतिशय अधिरतेने तुमच्या लेह-लडाख भटकंतीचे भाग वाचून काढले..

मस्त लेखमालिका.

ओळखीतल्या बर्‍याच जणांनी लडाख ट्रीप केली आहे. बाईकवर /कार घेवून पण इतक्या चांगल्या प्रकारे कधीच कुणी प्रवासाच्या आठवणी सांगितल्या नव्हत्या. अगदी माझ्या भावाने दोन वेळा (एकदा दिल्लीहून बाईकवर आणि एकदा चंदीगढहून त्याच्या कारने ) लदाख ट्रीप करुनही इतकं सांगितलं नव्हतं. त्यामूळे फोटो वैगरे बघून कधीतरी एकदा जावून यायला पाहिजे इतपतच वाटायचं. पण आता तुझी प्रवासवर्णनं वाचल्यावर पुढच्य जुनच्या सुट्ट्यांमधली आमची नेहेमीची औरंगाबाद ट्रीप कँसल करुन लदाखसाठी प्लानिंग करायचंय.

तू प्लिज ही प्रवासवर्णनं इंग्रजीत पण लिही रे. म्हणजे मला नवर्‍याला वाचायला देता येतिल. Happy

खुप खुप अभिनंदन केदार! इतकी चोख आणि सगळ्या calculated risks सकट सुरक्षित ट्रीप करून आल्याबद्दल. आमच्यासाठी पण अतिशय आनंददायी होता हा सगळा प्रवास. ह्या भागात तुलनेने मोठं अंतर आणि जास्त दिवस कव्हर झालेयत पण तरीही वर्णन एकदम सुरस उतरलंय. भाग अगदी संपवता संपवता अंगावर काटा उभा राहण्यासारखा प्रसंग लिहिलात म्हणजे आमची उत्सुकता टिकवून ठेवण्याची हातोटी पण चांगली साधलीये आता तुम्हाला Happy
मलाही टिपणांबद्दल विचारायचं होतं. काय काय घडेल ते रोजच्या रोज थोडक्यात लिहित होता का? डायरी वगैरे? नाहीतर इतके सगळे तपशील लक्षात राहणं अवघड आहे.
असेच भरपुर फिरा आणि नियमीत लिहीत रहा.

फारच आवडली तुमची सफरगाथा.
फोटो बघून डोळे निवले अगदी.

मालिका पटकन संपली असे वाटले. अजून वाचायला आवडले असते. (नंतर संपवायची घाई केली का?:-))

खल्लास .. आपण फॅन झालो तुझा ....लै भारी ट्रिप केलीस .. असही लेह-लडाख म्हटलं की रक्त उसळ्या मारायला लागत.. त्यात ही अशी मालिका वाचली की जास्तच... बघु पुढच्या भारत वारीत अशी एखादी ट्रिप करायला आवडेल मला पण.

सर्वांनाच धन्यवाद. Happy

(नंतर संपवायची घाई केली का >> नाही. नंतरचे तीन दिवस परत एकदा प्लेन्स मधलेच होते त्यामुळे त्या विशेष लिहिण्यासारखे काही नव्हते. Happy

मी कधीही टिपनं काढली नाहीत. ( रोजच्या रोज डायरी वगैरे प्रकरणं मला खरच अजून करता आले नाहीत.) एकदा लिहायचा दिवस ठरवल्यावर ते सर्व आपोआप आठवत होतं.

इंग्रजीत देखील लिहायचे आहेच.

HERE MAPS' ( Lumia phone मधले) फार चांगले आहेत असे वाचले आहे त्याचा काही अनुभव ?( जिथे जायचे असेल ते नकाशे अगोदरच फोनमध्ये साठवायचे आणि नंतर तिकडे रेंजची जरूरी नाही फक्त GPS वर टन बाइ टन सूचना मिळतात . >>>

हो करू शकता. तुम्ही ( आणि इतर आयफोन / अ‍ॅन्ड्रॉइड वालेही) Nav free इंडियाचे अ‍ॅप डाऊनलोड करू शकता ज्यात हे सर्व ट्रॅक्स ऑलरेडी आहेत. शिवाय तुम्ही स्वतःचा ट्रॅक रेकॉर्ड देखील करू शकता. मी नोकियाधारक नसल्यामुळे here maps बद्दल माहिती नाही पण असे दिसते की नॅव्ह फ्री इंडियासारखेच हे आहे.

भारतात परतलो कि घ्यायचा मानस आहे.. गाडीचं माईलेज किती आहे सर्वसाधारणपणे.. >>> अ‍ॅडव्हरटाईज्ड मायलेज ११ आहे पण मला मिक्स मध्ये साधारण १२.५० तर हायवे वर १४ ( एसी सहीत) मिळते. घ्या. Happy

ज्यांनी लडाखला जायची इच्छा व्यक्त केली आहे त्यांच्यासाठी - तुम्ही ही ट्रीप करायलाच हवी ! पिरिएड. खूप सुंदर आहे लडाख. आणि जर स्वतः ड्राईव्ह करणार असाल तर त्याहून मस्त.

गंधर्व / सह्याद्री आणि इतर ट्रेकर्स साठी - तिथे ट्रेकिंगसाठी जायला पाहिजे. काही प्रसिद्ध ट्रेक.

१. नान / कुन पिक्स
२. चद्दर ट्रेक
३. स्टोक कांगरी
४.कांजी झांगला

चद्दर ट्रेक हा फ्रोझन झंस्कार वर केला जातो. चद्दरची माहिती इथे मिळेल. http://www.chadartrek.com/

सुंदर लेखमाला. खुप आवडली. काही भाग तर चक्क त्या त्या ठिकाणी असताना वाचले. Happy

लडाख खरंच खुप सुंदर. आयुष्यात एकदातरी जायलाच पाहिजे असे. फक्त हाताशी वेळ भरपुर हवा.

सुरेख झाली पुर्ण लेखमाला !!!!

जयपुर च्या आमेर फोर्ट मधला साउंड & लाइट शो फार बघण्या सारखा आहे. फेब.१३ मधे एका कॉन्फरन्स साठी गेले होते. तेंव्हा दोन्ही रात्री एकदा इंग्लिश मधे आणि एकदा हिंदीत पाहिला. सुदैवाने पौर्णिमेची रात्र होती. फार अप्रतिम अनुभव.....

आता परत जाल तेंव्हा चुकवु नका.....

एकंदर प्रवासाचे पल्ले वाचुन चक्रावुन जायला झालं......

शेवटचे दोन्ही भाग वाचून काढले. आम्हीही मनाने तुझ्याबरोबर गाडीतच होतो. खूप मजा आली वाचायला.

एकदम मस्त Happy
पुढ्च्या ट्रीप मध्ये (अगदी कुठेही) तुमच्याबरोबर यायला मिळालं (सगळा व्याप संभाळुन) तर लै मज्जा येइल राव Wink
आता नुसता तथास्तु म्हणा Happy

<<तिचा आणि माझा हिमालयातील हा शेवटचा प्रवास असणार नाही हे नक्की ! सो लाँग !>> Happy

आणि आम्हालाही नवीन लेख-मालिका वाचायला मिळेल....

सुरेख
गेले २ आठवडे आपल्या लिखाणामुळे सर्वांना ट्रीपचा आनंद घरबसल्या (वा जीभ चाउन ऑफिस बसल्या) अनुभवता आला.

अप्रतिम 'लेह'मालिका Happy

सगळे भाग सलग वाचले आणि पुन:प्रत्ययाचा आनंद घेतला. मस्तच

आमेर पॅलेसचा प्रचि खुपच सुंदर!

पंजाब - हरयाना भागात एक अपस्केल ढाबा चेन आहे. हवेली > सहीच. हवेलीत घंटा वाजवून आम्ही फूल सर्किटचा समारोप केला.

Pages