सह्याद्रीचा सर्वांगसुंदर अविष्कार.....विश्रामगड - मानगड

Submitted by सह्याद्रीमित्र on 8 August, 2013 - 02:41

सात वाजत आले होते. मुळशीच्या हिरवाईने बहरलेल्या आसमंतामुळे म्हणा किंवा हवेच्या सुखद गारव्यामुळे,"सह्याद्री एक्स्प्रेस" आज पंख फुटल्यासारखी धावत होती. आजच्या या पावसाळी सफरीचे भिडू आम्ही दोघंच,मी आणि देवेश. पण आज आम्ही सह्याद्रीतल्या दोन नितांत सुंदर आणि पावसाळ्यातला स्वर्ग मानल्या गेलेल्या विश्रामगड आणि मानगड या रायगड जिल्ह्यातल्या भिडूंना भेटायला निघालो होतो. देवेशला पहाटे साडेचार वाजता अलार्म कॉलचा फोन करतानाच आमच्या संतोषगड - वारुगड ट्रेकचा अनुभव लक्षात ठेवून "अंघोळीत वेळ घालवून उशीर केलास तर ****** " असली धमकीच दिल्याने त्या बिचा-यानेही पावसातच भिजू हे कारण पुढे करत त्या पवित्र गोष्टीवर "पाणी सोडलं होतं !!!" त्यामुळे आम्ही वेळेवर निघण्याला कारणीभूत असलेली ही एक अतिशय महत्वाची गोष्ट होती (मी मात्र मुलगी बघायला निघाल्यासारखा चाललो होतो !!). ताम्हीणीत पूर्वेकडे उसळलेला ढगांचा समुद्र,त्यातून डोकं वर काढणारे घनगड आणि तैलबैला आणि डावीकडे जमलेल्या धबधब्यांच्या रांगा हे दृष्य म्हणजे आम्ही योग्य महुर्त साधल्याची निसर्गाने दिलेली पावतीच होती.मग विळे फाट्याला पोहोचेपर्यंत पुण्यात सुमार चवीचे वडापाव आणि मिसळ कुठे मिळतात… लोक मिसळ देताना कसा माज करतात… त्यात तोंड वर करून ग्राहकच कसे चुकीचे असतात यावर आमच्यात अगदी मन लावून चर्चा सुरु होती. जगातले सगळेच लोक दुस-यात चांगलं काय हे बघतात. नावं ठेवण्याचं डिपार्टमेंट पण कोणीतरी सांभाळायला हवं असल्याने आम्हा पुण्याच्या लोकांना मिळालेली ही दैवी देणगी आहे !!!

विश्रामगड या नावाचे महाराष्ट्रात दोन किल्ले आहेत. एक आहे तो नाशिक जिल्ह्यातला पट्टा उर्फ विश्रामगड आणि दुसरा हा प्रस्तुतचा रायगड जिल्ह्यातला कुर्डूगड उर्फ विश्रामगड. विश्रामगडला पुण्याहून जाण्यासाठी ताम्हिणी मार्गे माणगावच्या रस्त्याला लागायचं. या रस्त्यावरच डावीकडे शिरवली फाटा असून तिथून आत वळालं की टिटवे,कडापे,जिते मार्गे जाणारा रस्ता उंबर्डी या विश्रामगड पायथ्याच्या गावात येउन थांबला आहे . तशी याच वाटेवरच्या जिते मधूनही एक वाट विश्रामगडावर गेली आहे. पण ती वाट लांबची आणि दमछाक करणारी असल्याने उंबर्डीची वाट जास्त सोयीस्कर आहे. मुंबईकडून विश्रामगडला यायचं झाल्यास मुंबई - गोवा हायवे वरच्या माणगावला पोहोचायचं. माणगाव - निजामपूर या रस्त्याने ताम्हिणीकडे जातानाच उजवीकडे हा शिरवली फाटा लागतो. तिथून आत वळायचं आणि अर्ध्या - पाउण तासात उंबर्डी गाठायचं. शिरवली फाट्यावर उभ्या असलेल्या एका म्हातारबुवांनी आम्ही उंबर्डीचा रस्ता विचारल्यावर "मंगळावर जाण्यासाठी एस. टी. कुठून मिळेल " असला प्रश्न विचारल्यासारखा चेहेरा केला. "काय काम हाये गावात ??" आजोबा. "कुर्डूपेठेला जायचंय". "पोलिओचा डोस द्यायला आलाय काय ??" विश्रामगड आणि पोलिओ डोसचा काय संबंध तेच आम्हाला कळेना. "आरं आज पोलिओ रविवार ना. मला वाटलं तुमी डाक्टर हाये." आता आमच्या अवताराकडे बघून आम्हाला डॉक्टर म्हणणं म्हणजे हातगाडीला शॉपिंग मॉल म्हणण्यासारखं होतं !!! शेवटी त्यांच्या हो ला हो म्हणून त्यांनी बोट दाखवलेल्या दिशेकडे आम्ही गाडीची चाकं वळवली.थोडया वेळाने विश्रामगडाचं उंचावलेलं बोट एका डोंगराच्या आडून नजरेस पडलं.कडापे,शिरवली,टिटवे,जिते ही गावं मागे पडायला लागली होती. उंबर्डी जवळ येत चाललं होतं. आमच्या गप्पाटप्पा सुरूच होत्या. आम्ही गावात पोहोचणार इतक्यात उंबर्डीच्या अलीकडे एका ओढयावर आम्हाला मोठमोठ्यानी बोलण्याचे आवाज ऐकू येऊ लागले. आवाजाचा हेल नक्कीच गावातला नव्हता. पुढे जाऊन बघतो तर त्या ओढयात एक आय २० गाडी फसलेली होती आणि "ट्रीप" विभागातले उमेदवार असलेले दोन तरुण आणि तीन तरुणी जीव खाऊन ती बाहेर काढायच्या प्रयत्नात होते. आमच्याकडे बघून का कोण जाणे पण हात दाखवून त्यांनी आम्हाला थांबवलं आणि आपल्या रथाचं चाक जमिनीत कसं रुतलं याचा सगळा इतिहास कथन केला.पुण्याहून कुठेतरी टाईमपास करायचा म्हणून बाहेर पडलेल्या या अजाण बालकांनी हा आडवाटेचा रस्ता धरला होता आणि स्वत:चीच दुर्दशा करून घेतली होती. "Will you please help us ??? its not the easy job and we don't know anybody around here " त्यातल्याच एका सुबक ठेंगणीने आमच्याकडे अगदी अगतिक चेहेरा करून पाहत विचारलं. आता माहित नसलेल्या रस्त्यावर उगाच कशाला आपली आय (२०) घालायची असा प्रश्न मला पडला इतकंच !!! पुढच्या गावात कळवतो असं सांगून त्यांना दशांग दंडवत घालत त्यांचा निरोप घेतला आणि पंधरा मिनिटात उंबर्डीत येउन दाखल झालो. उंबर्डी हे विश्रामगड पायथ्याचं नितांत सुंदर गाव. हिरवळीने बहरलेलं आणि निसर्गाने सजलेलं. टिपिकल कोकणाचा फील देणारं उंबर्डी !!! राम हळदेंच्या घरासमोर गाडी लावताच "काय गडावर का ?? " अशी हाक आली आणि आमचा होकार येताच वाफाळत्या चहाचे दोन कपही आमच्या हातात येउन स्थिरावले !!! "दहा - पंधरा मिनिटं थांबा. माझी मुलं कुर्डूपेठेत पोलिओ डोस द्यायला जातायेत. तेवढीच तुम्हाला सोबत होईल. " लैच झ्याक !!! विश्रामगडाची पायवाट शोधायचा त्रास विनासायास वाचला होता.

उंबर्डी गावात जातानाचे एक वळण

उंबर्डी गावाबाहेरील भग्न हेमाडपंथी शिवमंदिर आणि मागे विश्रामगड

हेमाडपंथी शिवमंदिर… क्लोजअप

राम हळदेंची दोन मुलं राकेश आणि ज्ञानेश्वर या दोघांची सोबत आम्हाला आता कुर्डूपेठेपर्यंत लाभणार होती. वास्तविक उंबर्डीपासून कुर्डूपेठेपर्यंत लाईटचे टॉवर्स गेले असल्याने आणि गावक-यांच्या रोजच्या वापरामुळे वाट व्यवस्थित मळलेली आहे. पण तरीही पहिल्यांदा जात असल्यास गावातील माहितगार माणूस जरूर बरोबर घ्यावा. उंबर्डीपासून एक ओढा ओलांडून आम्ही आता मुख्य पायवाटेला लागलो होतो. सह्याद्रीचं हिरव्या रंगात न्हाऊन निघालेलं हिरवागार रूप डोळ्याचं पारणं फेडत होतं. राकेश वाटेत आम्हाला त्याच्या पोलिओ डोस उपक्रमाची माहिती देत चालला होता. उंबर्डी ते गडाच्या माचीवरची कुर्डूपेठ हा प्रवास नितांत सुंदर आहे. सह्याद्रीचे अनेक रंग ही पायवाट आपल्याला पावसाळ्यात दाखवते आणि इथे आल्याचं सार्थक करते !! पायथ्याहून निघाल्यापासून दीड तासात आम्ही कुर्डूपेठेत दाखल झालो.राकेश आणि ज्ञानेश्वरने इथेच आमचा निरोप घेतला आणि घरी जेवल्याशिवाय पुढे जाऊ नका असा प्रेमळ निरोप देऊन दोघं आपापल्या कामाला निघून गेले. विश्रामगडाचं कुर्डूपेठेतून दिसणारं रूप कोणत्या शब्दात वर्णावं !!!! डोक्यावर निळ्या आभाळाचा पसरलेला विलक्षण सुंदर विस्तार… पायथ्याला वा-याच्या सोबतीने डोलणारी कोकणच्या वाड्यांमधली हिरवीगार भातखाचरं… आणि त्यांच्या पार्श्वभूमीवर सह्याद्रीचं असीम रूप पेश करणारा हिरवागार सुळका… आजही ते निखालस सुंदर दृश्य डोळ्यासमोर आहे… कारण एकदा पाहिल्यावर समोरच्याचं भान हरपून टाकण्याची विलक्षण किमयाच त्या निसर्गामध्ये सामावली आहे !!!

कुर्डूपेठेतून दिसणारं विश्रामगडाचं अविस्मरणीय रूप

कुर्डूपेठेतून दिसणारी लिंग्या घाटाची डोंगररांग

कुर्डूपेठेचा बहरलेला प्रदेश आणि झाडीत दिसणारं कुर्डाई देवीचं कौलारू मंदिर

कुर्डाई देवीचं कौलारू मंदिर आणि मागे विश्रामगड

कुर्डूपेठ या गावाला ऐतिहासिक दृष्टया एक खूप छान महत्व प्राप्त झाले आहे. एक म्हणजे शिवाजी महाराजांचे पराक्रमी सरदार बाजी पासलकर यांच्या विश्रांतीचं ठिकाण म्हणजे कुर्डूपेठ. यामुळेच मूळ "कुर्डूगड" हे नाव असणा-या या गडाला विश्रामगड हे नाव बहाल झालं. बाजींचं मूळ गाव असणारं मोसे हे विश्रामगडाच्या मागच्या अंगाला आहे. मोसे खो-यातून लिंग्या / कुर्डूघाट / देवघाट उतरला की आपण थेट कुर्डूठेत येउन दाखल होतो. पुण्याहून धामणव्हळ किंवा स्थानिक भाषेतील धामणओहोळ या गावापर्यंत मुक्कामी एस.टी आहे. धामणव्हळला मुक्कामी येउन तिथून दुस-या दिवशी लिंग्या घाटाने विश्रामगड असाही ट्रेक करता येतो. विश्रामगड पायथ्याच्या जिते या गावातून निघून पानशेत जवळच्या दापसर गावात नेउन सोडणारा थिबथिबा नावाचा घाटही या भागात आहे. विश्रामगडाच्या समृध्द आणि रमणीय प्रदेशामुळे बाजींना या ठिकाणाची भुरळ पडली नसती तरच नवल !!! पण कुर्डूपेठेचं महत्व एवढयावरच संपत नाही. शिवाजीराजांचा धडाडीचा सरदार येसाजी कंक याचं कुर्डूपेठ हे जन्मस्थान !!! त्यामुळे आडवाटेला असूनही कुर्डूपेठेचं महत्व विश्रामगडासारख्या बहारदार किल्ल्याने तर वृद्धिंगत केलेलंच आहे परंतु शिवाजीमहाराजांच्या या दोन अतुलनीय वीरांमुळेही कुर्डूपेठेने आपली खास ओळख इतिहासात निर्माण केली आहे.

कुर्डूपेठ गावातून आपण किल्ल्याच्या दिशेला बाहेर पडलो की शेतातून वाट काढत आपण कुर्डाई देवीच्या मंदिरापाशी येउन पोहोचतो. कुर्डाई देवीच्या नावावरूनच विश्रामगडाला कुर्डूगड हे आणखी एक नाव आहे. देवीचं हे कौलारू मंदिर अतिशय स्वछ ठेवलेलं असून मुक्कामासाठी ट्रेकर्सना ही एक सुंदर जागा आहे. मंदिरापासून सरळ गेलो की गडाची छोटीशी चढण चढून पंधरा - वीस मिनिटात आपण गडाच्या उध्वस्त झालेल्या दरवाजात खोदीव पाय-या चढून येतो. ह्या दरवाजात प्रवेश करण्याच्या आधी सुळक्याच्या पायथ्याला एक पाण्याचे टाके आहे. उन्हळ्यात कुर्डूपेठेत पाण्याचं दुर्भिक्ष निर्माण झालं की गावकरी याच टाक्यातल्या पाण्याचा वापर करतात. पुढे दरवाजातून आत प्रवेश केल्यावर एक वाट सरळ जाते तर एक उजवीकडे जाते. उजवीकडच्या वाटेने म्हणजेच किल्ला डावीकडे ठेवत गेल्यावर सुरुवातीला एक बुरुज आहे. बुरुजावरून पुढे गेल्यावर पाण्याची काही टाकी आणि सुळक्याच्या पोटात एक गुहा खोदलेली दिसते. पुन्हा फिरून आपण दरवाजापाशी आलो की आता सरळ जाणा-या पायवाटेने जायला सुरुवात करायची. या वाटेवर उजवीकडे एक कोरडे खांबटाके आहे. इथून सुळका उजवीकडे ठेवत आपण पुढे गेलो की समोरच हनुमंताची मिशा असलेली आणि कमरेला खंजीर असलेली मूर्ती आहे. रसाळगड,सुरगड वगैरे गडांवरच्या हनुमंताच्या मूर्तींशी कमालीचे साम्य दर्शवणारी ही मूर्ती आहे. मूर्तीच्या पुढे किल्ल्याच्या पोटातून करावी लागणारी वाटचाल मात्र अतिशय जपून करावी कारण इथे बहुदा गडाची दरड कोसळल्याने अतिशय धारदार अशा दगडांच्या ढिगा-यातून हा मार्ग पुढे गेला आहे. ब-याचदा चार पाच फुट उंचीचे दगडही आपला मार्ग अडवतात पण योग्य आणि सुरक्षित वाट शोधून आपण पुढे जात राहायचं. या मार्गावर शंभर लोक मावतील अशी एक नैसर्गिक गुहा असून त्यातही या धारदार दगडांचे साम्राज्य असल्याने ती मुक्कामायोग्य नाही. तात्पुरता आसरा म्हणून उत्तम. या गुहेच्या समोरच पाण्याची दोन टाकी खोदलेली आहेत. इथून पुढे गेलो की गडाचा सर्वात शेवटचा आणि भक्कम अवस्थेत उभा असलेला बुरुज असून याला स्थानिक लोक त्या हनुमान मूर्तीमुळे "हनुमान बुरुज" या नावाने ओळखतात. या बुरुजाकडून किल्ल्याकडे पाहिलं की घनगडला आहे अगदी तशाच प्रकारचा एक मोठा प्रस्तर गडावरून निखळला आहे आणि अलगद गडाच्या सुळक्याला चिकटला आहे. विश्रामगडाचा मुख्य सुळका आणि हा प्रस्तर यांच्यामध्ये एक छोटा घसारा पार करून पाच - दहा मिनिटात पोचता येतं आणि इथे आल्यावर डोळ्याचं पारणं फेडणारी आणि नैसर्गिक आकाराने अजूनच मोहात पडणारी कोकण खिडकी आपल्याला दिसते !!! ही कोकण खिडकी म्हणजे काय हे इथे सांगण्यापेक्षा प्रत्यक्ष पाहण्यात कितीतरी पट जास्त आनंद आहे.इथे थोडं वरच्या बाजूला मधमाशांची पोळी असून योग्य ती खबरदारी नक्कीच घ्यायला हवी. पण तरीही ही जागा केवळ अप्रतिम आहे. लिंग्या घाटाचे बहरलेले कडे आणि त्यातून कोसळणारे पांढरेशुभ्र धबधबे हा नजर म्हणजे आपल्या विश्रामगड भेटीचं सर्वार्थाने झालेलं सार्थक !!! कोकण खिडकीपासून खाली मगाशी बघितलेली सुळक्याच्या विरुद्ध अंगाला असणारी टाकीही दिसतात. विश्रामगडाच्या दरवाजात पोचल्यापासून हा संपूर्ण परिसर फिरण्यास एक - दीड तास लागतो.

कुर्डाई देवीच्या मंदिराच्या बाहेरचं गजांतलक्ष्मी / गजलक्ष्मीचं शिल्प

मुख्य पायवाटेवरून दिसणारा विश्रामगड

विश्रामगडाचं भग्न प्रवेशद्वार

विश्रामगडावरून दिसणारं छोटंसं कुर्डूपेठ गाव, कुर्डाई देवीचं मंदिर आणि गडाकडे येणारी पायवाट

विश्रामगडावरील हनुमंताची मूर्ती

गडाच्या सुळक्याच्या पोटातील दगडांनी भरलेली गुहा

हनुमंत बुरुज

विश्रामगडाला चिकटलेला प्रस्तर व त्याकडे नेणारी पायवाट

विश्रामगडाचं सगळ्यात प्रमुख आकर्षण असणारी "कोकण खिडकी" !!!

अकरा वाजत आले होते. विश्रामगडाच्या पलीकडून मानगडाची साद ऐकू आली आणि आम्ही विश्रामगडाचा माथा सोडला. वरच्या फोटोंवरून तुमच्या लक्षात आलंच असेल की पावसाळ्यात एक अभूतपूर्व अनुभूती देणारा विश्रामगड हा रायगड जिल्ह्यातला सर्वांगसुंदर आणि अविस्मरणीय किल्ला आहे !!! तासाभरात गड उतरून आम्ही उंबर्डीमध्ये परतलो. राम हळदेंच्या घरासमोर पाऊल टाकताच "आलात का…. चला हातपाय धुवून घ्या आणि जेवायला बसा." अशी घरची आठवण करून देणारी हाक ऐकायला आली !!! सह्याद्रीच्या कुठल्याही कडेकपा-यात जा… समोर उभा असलेला जीव आपला का परका याची पर्वा न करता मायेनं रांधून वाढणारे हात अजूनही आहेत आणि ते आहेत म्हणून आपण आहोत !!! पाचव्या मिनिटाला आमच्या समोर वाफाळलेला आंबेमोहोर भात आणि वरून गरम गरम आमटी वाढलेलं ताट आलं होतं. विश्रामगड उतरताना पाऊस जरी नसला तरी घोंघावणा-या थंडगार वा-यांनी मात्र आमची हाडं खिळखिळी केली होती. कुडकुडत हळदेंच्या घरात शिरलेले आम्ही आणि त्यात समोर आलेलं हे पूर्णब्रम्ह !!! स्वर्गसुख म्हणतात ते हेच का हो ?? अर्धा तास माझ्या आणि देवेशच्या तोंडून अवाक्षरही उच्चारलं गेलं नाही कारण हळदेमामी वाढत होत्या आणि आम्ही ओरपत होतो. वरून लोणचं,पापड,कोशिंबीर वगैरेचे लाड होतेच. "माझ्या पोरांसारखी पोरं तुम्ही. एवढ्याश्या आमटी - भाताचे पैसे घेतले तर "तो" माफ करेल का आम्हाला. आता पुढच्या वेळेला अजून लोकांना घेऊन या. फक्कड बेत जमवू काहीतरी. आमची आठवण ठेवा !!!" शहरी मनोवृत्तीला बसलेली एक सणसणीत चपराक !!! शहरीकरणाचं वारं लागलेले गडकिल्ले आणि तिथले "सायेब तेवढया एक्ष्ट्रा घेतलेल्या पापडाचे पाच रुपये झाले बरं का " म्हणणारे ऐतखाऊ स्थानिक एकीकडे आणि "माझ्या पोरांसारखेच आहात तुम्ही. " म्हणणारी निरागस…निर्व्याज मनं एकीकडे. काळाचा महिमा… दुसरं काय !!!

विश्रामगडाचा एक अनोखा Contrast !!!

उंबर्डीहून तृप्त मनाने आम्ही निघालो. आता मानगडाचे वेध लागले होते. उंबर्डीमधून पुन्हा शिरवली फाट्याला येउन तिथून आम्ही माणगावचा रस्ता धरला. आता निजामपूर मार्गे मानगड पायथ्याची मशिदवाडी गाठायची होती. हा प्रवास साधारणपणे तासाभराचा आहे पण कोकणातल्या लाजवाब निसर्गामुळे वेळ कसा जातो ते कळतच नाही. माणगाव तालुक्यातला एक छोटासाच पण भौगोलिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचा किल्ला म्हणजे मानगड. रायगडासारख्या राजधानीच्या किल्ल्याच्या प्रभावळीत चांभारगड,सोनगड,दौलतगड(दासगावचा किल्ला) इत्यादी किल्ल्यांची जी वर्णी लागली आहे त्यात मानगडचाही समावेश आहे. निजामपूर गावातून दोन रस्ते फुटतात. एक रस्ता रायगड पायथ्याच्या पाचाड गावात जातो तर दुसरा मानगड पायथ्याच्या मशिदवाडीमध्ये येउन थांबतो. माणगाव जवळचं निजामपूर आणि रायगड पायथ्याचं छत्री निजामपूर ही दोन्ही गावं रायगड जिल्ह्यातच आणि रायगडाच्या परिसरातच येत असली तरी पूर्णपणे वेगळी आणि एकमेकांपासून बरीच लांब आहेत. निजामपूर ते मशिदवाडी हे अंतर साधारणपणे सात - आठ किलोमीटर्सचे आहे. सध्या मुंबईच्या "दुर्गवीर प्रतिष्ठान " (www.durgveer.com) या संस्थेने गडाच्या संवर्धनाचे काम हाती घेतले असून निजामपूर ते मशिदवाडी या संपूर्ण रस्त्यावर त्यांनी मानगडची दिशा दर्शवणारे फलक लावले आहेत. त्यामुळे मशिदवाडी पर्यंतचा रस्ता शोधताना कोणतीही अडचण येत नाही. एक मात्र आहे. निजामपूर वरून निघाल्यापासून बोरवाडी या गावानंतरचा मशिदवाडीपर्यंतचा रस्ता डांबरी असला तरी अत्यंत अरुंद आहे. त्यामुळे आपल्या वाहनाच्या आकाराप्रमाणे तसाच ड्रायव्हरच्या अंदाजाप्रमाणे या रस्त्यावरून गाडी हाकावी अन्यथा गाडी चालवण्यास अत्यंत त्रास होऊ शकतो. तसेच समोरून कार सारखे छोटे वाहनही आल्यास गाडी मागे घेणे जिकीरीचे आहे. त्यामुळे ही गोष्ट लक्षात घेऊन मशिदवाडी पर्यंत गाडी घेऊन जावी अन्यथा सोयीच्या जागी पार्क करून चालतही जाता येईल. मशिदवाडीच्या अलीकडे एक पुरातन शिवमंदिर असून दुर्गवीरच्या सदस्यांनी त्याचेही संवर्धन उत्तमरीत्या केले आहे. या मंदिरास सुमारे तीन - साडेतीन फुट उंचीचा चौथरा असून त्यावर एक भव्य आकाराचा नंदी व समोर भग्न शिवपिंड आहे. मंदिराच्या परिसरात वीरगळींचे कोरीव दगडही पाहायला मिळतात.मानगड ट्रेकच्या वेळी हे मंदिर अवश्य बघण्यासारखं आहे.

(आम्ही केलेल्या विश्रामगड - मानगड या ट्रेकच्या वेळी दुर्गवीर संस्थेचे काम मानगडावर अद्याप सुरु व्हायचे होते. मानगडवर मी दुर्गवीरचे काम सुरु असतानाही गेलेलो आहे. त्यामुळे प्रस्तुत लेखातील मानगडाची माहिती गडाच्या संवर्धनाच्या नंतरची असून काही फोटो विश्रामगड - मानगड ट्रेक मधील म्हणजे पावसाळ्यातील व काही फोटो नंतरच्या मानगड भेटीचे म्हणजेच हिवाळ्यातील आहेत. हिवाळ्यातील फोटो हे गडावरील अवशेष नीट दिसावेत यासाठी रेफरन्स म्हणून दिले आहेत. अनुभवकथन मात्र विश्रामगड - मानगड ट्रेकच्या वेळचे आहे. )

मशिदवाडीच्या रस्त्यावरून मानगड

मशिदवाडीतून मानगड

मशिदवाडीच्या अलीकडील पुरातन शिवमंदिरातील भव्य नंदी

मंदिरातील भग्न शिवलिंग

मंदिर परिसरातील वीरगळींचे कोरीव दगड

आम्ही मशिदवाडीत पोचलो तेव्हा दीड वाजत आला होता. मानगड तेव्हा फार प्रसिद्ध नसल्याने त्याच्या भेटीसाठी येणा-या ट्रेकर्सकडे विचित्र नजरेने पहायची पद्धत असावी. मशिदवाडीच्या एका घरासमोर गाडी लावताच एक मध्यमवयीन काका आणि त्यांच्या सौ बाहेर आल्या. कॉलेजात शिकणारी दोन पोरं….अंगावर मळके कपडे आणि बाईकवर ह्या आडवाटेच्या गावात आलेले बघून हे दोघं शिक्षणाला कंटाळून घरातून पळून आले असावेत असले काहीतरी भाव त्यांच्या चेहे-यांवर स्पष्ट दिसत होते !! "कोनाकडे आलाय गावात??" अपेक्षित प्रश्न आला. "गावात नाही. गडावर आलोय. वाट कुठून आहे ??" "वाट लय वंगाळ हाये. मानुस घेऊन जावा गावातून. " आता आश्चर्य करायची पाळी आमची होती. वरच्या फोटोत दिसतोय त्याच उंचीचा मानगड. हा बघायला वाटाड्या ?? आम्ही आमच्याच कर्माला मनातल्या मनात दोष दिला. काही सेकंद अशीच गेली. "तुम्ही वाट सांगा. आम्ही जातो बरोबर." "तुम्ही काय आयकायचे नाय. एक काम करा. या वोढ्यातून सरळ जावा. मंदिर लागल इंझाईचं (विंझाई देवी). तिथून मंग वर व्हा. वीस मिनिटात गडावर !!!" आम्हाला हेच हवं होतं. पडत्या फळाची आज्ञा स्वीकारून आम्ही गडाची वाट तुडवायला सुरुवात केली. मानगडाच्या त्या अतिप्रशस्त वाटेवरून एक ओढा खाली येत होता. अत्यंत सोप्या असलेल्या त्या "वंगाळ" वाटेने दहा मिनिटात आम्ही विंझाई देवीचं मंदिर गाठलं. सह्याद्रीच्या कड्यांनी चहूबाजूंनी वेढलं गेलेलं शांत कौलारू देवस्थान !!! आजूबाजूला फक्त वाहणा-या वा-याचा आवाज आणि त्यामुळे होणारी पानांची सळसळ.बाकी पूर्ण…निश:ब्द शांतता. विंझाई देवीच्या मंदिरात देवीची मूर्ती असून मंदिराच्या बाहेर दोन मूर्त्या आणि दगडी दीपमाळ आहे. वेळेच्या बरंच पुढे असल्याने आणि निवांत वेळ हाताशी असल्याने आमचा तळ वीस मिनिटांसाठी मंदिराच्या आवारात पडला. देवेशने बसल्या बसल्या विषय तरी काय काढावा. तो विषय विंझाईच काय पण जगातल्या कोणत्याही देवळात बोलण्यासारखा नव्हता (गैरसमज नको. फेसबुकवरची हिरवळ इतका साधा सरळ आणि शाकाहारी विषय होता. हाताशी असलेला वेळ आणि टेकायला मिळालेलं निवांत ठिकाण याचा परिणाम देवेशवर झाला असावा !!!).

दुर्गवीरने लावलेला दिशादर्शक फलक

गडाच्या दिशेने गेलेली प्रशस्त वाट

विंझाई देवी मंदिर

मंदिर परिसरातील कोरीव मूर्त्या व छोटी दगडी दीपमाळ

मंदिर परिसरातील मानगडाविषयीचा माहिती फलक

मानगड दरवाजाकडे नेणा-या खोदीव पावट्या

मानगडाचा मुख्य दरवाजा

विंझाई मंदिरापासून खोदीव पावट्यांच्या मार्गाने मोजून पाच मिनिटात आम्ही गडाचा दरवाजा गाठला. दरवाजा पडलेला असला तरी बाजूचे दोन बुरुज मात्र भक्कम आहेत. मानगडच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर डावीकडे आणि उजवीकडे अशा दोन पायवाटा गेल्या आहेत. दरवाजाची कमान दरवाजाच्या आतच एका बाजूला ठेवलेली असून त्याच्यावर मासा आणि कमळाच्या फुलाचे शिल्प कोरलेलं आहे. दरवाजातून डावीकडच्या पायवाटेने गेलं की समोरच धान्यकोठारासदृश दिसणारी खोली असून या खोलीच्या बाहेरच्या बाजूला एक आणि समोरच्या बाजूला एक अशी दोन पाण्याची टाकी आहेत. या टाक्यांपासून सरळ गेल्यावर "गडाच्या माथ्याकडे" अशी एक पाटी लावलेली असून केवळ आपण या वाटेने दोन ते तीन मिनिटात खोदिव पावट्यांच्या आधाराने गडमाथ्यावर म्हणजेच झेंडा लावलेल्या जागी पोहोचतो. मुख्य दरवाजाच्या उजवीकडूनही व्यवस्थित खोदलेल्या पाय-यांच्या वाटेने गडमाथा गाठता येतो पण उतरताना त्या बाजूने उतरल्यास पूर्ण गड व्यवस्थित फिरता येतो. दरवाजातून उजवीकडे जाणा-या पाय-यांच्या वाटेने मी आणि देवेश दहा मिनिटात गडमाथ्यावर पोहोचलो. गडमाथ्यावर बांधकामांची काही उध्वस्त जोती असून जवळच एक पिराचं स्थानही आहे. या पिरासमोर एक विस्तीर्ण पटांगण असून इथे शिवकाळात तलवारबाजी व लाठी - काठीचे खेळ / सराव केला जात असे असे तज्ञांचे मत आहे. गडावर मंदिराचेही अवशेष बघण्यास मिळतात. मशिदवाडी गाव उजवीकडे ठेवत आपण पुढे गेलो की उजवीकडे आपल्याला पाण्याची दोन टाकी बघायला मिळतात. त्याच्याच पुढे झेंडा लावलेला बुरुज आहे. आम्ही या बुरुजावर पोहोचलो. आभाळ कृष्णमेघांनी झाकोळून गेलं होतं. पायथ्याच्या मशिदवाडीतली लाल कौलांची घरं आजूबाजूच्या हिरव्यागार पार्श्वभूमीवर खुलून दिसत होती. डावीकडच्या धन्वीच्या जुळ्या शिखरांचही अप्रतिम दर्शन या बुरुजावरून होत होतं. हवा स्वछ असल्यास चांभारगड,सोनगड आणि तळा किल्ल्यापर्यंत प्रदेश दिसू शकतो.

मुख्य दरवाजाशेजारच्या तटावरील बुरुज

मानगडच्या प्रवेशद्वारात लावलेला गडाचा सविस्तर नकाशा

मानगडवरील धान्यकोठाराची खोली

कोठारासमोरील पाण्याचे टाके

गडावरील पीराचे स्थान

गडावरील भग्न जोत्यांचे अवशेष

ध्वजस्तंभा शेजारील पाण्याचे टाके. याच्या शेजारी आणखी एक टाके आहे.

गडावरील दगड. याचे प्रयोजन कळू शकले नाही.

गर्द हिरवळीत निवांत पहुडलेलं मशिदवाडी गाव

मानगडावरून दिसणारी धन्वीची जुळी शिखरं आणि कुंभ्या घाटाची रांग

मानगडचा माथा अगदीच आटोपशीर असून तासाभरात पूर्ण अवशेष बघता येतात. आता आपण जर कोठाराच्या बाजूच्या शॉर्टकटने वर आला असाल तर पाय-यांच्या वाटेने खाली उतरायचं.पण पूर्ण किल्ला उतरायचा नाही कारण मानगडचं मुख्य आकर्षण अजून बाकी आहे. आपण गडमाथा थोडासा उतरून निजामपूर / बोरवाडीच्या दिशेला जायला लागलो की उजवीकडे पाण्याच्या टाक्यांची मालिकाच लागते. या वाटेने आपण सरळ गेलो की समोर येतो तो गडाचा चोर दरवाजा किंवा गुप्त दरवाजा. दुर्गवीरच्या सदस्यांना गडावरील श्रमदानाच्या वेळी काही पाय-या आढळून आल्या. उत्सुकता शिगेला पोहचून त्यांनी इथली माती दूर केल्यानंतर गडाचा चोर दरवाजा सापडला आणि मानगडचं आत्तापर्यंत अज्ञातात असलेलं एक वास्तुवैभव प्रकाशात आलं !!! स्थानिकांच्या मते या दरवाजातून खाली जाणारी वाट चाच या गावात उतरते. मानगडचा हा सुंदर असा चोरदरवाजा बघायचा आणि पुन्हा महादरवाजापाशी यायचं. संपूर्ण गडफेरी व्यवस्थित करण्यास दोन तास पुरतात.

गडाच्या चोर दरवाजाकडे जाताना लागणारी पाण्याची टाकी

मानगडचा नुकताच प्रकाशात आलेला चोर / गुप्त दरवाजा

(मानगडवरील सद्यस्थितीतल्या संपूर्ण अवशेषांची माहिती सविस्तर देणारा आणि गडाचा कानाकोपरा फिरवून आणणारा छोटेखानी मानगड हा माझा लेख लोकसत्ता मध्ये प्रसिद्ध झाला आहे. दुर्गप्रेमींना मानगड भ्रमंतीच्या वेळी या लेखाची नक्की मदत होईल.)

आम्ही पुन्हा महादरवाजापाशी परतलो. आकाशात ढगांचा प्रचंड गडगडाट व्हायला सुरुवात झाली होती. एका क्षणी अक्षरश: कानठळ्या बसवणारा आवाज झाला !! वीजाही चमकू लागल्या होत्या. लवकरात लवकर मशिदवाडी गाठणं श्रेयस्कर होतं. पण दिवसभर पावसाच्या शिडकाव्यापासून वंचित असलेल्या आम्हा दोघांना मानगड उतरतानाच्या पंधरा - वीस मिनिटातही पावसाने असं काही झोडपलं की त्याला सुमार नाही !!! मुसळधार वगैरे शब्दांनाही लाजवेल असा तुफान पाऊस मानगडाच्या परिसरात सुरु झाला होता.आजपर्यंतच्या भटकंतीमधला सर्वात लक्षात राहिलेला पाऊस कोणता असं विचारलं तर मी कसलाही विचार न करता मानगड हे उत्तर देऊन मोकळा होईन !! मशिदवाडीत नखशिखांत भिजून परतल्यावर ज्यांच्या घरासमोर गाडी लावली होती त्यांची ओसरी धावतच गाठली आणि आमच्या अवताराकडे त्यांनाही बघवत नाहीये हे त्या स्थितीतही माझ्या लक्षात आलं. घरातल्या वृध्द आजींच्या तोंडचं "बया बया बया… आरं पाऊस लागलाय का काय !!! प्वोरांनो ह्यो गाडीवर घरी कसे जानार रे तुमी. आज तुमचं घरी पोचनं लई कठीन हाये. आज मुक्कामाला रावा हिथंच. उद्या पहाटेला निगा घराकडं !!!" हे वाक्य पावसाच्या तांडवाला पुष्टी देणारं होतं. पावसाचा जोर वाढतच चालला होता. त्यात बाहेरून आलेल्या त्यांच्या कोणा ओळखीच्या माणसाने "ताम्हिणी मध्ये ट्यांपो आडवा झालाय. त्यात पावसानं ट्राफिक जाम केलंय समदं." ही दिलेली बातमी म्हणजे कहरच होता. पुण्याला परतायचा जवळचा मार्गही हातातून गेला !!!! या सगळ्यात सुख देणारी एकच गोष्ट होती आणि ती म्हणजे त्या घरातून आलेला वाफाळता चहा आणि गरमागरम कांदेपोह्यांची डिश !!! त्यांचे आभार कसे मानावेत हेच कळेना. पाऊस काही केल्या कमी होत नव्हता. साडेतीन वाजत आले होते. शेवटी वरंधा घाटातून पुणे गाठणे हा शेवटचा पर्याय उरला होता. त्या परिवाराचा निरोप घेऊन आम्ही निघालो. त्यात पुन्हा देवेशला बाईक चालवता येत नसल्याने संपूर्ण सारथ्य माझ्याकडेच होतं. मशिदवाडी ते निजामपूर आणि निजामपूर ते माणगाव या सुमारे वीस किलोमीटर्सच्या प्रवासात आम्हाला जो काही पाऊस लागलाय तो मी शब्दात वर्णन करणं खरोखरंच कठीण आहे. बाकी बाईकवाल्यांचीही स्थिती आमच्यापेक्षा वेगळी नव्हती. कार असलेल्यांचा मला विलक्षण हेवा,असूया मत्सर वगैरे कधी वाटला असेल तर तो ह्या प्रवासात !!! आम्ही मुंबई - गोवा हायवेला लागलो. माणगाव - महाड रस्ता कोरडा ठणठणीत. पावसाचा एक टिपूस नव्हता !!! आम्ही मात्र पावसात पेशली भिजवून आणल्यासारखे दिसत होतो. महाडमध्ये पोचल्यावर सगळ्यात आधी आम्ही काय केलं असेल तर परहेड दोन कप चहा आणि दोन वडापाव पोटात ढकलले आणि मगच वरंध्याच्या रस्त्याला लागलो. बिरवाडी ते वरंध माथा हा प्रवास आजूबाजूच्या हिरव्यागार सह्यकड्यांनी आणि खोल कोसळणा-या पांढ-याशुभ्र धबधब्यांनी अतिशय सुसह्य केला !!! वाघजाई मंदिरापासून कावळ्याचा कडा अप्रतिम दिसत होता. वरंध घाट ते भोर हा दीड-दोन तासांचा वळणावळणाचा रस्ता कमालीचा कंटाळवाणा आणि गाडी चालवणा-याच्या संयमाची कसोटी पाहणारा आहे.वरंध घाटमाथ्यावर थोडया वेळासाठी ढगांमध्ये विसावलेला पाऊस पुन्हा कोसळायला सुरुवात झाली होता. एका क्षणी गाडी चालवण्याचा जेव्हा विलक्षण कंटाळा आला…तेव्हा पुणे अजूनही १०० किलोमीटर्सवर राहिलं होतं !!!

वरंध घाटातून दिसणारा कावळ्या किल्ला

हिरव्या रंगाने रंगलेला बहारदार वरंध घाट !!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्यातल्याच एका सुबक ठेंगणीने आमच्याकडे अगदी अगतिक चेहेरा करून पाहत विचारलं. आता माहित नसलेल्या रस्त्यावर उगाच कशाला आपली आय (२०) घालायची असा प्रश्न मला पडला इतकंच !!!
Rofl Rofl Rofl

अफाट...जबरी...

सॉलिड लिहितोस रे तू .... एकदम खंगरी ....
फोटुही भारी ....

जगातले सगळेच लोक दुस-यात चांगलं काय हे बघतात. नावं ठेवण्याचं डिपार्टमेंट पण कोणीतरी सांभाळायला हवं असल्याने आम्हा पुण्याच्या लोकांना मिळालेली ही दैवी देणगी आहे !!! >>>>> क्लासच ....

मस्त लेख व प्रचित्रे. सुंदर!!
मला तुझी सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे तुझ्या सगळ्या गडभटकंतीमध्ये स्थानिक गांवकर्‍यांशी असलेला तुझा संवाद.. आणि नंतरही त्यांच्याशी ठेवलेला संपर्क..
हल्ली कॉर्पोरेट लोकांच्या बशी किंवा कार भरुन येतात आणि त्यांच्यातलाच एखाददोन ट्रेक केलेला लंगडा बैलोबा स्थानिकांना डावलून किल्ल्यावर त्यांना घेऊन जातो. स्थानिकांशी संवाद नाही, त्यामुळे त्यांच्या अडचणी कळत नाहीत, वर त्यांना प्रत्येक गोष्ट पैशात मोजायला हे शिकवतात. संवाद केलाच तर आप्पलपोटेपणाचा, स्वार्थी गोष्टींचा असतो...
श्या:! किळस येते अशा लोकांची..!!

मला तुझी सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे तुझ्या सगळ्या गडभटकंतीमध्ये स्थानिक गांवकर्‍यांशी असलेला तुझा संवाद.. आणि नंतरही त्यांच्याशी ठेवलेला संपर्क.. + १००

मला तुझी सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे तुझ्या सगळ्या गडभटकंतीमध्ये स्थानिक गांवकर्‍यांशी असलेला तुझा संवाद.. आणि नंतरही त्यांच्याशी ठेवलेला संपर्क.. << +१

हेम Happy

एकदम झ्याक्क!!!

मला तुझी सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे तुझ्या सगळ्या गडभटकंतीमध्ये स्थानिक गांवकर्‍यांशी असलेला तुझा संवाद.. आणि नंतरही त्यांच्याशी ठेवलेला संपर्क.. >> +११०

वर्णन फार छान
प्रचि - वर्णनातीत सुंदर आहेत.

रश्मी धागा वर काढल्याबद्दल धन्यवाद.

पुण्यात बाहेरुन येऊन कंपनीत काम करणारी सात आठ पोरं 1 तारखेला सुट्टी आहे म्हणुन सोशल मिडीयावर रील्स बघुन हरीश्चंद्रगड ला जातात. खिरेश्वर मार्गे दुपारी तीन च्या आसपास गड चढायला लागतात. पास सहा वाजले तरी आपण गडावर का पोहोचत नाही हे लक्षात येत. हरीश्चंद्र गडाचा घेरा भयंकर मोठा त्यात पर्जन्यकाळी भयंकर पाऊस, धुक्याची दाट-दडप चादर, गवत प्रचंड माजलेलं असल्याने पायवाटा या काळात गायब होतात. अशात ही पोरं रस्ता चुकतात. फोन ला नेटवर्क नाही. अशातच रात्र होते. अंधार पडतो.सोबत खायला-प्यायला नाही. सोबत रेनकोट नाही वरुन पाउस चालु गारटा वाढतो. रात्रभर जागीच बसुन काढतात.
दुसरा दिवस पण तसाच जातो ना रस्ता सापडतो ना कोणी भेटतो. शरीरात त्राण राहत नाही. विषय जिवाशी येतो. ऊपाशी पोटी कीती राहणार ना वरुन मुसळधार पाऊस,असह्य थंडी,हातभर अंतरावरच दिसणार नाही इतकं धुकं. याला कंटाळुन एकजण जीव सोडतो. त्यचा म्रुतदेहाच काय करणार ती लोकं तसाच दुसरा दिवस काढतात.
तिसर्या दिवस म्हणजे आज कसातरी संपर्क झालाय त्यांना. ( यावर सविस्तर लिहीन ) सर्वांना खाली आणलं गेलय. एकाचा जिव गेलेला आहे चार जण दवाखाण्यात ऊपचार घेत आहेत. विषेश म्हणजे यामध्ये एक मुलगा अवघ्या अकरा वर्षाचा आहे.
सोशल मिडीया वरचा सह्याद्री अन गडकील्ले खुप वेगळे आहेत आणि प्रत्यक्षात खुप बाबानो. मी अनेक वेळा हरीश्चंद्रगड ला गेलेलो असताना देखील 6 जुन 2021 बालेकील्ल्याकडे जाताना दोनतीन तास हरवलो होतो. सगळी माहीती असेल तरच ट्रेकींग जा भावांनो. विषय जीवाशी येऊ शकतो.
- सागर काळे

कुठे लिहावे हे न कळल्याने इथे छापले. आशा आहे की या बाफाचे लेखक रुष्ट होणार नाहीत. नवख्यांनी काळजी घ्यावी इतकेच

बाप रे! भयानक आहे. हो, हरिश्चंद्र गडावर बरेच जण चुकतात, तिथल्या वाटा खूप फसव्या आहेत आणि पावसाळ्यात तर माहितीतल्या वाटा बंद पडल्या की अजून पंचाईत होते. एका दिवसात जिवावर बेतले म्हणजे हवामान फारच खराब असणार. हृदयद्रावक प्रसंग ... कुणावरही न येवो.